वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g94 १०/८ पृ. ३-६
  • शिष्टाचार याचा लय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शिष्टाचार याचा लय
  • सावध राहा!—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परिपूर्ण उदाहरण
  • देवाचे सेवक या नात्याने सभ्यपणे वागणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • शिष्टाचार—देवाच्या लोकांचा खास गुण
    आमची राज्य सेवा—२००१
  • शिष्टाचार ‘नव नीतीने’ धिक्कारलेला?
    सावध राहा!—१९९४
  • पालकांनो—आपल्या मुलांपुढे उत्तम आदर्श ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९४
g94 १०/८ पृ. ३-६

शिष्टाचार याचा लय

लाखो लोक अजूनही चांगला शिष्टाचार आचरतात. इतर करोडो मात्र त्याला पायदळी तुडवतात.

हे शतक आरंभले तेव्हा शिष्टाचाराने चुकीची दिशा घेतली, द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका या ग्रंथाच्या मते: “१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या आरंभाला समाजातील श्रेष्ठ लोक शिष्टाचाराच्या अत्यंत क्षुल्लक मागणीला एकाच वेळी करमणूक व स्त्रियांसाठी तो महत्त्वाचा आचार म्हणून पाहू लागले. या वर्गातील नव्या लोकांमध्ये वेचक वृत्तीची संवेदना निर्माण व्हावी आणि त्यासाठी पात्र नसणाऱ्‍यांना अजाण व दूर ठेवता यावे म्हणून अधिकाधिक सविस्तर आचारसंहिता निर्माण करण्यात आली.”

हे तर चांगल्या आचारसंहितेपेक्षा खूपच वेगळे आहे. शिष्टाचार या विषयामध्ये ॲमी वॉन्डरबिल्ट या सन्माननीय अधिकारी आहेत; त्या शिष्टाचाराचे संपूर्ण नवे पुस्तक (इंग्रजी) यामध्ये लिहितात: “करिंथकरांच्या पहिल्या पत्रातील १३ व्या अध्यायात संत पौलाने प्रेम या विषयाबद्दल जो सुंदर प्रबंध लिहिला त्यात वागणूकीचे सर्वोत्तम नियम आढळून येतात. या नियमांचा वस्त्रप्रावरणांच्या सविस्तर वर्णनांशी किंवा वरकरणी शिष्टाचाराशी काहीएक संबंध नाही. त्यांचा संबंध इतरांच्या भावना व प्रवृत्त्या, दयाळूपणा व विचारशीलपणा याजशी आहे.”

ॲमी वॉन्डरबिल्ट यांनी १ करिंथकर १३:४-८ मधील बायबलच्या उताऱ्‍याचा संदर्भ घेतला होता, जेथे असे वाचले जाते: “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति हेवा करीत नाही; प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते; ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीति कधी अंतर देत नाही.”

अशाप्रकारचे हे प्रेम आज आचरणात आणले जात असल्याचे पाहावयास मिळणे ही केवढी दुर्मिळ गोष्ट असेल! तेव्हा सर्वत्र शिष्टाचार निर्दोष असतील! असा हा शिष्टाचार शिकवणे व शिकून घेण्याचे उगमस्थान ख्रिस्ती घर हे आहे. कुटुंब हे जणू अशा एका नाजूक यंत्रासारखे आहे, ज्याचे विविध भाग एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. या यंत्राला केवळ चांगले वंगण लावल्यामुळे ते सुरळीतपणे चालू शकते. याचप्रमाणे मदतगार, सौजन्यपूर्ण, गोड व विनम्र राहण्याचे माहीत असणे या गोष्टी आनंदी घर तयार करण्यात महत्त्वपूर्ण आहेत. सौजन्यशीलता व विचारपूर्वकता दाखवणारे सर्वसामान्य बोल, जसे की, “आभारी आहे,” “कृपा करून,” “मला क्षमा करा,” “मला वाईट वाटतं,”—आमच्या संगतीत उद्‌भवणाऱ्‍या नाशकारक चकमकींना काढून टाकण्यात मदत करतील. हे बोल लहान, पण त्यांचा अर्थ मात्र महान आहे. ते सर्वांनाच बोलता येतात. त्याला काहीच किंमत पडत नाही, पण त्यामुळे आम्ही मित्र संपादित असतो. आपण आपल्या घरात चांगल्या आचारसंहितेचा दररोज सराव केल्यास, आम्ही कौटुंबिक वर्तुळ सोडून बाहेर समाजात वावरण्यास जातो तेव्हा हा शिष्टाचार आम्हाला सोडणार नाही.

चांगल्या आचारसंहितेत दुसऱ्‍यांच्या भावनांचा विचार राखणे, त्यांना आदर दाखवणे, आपल्याला इतरांनी जसे वागवावे असे वाटते तसेच त्यांनाही वागवणे यांचा समावेश होतो. तथापि, पुष्कळांच्या पाहणीत, शिष्टाचाराचा क्षय झाल्याचे दिसून आले आहे. एका लेखिकेने म्हटले: “आम्हामध्ये सौजन्याचा अभाव आहे, कारण मी-पणाने उचल घेतली आहे.” तत्ववेत्ता ऑ’टूर स्कोपेनहूर यांनी लिहिले: “स्वार्थ ही इतकी भयंकर गोष्ट आहे की, त्याला लपवण्यासाठी आपण विनयशीलता शोधून काढली.” आज पुष्कळांना वाटते की, “विनय” म्हणजे “अशक्‍त” आणि इतरांना प्रथम स्थानी ठेवणे म्हणजे दुर्बळता आहे. १९७० च्या दशकात पुढे आलेल्या मी-पणाच्या वृत्तीमुळेच आज आपण सध्या मी-पणाच्या वृत्तीने जगत नाही का? एका मोठ्या शहराच्या वर्तमानपत्राने म्हटले: “ही समस्या आता या थराला पोहंचली आहे की, सर्वसाधारण सभ्यतेचे वर्णन आता सभ्यता असे करण्याजोगे राहिले नाही.”

लंडनचे डेली मेल वृत्तपत्र कळवते की, साधारण पाच वर्षे वयाची मुले अधिकाधिक भांडखोर, इतर मुलांच्या वस्तुंबद्दल अनादर दाखवणारी, प्रौढांकरता आदर नसलेली आणि गलिच्छ भाषा वापरणारी बनत आहेत. चाचणी घेण्यात आलेल्या बहुतेक शिक्षकांना वाटते की, पालकच मुलांना बिघडवत आहेत आणि हेच असामाजिक वागणूकीच्या वाढीमागील मूळ कारण आहे. आणखी एका चाचणीत मुलाखत घेतलेल्यांपैकी ८६ टक्के शिक्षकांनी “घरांमध्ये स्पष्ट दर्जे व अपेक्षा यांची उणीव” हा ठपका ठेवला. ब्याऐंशी टक्क्‌यांनी, पालकीय उदाहरणाची उणीव कारणीभूत आहे असे दर्शवले. मोडलेली घरे, घटस्फोट, विवाह न करता तसेच एकमेकांसोबत राहणे, सतत दूरदर्शन पाहत राहणे, शिस्त नाही, शिक्षा नाही—या सर्व गोष्टींचा परिणाम शेवटी कुटुंबाचा ऱ्‍हास घडण्यात होतो.

प्राथमिक शाळेच्या एका मुख्याध्यापिकेने म्हटले: “मुलांमध्ये आदर दाखवण्याचा गुण दिसत नाही व याची मला काळजी वाटते. आपल्या मित्रांची मानहानी करणे किंवा प्रौढांना दुखावणे याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. . . . ते या विविध प्रकाराने आपला अनादर व्यक्‍त करतात—चिडवणे, गलिच्छ भाषा, साध्या नियमांचे पालन करण्याचे नाकारणे . . . , खेळात आपल्याकडेच चेंडू टिकवून ठेवणे . . . [दुसऱ्‍या बाजूला पाहता,] काही घरातील मुले दुसऱ्‍यांचा मान राखतात. अर्थात, ती शिक्षकांची लाडकी असतातच असे नाही . . . , पण ती इतरांसोबत आदराने वागतात. दुसरी मुले रांगेत पुढे जाण्यासाठी धडपडत असता ही शांतीने आपली पाळी येईपर्यंत थांबतात . . . मुले आदर करण्याचे शिकले आहेत की नाहीत, हे याद्वारे स्पष्ट दिसून येते.”

आणखी एका प्राथमिक शाळेचे अनुभवी मुख्याध्यापक याहीपुढे जाऊन असे म्हणतात: “आम्हाला निष्ठुरतेची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसते. मुले मैदानात खेळताना ती पूर्वीसारखी दिसत नाहीत; ती टोळीने वावरत असतात. त्यांना लवकरच अशक्‍त व परकी, ठराविक बूट व जीन्स न घातलेली अशी मुले ओळखता येतात; व मग त्यांच्या मागे लागतात, त्यांना टोमणे मारतात; उद्धटपणाने वागतात. आम्ही या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यात पाहिजे तेवढे यशस्वी होऊ शकलो नाही.”

कोलंबिया विद्यालयाचे प्राध्यापक जोनाथान फ्रीडमन म्हणतात: “आज पुष्कळ लोक मोठ्या उद्धटपणे आपली वाहने चालवतात. हमरस्ता जणू रणक्षेत्रच बनले आहे.” कॅनडाच्या रॉयल बँकेतर्फे प्रकाशित होणारे मासिक पत्र (इंग्रजी) “रस्त्यावरील निष्ठुर रक्‍तपात” याबद्दल सांगते व समारोपाला म्हणते की, “समस्येचा मुख्य गाभा रानटी वागणूक हा आहे. सुसंस्कृत होण्यासाठी आवश्‍यक असणारी सभ्यता, विचारशीलता, मनास आवर घालणे, सहिष्णुता आणि मानवी हक्कांबद्दलचा आदर या गोष्टींची अत्यंत उणीव भासते.”

न्यूयॉर्क शहरातील रस्त्यांबद्दलचे वर्णन द न्यूयॉर्क टाईम्स “मोटारी विरुद्ध रुग्णवाहिका” अशा पद्धतीने करते. या शहरातील पुष्कळ वाहनचालक रुग्णवाहिका किंवा अग्निशामक मोटारींपुढे माघार घेण्यास तयार नाहीत व यामुळे भयंकर आजारी किंवा जखमी झालेल्या कोणाला इस्पितळात वेळेवर नेता न आल्यामुळे त्याचा जीव गमावण्याचा धोका वाढत राहतो. तातडीच्या वैद्यकीय सेवेतील कप्तान इलन शिबेली यांनी न्यूयॉर्क शहराच्या ब्राँक्स पेलम पार्कवे भागातून वाहन चालवणाऱ्‍या एका चालकाबद्दल माहिती दिली. हृदयाचे झटके आलेल्या एका रुग्णाला घेऊन जाण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेला वाट देण्यास तो तयार नव्हता. “तो खूपच हट्टी होता व बाजूला जात नव्हता; पण जेव्हा तो घरी आला तेव्हा आपला मूर्खपणा त्याला सातत्याने जाणवला. त्याच्या आईलाच तो हृदयाचा झटका आला होता व ती रुग्णवाहिका तिला घेऊन जाण्यास येत होती.”

द न्यूयॉर्क टाईम्स इंटरनॅशनल वृत्तपत्राने पोलाईट सोसायटी नावाच्या एका इंग्रजी संघटनेबद्दल माहिती दिली. ही संघटना “लोक एकमेकांविरुद्ध खूपच पाशवी बनले आहेत आणि त्याकरता काही तरी केलेच पाहिजे” या उद्देशास्तव स्थापण्यात आली होती. तसेच, द इव्हनिंग स्टँडर्ड वृत्तपत्रातील रकान्यात एका आकाशवाणीच्या पत्रकाराला ही तक्रार मांडावी लागली: “एकेकाळी आपल्या दाक्षिण्याबद्दल प्रसिद्धी मिळवलेले राष्ट्र आता रानटी बनत आहे.” एका स्कॉटिश विमा कंपनीने “निर्वाळा दिला की, रस्त्यावरील अपघातांपैकी ४७ टक्के असभ्य वृत्तीमुळे घडले आहेत याचा मागमूस लावता येतो.”

लहान मुले व युवक यांच्यामधील शिष्टाचार नष्ट करण्यात दूरदर्शनने फारच मोठा हातभार लावला आहे. लोक कसा पेहराव करतात, ते कसे बोलतात, ते कसे इतरांबरोबर वागतात, ते वारंवार हिंसाचाराद्वारे समस्या कशा सोडवतात—हे सगळे शिकवण्यात दूरदर्शन वाकबगार शिक्षक आहे. आपण व आपली मुले काल्पनिक तसेच उथळ कार्यक्रमांची मेजवानी घेत राहिलो तर ओघाओघाने आपला शिष्टाचार, आपण ज्या पात्रांना पडद्यावर पाहिले त्यांची उद्धट, तुच्छ तसेच टोमणा मारण्याची प्रवृत्ती परावर्तित करू लागेल. पालकांना नेहमी भोळसट आणि मुलांना हुशार असे समजले जाते.

मोठमोठ्या बढाया मारण्यात जगाला मोठे भूषण वाटते. मध्येच तोडून बोलणे, दुसऱ्‍यांना ताब्यात ठेवण्याचा अहंकार, खवळणे, श्रेष्ठतेचा आव आणणे, चिडवणे, आव्हान करणे हे सर्वकाही जगाला आवडते. एक काळ असा होता की, निष्ठुर वागणूकीकडे समाज सर्वसाधारणपणे असंतुष्ट दृष्टीने पाहात होता आणि दुष्कृत्ये आचरणाऱ्‍याला वाळीत टाकले जात होते. पण आजच्या समाजात कोणतेही लांच्छन न लागता गुन्हेगार निष्ठुर कृत्ये आचरू शकतो. आणि कोणी हरकत घेतलीच तर हरकत घेणाराच शिव्या किंवा मार खातो! गटाने जात असताना काही युवक वातावरण आपल्या घाणेरड्या भाषेने, गलिच्छ हावभावांनी भरून टाकून आपल्या उद्धट वागणूकीने निरीक्षकांना त्रास देतात; पण हे सर्व त्यांच्या उर्मट बंडखोरीकडे लक्ष केंद्रित व्हावे आणि प्रौढांना त्यांच्या असभ्य वृत्तीने धक्का बसावा या उद्देशाने केले जाते. तथापि, “असभ्यपणा हा दुर्बळ माणसाच्या शक्‍तीचे अनुकरण आहे,” असे म्हणण्यात आले आहे.

मानवाची वागणूक ताब्यात ठेवता यावी म्हणून लोकांनी जे नियम संकलित केले आहेत त्याचे एक ग्रंथालयच तयार होईल, पण या नियमांमुळे मानवांना आवश्‍यक असणारे मार्गदर्शन मिळालेले नाही. आम्हाला आणखी नियम हवेत का? किंवा थोडेफार चालतील? समाज जितका अधिक चांगला तितके नियम कमी असे म्हटले जाते. पण एकच नियम असला तर कसे? उदाहरणार्थ, “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्टग्रंथ हेच होत.”—मत्तय ७:१२.

या नियमाला अधीनता दाखवल्यास सध्याच्या बहुतेक समस्या राहणारच नाहीत, तरीपण समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या महत्त्वाच्या नियमाला येथे जोडले पाहिजे: “तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर.”—मार्क १२:३०.

आजचा समाज बायबलच्या या गरजा व इतर मार्गदर्शक तत्त्वे या दोन्ही गोष्टींना टाकाऊ मानून त्यांना दूर सारतो. अशा प्रवृत्तीच्या लोकांबद्दल म्हणताना बायबल यिर्मया ८:९ (NW) मध्ये असे म्हणते: “शहाणे लज्जित झाले आहेत. . . . यहोवाचे वचन ते धिक्कारतात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार?” आमच्या मार्गदर्शनाकरता महत्त्वपूर्ण या दृष्टीने सांप्रदायिकरित्या ओळखल्या गेलेल्या खऱ्‍या मूल्यांबद्दल तमाम लोकांचे सर्वसाधारण मत काय पडते ते पाहण्याची गरजही त्यांना वाटत नाही. त्यांची नव नीतीमत्ता, कोणाला कसे वाटते ती पर्यायी जीवनपद्धत निवडण्याची अनुमती देणारा असा प्रशस्त मार्ग आहे—असा प्रशस्त मार्ग जो येशूने म्हटले की नाशाकडे जातो—आणि यात बहुतेक जात आहेत.—मत्तय ७:१३, १४.

परिपूर्ण उदाहरण

‘देवपित्याच्या उराशी असलेला’ येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्याजोगे आम्हापुढे उल्लेखनीय उदाहरण आहे. (योहान १:१८) लोकांसोबत व्यवहार करताना तो एका दृष्टीने कोमल व कनवाळू पण तेच दुसऱ्‍या दृष्टीने प्रबळ व दृढ देखील होता; तरी देखील तो कधीही कोणाशी निष्ठुरपणे किंवा निर्दयीपणे वागला नाही. “सर्व प्रकारातील लोकांशी त्याची सहजपणे असण्याची अपूर्व देणगी” याबद्दल भाष्य करताना नासरेथचा मनुष्य (इंग्रजी) हे पुस्तक येशूबद्दल म्हणते: “लोकात जाहीरपणे व खासगीरित्या तो पुरुष व स्त्रियांबरोबर निपक्षपातीपणे मिसळत असे. त्याला निरागस लहान मुलांसोबत निश्‍चिंत वाटत होते, शिवाय जक्कयसारख्या जर्जरित विवेकाच्या पिळवणूक करणाऱ्‍या लोकांबरोबर देखील तो तितकाच मोकळा होता हे आश्‍चर्याचे आहे. मार्था व मरीयेसारख्या गृहिणी त्याच्याशी स्वाभाविक मोकळेपणाने संभाषण करीत; पण वेश्‍यांनी सुद्धा, तो त्यांना समजून घेईल आणि मित्रत्वाची मदत देईल याची खात्री वाटून त्याचा संपर्क साधला. . . . सर्वसाधारण लोकांना निर्बंध घालणाऱ्‍या अडथळ्यांबद्दल त्याने दाखवलेली अजाणता, हीच त्याच्या गुणलक्षणांपैकी एक उल्लेखनीय गोष्ट आहे.”

यहोवा देव आपल्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्‍यांसोबत व्यवहार करताना नेहमी शिष्टाचाराने वागतो व सहसा विनम्रतेने अपील करतो. अब्राहाम या आपल्या मित्राला आशीर्वाद देताना त्याने म्हटले: “तू आहेस तेथून . . . कृपया, दृष्टि लावून पाहा.” आणि पुन्हा: “कृपया, आकाशाकडे दृष्टि लाव . . . व हे तारे मोज.” (उत्पत्ती १३:१४, NW; १५:५, NW) मोशेला आपल्या शक्‍तीबद्दलचा पुरावा देताना देव म्हणाला: “आता, कृपया, आपला हात आपल्या छातीवर ठेव.” (निर्गम ४:६, NW) यानंतर पुष्कळ वर्षांनी यहोवाने आपला संदेष्टा मीखा याजद्वारे त्याच्या भटकलेल्या इस्राएल घराण्याला असे म्हटले: “याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, कृपया ऐका . . . हे प्रमुखहो, . . . तुम्ही कृपया हे ऐका.” (मीखा ३:१, ९, NW) तर मग, आपण सुद्धा इतरांशी व्यवहार करताना त्यांना “कृपया” असे म्हणून ‘देवाचे अनुकारी’ झालो आहोत का?—इफिसकर ५:१.

तेव्हा बायबलमधील सल्ला त्याज्य मानून जगातील शहाणे लोक कोणती मार्गदर्शक तत्त्वे व नीतीमूल्ये सादर करतात? पुढील लेख याबद्दल विचार करील. (g94 7/22)

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“सर्वसाधारण सभ्यता आता सर्वसाधारण राहिली नाही.”

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

ती रुग्णवाहिका त्याच्या आईकडे पोहंचण्याचा प्रयत्न करीत होती

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“असभ्यपणा हा दुर्बळ माणसाच्या शक्‍तीचे अनुकरण आहे”

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Left: Life; Right: Grandville

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा