गैरवागणूक देणारे पालक—तणावासाठी प्रामुख्याने कारणीभूत असणारे
“[मुलांना] कुटुंबाच्या बाहेरील वस्तुस्थितीचे किंवा कल्पनांचे कमी ज्ञान असल्यामुळे, त्यांच्याबद्दल आणि इतरांबद्दल घरी शिकलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी सत्य बनतात आणि त्यांच्या मनावर खोलवर ठसतात.”—डॉ. सुसन फॉरवर्ड.
कुंभार आकारहीन मातीच्या गोळ्यात योग्य प्रमाणात पाणी घालून सुंदर पात्र तयार करू शकतो. त्याचप्रमाणे, पालक मुलाच्या स्वतःबद्दलच्या आणि जगाबद्दलच्या दृष्टिकोनाला आकार देऊ शकतात. प्रेम, मार्गदर्शन आणि शिस्त यामुळे मूल एक स्थिर प्रौढ व्यक्ती बनते.
तरीसुद्धा, बहुधा मुलाच्या मनावर आणि हृदयावर गैरवागणूक देणाऱ्या पालकांमुळे ठसे उमटतात. भावनात्मक, शारीरिक आणि लैंगिक गैरवर्तणूकीमुळे विकृत विचार करण्याच्या पद्धती निर्माण होतात ज्या भक्कम होतात आणि परत आकार देण्यास कठीण बनतात.
भावनात्मकरीत्या दिलेली गैरवागणूक
बुक्क्यांपेक्षा शब्दांचा मार अधिक जोरात लागतो. जेसन म्हणतो की “असा एकही दिवस नव्हता जेव्हा मी जन्मायला नको होतो असे माझ्या आईने व्यक्त केले नाही.” कॅरेन म्हणते: “मला नेहमी असे सांगितले जाई की मी खूप वाईट होते किंवा मुळीच चांगली नव्हते.”
मुलांच्याबद्दल जे काही म्हटले जाते त्यावर ते विश्वास ठेवतात. एका मुलाला नेहमीच मूर्ख म्हटले तर कालांतराने तो मूर्ख आहे असेच त्याला वाटेल. एका मुलीला ती काही कामाची नाही असे सांगा आणि ती त्यावर विश्वास ठेवील. मुलांचा दृष्टिकोन मर्यादित असल्यामुळे अपशब्दांचा उपयोग करून फुगवून सांगितलेल्या गोष्टी किंवा खऱ्या आणि खोट्या गोष्टींमधील भेद त्यांना कळत नसतो.
शारीरिकरीत्या दिलेली गैरवागणूक
ज्यो नावाचा मुलगा त्याच्या शारीरिकरीत्या गैरवागणूक केलेल्या पित्याची आठवण काढून म्हणतो: “मला भिंतीशी धरून ते मला ठोसे द्यायचे. ते मला इतके मारायचे की मी बधिर होत होतो . . . त्यांचा संताप कशाने भडकायचा ते न कळणे हा सर्वात भीतीजनक भाग होता!”
जेकला त्याचे पिता नेहमी मारत. जेक सहा वर्षांचा असताना अशाच एका मारहाणीमध्ये त्याचा हात मोडला. जेक आठवतो, “मी त्यांना, माझ्या आईला किंवा बहीणींना रडत असलेलो दाखवत नसे. तोच केवळ अभिमान माझ्याजवळ राहिला होता.”
स्ट्राँग ॲट द ब्रोकन प्लेसेस हे पुस्तक म्हणते की लहानपणी शारीरिकरीत्या केलेल्या गैरवागणूकीची तुलना आम्ही “प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवडी किंवा प्रत्येक महिन्यात कारच्या अपघातात सापडणे,” याच्याशी करू शकतो. अशी गैरवागणूक मुलाला हे शिकवते की जग असुरक्षित आहे आणि कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्याहून अधिक म्हणजे, हिंसा बहुधा हिंसेलाच उत्पन्न करते. “मुलांना गैरवागणूक करणाऱ्यांपासून सुरक्षा दिली नाही तर एके दिवशी लोकांना मुलांपासून सुरक्षित ठेवावे लागेल,” असा इशारा टाईम मासिक देते.
लैंगिकरीत्या दिलेली गैरवागणूक
एका अभ्यासाप्रमाणे, ३ मधील १ मुलीला आणि ७ मधील १ मुलाला १८ वर्षांचे होण्याआधी लैंगिक अनुभव घेण्यासाठी जबरदस्ती केली गेली. यापैकी पुष्कळ मुले निमूटपणे ते सहन करतात. द चाईल्ड इन क्रायसिस हे पुस्तक असे म्हणते, “लढाईच्या कामगिरीसाठी पाठवल्यावर हरवलेल्या किंवा ज्यांची काहीच माहिती नाही अशा सैनिकांप्रमाणे ती, भीती आणि दोषाच्या वैयक्तिक जंगलात वर्षानुवर्षे हरवलेली असतात.”
“माझ्याशी गैरवागणूक केल्याबद्दल माझ्या पित्याचा मी किती द्वेष करी आणि त्यांचा द्वेष केल्याबद्दल मी दोषी असल्याचे मला वाटत होते,” अशी लुईज म्हणते. “एका लहान मुलीने तिच्या पालकांवर प्रेम करायचे असते आणि मी ते कधीच केले नाही याबद्दल मला किती लाज वाटत असे.” मुलाचा मुख्य रक्षणकर्ता, दुष्कृत्य करणारा असा बनल्यावर असे अस्वस्थ करणारे विचार समजण्याजोगे आहेत. द राईट टू इनोसेन्स यामध्ये बेवरली एंजल अशी विचारते: “ज्याने आम्हावर प्रेम करायला हवे होते आणि आमची काळजी घ्यायला हवी होती त्या आमच्या स्वतःच्या पालकाने इतकी कमी काळजी घ्यावी ही गोष्ट आपण कशी मान्य करू शकतो?”
लैंगिकरीत्या केलेली गैरवागणूक एका मुलाच्या जीवनाच्या संपूर्ण दृष्टिकोनाला विकृत बनवते. “लहानपणी छळली गेलेली प्रत्येक प्रौढ व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या बालपणातून अतिशय अपुरा, काहीच कामाचा नसलेला आणि खरोखरीच वाईट अशा व्यापक विचारांना अनुभवतात,” असे डॉ. सुसन फॉरवर्ड लिहितात.
त्याचे परिणाम नाहीसे होत नाहीत
“केवळ मुलाच्या शरीराशी गैरवागणूक किंवा दुर्लक्ष केले जात नाही,” असे संशोधक लिंडा टी. सॅनफर्ड लिहितात. “त्रस्त कुटुंबे एका मुलाच्या मनाशी गैरवागणूक करतात.” एका मुलाशी गैरवागणूक केल्यावर भावनात्मक, शारीरिक किंवा लैंगिकरीत्या तो किंवा ती प्रेम न करण्याजोगी आणि काहीच कामाची नाही अशी भावना बाळगून वाढेल.
आधी उल्लेखलेल्या जेसनने स्वतः विषयीचे इतके वाईट मत करून घेतले होते की त्याची आत्महत्या करण्याची शक्यता आहे असे लोक म्हणू लागले. गरज नसताना स्वतःला धोक्याच्या परिस्थितींमध्ये घालून ‘तू जन्मायला नको होतास’ या त्याच्या आईने शिकवलेल्या गोष्टीप्रमाणे त्याने स्वतःच्या जीवनाचे मूल्यमापन केले.
मूल या नात्याने शारीरिकरीत्या झालेल्या गैरवागणूकीच्या परिणामांवर पुन्हा विचार करून ज्यो असे म्हणतो: “तुम्ही घर सोडून जाता यामुळे किंवा लग्न करून घेतल्यामुळे त्याचे परिणाम नाहीसे होत नाहीत. मला नेहमी कशाचीतरी भीती लागून असते, आणि त्यासाठी मला स्वतःचा तिरस्कार वाटतो.” शारीरिकरीत्या गैरवागणूक करत असलेल्या घरांमधील ताणामुळे पुष्कळ मुले नकारात्मक अपेक्षा आणि पालकांचे कडक समर्थन या वर्चस्वाखाली वाढतात जे संरक्षण देण्याऐवजी त्यांना कोंडीत पकडून ठेवते.
कॉनीसाठी मात्रागमनामुळे स्वतःबद्दलची विकृत भावना निर्माण झाली जी तिच्या प्रौढपणी भक्कम झाली: “मी अजूनही पुष्कळ वेळा विचार करते की माझ्यामध्ये पाहिल्यावर मी किती घृणित आहे ते लोकांना दिसेल.”
सर्व प्रकारची गैरवागणूक विषारी धडे शिकवतात जे प्रौढपणी अधिक मजबूत होतात. जे काही शिकले आहे ते विसरू शकतो ही गोष्ट खरी आहे. लहानपणी गैरवागणूक सहन केलेले पुष्कळ जण या वस्तुस्थितीला पुष्टी देतात. परंतु पालक त्यांच्या मुलाच्या जन्मापासून त्याच्या स्वतःबद्दलच्या आणि जगाच्या कल्पनेला घडवतात हे त्यांनी जाणून घेतले तर किती बरे असेल. एका मुलाचे शारीरिक आणि भावनात्मक कल्याण त्याच्या पालकांच्या हाती असते.
[७ पानांवरील चित्र]
बुक्क्यांपेक्षा शब्दांचा मार अधिक जोरात लागतो