जागतिक घटनांवर प्रभाव पाडणारी रुची
भारतातील अवेक! प्रतिनिधींकडून
तेराव्या शतकात, मारको पोलो यांनी ते विपुलतेत पाहिले. ख्रिस्तोफर कोलंबसने त्यांचा शोध लावण्यासाठी समुद्रपर्यटन सुरु केले परंतु ते करता करता नव्या जगाचा शोध लावला. १५व्या शतकात, वास्को द गामा समुद्राद्वारे भारतात पोंहचले व युरोपात उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या व्यापाऱ्यांकडे ते आणले. खरेच, त्याकाळी मसाल्याचे पदार्थ इतके मोलवान होते की लोक त्यांना मिळवण्यासाठी त्यांचे जीवन धोक्यात घालत होते!
राजनैतिक घडामोडींनी जेव्हा जमिनीवरील प्रवासाच्या मार्गात अडथळे आणले, तेव्हा वास्को द गामाने ३९,००० कि.मी प्रवास करण्यात दोन वर्षे घालवली व ह्या प्रवासाने तो पोर्तुगाल ते आफ्रिकाच्या टोकापासून आणि भारताहून पून्हा त्याच्या घरी गेला. त्याचा दोन जहाजांचा, ज्यामध्ये मसाल्याच्या पदार्थाचे गलबते व दुसरे काही वस्तु ज्यांची किंमत प्रवासाला झालेल्या किंमती पेक्षा ६०पट अधिक होती, सुखरुप प्रवास झाला. पण त्याच्या प्रवासाच्या यशामुळे युरोपीयन राष्ट्रांनी आपसात लढाई करण्यासाठी बुडी घेतली. पुढील तीन शतके, मसाल्याच्या पदार्थांवर ताबा मिळवण्यासाठी पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, हॉलेन्ड आणि ग्रेट ब्रिटन यांनी स्पर्धा चालवली.
मसाल्याच्या पदार्थांचा इतिहास, “साहस, शोध, जिंकणे, व भयंकर जहाजांच्या स्पर्धेची” गोष्ट आहे असे एका लेखकाने संक्षिप्त रुपात म्हटले. फ्रेडरिक रोझेनगारटन यांनी त्यांचे पुस्तक द बुक ऑफ स्पाइसीस यात म्हटलेः “राजनैतिक व आर्थिक रित्या मसाल्याचे पदार्थ इतके अत्यावश्यक होते, त्यांचा शोध लावण्यासाठी राजांनी त्यांचे सैन्य पाठविले, व्यापार करण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांचे जीवन व भाग्य धोक्यात घातले, त्यांच्यासाठी युद्धे लढवली गेली, सर्व लोकसंख्येला दास्यत्वात बंदिवान केले गेले, पृथ्वीची कसून तपासणी केली, व अशा प्रकारे अनेक बदलांना अस्वस्थ, निर्दयी, स्पर्धांमुळे पुनरुज्जिवीत केले.”
मसाल्याच्या व्यापारावर जेव्हा डचने ताबा ठेवला होता, तेव्हा त्यांनी एक पौंड मिरी मागे पाच शिलिंग असा भाव वाढवून ब्रिटनला विकला. अशा ह्या कृत्यामुळे, संतापून १५९९ मध्ये लंडनचे व्यापारी एकत्र गोळा झाले व त्यांनी स्वत:च्या व्यापारी संस्थेची स्थापना केली जिला कालांतराने इस्ट इंडिया कंपनी असे ओळखण्यात येऊ लागले. ह्या कंपनीच्या प्रभावामुळे शेवटी भारतावर ३०० पेक्षा अधिक वर्षे ब्रिटिशांनी राज्य केले.
भयंकर स्पर्धा नाहीशी झाली, परंतु मसाल्याबद्दल जगव्याप्त रुची निरंतर चालूच आहे. आणि कदाचित भारताशिवाय आणखी कोठेच मसाल्याचा आनंद लूटला जात नसावा.
मसाल्याच्या पदार्थांबद्दलचे प्रेम
मसाले व भारतीय स्वयंपाकाच्या पद्धतींमध्ये इतके अतुट बंधन आहे की कोणी असा विचार करील की ह्या राष्ट्राचे मसाल्याच्या पदार्थांबरोबर प्रेम आहे. शिजवलेल्या भाज्या, अंडी, लाल मांस, मासा, किंवा कोंबडी—या सर्वांना स्वादिष्ट मसाल्याची फोडणी दिलेल्या भारतीय आमटीबद्दल कोणी ऐकले नाही? यापैकीची काही विशेष चव गोड पदार्थांमध्ये देखील असते, ज्यामुळे याची पुष्टी मिळते की “मसाला” याचा अर्थ केवळ “तिखट” असा होत नाही. एवढेच नव्हे तर इथे प्रसिद्ध असणारा दुधाचा गोड चहा त्यात देखील वेलचीची पूड, लवंग, आले, किंवा इतर काही मसाला घालून चविष्ट बनविले जाते. अशा मसाल्यांची इच्छा असल्यामुळे दरडोई मसाल्यांच्या वापरात भारताचा पहिला क्रमांक आहे यात काय आश्चर्य?
भारतीय स्वयंपाकिणीच्या स्वयंपाक घरात फक्त प्रवेश करा, आणि तुमच्या डोळ्यांना विविध रंग व आकारातील अनेक मसाल्यांची रांग दिसेल. त्यातील काही, काळी मोहरीचे दाणे; सुवासिक काड्या; तपकिरी दालचिनी; हिरवी वेलची; चकचकीत, सोनेरी हळदीची पूड; ओबडधोबड सुंठ; व किरमिजी रंगाच्या मिरच्या यांचा समावेश आहे. ह्या निरनिराळ्या वस्तुंचा समूह आणि अनेक राष्ट्रांमध्ये किराणा मालाच्या दुकानात बाटलीत मिळणाऱ्या आमटीची पूड यांच्यामधला फरक पहा. आमटीच्या पुडीत निरनिराळे मिश्रण जरुर असते व त्यामुळे थोडाफार उद्देश साध्य होतो. परंतु मसाल्यांचे हे एकत्रीकरण, भारतात वापरला जाणारा मसाला यापेक्षा फार हलक्या प्रतीचे ठरते.
विविध प्रकारच्या भोजनासाठी, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, मासे, कोंबडी आणि लाल मांस ह्यांचाही समावेश आहे यांना तयार मसाल्याचे मिश्रण असते. परंतु बहुतेकवेळा, स्वयंपाक करतेवेळी जो पदार्थ बनविला जाणार आहे त्याचा प्रकार व परिमाण ह्यावर अवलंबित, विशिष्ट मसाल्यांचे एकत्रीकरण केले जाते. भोजन तयार करताना भारतीय कुशल गृहिणीला अचूक पद्धत व कोणत्या मसाल्याची फोडणी केव्हा द्यावी हे सर्व माहीत असते. मसाल्याला भाजून, वाटून, गरम तेलात तळून, किंवा फोडणी देताना इतर गोष्टींना एकत्र करुन ती गृहिणी त्याच मसाल्यातून विविध रुची तयार करू शकते.
भारताला भेटी देणारे लोक, तेथील भोजन तयार करण्याच्या विविधतेकडे पाहून आश्चर्यचकित होतात. उत्तर भारत व दक्षिण भारताच्या स्वयंपाकाच्या पद्धतींशिवाय, राष्ट्राच्या विशिष्ट प्रांताच्या संस्कृती, जसे की बंगाली, गोअन, गुजराती आणि पंजाबी या सर्वांना त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. धार्मिक विश्वासाचा देखील भोजनाच्या रुचीवर परिणाम होतो. यास्तव, गुजरातच्या राज्यात, एखाद्या व्यक्तीचे परंपरागत हिंदू शाकाहारी भोजन असेल, पण भारताच्या उत्तरेकडील व्यक्ती, मुसलमान कारकीर्दीची आठवण करीत मोगली मांसाहार भोजनाचा स्वाद घेईल. यास्तव, वेगवेगळ्या रात्री हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारसी, आणि ख्रिश्चन कुटुंबासोबत भोजन केल्याने जेवणाच्या रुचीत पुनरावृत्ती झालेली आहे असे मुळीच आढळणार नाही.
मसाला वाढविण्याचे योग्य ठिकाण
संपूर्ण जगभरात मसाल्यांचे उत्पादन होत असले तरी, इतर राष्ट्रांपेक्षा भारतात—६० वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचे उत्पन्न होते. शिवाय १६० पेक्षा अधिक राष्ट्रांना ते आख्खे मसाले व पूड केलेले मसाले भारतातून निर्यात केले जातात. राष्ट्राच्या मसाल्याच्या पदार्थांच्या उत्पादनात दक्षिण भारत अग्रगामी आहे. अरबी समुद्रावरच्या कोचीनला, त्याच्या रम्य आणि भरपूर जलप्रवाहामुळे “पूर्वेकडील वेनीस” असे म्हटले जाते व येथेच मलबार किनाऱ्यावरील उष्णकटिबंधाच्या ताज्या हवामानाला बहरलेल्या मसाल्यांची थेट प्राप्ती होते.
कोचीनचे बंदर प्राचीन पुरातन काळापासून फैनिके, इजिप्त, पर्शिया, चिनी, रोमी, ग्रीक, व अरबी यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार बाजारपेठ होते. मनोरंजक गोष्ट अशी की, पवित्र शास्त्राच्या प्रकटीकरण पुस्तकात “सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे . . . दालचिनी व भारतीय मसाले [न्यू.व.]” यांचा व्यापार करणाऱ्या “पृथ्वीवरील व्यापारी” यांचा उल्लेख आला आहे.—प्रकटीकरण १८:११-१३.
“मसाल्यांचा राजा” म्हणून उल्लेखनीय असलेली काळे मिरी, मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रथमत: इच्छिले. ते केवळ भोजनाच्या फोडणीसाठीच नव्हे तर मांस आणि इतर नाश होणाऱ्या अन्नाला जपून ठेवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. मसाल्यांचा वापर केल्याने जे पदार्थ खराब होतात किंवा निरुपयोगी होतात त्यांना गोठवून न ठेवता ते एक किंवा यापेक्षा अधिक वर्ष टिकवून ठेवता येते. काळी मिरी याजबरोबर, नंतरच्या व्यापाऱ्यांनी इतर मसाल्यांना—थोडक्यात सांगायचे म्हणजे वेलची, धने, बडीशेप, आणि मेथ्या मिळवण्याची इच्छा धरली.
तथापि, भारतात वाढवणाऱ्या सर्वच मसाल्यांचा उगम इथला नव्हे. उदाहरणार्थ, लाल मिरची दक्षिण अमेरिकेतून आलेली आहे. पदार्थविज्ञानाबद्दल इंडियन नोबल लॉरेट पारितोषिक मिळालेले डॉ. सी. वी. रामन एकदा असे म्हणाले होते की ‘मिरचीविना सर्व भोजन बेचव व खाण्यायोग्य नसते.’ पुष्कळ जण जे यापेक्षा वेगळा आहार खातात ते या गोष्टीबरोबर असहमतात असतील. परंतु, आमच्या प्रेमळ सृष्टीकर्त्याने, पृथ्वीची अन्नपदार्थांची कपाटे विविध प्रकाराने साठवून ठेवली आहेत, आमच्या विविध तीव्र आवडीनिवडींना तो तृप्त करतो या बद्दल आम्ही त्याचे आभार मानतो.
केवळ भोजन चवीसाठीच नव्हे
मसाल्यांचा आकर्षक इतिहास आहे. अभिषेक करणाऱ्या तेलात, ऊद आणि सुवास यामध्येही मसाल्यांच्या अंतर्भावाबद्दल पवित्र शास्त्र, लेखी पुराव्याने सिद्ध करते. यरुशलेममधील यहोवाच्या मंदिरात वापरल्या जाणाऱ्या पवित्र अभिषेकाच्या तेलात व सुवासात मसाल्यांचा वापर केला याबद्दल ते उल्लेख करते आणि सांगते की द्राक्षारसात देखील मसाले घातले होते. (निर्गम ३०:२३-२५, ३४-३७; गीतरत्न ८:२) पुढे, पवित्र शास्त्र प्रकट करते की पूर्वीच्या ख्रिश्चनांनी येशूच्या शरीराचे दफन करण्यासाठी मसाले आणले.—योहान १९:३९, ४०.
भारतात, मुली पिढ्यानपिढ्यासाठी अद्रकासारखे येणारे एक झाड ज्याचे मूळ भडक सोनेरी आहे त्याचा—हळदीचा उपयोग करत आहेत. त्वचेच्या स्थितीत सुधार होण्याकरता हळदीचा लेप लावला जातो. आज, सुवास आणि प्रसाधने बनविणाऱ्या कंपन्या ऑलस्पाईस (पीमेंटा ऑफीशीनलीस वनस्पतीची सुकविलेली फळे), शहाजिरे, दालचिनी, अमलतास, लवंग, जायफळ, जायपत्री, रोझमेरी आणि वेलचीच्या तेलांचा व आकर्षित करणारे सुवास बनविण्यासाठी वॉलटाईलच्या प्रकारच्या तेलाचा उपयोग करतात. हेच मिश्रण साबण, चेहऱ्याला लावण्याचा पावडर, दाढी केल्यावर लावण्याचे लोशन, कोलोन्स, माउथ फ्रेशनर्स, आणि असंख्य वस्तु बनविण्यासाठी उपयोगात आणले जाते.
याशिवाय, पूर्वीपासून मसाल्यांचा उपयोग औषधांसाठी सुद्धा केला जातो. आले, हळद, लसूण, वेलची, मिरची, लवंग, आणि केशर यासर्व गोष्टींना आयुर्वेद, हिंदू संस्कृत लेखनाच्या वेदांमधील औषधांचे विज्ञान याने यांना मान्यता दिली आहे. कापलेल्या व भाजलेल्या जखमेवर हळदीचा लेप, १३ मसाल्यांनी मिळून बनविलेले टूथपेस्ट, व विविध प्रकारच्या आजारावर अनेक औषधोपचार एखाद्या व्यक्तीला भारतीय औषधालयाला भेट देताना आढळून येतील.
यास्तव, मसाल्यांच्या इतिहासाचे पुनरावलोकन केल्याने असे दर्शविले जाते की त्यांच्या शिवाय, भोजनाच्या आवडीनिवडी भिन्न झाल्या असत्या, औषधांमध्ये फरक झाला असता, आणि इतिहासाचे लिखाण देखील वेगळ्या पद्धतीने झाले असते. मसाल्यांच्या रुचीने खरोखरी अनेक मार्गांनी जागतिक घटनांवर प्रभाव पाडला आहे. (g93 2/22)
[२५ पानांवरील चित्रं]
संपूर्ण जगभरात लोकप्रिय असणाऱ्या अनेक मसाल्यांच्या पदार्थांचा छोटा नमुना
गिऱ्हाईकासाठी मसाल्याच्या पदार्थांचे वजन करुन देणारी रस्त्यावरील विक्रेती
कोचीनच्या दुकानात मसाल्याचे पदार्थ खरेदी करणारांची वाट पाहत असतात