तरुण लोक विचारतात . . .
मला प्रेमाच्या भुरळीचा कसा त्याग करता येईल?
“मी आपल्या पत्रातून त्याला माझ्या भावना व्यक्त केल्या,” असे ती तरुणी म्हणते. “जेव्हा जेव्हा मी त्याला विचारते की त्याला मजबद्दल काय वाटते—तो नेहमी सरळ उत्तर देतो की, माझ्याविषयी त्याला खरचं काही वाटत नाही. पण तो मजकडे ज्या रितीने बघतो व ज्या पद्धतीने वागतो त्यावरुन मी खात्रीपूर्वक सांगते की, तो जे म्हणतो ते खरे नाही.”
प्रेमवेडाचे अंधत्व चढलेले असले की, वास्तविक गोष्टींचे मोल तितके राहात नाही. वर उल्लेखित असणाऱ्या तरुणाने जितके होते त्याकरवी, एवढेच काय पण ख्रिस्ती वडीलांच्या मदतीने देखील हे दयाळूपणे सांगण्याचा प्रयत्न केला होता की, तो तितका आस्थेवाईक नव्हता. पण ती तरुणी काहीएक मानण्यास तयार नव्हती. त्याची अजाण प्रवृत्ती व बोलणे यांना ती, तो तिजविषयी किती आपुलकी बाळगतो या दृष्टीकोणातून बघू लागली. अशाप्रकारे ती कल्पनेच्या दुनियेत विचारतरंगावर भरारी घेत होती.
कदाचित तुम्हालाही कोणा व्यक्तीबद्दल तीव्र आपुलकी वाटत असेल, पण त्या व्यक्तीला तसे काही वाटत नसेल इतकेच काय पण तुम्हाविषयीची त्याला पुसट कल्पनाही नसेल. तिचे किंवा त्याचे आपल्याकडे लक्ष आकर्षून घेण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले असतील. खरे म्हणजे आपली भावना व्यक्त करताना तुम्हालाच विचित्र परिस्थितीत पडल्याचा अनुभव आला असेल. इतके असूनही कधी ना कधी बदल घडेल अशी आशा तुम्ही मनोमन बाळगून राहता.
असे आहे तर मग, ती तारुण्यातील प्रेमाची भुरळ किंवा मोह आहे. हे नकली प्रकारातील प्रेम असते जे कोणाबरोबरील रास्त परिचय घडल्यानंतरचे नसते, तर ते केवळ काल्पनिक असते. युवकातील प्रेमवेडाच्या भुरळीचे उद्दिष्ट हे त्यांच्या आवाक्याबाहेरचे असते, कारण कोणी चित्रपट अभिनेता किंवा अभिनेत्री, प्रसिद्ध पार्श्वगायक किंवा गायिका, कोणी शिक्षक अथवा शिक्षिका किंवा एखादी जुनी ओळख असलेली व्यक्ती याविषयी त्यांनी काल्पनिक भुरळ निर्माण करून घेतलेली असते.a ही भुरळ प्रमाणापेक्षा वाढत जाते. पण काहींसाठी प्रेमाची भुरळ त्यागणे खूपच दुःखदायी ठरते. मग, या दुःखद वेदना कमी करण्याचा काही मार्ग आहे का?
तुम्ही एकटेच नाहीत
अशा प्रकारातील प्रतिसाद मिळत नसलेल्या प्रेमाचा अनुभव घेणारे तुम्ही पहिलेच नाही या गोष्टीत आधी समाधान माना. इतिहासातील सर्वात शहाणा मनुष्य शलमोन हा देखील एका इस्राएल मुलीवर मोहीत झाला होता. त्याने तर तिची स्तुती करण्यात गीतरत्नाचे काव्यही म्हटले. तो म्हणालाः “तू प्रभातेसारखी आरक्त, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ” आहेस. इतके करून देखील तो तिला मिळवू शकला नाही!—गीतरत्ने ६:१०.
याप्रकारे, तुमचे समवयस्क एवढेच काय पण तुमचे पालक देखील या अनुभवातून पार गेले असतील. यामुळे तुम्हाठायी असणाऱ्या भावना अस्वाभाविक नाहीत. तथापि, प्रेमाची भुरळ ही जरी सर्वसाधारण प्रतीची असली तरी ती काढून टाकता येऊ शकते.
पवित्र शास्त्र, उदाहरणादाखल, अम्नोन या तरुणाविषयी सांगते, ज्याला एका तरुणीविषयी वाटणारे प्रेम इतके अनावर झाले की, तो “आजारी पडला.” (२ शमुवेल १३:१-१४) याचप्रमाणे एका प्रेमरोगी मुलीने कबूल केलेः “मला भूक लागत नाही. . . . मला अभ्यास करवत नाही. मला . . . त्याच्याविषयी दिवसाही स्वप्ने पडतात. . . . मी बरीच क्षीण झाले आहे.” होय, प्रेमाच्या भुरळीमुळे तुमच्या स्वास्थ्यावर तसेच मानसिक भावनांवर परिणाम होतो. तर मग, या परिस्थितीवर तुम्हाला कसा ताबा मिळवता येईल?
वास्तविकतेला तोंड देणे
“जो आपल्या हृदयावर भाव ठेवतो, तो मूर्ख,” असे पवित्र शास्त्र सांगते. (नीतीसूत्रे २८:२६) हे, तुम्ही जेव्हा कोणाविषयीच्या काल्पनिक प्रणयविहारात स्वैरपणे तरंगू लागता तेव्हा खासपणे खरे आहे. कारण अशावेळी तुम्ही स्वतःला भावनिक आवरणात गुरफटता आणि तुम्हाला पहावेसे वाटते तेच पाहता. पण ते नीतीसूत्र पुढे म्हणतेः “जो सूज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.” याचा अर्थ हा आहे की, ज्या गोष्टी जशा वास्तविक आहे त्या तशा बघणे.
“खरी आशा व निराधार आशा यातील फरक तुम्हाला कसा कळू शकेल?” असे डॉ. हावर्ड हालपर्न विचारतात. “जी वस्तुस्थिती आहे तिजकडे बारकाईने व शांत विचाराने बघून,” असे ते म्हणतात. जरा विचार कराः या व्यक्तीसोबत खरे प्रेम वाढविण्याची कितपत संभावना आहे? तो किंवा ती विवाहीत आहे का? तर मग, अशा व्यक्तीविषयी प्रेमाची प्रकरणे मनात रंगविणे हे निष्फळ व वास्तविकपणे अगदीच अयोग्य आहे. ती कोणी सुप्रसिद्ध व्यक्ती आहे का? असल्यास एक तर तिची भेट घडणे मुष्कीलीचे असते, मग प्रेम करणे तर दूरच राहिले! तसेच ती व्यक्ती तुम्हापेक्षा वयाने मोठी, जसा कोणी तुमचा प्राध्यापक किंवा प्राध्यापिका असेल तर तशी संधी ही शक्य नाही.
जर आतापर्यंत तुम्हाला भुरळ वाटणाऱ्या व्यक्तीने तुम्हाबद्दलची रसिकता दाखविलीच नाही तर भावी काळात बदल होण्याची संभावना आहे असे मानण्यास एखादे खरे कारण आहे का? “हृदय सर्वात कपटी आहे,” हे ध्यानात असू द्या. (यिर्मया १७:९) कोणाच्या अजाण कृतीत तसेच त्याच्या भोळ्या शब्दात प्रणयी आस्था दिसते असे वाटून घेणे म्हणजे आपल्याच डोळ्यांवर पट्टी बांधणे आहे. प्रत्यक्षात ते वेळ व भावना व्यर्थ घालविण्यासारखे आहे. बहुतेक देशात प्रणयात प्रथम पुरुष रस घेत असल्याचे आपल्याला दिसते. तर मग, कोणा मुलीने, आपणच, आस्थेवाईक नसणाऱ्या कोणा व्यक्तीच्या मागेमागे नेणे हे केवढे लाजिरवाणे आहे बरे!
तसेच तरुण व्यक्ती असल्यामुळे आपल्या मर्यादा काय आहेत हे ओळखा. समजा, तुम्ही ज्या व्यक्तीवर मोहीत झाला आहा तिने खरे पाहता दाद दिलीच तर मग काय कराल? विवाहासंबंधीच्या जबाबदाऱ्या तसेच नंतर जीवनात येणारे दबाब व आणखी जबाबदाऱ्या संभाळण्याची तुमची तयारी आहे का? नाही तर, स्वप्नरंगात राहण्याचे टाळा व अशाप्रकारे “आपल्या मनातून खेद दूर करा.” कारण “प्रेम करण्याचा समय” असतो व तुमच्या बाबतीत तो कदाचित काही वर्षांनी सज्ञान झाल्यावर येऊ शकेल.—उपदेशक ११:१०; ३:८.
आपल्या भावनांचे परिक्षण करा
‘पण आता ज्या भावना मजठायी आहेत त्यांच्याबद्दल काय?’ असे तुम्हास विचारावेसे वाटेल. यासाठी तुम्हास काय व कसे वाटते त्याविषयीचा खोल विचार करा. डॉ. चार्लस् झेस्ट्रो यांचे हे परिक्षण आहेः “कोणी व्यक्ती कोणाविषयी आपल्या स्वप्नसृष्टीत हीच किंवा तोच मजसाठी अगदी मनाजोगा प्रेमी किंवा प्रेयसी आहे या प्रेमवेडाने भारावते; तसेच मला हवा तशा सोबत्याठायीची सर्व गुणलक्षणे यात आहेत अशा भावनेने ती भारावते तेव्हा ही भुरळ जडते.” तथापि, असा “सर्वांगपूर्ण प्रेमवीर किंवा प्रेयसी” कोठेच अस्तित्वात नाही. “कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत,” असे पवित्र शास्त्र म्हणते.—रोमकर ३:२३.
यास्तव स्वतःला विचाराः ज्यावर मी माझे हृदय जडविले आहे त्या व्यक्तीला मी कितपत जाणतो वा जाणते? माझ्या भावना माहितीच्या वस्तुस्थितीवर आधारीत आहेत की मी कोणा प्रतिमेवर प्रेम करीत आहे? मी “डोळ्यांनी दिसते तेच” पाहतो का? (२ करिंथकर १०:७) मला त्या व्यक्तीतील अवगुण स्पष्ट दिसतात का, किंवा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे? तुमच्या स्वप्नातील प्रियकरावर टाकलेला एक हेतुनिष्ठ कटाक्ष तुम्हास तुमच्या प्रेमगुंगीतून खाडकन् जागे करील!
याशिवाय, तुम्हाला कोणत्या प्रकारातील प्रेम वाटते त्याचेही परिक्षण करा. पवित्र शास्त्र म्हणतेः “प्रेम सहनशील आहे, उपकारशील आहे. प्रेम हेवा करीत नाही. . . . स्वार्थ पाहात नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) तुम्हाठायीही अशाचप्रकारचे प्रेम आहे का? किंवा कॅथी मॅकॉय ही लेखिका ज्याला “अपरिपक्व प्रेम” म्हणते तसे काही तुमच्याठायी आहे? ती पुढे म्हणतेः “अपरिपक्व प्रेम हे क्षणार्धात येते व जाते. . . . प्रकाशझोत तुमच्यावर असतो आणि तुम्ही केवळ प्रेमात पडल्याच्या काल्पनिक प्रेमसृष्टीत गुंग असता . . . अपरिपक्व प्रेम हे बिलगणारे, हव्यासी व हेवा करणारे असते . . . अपरिपक्व प्रेम पूर्णत्वाची मागणी करते.”
आपण स्वप्नावरच भावना गुंतवल्या याची जाणीव होणे अतिशय दुःखदायक आहे. तथापि, डॉ. डेव्हीड एलकाईंड आपल्या निरिक्षणात म्हणतातः “या गोंधळाचे धक्के तरुण लोकांना शारीरिक आकर्षण व व्यक्तीगत क्षमता याविषयीचे अनुभव शिकण्यात फारच उपयुक्त ठरतात.”
त्याला किंवा तिला विचारातून काढून टाकणे
जगातील सर्व कारणमिमांसा तुम्हाला जे वाटते ते सर्वतोपरि काढून टाकू शकत नाही हे मान्य आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही आपल्या मनाचे दुःख हलके करण्यासाठी करू शकता. पहिली गोष्ट ही की, प्रथमतः समस्यावह गोष्टींना अधिक भरविण्याचे टाळा! प्रणयकथा, कादंबऱ्या वाचणे, दूरदर्शनवरील प्रणयभरीत रम्यकथा पाहणे, किंवा विशिष्ट प्रकारचे संगीत सतत ऐकणे टाळा. या सर्व गोष्टी तुमच्या एकटेपणाच्या भावनांना सतावीत राहतात. यास्तव अशा परिस्थितीत मग्न राहण्याचे टाळा. “सरपण नसले की, विस्तव विझतो.”—नीतीसूत्रे २६:२०.
खऱ्या स्वरुपाचे मित्रत्व जोडण्याचा प्रयत्न करा. जे लोक तुम्हावर खरोखरी प्रेम करतात व तुमची काळजी बाळगून असतात अशांची बरोबरी प्रेमनगरातील काल्पनिक व्यक्तीसोबत होऊच शकत नाही. स्वतःला “फटकून [एकांतवासी]” राहू देऊ नका. (नीतीसूत्रे १८:१) तुम्हास हे आढळेल की, तुमचे पालक, ते ख्रिस्ती असल्यास याबाबतीत बहुमोल मदत देतील. “माझ्या भुरळीबद्दल मला ज्यांना सांगता येईल असे तेच लोक आहेत,” असे एका तरुणाने सांगितले. पण आपल्या भावना तुम्ही लपवून ठेवीत आहात याची चाहूल तुमच्या पालकांना लागते का, किंवा तुमचे मन तुम्हाला खात आहे? मग, त्यांच्याचकडे जाऊन ‘त्यांच्यापुढे आपले मन का मोकळे करू नये’? ख्रिस्ती मंडळीतील एखादा प्रौढ सदस्य देखील धीराने तुमचे ऐकून घेण्यास तयार होईल.
स्वतःला “कामात मग्न ठेवा,” असा सल्ला एस्तेर डेव्हीडोव्हीट्झ ही तरुण लेखिका देते. एखादा छंद सुरु करा, थोडा व्यायाम करा, एखादी भाषा शिका, पवित्र शास्त्र संशोधनास आरंभ करा. उपयुक्त हालचालीत मग्न राहिल्यामुळे मागे होऊन निराश बनण्याच्या लक्षणांवर सहजपणे मात करता येईल.
भुरळीवर मात करणे सोपे नाही. पण वेळ जात राहील तसतशी ती निवळत जाते. तोपर्यंत तुम्हाला स्वतःविषयी व आपल्या भावनाविषयी बरेच काही समजायला लागले असेल. हे धडे, भुरळीमुळे जे अंतःकरण विदीर्ण होण्याचे अनुभव येतात ते दूर करण्यासाठी बहुमोलाचे आहेत. (g87 1/22)
[तळटीपा]
a “तरुण लोक विचारतात . . . कोण म्हणतो की, ती नुसती भुरळ आहे?” हा माहितीपत्रक ८/१ मधील लेख पहा.
[पानांवरील चित्र]
काहींना प्रेमाची भुरळ त्यागणे मोठे वेदनादायक वाटते