दक्षिण आफ्रिका—अनेक वंश, अनेक झगडे पण काहींना शांती प्राप्त
दक्षिण आफ्रिकेतील आमच्या प्रतिनिधीकडून
दक्षिण आफ्रिका हा, लक्षवेधक फरक असलेला देश आहे. विस्तीर्ण सुपीक सपाट प्रदेश, अफाट वाळवंट, पर्वतांच्या रांगा, खोल, अरूंद दऱ्यातून वाट काढीत हिरव्यागार खोऱ्यांतून बाहेर पडणाऱ्या नद्या, विविध जातीचे पशु, पक्षी, थव्याथव्यांनी उडतात, वनस्पतिंची विविधता व मुबलकता मनास आकर्षक वाटते. शिवाय येथे अनेक वंशीय लोक भेटतात.
तथापि, या अनेक वंशांच्या संमिश्र जीवनाने अनेक प्रकरणे उदयास आणली आहेत. सर लॉरेन्स व्हॅन हे डेअर पोस्ट पत्रकात लिहितात: “दक्षिण आफ्रिकेत जगातील इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा अधिक सामाजिक तणाव विविधतेत माजलेले आहेत. गोरे आणि आशियाई, काळे आणि आशियाई, गोरे आणि केप वर्णीय, आफ्रिकानर आणि ब्रिटीश तसेच आफ्रिकनर आणि ब्रिटीश व काळे यांच्यात तणाव माजले आहेत.”
येथे प्रथम कोण होते? हे केवढे आश्चर्य की, वर उल्लेखिलेल्या पैकी कोणीच नाही. मग हे नाकारता येणार नाही की, आज ज्यांना बुशमन वंशाचे म्हणतात तेच सर्वांत जुने रहिवासी आहेत. नंतर उत्तरेकडून काळे व दक्षिणेकडून गोरे आले व येथे वस्तीस राहिले, असे डॉ. टायरेल यांनी ट्रायबल पीपल ऑफ सदर्न आफ्रिका या आपल्या पुस्तकात लिहिले आहे. बुशमन हा मध्य आफ्रिकेतील पिग्मी समान पिवळसर रंगीय वंश आहे. शिकार करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांतून शेवटी उरलेले हे लोक आहेत.
या बुशमन लोकांशी बरेचसे साम्य असलेले हॉटबरॉटस लोक—बुशमन आणि काळे यांचे मिश्रणांतून आले असावेत असे म्हटले जाते. ते शिकारी आहेत, पण बुशमन सारखे नाहीत तर स्वतःची गुरे, शेळ्या मेंढरे राखितात व दक्षिणेकडिल किनाऱ्यावरील प्रदेशात वस्तीस असतात—हॉटनटॉटस हे आफ्रिकेच्या दक्षिण भागांत १६५२ पासून स्थाईक झालेल्या गोऱ्यांना सर्वप्रथम भेटले.
चवथ्या शतकापासून पुढे, आफ्रिकेतील काळ्यावर्णीय टोळ्या दक्षिण आफ्रिकेचा ठाव घेऊ लागल्या. काळाच्या ओघात या काळ्यांची संख्या भरमसाट वाढली—त्यांच्या शेकडों जमाती बनल्या व या जमाती आपआपल्या म्होरक्यांच्या मागे एकमेकापासून अलग झाल्या. एका भाषेच्या काही जमातींनी एकत्र मिळून मोठे मोठे राष्ट्रीय संघ बनविले जे आज झुलू, कझोसा, सोथा, तसेवाना, पेडी, व्हेंडा आणि स्टोंगा नावांनी चालतात.
प्रदेश प्राप्तीकरिता आक्रमणे
बुशमन ज्याप्रकारे त्यांचा चरितार्थ चालवितात तो हॉटनटोटशी किंवा इतर आफ्रिकन जमातीशी मिळताजुळता नाही. ज्यांना त्यांचा माल ठेविण्यास मोठमोठ्या वखारींची गरज भासली त्या युरापियनांच्या आगमनासोबत चोहोकडे युद्धांचा भडका उडाला. जरी हे ठेंगणे शिकारी अत्यंत शूर योध्दे होते तरी त्यांनाही गोऱ्या लोकांच्या आधुनिक शस्रांसमोर अधीक काळ टिकाव धरता आला नाही व मोठी प्राणहानी सोसून त्यांनी माघार घेतली. बरेचसे इतर देशांत, सोथे प्रदेशांत पळाले तर काही निराश्रित असे राहिले.
सुरवातीच्या युद्धांच्या चकमकीनंतर, वसाहतीकरिता आलेल्या गोऱ्यांना शरण जाण्यास व त्यांची गुलामी पत्करण्यास हॉटनटॉटस अधिक उत्सुक होते. लवकरच त्यांनी केपवर्णीय समाज स्थापिला ज्यात आपसात मित्रत्वाने राहणाऱ्या व भटक्यांचा मिश्र वंश समाविष्ट होता. यांच्यामध्ये युरोपियन वंशावळीचेही काही लोक होते—ज्यांचे वर्ण गोरे, निम-गोरे व ताम्र होते.
बुशमनांचा नायनाट आणि हॉटनटॉटना जरी नमविले तरी दक्षिण आफ्रिकेत शांती स्थापीत झाली नाही. गोल्ड ॲन्ड वर्कर्स नामे पुस्तक हे स्पष्ट करिते: “भूखंड अतिक्रमणाकरिता तीव्र झगडे सुरु झाले. सुरवातीस पूर्व केप मधील झोसा व डच आणि नंतर ब्रिटीश लढले. नंतर नातालमध्ये झुल्स, डच आणि ब्रिटीश यांच्यात परत चकमक झाली, व तेथून एक नवे पर्व सुरु झाले ते म्हणजे ब्रिटीशांनी दक्षिण आफ्रिकेत आपल्या सैन्याच्या मोठमोठ्या तुकड्या आणल्या. त्यांनी निकाल लावण्याचा निर्धार केला. त्यांचे घोडदळ, आधुनिक शस्त्रे व तोफखाना ही सर्व वापरून झोक्साना पूर्वेकडिल केपकडे रेटले व झुलूंना नातालकडे पिटाळले.”
१८९९ मध्ये, सुमारे २० वर्षानंतर, ॲग्लो-बोअर युद्धास सुरवात झाली व ते चार वर्षे चालले. हे युद्ध इंग्रजी गोरे आणि डच वंशीयात जुंपले होते ज्यांत ४० हजारापेक्षा अधिक लोक कामी आले. या युद्धाने काळ्या लोकांपुढे कसले चित्र उभे केले असावे याची कल्पना करा. त्यांत ज्यांनी काळ्यांकडे बायबल आणले होते तेच ख्रिस्ती गुंतले होते, व एकमेकांची कत्तल करीत होते.
काळे व आशियाई
मग ज्यांची संख्या दक्षिण आफ्रिकेत सर्वांत अधिक आहे त्या काळ्यांबाबत काय? त्यांच्यात ऐक्य आहे का? १९व्या शतकाच्या सुरवातीस शाका नामे एका बलाढ्य झुलुने शेजारील अनेक टोळ्यांना नमवून आपला जम बसविला, ज्यामुळे आपसात अनेक प्रतिक्रियात्मक घडामोडी घडून त्यांत लाखोंचे बळी पडले.
गेल्या शतकांत सोन्यांच्या खाणीचा शोध लागल्याने व औद्योगिक प्रगती झाल्याने काळे लोक हळू हळू गोऱ्यांच्या शहरांकडे नोकऱ्यांच्या निमित्ताने वाटचाल करू लागले. काळ्यांच्या लोकसंख्येपैकी एकतृतियांश विविध भाषेचे लोक आता गौरवर्णीय वस्तीसभोवताली राहू लागले. याचे एक उदाहरण स्वाटोमध्ये दिसते, जेथे सुमारे दहा लक्ष काळे दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत मोठे शहर, जोहान्सबर्ग, सभोवताली वस्तीस आहेत. या शहरात राहणाऱ्या काळ्यांनी अनेक युरोपियन चालीरीती अनुसरलेल्या आहेत. पण पुरातन जमातीच्या श्रद्धा पद्धती तशाच चालत आहेत.
या विविधवंशीय वसाहतीतच शेजारच्या बोटस्वाना, लेसोथे, स्वाझीलँड, मलावी आणि मोझँबीक येथील लाखो खाणकामगारांची भर पडली. हे कामगार, रोजगार मिळवून आपल्या गावी असलेल्या कुटुंबांचा चरितार्थ चालवितात. ते खाण असेल तेथे सभोवतालच्या अंगणात तळ ठोकतात. जेथे वेगवेगळ्या राष्ट्रीय भेदभावांमुळे वारंवार झगडे जुंपत असतात.
तसेच या दक्षिण आफ्रिकेत सुमारे पांच लक्षांपेक्षा अधिक, आशियांतील लोकांची वस्ती आहे. ते येथे कसे आले? १९व्या शतकांत नातालच्या समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रांतावर ब्रिटनची सत्ता होती तरी तेथील झुल्सची सत्ता अद्याप संपुष्टात आलेली नव्हती. ते गोऱ्यांच्या उसाच्या शेतात काम करण्यास तयार नव्हते. याकरिता १८६० नंतर भारतांतून मजुरांना नेण्यास सुरवात झाली. भारतांतून ही आवक १९११ पर्यंत सतत चालू होती. तेव्हापर्यंत सुमारे दीड लाख पुरुष, स्त्रिया व लेकरांनी दक्षिण आफ्रिकेस आपले घर बनवून तेथील विविध वंश जमातीत आपली भर टाकली. त्यांच्यात हिंदू-मुस्लीम आणि वेगवेगळ्या चर्चचे ख्रिस्ती लोकही होते, आणि कालांतराने काळे व भारतीय लोकांत सुरु झालेले संघर्ष अद्याप चालू आहेत.
आता कदाचित वाचकांच्या लक्षांत आले असेल की दक्षिण आफ्रिकेच्या संपादकाने असे का म्हटले होते की हा देश “जगातील इतर कोणाही राष्ट्रापेक्षा अधिक विविध सामाजिक तणातणींनी भरलेला आहे.” अलिकडेच निव्वळ गोऱ्या सरकारने भारतीय व काळ्यांच्या आशेचे समाधान होईल या हेतूने काही नवीन योजना जाहीर केल्या पण त्याला काही गोऱ्यांनीच तीव्र विरोध केला व एक नवीन पार्टी बनली.
साऊथ आफ्रिका १९८२ नामक पुस्तक हा दावा करते की दक्षिण आफ्रिकेतील गोरे आणि काळे यांचेपैकी ८३ टक्के लोक आपण ख्रिस्ती असल्याचा दावा करीतात. पण त्यांच्यातील बेबनावाने अनेकांना ख्रिस्तीत्वाच्या विरूद्धतेत उठविले आहे. मग याचा हा अर्थ होतो का की यात बायबलची काही चूक आहे? नाही. कारण बायबल अगदी स्पष्ट शब्दांत: “वैर, कलह, मत्सर . . . फुटी” यांचा धिक्कार करते, व पुढे म्हणते: “अशी कामे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (गलतीकर ५:२०, २१) प्रत्यक्षांत या कलह माजलेल्या दक्षिण आफ्रिकेत एकजूट घडवून आणण्यामागील शक्तिशाली उपकरण म्हणून बायबलने महत्वाचे काम केल्याचे शाबीत होत आहे.
सर्व वंशाना शांतीत एक करणे
तसे १९१५ पासून पुढील हा अहवाल आहे: “ख्रिस्ती प्रीतित सर्व जन्मजात, वंशीय वैरभाव-विरोध संपुष्टांत आले, आणि ब्रिटन व बोअर हे ख्रिस्त येशूमध्ये एक झाले . . . केवढी आश्चर्यकारक एकता ही की जिच्यामध्ये गोरे लोक, काळे लोक, तसेच पिवळे लोकही एक झाले.” यांत हा जो उल्लेख आहे तो, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत जे बायबल विद्यार्थ्यांचे, यहोवाच्या साक्षीदाराचे अधिवेशन भरले होते, त्याला अनुसरुन होता.
मग, आजही, ख्रिस्ती लोकांची तीच खरी एकता कायम आहे का? ती एवढा काळ टिकली व वाढली का? होय, नक्कीच वाढली! १९८७ मध्ये १२ एप्रिल रोजी येशू ख्रिस्ताच्या मृत्यु स्मरणार्थ जो मेमोरियल साजरा केला त्याला प्रसंगानुसार जगव्याप्त मंडळयातून सर्व वंशीय ८९,६५,२२१ लोक उपस्थित होते.—लूक २२:१९.
यहोवाच्या साक्षीदारांतील ही खरी ख्रिस्ती एकता दक्षिण आफ्रिकेतील मुख्य दप्तरांत, बायबल प्रकाशने भाषांतरीत करून अनेक भाषेत प्रकाशित करण्यात जे २०० सेवक एकजुटीने काम करीत आहेत त्यांच्या मध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकाशनातून कोणताही राजकीय प्रचार होत नाही, तर केवळ “राज्याची ही सुवार्ता” हिच्यावर—सबंध पृथ्वीवर शांती स्थापित करणारे देवाकडिल उपकरण म्हणून प्रकाशझोत, टाकतात.—मत्तय ६:१०; २४:१४; दानीएल २:४४.
यहोवाचे साक्षीदार राज्याचा हा जो संदेश घरोघर जाऊन देत आहेत त्यामुळे अंतःकरणात खोलवर रूजलेला वंशद्वेष खरोखरी जाईल?
झोसा राष्ट्राचे सॅम्युएल मेज यांचे उदाहरण विचारात घ्या. तीन वेळा त्यांच्यावर गोऱ्यांनी प्राण घातक हल्ले केले. त्याजठायीचे कटुत्व आणि भ्रमनिरासता त्यांना सतावीत होती. पण कशाने तरी त्याजमध्ये बदल घडविला. “जसजसे मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत संबंध वाढवू लागलो तसतसे तेथे मला इतर धर्मांपेक्षा अगदी वेगळेच असे काही प्राप्त झाले. जेव्हा चर्च ऑफ इग्लंडमध्ये होतो तेव्हा तेथे वारंवार सोथो आणि झोसा यांच्यातील झगडे पहात असे पण तेच यहोवाच्या साक्षीदारांत केवढी एकवाक्यता व प्रीती मला आढळली. अभ्यास तसाच पुढे चालू ठेविला म्हणून मला ही चांगली समज मिळाली की ज्या गोऱ्यांनी मजवर घातक हल्ले केले होते ते त्यांच्या ठायीच्या अपूर्णतेमुळे, जसे काळे आजही, त्यांच्याच टोळीतील काळ्यांवर हल्ले करतात.” गेली चाळीस वर्षें सॅमुएल स्वतः, देवराज्यावर विश्वास ठेविण्यात इतरांचे कसोशीने सहाय्य करीत आहे.
ऐझेक लांगा जो जोहान्सबर्ग प्रांताच्या—ॲलेक्सझांद्रा गावांत वाढून मोठा झालेला दक्षिण आफ्रिकन आहे, आपणाठायीचा आपल्या वंशाचा गर्व बाळगून गोऱ्यांचा द्वेष करी आणि झुलु राष्ट्र इतर काळ्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याचा दावा करी. सरकार विरोधक असल्यामुळे बंदी घातलेल्या संस्थेच्या सभांना उपस्थित राही. मग १९७६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ज्या दंगली उसळल्या होत्या त्यात ऐझेकही सामील होता. त्याला आठवते: “अनेक, पोलीस गोळीबारास बळी पडले. काही जन्माने अपंग बनले. हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिल्याने माझ्यामध्ये सूडाची भावना आली. एक स्वयंचलीत बंदूक मिळवून स्वतः आत्महत्या करण्याआधी अनेकांना ठार करण्याचा निश्चय केला. ती न मिळवू शकल्याने मी इतरांप्रमाणे शेजारच्या राष्ट्रात जाऊन लष्करी शिक्षण घेण्याचे ठरविले.”
त्या अनिश्चित विचार काळात, त्यांच्या घरोघरच्या प्रचार कार्याच्या ओघांत यहोवाच्या साक्षीदारांशी ऐझेकची भेट झाली. बायबलचा संदेश समजावून सांगितल्यानंतर प्रकाशने सादर केली. त्यात “ट्रू पीस ॲड सेक्युरीटी—फ्रॉम व्हॉट सोर्स,” हे खास प्रकाशन होते, ज्याने त्याजवर आपला कायमचा ठसा उमटविला. त्याने म्हटले: “जिचा मी शोध करीत होतो, ती शांती आता मला प्राप्त झाली. बायबल या घटनाबद्दल काय म्हणते ते मी शिकलो: ‘जे वाकडे करण्यात आले ते सरळ होत नाही,’ आणि ‘पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.’ यावरून मला हे स्पष्ट झाले. आमचे तंटे निष्फळ आहेत. कारण ते पृथ्वीवर शांती स्थापन करू शकणार नाहीत. केवळ देवाचे राज्य ते करू शकते.”—उपदेशक १:१५; यिर्मया १०:२३.
दुसरे उदहारण एका आफ्रिकनरचे आहे. याची काळ्यांचा द्वेष करीत वाढ झाली. तो आणि त्याचे दोन साथीदार रात्रीच्या काळोखांत जे कोणी आफ्रिकन भेटत त्यांना मारहाण करीत. पुढे त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. ज्या अधिवेशनांत आफ्रिकन साक्षीदारही उपस्थित होते त्याला तो हजर होता व तेथे भिन्न वंशियांच्यात जी प्रीति दिसली ती पाहून आश्चर्यचकीत झाला. काही दिवसांनी त्याने एका साक्षीदारासोबत सेवा करण्यास सुरवात केली. नंतर त्याला एका कामगिरीवर दूरवर पाठविले. “तो हिवाळा होता व कडक थंडी होती. मी एका पत्र्याच्या घरांत झोपलो होतो,” तो अनुभव सांगत होता, “तेथे एक ट्रक चालक आला. तो यहोवाचा साक्षीदार होता; आणि मी त्याचा बिछाना तयार करण्यास ब्लँकेट, चादरी, व उशी घेऊन पुढे आलो.” ज्याला या गृहस्थाची पूर्व ओळख होती असा एक काळा तेथे होता. त्याला खूप आश्चर्य वाटले. अनेक वर्षानंतर, हा जो पूर्वी काळ्यांचा द्वेष्टा होता व आता जो यहोवाचा साक्षीदार बनला आहे, पुढे म्हणतो: “आज हिंसाचाराला माझ्या जीवनात थारा नाही. अनेक वर्षांनंतर बदल करणे फार अवघड गेले. आज जरी जगातील लोक मला काफर बोटी (नीग्रोफिले) म्हणतात तरी मी कोणत्याही वंशभेदाला मानत नाही.
जी मंडळी काळे, गोरे, आणि भारतीयांनी मिळून बनलेली आहे तिच्या क्षेत्राचा काही भाग खाणीचा भूप्रदेश आहे, व त्यावर वस्तीस असलेल्या काळ्या निर्वासित कामगारात बायबल संदेशाच्या प्रचाराचे काम सुरु झाले. लवकरच काही जणांनी त्यांच्यातील गोऱ्या साक्षीदारांच्या संगतीत सभांना उपस्थित राहण्यास सुरवात केली व ते चांगली प्रगती करत आहेत. मंडळीचा अहवाल म्हणतो:
“आमचे मित्र मलावी, झिंम्बाबवे, लेसोथे, मोझांबिक, द्रान्सकई, झूलूलँड, एवढेच नव्हे तर अंगोलाहूनही येत असतात. ते आपसात सुमारे सात भाषा बोलतात. यास्तव झुलू भाषा सर्व माध्यम म्हणून ठरविली, तरी सभेत सर्व भाषेत उत्तरे देता येतात.” जाहीर भाषणांचा अनुवाद इंग्रजी किंवा आफ्रिकन भाषेतून झुलूं भाषेत केला जातो.
मंडळी बाहेर जे संघर्ष चालू आहेत ते मंडळीतील सदस्यात जी प्रीति नांदते तिचे प्रामुख्याने वर्णन करते. काही तरूण, अंगणातील खुल्या जागेत वस्तीस असलेल्या खाण कामगारांना सतावीत असतात. काही वेळा तर मरणप्राय जखमी करीत. यामुळे मोठ्या प्रमाणात शत्रुत्व फैलावले, व सर्वांना असुरक्षितता भासू लागली. असे जरी बाहेर असले तरी राज्य सभागृहात हंसणे, हस्तांदोलन, विनोद आणि एकमेकाबद्दल आदर व आस्था याद्वारा दाखविलेली प्रीति सुव्यक्त होते.
जेथे अशाप्रकारची निस्वार्थी प्रीति प्रदर्शित होते, त्या वातावरणाचे वर्णनानंतर, तोच अहवाल पुढे म्हणतो: “त्याकाळी हे केवढ्या नवलाईचे असेल की सबंध पृथ्वीवरील लोक केवळ यहोवाची भक्ति करण्यास एकत्रित होतील व सर्वजण एकजुटीतील सहजीवनाचा आनंद लुटतील.”
दक्षिण आफ्रिकेतील यहोवाचे साक्षीदार हा अटळ विश्वास बाळगून आहेत की देवाने जर तसे अभिवचन दिलेले आहे तर ते नक्की पूर्ण होणार व तसे घडणार. त्यांच्यातील सध्याच्या विविध वंशीयांसोबतच नव्हे तर शुद्ध केलेल्या सबंध पृथ्वीवरील सर्व वंशीय नीतिमान लोकांसोबत मिळून मिसळून सदासर्वकाळचे जीवन व्यतित करण्याची उत्कट आशा ते बाळगून आहेत.—स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण ७:९, १४; २१:३-५.
[पानांवरील चित्र]
बुशमन
[पानांवरील चित्र]
झुलु स्त्री
[पानांवरील चित्र]
बोअर्स