वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt यहूदा १-२५
  • यहूदा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहूदा
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहूदा

यहूदा याचं पत्र

१ देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले+ असे जे बोलावण्यात आलेले आहेत,+ त्यांना येशू ख्रिस्ताचा दास आणि याकोबचा भाऊ यहूदा+ याच्याकडून:

२ देवाची करुणा, शांती आणि प्रेम तुमच्यावर भरपूर प्रमाणात असो.

३ माझ्या प्रिय बांधवांनो, खरंतर आपल्या सगळ्यांच्या तारणाबद्दल तुम्हाला लिहायची माझी खूप इच्छा होती.+ पण त्याऐवजी, पवित्र जनांना सर्वकाळासाठी सोपवण्यात आलेल्या विश्‍वासाचं रक्षण करायचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करावा, असं उत्तेजन या पत्राद्वारे तुम्हाला द्यायची मला गरज वाटली.+ ४ याचं कारण म्हणजे, शास्त्रवचनांप्रमाणे पूर्वीच न्यायदंडासाठी नेमलेली काही माणसं, नकळत आपल्यामध्ये शिरली आहेत. ही अधार्मिक माणसं देवाच्या अपार कृपेचं निमित्त देऊन निर्लज्ज वर्तन* करतात+ आणि आपला एकच मालक आणि प्रभू, येशू ख्रिस्त याचा विश्‍वासघात करतात.+

५ तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत. तरी, मला तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, की यहोवाने* इजिप्तमधून* आपल्या लोकांना वाचवलं असलं,+ तरी ज्यांनी विश्‍वास दाखवला नाही अशांचा त्याने नंतर नाश केला.+ ६ आणि ज्या स्वर्गदूतांनी आपल्या नेमलेल्या सेवेत टिकून राहण्याऐवजी आपलं योग्य निवासस्थान सोडून दिलं,+ अशांना त्याने त्याच्या मोठ्या दिवसाच्या न्यायदंडासाठी सर्वकाळाच्या बंधनांनी घोर अंधारात जखडून ठेवलं आहे.+ ७ तसंच, सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासच्या शहरांतल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अनैतिक लैंगिक कृत्यं* केली आणि ते अनैसर्गिक शारीरिक वासनांच्या मागे लागले.+ सर्वकाळाच्या अग्नीचा न्यायदंड भोगलेली ही शहरं आपल्यासाठी इशारा देणारं एक उदाहरण आहे.+

८ इतकं असूनही, ही माणसं स्वप्नांत रमतात, शरीराला दूषित करतात, अधिकाराला तुच्छ लेखतात आणि देवाने ज्यांचा सन्मान केला आहे त्यांची निंदानालस्ती करतात.+ ९ प्रमुख स्वर्गदूत*+ मीखाएल+ याचा सैतानासोबत* मोशेच्या मृतदेहावरून वाद झाला,+ तेव्हा त्याने सैतानाविरुद्ध अपमानास्पद शब्दांत न्यायदंड घोषित करण्याचं धाडस केलं नाही.+ तर “यहोवा* तुझा न्याय करो,”* असं तो म्हणाला.+ १० पण ही माणसं, त्यांना समजत नसलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल अपमानास्पद बोलतात;+ आणि बुद्धिहीन प्राण्यांप्रमाणे ज्या गोष्टी त्यांना उपजत बुद्धीने समजतात,+ त्या सगळ्या गोष्टींनी स्वतःला दूषित करत राहतात.

११ या माणसांची किती दुर्दशा होईल! कारण ती काइनच्या मार्गाने चालत आहेत+ आणि आपल्या फायद्यासाठी ती बलामच्या वाईट मार्गाचं अनुकरण करायला मागेपुढे पाहत नाहीत.+ शिवाय, कोरहप्रमाणे+ त्यांनी अधिकारपदावर असलेल्यांच्या विरोधात बोलून नाश ओढवून घेतला आहे.+ १२ तुमच्या मेजवान्यांमध्ये* तुमच्यासोबत खातपीत असलेली ही माणसं पाण्याखाली दडलेल्या खडकांसारखी आहेत.+ ती निर्लज्जपणे स्वतःचंच पोट भरणाऱ्‍या मेंढपाळांसारखी,+ वाऱ्‍याने वाहणाऱ्‍या कोरड्या ढगांसारखी;+ हंगामात फळ न देणाऱ्‍या, पूर्णपणे सुकलेल्या* आणि समूळ उपटलेल्या झाडांसारखी आहेत. १३ जशा बेफाम लाटा समुद्रातली घाण किनाऱ्‍यावर आणतात, तशी या माणसांची लज्जास्पद कामं उघड होतात;+ ज्यांच्यासाठी कायमचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवला आहे, अशा भटकणाऱ्‍या ताऱ्‍यांसारखी ही माणसं आहेत.+

१४ आदामपासून सातव्या पिढीतला पुरुष हनोख+ यानेही त्यांच्याबद्दल अशी भविष्यवाणी केली: “पाहा! यहोवा* आपल्या लाखो पवित्र स्वर्गदूतांसोबत आला;+ १५ सर्वांचा न्याय करायला+ आणि पापी लोकांनी केलेल्या दुष्ट कामांमुळे आणि आपल्याविरुद्ध बोललेल्या सर्व धक्कादायक गोष्टींमुळे तो त्यांना दोषी ठरवायला आलाय.”+

१६ ही माणसं कुरकुर करतात,+ स्वतःच्या परिस्थितीबद्दल सतत तक्रार करतात, आपल्या वासनांप्रमाणे वागतात,+ मोठमोठ्या बढाया मारतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी इतरांची वाहवा* करतात.+

१७ पण, माझ्या प्रिय बांधवांनो, तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रेषितांनी पूर्वीच सांगून ठेवलेल्या गोष्टी* आठवा. १८ ते तुम्हाला सांगायचे: “शेवटल्या काळात, स्वतःच्या दुष्ट वासनांप्रमाणे चालणारी थट्टेखोर माणसं येतील.”+ १९ हीच माणसं फूट पाडतात+ आणि त्यांच्यात देवाची पवित्र शक्‍ती* नाही. ती फक्‍त शारीरिक गोष्टींचा विचार करतात.* २० पण, माझ्या प्रिय बांधवांनो तुम्ही आपला परमपवित्र विश्‍वास मजबूत करा आणि पवित्र शक्‍तीच्या मदतीने प्रार्थना करा.+ २१ आणि सर्वकाळाच्या जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत असताना,+ देवाच्या प्रेमात टिकून राहा.+ २२ तसंच, ज्यांच्या मनात शंका आहेत+ त्यांना दया दाखवत राहा.+ २३ त्यांना नाशाच्या आगीतून बाहेर ओढून काढा आणि वाचवा.+ पण, इतरांना दया दाखवत असताना सावधगिरी बाळगा आणि त्यांच्या वाईट कामांमुळे डागाळलेल्या कपड्यांचीही घृणा करा.+

२४ शेवटी, तुम्ही अडखळून पडू नये म्हणून जो गौरवशाली देव तुमचं रक्षण करायला आणि तुम्हाला आपल्यासमोर मोठ्या आनंदाने निष्कलंक असं उभं करायला समर्थ आहे,+ २५ त्या एकमेव तारणकर्त्या देवाला, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, वैभव, सामर्थ्य आणि अधिकार पूर्वी, आता आणि पुढेही सदासर्वकाळ मिळत राहो. आमेन.

ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “मिसरमधून.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “दियाबलासोबत.” म्हणजे, निंदा करणारा.

अति क५ पाहा.

किंवा “यहोवा तुला खडसावो.”

शब्दशः “प्रीतिभोजनांत.”

शब्दशः “दोनदा मेलेल्या.”

अति. क५ पाहा.

किंवा “व्यक्‍तिपूजा.”

किंवा “पूर्वी केलेल्या भविष्यवाण्या.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “ती प्राण्यांसारखी आहेत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा