योहान याचं पहिलं पत्र
१ जे सुरुवातीपासून होतं, ज्याबद्दल आम्ही ऐकलं, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, ज्याचं आम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं आणि ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला, त्या जीवनाच्या वचनाबद्दल+ आम्ही तुम्हाला लिहीत आहोत. २ (हो, ते जीवन प्रकट झालं आणि आम्ही ते पाहिलं; जे पित्याजवळ होतं आणि आमच्यासमोर प्रकट झालं, त्या सर्वकाळाच्या जीवनाबद्दल+ आम्ही साक्ष देत आहोत+ आणि तुम्हाला सांगत आहोत.) ३ जे आम्ही पाहिलं आणि ऐकलं ते तुम्हालाही सांगत आहोत.+ हे यासाठी, की तुम्हीही आमच्यासोबत ऐक्यात असावं.* आणि आपण सगळे पित्यासोबत आणि त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याच्यासोबत ऐक्यात आहोत.+ ४ आपल्या सर्वांचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून आम्ही या गोष्टी लिहीत आहोत.
५ जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत तो असा, की देव प्रकाश आहे,+ आणि त्याच्यामध्ये अंधार मुळीच नाही. ६ “आपण त्याच्यासोबत ऐक्यात आहोत,” असं जर आपण म्हटलं आणि तरीसुद्धा अंधारात चालत राहिलो, तर आपण खोटं बोलत आहोत आणि सत्याप्रमाणे चालत नाही.+ ७ पण, जसा तो स्वतः प्रकाशात आहे, तसं जर आपणही प्रकाशात चालत राहिलो, तर मात्र आपण एकमेकांसोबत ऐक्यात आहोत. आणि त्याचा मुलगा, येशू याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.+
८ “आपल्यामध्ये पाप नाही,” असं जर आपण म्हटलं, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत+ आणि आपल्यामध्ये सत्य नाही. ९ पण जर आपण आपली पापं कबूल केली तर तो आपल्याला क्षमा करेल आणि सर्व अनीतीपासून शुद्ध करेल,+ कारण तो विश्वासू आणि नीतिमान आहे. १० “आपण पापी नाही,” असं जर आपण म्हटलं, तर आपण त्याला खोटं ठरवत आहोत आणि त्याचं वचन आपल्यामध्ये नाही.
२ माझ्या मुलांनो, मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहीत आहे, की तुम्ही पाप करू नये. आणि तरीसुद्धा एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक* आहे, म्हणजे येशू ख्रिस्त,+ जो नीतिमान आहे.+ २ तो आपल्या पापांसाठी+ दिलेलं प्रायश्चित्ताचं बलिदान+ आहे आणि त्याद्वारे देवासोबत आपला समेट होतो. हे बलिदान फक्त आपल्याच पापांसाठी नाही, तर संपूर्ण जगातल्या लोकांच्या पापांसाठी आहे.+ ३ आणि जर आपण त्याच्या आज्ञांचं पालन करत राहिलो, तर यावरूनच आपल्याला कळतं, की आपल्याला त्याची ओळख झाली आहे. ४ “मला त्याची ओळख झाली आहे,” असं जो कोणी म्हणतो, पण त्याच्या आज्ञांचं पालन करत नाही, तो खोटं बोलतो आणि त्या माणसात सत्य नाही. ५ पण जो त्याच्या शिकवणींचं पालन करतो, त्याचं देवावर खरोखर प्रेम आहे हे दिसून येतं.+ यावरूनच आपल्याला कळतं की आपण त्याच्यासोबत ऐक्यात आहोत.+ ६ आपण त्याच्यासोबत ऐक्यात राहतो असं जो म्हणतो त्याचं हेच कर्तव्य आहे, की जसा येशू जगला,* तसंच त्यानेही जगावं.*+
७ प्रिय मुलांनो, मी तुम्हाला जी आज्ञा लिहीत आहे, ती नवीन नाही तर तुम्हाला सुरुवातीपासून देण्यात आलेली जुनीच आज्ञा आहे.+ ही जुनी आज्ञा म्हणजे तुम्ही पूर्वी ऐकलेलं वचन. ८ तरीपण, मी तुम्हाला एक नवीन आज्ञा लिहीत आहे. ती ख्रिस्ताने पाळली आणि तुम्हीही पाळत आहात. आणि आता अंधार नाहीसा होत आहे आणि खरा प्रकाश चमकू लागला आहे.+
९ आपण प्रकाशात आहोत असं जो म्हणतो आणि तरीपण आपल्या भावाचा द्वेष करतो,+ तो अजूनही अंधारातच आहे.+ १० जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात टिकून राहतो+ आणि तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाही.* ११ पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे आणि अंधारात चालत आहे.+ आपण कुठे जात आहोत हे त्याला कळत नाही,+ कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केले आहेत.
१२ माझ्या मुलांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण त्याच्या* नावामुळे देवाने तुमच्या पापांची क्षमा केली आहे.+ १३ वडीलजनांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण जो सुरुवातीपासून आहे त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.+ मुलांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण देव, जो आपला पिता त्याची तुम्हाला ओळख झाली आहे.+ १४ वडीलजनांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण जो सुरुवातीपासून आहे त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही खंबीर आहात+ आणि देवाचं वचन तुमच्यामध्ये टिकून राहतं+ आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.+
१५ जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका.+ जर कोणाचं जगावर प्रेम असेल, तर पित्याचं प्रेम त्याच्यामध्ये नाही.+ १६ कारण जगातल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शरीराची वासना,+ डोळ्यांची वासना+ आणि आपल्या धनसंपत्तीचा दिखावा,* या पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. १७ शिवाय, जग आणि त्याची वासना नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे.+ पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्वकाळ टिकून राहतो.+
१८ मुलांनो, हा शेवटचा काळ आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहे.+ आतासुद्धा बरेच ख्रिस्तविरोधी आले आहेत+ आणि यावरूनच आपल्याला कळतं की हा शेवटचा काळ आहे. १९ ते आपल्यातूनच बाहेर निघाले, पण ते आपल्यातले* नव्हते.+ कारण जर ते आपल्यातले असते, तर ते आपल्यासोबत टिकून राहिले असते. पण ते बाहेर गेले, यासाठी की सर्वच जण आपल्यातले नाहीत हे दिसून यावं.+ २० आणि जो पवित्र, त्याने तुमचा अभिषेक केला आहे+ आणि तुम्हा सर्वांजवळ ज्ञान आहे. २१ तुम्हाला सत्य माहीत नसल्यामुळे नाही,+ तर तुम्हाला ते माहीत असल्यामुळे मी लिहीत आहे, कारण सत्यापासून कोणतीही खोटी गोष्ट निघू शकत नाही.+
२२ येशू हा ख्रिस्त आहे ही गोष्ट जो नाकारतो तो जर खोटारडा नाही, तर मग कोण आहे?+ हाच तो ख्रिस्तविरोधी आहे,+ जो पित्याला आणि मुलाला नाकारतो. २३ जो मुलाला नाकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा नाही.+ पण जो मुलाला स्वीकारतो+ त्याच्याजवळ पितासुद्धा आहे.+ २४ तुमच्याबद्दल बोलायचं, तर जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकलं आहे ते तुमच्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे.+ जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकलं आहे, ते जर तुमच्यामध्ये टिकून राहिलं, तर तुम्हीसुद्धा मुलासोबत आणि पित्यासोबत ऐक्यात राहाल. २५ शिवाय, त्याने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाचं वचन दिलं आहे.+
२६ जे तुम्हाला चुकीच्या मार्गाने न्यायचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे. २७ आणि तुमच्याबद्दल बोलायचं, तर देवाने आपल्या पवित्र शक्तीद्वारे* तुमचा अभिषेक केला आहे+ आणि ही पवित्र शक्ती तुमच्यामध्ये टिकून राहते. तुम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही; तर तुमचा अभिषेक करण्याद्वारे तोच तुम्हाला सर्व गोष्टी शिकवत आहे.+ तुमचा हा अभिषेक खोटा नाही, तर खरा आहे. त्याद्वारे तुम्ही शिकल्याप्रमाणे, तुमचा अभिषेक करणाऱ्याच्या ऐक्यात टिकून राहा.+ २८ तर आता माझ्या मुलांनो, त्याच्या ऐक्यात टिकून राहा. म्हणजे जेव्हा त्याला प्रकट केलं जाईल तेव्हा आपल्याला मनमोकळेपणाने बोलण्याचं धैर्य असेल+ आणि त्याच्या उपस्थितीदरम्यान आपल्याला त्याच्यापुढे लज्जित व्हावं लागणार नाही. २९ तो नीतिमान आहे हे जर तुम्हाला माहीत आहे, तर तुम्हाला हेसुद्धा माहीत आहे, की जो कोणी नीतीने वागत राहतो तो त्याच्यापासून जन्मला आहे.+
३ पाहा, पित्याने आपल्यावर किती प्रेम केलं आहे!+ त्याने आपल्याला त्याची मुलं* म्हटलं आहे+ आणि खरोखरच आपण देवाची मुलं आहोत. म्हणूनच, जग आपल्याला ओळखत नाही,+ कारण जगाने त्याला ओळखलेलं नाही.+ २ प्रिय बांधवांनो, आपण आता देवाची मुलं आहोत,+ पण पुढे आपण कसे असू हे अजून प्रकट झालेलं नाही.+ त्याला प्रकट करण्यात येईल तेव्हा आपण त्याच्यासारखेच होऊ इतकं मात्र आपल्याला माहीत आहे. कारण तो जसा आहे तसाच आपण त्याला पाहू. ३ आणि ज्या कोणाला ही आशा आहे तो स्वतःला त्याच्यासारखंच शुद्ध करतो.+
४ जो पाप करत राहतो तो देवाचे नियम मोडत राहतो, कारण पाप म्हणजेच देवाचे नियम मोडणं. ५ तो आपली पापं दूर करण्यासाठी आला हेसुद्धा तुम्हाला माहीत आहे,+ आणि त्याच्यात पापाचा अंशही नाही. ६ जो त्याच्या ऐक्यात राहतो तो पाप करत राहत नाही.+ जो पाप करत राहतो त्याने त्याला पाहिलेलं नाही किंवा त्याला ओळखलेलंही नाही. ७ मुलांनो, कोणालाही तुमची फसवणूक करू देऊ नका. जो नीतीने चालतो तो येशू ख्रिस्तासारखाच नीतिमान आहे. ८ जो पाप करत राहतो तो सैतानापासून* आहे, कारण सैतान पूर्वीपासूनच* पाप करत आला आहे.+ देवाचा मुलगा यासाठीच आला, की त्याने सैतानाची कार्यं उद्ध्वस्त करावीत.+
९ जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करत राहत नाही,+ कारण देवाची पवित्र शक्ती* त्याच्यामध्ये टिकून राहते. आणि त्याने पाप करत राहणं शक्य नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे.+ १० देवाची मुलं कोण आणि सैतानाची मुलं कोण, हे यावरून दिसून येतं: जो कोणी नीतीने चालत नाही तो देवापासून नाही. तसंच जो आपल्या बांधवावर प्रेम करत नाही तोही देवापासून नाही.+ ११ कारण तुम्ही सुरुवातीपासून ऐकलेला संदेश हाच आहे, की आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे.+ १२ आपण काइनसारखं होऊ नये. तो त्या दुष्टापासून होता आणि त्याने आपल्या भावाची हत्या केली.+ त्याने त्याची हत्या का केली? कारण त्याची स्वतःची कार्यं दुष्ट होती,+ पण त्याच्या भावाची कार्यं मात्र नीतिमान होती.+
१३ बांधवांनो, जग तुमचा द्वेष करतं याबद्दल आश्चर्य करू नका.+ १४ आपण पूर्वी मेलेल्यांसारखे होतो. पण आता आपण जिवंत झालो आहोत हे आपल्याला माहीत आहे,+ कारण आपण बांधवांवर प्रेम करतो.+ जो प्रेम करत नाही तो मेलेल्या स्थितीतच राहतो.+ १५ जो कोणी आपल्या बांधवाचा द्वेष करतो तो खुनी आहे+ आणि तुम्हाला माहीत आहे की खुनी असलेल्या कोणत्याही माणसात सर्वकाळाचं जीवन राहत नाही.+ १६ प्रेम काय असतं हे आपल्याला यावरूनच कळलं आहे, कारण त्याने आपल्यासाठी त्याचं जीवन* अर्पण केलं.+ आणि आपणही आपल्या बांधवांसाठी जीवन* अर्पण करावं, हे आपलं कर्तव्य आहे.+ १७ जगात धनसंपत्ती असलेल्या एखाद्याने जर आपल्या बांधवाला अडचणीत पाहूनही त्याला दया दाखवली नाही, तर मग त्याचं देवावर प्रेम आहे असं कसं म्हणता येईल?+ १८ मुलांनो, आपण शब्दांनी किंवा फक्त तोंडाने नाही,+ तर कार्यांतून+ आणि अगदी खऱ्या मनाने प्रेम केलं पाहिजे.+
१९ यावरूनच आपल्याला कळेल की आपण सत्यापासून आहोत. आपलं मन कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला दोष देत असलं, २० तरीसुद्धा आपण देवासमोर त्याबद्दल आपल्या मनाला दिलासा देऊ.* कारण देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे आणि त्याला सर्वकाही माहीत आहे.+ २१ प्रिय बांधवांनो, जर आपलं मन आपल्याला दोष देत नसेल, तर मात्र आपल्याला देवासमोर मोकळेपणाने बोलण्याचं धैर्य आहे.+ २२ आणि आपण त्याच्याकडे जे काही मागतो ते आपल्याला मिळतं,+ कारण आपण त्याच्या आज्ञांचं पालन करत आहोत आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करत आहोत. २३ खरंतर, त्याची आज्ञा हीच आहे, की आपण त्याचा मुलगा, येशू ख्रिस्त याच्या नावावर विश्वास ठेवावा+ आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रेम करावं.+ २४ तसंच, जो देवाच्या आज्ञांचं पालन करतो, तो देवासोबत ऐक्यात राहतो आणि देवही अशा माणसासोबत ऐक्यात राहतो.+ आणि त्याने आपल्याला दिलेल्या पवित्र शक्तीद्वारे आपल्याला हे कळतं, की तो आपल्यासोबत ऐक्यात आहे.+
४ प्रिय बांधवांनो, प्रत्येक प्रेरित संदेशावर विश्वास ठेवू नका.+ तर, प्रेरित संदेश देवापासून आहेत की नाही याची पारख करा;+ कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.+
२ देवापासून असलेला प्रेरित संदेश तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता: जो संदेश हे मान्य करतो, की ख्रिस्त माणूस* म्हणून आला तो देवापासून आहे.+ ३ पण, जो संदेश येशूला मान्य करत नाही तो देवापासून नाही;+ तर, जो ख्रिस्तविरोधी आहे, त्याच्यापासून हा संदेश आहे. हा संदेश येणार असल्याचं तुम्ही ऐकलं होतं+ आणि आता तो जगात आहे.+
४ मुलांनो, तुम्ही देवापासून आहात आणि तुम्ही त्या खोट्या संदेष्ट्यांवर विजय मिळवला आहे.+ कारण जो तुमच्यासोबत ऐक्यात आहे,+ तो जगासोबत ऐक्यात असणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.+ ५ ते जगापासून आहेत;+ म्हणूनच ज्या गोष्टी जगापासून आहेत त्यांबद्दल ते बोलतात आणि जग त्यांचं ऐकतं.+ ६ आपण मात्र देवापासून आहोत. ज्याला देवाची ओळख झाली आहे, तो आपलं ऐकतो;+ पण जो देवापासून नाही, तो आपलं ऐकत नाही.+ यावरूनच आपण सत्याचा संदेश आणि खोटेपणाचा संदेश यांतला फरक ओळखू शकतो.+
७ प्रिय बांधवांनो, आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या,+ कारण प्रेम देवापासून आहे. जो प्रेम करतो तो देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो.+ ८ जो प्रेम करत नाही, त्याला देवाची ओळख झालेली नाही, कारण देव प्रेम आहे.*+ ९ देवाने आपल्या एकुलत्या एका मुलाला जगात पाठवलं.+ हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावं. यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.+ १० आपण देवावर प्रेम केलं असं नाही, तर त्याने आपल्यावर प्रेम केलं. आणि त्याच्यासोबत आपला समेट होण्याकरता, आपल्या पापांसाठी प्रायश्चित्ताचं बलिदान म्हणून त्याने आपल्या मुलाला पाठवलं.+
११ प्रिय बांधवांनो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रेम केलं, तर आपलंही एकमेकांवर प्रेम करण्याचं कर्तव्य आहे.+ १२ देवाला कधीही कोणी पाहिलेलं नाही.+ पण, आपण एकमेकांवर प्रेम करत राहिलो, तर देव आपल्यामध्ये राहतो आणि त्याचं प्रेम आपल्यामध्ये परिपूर्ण होतं.+ १३ त्याने आपल्याला त्याची पवित्र शक्ती* दिली आहे, यावरून आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यामध्ये ऐक्यात राहतो हे आपल्याला समजतं. १४ तसंच, पित्याने आपल्या मुलाला जगाचा तारणकर्ता म्हणून पाठवल्याचं आपण स्वतः पाहिलं आहे आणि त्याबद्दल आपण साक्ष देत आहोत.+ १५ जो कोणी येशूला, देवाचा मुलगा म्हणून मान्य करतो,+ त्याच्यासोबत देव ऐक्यात राहतो आणि तो देवासोबत ऐक्यात राहतो.+ १६ देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम आपण ओळखलं आहे आणि त्यावर आपण विश्वासही ठेवतो.+
देव प्रेम आहे,+ आणि जो कोणी प्रेमात टिकून राहतो तो देवासोबत आणि देव त्याच्यासोबत ऐक्यात राहतो.+ १७ अशा रितीने आपल्यामध्ये प्रेम परिपूर्ण करण्यात आलं आहे. हे यासाठी, की न्यायाच्या दिवशी आपल्याला मनमोकळेपणाने बोलण्याचं धैर्य असावं;*+ कारण या जगात आपलं जीवन त्याच्या* जीवनासारखंच आहे. १८ प्रेमामध्ये भीती नसते,+ उलट परिपूर्ण प्रेम भीती घालवून देतं, कारण भीती आपल्यावर बंधन घालते. खरोखर, ज्याला भीती आहे त्याच्यामध्ये प्रेम परिपूर्ण झालेलं नाही.+ १९ आधी त्याने आपल्यावर प्रेम केलं, म्हणून आपण प्रेम करतो.+
२० जो कोणी असं म्हणतो, की “मी देवावर प्रेम करतो,” पण आपल्या भावाचा द्वेष करतो तो खोटं बोलतो.+ कारण ज्याला त्याने पाहिलं आहे त्या भावावर जर तो प्रेम करत नाही,+ तर न पाहिलेल्या देवावर तो प्रेम करूच शकत नाही.+ २१ आणि त्याने तर आपल्याला अशी आज्ञा दिली आहे, की जो कोणी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या भावावरही प्रेम केलं पाहिजे.+
५ येशू हा ख्रिस्त आहे यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण देवापासून जन्मलेला आहे.+ आणि जो जन्म देणाऱ्यावर प्रेम करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यांवरही प्रेम करतो. २ जेव्हा आपण देवावर प्रेम करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपल्याला समजतं, की देवाच्या मुलांवर आपलं प्रेम आहे.+ ३ कारण देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचं पालन करावं+ आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.+ ४ जो कोणी* देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय मिळवतो.+ आणि ज्याद्वारे आपण जगावर विजय मिळवला आहे, तो म्हणजे आपला विश्वास.+
५ जगावर विजय कोण मिळवू शकतो?+ तोच नाही का, जो येशू हा देवाचा मुलगा आहे असा विश्वास बाळगतो?+ ६ जो पाण्याद्वारे आणि रक्ताद्वारे आला तो हाच आहे, म्हणजे येशू ख्रिस्त; तो फक्त पाण्यासोबत नाही,+ तर पाण्यासोबत आणि रक्तासोबत आला.+ आणि पवित्र शक्ती* याबद्दल साक्ष देत आहे,+ कारण पवित्र शक्ती सत्य प्रकट करते.* ७ साक्ष देणाऱ्या तीन गोष्टी आहेत: ८ पवित्र शक्ती,+ पाणी+ आणि रक्त;+ आणि या तिन्ही गोष्टींची साक्ष सारखीच आहे.
९ जर आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, तर तिच्या तुलनेत देवाची साक्ष कितीतरी महान आहे. कारण देव स्वतः आपल्या मुलाबद्दल साक्ष देतो. १० जो देवाच्या मुलावर विश्वास ठेवतो तो देवाने दिलेली साक्ष मनापासून स्वीकारतो. पण, जो देवावर विश्वास ठेवत नाही, त्याने त्याला खोटं ठरवलं आहे,+ कारण देवाने आपल्या मुलाबद्दल दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. ११ आणि देवाने दिलेली साक्ष हीच आहे, की त्याने आपल्याला सर्वकाळाचं जीवन दिलं+ आणि हे जीवन त्याच्या मुलामध्ये आहे.+ १२ जो मुलाला स्वीकारतो, त्याच्याजवळ हे जीवन आहे; पण, जो देवाच्या मुलाला स्वीकारत नाही, त्याच्याजवळ हे जीवन नाही.+
१३ मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहितो, की तुमच्याजवळ सर्वकाळाचं जीवन आहे, हे तुम्हाला कळावं.+ कारण तुम्ही देवाच्या मुलाच्या नावावर विश्वास ठेवता.+ १४ आणि देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे,*+ की त्याच्या इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.+ १५ आणि आपण काहीही मागितलं तरी तो आपलं ऐकतो, हे जर आपल्याला माहीत आहे, तर आपण जे मागितलं ते आपल्याला मिळेल हेही आपल्याला माहीत आहे, कारण आपण त्याच्याजवळ ते मागितलं आहे.+
१६ ज्याची शिक्षा मरण नाही, असं पाप करताना जर कोणी आपल्या भावाला पाहिलं, तर तो देवाकडे विनंती करेल आणि देव त्याला जीवन देईल.+ हो, ज्याची शिक्षा मरण नाही असं पाप करणाऱ्याला तो ते देईल. पण, असंही एक पाप आहे, ज्याची शिक्षा मरण आहे.+ आणि अशा पापाबद्दल विनंती करायला मी त्याला सांगत नाही. १७ खरंतर, सर्व प्रकारची अनीती पापच आहे.+ पण, तरीसुद्धा असं एक पाप आहे, ज्याची शिक्षा मरण नाही.
१८ आपल्याला माहीत आहे, की देवापासून जन्मलेला कोणीही पाप करत राहत नाही. तर जो देवापासून जन्मला तो* त्याचं रक्षण करतो आणि त्यामुळे सैतान* त्याला हातही लावू शकत नाही.+ १९ आपण देवापासून आहोत हे आपल्याला माहीत आहे, पण सगळं जग सैतानाच्या* नियंत्रणात आहे.+ २० आपल्याला माहीत आहे, की देवाचा मुलगा आला आहे+ आणि जो खरा आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला मिळावं म्हणून त्याने आपल्याला बुद्धी* दिली आहे. आणि जो खरा आहे त्याच्यासोबत, त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपण ऐक्यात आहोत.+ हाच खरा देव आणि सर्वकाळाचं जीवन आहे.+ २१ मुलांनो, मूर्तींपासून दूर राहा.+
किंवा “सहभागी असावं.”
किंवा “आपल्या वतीने बोलणारा.”
शब्दशः “चालला.”
शब्दशः “चालावं.”
किंवा कदाचित, “त्याच्यामुळे इतर जण अडखळणार नाहीत.”
म्हणजे, येशूच्या.
किंवा “आपल्या धनसंपत्तीबद्दल बढाई मारणं.”
किंवा “आपल्यासारखे.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “देवाची मुलं.”
शब्दशः “दियाबलापासून.” म्हणजे, निंदा करणारा.
शब्दशः “सुरुवातीपासूनच,” म्हणजे, त्याने पहिल्यांदा देवाविरुद्ध बंड केलं तेव्हापासून.
शब्दार्थसूची पाहा. शब्दशः “बीज.”
किंवा “जीव.”
किंवा “जीव.”
किंवा “समजूत घालू; खातरी देऊ.”
शब्दशः “देहात.”
म्हणजे, प्रेमाचा उगम आहे.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आत्मविश्वास असावा.”
म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या.
शब्दशः “जे काही.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “सत्य आहे.”
किंवा “मनमोकळेपणाने बोलण्याचं धैर्य आहे.”
म्हणजे, येशू ख्रिस्त, देवाचा मुलगा.
शब्दशः “तो दुष्ट.”
शब्दशः “त्या दुष्टाच्या.”
शब्दशः “समजशक्ती; समजण्याची कुवत.”