वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt मार्क १:१-१६:८
  • मार्क

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्क
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मार्क

मार्क याने सांगितलेला आनंदाचा संदेश

१ देवाचा मुलगा, येशू ख्रिस्त याच्याबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशाची सुरुवात: २ यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असं लिहिलं होतं: “(पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवतोय, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.)+ ३ ओसाड रानात घोषणा करणाऱ्‍या एकाचा आवाज ऐकू येतोय: ‘यहोवासाठी* मार्ग तयार करा! त्याच्यासाठी रस्ते मोकळे करा.’”+ ४ त्याप्रमाणे, बाप्तिस्मा* देणारा योहान ओसाड रानात आला आणि अशी घोषणा करू लागला, की पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचं चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घ्या.+ ५ तेव्हा यहूदीयाच्या प्रदेशातले आणि यरुशलेममधले सगळे लोक त्याच्याकडे येऊ लागले. त्यांनी आपल्या पापांची उघडपणे कबुली देऊन त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.+ ६ योहान उंटाच्या केसांचे कपडे घालायचा आणि कमरेला चामड्याचा पट्टा बांधायचा.+ टोळ आणि रानातला मध हेच त्याचं अन्‍न होतं.+ ७ तो अशी घोषणा करायचा: “जो माझ्या मागून येतोय त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे आणि खाली वाकून त्याच्या जोड्यांचे बंद सोडायलाही मी योग्य नाही.+ ८ मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तो तुम्हाला पवित्र शक्‍तीने* बाप्तिस्मा देईल.”+

९ त्याच दिवसांत, गालीलच्या नासरेथहून येशू आला आणि योहानने त्याला यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला.+ १० येशू पाण्यातून वर येताच त्याला आकाश उघडताना आणि पवित्र शक्‍ती* कबुतरासारखी आपल्यावर उतरताना दिसली.+ ११ आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा प्रिय मुलगा आहेस. तू माझं मन आनंदित केलं आहेस.”+

१२ त्यानंतर लगेच पवित्र शक्‍तीने त्याला ओसाड रानात जायला प्रवृत्त केलं. १३ त्यामुळे तो ४० दिवस तिथे राहिला आणि तिथेच सैतानाने त्याची परीक्षा घेतली.+ तो जंगली प्राण्यांसोबत राहत होता आणि स्वर्गदूत त्याची सेवा करत होते.+

१४ मग योहानला अटक झाल्यानंतर येशू गालीलमध्ये गेला+ आणि असं म्हणून देवाबद्दल आनंदाचा संदेश सांगू लागला:+ १५ “नेमलेली वेळ आली आहे आणि देवाचं राज्य जवळ आलंय. म्हणून पश्‍चात्ताप करा+ आणि या आनंदाच्या संदेशावर विश्‍वास ठेवा.”

१६ गालील समुद्राजवळून जात असताना येशूला शिमोन आणि शिमोनचा भाऊ अंद्रिया दिसला.+ ते समुद्रात जाळी टाकत होते,+ कारण ते मासे धरणारे होते.+ १७ तो त्यांना म्हणाला: “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन.”+ १८ हे ऐकताच त्यांनी आपली जाळी टाकून दिली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.+ १९ तिथून थोडं पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे दोघं दिसले. ते आपल्या नावेत जाळी नीट करत होते.+ २० त्यांना पाहताच येशूने त्यांना बोलावलं, तेव्हा ते आपले वडील जब्दी यांना नावेतच मजुरांसोबत सोडून त्याच्यामागे चालू लागले. २१ मग ते कफर्णहूमला गेले.

शब्बाथाचा दिवस सुरू होताच, तो सभास्थानात जाऊन शिकवू लागला.+ २२ त्याची शिकवण्याची पद्धत पाहून लोक थक्क झाले, कारण तो शास्त्र्यांसारखा नाही, तर अधिकार असलेल्या व्यक्‍तीसारखा त्यांना शिकवत होता.+ २३ त्याच वेळी, दुष्ट स्वर्गदूताच्या* प्रभावाखाली असलेला एक माणूस त्यांच्या सभास्थानात होता. तो ओरडून म्हणाला: २४ “हे नासरेथच्या येशू, आमचं तुझ्याशी काय घेणंदेणं?+ तू काय आमचा नाश करायला आला आहेस? तू कोण आहेस हे मला चांगलं माहीत आहे. तू देवाचा पवित्र सेवक आहेस!”+ २५ पण, येशू त्याला धमकावून म्हणाला: “शांत राहा आणि त्याच्यातून बाहेर निघ!” २६ तेव्हा दुष्ट स्वर्गदूताने त्या माणसाच्या शरीराला पिळवटून काढलं आणि मोठ्याने किंचाळत तो त्याच्यातून बाहेर निघाला. २७ हे पाहून सगळे लोक इतके चकित झाले, की ते आपसात चर्चा करू लागले: “हे आहे तरी काय? ही कोणती नवीन शिकवण्याची पद्धत?* हा तर दुष्ट स्वर्गदूतांनासुद्धा अधिकाराने आज्ञा देतो आणि तेही त्याचं ऐकतात.” २८ तेव्हा त्याच्याबद्दलची बातमी पाहतापाहता गालीलच्या संपूर्ण प्रदेशात चारही दिशांना पसरली.

२९ मग सभास्थानातून निघून ते याकोब आणि योहानसोबत, शिमोन आणि अंद्रिया यांच्या घरी गेले.+ ३० तिथे शिमोनची सासू+ तापाने आजारी पडली होती. तेव्हा त्यांनी लगेच येशूला याबद्दल सांगितलं. ३१ म्हणून येशूने जवळ जाऊन तिचा हात धरला आणि तिला उठवलं. तेव्हा तिचा ताप उतरला आणि ती त्यांची सेवा करू लागली.

३२ संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, लोक त्याच्याकडे सगळ्या आजारी लोकांना आणि दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेल्यांना आणू लागले.+ ३३ संपूर्ण शहरच त्यांच्या दारासमोर जमलं. ३४ तेव्हा त्याने वेगवेगळे आजार असलेल्या लोकांना बरं केलं+ आणि बऱ्‍याच दुष्ट स्वर्गदूतांना काढलं. पण, तो ख्रिस्त आहे* हे त्या दुष्ट स्वर्गदूतांना माहीत असल्यामुळे त्याने त्यांना बोलू दिलं नाही.

३५ दुसऱ्‍या दिवशी पहाटे, अंधार असतानाच तो उठून बाहेर गेला आणि एका एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करू लागला.+ ३६ तेव्हा शिमोन आणि बाकीचे लोक त्याला शोधू लागले. ३७ तो त्यांना सापडला तेव्हा ते म्हणाले: “सगळे तुला शोधत आहेत.” ३८ तेव्हा तो म्हणाला: “आपण दुसरीकडे, आसपासच्या गावांत जाऊ या, म्हणजे मला तिथेही प्रचार करता येईल, कारण यासाठीच मी आलोय.”+ ३९ मग तो तिथून निघाला आणि त्यांच्या सभास्थानांत शिकवत आणि दुष्ट स्वर्गदूत काढत संपूर्ण गालीलमध्ये फिरला.+

४० मग एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून अशी विनवणी करू लागला: “तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.”+ ४१ तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला आणि त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.”+ ४२ त्याच क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा होऊन तो शुद्ध झाला. ४३ मग येशूने त्याला लगेच पाठवून दिलं आणि अशी ताकीद दिली, ४४ “हे बघ, कोणाला काहीही सांगू नकोस. तर याजकाकडे जाऊन स्वतःला दाखव आणि त्यांना साक्ष मिळावी म्हणून शुद्ध होण्यासाठी मोशेने सांगितलेल्या गोष्टी अर्पण कर.”+ ४५ पण तिथून निघाल्यानंतर, तो माणूस सगळ्यांना याबद्दल सांगू लागला. आणि त्याने ही बातमी सगळीकडे इतकी पसरवली की येशूला कोणत्याही शहरात उघडपणे जाणं कठीण झालं. म्हणून तो शहराबाहेर एकांत ठिकाणांत राहू लागला. तरीसुद्धा लोक सगळीकडून त्याच्याकडे येतच राहिले.+

२ पण काही दिवसांनंतर तो पुन्हा कफर्णहूमला आला. तेव्हा, तो घरी आला आहे+ अशी बातमी सगळीकडे पसरली. २ घरात इतके लोक जमले की पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती; अगदी दाराजवळही लोकांची गर्दी होती. मग तो त्यांना देवाचं वचन सांगू लागला.+ ३ तेव्हा लोक लकवा मारलेल्या* एका माणसाला घेऊन आले. चौघांनी त्याला उचलून आणलं होतं.+ ४ पण लोकांच्या गर्दीमुळे ते त्याला थेट येशूजवळ घेऊन जाऊ शकत नव्हते. त्यामुळे, ज्या ठिकाणी येशू होता त्या ठिकाणी त्यांनी छताचा काही भाग उघडला. मग लकवा मारलेला माणूस झोपला होता ती खाट त्यांनी तिथून खाली सोडली. ५ त्यांचा विश्‍वास पाहून+ येशू त्या लकवा मारलेल्या माणसाला म्हणाला: “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”+ ६ तेव्हा, तिथे बसलेले काही शास्त्री मनातल्या मनात असा विचार करू लागले:+ ७ “असं कसं बोलू शकतो हा माणूस? हा तर देवाची निंदा करतोय. देवाशिवाय आणखी कोण पापांची क्षमा करू शकतो?”+ ८ पण, त्यांच्या मनातले विचार लगेच ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही असा विचार का करता?+ ९ ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे, की ‘ऊठ आणि आपली खाट उचलून चालायला लाग,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे? १० पण, मनुष्याच्या मुलाला+ पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे+ हे तुम्हाला कळावं म्हणून . . . . ” तो त्या लकवा मारलेल्या माणसाला म्हणाला: ११ “मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचल आणि घरी जा.” १२ तेव्हा तो उठला आणि लगेच आपली खाट उचलून त्या सगळ्यांच्या देखत बाहेर चालत गेला. हे पाहून लोकांना फार नवल वाटलं आणि त्यांनी असं म्हणून देवाचा गौरव केला: “यापूर्वी आम्ही कधीच असं काही पाहिलं नव्हतं.”+

१३ मग येशू पुन्हा समुद्रकिनाऱ्‍यावर गेला. तेव्हा सगळे लोक त्याच्यामागे येऊ लागले आणि तो त्यांना शिकवू लागला. १४ तिथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी, जकात नाक्यावर बसलेला दिसला. येशू त्याला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे चालू लागला.+ १५ नंतर, येशू लेवीच्या घरात जेवायला बसला होता, तेव्हा बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू आणि त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले होते. कारण त्यांच्यापैकी बरेच जण त्याचे शिष्य बनले होते.+ १६ पण, जेव्हा परूशी* लोकांमधल्या शास्त्र्यांनी त्याला पापी लोकांसोबत आणि जकातदारांसोबत जेवताना पाहिलं, तेव्हा ते त्याच्या शिष्यांना म्हणाले: “हा जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत कसा काय जेवतो?” १७ येशूने हे ऐकलं तेव्हा तो त्यांना म्हणाला: “जे निरोगी असतात त्यांना वैद्याची गरज नसते, तर आजाऱ्‍यांना असते. मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.”+

१८ योहानचे शिष्य आणि परूशी लोक उपास करायचे. त्यामुळे ते त्याच्याजवळ आले आणि म्हणाले: “योहानचे आणि परूश्‍यांचे शिष्य उपास करतात, मग तुमचे शिष्य उपास का करत नाहीत?”+ १९ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “नवरा मुलगा+ सोबत असेपर्यंत त्याच्या मित्रांना उपास करायची गरज असते का? नाही. नवरा मुलगा सोबत असेपर्यंत ते उपास करत नाहीत. २० पण, असे दिवस येतील जेव्हा नवऱ्‍या मुलाला त्यांच्यापासून दूर केलं जाईल+ आणि त्या दिवशी ते उपास करतील. २१ एखाद्या जुन्या झग्याला कोणीही नवीन कापडाचं ठिगळ लावत नाही. कारण नवीन कापड आकसतं आणि झग्याला पडलेलं छिद्र आणखीनच मोठं होतं.+ २२ तसंच, कोणीही जुन्या बुधल्यांमध्ये* नवीन द्राक्षारस भरत नाही. कारण असं केलं, तर द्राक्षारसामुळे बुधल्या फाटतील आणि बुधल्यांसोबत द्राक्षारसही वाया जाईल. म्हणून लोक नवीन द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये भरतात.”

२३ मग शब्बाथाच्या दिवशी तो शेतांतून जात होता, तेव्हा त्याचे शिष्य जाताजाता धान्याची कणसं तोडू लागले.+ २४ त्यामुळे परूशी त्याला म्हणाले: “बघ! शब्बाथाच्या दिवशी नियमाप्रमाणे योग्य नसलेली गोष्ट हे का करत आहेत?” २५ पण येशू त्यांना म्हणाला: “एकदा दावीदला आणि त्याच्या माणसांना भूक लागली होती आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नव्हतं तेव्हा त्याने काय केलं, हे तुम्ही कधी वाचलं नाही का?+ २६ दावीद देवाच्या घरात गेला आणि त्याने पवित्र भाकरी* खाल्ल्या आणि आपल्या माणसांनाही दिल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या खाणं योग्य नव्हतं.+ तुम्ही याबद्दल मुख्य याजक अब्याथार+ याच्या वृत्तान्तात वाचलं नाही का?” २७ मग तो त्यांना म्हणाला: “माणूस शब्बाथासाठी नाही, तर शब्बाथ माणसासाठी अस्तित्वात आला.”+ २८ मनुष्याचा मुलगा तर शब्बाथाचाही प्रभू आहे.+

३ तो पुन्हा एका सभास्थानात गेला, तेव्हा तिथे वाळलेल्या* हाताचा एक माणूस होता.+ २ येशू त्याला शब्बाथाच्या दिवशी बरं करतो का, हे पाहायला परूशी त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. कारण त्यांना त्याच्यावर आरोप लावायचा होता. ३ येशू त्या वाळलेल्या* हाताच्या माणसाला म्हणाला: “ऊठ, इथे मधे ये.” ४ मग तो त्यांना म्हणाला: “शब्बाथाच्या दिवशी काय करणं योग्य आहे? एखाद्याचं भलं करणं की वाईट करणं? एखाद्याचा जीव वाचवणं की जीव घेणं?”+ पण ते काहीच बोलले नाहीत. ५ त्यांची मनं किती कठोर आहेत+ हे पाहून त्याला खूप दुःख झालं. तेव्हा त्याने रागाने त्यांच्यावर एक नजर टाकली आणि तो त्या माणसाला म्हणाला: “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात बरा झाला. ६ हे पाहून परूशी बाहेर गेले आणि लगेच हेरोदच्या पक्षाच्या लोकांसोबत+ मिळून येशूला ठार मारायचा कट रचू लागले.

७ पण, येशू आपल्या शिष्यांसोबत समुद्राकडे निघून गेला. तेव्हा गालील आणि यहूदीया इथून आलेल्या लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे निघाला.+ ८ तो करत असलेल्या बऱ्‍याच चमत्कारांबद्दल ऐकून यरुशलेम, इदोम आणि यार्देन नदीच्या पलीकडच्या भागांतून; तसंच, सोर आणि सीदोन यांच्या आसपासच्या प्रदेशांतूनही मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आले. ९ गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना आपल्यासाठी एक लहानशी नाव तयार ठेवायला सांगितलं. १० येशूने पुष्कळ लोकांना बरं केलं होतं. त्यामुळे गंभीर आजार असलेले सगळे लोक त्याला हात लावण्यासाठी+ त्याच्याभोवती गर्दी करू लागले. ११ तसंच, जेव्हा दुष्ट स्वर्गदूतांनी*+ पछाडलेले लोक त्याला पाहायचे, तेव्हा ते त्याच्यासमोर पडून मोठ्याने ओरडून म्हणायचे: “तू देवाचा मुलगा आहेस.”+ १२ पण त्याने त्यांना वारंवार बजावून सांगितलं, की त्यांनी त्याच्याबद्दल कोणालाही सांगू नये.+

१३ मग तो एका डोंगरावर गेला आणि त्याने आपल्या शिष्यांपैकी काहींना आपल्यासोबत यायला सांगितलं,+ तेव्हा ते त्याच्यासोबत गेले.+ १४ मग त्याने १२ जणांना निवडलं* आणि त्यांना प्रेषित असं नावही दिलं. ते त्याच्यासोबत असायचे आणि त्याने त्यांना प्रचार करायला पाठवलं. १५ तसंच, दुष्ट स्वर्गदूत काढायचा अधिकारही त्याने त्यांना दिला.+

१६ त्याने निवडलेल्या* १२ जणांची+ नावं अशी: शिमोन, ज्याला त्याने पेत्र असंही नाव दिलं,+ १७ जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबचा भाऊ योहान (त्याने त्यांना बोआनेर्गेस असंही नाव दिलं. त्याचा अर्थ “गर्जनेची मुलं” असा होतो),+ १८ अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी* १९ आणि ज्याने पुढे त्याचा विश्‍वासघात केला तो यहूदा इस्कर्योत.

मग येशू एका घरात गेला, २० तेव्हा पुन्हा लोकांची इतकी गर्दी जमली, की येशू आणि त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत. २१ या सगळ्या गोष्टी त्याच्या घरच्यांना कळल्या, तेव्हा ते त्याला आपल्यासोबत घेऊन येण्यासाठी निघाले. कारण ते म्हणत होते, “त्याला वेड लागलंय.”+ २२ तसंच, यरुशलेममधून जे शास्त्री आले होते तेही असं म्हणत होते, की “याच्यात बालजबूल* आहे आणि या दुष्ट स्वर्गदूतांच्या अधिकाऱ्‍याच्या मदतीनेच हा दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ २३ त्यामुळे येशूने त्यांना आपल्याजवळ बोलावलं आणि उदाहरणं देऊन तो त्यांना म्हणाला: “सैतानच सैतानाला कसा काढू शकतो? २४ एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही.+ २५ आणि एखाद्या घरात फूट पडली तर ते घरही टिकू शकत नाही. २६ तसंच, सैतान जर स्वतःविरुद्धच उठला असेल आणि त्याच्यात फूट पडली असेल, तर तो टिकू शकणार नाही, उलट त्याचा अंत होईल. २७ जर कोणाला एखाद्या ताकदवान माणसाच्या घरात शिरून चोरी करायची असेल, तर त्याला आधी त्या माणसाला बांधून ठेवावं लागेल, तरच त्याला त्याचं घर लुटता येईल. २८ मी तुम्हाला खरं सांगतो, माणसांनी कोणतंही पाप केलं किंवा कोणत्याही प्रकारची निंदा केली, तरी त्यांना त्याबद्दल क्षमा केली जाईल. २९ पण जो पवित्र शक्‍तीविरुद्ध* बोलून तिची निंदा करतो, त्याला कधीच क्षमा केली जाणार नाही.+ तर त्या पापाचा दोष कायमचा त्याच्यावर राहील.”+ ३० त्यांनी, “त्याच्यात दुष्ट स्वर्गदूत आहे,”+ असं म्हटल्यामुळे तो हे बोलला.

३१ मग त्याची आई आणि भाऊ तिथे आले.+ ते बाहेरच थांबले आणि त्यांनी त्याला बोलावून आणण्यासाठी निरोप पाठवला.+ ३२ तेव्हा त्याच्याभोवती बसलेल्या लोकांपैकी एक त्याला म्हणाला: “बाहेर तुमची आई आणि तुमचे भाऊ तुम्हाला भेटायला आले आहेत.”+ ३३ पण येशू म्हणाला: “माझी आई आणि माझे भाऊ कोण?” ३४ मग आपल्याभोवती बसलेल्या लोकांकडे पाहून तो म्हणाला: “पाहा, माझी आई आणि माझे भाऊ हेच आहेत!+ ३५ जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.”+

४ मग तो पुन्हा समुद्रकिनाऱ्‍यावर शिकवू लागला, तेव्हा लोकांचा खूप मोठा समुदाय त्याच्याजवळ जमला. म्हणून, तो नावेत बसून किनाऱ्‍यापासून काही अंतरावर गेला आणि सगळे लोक किनाऱ्‍यावर उभे राहिले.+ २ तो त्यांना उदाहरणं देऊन बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.+ तो म्हणाला:+ ३ “लक्ष देऊन ऐका! एक शेतकरी पेरणी करायला निघाला.+ ४ तो पेरणी करत असताना काही बी रस्त्याच्या कडेला पडलं आणि पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकलं. ५ काही बी खडकाळ जमिनीवर पडलं. तिथे जास्त माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे लगेच रोपं उगवली.+ ६ पण सूर्य वर येताच कडक उन्हामुळे ती वाळून गेली, कारण त्यांनी मूळ धरलं नव्हतं. ७ काही बी काटेरी झुडपांत पडलं आणि ती झुडपं वाढल्यावर त्यांनी रोपांची वाढ खुंटवली. यामुळे त्यांनी पीक दिलं नाही.+ ८ पण काही बी चांगल्या जमिनीवर पडलं. ते उगवून वाढू लागलं आणि पीक देऊ लागलं; काही तीसपट, काही साठपट आणि काही शंभरपट.”+ ९ मग तो असंही म्हणाला: “ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+

१० तो एकटा असताना, त्याचे १२ प्रेषित आणि इतर शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याने दिलेल्या उदाहरणांबद्दल प्रश्‍न विचारू लागले.+ ११ तो त्यांना म्हणाला: “देवाच्या राज्याच्या पवित्र रहस्याची+ समज तुम्हाला देण्यात आली आहे, पण बाहेरच्यांसाठी ही फक्‍त उदाहरणं आहेत.+ १२ म्हणून ते पाहतील, पण त्यांना दिसणार नाही आणि ते ऐकतील, पण त्यांना अर्थ कळणार नाही. तसंच, ते कधीच मागे फिरणार नाहीत आणि त्यांच्या पापांची क्षमा त्यांना मिळणार नाही.”+ १३ मग तो त्यांना म्हणाला: “हे उदाहरण जर तुम्हाला समजलं नाही, तर इतर उदाहरणं कशी समजतील?

१४ शेतकऱ्‍याने पेरलेलं बी म्हणजे देवाचं वचन.+ १५ त्यामुळे, जे रस्त्याच्या कडेला पेरलेल्या बीसारखे आहेत ते लोक वचन तर ऐकतात, पण लगेच सैतान येऊन+ त्यांच्यामध्ये पेरलेलं बी काढून घेतो.+ १६ तसंच, जे खडकाळ जमिनीवर पेरलेल्या बीसारखे आहेत ते लोक वचन ऐकताच आनंदाने स्वीकारतात.+ १७ पण मूळ न धरल्यामुळे ते फक्‍त काही काळ टिकून राहतात. मग वचनामुळे संकट आलं किंवा छळ झाला तर ते लगेच अडखळून पडतात. १८ आणि असेही काही आहेत जे काटेरी झुडपांत पेरलेल्या बीसारखे असतात. ते असे लोक आहेत ज्यांनी वचन ऐकलंय,+ १९ पण या जगाच्या व्यवस्थेच्या* चिंता,+ पैशाची फसवी ताकद+ आणि इतर सगळ्या गोष्टींची इच्छा+ त्यांच्या मनात येऊन वचनाची वाढ खुंटवते आणि ते निष्फळ ठरतं. २० शेवटी, जे चांगल्या जमिनीवर पेरलेल्या बीसारखे आहेत ते लोक वचन ऐकतात आणि आनंदाने स्वीकारतात. मग, काही तीसपट, तर काही साठपट आणि काही शंभरपट असं पीक देतात.”+

२१ तो त्यांना असंही म्हणाला: “दिवा लावून कधी टोपलीखाली किंवा पलंगाखाली ठेवला जातो का? नाही. उलट, तो घरात एखाद्या उंच ठिकाणी ठेवला जातो. नाही का?+ २२ कारण अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उघड होणार नाही. आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही.+ २३ ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+

२४ पुढे तो त्यांना म्हणाला: “तुम्ही जे ऐकत आहात त्याकडे लक्ष द्या.+ ज्या मापाने तुम्ही मापून देता, त्याच मापाने तुम्हाला मापून दिलं जाईल; खरंतर, आणखी जास्त दिलं जाईल. २५ कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात येईल,+ पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडून जे आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.”+

२६ मग तो पुढे म्हणाला: “देवाचं राज्य अशा एका माणसासारखं आहे, जो जमिनीत बी टाकतो. २७ तो रोज रात्री झोपतो आणि सकाळी उठतो; यादरम्यान, पेरलेलं बी अंकुरतं आणि चांगलं वाढतं. पण हे नेमकं कसं घडलं हे त्याला कळत नाही. २८ हळूहळू, जमीन आपोआप पीक देते; आधी अंकुर, मग कणीस आणि शेवटी कणसात भरलेला दाणा. २९ मग, पीक तयार होताच तो विळा चालवतो कारण कापणीची वेळ आलेली असते.”

३० तो पुढे म्हणाला: “देवाच्या राज्याची तुलना आपल्याला कशाशी करता येईल? कोणत्या उदाहरणाने ते स्पष्ट करून सांगता येईल? ३१ ते मोहरीच्या दाण्यासारखं आहे. तो जमिनीत पेरताना पृथ्वीवरच्या सगळ्या बियांपेक्षा लहान असतो.+ ३२ पण, पेरल्यावर तो वाढतो आणि त्याचं रोप झाडासारखं होतं. त्याला मोठमोठ्या फांद्या फुटतात आणि आकाशातले पक्षी त्याच्या छायेत घरटी बांधून राहू लागतात.”

३३ तर, अशी बरीच उदाहरणं+ देऊन त्यांना समजू शकेल अशा प्रकारे तो त्यांना देवाचं वचन शिकवायचा. ३४ खरंतर तो कधीच उदाहरणांशिवाय त्यांच्याशी बोलत नव्हता. पण आपल्या शिष्यांना तो एकांतात सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगायचा.+

३५ त्या दिवशी संध्याकाळी तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “चला आपण पलीकडच्या किनाऱ्‍यावर जाऊ या.”+ ३६ तेव्हा, जमलेल्या लोकांना निरोप दिल्यानंतर ते त्याला तसंच नावेतून आपल्यासोबत घेऊन गेले आणि त्याच्या नावेसोबत इतरही नावा होत्या.+ ३७ मग खूप जोरदार वादळ आलं. तेव्हा लाटा नावेवर आदळू लागल्या आणि नाव बुडायच्या बेतात होती.+ ३८ पण, येशू नावेच्या मागच्या बाजूला उशीवर डोकं टेकून झोपला होता. म्हणून त्यांनी त्याला उठवलं आणि म्हटलं: “गुरू, आपण बुडतोय याचं तुला काहीच वाटत नाही?” ३९ तेव्हा तो उठला आणि त्याने वाऱ्‍याला दटावलं. मग तो समुद्राला म्हणाला: “श्‍श्‍श! शांत हो!”+ तेव्हा वारा थांबला आणि समुद्र अगदी शांत झाला. ४० मग तो त्यांना म्हणाला: “इतकं का घाबरता?* अजूनही तुम्हाला विश्‍वास नाही का?” ४१ पण ते खूपच घाबरले होते. ते एकमेकांना म्हणू लागले: “हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्रही याचं ऐकतात.”+

५ मग ते समुद्रापलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले.+ २ येशू नावेतून उतरताच, दुष्ट स्वर्गदूताच्या* प्रभावाखाली असलेला एक माणूस कबरस्तानातून निघून त्याच्याकडे आला. ३ तो कबरस्तानातच राहायचा आणि त्याला बांधून ठेवणं कोणालाही शक्य नव्हतं; अगदी साखळीनेसुद्धा कोणी त्याला बांधून ठेवू शकत नव्हतं. ४ कितीतरी वेळा त्याला बेड्यांनी आणि साखळ्यांनी बांधण्यात आलं होतं, पण तो साखळ्या तोडून टाकायचा आणि बेड्यांचे तुकडेतुकडे करायचा; आणि कोणाकडेही त्याला आवरायची ताकद नव्हती. ५ तो रात्रंदिवस कबरस्तानात आणि डोंगरांमध्ये ओरडत राहायचा आणि स्वतःला दगडांनी मारून जखमी करायचा. ६ पण, दुरून येशूला पाहताच तो धावत त्याच्याकडे गेला आणि त्याच्या पाया पडला.+ ७ मग तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हे येशू, सर्वोच्च देवाच्या मुला! तुझ्याशी माझं काय घेणंदेणं? मी तुला देवाची शपथ घालून सांगतो, मला छळू नकोस.”+ ८ कारण येशू त्याला असं म्हणत होता: “अरे दुष्ट स्वर्गदूता, या माणसातून बाहेर निघ.”+ ९ मग येशूने त्याला विचारलं: “तुझं नाव काय?” तेव्हा तो म्हणाला: “माझं नाव ‘सैन्य’ आहे, कारण आम्ही बरेच जण आहोत.” १० तेव्हा तो येशूला विनंती करू लागला, की आम्हाला या प्रदेशातून घालवू नको.+

११ त्याच वेळी, डुकरांचा+ एक मोठा कळप डोंगरावर चरत होता.+ १२ त्यामुळे त्या दुष्ट स्वर्गदूतांनी त्याला अशी विनवणी केली: “आम्हाला त्या डुकरांमध्ये पाठवून दे म्हणजे आम्ही त्यांच्यामध्ये शिरू.” १३ त्याने त्यांना परवानगी दिली तेव्हा ते दुष्ट स्वर्गदूत त्या माणसातून निघून डुकरांमध्ये शिरले. आणि जवळजवळ २,००० डुकरांचा तो कळप धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला आणि बुडून मेला. १४ पण, कळप चारणारे तिथून पळाले आणि शहरात आणि शेतांत जाऊन त्यांनी ही बातमी लोकांना सांगितली. तेव्हा काय घडलं हे पाहायला लोक तिथे आले.+ १५ ते येशूकडे आले तेव्हा दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेला तो माणूस, म्हणजे ज्याच्यामध्ये आधी ‘सैन्य’ होतं, तो त्यांना बसलेला दिसला. त्याने कपडे घातले होते आणि तो शुद्धीवर होता. त्याला पाहून ते घाबरले. १६ तसंच, दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेल्या माणसाची आणि डुकरांची ती घटना ज्यांनी पाहिली होती, त्यांनी त्याबद्दल त्यांना सांगितलं. १७ तेव्हा, ते येशूला त्यांचा प्रदेश सोडून जायची विनंती करू लागले.+

१८ मग येशू नावेत चढू लागला तेव्हा दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेला तो माणूस त्याच्यासोबत जायची विनंती करू लागला.+ १९ पण येशूने त्याला आपल्यासोबत येऊ दिलं नाही. तो त्याला म्हणाला: “घरी आपल्या नातेवाइकांकडे जा आणि यहोवाने* तुझ्यासाठी जे काही केलंय आणि तुला कशी दया दाखवली आहे, ते सगळं त्यांना सांग.” २० तेव्हा तो माणूस तिथून निघाला आणि येशूने त्याच्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल तो दकापलीसमध्ये* सांगू लागला. ते ऐकून सगळ्यांना खूप आश्‍चर्य वाटलं.

२१ त्यानंतर, येशू नावेतून पुन्हा पलीकडच्या किनाऱ्‍यावर गेला आणि तो समुद्राजवळ असतानाच लोकांचा मोठा समुदाय त्याच्याकडे आला.+ २२ त्या वेळी, याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी तिथे आला आणि येशूला पाहताच त्याच्या पाया पडला.+ २३ तो वारंवार येशूला अशी विनंती करू लागला: “माझी लहान मुलगी खूप आजारी आहे.* कृपा करून चला आणि तिच्यावर हात ठेवा,+ म्हणजे ती बरी होईल आणि जगेल.” २४ तेव्हा येशू त्याच्यासोबत गेला आणि लोकांचा समुदाय त्याच्या मागेमागे जाऊ लागला आणि त्याच्याभोवती गर्दी करू लागला.

२५ तिथे अशी एक स्त्री होती, जिला १२ वर्षांपासून रक्‍तस्रावाचा+ आजार होता.+ २६ बऱ्‍याच वैद्यांकडून उपचार घेताना तिचे खूप हाल झाले होते आणि तिच्याजवळ होते नव्हते ते सगळे पैसे तिने खर्च केले होते. तरीसुद्धा ती बरी झाली नव्हती. उलट, तिची स्थिती आणखीनच वाईट झाली होती. २७ तिने येशूबद्दल ऐकलं, तेव्हा तिने गर्दीतून त्याच्या मागून येऊन त्याच्या कपड्यांना हात लावला.+ २८ कारण ती म्हणत होती: “मी फक्‍त त्याच्या कपड्यांना हात लावला तरी बरी होईन.”+ २९ आणि त्याच क्षणी तिचा रक्‍तस्राव थांबला आणि त्या त्रासदायक आजारापासून मुक्‍त झाल्याचं तिला जाणवलं.

३० त्याच वेळी, आपल्यामधून शक्‍ती+ निघाल्याचं येशूला जाणवलं. तेव्हा, त्याने गर्दीत मागे वळून पाहिलं आणि विचारलं: “माझ्या कपड्यांना कोणी हात लावला?”+ ३१ पण, त्याचे शिष्य त्याला म्हणाले: “तुझ्या आजूबाजूला लोकांची किती गर्दी आहे, हे पाहतोस ना, मग ‘मला कोणी हात लावला’ असं कसं विचारतोस?” ३२ तरीसुद्धा, हे कोणी केलं असावं हे जाणून घेण्यासाठी तो इकडे-तिकडे पाहू लागला. ३३ तेव्हा, आपण बरं झालो आहोत हे ओळखून ती स्त्री घाबरत आणि थरथर कापत त्याच्याजवळ आली आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून तिने त्याला सगळं काही खरंखरं सांगितलं. ३४ तो तिला म्हणाला: “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरं केलंय. जा, काळजी करू नकोस,*+ तुझा त्रासदायक आजार बरा झालाय.”+

३५ तो बोलत होता इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्‍याच्या घरून काही माणसं आली आणि म्हणाली: “तुमची मुलगी वारली! आता गुरुजींना त्रास का देता?”+ ३६ पण त्यांचं बोलणं ऐकून येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्‍याला म्हणाला: “घाबरू नकोस, फक्‍त विश्‍वास ठेव.”+ ३७ मग, त्याने पेत्र, याकोब आणि याकोबचा भाऊ योहान यांच्याशिवाय दुसऱ्‍या कोणालाही आपल्यामागे येऊ दिलं नाही.+

३८ सभास्थानाच्या अधिकाऱ्‍याच्या घरी आल्यावर त्याने पाहिलं, की तिथे बराच गोंधळ माजला आहे आणि लोक मोठमोठ्याने रडत आहेत आणि आक्रोश करत आहेत.+ ३९ आत गेल्यावर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही रडून असा गोंधळ का माजवता? मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ ४० तेव्हा लोक त्याची थट्टा करत हसू लागले. पण त्याने त्या सगळ्यांना बाहेर पाठवलं. मग मुलीच्या आईवडिलांना आणि त्याच्यासोबत असलेल्यांना घेऊन तो आत मुलीजवळ गेला. ४१ मुलीचा हात धरून तो तिला म्हणाला: “तलिथा कूमी.” म्हणजेच, “मुली, मी तुला सांगतो, ‘ऊठ!’”+ ४२ आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली. (ती १२ वर्षांची होती.) हे पाहून त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. ४३ पण, येशूने त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितलं,* की त्यांनी याबद्दल कोणालाही सांगू नये.+ मग मुलीला काहीतरी खायला द्या असं तो म्हणाला.

६ तिथून निघाल्यावर तो आपल्या गावी आला+ आणि त्याचे शिष्यही त्याच्यामागे आले. २ मग शब्बाथाच्या दिवशी तो सभास्थानात जाऊन शिकवू लागला. तेव्हा ऐकणाऱ्‍या बऱ्‍याच जणांना खूप आश्‍चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हा माणूस या सगळ्या गोष्टी कुठून शिकला?+ ही बुद्धी आणि चमत्कार* करायची शक्‍ती याला कोणी दिली?+ ३ हाच तो सुतारकाम करणारा+ मरीयाचा मुलगा+ आहे ना? हा याकोब,+ योसेफ, यहूदा आणि शिमोन यांचाच भाऊ आहे ना?+ याच्या बहिणीही इथेच राहत नाहीत का?” म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. ४ पण येशू त्यांना म्हणाला: “संदेष्ट्याचा सगळीकडे आदर केला जातो, फक्‍त त्याच्या स्वतःच्या गावात, नातेवाइकांत आणि स्वतःच्या घरात केला जात नाही.”+ ५ म्हणून, त्याने तिथे फक्‍त काही आजारी लोकांवर हात ठेवून त्यांना बरं केलं. याशिवाय इतर कोणतेही चमत्कार* तो त्या ठिकाणी करू शकला नाही. ६ खरंतर, त्यांचा अविश्‍वास पाहून त्याला आश्‍चर्य वाटलं. मग तो आसपासच्या गावांत फिरून तिथे शिकवू लागला.+

७ त्यानंतर, त्याने त्या १२ जणांना बोलावलं. तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला+ आणि त्याने त्यांना दुष्ट स्वर्गदूत* काढायचा अधिकार दिला.+ ८ तसंच, त्याने त्यांना अशी आज्ञा दिली, की त्यांनी प्रवासात आपल्यासोबत एका काठीशिवाय दुसरं काहीही, म्हणजे भाकरी किंवा जेवणाची पिशवी किंवा बटव्यात* पैसे* घेऊ नयेत,+ ९ तर पायांत जोडे घालावेत आणि अंगात दोन वस्त्रं घालू नयेत. १० तसंच तो त्यांना म्हणाला: “कोणत्याही घरात जाल तेव्हा त्या शहरातून निघेपर्यंत तिथेच मुक्काम करा.+ ११ एखाद्या ठिकाणी लोकांनी तुमचं स्वागत केलं नाही किंवा तुमचं ऐकून घेतलं नाही, तर त्यांना साक्ष मिळावी म्हणून तिथून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.”+ १२ तेव्हा ते निघाले आणि लोकांनी पश्‍चात्ताप करावा+ अशी घोषणा करू लागले, १३ आणि त्यांनी बऱ्‍याच दुष्ट स्वर्गदूतांना काढलं+ आणि पुष्कळ आजारी लोकांना तेल लावून बरं केलं.

१४ ही गोष्ट हेरोद* राजाच्या कानावर आली, कारण येशूचं नाव खूप प्रसिद्ध झालं होतं आणि लोक म्हणू लागले: “बाप्तिस्मा देणारा योहान मेलेल्यांतून उठलाय, म्हणूनच तो ही अद्‌भुत कार्यं करतोय.”+ १५ पण काही जण म्हणत होते: “हा एलीया आहे.” तर इतर काही म्हणत होते: “तो जुन्या काळातल्या संदेष्ट्यांपैकी एक आहे.”+ १६ पण हेरोदने हे ऐकलं तेव्हा तो म्हणाला: “ज्या योहानचं मी डोकं कापलं होतं, तोच पुन्हा उठलाय.” १७ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्याशी लग्न केलं होतं. आणि तिच्यामुळेच त्याने स्वतः माणसं पाठवून योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+ १८ कारण योहान त्याला बऱ्‍याच वेळा म्हणाला होता: “तू आपल्या भावाच्या बायकोला आपली बायको केली हे कायद्याने योग्य नाही.”+ १९ त्यामुळे हेरोदिया मनातल्या मनात त्याचा द्वेष करत होती आणि त्याला मारून टाकायची संधी शोधत होती; पण तिला ते करता आलं नाही. २० कारण हेरोदच्या मनात योहानबद्दल आदर होता आणि तो त्याला वाचवायचा प्रयत्न करायचा. योहान एक नीतिमान आणि पवित्र माणूस आहे हे त्याला माहीत होतं.+ योहानने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर काय करावं हे त्याला समजायचं नाही, तरीसुद्धा तो आनंदाने त्याचं ऐकून घ्यायचा.

२१ पण, शेवटी एक दिवशी हेरोदियाला हवी असलेली संधी मिळाली. त्या दिवशी हेरोदचा वाढदिवस+ होता आणि त्याने आपल्या उच्च अधिकाऱ्‍यांना, सेनापतींना आणि गालीलमधल्या प्रतिष्ठित लोकांना मेजवानी दिली.+ २२ त्या वेळी हेरोदियाची मुलगी नाचली आणि तिने हेरोदला आणि मेजवानीला आलेल्या लोकांना खूश केलं. तेव्हा, राजा तिला म्हणाला: “तुला जे काही हवं असेल ते माग आणि मी तुला ते देईन.” २३ तो शपथ घेऊन म्हणाला: “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” २४ म्हणून ती बाहेर आपल्या आईकडे गेली आणि म्हणाली: “मी काय मागू?” तेव्हा ती म्हणाली: “बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचं डोकं.” २५ त्यामुळे तिने लगेच राजाकडे जाऊन आपली मागणी सांगितली. ती म्हणाली: “बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचं डोकं, मला आत्ताच्या आता एका थाळीत आणून दिलं जावं, अशी माझी इच्छा आहे.”+ २६ हे ऐकून राजाला फार वाईट वाटलं. तरीसुद्धा त्याने दिलेल्या शपथांमुळे आणि मेजवानीला आलेल्या लोकांमुळे* त्याला नाही म्हणता आलं नाही. २७ म्हणून त्याने लगेच एका अंगरक्षकाला पाठवलं आणि त्याला योहानचं डोकं घेऊन येण्याची आज्ञा दिली. तेव्हा त्याने तुरुंगात जाऊन योहानचं डोकं कापलं २८ आणि तो एका थाळीत ते घेऊन आला. त्याने ते मुलीला दिलं आणि मुलीने ते आपल्या आईला दिलं. २९ योहानच्या शिष्यांना हे कळलं तेव्हा त्यांनी येऊन त्याचा मृतदेह घेतला आणि तो एका कबरेत* ठेवला.

३० मग, प्रेषित येशूच्या भोवती जमले आणि त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि लोकांना शिकवल्या होत्या त्यांबद्दल त्याला सांगितलं.+ ३१ तिथे बऱ्‍याच लोकांची ये-जा सुरू असल्यामुळे त्यांना जेवायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता. म्हणून येशू त्यांना म्हणाला: “एखाद्या एकांत ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.”+ ३२ म्हणून ते नावेतून एका एकांत ठिकाणी जायला निघाले.+ ३३ पण लोकांनी त्यांना जाताना पाहिलं आणि बऱ्‍याच जणांना याबद्दल कळलं. तेव्हा, सगळ्या शहरांतून लोक धावत जाऊन त्यांच्याआधीच तिथे पोहोचले. ३४ नावेतून उतरताच लोकांचा मोठा समुदाय पाहून येशूला त्यांचा कळवळा आला,+ कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.+ मग तो त्यांना बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.+

३५ आता दिवस मावळायची वेळ झाली होती. त्यामुळे त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “इथे आसपास कोणीही राहत नाही आणि खूप उशीरही झालाय.+ ३६ म्हणून लोकांना पाठवून दे म्हणजे ते जवळपासच्या खेड्यापाड्यांत जाऊन खायला काहीतरी विकत घेऊ शकतील.”+ ३७ पण तो त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” तेव्हा ते म्हणाले: “आम्ही जाऊन २०० दिनारांच्या* भाकरी विकत आणून लोकांना खायला देऊ का?”+ ३८ तो त्यांना म्हणाला: “जा आणि तुमच्याजवळ किती भाकरी आहेत ते पाहा.” त्यांनी जाऊन पाहिलं आणि ते म्हणाले: “पाच भाकरी आणि दोन मासेही आहेत.”+ ३९ मग त्याने सगळ्या लोकांना लहानलहान गट करून गवतावर बसायला सांगितलं.+ ४० तेव्हा ते शंभर-शंभर आणि पन्‍नास-पन्‍नास लोकांचे गट करून बसले. ४१ त्यानंतर त्याने त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेतले आणि वर आकाशाकडे पाहून धन्यवाद दिला.+ मग त्याने भाकरी मोडून लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिल्या. तसंच, त्याने ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. ४२ मग सगळे पोटभर जेवले ४३ आणि भाकरींच्या उरलेल्या तुकड्यांनी १२ टोपल्या भरल्या, शिवाय मासेही उरले होते.+ ४४ त्या दिवशी जेवणाऱ्‍या पुरुषांची संख्या ५,००० होती.

४५ मग त्याने लगेच आपल्या शिष्यांना नावेत बसून पलीकडे बेथसैदा इथे आपल्यापुढे जायला सांगितलं. आणि तो स्वतः लोकांना निरोप देऊ लागला.+ ४६ पण लोकांना पाठवून दिल्यानंतर तो प्रार्थना करायला एका डोंगरावर गेला.+ ४७ संध्याकाळ झाली तेव्हा नाव समुद्राच्या मधोमध होती, पण तो अजूनही एकटाच डोंगरावर होता.+ ४८ रात्री सुमारे चौथ्या प्रहरी,* वारा विरुद्ध दिशेचा असल्यामुळे शिष्यांना नाव चालवणं खूप अवघड जात आहे असं त्याला दिसलं. तेव्हा तो समुद्रावर चालत त्यांच्याकडे येऊ लागला. पण असं वाटत होतं की तो त्यांच्या पुढे जाणार आहे. ४९ त्याला समुद्रावर चालताना पाहून ते मनात म्हणाले, “आपल्याला काहीतरी भास होतोय!” आणि ते मोठ्‌याने ओरडू लागले. ५० कारण त्याला पाहून ते सगळे घाबरले होते. पण लगेच तो त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला: “तुम्ही का घाबरता? भिऊ नका, मी आहे.”+ ५१ मग तो नावेत त्यांच्याकडे गेला तेव्हा वारा शांत झाला. हे पाहून त्यांना फार आश्‍चर्य वाटलं. ५२ कारण भाकरींच्या चमत्काराचा अर्थ त्यांना कळला नव्हता आणि त्यांचं मन अजूनही अंधारात होतं.

५३ नंतर ते पलीकडे गनेसरेतच्या किनाऱ्‍यावर आले आणि त्यांनी नाव बांधून ठेवली.+ ५४ पण ते नावेतून उतरताच लोकांनी येशूला ओळखलं. ५५ तेव्हा आसपासच्या संपूर्ण भागात लोकांची धावपळ सुरू झाली. जिथे जिथे येशू आला आहे असं त्यांनी ऐकलं, तिथे तिथे ते आजारी लोकांना खाटांवर घेऊन त्याच्याकडे आणू लागले. ५६ तो शहरांत किंवा खेड्यापाड्यांत जिथे कुठे जायचा तिथे ते आजारी लोकांना भर बाजारात आणून ठेवायचे; आणि ‘फक्‍त तुमच्या कपड्यांच्या काठाला हात लावू द्या,’+ अशी ते त्याला विनंती करायचे. तेव्हा, ज्यांनी ज्यांनी त्याच्या कपड्यांना हात लावला ते सगळे बरे झाले.

७ मग, परूशी आणि यरुशलेमहून आलेले काही शास्त्री येशूच्या भोवती जमले.+ २ त्यांनी पाहिलं, की त्याचे काही शिष्य अशुद्ध हातांनी, म्हणजे हात न धुता* जेवत होते. ३ (कारण परूशी आणि सगळे यहुदी, वाडवडिलांच्या परंपरांचं काटेकोरपणे पालन करतात. ते कोपरांपर्यंत हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत ४ आणि बाजारातून आल्यावर स्वतःला पाण्याने शुद्ध केल्याशिवाय ते जेवत नाहीत. त्यांना प्याले, घागरी आणि तांब्याची भांडी विधिपूर्वक धुणं,* यांसारख्या इतर बऱ्‍याच परंपराही देण्यात आल्या आहेत आणि ते त्यांचं काटेकोरपणे पालन करतात.)+ ५ त्यामुळे परूश्‍यांनी आणि शास्त्र्यांनी त्याला विचारलं: “तुमचे शिष्य, वाडवडिलांच्या परंपरांचं पालन का करत नाहीत आणि अशुद्ध हातांनी का जेवतात?”+ ६ तो त्यांना म्हणाला: “तुम्हा ढोंग्यांबद्दल यशयाने भविष्यवाणीत जे म्हटलं होतं ते अगदी खरंय. त्याने लिहिलं, ‘हे लोक ओठांनी तर माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे.+ ७ ते माझी उपासना करत असले, तरी ती व्यर्थ आहे कारण ते माणसांच्या आज्ञा, देवाचे सिद्धान्त म्हणून शिकवतात.’+ ८ तुम्ही देवाची आज्ञा पाळायचं सोडून माणसांच्या परंपरांना धरून बसता.”+

९ तो त्यांना असंही म्हणाला: “तुमच्या परंपरांचं पालन करण्यासाठी तुम्ही देवाची आज्ञा चलाखीने टाळता.+ १० उदाहरणार्थ, मोशेने म्हटलं, ‘आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,’+ आणि ‘जो आपल्या वडिलांशी किंवा आईशी अपमानास्पद बोलतो* त्याला ठार मारलं जावं.’+ ११ पण तुम्ही म्हणता, ‘जर एखादा आपल्या वडिलांना किंवा आईला म्हणतो, की “तुम्हाला उपयोगी पडेल असं जे काही माझ्याकडे आहे ते कुर्बान आहे (म्हणजे देवाला अर्पण केलेलं आहे),” तर यात काहीच गैर नाही.’ १२ असं म्हणून तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही.+ १३ आणि अशा रितीने तुम्ही वर्षानुवर्षं चालू ठेवलेल्या तुमच्या परंपरांमुळे देवाचं वचन तुच्छ लेखता.+ शिवाय, अशा आणखी कितीतरी गोष्टी तुम्ही करता.”+ १४ मग, लोकांना पुन्हा आपल्याजवळ बोलावून तो त्यांना म्हणाला: “तुम्ही सगळे माझं ऐका आणि याचा अर्थ समजून घ्या.+ १५ अशी कोणतीही बाहेरची गोष्ट नाही, जी माणसाच्या आत जाऊन त्याला अशुद्ध करते. तर, ज्या गोष्टी माणसाच्या आतून निघतात त्याच त्याला अशुद्ध करतात.”+ १६*​——

१७ मग तो लोकांच्या गर्दीतून निघून काही अंतरावर असलेल्या एका घरात गेला. तेव्हा त्याने दिलेल्या या उदाहरणाबद्दल शिष्य त्याला प्रश्‍न विचारू लागले.+ १८ त्यामुळे तो त्यांना म्हणाला: “त्यांच्याप्रमाणेच तुम्हालाही समजलं नाही का? बाहेरून माणसाच्या आत जाणारी कोणतीही गोष्ट त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्हाला माहीत नाही का? १९ कारण ती त्याच्या हृदयात नाही, तर त्याच्या पोटात जाऊन शरीराबाहेर टाकली जाते.” असं म्हणून त्याने खाण्याच्या सगळ्या गोष्टी शुद्ध ठरवल्या. २० मग तो म्हणाला: “ज्या गोष्टी माणसाच्या आतून निघतात त्याच गोष्टी त्याला अशुद्ध करतात.+ २१ कारण आतून म्हणजे माणसाच्या हृदयातून+ दुष्ट विचार निघतात. त्यामुळे अनैतिक लैंगिक कृत्यं,* चोऱ्‍या, खून, २२ व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, फसवणूक, निर्लज्ज वर्तन,* ईर्ष्या,* निंदा, गर्व आणि मूर्खपणा या गोष्टी घडतात. २३ या सगळ्या वाईट गोष्टी माणसाच्या आतून निघतात आणि त्याला अशुद्ध करतात.”

२४ नंतर तो तिथून उठला आणि सोर आणि सीदोनच्या प्रदेशात गेला.+ तिथे तो एका घरात गेला. पण आपण तिथे आहोत हे कोणालाही कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी, लोकांना ते कळलंच. २५ इतक्यात एक स्त्री, जिची लहान मुलगी दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलेली होती, तिने येशूबद्दल ऐकलं आणि ती त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडली.+ २६ ती स्त्री ग्रीक होती आणि सीरिया प्रांतातल्या फेनिके इथे राहणारी होती. ती आपल्या मुलीतून दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकण्याची त्याला पुन्हापुन्हा विनंती करत होती. २७ पण तो तिला म्हणाला: “आधी मुलांचं पोट भरलं पाहिजे, कारण मुलांसाठी असलेली भाकर घेऊन कुत्र्याच्या पिल्लांपुढे टाकणं योग्य नाही.”+ २८ पण ती त्याला म्हणाली: “खरंय प्रभू, पण मेजाखाली असलेली कुत्र्याची पिल्लंसुद्धा, मुलांच्या हातातून पडणारे तुकडे खातातच ना.” २९ तेव्हा तो तिला म्हणाला: “तू हे बोललीस, म्हणून जा, तुझ्या मुलीतून दुष्ट स्वर्गदूत निघून गेलाय.”+ ३० मग ती आपल्या घरी गेली तेव्हा तिने पाहिलं, की तिची मुलगी अंथरुणावर पडलेली आहे आणि तिच्यातून दुष्ट स्वर्गदूत निघून गेला आहे.+

३१ सोरच्या प्रदेशातून परत आल्यावर, येशू सीदोन आणि दकापलीसच्या* मार्गाने गालील समुद्राकडे आला.+ ३२ इथे लोकांनी एका बहिऱ्‍या माणसाला त्याच्याकडे आणलं. त्याला स्पष्टपणे बोलताही येत नव्हतं.+ येशूने त्या माणसावर हात ठेवावा अशी त्यांनी त्याला विनंती केली. ३३ तेव्हा, त्याने त्याला एका बाजूला, गर्दीपासून दूर नेलं. त्याने त्या माणसाच्या कानांत बोटं घातली आणि तो थुंकला. मग त्याने त्याच्या जिभेला स्पर्श केला.+ ३४ त्यानंतर आकाशाकडे पाहून त्याने मोठा उसासा टाकला आणि तो त्याला म्हणाला: “एप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.” ३५ तेव्हा, त्याचे कान उघडले+ आणि त्याच्या बोलण्यातला दोष जाऊन तो स्पष्टपणे बोलू लागला. ३६ येशूने लोकांना बजावून सांगितलं, की त्यांनी याबद्दल कोणालाही सांगू नये.+ पण त्याने त्यांना जितकं बजावून सांगितलं, तितकाच जास्त ते त्याबद्दल गाजावाजा करू लागले.+ ३७ ते खूप आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले:+ “तो किती अद्‌भुत गोष्टी करतो! बहिऱ्‍यांना आणि मुक्यांनाही बरं करतो.”+

८ त्या दिवसांत, पुन्हा लोकांचा एक मोठा समुदाय जमला होता आणि त्यांच्याजवळ खायला काहीच नव्हतं. म्हणून येशू आपल्या शिष्यांना बोलावून म्हणाला: २ “मला या लोकांची दया येते+ कारण ते तीन दिवसांपासून माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नाही.+ ३ मी जर त्यांना असंच उपाशी घरी पाठवून दिलं, तर वाटेत त्यांचे भुकेने हाल होतील. काही जण तर फार दुरून आले आहेत.” ४ पण त्याचे शिष्य त्याला म्हणाले: “लोक पोटभर जेवू शकतील इतक्या भाकरी या एकांत ठिकाणी कुठून आणाव्यात?” ५ तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले: “सात.”+ ६ मग लोकांना खाली बसायला सांगून येशूने त्या सात भाकरी घेतल्या आणि देवाला धन्यवाद देऊन त्या मोडल्या. त्याने त्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकांना वाढल्या.+ ७ त्यांच्याजवळ काही लहान मासेही होते. तेव्हा धन्यवाद देऊन त्याने शिष्यांना तेही वाढायला सांगितले. ८ मग लोक पोटभर जेवले आणि जेव्हा त्यांनी उरलेलं अन्‍न गोळा केलं, तेव्हा सात मोठ्या टोपल्या भरल्या.+ ९ त्या वेळी, जेवणाऱ्‍या पुरुषांची संख्या जवळजवळ ४,००० होती. मग येशूने त्यांना निरोप दिला.

१० त्यानंतर लगेच तो आपल्या शिष्यांसोबत नावेत बसून दल्मनुथाच्या प्रदेशात आला.+ ११ तिथे परूशी त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहण्यासाठी, ‘आम्हाला स्वर्गातून एखादं चिन्ह दाखव,’ असं ते म्हणू लागले.+ १२ तेव्हा त्याला मनापासून वाईट वाटलं आणि तो म्हणाला: “ही पिढी चिन्ह का मागत राहते?+ मी तुम्हाला खरं सांगतो, या पिढीला एकही चिन्ह दिलं जाणार नाही.”+ १३ मग तो त्यांना सोडून पुन्हा नावेत बसला आणि पलीकडच्या किनाऱ्‍यावर गेला.

१४ पण शिष्य आपल्यासोबत भाकरी घ्यायला विसरले. नावेत त्यांच्याजवळ खायला एका भाकरीशिवाय काहीच नव्हतं.+ १५ येशूने अगदी स्पष्ट शब्दांत त्यांना ताकीद दिली: “जागे राहा. परूशी लोकांच्या आणि हेरोदच्या खमिरापासून* सांभाळा.”+ १६ तेव्हा, भाकरी का घेतल्या नाहीत यावरून ते आपसात वाद घालू लागले. १७ हे ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तुम्ही वाद का घालता? अजूनही तुमच्या लक्षात येत नाही का? अजूनही तुमची मनं अंधारात आहेत का? १८ ‘डोळे असूनही तुम्हाला दिसत नाही का आणि कान असूनही तुम्हाला ऐकू येत नाही का?’ तुम्हाला आठवत नाही का, १९ मी पाच भाकरी+ मोडून ५,००० माणसांना जेवू घातलं, तेव्हा उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या तुम्ही भरल्या होत्या?” ते त्याला म्हणाले: “बारा.”+ २० “आणि मी सात भाकरी मोडून ४,००० माणसांना जेवू घातलं, तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या* भरल्या होत्या?” ते त्याला म्हणाले: “सात.”+ २१ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “मग अजूनही तुम्हाला समजत नाही का?”

२२ त्यानंतर ते बेथसैदा इथे आले. तिथे लोकांनी एका आंधळ्या माणसाला येशूकडे आणलं. त्याने त्याला स्पर्श करावा अशी ते विनंती करू लागले.+ २३ तेव्हा, त्याने त्या आंधळ्या माणसाचा हात धरून त्याला गावाबाहेर नेलं. मग त्याच्या डोळ्यांवर थुंकून+ त्याने त्याच्यावर हात ठेवले आणि तो त्याला म्हणाला: “तुला काही दिसतं का?” २४ तेव्हा तो माणूस समोर पाहून म्हणाला: “मला लोक दिसत आहेत, पण असं वाटतं की झाडं इथेतिथे चालत आहेत.” २५ मग येशूने पुन्हा त्या माणसाच्या डोळ्यांवर हात ठेवले, तेव्हा त्याची दृष्टी परत आली. त्याला सगळं काही अगदी स्पष्ट दिसू लागलं. २६ येशूने त्याला, “या गावात जाऊ नकोस,” असं सांगून घरी पाठवलं.

२७ नंतर येशू आणि त्याचे शिष्य कैसरीया फिलिप्पैच्या गावांमध्ये जायला निघाले. वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारलं: “मी कोण आहे असं लोक म्हणतात?”+ २८ ते त्याला म्हणाले: “बाप्तिस्मा देणारा योहान.+ पण काही जण तुला एलीया+ म्हणतात आणि इतर जण तू संदेष्ट्यांपैकी एक आहेस असं म्हणतात.” २९ मग त्याने त्यांना विचारलं: “पण, तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “तू ख्रिस्त आहेस.”+ ३० पण याबद्दल कोणालाही सांगू नका, असं त्याने त्यांना बजावून सांगितलं.+ ३१ तसंच, मनुष्याच्या मुलाला बरीच दुःखं सोसावी लागतील आणि वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री त्याला नाकारतील आणि ठार मारतील+ आणि तीन दिवसांनंतर तो उठेल, असं तो शिष्यांना सांगू* लागला.+ ३२ खरंतर, तो त्यांना ही गोष्ट अगदी उघडउघड सांगत होता. पण पेत्र त्याला बाजूला घेऊन गेला आणि त्याला रागवू लागला.+ ३३ तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिलं आणि पेत्रला दटावून म्हटलं: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा!* तुझे विचार देवाचे नाहीत, तर माणसांचे आहेत.”+

३४ मग आपल्या शिष्यांसोबत लोकांनाही जवळ बोलावून तो म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+ ३५ कारण जो आपला जीव* वाचवायचा प्रयत्न करतो तो त्याला गमावेल, पण जो माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी आपला जीव* गमावतो तो त्याला वाचवेल.+ ३६ खरोखर, माणसाने संपूर्ण जग मिळवलं, पण आपला जीव* गमावला तर त्याचा काय उपयोग?+ ३७ किंवा माणूस आपल्या जिवाच्या* मोबदल्यात काय देऊ शकेल?+ ३८ कारण या व्यभिचारी* आणि पापी पिढीत जर कोणाला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटत असेल, तर मनुष्याचा मुलगा आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र स्वर्गदूतांसोबत येईल,+ तेव्हा त्यालाही त्या माणसाची लाज वाटेल.”+

९ मग येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, इथे उभे असलेल्यांपैकी काही जण असे आहेत, की जे देवाच्या राज्याला शासन करत असलेलं जोपर्यंत पाहणार नाहीत, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”+ २ नंतर, सहा दिवसांनी येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत एका उंच डोंगरावर नेलं. तिथे त्यांच्याशिवाय आणखी कोणीही नव्हतं. मग त्यांच्यासमोर त्याचं रूपांतर झालं.+ ३ त्याचे कपडे चमकू लागले आणि कोणत्याही धोब्याला करता येणार नाहीत, इतके ते शुभ्र झाले. ४ तसंच, त्यांना तिथे मोशे आणि एलीया येशूसोबत बोलताना दिसले. ५ मग पेत्र येशूला म्हणाला: “रब्बी,* बरं झालं आम्ही आलो. आम्हाला तीन तंबू टाकू दे; एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी.” ६ खरंतर, ते फार घाबरले होते. त्यामुळे, काय बोलावं हे पेत्रला सुचत नव्हतं. ७ तेवढ्यात, एक ढग खाली उतरला आणि त्याने त्यांना झाकून टाकलं. त्या ढगातून असा आवाज ऐकू आला:+ “हा माझा प्रिय मुलगा आहे,+ याचं ऐका.”+ ८ मग अचानक त्यांनी आजूबाजूला पाहिलं, तेव्हा तिथे येशूशिवाय त्यांच्यासोबत आणखी कोणीही नव्हतं.

९ नंतर, डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना बजावून सांगितलं, की मनुष्याच्या मुलाला मेलेल्यांतून उठवलं जात नाही, तोपर्यंत त्यांनी जे पाहिलं त्याबद्दल कोणालाही सांगू नये.+ १० त्यांनी येशूचं बोलणं मनावर घेतलं,* पण त्याच्या मेलेल्यांतून उठण्याचा काय अर्थ असेल याबद्दल ते आपसात चर्चा करू लागले. ११ त्यांनी त्याला विचारलं: “शास्त्री असं का म्हणतात की आधी एलीया+ आला पाहिजे?”+ १२ येशू त्यांना म्हणाला: “एलीया खरोखरच आधी येईल आणि तो सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या व्यवस्थित करेल.+ पण मनुष्याच्या मुलाबद्दल असं का लिहिलंय, की त्याला बरीच दुःखं सहन करावी लागतील+ आणि त्याला तुच्छ लेखलं जाईल?+ १३ मी तर तुम्हाला सांगतो, की एलीया+ आधीच आलाय आणि त्याच्याबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे, त्यांनी त्याच्यासोबत वाटेल तसं केलं.”+

१४ मग ते इतर शिष्यांजवळ आले तेव्हा त्यांनी पाहिलं, की त्यांच्याभोवती लोकांचा मोठा समुदाय जमला आहे आणि शास्त्री त्यांच्यासोबत वाद घालत आहेत.+ १५ पण येशूला पाहताच सगळे लोक आश्‍चर्यचकित झाले आणि त्याला भेटायला धावत गेले. १६ तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “तुम्ही त्यांच्याशी कशाबद्दल वाद घालताय?” १७ यावर गर्दीतल्या एकाने उत्तर दिलं: “गुरू, माझ्या मुलामध्ये एक मुका दुष्ट स्वर्गदूत* आहे, म्हणून मी त्याला तुमच्याकडे आणलं.+ १८ तो जेव्हा जेव्हा माझ्या मुलाला धरतो तेव्हा तेव्हा त्याला जमिनीवर आपटतो. मग माझ्या मुलाच्या तोंडातून फेस निघू लागतो, तो दात खाऊ लागतो आणि अगदी गळून जातो. त्या दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकायची मी तुमच्या शिष्यांना विनंती केली, पण त्यांना ते करता आलं नाही.” १९ तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? त्याला इथे माझ्याजवळ आणा.”+ २० त्यांनी मुलाला त्याच्याजवळ आणलं, पण त्याला पाहताच तो दुष्ट स्वर्गदूत मुलाच्या शरीराला पिळवटू लागला. तेव्हा मुलगा जमिनीवर पडला आणि लोळू लागला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. २१ मग येशूने त्याच्या वडिलांना विचारलं: “याला असं केव्हापासून होतंय?” तो म्हणाला: “लहानपणापासून. २२ आणि बऱ्‍याच वेळा हा दुष्ट स्वर्गदूत त्याला आगीत आणि पाण्यात टाकून त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला काही करता आलं, तर कृपा करून आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.” २३ येशू त्याला म्हणाला: “‘काही करता आलं तर,’ असं का म्हणतोस? ज्याला विश्‍वास आहे त्याला सगळं काही शक्य आहे.”+ २४ तेव्हा लगेच मुलाचे वडील मोठ्याने म्हणाले: “मला विश्‍वास आहे! तो आणखी दृढ करायला मला मदत करा!”+

२५ येशूने लोकांना त्यांच्याकडे धावत येताना पाहिलं, तेव्हा तो त्या दुष्ट स्वर्गदूताला दटावून म्हणाला: “अरे मुक्या आणि बहिऱ्‍या दुष्ट स्वर्गदूता! मी तुला आज्ञा देतो, की त्याच्यातून बाहेर निघ आणि पुन्हा कधीच त्याच्यात जाऊ नकोस!”+ २६ मग तो दुष्ट स्वर्गदूत मोठ्याने ओरडून आणि मुलाच्या शरीराला बऱ्‍याच वेळा पिळवटून त्याच्यातून बाहेर निघाला. तेव्हा मुलगा मेलेल्या माणसासारखा जमिनीवर पडून राहिला. त्यामुळे बरेच लोक म्हणू लागले: “मेला तो!” २७ पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठवलं तेव्हा तो उठून उभा राहिला. २८ नंतर तो एका घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांतात विचारलं: “आम्ही त्याला का काढू शकलो नाही?”+ २९ तो त्यांना म्हणाला: “अशा प्रकारचे दुष्ट स्वर्गदूत फक्‍त प्रार्थनेनेच निघू शकतात.”

३० मग ते तिथून निघून गालीलमधून जात होते, पण कोणालाही याबद्दल कळू नये अशी त्याची इच्छा होती. ३१ कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता आणि असं सांगत होता, की “मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला लोकांच्या हवाली केलं जाईल आणि ते त्याला ठार मारतील.+ पण, त्याला मारल्यानंतर तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”+ ३२ त्यांना त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, पण याबद्दल त्याला विचारायचं त्यांना धैर्यही झालं नाही.

३३ मग ते कफर्णहूम इथे आले आणि घरात गेल्यानंतर त्याने त्यांना विचारलं: “रस्त्यात तुम्ही कशाबद्दल वाद घालत होता?”+ ३४ पण ते शांतच राहिले, कारण आपल्यापैकी श्रेष्ठ कोण आहे याबद्दल ते वाद घालत होते. ३५ तेव्हा खाली बसून त्याने १२ शिष्यांना जवळ बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “ज्याला तुमच्यामध्ये पहिला व्हायचं असेल, त्याने सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यांचा सेवक झालं पाहिजे.”+ ३६ मग त्याने एका लहान मुलाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला त्यांच्यामध्ये उभं केलं. त्याच्या खांद्यांवर हात ठेवून तो त्यांना म्हणाला: ३७ “जो अशा एखाद्या लहान मुलाला+ माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो, तो फक्‍त मलाच नाही, तर ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.”+

३८ योहान त्याला म्हणाला: “प्रभू, आम्ही एकाला तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूत काढताना पाहिलं आणि आम्ही त्याला अडवायचा प्रयत्न केला कारण तो तुझ्यामागे चालत नाही.”+ ३९ पण येशू म्हणाला: “त्याला अडवायचा प्रयत्न करू नका, कारण असा कोणीही नाही जो माझ्या नावाने अद्‌भुत कार्य करेल आणि नंतर लगेच माझी निंदा करेल. ४० कारण जो आपल्या विरोधात नाही तो आपल्या सोबत आहे.+ ४१ मी तुम्हाला खरं सांगतो, की तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात हे ओळखून जो तुम्हाला पेलाभर पाणी प्यायला देईल,+ त्याला त्याचं प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.+ ४२ पण माझ्यावर विश्‍वास असलेल्या अशा लहानांपैकी एकालाही जो अडखळायला लावतो, त्याच्या गळ्यात जात्याचा मोठा दगड* बांधून त्याला समुद्रात टाकून दिलं, तर तेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.+

४३ जर तुझा हात तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून टाक. दोन हातांसोबत गेहेन्‍नात,* म्हणजे विझवता न येणाऱ्‍या आगीत टाकलं जाण्यापेक्षा, अधू होऊन जीवनात* जाणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+ ४४*​—— ४५ आणि जर तुझा पाय तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून टाक. दोन पायांसोबत गेहेन्‍नात टाकलं जाण्यापेक्षा, लंगडं होऊन जीवनात* जाणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+ ४६*​—— ४७ तसंच, जर तुझा डोळा तुला अडखळायला लावत असेल तर तो काढून फेकून दे.+ कारण एकच डोळा असून देवाच्या राज्यात* जाणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे, नाहीतर दोन डोळे असून तुला गेहेन्‍नाच्या* आगीत टाकलं जाईल.+ ४८ तिथे किडे कधी मरत नाहीत आणि आग कधी विझत नाही.+

४९ जेवणात वरून मीठ टाकतात, तसा प्रत्येक माणसावर अग्नीचा वर्षाव केला जाईल.+ ५० मीठ तर चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तुम्ही त्याची चव कशाने परत आणाल?+ स्वतःमध्ये मिठाची चव कायम ठेवा+ आणि एकमेकांसोबत शांतीने राहा.”+

१० तिथून निघाल्यावर येशू यार्देन नदीपलीकडे असलेल्या यहूदीयाच्या सीमेजवळच्या प्रदेशात आला. तिथेसुद्धा लोकांचे मोठे समुदाय त्याच्याकडे आले. मग त्याच्या नेहमीच्या रितीप्रमाणे तो त्यांना पुन्हा शिकवू लागला.+ २ तेव्हा परूशी त्याच्याजवळ आले आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी त्याला विचारलं, की एखाद्या माणसाने आपल्या बायकोला घटस्फोट देणं नियमाप्रमाणे योग्य आहे का?+ ३ त्याने त्यांना विचारलं: “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?” ४ ते म्हणाले: “सोडचिठ्ठी देऊन बायकोला घटस्फोट द्यायची मोशेने परवानगी दिली आहे.”+ ५ पण येशू त्यांना म्हणाला: “मोशेने तुमच्या कठोर वृत्तीमुळे+ तुमच्यासाठी ही आज्ञा लिहिली होती.+ ६ पण देवाने सृष्टीच्या सुरुवातीपासूनच, ‘त्यांना पुरुष आणि स्त्री असं निर्माण केलं.+ ७ म्हणून माणूस आपल्या आईवडिलांना सोडेल,+ ८ आणि तो आणि त्याची पत्नी एकदेह होतील.+ तेव्हा, यापुढे ते दोन नाहीत तर एकदेह असे आहेत.’ ९ म्हणूनच, देवाने जे जोडलंय, ते कोणत्याही माणसाने तोडू नये.”*+ १० मग घरात गेल्यावर शिष्य त्याला याबद्दल प्रश्‍न विचारू लागले. ११ तो त्यांना म्हणाला: “जो आपल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करतो, तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो.+ १२ आणि जर एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्‍याला घटस्फोट देऊन दुसऱ्‍याशी लग्न केलं, तर तीही व्यभिचार करते.”+

१३ मग येशूने आपल्या लहान मुलांवर हात ठेवावा, म्हणून लोक त्यांना त्याच्याजवळ आणू लागले. पण शिष्य त्यांना रागावले.+ १४ हे पाहून येशू चिडला आणि त्यांना म्हणाला: “मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. कारण देवाचं राज्य अशांचंच आहे.+ १५ मी तुम्हाला खरं सांगतो, जो एखाद्या लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करत नाही, तो त्यात कधीच जाऊ शकणार नाही.”+ १६ मग त्याने त्या लहान मुलांना आपल्याजवळ घेतलं आणि त्यांच्यावर हात ठेवून तो त्यांना आशीर्वाद देऊ लागला.+

१७ तो तिथून जात होता, तेव्हा एक माणूस धावत आला आणि त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याने त्याला असा प्रश्‍न विचारला: “हे उत्तम गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?”+ १८ येशू त्याला म्हणाला: “मला उत्तम का म्हणतोस? कारण देवाशिवाय कोणीही उत्तम नाही.+ १९ तुला तर आज्ञा माहीतच आहेत: ‘खून करू नका,+ व्यभिचार करू नका,+ चोरी करू नका,+ खोटी साक्ष देऊ नका,+ फसवणूक करू नका,+ आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा.’”+ २० तेव्हा तो माणूस येशूला म्हणाला: “गुरू, या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासूनच करत आलोय.” २१ येशूने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाला, “तुझ्यात फक्‍त एका गोष्टीची कमी आहे. म्हणून जा आणि जे काही तुझ्या मालकीचं आहे ते विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि ये, माझा शिष्य हो.”+ २२ पण हे उत्तर ऐकून तो उदास झाला आणि दुःखी होऊन तिथून निघून गेला कारण त्याच्याजवळ बरीच मालमत्ता होती.+

२३ मग सभोवती पाहून येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “खरंच, ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना देवाच्या राज्यात जाणं किती कठीण जाईल!”+ २४ पण शिष्यांना त्याचे हे शब्द ऐकून आश्‍चर्य वाटलं. तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मुलांनो, देवाच्या राज्यात जाणं खरंच कठीण आहे! २५ श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात जाण्यापेक्षा एका उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.”+ २६ तेव्हा त्यांना आणखीनच आश्‍चर्य वाटलं आणि ते त्याला* म्हणाले: “मग, कोणाचं तारण होणं शक्य आहे?”+ २७ येशू सरळ त्यांच्याकडे पाहून म्हणाला: “माणसांना हे अशक्य आहे, पण देवाला नाही. देवाला सगळं काही शक्य आहे.”+ २८ पेत्र त्याला म्हणाला: “बघ! आम्ही सगळं काही सोडून तुझ्यामागे आलो आहोत.”+ २९ यावर येशू म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, ज्यांनी माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी घरदार, शेतीवाडी, तसंच बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं सोडून दिली आहेत,+ त्यांच्यापैकी प्रत्येकाला ३० सध्याच्या काळात छळासोबत+ शंभरपटीने घरंदारं, शेतीवाडी, बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेत* सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. ३१ पण जे पहिले आहेत असे बरेच जण शेवटचे असतील आणि जे शेवटचे ते पहिले असतील.”+

३२ मग, वर यरुशलेमकडे जाताना येशू त्यांच्यापुढे चालत होता. हे पाहून त्याचे शिष्य आश्‍चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागून येणारे लोक घाबरले. तेव्हा पुन्हा एकदा त्याने आपल्या १२ शिष्यांना बाजूला नेलं आणि लवकरच ज्या गोष्टी त्याच्यासोबत घडणार होत्या, त्यांबद्दल तो त्यांना सांगू लागला:+ ३३ “पाहा! आपण वर यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या मुलाला मुख्य याजकांच्या आणि शास्त्र्यांच्या हवाली केलं जाईल. ते त्याला मृत्युदंड सुनावतील आणि विदेश्‍यांच्या हाती सोपवतील. ३४ ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील आणि त्याला फटके मारतील. मग ते त्याला ठार मारतील, पण तिसऱ्‍या दिवशी तो पुन्हा उठेल.”+

३५ जब्दीची मुलं याकोब आणि योहान+ त्याच्याजवळ येऊन म्हणाली: “हे गुरू, आम्ही जे काही मागू त्याप्रमाणे तू आमच्यासाठी करावं अशी आमची इच्छा आहे.”+ ३६ तो त्यांना म्हणाला: “मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?” ३७ ते म्हणाले: “तुझ्या राज्यात* आमच्यापैकी एकाला तुझ्या उजवीकडे आणि दुसऱ्‍याला तुझ्या डावीकडे बसू दे.”+ ३८ पण येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही काय मागत आहात याची तुम्हाला कल्पना नाही. जो प्याला मी पीत आहे तो तुम्हाला पिता येईल का? आणि जो बाप्तिस्मा मी घेतोय तो तुम्हाला घेता येईल का?”+ ३९ ते म्हणाले, “हो घेता येईल.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा प्याला तर प्याल आणि जो बाप्तिस्मा मी घेतोय तोही घ्याल,+ ४० पण माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसायचा अधिकार देणं माझ्या हातात नाही. ज्यांच्यासाठी तो राखून ठेवलाय त्यांनाच तो मिळेल.”

४१ ही गोष्ट बाकीच्या दहा जणांनी ऐकली तेव्हा त्यांना याकोब आणि योहान यांचा खूप राग आला.+ ४२ पण येशू त्यांना आपल्याजवळ बोलावून म्हणाला: “विदेश्‍यांमध्ये ज्यांना राजे म्हणतात ते त्यांच्यावर सत्ता चालवतात आणि महत्त्वाच्या पदांवर असलेले त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हाला माहीत आहे.+ ४३ पण तुमच्यामध्ये असं व्हायला नको. उलट, ज्याला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे,+ ४४ आणि ज्याला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने सर्वांचा दास झालं पाहिजे. ४५ कारण, मनुष्याचा मुलगाही सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला+ आणि बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”+

४६ मग ते यरीहोला आले. नंतर तो, त्याचे शिष्य आणि लोकांचा एक मोठा समुदाय यरीहोमधून बाहेर जात होता, तेव्हा बार्तीमय (तीमयचा मुलगा), हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.+ ४७ नासरेथकर येशू तिथून जात आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला: “हे येशू, दावीदच्या मुला,+ माझ्यावर दया कर!”+ ४८ बरेच जण त्याला दटावून गप्प राहायला सांगू लागले. पण तो आणखीनच मोठ्याने ओरडू लागला: “हे दावीदच्या मुला, माझ्यावर दया कर!” ४९ तेव्हा येशू थांबला आणि म्हणाला: “त्याला बोलवा.” म्हणून त्यांनी आंधळ्या माणसाला बोलावून म्हटलं: “भिऊ नकोस! ऊठ, तो तुला बोलवतोय.” ५० तेव्हा आपल्या अंगावरचं वस्त्र टाकून तो लगेच उठला आणि येशूजवळ गेला. ५१ मग येशू त्याला म्हणाला: “मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा माणूस त्याला म्हणाला: “हे गुरू,* माझी दृष्टी परत येऊ दे.” ५२ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “जा. तुझ्या विश्‍वासाने तुला बरं केलंय.”+ आणि लगेचच त्याची दृष्टी परत आली+ आणि तो येशूच्या मागे चालू लागला.

११ यरुशलेमजवळ आल्यावर ते जैतुनांच्या डोंगरावर असलेल्या बेथफगे आणि बेथानी+ इथे पोहोचले. तेव्हा येशूने दोन शिष्यांना पुढे पाठवलं+ २ आणि त्यांना सांगितलं: “समोरच्या गावात जा आणि तिथे जाताच तुम्हाला गाढवाचं एक पिल्लू बांधलेलं दिसेल. त्याच्यावर आतापर्यंत कोणीही बसलेलं नाही. त्याला सोडवून इकडे आणा. ३ जर कोणी तुम्हाला म्हटलं, की ‘त्याला का सोडता?’ तर म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवेल.’” ४ तेव्हा ते गेले आणि त्यांना रस्त्याच्या कडेला एका दाराजवळ गाढवाचं पिल्लू बांधलेलं दिसलं. त्यांनी त्याला सोडलं.+ ५ पण तिथे उभे असलेले काही लोक त्यांना म्हणाले: “तुम्ही गाढवाच्या पिल्लाला का सोडताय?” ६ त्यांनी येशूने सांगितल्याप्रमाणेच उत्तर दिलं, तेव्हा त्या लोकांनी त्यांना जाऊ दिलं.

७ मग त्यांनी गाढवाच्या पिल्लाला+ येशूजवळ आणलं. त्यांनी त्याच्यावर आपली बाहेरची वस्त्रं टाकली आणि येशू त्याच्यावर बसला.+ ८ बऱ्‍याच जणांनी रस्त्यावरही आपली बाहेरची वस्त्रं पसरली. तर, इतरांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावर पसरल्या.+ ९ तेव्हा पुढे जाणारे आणि मागून येणारे लोक अशी घोषणा करत होते: “आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!+ यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो!+ १० आमचा पिता दावीद याचं येणारं राज्य आशीर्वादित असो!+ स्वर्गात राहणाऱ्‍या देवा, आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!” ११ मग तो यरुशलेम शहरात आला आणि मंदिरात गेला. तिथे त्याने आसपासच्या सगळ्या गोष्टींवर नजर टाकली. पण आधीच उशीर झालेला असल्यामुळे तो आपल्या १२ शिष्यांसोबत बेथानीला निघून गेला.+

१२ दुसऱ्‍या दिवशी ते बेथानीहून निघाले तेव्हा त्याला भूक लागली.+ १३ त्याला दुरून अंजिराचं एक हिरवंगार झाड दिसलं. तेव्हा फळ मिळेल या आशेने तो झाडाजवळ गेला. पण जवळ गेल्यावर त्याला पानांशिवाय काहीच दिसलं नाही कारण तो अंजिरांचा मोसम नव्हता. १४ म्हणून तो त्या झाडाला म्हणाला: “यापुढे कोणीही तुझं फळ खाणार नाही.”+ शिष्य हे ऐकत होते.

१५ मग ते यरुशलेमला आले. तिथे येशू मंदिरात गेला आणि जे लोक मंदिराच्या आत खरेदी-विक्री करत होते त्या सगळ्यांना त्याने तिथून हाकलून लावलं. त्याने पैसे बदलून देणाऱ्‍यांची मेजं आणि कबुतरं विकणाऱ्‍यांची बाकं उलटून टाकली.+ १६ आणि त्याने कोणालाही मंदिरातून भांड्यांची ने-आण करू दिली नाही. १७ मग तो त्यांना शिकवू लागला आणि म्हणाला: “‘माझ्या मंदिराला सगळ्या राष्ट्रांसाठी प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलेलं नाही का?+ पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”+ १८ मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी हे ऐकलं, तेव्हा त्याला कसं ठार मारता येईल, यावर ते विचार करू लागले.+ त्यांना त्याची भीती वाटत होती, कारण सगळे लोक त्याच्या शिकवणीमुळे थक्क व्हायचे.+

१९ संध्याकाळ झाल्यावर ते शहरातून बाहेर गेले. २० पण दुसऱ्‍या दिवशी पहाटे तिथून जाताना, अंजिराचं ते झाड मुळापासून वाळून गेलं आहे, असं त्यांना दिसलं.+ २१ आदल्या दिवसाची गोष्ट आठवून पेत्र त्याला म्हणाला: “रब्बी,* पाहा! तू ज्याला शाप दिला होतास ते अंजिराचं झाड वाळून गेलंय.”+ २२ तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिलं: “देवावर विश्‍वास ठेवा. २३ मी तुम्हाला खरं सांगतो, की जर कोणी या डोंगराला म्हणाला, की ‘इथून उपटून समुद्रात जाऊन पड,’ आणि जर त्याने मनात कोणतीही शंका न धरता, आपल्या बोलण्याप्रमाणे नक्की होईल असा विश्‍वास बाळगला, तर त्याच्यासाठी ते खरोखरच घडेल.+ २४ म्हणून, मी तुम्हाला सांगतो की प्रार्थनेत तुम्ही ज्या गोष्टी मागता, त्या तुम्हाला मिळाल्याच आहेत असा विश्‍वास धरा, म्हणजे तुम्हाला त्या मिळतील.+ २५ आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काहीही असलं, तर त्याला क्षमा करा, म्हणजे स्वर्गातला तुमचा पितासुद्धा तुमच्या चुकांची तुम्हाला क्षमा करेल.”+ २६ *​——

२७ मग ते पुन्हा यरुशलेमला आले. तिथे तो मंदिरात फिरत होता, तेव्हा मुख्य याजक, शास्त्री आणि वडीलजन त्याच्याजवळ आले २८ आणि म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? या सगळ्या गोष्टी करायचा अधिकार कोणी दिला तुला?”+ २९ येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. मला त्याचं उत्तर द्या, मग मीही तुम्हाला सांगीन की कोणत्या अधिकाराने मी या गोष्टी करतो. ३० योहानने दिलेला बाप्तिस्मा+ देवापासून* होता की माणसांपासून? उत्तर द्या.”+ ३१ तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपण ‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, की ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’ ३२ आणि ‘माणसांपासून’ असं म्हणण्याचं धाडस तरी कसं करावं?” खरंतर, त्यांना लोकांची भीती होती. कारण योहान खरोखरच संदेष्टा होता, असं सगळे लोक मानायचे.+ ३३ म्हणून ते येशूला म्हणाले: “आम्हाला नाही माहीत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मीही तुम्हाला सांगणार नाही.”

१२ मग तो उदाहरणं देऊन त्यांच्याशी बोलू लागला आणि म्हणाला, “एका माणसाने द्राक्षमळा+ लावला आणि त्याच्याभोवती कुंपण घातलं आणि त्यात द्राक्षं तुडवण्यासाठी द्राक्षकुंड खणलं आणि पहाऱ्‍यासाठी एक मचाण बांधलं.*+ मग माळ्यांना आपल्या द्राक्षमळ्याचा ठेका देऊन तो परदेशी गेला.+ २ फळांचा हंगाम आला तेव्हा त्याने द्राक्षमळ्याच्या फळांपैकी काही फळं मागण्यासाठी एका दासाला माळ्यांकडे पाठवलं. ३ पण त्यांनी त्याला धरून बेदम मारलं आणि रिकाम्या हाती परत पाठवलं. ४ मग त्याने आणखी एका दासाला त्यांच्याकडे पाठवलं, पण त्यांनी त्याला डोक्यावर मारलं आणि त्याचा अपमान केला.+ ५ त्यानंतर त्याने पुन्हा एकाला पाठवलं, पण त्यांनी त्याला मारून टाकलं. पुढे त्याने इतर बऱ्‍याच जणांना पाठवलं, पण त्यांपैकी काहींना त्यांनी मारहाण केली, तर काहींना ठार मारलं. ६ आता त्याच्याजवळ एकच जण उरला होता, त्याचा लाडका मुलगा.+ म्हणून शेवटी त्याने असा विचार करून त्याला त्यांच्याकडे पाठवलं, की ‘निदान ते माझ्या मुलाचा तरी मान राखतील.’ ७ पण ते माळी आपसात म्हणू लागले, ‘हा तर वारस आहे.+ चला आपण त्याला मारून टाकू म्हणजे त्याच्या वारशाची जमीन आपली होईल.’ ८ म्हणून, त्यांनी त्याला धरून मारून टाकलं आणि त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिलं.+ ९ आता द्राक्षमळ्याचा मालक काय करेल? तो येऊन माळ्यांना ठार मारेल आणि द्राक्षमळ्याचा ताबा दुसऱ्‍यांना देईल.+ १० तुम्ही कधी शास्त्रात हे वाचलं नाही का, की ‘बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनलाय;+ ११ हे यहोवाने* घडवून आणलंय आणि आमच्या दृष्टीत ते अद्‌भुत आहे’?”+

१२ येशूने आपल्यालाच मनात ठेवून हे उदाहरण दिलं, हे त्याच्या विरोधकांच्या लक्षात आल्यामुळे त्याला धरण्याची* त्यांची इच्छा होती, पण ते लोकांना घाबरत होते. म्हणून ते त्याला सोडून तिथून निघून गेले.+

१३ मग त्याला बोलण्यात पकडण्यासाठी त्यांनी काही परूश्‍यांना आणि हेरोदच्या पक्षाच्या सदस्यांना त्याच्याकडे पाठवलं.+ १४ ते येशूकडे येऊन त्याला म्हणाले: “हे गुरू, तुम्ही नेहमी खरं तेच बोलता हे आम्हाला माहीत आहे, आणि तुम्ही कोणाची मर्जी मिळवायचा प्रयत्न करत नाही, कारण तुम्ही कोणाचं तोंड पाहून बोलत नाही, तर देवाचा मार्ग अगदी खरेपणाने शिकवता. म्हणून आम्हाला सांगा, कैसराला* कर देणं नियमाप्रमाणे योग्य आहे की नाही? १५ आम्ही तो द्यावा की नाही?” त्यांचा ढोंगीपणा ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? मला दिनाराचं* नाणं दाखवा.” १६ तेव्हा त्यांनी त्याला दिनाराचं नाणं आणून दिलं. तो त्यांना म्हणाला: “हे चित्र आणि यावर लिहिलेलं नाव कोणाचं आहे?” ते म्हणाले: “कैसराचं.” १७ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग जे कैसराचं आहे ते कैसराला द्या,+ पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.”+ हे ऐकून ते थक्क झाले.

१८ नंतर, पुनरुत्थान* होत नाही असं म्हणणारे सदूकी* लोक+ त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारलं:+ १९ “गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असं लिहून ठेवलंय, की एखाद्याच्या भावाचा मृत्यू झाला, आणि त्याची बायको मागे राहिली, पण त्यांना मूलबाळ नसलं, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करून आपल्या भावाचा वंश चालवावा.+ २० तर एका कुटुंबात सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं, पण तो मेला तेव्हा त्याला मूलबाळ नव्हतं. २१ मग दुसऱ्‍याने तिच्याशी लग्न केलं पण तोसुद्धा मूलबाळ नसतानाच मेला आणि तिसऱ्‍याच्या बाबतीतही असंच झालं. २२ सातही भाऊ मूलबाळ न होताच मेले. शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला. २३ मग, पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात भावांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.” २४ येशू त्यांना म्हणाला: “तुम्हाला शास्त्रवचनांचं ज्ञान नाही आणि देवाचं सामर्थ्यही माहीत नाही. म्हणूनच तुमचा गैरसमज झालाय.+ २५ कारण मेलेल्यांतून उठल्यावर, पुरुष लग्न करत नाहीत आणि स्त्रियांचंही लग्न करून दिलं जात नाही. तर ते स्वर्गदूतांसारखे असतात.+ २६ पण, मेलेल्यांना पुन्हा उठवण्याबद्दल, मोशेच्या पुस्तकातल्या झुडपाच्या अहवालात तुम्ही वाचलं नाही का? तिथे देव मोशेला म्हणाला: ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे.’+ २७ तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय.”+

२८ तिथे आलेला एक शास्त्री त्यांचा वाद ऐकत होता. येशूने त्यांना किती चांगलं उत्तर दिलं, हे पाहून त्याने त्याला विचारलं: “सगळ्यात पहिली* आज्ञा कोणती?”+ २९ येशूने उत्तर दिलं: “पहिली आज्ञा ही आहे: ‘इस्राएली लोकांनो ऐका, यहोवा* आपला देव हा एकच यहोवा* आहे, ३० आणि तुम्ही आपला देव यहोवा* याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने,* पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‍तीने प्रेम करा.’+ ३१ दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’+ या दोन आज्ञांपेक्षा महत्त्वाची दुसरी कोणतीच आज्ञा नाही.” ३२ तो शास्त्री त्याला म्हणाला: “गुरुजी तुम्ही बोललात ते योग्य आणि खरं आहे. ‘तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही,’+ ३३ आणि त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‍तीने प्रेम करणं आणि आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम करणं, हे सगळ्या होमार्पणांपेक्षा आणि बलिदानांपेक्षा जास्त मोलाचं आहे.”+ ३४ त्या शास्त्र्याने सुज्ञपणे दिलेलं उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला: “तू देवाच्या राज्यापासून जास्त दूर नाहीस.” त्यानंतर त्याला आणखी काही विचारायचं कोणाचं धाडस झालं नाही.+

३५ नंतर, मंदिरात शिकवताना येशू म्हणाला: “ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे असं शास्त्री कसं काय म्हणतात?+ ३६ पवित्र शक्‍तीच्या* प्रेरणेने+ दावीद स्वतःच असं म्हणाला होता, ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणतो: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली तुडवेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस.”’+ ३७ जर दावीद त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा मुलगा कसा काय असू शकतो?”+

लोकांचा मोठा समुदाय आनंदाने त्याचं ऐकत होता. ३८ मग शिकवत असताना तो पुढे म्हणाला: “शास्त्र्यांपासून सांभाळून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवायला, बाजारांत लोकांकडून नमस्कार घ्यायला+ ३९ आणि सभास्थानांत पुढच्या* आसनांवर आणि मेजवान्यांत सगळ्यात महत्त्वाच्या जागांवर बसायला आवडतं.+ ४० ते विधवांची मालमत्ता* हडपतात आणि लोकांना दाखवण्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना जास्त कठोर शिक्षा मिळेल.”

४१ मग तो मंदिरातल्या दानपात्रांजवळ+ बसला होता, तेव्हा तो लोकांना त्यांत पैसे टाकताना पाहू लागला. बरेच श्रीमंत लोक दानपात्रांत पुष्कळ नाणी टाकत होते.+ ४२ मग एक गरीब विधवा आली आणि तिने फार कमी किमतीची दोन छोटीशी नाणी* दानपात्रात टाकली.+ ४३ तेव्हा तो आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो की दानपात्रांत पैसे टाकणाऱ्‍या सगळ्यांपेक्षा या गरीब विधवेने जास्त पैसे टाकले.+ ४४ कारण त्या सगळ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या जास्तीच्या पैशांतून टाकलं. पण ती इतकी गरीब असूनही तिने पोट भरण्यासाठी तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं टाकलं.”+

१३ तो मंदिरातून बाहेर जात असताना त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला: “गुरू, पाहा! किती सुंदर दगड आणि इमारती!”+ २ येशू त्याला म्हणाला: “या मोठमोठ्या इमारती पाहतोस ना? पण, या ठिकाणी एकाही दगडावर दगड राहणार नाही, प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”+

३ तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसलेला असताना पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया एकांतात त्याच्याजवळ येऊन म्हणाले: ४ “आम्हाला सांग, या गोष्टी केव्हा होतील आणि या सगळ्या गोष्टींच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?”+ ५ तेव्हा येशू त्यांना सांगू लागला: “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.+ ६ माझ्या नावाने बरेच जण येतील आणि ‘मीच तो आहे,’ असं म्हणून पुष्कळ जणांना फसवतील. ७ शिवाय, जेव्हा तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. या गोष्टी घडणं आवश्‍यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.+

८ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल,+ आणि ठिकठिकाणी भूकंप होतील; तसंच, दुष्काळही पडतील.+ या सगळ्या गोष्टी संकटांची* फक्‍त सुरुवात असेल.+

९ पण तुम्ही सांभाळून राहा. लोक तुम्हाला न्यायालयांच्या हवाली करतील+ आणि सभास्थानांत तुम्हाला फटके मारले जातील.+ राज्यपालांना आणि राजांना साक्ष मिळावी, म्हणून माझ्या नावामुळे तुम्हाला त्यांच्यासमोर उभं केलं जाईल.+ १० तसंच, सगळ्या राष्ट्रांत आधी राज्याबद्दलच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा होणं गरजेचं आहे.+ ११ जेव्हा ते तुम्हाला न्यायालयाच्या स्वाधीन करण्यासाठी नेतील, तेव्हा काय बोलावं याबद्दल आधीपासूनच चिंता करू नका. तर, त्या वेळी तुम्हाला जे सुचवलं जाईल तेच बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र शक्‍ती* आहे.+ १२ शिवाय, भाऊ भावाला आणि बाप आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी धरून देईल, आणि मुलं आईवडिलांविरुद्ध उठतील आणि त्यांना ठार मारण्यासाठी धरून देतील.+ १३ आणि माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील.+ पण जो शेवटपर्यंत धीर धरेल,*+ त्यालाच वाचवलं जाईल.*+

१४ पण उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट+ जिथे असायला नको तिथे उभी असलेली तुम्ही पाहाल (वाचणाऱ्‍याने हे समजून घ्यावं), तेव्हा जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करावी.+ १५ घराच्या छतावर असलेल्या माणसाने खाली येऊ नये किंवा आपल्या घरातून काही वस्तू घ्यायला घरात जाऊ नये. १६ आणि शेतात असलेल्या माणसाने मागे राहिलेल्या वस्तू, जसं की आपलं बाहेरचं वस्त्र घ्यायला परत जाऊ नये. १७ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्‍या स्त्रियांची फार दुर्दशा होईल!+ १८ हे हिवाळ्यात घडू नये म्हणून प्रार्थना करत राहा. १९ कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या सुरुवातीपासून त्या दिवसापर्यंत आलं नव्हतं, आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट+ त्या दिवसांत येईल.+ २० खरं पाहता, जर यहोवाने* ते दिवस कमी केले नसते, तर कोणीच माणूस वाचू शकला नसता. पण देवाने ज्यांना निवडलं आहे, त्या निवडलेल्या लोकांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.+

२१ त्या वेळी जर कोणी तुम्हाला म्हटलं, की ‘पाहा! ख्रिस्त इथे आहे,’ किंवा ‘पाहा! तो तिथे आहे,’ तर त्यावर विश्‍वास ठेवू नका.+ २२ कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उठतील+ आणि लोकांना, इतकंच काय तर निवडलेल्या लोकांनाही फसवण्यासाठी चिन्हं आणि चमत्कार करतील. २३ पण तुम्ही जागे राहा.+ मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आधीच सांगितल्या आहेत.

२४ पण त्या दिवसांत, त्या संकटानंतर सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही.+ २५ आणि तारे आकाशातून पडू लागतील आणि आकाशातल्या शक्‍तींना हादरे बसतील. २६ आणि मग, ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगांवर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+ २७ मग तो स्वर्गदूतांना पाठवेल आणि चारही दिशांतून,* पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना गोळा करेल.+

२८ आता अंजिराच्या झाडाच्या या उदाहरणावरून एक गोष्ट समजून घ्या: अंजिराच्या झाडाच्या कोवळ्या फांदीला जेव्हा पालवी फुटते, तेव्हा उन्हाळा जवळ आलाय हे तुम्ही ओळखता.+ २९ त्याच प्रकारे तुम्हीही या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तो दाराशीच आहे हे ओळखा.+ ३० मी तुम्हाला खरं सांगतो, या सगळ्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही.+ ३१ आकाश आणि पृथ्वीही नाहीशी होईल,+ पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.+

३२ त्या दिवसाबद्दल किंवा त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही; स्वर्गदूतांना नाही आणि मुलालाही नाही, तर फक्‍त पित्याला माहीत आहे.+ ३३ म्हणून सावध राहा, जागे राहा,+ कारण ठरवलेली वेळ केव्हा येईल हे तुम्हाला माहीत नाही.+ ३४ हे परदेशी जाणाऱ्‍या एका माणसासारखं आहे. त्याने घर सोडून जाण्याआधी आपल्या दासांना अधिकार सोपवून दिला.+ त्याने प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम नेमून दिलं आणि पहारेकऱ्‍याला जागं राहायची आज्ञा दिली.+ ३५ म्हणून जागे राहा, कारण घराचा मालक नेमका केव्हा परत येईल—संध्याकाळी, मध्यरात्री, पहाट होण्याआधी* की सकाळी, हे तुम्हाला माहीत नाही.+ ३६ नाहीतर तो अचानक परत येईल, तेव्हा तुम्ही झोपेत असल्याचं त्याला दिसेल.+ ३७ जे मी तुम्हाला सांगतो तेच सगळ्यांना सांगतो: जागे राहा.”+

१४ वल्हांडण+ आणि बेखमीर भाकरींच्या सणाला+ आता दोन दिवस उरले होते.+ मुख्य याजक आणि शास्त्री येशूला धूर्तपणे* अटक करून* ठार कसं मारता येईल यावर विचार करत होते.+ २ पण ते म्हणाले: “सणाच्या वेळी नको, नाहीतर कदाचित लोक गोंधळ माजवतील.”

३ मग, येशू बेथानी इथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवत होता, तेव्हा एक स्त्री शुद्ध जटामांसीच्या* सुगंधी तेलाची बाटली घेऊन त्याच्याजवळ आली. ते तेल खूप मौल्यवान होतं. तिने बाटली* उघडली* आणि ती त्याच्या डोक्यावर तेल ओतू लागली.+ ४ हे पाहून काही लोक संतापले आणि एकमेकांना म्हणाले: “ही बाई सुगंधी तेल वाया का घालवत आहे? ५ हेच तेल विकलं असतं तर ३०० दिनारांपेक्षा* जास्त पैसे मिळाले असते आणि ते गरिबांना देता आले असते!” ते तिच्यावर खूप चिडले.* ६ पण येशू त्यांना म्हणाला: “तिला रागावू नका. तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलंय.+ ७ कारण गरीब तर नेहमीच तुमच्यासोबत असतील+ आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. पण मी नेहमी तुमच्यासोबत असणार नाही.+ ८ तिला जे करता आलं ते तिने केलं. तिने माझ्या दफनविधीच्या तयारीसाठी आधीच माझ्या शरीराला सुगंधी तेल लावलंय.+ ९ मी तुम्हाला खरं सांगतो, जगात जिथे जिथे आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाईल,+ तिथे तिथे या स्त्रीची आठवण करून, तिने जे काही केलं तेही सांगितलं जाईल.”+

१० मग १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत नावाचा एक जण येशूला विश्‍वासघाताने पकडून द्यायला मुख्य याजकांकडे गेला.+ ११ हे ऐकून याजकांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्याला चांदीची नाणी+ द्यायचं कबूल केलं. त्यामुळे तो त्याला पकडून द्यायची संधी शोधू लागला.

१२ बेखमीर भाकरींच्या सणाच्या+ पहिल्या दिवशी वल्हांडणाचा पशू अर्पण करायची प्रथा होती.+ त्या दिवशी शिष्य येशूजवळ येऊन म्हणाले: “आम्ही तुझ्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी कुठे करू?”+ १३ तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं: “शहरात जा आणि तिथे तुम्हाला पाण्याचं मडकं घेतलेला एक माणूस भेटेल. त्याच्यामागे जा+ १४ आणि ज्या घरात तो जाईल तिथे जाऊन घरमालकाला असं म्हणा, ‘गुरू विचारतात: “मी आपल्या शिष्यांसोबत वल्हांडणाचं भोजन करू शकेन, अशी खोली कुठे आहे?”’ १५ मग तो सामानसुमान लावून तयार केलेली माडीवरची एक मोठी खोली तुम्हाला दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” १६ तेव्हा शिष्य गेले आणि शहरात गेल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणेच सगळं घडलं. मग त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.

१७ संध्याकाळ झाल्यावर येशू १२ शिष्यांसोबत आला.+ १८ मग ते मेजाभोवती बसून जेवत असताना तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्यासोबत जेवायला बसलेला तुमच्यापैकीच एक जण मला पकडून देईल.”+ १९ हे ऐकून त्यांना फार दुःख झालं आणि एकापाठोपाठ एक प्रत्येक जण त्याला विचारू लागला: “तो मी तर नाही ना?” २० तो त्यांना म्हणाला: “तुम्हा १२ जणांपैकी जो माझ्याबरोबर ताटात हात घालतोय, तोच तो आहे.+ २१ कारण मनुष्याच्या मुलाबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे तो तर जाणारच आहे; पण जो मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला पकडून देईल त्या माणसाची किती दुर्दशा होईल!+ तो जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं!”+

२२ नंतर, ते जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि धन्यवाद देऊन ती मोडली. मग त्याने असं म्हणून ती त्यांना दिली: “ही भाकर घ्या. ही माझ्या शरीराला सूचित करते.”+ २३ मग एक प्याला घेऊन त्याने देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला आणि ते सगळे त्यातून प्यायले.+ २४ तो त्यांना म्हणाला: “द्राक्षारसाचा हा प्याला माझ्या ‘कराराच्या+ रक्‍ताला’+ सूचित करतो. ते पुष्कळ लोकांच्या पापांच्या क्षमेसाठी ओतलं जाणार आहे.+ २५ मी तुम्हाला खरं सांगतो, की जोपर्यंत मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पीत नाही, तोपर्यंत मी पुन्हा कधीही द्राक्षारस पिणार नाही.” २६ शेवटी, स्तुतिगीतं* गायल्यानंतर ते तिथून निघून जैतुनांच्या डोंगरावर गेले.+

२७ मग येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही सगळे मला सोडून जाल,* कारण असं लिहिलंय: ‘मी मेंढपाळाला मारीन+ आणि कळपातल्या मेंढरांची पांगापांग होईल.’+ २८ पण मला उठवण्यात आल्यावर मी तुमच्यापुढे गालीलमध्ये जाईन.”+ २९ तेव्हा पेत्र त्याला म्हणाला: “बाकीचे सगळे तुला सोडून गेले, तरी मी तुला कधीच सोडून जाणार नाही!”*+ ३० यावर येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो की आज, हो, आज रात्रीच, कोंबडा दोन वेळा आरवण्याआधी तू तीनदा मला नाकारशील.”+ ३१ पण तरी तो पुन्हापुन्हा असंच म्हणत राहिला: “मला तुझ्यासोबत मरावं लागलं तरी मी तुला मुळीच नाकारणार नाही.” बाकीचे सगळे शिष्यही तसंच म्हणू लागले.+

३२ मग ते गेथशेमाने या ठिकाणी आले आणि येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “मी प्रार्थना करेपर्यंत इथेच बसा.”+ ३३ आणि त्याने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत घेतलं.+ मग तो खूप बेचैन* झाला आणि त्याचं मन दुःखाने व्याकूळ झालं. ३४ तो त्यांना म्हणाला: “मी* फार दुःखी आहे,+ माझ्या मनाला मरणासारख्या यातना होत आहेत. तुम्ही इथेच थांबा आणि जागे राहा.”+ ३५ तो तिथून जरासा पुढे गेला आणि जमिनीवर पडून अशी प्रार्थना करू लागला, की शक्य असलं, तर ही वेळ माझ्यापासून टळून जावी. ३६ मग तो म्हणाला: “अब्बा, * बापा,+ तुला सगळं काही शक्य आहे. म्हणून हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+ ३७ तो परत आला तेव्हा शिष्यांना झोपलेलं पाहून तो पेत्रला म्हणाला: “शिमोन, तू झोपत आहेस? तुला थोडा वेळसुद्धा जागं राहायला जमलं नाही का?+ ३८ तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+ ३९ मग तो पुन्हा गेला आणि त्याने तशीच प्रार्थना केली.+ ४० नंतर त्याने पुन्हा येऊन त्यांना झोपलेलं पाहिलं, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. त्यामुळे काय उत्तर द्यावं हे त्यांना कळत नव्हतं. ४१ मग तो तिसऱ्‍यांदा शिष्यांकडे परत येऊन त्यांना म्हणाला: “अशा वेळी तुम्ही झोपत आहात आणि विश्रांती घेत आहात! आता पुरे झालं! वेळ आली आहे!+ पाहा! मनुष्याच्या मुलाला विश्‍वासघाताने पापी लोकांच्या हाती पकडून दिलं जातंय. ४२ उठा, आपण जाऊ या. पाहा! माझा विश्‍वासघात करणारा जवळ आलाय!”+

४३ तो अजून बोलतच होता, इतक्यात यहूदा, जो १२ शिष्यांपैकी एक होता, तो आला आणि त्याच्यासोबत तलवारी आणि काठ्या घेतलेल्या लोकांचा जमाव होता. त्यांना मुख्य याजकांनी, शास्त्र्यांनी आणि वडीलजनांनी पाठवलं होतं.+ ४४ त्याचा विश्‍वासघात करणाऱ्‍याने त्यांना अशी खूण द्यायचं कबूल केलं होतं, की “मी ज्याचं चुंबन घेईन, तोच येशू आहे. त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” ४५ मग थेट येशूजवळ जाऊन तो म्हणाला: “रब्बी!”* आणि त्याने प्रेमाने त्याचं चुंबन घेतलं. ४६ तेव्हा त्यांनी येशूला पकडून अटक केली. ४७ पण, येशूसोबत असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या दासावर हल्ला करून त्याचा कान कापून टाकला.+ ४८ येशू त्यांना म्हणाला: “मी काय चोर आहे, की तुम्ही मला तलवारी आणि काठ्या घेऊन पकडायला आलात?+ ४९ दररोज मी तुमच्यासोबत मंदिरात शिकवत होतो,+ तेव्हा तुम्ही मला पकडलं नाही. पण शास्त्रात जे लिहिलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून+ या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.”

५० तेव्हा सगळे शिष्य त्याला सोडून पळून गेले.+ ५१ पण एक तरुण, अंगावर फक्‍त एक उत्तम प्रतीचं मलमलीचं वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालत होता आणि त्यांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला. ५२ पण तो आपलं मलमलीचं वस्त्र टाकून उघडाच* पळून गेला.

५३ मग त्यांनी येशूला महायाजकाकडे नेलं.+ तिथे सगळे मुख्य याजक, वडीलजन आणि शास्त्री जमले होते.+ ५४ पण, पेत्र बरंच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे चालत महायाजकाच्या अंगणापर्यंत गेला. तिथे तो घराच्या नोकरचाकरांसोबत शेकोटीजवळ बसला.+ ५५ आता मुख्य याजक आणि संपूर्ण न्यायसभा,* येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होती. पण त्यांना तो सापडत नव्हता.+ ५६ खरंतर, बरेच जण त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देत होते.+ पण त्यांच्या साक्षीत मेळ बसत नव्हता. ५७ तसंच, काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध अशी खोटी साक्ष देत होते: ५८ “आम्ही याला असं म्हणताना ऐकलं, की ‘हातांनी बांधलेलं हे मंदिर मी पाडीन आणि तीन दिवसांत असं एक मंदिर उभं करीन, जे हातांनी बांधलेलं नाही.’”+ ५९ पण या बाबतीतही त्यांच्या साक्षीत मेळ बसत नव्हता.

६० मग महायाजक त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्याने येशूला विचारलं: “तू काहीच कसं बोलत नाहीस? ही माणसं तुझ्याविरुद्ध काय आरोप लावत आहेत हे तू ऐकलं नाहीस का?”+ ६१ पण तरीही येशू शांतच राहिला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही.+ मग पुन्हा महायाजकाने त्याला विचारलं: “तू पवित्र देवाचा मुलगा, ख्रिस्त आहेस का?” ६२ येशू त्याला म्हणाला: “हो, मी आहे. आणि तुम्ही मनुष्याच्या मुलाला+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला+ आणि आकाशातल्या ढगांवर स्वार होऊन येताना पाहाल.”+ ६३ तेव्हा महायाजक आपला अंगरखा फाडून म्हणाला: “आता आणखी साक्षीदारांची काय गरज?+ ६४ त्याने देवाची केलेली निंदा तुम्ही स्वतः ऐकली आहे. तुमचा निर्णय* काय आहे?” त्या सगळ्यांनी त्याला मृत्युदंडासाठी पात्र ठरवलं.+ ६५ तेव्हा काही जण त्याच्या तोंडावर थुंकू लागले+ आणि त्याचा चेहरा झाकून त्याला बुक्क्या मारू लागले. ते त्याला म्हणाले: “भविष्यवाणी कर!” मग, त्याच्या थोबाडीत मारून शिपाई त्याला तिथून घेऊन गेले.+

६६ मग, पेत्र खाली अंगणात बसलेला असताना महायाजकाची एक दासी तिथे आली.+ ६७ पेत्रला शेकोटीजवळ बसलेला पाहून ती सरळ त्याच्याकडे बघून म्हणाली: “तूपण त्या नासरेथच्या येशूसोबत होतास!” ६८ पण तो ते नाकारून म्हणाला: “मी त्याला ओळखत नाही आणि तू काय बोलत आहेस, मला काहीच कळत नाही.” मग तो बाहेरच्या फाटकाजवळ गेला. ६९ तिथे ती दासी त्याला पाहून जवळ उभे असलेल्यांना पुन्हा म्हणू लागली: “हा त्यांच्याचपैकी एक आहे.” ७० पण त्याने पुन्हा ते नाकारलं. मग थोड्या वेळाने तिथे उभे असलेले लोक पुन्हा पेत्रला म्हणाले: “नक्कीच तूपण त्यांच्यातलाच एक आहेस, कारण तू गालीलचा आहेस.” ७१ तेव्हा, आपण खोटं बोलत असलो, तर आपल्याला शाप लागावा असं म्हणून तो शपथ घेऊन म्हणाला: “तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!” ७२ आणि तेवढ्यात कोंबडा दुसऱ्‍यांदा आरवला.+ तेव्हा पेत्रला येशूचे हे शब्द आठवले: “कोंबडा दोन वेळा आरवण्याआधी तू मला तीनदा नाकारशील.”+ तेव्हा, भावना अनावर होऊन तो ढसाढसा रडू लागला.

१५ पहाट होताच मुख्य याजक, वडीलजन आणि शास्त्री यांनी, म्हणजे खरंतर संपूर्ण न्यायसभेने* आपसात चर्चा केली. मग ते येशूला बांधून तिथून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला पिलातच्या हवाली केलं.+ २ तेव्हा पिलातने त्याला विचारलं: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?”+ त्याने उत्तर दिलं: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.”+ ३ पण मुख्य याजक त्याच्यावर बरेच आरोप लावत होते. ४ म्हणून पिलातने त्याला पुन्हा विचारलं: “तू काहीच कसं बोलत नाहीस?+ बघ, ही माणसं तुझ्यावर किती आरोप लावत आहेत!”+ ५ पण येशूने पुढे काहीच उत्तर दिलं नाही. यामुळे, पिलातला खूप आश्‍चर्य वाटलं.+

६ दरवर्षी, त्या सणाच्या वेळी पिलात लोकांच्या विनंतीप्रमाणे कोणत्याही एका कैद्याची सुटका करायचा.+ ७ त्या वेळी, बरब्बा नावाचा एक माणूस इतर बंडखोरांसोबत तुरुंगात होता. त्या बंडखोरांनी सरकारविरुद्ध बंड केलं होतं आणि लोकांची हत्या केली होती. ८ तेव्हा, लोक पिलातपुढे येऊन विनंती करू लागले, की त्याने आपल्या रितीप्रमाणे एका कैद्याची सुटका करावी. ९ पिलातने त्यांना विचारलं: “मी यहुद्यांच्या राजाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे का?”+ १० कारण पिलातला माहीत होतं, की मुख्य याजकांनी द्वेषामुळे येशूला पकडून दिलं आहे.+ ११ पण मुख्य याजकांनी, येशूच्या ऐवजी बरब्बाची सुटका करावी अशी विनंती करायला लोकांना भडकवलं.+ १२ पिलातने त्यांना पुन्हा एकदा विचारलं: “मग, तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचं मी काय करू?”+ १३ ते पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणाले: “त्याला वधस्तंभावर* खिळा!”*+ १४ तेव्हा पिलात त्यांना म्हणाला: “पण का? त्याने कोणतं वाईट काम केलंय?” तरीसुद्धा, ते आणखीनच ओरडू लागले: “त्याला वधस्तंभावर खिळा!”*+ १५ मग लोकांना खूश करण्यासाठी त्याने बरब्बाची सुटका केली. पण येशूला चाबकाचे फटके मारून+ त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी सैनिकांच्या हाती दिलं.+

१६ मग सैनिकांनी येशूला अंगणात, म्हणजे राज्यपालाच्या भवनात नेलं आणि त्यांनी बाकीच्या सगळ्या सैनिकांना तिथे जमवलं.+ १७ त्यांनी त्याला जांभळं वस्त्र घातलं आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला. १८ मग ते मोठ्याने ओरडून म्हणू लागले: “यहुद्यांच्या राजाचा जयजयकार असो!”*+ १९ तसंच, ते वेताच्या काठीने त्याच्या डोक्यावर मारू लागले आणि त्याच्यावर थुंकू लागले आणि त्यांनी गुडघे टेकून त्याला नमन केलं. २० शेवटी, त्याची अशी थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावर घातलेलं जांभळं वस्त्र काढलं आणि त्याला पुन्हा त्याचा झगा घालून ते त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले.+ २१ त्या वेळी, शिमोन नावाचा एक माणूस त्या रस्त्याने शेतांतून शहराकडे येत होता. तो मूळचा कुरेनेचा होता आणि आलेक्सांद्र आणि रूफ यांचा पिता होता. तेव्हा, सैनिकांनी त्याला येशूचा वधस्तंभ उचलून न्यायला भाग पाडलं.+

२२ मग त्यांनी येशूला गुलगुथा या ठिकाणी आणलं. त्याचा अर्थ “कवटीची जागा” असा होतो.+ २३ तिथे त्यांनी त्याला गंधरस* मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला,+ पण त्याने तो प्यायला नकार दिला. २४ मग त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळलं आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणी कोणते घ्यावेत, हे ठरवायला चिठ्ठ्या टाकल्या आणि ते आपसात वाटून घेतले.+ २५ त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळलं तेव्हा सकाळचे सुमारे नऊ वाजले होते.* २६ त्याच्याविरुद्ध असलेला आरोप लिहून वधस्तंभावर लावण्यात आला. त्यावर लिहिलं होतं: “यहुद्यांचा राजा.”+ २७ शिवाय, त्यांनी येशूसोबत दोन चोरांनाही वधस्तंभांवर लटकवलं, एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुसऱ्‍याला डावीकडे.+ २८ *​—— २९ तेव्हा तिथून येणारे-जाणारे लोक डोकं हलवून त्याची निंदा करत होते+ आणि म्हणत होते: “काय रे, मंदिर पाडून तीन दिवसांत पुन्हा उभं करणार होतास ना?+ ३० मग आता वधस्तंभावरून खाली येऊन स्वतःला वाचव!” ३१ तसंच, मुख्य याजक आणि शास्त्रीही आपसात त्याची अशी थट्टा करू लागले: “याने दुसऱ्‍यांना वाचवलं, पण याला स्वतःला वाचवता येत नाही!+ ३२ आता इस्राएलच्या या राजाने, या ख्रिस्ताने वधस्तंभावरून खाली यावं. म्हणजे ते पाहून आम्ही विश्‍वास ठेवू.”+ तसंच, वधस्तंभांवर त्याच्या बाजूला असलेले चोरसुद्धा त्याची निंदा करत होते.+

३३ मग, दुपारी सुमारे बारा वाजेपासून* ते सुमारे तीन वाजेपर्यंत* पृथ्वीवर अंधार पसरला.+ ३४ तीन वाजले, तेव्हा येशू मोठ्याने ओरडून म्हणाला: “एली, एली, लामा साबाखतानी?” ज्याचा अर्थ असा होतो, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?”+ ३५ हे ऐकून तिथे उभे असलेले काही लोक म्हणू लागले: “पाहा! तो एलीयाला हाक मारतोय.” ३६ तेवढ्यात कोणीतरी धावत जाऊन एक बोळा आणला आणि तो आंबट द्राक्षारसात बुडवून एका वेताच्या टोकावर ठेवला. मग त्याला चोखायला देऊन+ तो म्हणाला: “असू दे! एलीया याला खाली उतरवायला येतो का ते पाहू या.” ३७ पण येशूने मोठ्याने ओरडून प्राण सोडला.*+ ३८ तेव्हा, मंदिराच्या पवित्र स्थानाचा पडदा+ वरपासून खालपर्यंत फाटून त्याचे दोन भाग झाले.+ ३९ जवळच, त्याच्यासमोर उभ्या असलेल्या सैन्याच्या अधिकाऱ्‍याने त्याच्या मृत्यूच्या वेळी घडलेल्या घटना पाहिल्या, तेव्हा तो म्हणाला, “खरंच, हा देवाचा मुलगा होता!”+

४० बऱ्‍याच स्त्रियासुद्धा दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, तसंच धाकटा याकोब आणि योसे यांची आई मरीया आणि सलोमी या होत्या.+ ४१ येशू गालीलमध्ये असताना या स्त्रिया त्याच्यासोबत असायच्या आणि त्याची सेवा करायच्या.+ तसंच, त्याच्यासोबत यरुशलेमहून आलेल्या इतर बऱ्‍याच स्त्रियाही तिथे होत्या.

४२ दुपार टळून गेली होती आणि तो तयारीचा दिवस, म्हणजेच शब्बाथाच्या आधीचा दिवस होता. ४३ तेव्हा, अरिमथाई इथला योसेफ तिथे आला. तो न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तोसुद्धा देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तो हिंमत करून पिलातकडे गेला आणि त्याने येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली.+ ४४ पण येशू इतक्यात कसा काय मेला याचं पिलातला आश्‍चर्य वाटलं. म्हणून त्याने सैन्याच्या अधिकाऱ्‍याला बोलावून येशू खरोखरच मेला का, असं त्याला विचारलं. ४५ मग सैन्याच्या अधिकाऱ्‍याकडून खातरी करून घेतल्यावर त्याने येशूचा मृतदेह योसेफला दिला. ४६ योसेफने उत्तम प्रतीचं मलमलीचं कापड विकत आणलं आणि येशूचं शरीर खाली उतरवून ते त्या कापडात गुंडाळलं. मग त्याने ते खडकात खोदलेल्या एका कबरेत* ठेवलं+ आणि मोठा दगड लोटून कबरेचं दार बंद केलं.+ ४७ पण मग्दालीया मरीया आणि योसेची आई मरीया, त्याला ठेवण्यात आलं होतं त्या जागेकडे बराच वेळ पाहत राहिल्या.+

१६ मग शब्बाथाचा+ दिवस संपल्यावर मग्दालीया मरीया, याकोबची आई मरीया+ आणि सलोमी यांनी येशूच्या शरीराला लावायला सुगंधी मसाले विकत घेतले.+ २ मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी सूर्य उगवायच्या वेळी, पहाटेच त्या कबरेजवळ* आल्या.+ ३ त्या एकमेकींना म्हणत होत्या, “कबरेच्या तोंडावरून आपल्यासाठी दगड बाजूला कोण लोटेल?” ४ पण त्यांनी कबरेच्या दाराकडे पाहिलं, तेव्हा त्यावरचा दगड आधीच लोटण्यात आला आहे असं त्यांना दिसलं. खरंतर तो दगड खूप मोठा होता.+ ५ त्या आत गेल्या, तेव्हा पांढरा झगा घातलेला एक तरुण उजव्या बाजूला बसलेला त्यांना दिसला. त्याला पाहून त्यांना धक्काच बसला. ६ पण तो त्यांना म्हणाला: “घाबरू नका.+ ज्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला, त्या नासरेथच्या येशूलाच तुम्ही शोधताय ना? तो इथे नाही. त्याला उठवण्यात आलंय.+ बघा, त्याला इथेच ठेवलं होतं.+ ७ म्हणून आता जा आणि त्याच्या शिष्यांना आणि पेत्रला सांगा, की ‘तो तुमच्यापुढे गालीलला जातोय.+ त्याने तुम्हाला सांगितलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही त्याला तिथे पाहाल.’”+ ८ मग त्या कबरेबाहेर येऊन तिथून पळाल्या. त्या थरथर कापत होत्या आणि खूप चकित झाल्या होत्या. पण, फार घाबरल्यामुळे त्यांनी कोणालाही काहीच सांगितलं नाही.*+

शब्दशः “तुझ्या चेहऱ्‍यापुढे.”

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “नवीनच शिकवण.”

किंवा कदाचित, “तो कोण आहे.”

किंवा “पक्षाघात झालेल्या.”

शब्दार्थसूची पाहा.

प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या पिशव्या. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अर्पणाच्या भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “लकवा मारल्यामुळे लुळा झालेल्या.”

किंवा “लकवा मारल्यामुळे लुळा झालेल्या.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “नेमलं.”

किंवा “नेमलेल्या.”

म्हणजे, “आवेशी असलेला.”

सैतानासाठी वापरण्यात आलेलं एक नाव.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “सध्याच्या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुम्ही एवढे भित्रे कसे?”

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “दहा शहरांच्या प्रदेशामध्ये.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मरायला टेकली आहे.”

शब्दशः “शांतीने जा.”

किंवा “अशी कडक आज्ञा दिली.”

किंवा “अद्‌भुत कार्यं.”

किंवा “अद्‌भुत कार्यं.”

शब्दार्थसूची पाहा.

कदाचित एक प्रकारचा कमरपट्टा ज्यात पैसे ठेवले जायचे.

शब्दशः “तांबं.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जेवायला बसलेल्या लोकांमुळे.”

किंवा “स्मारक कबरेत.”

अति. ख१४ पाहा.

म्हणजे, पहाटे सुमारे ३ वाजेपासून सुमारे ६ वाजता सूर्योदय होईपर्यंत.

म्हणजे, हात धुण्याचा विधी न पाळता.

शब्दशः “बाप्तिस्मा.” म्हणजे, पाण्यात बुडवून काढणं.

किंवा “वडिलांना किंवा आईला शिव्याशाप देतो.”

अति. क३ पाहा.

ग्रीक, पोर्निया  अनेकवचन. शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक, ॲसेल्गेया.  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “ईर्ष्येने भरलेली नजर.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दहा शहरांच्या प्रदेशाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मोठ्या टोपल्या.”

शब्दशः “शिकवू.”

शब्दशः “माझ्या मागे हो.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आपलं जीवन.”

किंवा “आपलं जीवन.”

किंवा “जीवन.”

किंवा “जीवनाच्या.”

किंवा “विश्‍वासघातकी.”

किंवा “गुरू.”

किंवा कदाचित, “ही गोष्ट आपल्यातच ठेवली.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “गाढव ओढतं तसा जात्याचा दगड.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “सर्वकाळाच्या जीवनात.”

अति. क३ पाहा.

किंवा “सर्वकाळाच्या जीवनात.”

अति. क३ पाहा.

किंवा “सर्वकाळाच्या जीवनात.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वेगळं करू नये.”

किंवा कदाचित, “एकमेकांना.”

किंवा “येणाऱ्‍या काळात.” शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “गौरवात.”

शब्दशः “रब्बोनी.”

अति. क५ पाहा.

किंवा “गुरू.”

अति. क३ पाहा.

शब्दशः “स्वर्गापासून.”

किंवा “माळा बांधला.”

शब्दार्थसूचीत “कोपऱ्‍याचा दगड” पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “अटक करण्याची.”

किंवा “रोमी सम्राटाला.” शब्दार्थसूची पाहा.

अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “महत्त्वाची.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “सगळ्यात चांगल्या.”

किंवा “घरं.”

शब्दशः “दोन लेप्टा,  म्हणजे एक क्वॉड्रन.”  अति. ख१४ पाहा.

शब्दशः “बाळाच्या जन्माच्या वेळी स्त्रीला येणाऱ्‍या कळांची.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “धीर धरतो.”

किंवा “त्याचंच तारण होईल.”

अति. क५ पाहा.

शब्दशः “वाऱ्‍यांतून.”

शब्दशः “कोंबडा आरवण्याच्या वेळी.”

किंवा “कुयुक्‍तीने.”

किंवा “पकडून.”

एका सुगंधी वनस्पतीचं नाव. शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, अलाबास्त्र नावाच्या दगडापासून बनवलेली बाटली. शब्दार्थसूचीत “अलाबास्त्र” पाहा.

किंवा “तेलाच्या बाटलीचं तोंड फोडून ती उघडली.”

अति. ख१४ पाहा.

किंवा “तिच्याशी रागाने बोलू लागले; तिला दटावू लागले.”

किंवा “स्तोत्रं.”

शब्दशः “सगळे अडखळाल.”

शब्दशः “सगळे अडखळले तरी मी अडखळणार नाही.”

किंवा “तो अगदी सुन्‍न.”

किंवा “माझा जीव.”

हा ‘वडील’ या अर्थाचा हिब्रू किंवा ॲरामेईक (अरामी) भाषेतला शब्द आहे. सहसा मुलं आपल्या वडिलांना संबोधण्यासाठी हा शब्द वापरतात.

किंवा “तयार.”

किंवा “गुरू.”

किंवा “कमी कपड्यांत; फक्‍त आतल्या कपड्यांवर.”

म्हणजे, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुमचं म्हणणं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”

किंवा “वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”

किंवा “यहुद्यांच्या राजा, नमस्कार!”

किंवा “गुंगीचा पदार्थ.” शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तिसरा तास होता.”

अति. क३ पाहा.

शब्दशः “सहाव्या तासापासून.”

शब्दशः “नवव्या तासापर्यंत.”

किंवा “शेवटचा श्‍वास घेतला.”

किंवा “स्मारक कबरेत.”

किंवा “स्मारक कबरेजवळ.”

शब्दार्थसूची पाहा.

सर्वात जुन्या विश्‍वसनीय हस्तलिखितांप्रमाणे आठवं वचन हे मार्कच्या पुस्तकातलं शेवटचं वचन आहे. अति. क३ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा