वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt विलापगीत १:१-५:२२
  • विलापगीत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विलापगीत
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
विलापगीत

विलापगीत

א [आलेफ ]*

१ कशी एकाकी बसली आहे ती नगरी, जी एकेकाळी गजबजलेली होती!+

कशी विधवेसारखी झाली आहे, जी राष्ट्रांमध्ये महान होती!+

कशी सक्‍तीच्या मजुरीत जखडली आहे, जी प्रांतांमध्ये राजकन्या होती!+

ב [बेथ ]

 २ ती रात्रभर रडत राहते,+ तिच्या गालांवरून अश्रू ओघळतात.

तिच्या सगळ्या प्रियकरांपैकी, एकही तिचं सांत्वन करायला तिच्याजवळ नाही.+

तिचे सगळे सोबती तिचे शत्रू बनले आहेत, त्यांनी तिचा विश्‍वासघात केलाय.+

ג [गिमेल ]

 ३ यहूदा बंदिवासात गेली आहे;+ तिला जुलूम आणि कठोर गुलामगिरी सहन करावी लागत आहे.+

तिला परक्या राष्ट्रांमध्ये राहावं लागेल;+ तिला विश्रांतीचं ठिकाण सापडत नाही.

तिचा छळ करणाऱ्‍या सर्वांनी, तिच्या संकटाच्या काळात तिला गाठलं.

ד [दालेथ ]

 ४ सीयोनला जाणारे रस्ते शोक करत आहेत, कारण कोणीही सणासाठी येत नाही.+

तिची सर्व फाटकं उजाड पडली आहेत;+ तिचे याजक उसासे टाकत आहेत.

तिच्या कुमारी* शोक करत आहेत आणि ती दुःखाने व्याकूळ आहे.

ה [हे ]

 ५ तिचे शत्रू आता तिचे मालक* बनले आहेत; तिचे वैरी बेपर्वा आहेत.+

कारण तिच्या पुष्कळ अपराधांमुळे यहोवाने तिच्यावर दुःख आणलंय.+

शत्रूने तिच्या मुलांना बंदिवासात नेलंय.+

ו [वाव ]

 ६ सीयोनच्या मुलीचं सर्व ऐश्‍वर्य नाहीसं झालंय.+

तिचे अधिकारी चारा न मिळालेल्या हरणांसारखे झाले आहेत,

आपला पाठलाग करणाऱ्‍यांपुढे ते शक्‍तिहीन होऊन चालत आहेत.

ז [झाइन ]

 ७ यरुशलेम दुःखी आणि बेघर झाली,

तेव्हा पूर्वी आपल्याजवळ असलेल्या सर्व मौल्यवान वस्तू तिला आठवल्या.+

तिचे लोक वैऱ्‍याच्या हाती सापडले आणि तिला कोणी सहायक नव्हता,+

तेव्हा तिचा नाश झालेला पाहून तिचे शत्रू तिच्यावर हसले.+

ח [हेथ ]

 ८ यरुशलेमने भयंकर पाप केलंय.+

म्हणून ती घृणास्पद झाली आहे.

जे तिचा सन्मान करायचे, ते आता तिला तुच्छ लेखतात, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे.+

ती कण्हते+ आणि शरमेने तोंड लपवते.

ט [तेथ ]

 ९ तिची अशुद्धता तिच्या वस्त्रांत आहे.

तिने आपल्या भविष्याबद्दल जराही विचार केला नाही.+

तिचा नाश धक्कादायक होता; तिचं सांत्वन करणारं कोणीही नाही.

हे यहोवा, माझं दुःख पाहा, कारण शत्रू बढाई मारतोय.+

י [योद ]

१० शत्रूने तिचा सगळा खजिना लुटून नेलाय.+

ज्यांनी तुझ्या मंडळीत येऊ नये अशी तू आज्ञा दिली होतीस,

त्या राष्ट्रांना तिने आपल्या पवित्र ठिकाणात पाऊल ठेवताना पाहिलंय.+

כ [खाफ ]

११ तिचे सगळे लोक उसासे टाकत आहेत; ते अन्‍न शोधत आहेत.+

जिवंत राहण्यासाठी काहीतरी खायला मिळावं, म्हणून त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू दिल्या आहेत.

हे यहोवा, पाहा, मी तुच्छ स्त्रीसारखी* झाले आहे.

ל [लामेद ]

१२ येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांनो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?

जरा माझ्याकडे पाहा!

यहोवाने आपल्या क्रोधाच्या दिवशी मला जे दुःख सोसायला लावलं,+

त्यासारखं आणखी कोणतं दुःख आहे का?

מ [मेम ]

१३ त्याने स्वर्गातून माझ्यावर अग्नी पाठवून माझं प्रत्येक हाड जाळून टाकलं.+

माझ्या पायांसाठी त्याने जाळं पसरवलंय; त्याने मला माघार घ्यायला लावली आहे.

त्याने मला असाहाय्य स्त्रीसारखं केलं आहे.

दिवसभर मी दुःखीकष्टी* असते.

נ [नून ]

१४ त्याने आपल्या हाताने, माझे अपराध माझ्यावर जुवासारखे लादले आहेत.

ते माझ्या मानेवर ठेवण्यात आले आहेत; माझ्यात शक्‍ती उरलेली नाही.

मी ज्यांचा सामना करू शकत नाही, अशा लोकांच्या हाती मला यहोवाने दिलंय.+

ס [सामेख ]

१५ माझ्या सर्व शूरवीरांना यहोवाने बाहेर फेकून दिलंय.+

माझ्या तरुणांना चिरडण्यासाठी त्याने माझ्याविरुद्ध मोठा समुदाय जमा केलाय.+

यहोवाने यहूदाच्या कुमारीला द्राक्षकुंडात तुडवलंय.+

ע [आयन ]

१६ यामुळे मी रडत आहे;+ माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत.

माझं सांत्वन करणारं किंवा मला* दिलासा देणारं कोणीही माझ्याजवळ नाही.

माझी मुलं हताश आहेत, कारण शत्रूने त्यांच्यावर विजय मिळवलाय.

פ [पे ]

१७ सीयोनने आपले हात पसरले आहेत;+ तिला सांत्वन देणारं कोणीही नाही.

यहोवाने याकोबविरुद्ध त्याच्या आसपासच्या सर्व शत्रूंना आदेश दिलाय.+

यरुशलेम त्यांच्यासाठी घृणास्पद वस्तू झाली आहे.+

צ [सादे ]

१८ यहोवा नीतिमान आहे;+ मीच त्याच्या आज्ञांविरुद्ध बंड केलं.+

सर्व लोकांनो, ऐका आणि माझ्या यातना पाहा.

माझ्या कुमारी* आणि माझे तरुण बंदिवासात गेले आहेत.+

ק [खुफ ]

१९ मी माझ्या प्रियकरांना हाक मारली, पण त्यांनी माझा विश्‍वासघात केला.+

जिवंत राहण्यासाठी अन्‍न शोधत असताना,+

माझ्या याजकांचा आणि वडीलजनांचा शहरात नाश झाला.

ר [रेश ]

२० हे यहोवा, पाहा मी मोठ्या संकटात आहे.

माझ्या आतड्यांना पीळ पडलाय.

माझ्या हृदयाला यातना होत आहेत, कारण मी फार बंडखोर झाले होते.+

बाहेर, तलवार माझ्या मुलांचा घात करते+ आणि घरातही मरण आहे.

ש [शिन ]

२१ लोकांनी माझे उसासे ऐकले आहेत; मला सांत्वन देणारं कोणीही नाही.

माझ्या सर्व शत्रूंनी माझ्यावर आलेल्या संकटाबद्दल ऐकलंय.

ते खूश आहेत, कारण तू ते आणलं आहेस.+

पण तू घोषित केलेला दिवस तू आणशील,+ तेव्हा त्यांचीही माझ्यासारखीच दशा होईल.+

ת [ताव ]

२२ त्यांचा सर्व दुष्टपणा तुझ्यापुढे येऊ दे,

आणि माझ्या सर्व अपराधांमुळे जसा तू माझ्याशी कठोरपणे वागलास,

तसाच तू त्यांच्याशीही कठोरपणे वाग.+

कारण मी उसासे टाकून थकले आहे आणि माझ्या हृदयाला यातना होत आहेत.

א [आलेफ ]

२ यहोवाने सीयोनच्या मुलीला आपल्या क्रोधाच्या मेघाने कसं झाकून टाकलंय!

इस्राएलचं सौंदर्य त्याने आकाशातून पृथ्वीवर फेकून दिलंय.+

त्याच्या क्रोधाच्या दिवशी त्याने आपल्या पायांच्या आसनाची+ आठवण ठेवली नाही.

ב [बेथ ]

 २ यहोवाने याकोबच्या सगळ्या वस्त्या गिळून टाकल्या आहेत; त्याने दयामाया दाखवली नाही.

त्याच्या क्रोधाच्या भरात त्याने यहूदाच्या सगळ्या तटबंद्या पाडून टाकल्या आहेत.+

त्याने यहूदाला आणि तिच्या अधिकाऱ्‍यांना धुळीला मिळवून त्यांना दूषित केलंय.+

ג [गिमेल ]

 ३ त्याने संतापाच्या भरात इस्राएलचं सगळं सामर्थ्य* मोडून टाकलंय.

शत्रूने हल्ला केला, तेव्हा त्याने आपला उजवा हात मागे घेतला.+

याकोबमध्ये तो आगीसारखा जळत राहिला आणि त्याने आपल्या आसपासचं सगळं काही भस्म केलं.+

ד [दालेथ ]

 ४ त्याने शत्रूप्रमाणे आपलं धनुष्य वाकवलंय;* त्याचा उजवा हात वैऱ्‍यासारखा सज्ज आहे;+

आमच्या दृष्टीने प्रिय असलेल्या सर्वांना त्याने ठार मारलं.+

त्याने सीयोनच्या मुलीच्या तंबूत+ आपला क्रोध आगीसारखा ओतला.+

ה [हे ]

 ५ यहोवा शत्रूसारखा झालाय;+

त्याने इस्राएलला गिळून टाकलंय.

तिचे सगळे बुरूज त्याने गिळून टाकले आहेत.

तिच्या तटबंद्यांचा त्याने नाश केलाय.

त्याने यहूदाच्या मुलीचा शोक आणि आक्रोश वाढवलाय.

ו [वाव ]

 ६ बागेतली झोपडी असल्याप्रमाणे तो आपला मंडप उद्ध्‌वस्त करतो.+

त्याने आपला सण बंद केलाय.+

सीयोनमध्ये यहोवाने सणाचा आणि शब्बाथाचा विसर पाडलाय.

त्याच्या तीव्र संतापापुढे त्याने राजाची आणि याजकाचीही गय केली नाही.+

ז [झाइन ]

 ७ यहोवाने आपल्या वेदीकडे पाठ फिरवली आहे;

त्याने आपलं पवित्र ठिकाण तुच्छ लेखलंय.+

त्याने तिच्या बुरुजांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत.+

सणाच्या दिवशी जल्लोष करावा, तसा ते यहोवाच्या घरात गोंगाट करत आहेत.+

ח [हेथ ]

 ८ यहोवाने सीयोनची भिंत जमीनदोस्त करायचं ठरवलंय.+

त्याने मोजण्याची दोरी ताणली आहे.+

त्याने नाश आणण्यापासून* आपला हात आवरला नाही.

तो तटाला आणि बुरुजांना शोक करायला लावतो.

ते सर्व कमजोर झाले आहेत.

ט [तेथ ]

 ९ तिची फाटकं जमिनीत खचली आहेत.+

त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत.

तिचा राजा आणि तिचे अधिकारी राष्ट्रांमध्ये बंदिवान आहेत.+

कोणीच नियमशास्त्र* पाळत नाही; तिच्या संदेष्ट्यांनाही यहोवाकडून दृष्टान्त मिळत नाहीत.+

י [योद ]

१० सीयोनचे वडीलजन शांतपणे जमिनीवर बसले आहेत.+

ते आपल्या डोक्यावर धूळ घालत आहेत; त्यांनी गोणपाट घातलंय.+

यरुशलेमच्या मुलींनी वाकून जमिनीवर डोकं टेकलंय.

כ [खाफ ]

११ अश्रू गाळून माझे डोळे थकले आहेत.+

माझ्या आतड्यांना पीळ पडलाय.

माझ्या लोकांच्या मुलीच्या* विनाशामुळे, माझं काळीज तुटतंय.*+

शहराच्या चौकांत चिमुकली मुलं आणि तान्ही बाळं बेशुद्ध होऊन पडत आहेत.+

ל [लामेद ]

१२ शहराच्या चौकांत ती जखमी माणसांप्रमाणे मरायला टेकलेली आहेत.

आपल्या आईच्या कुशीत प्राण सोडताना,

ती तिला विचारतात, “अन्‍न आणि द्राक्षारस कुठे आहे?”+

מ [मेम ]

१३ हे यरुशलेमच्या मुली, मी तुला कोणतं उदाहरण देऊ?

मी तुला कोणाची उपमा देऊ?

हे सीयोनच्या कुमारी, तुझं सांत्वन करण्यासाठी मी कोणाशी तुझी तुलना करू?

कारण तुझा विनाश समुद्राइतका मोठा आहे.+ तुला कोण बरं करेल?+

נ [नून ]

१४ तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्याबद्दल पाहिलेले दृष्टान्त खोटे आणि निरर्थक होते,+

तुझे अपराध उघड करून त्यांनी तुला बंदिवासात जाण्यापासून वाचवलं नाही,+

उलट, ते खोटे आणि भ्रमात पाडणारे दृष्टान्त सांगत राहिले.+

ס [सामेख ]

१५ रस्त्यावरून येणारे-जाणारे सर्व जण तुझी थट्टा करण्यासाठी टाळ्या वाजवतात.+

ते यरुशलेमकडे पाहून शिट्ट्या वाजवतात*+ आणि माना डोलावून म्हणतात:

“‘सर्वात सुंदर नगरी, सगळ्या पृथ्वीचा आनंद,’ असं जिच्याबद्दल म्हणायचे ती हीच ना?”+

פ [पे ]

१६ तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध तोंड उघडलंय.

ते शिट्ट्या वाजवतात, दातओठ खातात आणि म्हणतात: “आम्ही तिला गिळून टाकलंय.+

याच दिवसाची आम्ही वाट पाहत होतो!+ शेवटी तो आला; आम्ही आपल्या डोळ्यांनी तो पाहिला!”+

ע [आयन ]

१७ यहोवाच्या मनात जे होतं, ते त्याने केलंय;+ त्याने आपले शब्द पूर्ण केले.+

फार पूर्वी दिलेल्या आज्ञेप्रमाणे+ त्याने घडवून आणलंय.

त्याने दयामाया न दाखवता तुला जमीनदोस्त केलंय.+

त्याने शत्रूला तुझ्याविरुद्ध विजयी करून त्याला आनंदी केलंय;

त्याने तुझ्या वैऱ्‍यांचं सामर्थ्य* वाढवलंय.

צ [सादे ]

१८ हे सीयोन, तुझे लोक मनापासून यहोवाला हाक मारतात.

तुझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रूंच्या धारा वाहू दे.

थोडाही विसावा घेऊ नकोस आणि तुझ्या डोळ्यांना विश्रांती देऊ नकोस.

ק [खुफ ]

१९ ऊठ! रात्रभर* आक्रोश कर.

पाणी ओतावं तसं यहोवासमोर आपलं मन मोकळं कर.

दुष्काळामुळे तुझी मुलंबाळं प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्‍यावर भुकेने व्याकूळ होऊन पडली आहेत.+

त्यांचा जीव वाचावा म्हणून त्याच्यापुढे हात पसर.

ר [रेश ]

२० हे यहोवा, तू ज्यांच्याशी इतक्या कठोरपणे वागलास त्यांच्याकडे पाहा.

स्त्रियांनी आपली पोटची मुलं, आपली पूर्ण वाढलेली मुलं खात राहावीत का?+

याजकांना आणि संदेष्ट्यांना यहोवाच्या मंदिरात ठार मारलं जावं का?+

ש [शिन ]

२१ तरुण आणि म्हातारा दोघंही रस्त्यांवर मरून पडलेले आहेत.+

माझ्या कुमारींचा* आणि तरुणांचा तलवारीने घात झालाय.+

तुझ्या क्रोधाच्या दिवशी तू त्यांना ठार मारलंस; तू दयामाया न दाखवता कत्तल केलीस.+

ת [ताव ]

२२ सणाच्या दिवसासाठी बोलवावं,+ त्याप्रमाणे मला भीतिदायक वाटणाऱ्‍या गोष्टी तू सर्व दिशांवरून बोलावतोस.

यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी, कोणीही निसटून जाऊ शकलं नाही किंवा वाचलं नाही;+

मी ज्यांना जन्म दिला आणि वाढवलं, त्यांचा माझ्या शत्रूने नाश केला.+

א [आलेफ ]

३ मी त्याच्या क्रोधाच्या काठीमुळे दुःख सोसलेला माणूस आहे.

 २ त्याने मला हाकलून लावलंय; तो मला उजेडात नाही, तर अंधारात चालायला लावतो.+

 ३ तो तर दिवसभर माझ्यावर पुन्हापुन्हा हात उगारतो.+

ב [बेथ ]

 ४ त्याने माझं मांस आणि माझी कातडी झिजवून टाकली आहे;

त्याने माझी हाडं मोडून टाकली आहेत.

 ५ त्याने मला वेढा घातलाय; तो कडू विषाने+ आणि संकटाने मला घेरतो.

 ६ तो मला फार पूर्वी मेलेल्या माणसांप्रमाणे, अंधाऱ्‍या ठिकाणांत बसायला लावतो.

ג [गिमेल ]

 ७ मी पळून जाऊ नये, म्हणून त्याने माझ्याभोवती भिंत उभारली आहे.

त्याने मला तांब्याच्या बोजड बेड्यांनी जखडलंय.+

 ८ मी कळकळून विनंती करतो, तेव्हा तो माझी प्रार्थना झिडकारतो.*+

 ९ त्याने मोठ्या दगडांनी माझे मार्ग अडवले आहेत;

त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत.+

ד [दालेथ ]

१० एखाद्या अस्वलासारखा, लपून बसलेल्या सिंहासारखा तो माझ्यासाठी टपून बसलाय.+

११ त्याने मला मार्गावरून बाजूला ओढून नेलंय आणि फाडून माझे तुकडेतुकडे केले आहेत;*

त्याने मला उद्ध्‌वस्त केलंय.+

१२ त्याने आपलं धनुष्य वाकवलंय* आणि मला आपल्या बाणाचं निशाण बनवलंय.

ה [हे ]

१३ त्याने आपल्या भात्यातले बाण* माझ्या हृदयात* घुसवले आहेत.

१४ मी सर्व लोकांसाठी हसण्याचा विषय बनलोय; ते दिवसभर गाणी म्हणून माझी थट्टा करतात.

१५ त्याने मला कडू गोष्टी खायला दिल्या आहेत आणि तो सतत मला कडूदवणा* प्यायला लावतो.+

ו [वाव ]

१६ तो खड्यांनी माझे दात तोडतो;

तो मला राखेत लोळायला लावतो.+

१७ तू माझी* शांती हिरावून घेतोस; सुख काय असतं, हे मी विसरून गेलोय.

१८ म्हणून मी म्हणतो: “माझं वैभव नष्ट झालंय, यहोवावरची माझी आशा धुळीला मिळाली आहे.”

ז [झाइन ]

१९ माझं दुःख आणि माझी बेघर स्थिती आठव,+ मी कडूदवणा आणि कडू विष खातोय,+ हे आठव.

२० तू नक्कीच हे आठवशील आणि खाली वाकून मला मदत करशील.+

२१ मी मनोमन या गोष्टी आठवतो, म्हणूनच मी धीराने वाट पाहीन.+

ח [हेथ ]

२२ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच आमचा नाश झाला नाही,+

कारण त्याची दया कधीच संपत नाही.+

२३ ती रोज सकाळी नवी होते;+ तुझा विश्‍वासूपणा अपार आहे.+

२४ मी म्हणालो: “यहोवा माझा वाटा आहे,+ म्हणून मी त्याची धीराने वाट पाहीन.”+

ט [तेथ ]

२५ जो यहोवावर आशा ठेवतो, जो* त्याची वाट पाहतो,+ त्याच्यावर तो कृपा करतो.+

२६ यहोवाकडून मिळणाऱ्‍या तारणाची शांतपणे* वाट पाहणं चांगलं आहे.+

२७ तरुणाने आपल्या तारुण्यात जू* वाहणं चांगलं आहे.+

י [योद ]

२८ देव त्याच्यावर जू लादतो, तेव्हा त्याने एकटं बसावं आणि शांत राहावं.+

२९ त्याने आपलं तोंड धुळीत खुपसावं;+ कदाचित त्याच्यासाठी अजूनही आशा असेल.+

३० त्याला मारणाऱ्‍याकडे त्याने आपला गाल पुढे करावा; करता येईल तितका अपमान त्याने सहन करावा.

כ [खाफ ]

३१ कारण यहोवा आपल्याला कायमचं सोडून देणार नाही.+

३२ जरी त्याने दुःख दिलं असलं, तरी त्याच्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे तो आपल्यावर दयाही करेल.+

३३ कारण मानवांवर संकटं आणणं, किंवा त्यांना दुःख देणं त्याला आवडत नाही.+

ל [लामेद ]

३४ पृथ्वीवरच्या सर्व कैद्यांना पायाखाली तुडवणं,+

३५ सर्वोच्च देवासमोर एखाद्यावर अन्याय करणं,+

३६ एखाद्याला खटल्यात न्याय न मिळू देणं,

अशा गोष्टी यहोवा खपवून घेत नाही.

מ [मेम ]

३७ मग यहोवाने आज्ञा दिल्याशिवाय, कोण एखादी गोष्ट बोलून, ती घडवून आणू शकतं?

३८ सर्वोच्च देवाच्या तोंडून,

चांगल्या गोष्टींसोबत, वाईट गोष्टी निघत नाहीत.

३९ माणसाने आपल्या पापाच्या परिणामांबद्दल तक्रार का करावी?+

נ [नून ]

४० आपण आपले मार्ग तपासून पाहू या, त्यांचं बारकाईने परीक्षण करू या+ आणि यहोवाकडे परत जाऊ या.+

४१ आपण आपल्या हातांसोबत आपलं हृदयसुद्धा स्वर्गातल्या देवापुढे उंचावू या.+

४२ “आम्ही अपराध आणि बंड केलंय,+ आणि तू क्षमा केली नाहीस.+

ס [सामेख ]

४३ तू क्रोधाने, तुझ्याकडे येण्याचा आमचा मार्ग रोखला आहेस;+

आमचा पाठलाग करून, दयामाया न दाखवता तू आम्हाला ठार केलंस.+

४४ आमच्या प्रार्थना तुझ्यापर्यंत येऊ नयेत,

म्हणून तुझ्याकडे येण्याचा मार्ग तू मेघाने अडवला आहेस.+

४५ तू लोकांमध्ये आम्हाला गाळासारखं आणि केरकचऱ्‍यासारखं केलं आहेस.”

פ [पे ]

४६ आमचे सर्व शत्रू आमच्याविरुद्ध बोलतात.+

४७ दहशत आणि खाचखळगे;+ ओसाडी आणि विनाश+ आमच्या वाट्याला आले आहेत.

४८ माझ्या लोकांच्या मुलीचा नाश पाहून, माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतात.+

ע [आयन ]

४९ माझ्या डोळ्यांतले अश्रू थांबत नाहीत, ते अखंड वाहत राहतात.+

५० जोपर्यंत यहोवा स्वर्गातून खाली वाकून आपल्या लोकांचं दुःख पाहत नाही,+ तोपर्यंत माझे अश्रू थांबणार नाहीत.

५१ माझ्या शहराच्या सर्व मुलींवर आलेल्या दुःखामुळे, माझ्या डोळ्यांनी मला* यातना दिल्या आहेत.+

צ [सादे ]

५२ माझ्या शत्रूंनी उगाचच माझा पाठलाग करून, पक्ष्यासारखी माझी शिकार केली आहे.

५३ त्यांनी मला खड्ड्यात टाकून कायमचं शांत केलंय; ते माझ्यावर दगड फेकत राहतात.

५४ पाणी माझ्या डोक्यावरून गेलंय; मी म्हणालो: “आता सर्वच संपलं!”

ק [खुफ ]

५५ हे यहोवा, मी खोल खड्ड्यातून तुझ्या नावाने तुला हाक मारली.+

५६ माझी प्रार्थना ऐक; मदतीसाठी आणि सुटकेसाठी केलेल्या माझ्या याचनेकडे दुर्लक्ष करू नकोस.

५७ मी हाक मारली त्या दिवशी तू माझ्याजवळ आलास. तू म्हणालास: “घाबरू नकोस.”

ר [रेश ]

५८ हे यहोवा, तू माझ्या बाजूने लढलास; तू माझ्या जिवाची सुटका केलीस.+

५९ हे यहोवा, माझ्यावर झालेला अन्याय तू पाहिला आहेस; कृपा करून मला न्याय दे.+

६० त्यांनी कसा माझा सूड घेतला, माझ्याविरुद्ध कशी कारस्थानं केली, हे सर्व तू पाहिलं आहेस.

ש [शिन ]

६१ हे यहोवा, तू त्यांचे टोमणे आणि त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या दुष्ट योजना ऐकल्या आहेस.+

६२ माझ्या विरोधकांचे शब्द आणि दिवसभर ते माझ्याविरुद्ध कसे कुजबुज करतात, हे तू ऐकलं आहेस.

६३ त्यांच्याकडे पाहा! ते उठता-बसता त्यांच्या गाण्यांमधून माझी थट्टा करतात.

ת [ताव ]

६४ हे यहोवा, त्यांच्या कृत्यांप्रमाणे तू त्यांची परतफेड करशील.

६५ त्यांना शाप देऊन, तू त्यांचं हृदय कठोर करशील.

६६ हे यहोवा, तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील आणि तुझ्या आकाशाखालून त्यांचा सर्वनाश करशील.

א [आलेफ ]

४ शुद्ध, चकाकतं सोनं+ कसं निस्तेज झालंय!

पवित्र ठिकाणाचे दगड+ कसे शहराच्या कोपऱ्‍या-कोपऱ्‍यावर पडले आहेत!+

ב [बेथ ]

 २ सीयोनची प्रिय मुलं, ज्यांची उत्तम प्रतीच्या सोन्याशी तुलना केली जायची,*

त्यांना मातीच्या मडक्यांसारखं;

कुंभाराने घडवलेल्या भांड्यांसारखं लेखण्यात आलंय!

ג [गिमेल ]

 ३ कोल्हीणसुद्धा आपल्या पिल्लांना पाजते,

पण माझ्या लोकांची मुलगी ओसाड रानातल्या शहामृगींसारखी+ निर्दय झाली आहे.+

ד [दालेथ ]

 ४ तान्ह्या बाळाची जीभ तहानेमुळे त्याच्या टाळूला चिकटते.

मुलंबाळं भाकरीसाठी भीक मागतात,+ पण कोणी त्यांना तुकडासुद्धा देत नाही.+

ה [हे ]

 ५ जे एकेकाळी चमचमीत पदार्थ खायचे, ते रस्त्यांवर उपाशी* पडले आहेत.+

जे लहानपणापासून महागाचे कपडे घालायचे,+ त्यांनी राखेच्या ढिगाऱ्‍यांचा आश्रय घेतलाय.

ו [वाव ]

 ६ माझ्या लोकांच्या मुलीला मिळालेली शिक्षा,* सदोमच्या पापाबद्दल+ देण्यात आलेल्या शिक्षेपेक्षा भयंकर आहे;

त्या शहराचा एका क्षणात नाश झाला होता आणि कोणीही त्याला साहाय्य केलं नाही.+

ז [झाइन ]

 ७ तिचे नाझीर+ बर्फापेक्षा स्वच्छ, दुधापेक्षा शुभ्र होते.

त्यांची त्वचा पोवळ्यांपेक्षा लाल होती; ते चमकवलेल्या नीलमण्यांसारखे होते.

ח [हेथ ]

 ८ आता तर त्यांचे चेहरे काजळापेक्षा* काळे झाले आहेत;

रस्त्यांवर त्यांना कोणीही ओळखत नाही.

त्यांची सुरकुतलेली कातडी, त्यांच्या हाडांना चिकटली आहे;+ ती सुकलेल्या लाकडासारखी झाली आहे.

ט [तेथ ]

 ९ ज्यांना तलवारीने मारण्यात आलं, ते दुष्काळाला बळी पडलेल्यांपेक्षा;+

खंगत चाललेल्या आणि उपासमारीने घात झालेल्यांपेक्षा बरे आहेत.

י [योद ]

१० कोमल मनाच्या स्त्रियांनी आपल्या हातांनी स्वतःच्या मुलांना उकळलं.+

माझ्या लोकांच्या मुलीचा विनाश झाला, तेव्हा त्यांची मुलंच त्यांचं अन्‍न* झाली.+

כ [खाफ ]

११ यहोवाने आपला क्रोध प्रकट केलाय;

त्याने त्याच्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केलाय.+

सीयोनमध्ये त्याने अशी आग पेटवली, जिने तिचे पाये भस्म केले आहेत.+

ל [लामेद ]

१२ शत्रू यरुशलेमच्या फाटकांतून आत गेला,

यावर पृथ्वीच्या राजांचा आणि सर्व रहिवाशांचा विश्‍वास बसला नाही.+

מ [मेम ]

१३ तिच्या संदेष्ट्यांच्या पापांमुळे, तिच्या याजकांच्या अपराधांमुळे हे घडलं;+

त्यांनी तिच्यात नीतिमान लोकांचं रक्‍त सांडलं.+

נ [नून ]

१४ ते रस्त्यांवर आंधळ्यांसारखे भटकत आहेत.+

ते रक्‍ताने माखले आहेत,+

त्यामुळे कोणीही त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करू शकत नाही.

ס [सामेख ]

१५ लोक त्यांना म्हणतात, “अशुद्ध झालेल्यांनो, निघून जा! चालते व्हा! चालते व्हा! आम्हाला स्पर्श करू नका!”

ते बेघर झाले आहेत आणि भटकत राहतात.

राष्ट्रांतले लोक म्हणतात: “ते आमच्यामध्ये राहू शकत नाहीत.”*+

פ [पे ]

१६ यहोवाने त्यांची पांगापांग केली आहे;+

तो यापुढे त्यांच्यावर कृपा करणार नाही.

लोक याजकांचा आदर करणार नाहीत+ आणि वडीलजनांची कदर करणार नाहीत.+

ע [आयन ]

१७ साहाय्यासाठी आम्ही उगीच वाट पाहत राहिलो आणि आमचे डोळे थकून गेले.+

आम्ही एका राष्ट्राकडून मदतीसाठी खूप वाट पाहिली, पण ते आम्हाला वाचवू शकलं नाही.+

צ [सादे ]

१८ त्यांनी सतत आमचा पाठलाग केला;+ आम्ही आपल्या चौकांतून चालूही शकत नाही.

आमचा अंत जवळ आला आहे; आमचे दिवस संपले आहेत, कारण आमचा शेवट आला आहे.

ק [खुफ ]

१९ आमचा पाठलाग करणारे आकाशातल्या गरुडांपेक्षाही वेगवान होते.+

त्यांनी डोंगरांवर आमचा पिच्छा पुरवला; ओसाड रानात ते आमचा घात करण्यासाठी टपून बसले.

ר [रेश ]

२० “त्याच्या छत्रछायेत आपण राष्ट्रांमध्ये राहू,” असं ज्याच्याबद्दल आम्ही म्हणायचो,

तो आमच्या नाकपुड्यांतला श्‍वास, यहोवाचा अभिषिक्‍त,+ बंदी होऊन त्यांच्या मोठ्या खळग्यात अडकलाय.+

ש [शिन ]

२१ ऊस देशात राहणाऱ्‍या अदोमच्या मुली,+ आनंदी होऊन जल्लोष कर!

पण संकटाचा प्याला तुझ्या हातातही येईल+ आणि तू धुंद होऊन आपली नग्नता उघड करशील.+

ת [ताव ]

२२ हे सीयोनच्या मुली, तुझ्या अपराधाची शिक्षा पूर्ण झाली आहे.

तो तुला पुन्हा बंदिवासात नेणार नाही.+

पण हे अदोमच्या मुली, तुझ्या अपराधाकडे तो आपलं लक्ष वळवेल.

तो तुझी पापं उजेडात आणेल.+

५ हे यहोवा, आमच्यावर आलेलं संकट आठव.

आमचा किती अपमान झालाय, ते पाहा.+

 २ आमचा वारसा परक्यांच्या हाती; आमची घरं विदेश्‍यांच्या हाती देण्यात आली आहेत.+

 ३ आम्ही वडील नसलेल्या अनाथ मुलांसारखे झालो आहोत; आमच्या आया विधवांसारख्या झाल्या आहेत.+

 ४ आमचंच पाणी आम्हाला विकत घ्यावं लागतं+ आणि आमच्याच लाकडासाठी आम्हाला किंमत मोजावी लागते.

 ५ आमचा पाठलाग करणारे आमच्या मानेवर बसले आहेत;

आम्ही थकून गेलो आहोत, आम्हाला विश्रांती मिळत नाही.+

 ६ पुरेसं अन्‍न मिळावं म्हणून आम्ही इजिप्तपुढे*+ आणि अश्‍शूरपुढे हात पसरतो.+

 ७ ज्यांनी पाप केलं, ते आमचे वाडवडील आता जिवंत नाहीत, पण त्यांच्या अपराधांची शिक्षा आम्ही भोगतोय.

 ८ आता सेवक आमच्यावर राज्य करत आहेत; आम्हाला त्यांच्या हातून सोडवणारं कोणीही नाही.

 ९ ओसाड रानातल्या तलवारीमुळे, आम्ही आपला जीव धोक्यात घालून अन्‍न मिळवतो.+

१० भुकेने आम्ही व्याकूळ झाल्यामुळे, आमची त्वचा भट्टीसारखी तापली आहे.+

११ सीयोनमधल्या स्त्रियांची, यहूदाच्या शहरांतल्या कुमारींची त्यांनी अब्रू लुटली आहे.+

१२ अधिकाऱ्‍यांना हाताने लटकवण्यात आलं;+ वडीलजनांना जराही आदर दाखवण्यात आला नाही.+

१३ तरुण माणसं जातं उचलतात आणि लाकडांच्या ओझ्यामुळे लहान मुलं अडखळतात.

१४ वडीलजन शहराच्या फाटकांमधून निघून गेले आहेत;+ तरुण आपली वाद्यं वाजवत नाहीत.+

१५ आमच्या मनातला आनंद हरवला आहे; आमचं नाचगाणं शोकात बदललं आहे.+

१६ आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. आम्ही पाप केलंय, आमचा धिक्कार असो!

१७ यामुळे आमच्या मनाला यातना होत आहेत,*+

आणि या गोष्टींमुळे आमची दृष्टी अंधूक झाली आहे.+

१८ सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे,+ आता तिथे कोल्हे फिरतात.

१९ हे यहोवा, तू तर तुझ्या राजासनावर सर्वकाळासाठी विराजमान आहेस.

तुझं राजासन पिढ्या न्‌ पिढ्या टिकून राहील.+

२० तू आम्हाला कायमचं का विसरतोस? तू आम्हाला इतका काळ का टाकून देतोस?+

२१ हे यहोवा, आम्हाला तुझ्याकडे परत आण; आम्ही आनंदाने तुझ्याकडे परतू.+

आमचे पूर्वीचे दिवस परत आण.+

२२ पण तू तर आम्हाला पूर्णपणे झिडकारलं आहेस.

तू आमच्यावर खूप संतप्त आहेस.+

अध्याय १-४ हिब्रू वर्णमालेतल्या अक्षरांच्या क्रमाने रचलेली शोकगीतं आहेत.

किंवा “तरुण स्त्रिया.”

शब्दशः “डोकं.”

यरुशलेमला सूचित करणारा भाषालंकार.

शब्दशः “आजारी.”

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा “तरुण स्त्रिया.”

शब्दशः “प्रत्येक शिंग.”

शब्दशः “तुडवलंय.”

शब्दशः “गिळून टाकण्यापासून.”

किंवा “शिकवण.”

दया आणि सहानुभूती व्यक्‍त करण्यासाठी इथे आलंकारिक भाषेत लोकांची तुलना मुलीशी करण्यात आली आहे.

शब्दशः “माझं काळीज पृथ्वीवर ओतून टाकण्यात आलंय.”

यावरून कदाचित आश्‍चर्य किंवा तिरस्कार सूचित होत असावा.

शब्दशः “शिंग.”

शब्दशः “प्रहरांच्या सुरुवातीला.”

किंवा “तरुणींचा.”

किंवा “अडवतो.”

किंवा कदाचित, “मला पडीक राहू देतोस.”

शब्दशः “तुडवलंय.”

शब्दशः “मुलं.”

शब्दशः “गुरदे.”

एक कडू वनस्पती.

किंवा “माझ्या जिवाची.”

किंवा “ज्याचा जीव.”

किंवा “धीराने.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा “सोन्याइतकी मौल्यवान होती.”

शब्दशः “उजाड.”

शब्दशः “अपराध.”

शब्दशः “काळेपणा.”

किंवा “शोकाचं अन्‍न.”

किंवा “विदेशी म्हणून इथे राहू शकत नाहीत.”

किंवा “मिसरपुढे.”

शब्दशः “आमचं हृदय रोगी आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा