वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt यिर्मया १:१-५२:३४
  • यिर्मया

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यिर्मया
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यिर्मया

यिर्मया

१ हे यिर्मयाचे* शब्द आहेत. तो बन्यामीन प्रदेशातल्या अनाथोथ+ शहरात राहणाऱ्‍या याजकांपैकी हिल्कीया याजकाचा मुलगा होता. २ यहूदाचा राजा, म्हणजे आमोनचा+ मुलगा योशीया+ याच्या शासनकाळाच्या १३ व्या वर्षी यिर्मयाला यहोवाकडून* संदेश मिळाला. ३ त्याला यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्या शासनकाळातही देवाकडून संदेश मिळाला. आणि यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा सिद्‌कीया+ याच्या शासनकाळाचं ११ वं वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे पाचव्या महिन्यात यरुशलेम बंदिवासात जाईपर्यंत यिर्मयाला देवाकडून संदेश मिळत राहिला.+

४ यहोवाकडून मला संदेश मिळाला; तो मला म्हणाला:

 ५ “मी तुला आईच्या गर्भात घडवलं, त्याआधीच मी तुला ओळखत होतो.*+

तुझा जन्म होण्याआधीच मी तुला पवित्र केलं.*+

मी तुला राष्ट्रांसाठी संदेष्टा म्हणून नेमलं.”

 ६ पण मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा!

मी तर एक लहान मुलगा* आहे.+ मला नीट बोलताही येत नाही.”+

 ७ त्यावर यहोवा मला म्हणाला:

“असं बोलू नकोस, की ‘मी तर एक लहान मुलगा आहे.’

कारण ज्यांच्याकडे मी तुला पाठवीन, त्या सगळ्यांकडे तुला जावं लागेल,

आणि ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या, त्या सगळ्या तुला त्यांना सांगाव्या लागतील.+

 ८ तू त्यांना पाहून घाबरू नकोस,+

कारण मी यहोवा असं म्हणतो, ‘तुला वाचवायला मी तुझ्यासोबत आहे.’”+

९ त्यानंतर यहोवाने आपला हात पुढे करून माझ्या तोंडाला स्पर्श केला.+ मग यहोवा मला म्हणाला: “मी माझे शब्द तुझ्या मुखात घातले आहेत.+ १० बघ, मी आज तुला राष्ट्रांवर आणि राज्यांवर नेमलंय; मुळासकट उपटायला आणि जमीनदोस्त करायला, नाश करायला आणि पाडून टाकायला, बांधायला आणि लागवड करायला मी तुला नेमलंय.”+

११ यहोवाकडून मला पुन्हा संदेश मिळाला. तो मला म्हणाला: “यिर्मया, तुला काय दिसतंय?” तेव्हा मी म्हणालो: “मला बदामाच्या झाडाची* एक फांदी दिसत आहे.”

१२ त्यावर यहोवा मला म्हणाला: “तू बरोबर बघितलंस. कारण मी माझा शब्द पूर्ण करायच्या बाबतीत जागृत असतो.”

१३ यहोवाकडून मला दुसऱ्‍यांदा संदेश मिळाला. त्याने मला विचारलं: “तुला काय दिसतंय?” तेव्हा मी म्हणालो: “मला उकळत असलेलं एक मोठं भांडं* दिसतंय. त्याचं तोंड उत्तरेकडून दक्षिणेकडे झुकलेलं आहे.” १४ मग यहोवा मला म्हणाला:

“या देशातल्या सगळ्या लोकांवर उत्तरेकडून एक संकट येईल.+

१५ कारण यहोवा म्हणतो, ‘मी उत्तरेकडच्या राज्यांतल्या सगळ्या घराण्यांना बोलवतोय.+

ते सगळे येतील, आणि त्यांच्यातला प्रत्येक जण यरुशलेमच्या प्रवेशद्वाराजवळ आपलं राजासन मांडेल;+

प्रत्येक जण शहराच्या भिंतीभोवती आणि यहूदाच्या सगळ्या शहरांभोवती आपलं राजासन मांडेल.+

१६ माझ्या लोकांनी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी त्यांच्यावर न्यायदंड बजावीन.

त्यांनी मला सोडून दिलंय,+ आणि ते इतर दैवतांपुढे बलिदानांचं हवन करत आहेत.+

शिवाय ते आपल्या हातांनी बनवलेल्या मूर्तींच्या पाया पडत आहेत.’+

१७ पण तू कार्य करायला तयार हो,

आणि मी जे काही तुला सांगितलंय, ते सगळं त्यांना जाऊन सांग.

त्यांना घाबरू नकोस,+ नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला घाबरवीन.

१८ कारण आज मी तुला या देशाविरुद्ध

मजबूत भिंती असलेल्या शहरासारखं, लोखंडाच्या खांबासारखं आणि तांब्याच्या भिंतींसारखं बनवलंय;+

म्हणजे तू यहूदाच्या राजांचा, तिथल्या अधिकाऱ्‍यांचा, याजकांचा आणि देशातल्या सगळ्या लोकांचा सामना करू शकशील.+

१९ ते तुझ्याशी लढतील, पण ते तुला हरवू शकणार नाहीत.

कारण ‘तुला वाचवायला मी तुझ्यासोबत आहे,’+ असं यहोवा म्हणतो.”

२ यहोवाकडून मला संदेश मिळाला; तो मला म्हणाला: २ “जा आणि यरुशलेमला असं सांग, ‘यहोवा म्हणतो:

“तू तरुण असताना माझ्यावर किती प्रेम* करायचीस ते मला चांगलं आठवतंय.+

तुझं माझ्याशी लग्न ठरलं, तेव्हा तुझं माझ्यावर किती प्रेम होतं!+

ओसाड रानातून, ज्या जमिनीत कधी बी पेरलं गेलं नाही, अशा रानातून तू माझ्या मागे-मागे कशी यायचीस,

हे सगळं मला चांगलं आठवतं.+

 ३ यहोवासाठी इस्राएल पवित्र होता;+ त्याच्यासाठी तो कापणीच्या पहिल्या पिकासारखा होता.”’

‘जो कोणी त्याचं वाईट करायचा तो दोषी ठरायचा,

आणि त्याच्यावर संकट यायचं,’ असं यहोवा म्हणतो.”+

 ४ हे याकोबच्या घराण्या, ऐक!

इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो, यहोवा काय म्हणतो ते ऐका.

 ५ यहोवा असं म्हणतो:

“तुमच्या वाडवडिलांना माझ्यात असा काय दोष दिसला,+ की ते इतके भरकटले आणि माझ्यापासून दूर गेले?

आणि कवडीमोल मूर्तींच्या मागे जाऊन+ स्वतःही कवडीमोल झाले?+

 ६ त्यांनी असं विचारलं नाही, की ‘आम्हाला इजिप्त* देशातून बाहेर आणणारा यहोवा कुठे आहे?+

ज्याने आम्हाला मार्ग दाखवत ओसाड रानातून,

वाळवंटांच्या+ आणि खाचखळग्यांच्या प्रदेशातून,

रुक्ष+ आणि दाट अंधाराच्या प्रदेशातून,

जिथून कोणीही ये-जा करत नाही,

आणि जिथे कोणीही राहत नाही,

अशा प्रदेशातून नेलं, तो कुठे आहे?’

 ७ मी तुम्हाला फळबागांच्या प्रदेशात आणलं,

म्हणजे तुम्हाला तिथला उपज आणि चांगल्या गोष्टी खायला मिळतील.+

पण तुम्ही येऊन माझा देश भ्रष्ट केला;

माझा वारशाचा प्रदेश तुम्ही किळसवाणा केला.+

 ८ याजकांनीही असं विचारलं नाही, की ‘यहोवा कुठे आहे?’+

नियमशास्त्र शिकवण्याची जबाबदारी असलेल्यांनीही मला ओळखलं नाही,

मेंढपाळांनी माझ्याविरुद्ध बंड केलं,+

संदेष्ट्यांनी बआलच्या नावाने भविष्यवाण्या केल्या,+

आणि ते अशा दैवतांच्या नादी लागले ज्यांच्यापासून काहीच फायदा नाही.

 ९ ‘म्हणून मी तुमच्यावर आणखी दोष लावीन,+

आणि तुमच्या मुलांच्या मुलांवरही दोष लावीन,’ असं यहोवा म्हणतो.

१० ‘कित्तीमच्या+ समुद्री-प्रदेशांकडे* जा आणि पाहा.

केदारमध्ये+ माणसं पाठवा आणि कसून चौकशी करा;

आणि असलं काही कधी घडलंय का ते पाहा.

११ कोणत्याही राष्ट्राने आपले देव खरे नसतानाही ते कधी बदलले का?

पण, माझ्या लोकांनी मात्र कवडीमोल देवांसोबत माझ्या वैभवाची अदलाबदल केली.+

१२ हे आकाशा! जे काही घडलं ते पाहून तू चकित हो;

भितीने थरथर काप,’ असं यहोवा म्हणतो.

१३ ‘कारण माझ्या लोकांनी दोन वाईट गोष्टी केल्या आहेत:

त्यांनी मला, जिवंत पाण्याच्या झऱ्‍याला, सोडून दिलंय,+

आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी खणले आहेत.’

१४ ‘इस्राएल हा काय एखाद्या घराण्यात जन्माला आलेला दास किंवा गुलाम आहे का?

मग त्याला लुटारूंच्या हाती का देण्यात आलं?

१५ तरुण सिंह त्याच्यावर गर्जना करतात,+

त्यांनी त्याच्यावर आपला आवाज चढवलाय.

त्यांनी त्याच्या देशाची अशी अवस्था केली आहे, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसते.

त्याच्या शहरांना आग लावण्यात आली आहे, आणि एकही माणूस तिथे राहत नाही.

१६ नोफ*+ आणि तहपन्हेस+ इथले लोक तुझ्या डोक्यावरचे केस खाऊन तुला टकलं करतात.

१७ तुझा देव यहोवा तुला मार्ग दाखवत होता,

तेव्हा तू त्याला सोडून दिलंस.+

असं करून तू स्वतःवरच हे संकट ओढवून घेतलं नाहीस का?

१८ आता तुला इजिप्तला जाऊन शीहोरचं* पाणी का प्यायचंय?+

तुला अश्‍शूरला जाऊन फरात नदीचं पाणी का प्यायचंय?+

१९ तुझ्या दुष्टपणातूनच तू धडा शिकायला हवास,

आणि तुझ्या अविश्‍वासूपणानेच तुझं ताडन करायला हवं.

तुझा देव यहोवा याला सोडून देणं हे किती वाईट आहे,

आणि त्याचे परिणाम किती भयानक आहेत हे तू समजून घे.+

तुला माझी जरासुद्धा भीती वाटली नाही,’+ असं सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

२० ‘फार पूर्वीच मी तुझं जोखड* मोडून टाकलं,+

आणि तुझ्या बेड्या तोडून टाकल्या.

पण तू म्हणालीस: “मला नाही करायची तुझी सेवा.”

तू प्रत्येक उंच टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली+

पसरायचीस आणि वेश्‍येची कामं करायचीस.+

२१ मी जेव्हा तुला जमिनीत लावलं, तेव्हा तू उत्तम बियांपासून उगवलेली उत्कृष्ट लाल द्राक्षवेल होतीस.+

मग आता तू माझ्यासमोर एका परक्या द्राक्षवेलीच्या सडलेल्या फांद्यांसारखी कशी बनलीस?’+

२२ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, की ‘तू स्वतःला कितीही साबण लावलास आणि सोड्याने स्वतःला कितीही धुतलंस,

तरी तुझ्या दोषाचा डाग माझ्यासमोर तसाच राहील.’+

२३ तू कोणत्या तोंडाने असं म्हणतेस, की ‘मी स्वतःला अशुद्ध केलं नाही,

आणि मी बआलांच्या नादी लागले नाही’?

खोऱ्‍यात* तू काय-काय केलंस ते जरा बघ.

तू कोण-कोणती कामं केलीस त्यांचा जरा विचार कर.

तू इकडून तिकडे सैरावैरा धावणाऱ्‍या एका चपळ, तरुण उंटिणीसारखी आहेस.

२४ तू अशा एका रानगाढवीसारखी आहेस, जिला ओसाड रानात राहायची सवय आहे.

ती उत्तेजित झाली की वारा हुंगते.

तिची लैंगिक इच्छा तीव्र होते तेव्हा तिला कोण रोखू शकतं?

तिला शोधणाऱ्‍या नरांना जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत,

कारण तिच्या ऋतूत ती त्यांना सहज सापडते.

२५ तुझे पाय झिजू देऊ नकोस,

आणि तुझा घसा कोरडा पडू देऊ नकोस.

पण तू म्हणालीस, ‘नाही, आता हे शक्य नाही.+

मी परक्यांच्या* प्रेमात पडले आहे,+

आणि मी त्यांच्याच मागे जाईन.’+

२६ चोरी पकडली गेल्यावर चोराला जसं लज्जित केलं जातं,

तसं इस्राएलच्या घराण्याला लज्जित करण्यात आलंय.

त्यांना, त्यांच्या राजांना आणि अधिकाऱ्‍यांना;

त्यांच्या याजकांना आणि संदेष्ट्यांना लज्जित करण्यात आलंय.+

२७ ते झाडाला म्हणतात, ‘तू माझा बाप आहेस,’+

आणि दगडाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’

पण माझ्याकडे ते पाठ फिरवतात; ते माझ्याकडे पाहत नाहीत.+

त्यांच्यावर संकट येईल तेव्हा मात्र ते म्हणतील,

‘आम्हाला येऊन वाचव!’+

२८ तू स्वतःसाठी बनवलेले देव आता कुठे गेले?+

त्यांना जर शक्य असेल, तर तुझ्या संकटाच्या काळात त्यांनी येऊन तुला वाचवावं,

कारण हे यहूदा, तुझ्या देवांची संख्या तुझ्या शहरांइतकीच भरमसाठ झाली आहे.+

२९ यहोवा म्हणतो: ‘तुम्ही सतत माझ्याशी वाद का घालता?

तुम्ही सगळ्यांनी माझ्याविरुद्ध बंड का केलंय?’+

३० मी तुमच्या मुलांना शिक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.+

त्यांनी माझी शिस्त स्वीकारली नाही;+

चवताळलेल्या सिंहासारखं तुम्ही स्वतःच तुमच्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकलं.+

३१ या पिढीच्या लोकांनो, यहोवाच्या वचनाकडे लक्ष द्या.

मी इस्राएलसाठी ओसाड रानासारखा,

किंवा भयंकर काळोखासारखा झालोय का?

या लोकांनी, माझ्या स्वतःच्या लोकांनी असं का म्हटलं, की ‘आम्हाला पाहिजे तिथे आम्ही जाऊ;

आम्ही पुन्हा कधी तुझ्याकडे येणार नाही’?+

३२ कुमारी कधी आपले दागिने विसरू शकते का?

नवरी कधी आपला पट्टा* घालायला विसरू शकते का?

पण माझे स्वतःचे लोक मात्र कितीतरी दिवसांपासून मला विसरून गेले आहेत.+

३३ हे स्त्री, तू किती चलाखीने पुरुषांना आपल्या प्रेमात अडकवतेस!

दुष्टपणे कसं वागायचं हे तू चांगलं शिकून घेतलं आहेस.+

३४ तुझ्या अंगातला झगासुद्धा गरीब आणि निरपराध लोकांच्या रक्‍ताने डागाळलेला आहे,+

मी त्यांना तुझ्या घरात घुसून चोरी करताना पाहिलं नाही,

तरीसुद्धा तुझ्या कपड्यांवर मला त्यांच्या रक्‍ताचे डाग दिसतात.+

३५ असं असूनही तू म्हणतेस, की ‘मी निर्दोष आहे.

आणि माझ्यावरचा त्याचा राग नक्कीच शांत झालाय.’

पण आता मी तुझ्यावर न्यायदंड बजावीन,

कारण तू म्हणतेस, ‘मी कोणतंच पाप केलेलं नाही.’

३६ तुझ्या या चंचल वृत्तीचं तुला काहीच कसं वाटत नाही?

तू अश्‍शूरमुळे जशी लज्जित झालीस,+

तशीच इजिप्तमुळेही लज्जित होशील.+

३७ आणि तू आपल्या डोक्यावर हात ठेवून शरमेने निघून जाशील.+

कारण ज्यांच्यावर तू भरवसा ठेवला होतास, त्यांना यहोवाने नाकारलंय;

त्यांच्यामुळे तू कधीच यशस्वी होणार नाहीस.”

३ लोक म्हणतात: “एखाद्या माणसाने आपल्या बायकोला सोडून दिलं आणि तिने जाऊन दुसऱ्‍या माणसाशी लग्न केलं, तर तिच्या पहिल्या नवऱ्‍याने परत तिच्याकडे जावं का?”

हा देश खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्ट झाला आहे.+

यहोवा म्हणतो, “तू तुझ्या अनेक प्रियकरांसोबत व्यभिचार केलाय,+

आणि आता तू परत माझ्याकडे यावं का?

 २ आपली नजर वर कर आणि उजाड टेकड्यांकडे बघ!

अशी एकतरी जागा उरली आहे का, जिथे तुझी अब्रू लुटली गेली नाही?

तू रस्त्याच्या कडेला आपल्या प्रियकरांची अशी वाट पाहत बसतेस,

जसं ओसाड रानात अरबी माणूस बसतो.

तू व्यभिचाराने आणि दुष्ट कामाने,

संपूर्ण देश भ्रष्ट करून टाकतेस.+

 ३ म्हणून पावसाच्या सरी रोखून ठेवण्यात आल्या आहेत,+

आणि वसंत ऋतूत पाऊस पडलेला नाही.

व्यभिचार करूनसुद्धा तोंडावर शरमेचे कसलेच भाव नसलेल्या बायकोसारखी तू आहेस;

तुला अजिबात लाज वाटत नाही.+

 ४ आणि आता तू मला हाक मारून म्हणतेस,

‘माझ्या पित्या, माझ्या तरुणपणापासून तूच माझा साथीदार आहेस!+

 ५ कोणी कायम मनात राग धरतो का?

कोणी नेहमी मनात कटुता बाळगतो का?’

तू असं बोलतेस खरं,

पण तुला जितकी वाईट कामं करता येतात, तितकी तू करत राहतेस.”+

६ योशीया+ राजाच्या काळात, यहोवा मला म्हणाला: “‘या अविश्‍वासू स्त्रीने, इस्राएलने काय-काय केलंय हे तू पाहिलंस का? तिने प्रत्येक उंच डोंगरावर जाऊन आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली जाऊन व्यभिचार केलाय.+ ७ तिने इतकी वाईट कामं करूनसुद्धा मी तिला माझ्याकडे बोलवत राहिलो.+ पण ती काही माझ्याकडे परत आली नाही. आणि यहूदा आपल्या या विश्‍वासघातकी बहिणीचं वागणं बघत होती.+ ८ मी हे पाहिलं, तेव्हा अविश्‍वासू इस्राएलला मी सोडचिठ्ठी+ देऊन पाठवून दिलं. कारण तिने व्यभिचार केला.+ पण तिची विश्‍वासघातकी बहीण यहूदा ही मात्र घाबरली नाही. तिनेसुद्धा जाऊन व्यभिचार केला.+ ९ तिने आपल्या व्यभिचाराला हलकं समजलं. ती देश भ्रष्ट करत राहिली, आणि दगडांची व झाडांची पूजा करून व्यभिचार करत राहिली.+ १० एवढं सगळं होऊनही, तिची विश्‍वासघातकी बहीण यहूदा पूर्ण मनाने माझ्याकडे परत वळली नाही; माझ्याकडे परत येत असल्याचा तिने फक्‍त दिखावा केला,’ असं यहोवा म्हणतो.”

११ मग यहोवा मला म्हणाला: “विश्‍वासघातकी यहूदाच्या मानाने अविश्‍वासू इस्राएल कमी दोषी आहे.+ १२ म्हणून आता तू उत्तरेकडे जा आणि अशी घोषणा कर:+

‘यहोवा म्हणतो, “हे बंडखोर इस्राएल, माझ्याकडे परत ये.”’+ ‘“मी तुझ्याकडे रागाने बघणार नाही.+ कारण मी एकनिष्ठ देव आहे,” असं यहोवा म्हणतो.’ ‘“मी तुझ्याबद्दल कायम मनात राग धरणार नाही. १३ तू फक्‍त आपले अपराध कबूल कर. कारण तू तुझ्या देवाविरुद्ध, यहोवाविरुद्ध बंड केलंय. तू प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली परक्यांसोबत* संबंध ठेवलेस, आणि माझं ऐकलं नाहीस,” असं यहोवा म्हणतो.’”

१४ “बंडखोर मुलांनो, माझ्याकडे परत या,” असं यहोवा म्हणतो. “मीच तुमचा खरा मालक* आहे. मी प्रत्येक शहरातून एक आणि प्रत्येक घराण्यातून दोन असं तुम्हाला गोळा करीन, आणि सीयोनमध्ये घेऊन येईन.+ १५ मी तुम्हाला असे मेंढपाळ देईन, जे माझ्या इच्छेप्रमाणे वागतील.+ ते तुम्हाला चारा म्हणून ज्ञान आणि सखोल समज देतील. १६ त्या दिवसांत, तुमची संख्या वाढत जाईल आणि तुम्ही अगणित व्हाल,” असं यहोवा म्हणतो.+ “यापुढे पुन्हा कधी तुम्ही ‘यहोवाच्या कराराची पेटी!’ असं म्हणणार नाही. तुम्हाला त्या पेटीची कधी आठवण होणार नाही, तुम्हाला तिची कमी भासणार नाही किंवा तिचा विचार परत कधी तुमच्या मनात येणार नाही. आणि ती पेटी परत कधी बनवली जाणार नाही. १७ त्या वेळी, यरुशलेमला यहोवाचं राजासन म्हटलं जाईल.+ आणि सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांना यहोवाच्या नावाचा गौरव करायला यरुशलेममध्ये एकत्र केलं जाईल.+ पुन्हा कधी ते आपल्या हट्टी आणि दुष्ट मनाप्रमाणे वागणार नाहीत.”

१८ “त्या दिवसांत, यहूदाचं घराणं आणि इस्राएलचं घराणं एकत्र मिळून चालेल.+ मी तुमच्या वाडवडिलांना वारसा म्हणून जो देश दिला होता, त्यात ते उत्तरेकडच्या देशातून सोबत मिळून येतील.+ १९ मी विचार केला होता, की ‘मी तुला माझ्या मुलांमध्ये स्थान देईन आणि तुला राष्ट्रांमधला सगळ्यात सुंदर देश वारसा म्हणून देईन.’+ मला असंही वाटलं होतं, की तू मला पिता म्हणून हाक मारशील, आणि माझ्यामागे चालायचं सोडणार नाहीस. २० ‘पण हे इस्राएल, एखादी बायको जशी आपल्या नवऱ्‍याचा विश्‍वासघात करून त्याला सोडून जाते, तसं तूही माझा विश्‍वासघात केला आहेस,’+ असं यहोवा म्हणतो.”

२१ उजाड टेकड्यांवर आवाज ऐकू येत आहे,

इस्राएली लोकांच्या रडण्याचा आणि विनवणी करण्याचा तो आवाज आहे.

कारण त्यांनी वाकडा मार्ग निवडला आहे,

आणि ते आपल्या देवाला, यहोवाला विसरून गेले आहेत.+

२२ “हे बंडखोर मुलांनो, माझ्याकडे परत या.

मी तुम्हाला बरं करीन आणि पुन्हा कधीच तुम्ही बंडखोरपणे वागणार नाहीत.”+

“बघ, आम्ही तुझ्याकडे परत आलो आहोत.

कारण हे यहोवा, तू आमचा देव आहेस.+

२३ टेकड्यांवरचा आणि डोंगरांवरचा गोंधळ हा सगळा खोटा ठरलाय.+

खरंच, आमचा देव यहोवा हाच इस्राएलचं तारण करणारा आहे.+

२४ पण, आमच्या तरुणपणापासून त्या लज्जास्पद दैवताने आमच्या वाडवडिलांनी केलेली सगळी मेहनत खाऊन टाकली आहे;+

त्याने त्यांचे कळप आणि गुरंढोरं,

त्यांची मुलं आणि मुली हे सगळं खाऊन टाकलं आहे.

२५ आपण लज्जित होऊन खाली लोळायला हवं,

आणि स्वतःला आपल्या बदनामीने झाकायला हवं.

कारण आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत,

आपण आणि आपल्या वडिलांनी+ आपला देव यहोवा याच्याविरुद्ध पाप केलंय.+

शिवाय आपण आपल्या देवाचं, यहोवाचं ऐकलेलं नाही.”

४ यहोवा म्हणतो: “हे इस्राएल, तू जर परत फिरशील,

माझ्याकडे परत येशील,

आणि तुझ्या घृणास्पद मूर्ती माझ्यासमोरून काढून टाकशील,

तर तुला भटकत राहावं लागणार नाही.+

 २ आणि ‘यहोवाच्या जीवनाची शपथ,’ असं म्हणून शपथ घेताना तू जर ती खरेपणाने, न्यायाने आणि नीतीने घेशील,

तर राष्ट्रांना त्याच्याकडून आशीर्वाद मिळेल,

आणि त्याच्यामुळे ते अभिमानाने बोलतील.”+

 ३ कारण यहूदाच्या आणि यरुशलेमच्या माणसांना यहोवा म्हणतो:

“सुपीक जमीन नांगरा,

काट्याकुट्यांत पेरणी करत बसू नका.+

 ४ हे यहूदाच्या आणि यरुशलेमच्या माणसांनो,

यहोवासाठी स्वतःची सुंता* करा,

आपल्या अंतःकरणाची सुंता करा.+

नाहीतर तुमच्या दुष्ट कामांमुळे,

माझा क्रोध तुमच्यावर आगीसारखा भडकेल;

तो असा पेटेल, की कोणालाही तो शांत करता येणार नाही.”+

 ५ यहूदामध्ये घोषणा करा आणि यरुशलेममध्ये जाहीर करा.

देशभरात रणशिंग फुंका आणि मोठ्याने ओरडा.+

मोठ्या आवाजात अशी घोषणा करा:

“एकत्र या, आपण सगळे तटबंदी असलेल्या शहरांत पळून जाऊ.+

 ६ निशाणी म्हणून सीयोनच्या दिशेने झेंडा उभारा.

हातावर हात ठेवून बसू नका,

आश्रयाची जागा शोधा.”

कारण मी उत्तरेकडून संकट आणत आहे;+

मी एक मोठा विनाश आणत आहे.

 ७ राष्ट्रांचा नाश करणारा बाहेर पडला आहे,+

तो सिंहासारखा दाट झाडाझुडपांतून बाहेर पडला आहे.+

तो तुझ्या देशाची अशी अवस्था करायला निघाला आहे, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल.

तुझी शहरं उद्ध्‌वस्त केली जातील, आणि त्यांत एकही रहिवासी उरणार नाही.+

 ८ म्हणून गोणपाट घाला,+

आणि शोक* व आक्रोश करा,

कारण आपल्यावर भडकलेला यहोवाचा राग अजून शांत झालेला नाही.

 ९ यहोवा म्हणतो: “त्या दिवशी राजाचं धैर्य खचेल,+

त्याच्या अधिकाऱ्‍यांचंही धैर्य खचेल.

याजक घाबरून जातील आणि संदेष्ट्यांना आश्‍चर्याचा धक्का बसेल.”+

१० मग मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! तू या लोकांना आणि यरुशलेमला पूर्णपणे फसवलंस.+ तलवार आमच्या मानेवर असताना तू म्हणालास, की ‘तुम्हाला शांती मिळेल.’”+

११ त्या वेळी या लोकांना आणि यरुशलेमला असं सांगितलं जाईल:

“वाळवंटातल्या उजाड टेकड्यांवरून येणारा जोरदार उष्ण वारा,

माझ्या मुलीवर,* माझ्या लोकांवर वाहील;

पण तो वारा धान्यापासून भुसा वेगळा करायला किंवा धान्य स्वच्छ करायला येणार नाही.

१२ हा जोरदार वारा माझ्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणांवरून येतोय.

आता मी माझ्या लोकांवर न्यायदंड बजावीन.

१३ पाहा! तो पावसाच्या ढगांसारखा येईल,

त्याचे रथ वादळी वाऱ्‍यासारखे आहेत.+

त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत.+

आता आपलं काही खरं नाही! आपला नाश निश्‍चित आहे!

१४ हे यरुशलेम, तुला जर आपला जीव वाचवायचा असेल,

तर आपल्या मनातला दुष्टपणा काढून टाक आणि आपलं मन शुद्ध कर.+

तू आणखी किती दिवस आपल्या मनात दुष्ट विचार बाळगत राहशील?

१५ कारण दानकडून एक आवाज बातमी जाहीर करतोय,+

तो एफ्राईमच्या डोंगरांतून संकटाची घोषणा करतोय.

१६ ही गोष्ट राष्ट्रांना सांगा;

यरुशलेममध्ये याची घोषणा करा.”

“एका दूरच्या देशातून हेर* येत आहेत,

ते येऊन यहूदाच्या शहरांविरुद्ध मोठ्याने युद्धाची घोषणा करतील.

१७ ते शेतांची राखण करणाऱ्‍यांसारखे चारही बाजूंनी येत आहेत,+

कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केलंय,”+ असं यहोवा म्हणतो.

१८ “तुला तुझ्या स्वतःच्या वागणुकीचे आणि कामांचे परिणाम भोगावे लागतील.+

तुझा बंडखोरपणा तुझ्या मनात अगदी खोलवर रुजलेला आहे,

म्हणून तुझ्यावर येणारं संकट फार भयंकर असेल!”

१९ मी फार दुःखी आहे! खरंच मी फार दुःखी आहे!

माझ्या मनाला भयंकर वेदना होत आहेत.

माझं हृदय धडधडतय.

मी शांत बसू शकत नाही,

कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकलाय,

मी युद्धाची घोषणा ऐकली आहे.*+

२० एकापाठोपाठ एक संकट कोसळत असल्याची बातमी येत आहे,

संपूर्ण देशाचा नाश झालाय.

माझे तंबू एकाएकी जमीनदोस्त झाले आहेत,

एका क्षणात माझे तंबू खाली पडले आहेत.+

२१ सीयोनच्या दिशेने उभारलेल्या झेंड्याकडे मी किती वेळ पाहत बसू?

रणशिंगाचा आवाज मी किती वेळ ऐकत राहू?+

२२ “माझे लोक मूर्ख आहेत;+

ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत.

ती मूर्ख मुलं आहेत; त्यांना काहीच समजत नाही.

वाईट गोष्टी करण्याच्या बाबतीत ते हुशार* आहेत,

पण चांगल्या गोष्टी कशा करायच्या हे मात्र त्यांना माहीत नाही.”

२३ मी देशाकडे पाहिलं, तेव्हा तो मला रिकामा आणि ओसाड पडलेला दिसला.+

मी वर आकाशाकडे पाहिलं, तर तिथे मला प्रकाश दिसला नाही.+

२४ मी डोंगरांकडे पाहिलं, तर ते हादरत होते,

आणि टेकड्या थरथर कापत होत्या.+

२५ मी पाहिलं, तेव्हा मला एकही माणूस दिसला नाही,

आकाशातले सगळे पक्षीही उडून गेले होते.+

२६ मी पाहिलं, तेव्हा फळबाग ओसाड रान बनली होती,

आणि तिची सगळी शहरं जमीनदोस्त झाली होती.+

हे सगळं यहोवामुळे,

त्याच्या जळजळीत क्रोधामुळे झालं होतं.

२७ कारण यहोवा म्हणतो: “सगळा देश ओसाड पडेल,+

पण मी त्याचा पूर्णपणे नाश करणार नाही.

२८ यामुळे देश शोक करेल,+

आणि वर आकाशात काळोख पसरेल.+

मी स्वतः हे बोललोय,

मी स्वतः हे ठरवलंय,

आणि यामुळेच असं घडेल.

मी माझं मन बदलणार नाही* किंवा मी जे बोललोय ते केल्याशिवाय राहणार नाही.+

२९ घोडेस्वारांचा आणि तिरंदाजांचा आवाज ऐकताच,

शहरातले सगळे लोक पळून जातात.+

ते दाट झाडाझुडपांत शिरतात,

आणि खडकांवर चढतात.+

प्रत्येक शहर ओसाड पडलंय,

त्यात एकही माणूस राहत नाही.”

३० तुझा तर नाश झालाय, आता तू काय करशील?

पूर्वी तू गडद लाल रंगाचे कपडे घालायचीस,

स्वतःला सोन्याच्या दागिन्यांनी सजवायचीस,

आणि डोळ्यांना काजळ लावायचीस.

पण तुझं हे सगळं नटणं व्यर्थ आहे,+

कारण आपल्या वासना तृप्त करण्यासाठी तुझ्या मागे येणाऱ्‍यांनी तुला झिडकारलंय,

आणि आता ते तुझा जीव घ्यायला टपले आहेत.+

३१ कारण वेदनेने तळमळणाऱ्‍या स्त्रीच्या आवाजासारखा आवाज मी ऐकलाय,

पहिल्या मुलाला जन्म देणाऱ्‍या स्त्रीच्या ओरडण्याच्या आवाजासारखा आवाज मी ऐकलाय,

धापा टाकणाऱ्‍या सीयोनच्या मुलीचा आवाज मी ऐकलाय.

ती आपले हात पसरून म्हणत आहे:+

“माझ्यावर ही कोणती वेळ आली आहे! माझा जीव घेणाऱ्‍यांमुळे मी पार दमून गेले आहे!”

५ यरुशलेमच्या रस्त्यांवरून फिरा,

आजूबाजूला लक्ष देऊन पाहा,

तिच्या सगळ्या चौकांमध्ये शोधा,

न्यायाने वागणारा आणि विश्‍वासू राहण्याचा प्रयत्न करणारा एकतरी माणूस तिच्यात सापडतो का ते पाहा;+

एक जरी सापडला तर मी तिला माफ करीन.

 २ “यहोवाच्या जीवनाची शपथ!” असं जरी ते म्हणत असले,

तरी त्यांची शपथ खोटीच आहे.+

 ३ हे यहोवा, तुझे डोळे नेहमी विश्‍वासू लोकांना शोधत नाहीत का?+

तू तुझ्या लोकांना शिक्षा केलीस, पण त्यांना काहीच फरक पडला नाही.*

तू त्यांचा जवळजवळ नाशच केला, तरी त्यांनी त्यातून धडा घेतला नाही.+

उलट त्यांनी आपली तोंडं खडकापेक्षा कठीण केली,+

आणि ते आपल्या मार्गापासून फिरले नाहीत.+

 ४ पण मी मनात म्हणालो: “हे सामान्य लोक आहेत.

ते मूर्खांसारखे वागतात कारण त्यांना यहोवाचे मार्ग माहीत नाहीत;

त्यांना आपल्या देवाचे नीती-नियम माहीत नाहीत.

 ५ म्हणून मी प्रतिष्ठित माणसांकडे जाऊन त्यांच्याशी बोलतो,

कारण त्यांनी नक्कीच यहोवाच्या मार्गाची दखल घेतली असेल;

त्यांना देवाचे नीती-नियम नक्कीच माहीत असतील.+

पण, या सगळ्यांनी आपलं जोखड मोडून टाकलं होतं,

आणि आपली बंधनं झुगारून दिली होती.”

 ६ त्यामुळेच जंगलातला सिंह त्यांच्यावर हल्ला करतो,

रानातला लांडगा त्यांना फाडत राहतो,

आणि त्यांच्यावर हल्ला करायला चित्ता शहरांजवळ टपून बसतो.

त्या शहरांतून बाहेर पडणाऱ्‍या प्रत्येकाचे तुकडे-तुकडे केले जातात.

कारण त्यांनी खूप अपराध केले आहेत,

आणि ते फार अविश्‍वासूपणे वागले आहेत.+

 ७ या सगळ्यासाठी मी तुला कसं माफ करू?

तुझ्या मुलांनी मला सोडून दिलंय,

आणि जे मुळात देव नाहीत, त्यांच्या नावाने ते शपथ घेतात.+

मी त्यांच्या गरजा भागवल्या,

पण ते व्यभिचार करत राहिले,

आणि झुंडीने वेश्‍येच्या घराकडे जात राहिले.

 ८ ते उत्तेजित झालेल्या घोड्यांसारखे,

लैंगिक इच्छा तीव्र झालेल्या घोड्यांसारखे आहेत;

प्रत्येक जण दुसऱ्‍याच्या बायकोला पाहून खिंकाळतो.+

 ९ “या सगळ्या गोष्टींचा मी त्यांच्याकडे हिशोब मागायला नको का?

या असल्या राष्ट्रावर मी सूड उगवायला नको का?” असं यहोवा म्हणतो.+

१० “उतारांवरच्या तिच्या द्राक्षमळ्यांवर हल्ला करून त्यांची नासधूस करा,

पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका.+

तिच्या कोवळ्या फांद्या छाटून टाका,

कारण त्या यहोवाच्या नाहीत.

११ कारण इस्राएलच्या घराण्याने आणि यहूदाच्या घराण्याने,

माझा खूप मोठा विश्‍वासघात केलाय,” असं यहोवा म्हणतो.+

१२ “त्यांनी यहोवाला नाकारलंय,

आणि ते सारखं असं बोलत असतात:

‘तो काहीच करणार नाही,*+

आपल्यावर कोणतंही संकट येणार नाही,

आपल्या वाट्याला कधीच युद्ध किंवा दुष्काळ येणार नाही.’+

१३ संदेष्ट्यांच्या हृदयात देवाचं वचन नाही,

ते पोकळ गोष्टी बोलतात.

त्यांच्या पोकळ गोष्टींसारखंच तेही नाहीसे होतील.”

१४ म्हणून सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“हे लोक असं बोलतात म्हणून पाहा!

तुझ्या मुखातून निघणारे माझे शब्द मी आगीसारखे करतोय,+

आणि या लोकांना मी लाकडासारखं बनवतोय.

तुझ्या मुखातली आग त्यांना भस्म करून टाकेल.”+

१५ यहोवा म्हणतो, “हे इस्राएलच्या घराण्या, पाहा! मी एका दूरच्या राष्ट्राला तुझ्यावर हल्ला करायला आणतोय.+

ते बऱ्‍याच वर्षांपासून अस्तित्वात असलेलं एक प्राचीन राष्ट्र आहे.

त्यांची भाषा तुला येत नाही,

आणि त्यांची बोली तुला समजत नाही.+

१६ ते सगळे शूर योद्धे आहेत;

त्यांच्या बाणांचा भाता उघड्या कबरेसारखा आहे.

१७ ते तुझं सगळं पीक आणि भाकर खाऊन टाकतील.+

ते तुझ्या मुला-मुलींना मारून टाकतील.

तुझ्या कळपांचा आणि गुराढोरांचा,

तुझ्या द्राक्षवेलींचा आणि अंजिराच्या झाडांचा ते नाश करतील.

ज्या तटबंदी शहरांवर तुझा भरवसा आहे, त्यांचाही ते तलवारीने नाश करतील.”

१८ यहोवा म्हणतो, “पण तेव्हासुद्धा मी तुमचा पूर्णपणे नाश होऊ देणार नाही.+ १९ आणि जेव्हा ते असं विचारतील, की ‘आमचा देव यहोवा याने आमच्यासोबत हे सगळं का घडू दिलं?’ तेव्हा तू त्यांना सांग, ‘तुम्ही जसं मला सोडून तुमच्या देशात परक्या देवाची सेवा केली, तशी आता तुम्ही परक्या देशात विदेशी लोकांची सेवा कराल.’”+

२० याकोबच्या घराण्यात ही गोष्ट जाहीर करा,

आणि यहूदात अशी घोषणा करा:

२१ “मूर्ख आणि अक्कलशून्य लोकांनो, ऐका!+

तुम्हाला डोळे आहेत, पण तुम्ही पाहू शकत नाहीत;+

तुम्हाला कान आहेत, पण तुम्ही ऐकू शकत नाहीत.+

२२ यहोवा म्हणतो, ‘तुम्हाला माझी जराही भीती वाटत नाही का?

खरंतर तुम्ही माझ्यासमोर थरथर कापायला हवं.

मी वाळूला समुद्राची सीमा म्हणून नेमलंय,

समुद्राने ती ओलांडू नये, म्हणून मी वाळूला कायम तिथे राहायचा नियम लावून दिलाय.

समुद्राच्या लाटा कितीही उसळल्या, तरी त्यांचं काही चालत नाही,

त्यांनी कितीही गर्जना केली, तरी त्या सीमा पार करू शकत नाही.+

२३ पण या लोकांचं मन हट्टी आणि बंडखोर आहे;

त्यांनी मला सोडून दिलंय आणि ते स्वतःच्या मार्गाने चालत आहेत.+

२४ ते आपल्या मनात असं म्हणत नाहीत:

“आता आपण आपला देव यहोवा याचं भय बाळगू या,

तोच आपल्याला योग्य वेळी पाऊस देतो,

पानझडीचा आणि वसंत ऋतूचा पाऊस तोच आपल्याला देतो.

आणि तोच आपल्यासाठी कापणीचे आठवडे राखून ठेवतो.”+

२५ तुमच्या स्वतःच्या अपराधांमुळेच तुम्हाला या गोष्टी लाभल्या नाहीत.

तुमच्या स्वतःच्या पापांनीच तुम्हाला चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवलंय.+

२६ कारण माझ्या लोकांमध्ये काही दुष्ट माणसं आहेत.

टपून बसणाऱ्‍या फासेपारध्यांप्रमाणे ते नजर ठेवून असतात.

ते जीवघेणा सापळा लावतात,

आणि माणसांची शिकार करतात.

२७ पक्ष्यांनी भरलेल्या पिंजऱ्‍यासारखी,

त्यांची घरं लुटीच्या मालाने भरली आहेत.+

आणि त्यामुळे ते श्रीमंत आणि ताकदवान झाले आहेत.

२८ ते खाऊनपिऊन लठ्ठ झाले आहेत आणि त्यांची त्वचा तुकतुकीत झाली आहे.

दुष्टपणा त्यांच्यातून ओसंडून वाहतो.

आपला फायदा व्हावा म्हणून,

ते अनाथ मुलांना* न्याय देत नाहीत;+

आणि गरिबांनासुद्धा ते न्याय नाकारतात.’”+

२९ यहोवा म्हणतो, “या सगळ्या गोष्टींचा मी त्यांच्याकडे हिशोब मागायला नको का?

या असल्या राष्ट्रावर मी सूड उगवायला नको का?

३० देशात काहीतरी धक्कादायक आणि भयंकर घडलंय:

३१ संदेष्टे खोट्या भविष्यवाण्या करतात,+

याजक इतरांवर अधिकार गाजवतात,

आणि हे सगळं माझ्या लोकांना आवडतं.+

पण अंत येईल तेव्हा तुम्ही काय कराल?”

६ हे बन्यामीनच्या मुलांनो, यरुशलेमपासून दूर कुठेतरी आश्रय घ्या.

तकोवामध्ये+ रणशिंग फुंका,+

बेथ-हक्करेममध्ये निशाणी म्हणून आग पेटवा!

कारण उत्तरेकडून एक मोठं संकट येत आहे,

एक मोठा विनाश तिथून येत आहे.+

 २ सीयोनची मुलगी एका नाजूक, सुंदर स्त्रीसारखी आहे.+

 ३ मेंढपाळ आपले कळप घेऊन येतील.

ते तिच्या सभोवती आपले तंबू ठोकतील,+

आणि प्रत्येक मेंढपाळ तिथे आपला कळप चारेल.+

 ४ “तिच्याशी युद्ध करायची तयारी करा!

चला, आपण भरदुपारी तिच्यावर हल्ला करू!”

“अरेरे! पण दिवस तर मावळत आलाय,

आणि अंधार होऊ लागलाय!”

 ५ “मग चला, आपण रात्री तिच्यावर हल्ला करू,

आणि तिचे तटबंदी मनोरे* पाडून टाकू.”+

 ६ कारण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“यरुशलेमवर हल्ला करायला झाडं कापा आणि त्यांपासून तिच्याभोवती चढ तयार करा.+

या शहराकडून हिशोब घेतला जाईल;

कारण जाच-जुलमाशिवाय तिच्यात काहीच नाही.+

 ७ विहिरीतून जसं नेहमी ताजं* पाणी येत राहतं,

तसं या नगरीत नेहमी दुष्टपणाची नवनवीन कामं घडत राहतात.

तिच्यातून हिंसेचा आणि नाशाचा आवाज ऐकू येतो;+

तिथे मला सतत रोगराई आणि पीडा दिसते.

 ८ हे यरुशलेम, भानावर ये!

नाहीतर मला तुझी किळस येऊन मी तुझ्यापासून तोंड फिरवीन;+

मी तुला ओसाड करून टाकीन;

तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.”+

 ९ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“द्राक्षवेलीवरून जसं उरलेली द्राक्षं गोळा करून नेतात,

तसं इस्राएलमधल्या उरलेल्या लोकांना नेलं जाईल; एकही मागे उरणार नाही.

आपला हात पुन्हा पुढे करून द्राक्षवेलींवरून द्राक्षं गोळा कर.”

१० “मी कोणाला सांगू? कोणाला इशारा देऊ? कोण माझं ऐकेल?

पाहा! त्यांचे कान बंद आहेत, म्हणून ते लक्ष देत नाहीत.+

पाहा! ते यहोवाच्या वचनाची थट्टा करतात;+

त्यांना ते वचन अजिबात आवडत नाही.

११ म्हणून यहोवाच्या क्रोधाची आग माझ्यात पेटली आहे,

मी ती आणखी आवरून धरू शकत नाही.”+

“रस्त्यावरच्या मुलावर, एकत्र जमलेल्या तरुण मुलांवर ती ओतून टाक.+

त्या सगळ्यांना बंदी बनवलं जाईल;

नवरा आणि बायको,

म्हातारे आणि जख्ख म्हातारे,

अशा सगळ्यांना बंदी बनवलं जाईल.+

१२ त्यांची घरं दुसऱ्‍यांना दिली जातील,

त्यांची शेतीवाडी आणि त्यांच्या बायकाही दुसऱ्‍यांना दिल्या जातील.+

कारण मी देशातल्या लोकांवर आपला हात उगारीन,” असं यहोवा म्हणतो.

१३ “कारण लहानापासून मोठ्यापर्यंत, प्रत्येक जण बेइमानी करून धन कमवतोय;+

संदेष्ट्यापासून याजकापर्यंत, प्रत्येक जण दुसऱ्‍यांची फसवणूक करतोय.+

१४ ते माझ्या लोकांचं मोडलेलं हाड वरवर जोडायचा प्रयत्न करतात,

आणि काहीही बरोबर नसताना, ‘सगळं ठीक आहे! सगळं ठीक आहे!’ असं म्हणतात.+

१५ आपण केलेल्या घृणास्पद गोष्टींची त्यांना लाज वाटते का?

नाही! त्यांना मुळीच लाज वाटत नाही!

मुळात लाज काय असते, हेसुद्धा त्यांना माहीत नाही!+

म्हणूनच नाश झालेल्यांसोबत त्यांचाही नाश होईल.

मी त्यांना शिक्षा करीन, तेव्हा ते ठेच लागून खाली पडतील,” असं यहोवा म्हणतो.

१६ यहोवा म्हणतो:

“चौकात उभे राहा आणि पाहा.

जुन्या काळातल्या मार्गांबद्दल विचारा,

चांगला मार्ग कोणता आहे ते विचारा आणि त्यावरून चाला,+

आपल्या जिवाला विश्रांती द्या.”

पण लोक म्हणतात: “आम्ही नाही चालणार त्या मार्गावर.”+

१७ “मी पहारेकरी नेमले.+ ते म्हणाले:

‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’”+

पण लोक म्हणाले: “आम्ही नाही लक्ष देणार.”+

१८ “म्हणून हे राष्ट्रांनो, ऐका!

आणि हे लोकांनो, त्यांच्यासोबत काय होईल ते जाणून घ्या.

१९ हे पृथ्वी ऐक!

मी या लोकांवर संकट आणतोय,+

हे त्यांच्या दुष्ट विचारांचंच फळ आहे.

कारण त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही,

आणि माझा नियम पाळला नाही.”*

२० “तुम्ही माझ्यासाठी शबावरून ऊद* आणि दूरच्या देशातून अगरू* आणता,

पण मला त्याने काहीच फरक पडत नाही.

तुमची होमार्पणं मी स्वीकारत नाही,

आणि तुमच्या बलिदानांमुळे मला आनंद होत नाही.”+

२१ म्हणून यहोवा म्हणतो:

“पाहा! या लोकांच्या मार्गात मी अडखळणं ठेवीन.

त्यांमुळे ते अडखळून पडतील,

वडील आणि मुलं,

शेजारी आणि त्याचा मित्र

असे सगळे अडखळून पडतील आणि त्यांचा नाश होईल.”+

२२ यहोवा म्हणतो:

“पाहा! उत्तरेच्या देशाकडून लोक येत आहेत.

पृथ्वीच्या दूरच्या भागांतून एका मोठ्या राष्ट्राला जागं केलं जाईल.+

२३ ते आपल्या हातात धनुष्य आणि बरची* घेऊन येतील.

ते अतिशय क्रूर लोक आहेत; ते कोणावरही दयामाया करणार नाहीत.

समुद्राच्या गर्जनेसारखा त्यांचा आवाज असेल,

आणि ते घोड्यांवर बसून येतील.+

हे सीयोनच्या मुली, ते योद्ध्यांसारखं सैन्यदल रचून तुझ्यावर हल्ला करतील.”

२४ आम्ही ही बातमी ऐकली आहे.

आमचे हात गळून गेले आहेत,+

दुःखाने आम्हाला घेरलंय,

प्रसूत होणाऱ्‍या स्त्रीला होतात,

तशा वेदना आम्हाला होत आहेत.+

२५ शेतावर जाऊ नकोस,

किंवा रस्त्यावर फिरू नकोस,

कारण शत्रूच्या हातात तलवार आहे,

आणि सगळीकडे दहशत पसरली आहे.

२६ हे माझ्या लोकांनो, माझ्या मुली,

गोणपाट घाल+ आणि राखेत लोळ.

एकुलता एक मुलगा मेल्यावर शोक करतात, तसा शोक कर; मोठ्याने आक्रोश कर,+

कारण नाश करणारा अचानक आपल्यावर हल्ला करेल.+

२७ “मी तुला* माझ्या लोकांमध्ये धातूची पारख करणाऱ्‍यासारखं बनवलंय,

धातूची पारख करणारा जसा कसून पारख करतो,

तसं तू त्यांच्या वागण्याकडे लक्ष दे आणि त्यांचं परीक्षण कर.

२८ सगळेच्या सगळे अडेल वृत्तीचे आहेत,+

ते इतरांची बदनामी करत फिरतात.+

ते तांब्यासारखे आणि लोखंडासारखे आहेत.

ते सगळे भ्रष्ट आहेत.

२९ धातू गाळणाऱ्‍याचे भाते* पार जळून गेलेत,

पण आगीतून शिसंच बाहेर पडतं.

धातू गाळणारा धातू शुद्ध करायचा खूप प्रयत्न करतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.+

दुष्ट लोक काही केल्या वेगळे काढले जात नाहीत.+

३० त्यांना, ‘टाकून दिलेली चांदी’ असं म्हटलं जाईल,

कारण यहोवाने त्या सगळ्यांना टाकून दिलंय.”+

७ यहोवाकडून यिर्मयाला असा संदेश मिळाला: २ “यहोवाच्या मंदिराच्या दरवाजाजवळ उभा राहा आणि अशी घोषणा कर, ‘यहोवाची उपासना करायला या दरवाजांतून आत येणाऱ्‍या यहूदाच्या सगळ्या लोकांनो, यहोवा काय म्हणतो ते ऐका. ३ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “तुमचे मार्ग आणि तुमची वागणूक बदला, मगच मी तुम्हाला इथे राहू देईन.+ ४ फसव्या गोष्टींवर भरवसा ठेवू नका, आणि असं म्हणू नका, ‘हे* यहोवाचं मंदिर आहे, यहोवाचं मंदिर आहे, यहोवाचं मंदिर आहे!’+ ५ तुमचे मार्ग आणि तुमची वागणूक बदला; इतरांचा योग्य न्याय करा;+ ६ तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेशी लोकांवर, अनाथांवर* आणि विधवांवर जुलूम करू नका;+ निरपराध लोकांचा या देशात खून करू नका; आणि परक्या देवांच्या नादी लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका;+ ७ मगच मी तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे जो देश मी तुमच्या वाडवडिलांना कायमसाठी* दिला होता, त्यात राहू देईन.”’”

८ “तुम्ही मात्र फसव्या गोष्टींवर भरवसा ठेवत आहात.+ पण, त्यापासून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. ९ तुम्ही चोऱ्‍यामाऱ्‍या करता,+ खून करता, व्यभिचार करता, खोट्या शपथा घेता,+ बआलसाठी बलिदानं देता+ आणि ज्या देवांची तुम्हाला कधीच ओळख नव्हती, अशांच्या नादी लागता. १० तुम्हाला काय वाटतं, अशी सगळी घृणास्पद कामं करून, माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या या मंदिरात तुम्ही येऊ शकता? आणि माझ्यासमोर उभं राहून ‘आमचा नक्कीच बचाव होईल,’ असं म्हणू शकता? ११ माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या या मंदिराला तुम्ही समजता तरी काय? ते काय लुटारूंची गुहा आहे?+ तुम्ही काय-काय करता ते सगळं मी पाहिलंय,” असं यहोवा म्हणतो.

१२ “‘जरा शिलोमध्ये+ जाऊन पाहा. माझ्या नावासाठी मी सगळ्यात आधी तेच ठिकाण निवडलं होतं.+ पण माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्ट कामांमुळे मी त्या ठिकाणाचं काय केलं ते जरा जाऊन पाहा.+ १३ पण तुम्ही काही आपली वाईट कामं सोडली नाहीत,’ असं यहोवा म्हणतो. ‘तुम्हाला सारखं-सारखं सांगूनही तुम्ही माझं ऐकलं नाही.+ मी तुम्हाला हाक मारत राहिलो, पण तुम्ही उत्तर दिलं नाही.+ १४ म्हणून मी शिलोच्या बाबतीत जसं केलं, तसंच माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या मंदिराच्या बाबतीतही करीन.+ जे ठिकाण मी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिलं होतं आणि ज्यावर तुम्ही भरवसा ठेवता,+ त्याची मी शिलोसारखीच दशा करीन.+ १५ मी तुमच्या भाऊबंदांना, म्हणजे एफ्राईमच्या सगळ्या वंशजांना जसं घालवून दिलं, तसं तुम्हालाही माझ्या नजरेसमोरून घालवून देईन.’+

१६ पण हे यिर्मया, तू मात्र या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस. त्यांच्यासाठी माझा धावा करू नकोस. त्यांच्यासाठी माझ्याकडे याचना किंवा विनवणी करू नकोस.+ कारण मी तुझं ऐकणार नाही.+ १७ यहूदाच्या शहरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर ते काय करत आहेत, ते तुला दिसतंय ना? १८ ‘स्वर्गाच्या राणीसाठी’* पोळ्या बनवायला मुलं लाकडं गोळा करत आहेत, वडील आग पेटवत आहेत आणि बायका पीठ मळत आहेत.+ आणि ते इतर दैवतांपुढे पेयार्पणं ओतून माझा राग भडकवत आहेत.+ १९ यहोवा म्हणतो, ‘पण खरंतर असं करून ते मला दुःखी करत नाहीत,* तर उलट ते स्वतःवरच दुःख ओढवून घेत आहेत आणि स्वतःचाच अपमान करवून घेत आहेत.’+ २० म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी या जागेवर माझा राग, माझा क्रोध ओतीन;+ माणसांवर आणि प्राण्यांवर, रानातल्या झाडांवर आणि जमिनीतून उगणाऱ्‍या सगळ्यावर मी माझा क्रोध ओतीन. माझ्या क्रोधाची आग पेटत राहील आणि ती विझणार नाही.’+

२१ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘तुमच्या इतर बलिदानांसोबत तुमची होमार्पणंही द्या आणि स्वतःच त्यांचं मांस खा.+ २२ कारण मी जेव्हा तुमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून बाहेर आणलं, तेव्हा त्यांना होमार्पणांबद्दल किंवा बलिदानांबद्दल काहीच बोललो नाही किंवा कोणतीच आज्ञा दिली नाही.+ २३ पण मी त्यांना ही आज्ञा मात्र दिली होती: “माझं ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल.+ मी सांगेन त्या मार्गाने चाला, म्हणजे तुमचं भलं होईल.”’+ २४ पण त्यांनी माझं ऐकलं नाही, माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही.+ ते स्वतःच्याच विचारांप्रमाणे चालत राहिले; ते हट्टी बनले आणि त्यांचं दुष्ट मन सांगेल तसं वागत राहिले.+ सुधारण्याऐवजी ते आणखीनच वाईट बनले. २५ तुमचे वाडवडील इजिप्तमधून बाहेर आले, तेव्हापासून आजपर्यंत ते असंच वागत राहिले.+ म्हणून मी माझ्या सगळ्या सेवकांना, माझ्या सगळ्या संदेष्ट्यांना तुमच्याकडे पाठवत राहिलो; मी त्यांना दररोज, वारंवार तुमच्याकडे पाठवत राहिलो.+ २६ पण कोणीही माझं ऐकलं नाही, माझ्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही.+ उलट, ते हट्टी बनले आणि त्यांच्या वाडवडिलांपेक्षाही वाईट वागले!

२७ तू या सगळ्या गोष्टी त्यांना सांगशील,+ तरीपण ते तुझं ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील, पण ते तुला उत्तर देणार नाहीत. २८ तेव्हा तू त्यांना म्हणशील, ‘हे राष्ट्र आपला देव यहोवा याचं न ऐकणारं आणि त्याची शिस्त नाकारणारं राष्ट्र आहे. या राष्ट्रातल्या लोकांमधून विश्‍वासूपणा नाहीसा झालाय; त्याचा उल्लेखही केला जात नाही.’+

२९ तू तुझे लांब* केस कापून फेकून दे. उजाड टेकड्यांवर जाऊन मोठ्याने शोकगीत गा. कारण यहोवाचा क्रोध भडकवणाऱ्‍या या पिढीला त्याने नाकारलंय; त्याने तिला सोडून दिलंय. ३० ‘कारण यहूदाच्या लोकांनी माझ्या नजरेत जे वाईट ते केलंय,’ असं यहोवा म्हणतो. ‘माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या मंदिरात आपल्या घृणास्पद मूर्ती ठेवून त्यांनी ते अशुद्ध केलंय.+ ३१ त्यांनी ‘हिन्‍नोमच्या वंशजांच्या खोऱ्‍यात’*+ असलेल्या तोफेतमध्ये उपासनेची उच्च स्थानं बांधली आहेत. आपल्या मुला-मुलींचा आगीत होम करण्यासाठी त्यांनी ती बांधली आहेत.+ पण असं काही करायची आज्ञा मी त्यांना कधी दिली नव्हती, किंवा असला विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नव्हता.’+

३२ यहोवा म्हणतो, ‘म्हणून पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा त्या ठिकाणाला ‘तोफेत’ किंवा ‘हिन्‍नोमच्या वंशजांचं खोरं’* असं म्हणणार नाहीत; तर त्याला ‘कत्तलीचं खोरं’ म्हटलं जाईल. आणि पुरायला जागा उरणार नाही इतकी प्रेतं ते तोफेतमध्ये पुरतील.+ ३३ आणि लोकांची प्रेतं आकाशाच्या पक्ष्यांसाठी आणि पृथ्वीवरच्या प्राण्यांसाठी अन्‍न होईल; कोणीही त्यांना हुसकावून लावणार नाही.+ ३४ मी यरुशलेमच्या रस्त्यांवरचा आणि यहूदाच्या शहरांमधल्या जल्लोषाचा आणि आनंदोत्सवाचा आवाज, तसंच वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज बंद करून टाकीन.+ सगळा देश ओसाड होईल.’”+

८ यहोवा म्हणतो: “त्या वेळी, यहूदाच्या राजांची आणि अधिकाऱ्‍यांची हाडं, तसंच याजकांची व संदेष्ट्यांची आणि यरुशलेमच्या रहिवाशांची हाडं त्यांच्या कबरींमधून बाहेर काढली जातील. २ ती हाडं सूर्य, चंद्र आणि आकाशातल्या सगळ्या सैन्यासमोर पसरली जातील; त्यांनी ज्यांची आवड धरली आणि सेवा केली, ज्यांच्या मागे ते चालले, ज्यांच्याकडून त्यांनी सल्ला घेतला आणि ज्यांना त्यांनी नमन केलं त्यांच्यासमोर ती पसरली जातील.+ ती गोळा केली जाणार नाहीत किंवा पुरली जाणार नाहीत. तर ती जमिनीवर खत म्हणून पडून राहतील.”+

३ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “मी या दुष्ट घराण्यातल्या उरलेल्या लोकांची जिथे जिथे पांगापांग करीन, तिथे तिथे हे लोक जीवन नाही तर मरण मागतील.

४ आणि तू त्यांना सांग, की ‘यहोवा असं म्हणतो:

“ते पडले तर परत उठणार नाहीत का?

कोणी आपल्या मार्गापासून मागे वळला, तर दुसराही मागे वळणार नाही का?

 ५ मग यरुशलेमचे हे लोक माझ्याशी अविश्‍वासूपणे का वागत राहतात?

ते खोट्या गोष्टींना धरून बसतात;

आणि मागे वळायला नकार देतात.+

 ६ मी त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांचं बोलणं ऐकत राहिलो. पण ते जे बोलतात ते बरोबर नाही.

कोणीही आपल्या दुष्ट कामांबद्दल पश्‍चात्ताप करत नाही, किंवा असं म्हणत नाही, की ‘मी हे काय केलं?’+

इतर जण चालतात त्या मार्गावर चालण्यासाठी प्रत्येक माणूस मागे वळत राहतो;

घोडा जसा युद्धात बेधडक धावतो, तसा प्रत्येक माणूस त्या मार्गावर चालत राहतो.

 ७ आकाशात उडणाऱ्‍या करकोचा पक्ष्यालाही आपल्या स्थलांतराची वेळ* माहीत असते;

पारवे आणि इतर छोटे पक्षी, तसंच सारस पक्षी* यांनाही आपल्या परतण्याची* वेळ माहीत असते.

पण माझ्या लोकांना यहोवाच्या न्यायाची वेळ समजत नाही.”’+

 ८ ‘तुम्ही असं कसं म्हणू शकता, की “आम्ही सुज्ञ आहोत, आणि आमच्याकडे यहोवाचा नियम* आहे”?

कारण, शास्त्र्यांची* खोटी लेखणी+ तर फक्‍त खोट्या गोष्टी लिहिण्यासाठीच वापरण्यात आली आहे.

 ९ सुज्ञांना लज्जित केलं गेलंय.+

ते घाबरतील आणि त्यांना सापळ्यात अडकवलं जाईल.

पाहा! त्यांनी यहोवाचं वचन नाकारलंय,

मग त्यांच्याकडे सुज्ञता कशी असणार?

१० म्हणून मी त्यांच्या बायका इतर माणसांच्या हवाली करीन.

त्यांची शेतं इतरांच्या मालकीची होतील.+

कारण लहानापासून मोठ्यापर्यंत, प्रत्येक जण बेइमानी करून धन कमवतोय;+

संदेष्ट्यापासून याजकापर्यंत, प्रत्येक जण दुसऱ्‍याची फसवणूक करतोय.+

११ ते माझ्या मुलीचं, माझ्या लोकांचं मोडलेलं हाड वरवर जोडायचा प्रयत्न करतात,

आणि काहीही बरोबर नसताना, “सगळं ठीक आहे! सगळं ठीक आहे!” असं म्हणतात.+

१२ आपण केलेल्या घृणास्पद गोष्टींची त्यांना लाज वाटते का?

नाही! त्यांना मुळीच लाज वाटत नाही!

मुळात लाज काय असते, हेसुद्धा त्यांना माहीत नाही!+

म्हणूनच नाश झालेल्यांसोबत त्यांचाही नाश होईल.

मी त्यांना शिक्षा करीन, तेव्हा ते ठेच लागून खाली पडतील,’+ असं यहोवा म्हणतो.

१३ ‘मी त्यांना गोळा करीन, त्या वेळी त्यांचा नाश करीन.

द्राक्षवेलींवर एकही द्राक्ष उरणार नाही, अंजिराच्या झाडावर एकही अंजीर उरणार नाही आणि सगळी पानंही सुकून जातील.

मी त्यांना जे काही दिलं ते सगळं त्यांच्यापासून निघून जाईल.’ असं यहोवा म्हणतो.”

१४ “आपण इथे का बसलो आहोत?

चला आपण एकत्र येऊ आणि मजबूत भिंती असलेल्या शहरांमध्ये+ जाऊन मरू.

कारण आपला देव यहोवा आपला नाश करेल.

तो आपल्याला विषारी पाणी प्यायला देतो,+

कारण आपण यहोवाविरुद्ध पाप केलंय.

१५ आपण शांतीची आशा धरून होतो, पण काहीच चांगलं झालं नाही.

आपण बरं होण्याची वाट पाहत होतो, पण आपण घाबरलेलोच आहोत.+

१६ दानमधून त्याच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज ऐकू येत आहे.

त्याच्या दमदार घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने सगळी जमीन हादरत आहे.

ते येतात आणि देश व त्यातलं सगळं काही खाऊन टाकतात,

शहराचा आणि त्यातल्या रहिवाशांचा ते नाश करतात.”

१७ “कारण पाहा! मी तुमच्यामध्ये साप पाठवतोय;

मंत्रतंत्राने वश केले जाऊ शकत नाहीत, असे विषारी साप मी तुमच्यामध्ये पाठवतोय.

ते तुम्हाला दंश करतील,” असं यहोवा म्हणतो.

१८ माझ्या दुःखाचं सांत्वन होऊ शकत नाही;

माझ्या मनाला फार वेदना होत आहेत.

१९ दूरच्या देशातून मदतीची हाक ऐकू येत आहे;

माझ्या मुलीकडून, माझ्या लोकांकडून मदतीची हाक ऐकू येत आहे:

“यहोवा सीयोनमध्ये नाही का?

तिचा राजा तिच्यामध्ये नाही का?”

“त्यांनी आपल्या कोरीव मूर्तींनी आणि निरर्थक परक्या दैवतांनी माझा राग का भडकवला?”

२० “कापणीचा काळ निघून गेलाय, उन्हाळा संपून गेलाय.

पण आमचा अजूनही बचाव झालेला नाही!”

२१ माझ्या मुलीला, माझ्या लोकांना झालेल्या जखमांमुळे मी अतिशय दुःखी झालो आहे;+

मी पूर्णपणे हताश झालो आहे.

मला भितीने घेरलं आहे.

२२ गिलादमध्ये मलम* नाही का?+

तिथे कोणी वैद्य नाही का?+

मग माझी मुलगी, माझे लोक अजूनपर्यंत का बरे झाले नाहीत?+

९ माझं डोकं पाण्याने भरलेली विहीर असतं,

माझे डोळे अश्रूंचा झरा असते, तर किती बरं झालं असतं!+

म्हणजे मारल्या गेलेल्या माझ्या लोकांसाठी मी रात्रंदिवस रडलो असतो.

 २ प्रवासी मुक्काम करतात अशी एखादी जागा माझ्याकडे ओसाड रानात असती, तर किती बरं झालं असतं!

म्हणजे मी माझ्या लोकांना सोडून तिथे दूर निघून गेलो असतो.

कारण ते सगळे व्यभिचारी आहेत,+

विश्‍वासघातकी लोकांची ती टोळी आहे.

 ३ ते आपली जीभ धनुष्यासारखी वाकवतात;

देशात विश्‍वासूपणाचं नाही, तर खोटेपणाचं वर्चस्व आहे.+

“ते एकानंतर एक दुष्ट काम करत राहतात,

आणि माझ्याकडे लक्ष देत नाहीत,”+ असं यहोवा म्हणतो.

 ४ “प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्‍यापासून सावध राहावं,

आपल्या भावावरही विश्‍वास ठेवू नये.

कारण प्रत्येक भाऊ विश्‍वासघात करणारा,+

आणि प्रत्येक शेजारी बदनामी करणारा आहे.+

 ५ प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्‍याला फसवतो,

कोणीही खरं बोलत नाही.

त्यांनी आपल्या जीभेला खोटं बोलण्याचं प्रशिक्षण दिलंय.+

ते चुकीची कामं करून पार दमून जातात.

 ६ तू विश्‍वासघातकी लोकांमध्ये राहतोस.

ते खोटं बोलतात आणि मला ओळखायला नकार देतात,” असं यहोवा म्हणतो.

 ७ म्हणून सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“मी त्यांना धातूसारखं गाळून त्यांची पारख करीन.+

कारण माझ्या मुलीच्या बाबतीत, माझ्या लोकांच्या बाबतीत मी याशिवाय दुसरं काय करू शकतो?

 ८ त्यांची जीभ जीव घेणाऱ्‍या बाणासारखी आहे; ती फसव्या गोष्टी बोलते.

ते तोंडाने तर आपल्या शेजाऱ्‍याशी शांतीच्या गोष्टी बोलतात,

पण त्याला जाळ्यात कसं अडकवावं याविषयी मनात कट रचतात.”*

 ९ यहोवा म्हणतो, “या सगळ्या गोष्टींचा मी त्यांच्याकडे हिशोब मागायला नको का?

या असल्या राष्ट्रावर मी सूड उगवायला नको का?+

१० मी डोंगरांसाठी अश्रू गाळीन आणि विलाप करीन,

ओसाड रानातल्या कुरणांसाठी मी शोकगीत गाईन.

कारण ती जाळून टाकण्यात आली आहेत, आणि तिथून कोणीही ये-जा करत नाही.

तिथे गुराढोरांचा आवाज ऐकू येत नाही,

आणि सर्व प्राणी व आकाशातले पक्षी तिथून निघून गेले आहेत; ते पळून गेले आहेत.+

११ मी यरुशलेमला दगडांचा ढिगारा+ आणि कोल्ह्यांच्या राहण्याचं ठिकाण बनवीन.+

मी यहूदाच्या शहरांना ओसाड करून टाकीन; तिथे एकही माणूस उरणार नाही.+

१२ हे सगळं समजण्याइतकं सुज्ञ कोण आहे?

हे सांगता यावं म्हणून यहोवा कोणाशी बोलला आहे?

देशाचा नाश का झालाय?

कोणालाही तिथून ये-जा करता येत नाही, अशा ओसाड रानासारखा तो रखरखीत का झालाय?”

१३ यहोवाने उत्तर दिलं: “कारण, मी त्यांना दिलेलं शिक्षण* त्यांनी नाकारलं, त्याप्रमाणे ते चालले नाहीत आणि त्यांनी माझं ऐकलं नाही. १४ उलट ते हट्टीपणे आपल्या मनाला येईल तसं वागत राहिले.+ आणि त्यांच्या वाडवडिलांनी शिकवल्याप्रमाणे ते बआल मूर्तींच्या नादी लागले.+ १५ म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘मी या लोकांना कडूदवणा* खायला लावीन, आणि त्यांना विषारी पाणी प्यायला लावीन.+ १६ त्यांना आणि त्यांच्या वाडवडिलांना माहीत नाही, अशा राष्ट्रांमध्ये मी त्यांची पांगापांग करीन.+ त्यांचा पूर्णपणे नाश करेपर्यंत मी त्यांच्यामागे तलवार पाठवीन.’+

१७ सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो,

‘समंजसपणे वागा.

शोकगीत गाणाऱ्‍या स्त्रियांना बोलवा,+

कुशल स्त्रियांना आमंत्रित करा.

१८ म्हणजे त्या लवकर येतील आणि आपल्यासाठी शोकगीत गातील.

आपल्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतील,

आणि आपल्या पापण्या आसवांनी भिजून जातील.+

१९ सीयोनमधून शोक करण्याचा आवाज ऐकू आला:+

“आमचा नाश झालाय!

आम्ही किती लज्जित झालोय!

कारण आम्हाला आमचा देश सोडावा लागलाय, आणि त्यांनी आमची घरंदारं जमीनदोस्त केली आहेत.”+

२० हे स्त्रियांनो! यहोवाचा संदेश ऐका.

त्याच्या मुखातून निघालेल्या संदेशाकडे कान द्या!

तुमच्या मुलींना हे शोकगीत शिकवा,

आणि एकमेकींना हे विलापगीत शिकवा.+

२१ कारण आपल्या घराच्या खिडक्यांमधून मृत्यू आत शिरलाय;

तो मजबूत बुरुजांमध्ये शिरलाय.

रस्त्यांवरून लहान मुलांना,

आणि चौका-चौकांमधून तरुणांना घेऊन जायला तो आत शिरलाय.’+

२२ तू त्यांना सांग, की ‘यहोवा असं म्हणतो:

“कापणी करणारा शेतातली धान्याची कणसं कापून आपल्यामागे टाकतो,

पण गोळा करायला कोणी नसल्यामुळे ती पडून राहतात,

तशी लोकांची प्रेतं मैदानावर खत म्हणून पडून राहतील.”’”+

२३ यहोवा असं म्हणतो:

“सुज्ञ माणसाने आपल्या बुद्धीचा,+

शक्‍तिशाली माणसाने आपल्या शक्‍तीचा,

आणि श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये.”+

२४ “अभिमान बाळगायचाच असेल,

तर त्याला माझ्याविषयी सखोल समज आणि ज्ञान आहे याचा अभिमान बाळगावा.+

मी यहोवा आहे आणि मी एकनिष्ठ प्रेम करणारा, पृथ्वीवर न्याय आणि नीती प्रस्थापित करणारा देव आहे,+ याचा अभिमान बाळगावा.

कारण याच गोष्टींमुळे मला आनंद होतो,”+ असं यहोवा म्हणतो.

२५ यहोवा म्हणतो “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अशा सगळ्यांकडून हिशोब घेईन, ज्यांची सुंता* झाली असूनही ते बेसुनत लोकांसारखे आहेत.+ २६ मी इजिप्त,+ यहूदा,+ अदोम,+ अम्मोन+ आणि मवाब+ यांच्याकडून हिशोब घेईन. तसंच, आपल्या डोक्याच्या बाजूचे केस* कापणाऱ्‍या ओसाड रानातल्या सगळ्या रहिवाशांकडूनही हिशोब घेईन.+ कारण सगळी राष्ट्रं बेसुनत आहेत आणि इस्राएलचं सगळं घराणंही हृदयाने बेसुनत आहे.”+

१० हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! तुमच्याविरुद्ध यहोवाने काय संदेश दिला आहे तो ऐका. २ यहोवा म्हणतो:

“राष्ट्रांतल्या लोकांचे रितीरिवाज शिकू नका,+

आणि आकाशातली चिन्हं पाहून राष्ट्रं जशी घाबरून जातात, तसं तुम्ही घाबरून जाऊ नका.+

 ३ कारण राष्ट्रांतल्या लोकांचे रितीरिवाज व्यर्थ* आहेत.

कारागीर जंगलातून झाड कापून आणतो,

आणि आपलं हत्यार वापरून त्यापासून मूर्ती तयार करतो.+

 ४ त्या मूर्तीला सोन्या-चांदीने सजवलं जातं,+

आणि ती स्थिर उभी राहावी, म्हणून तिला हातोड्याने खिळे ठोकून पक्कं बसवलं जातं.+

 ५ मूर्ती तर काकडीच्या शेतातल्या बुजगावण्यांसारख्या* आहेत. त्या बोलू शकत नाहीत;+

त्यांना उचलून न्यावं लागतं, कारण त्या चालू शकत नाहीत.+

तुम्ही त्यांना घाबरू नका. कारण त्या कोणाचं नुकसान करू शकत नाहीत,

किंवा कोणाचं भलंही करू शकत नाहीत.”+

 ६ हे यहोवा, तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.+

तू गौरवशाली आहेस, आणि तुझं नाव महान व शक्‍तिशाली आहे.

 ७ हे सर्व राष्ट्रांच्या राजा!+ असा कोण आहे जो तुला घाबरणार नाही? कारण तुझी भीती बाळगणं योग्यच आहे;

राष्ट्रांतल्या सर्व बुद्धिमान लोकांमध्ये आणि त्यांच्या सगळ्या राज्यांमध्ये,

तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही.+

 ८ ते सगळे निर्बुद्ध आणि मूर्ख आहेत.+

लाकडी मूर्तीकडून मिळणाऱ्‍या सूचना व्यर्थ* आहेत.+

 ९ तार्शीशवरून+ आणलेले चांदीचे पत्रे आणि उफाजवरून आणलेलं सोनं,

या धातूकाम करणाऱ्‍या कारागिरांनी बनवलेल्या गोष्टी आहेत.

मूर्तींचे कपडे निळ्या धाग्यापासून आणि जांभळ्या लोकरीपासून बनवले आहेत.

त्या मूर्ती कुशल कारागिरांच्या हातांनी बनवलेल्या आहेत.

१० पण, यहोवा हाच खरा देव आहे.

तो जिवंत देव+ आणि सर्वकाळचा राजा आहे.+

त्याच्या क्रोधाने पृथ्वी हादरेल,+

आणि त्याच्या रागापुढे कोणतंही राष्ट्र टिकू शकणार नाही.

११ * तुम्ही त्यांना असं सांगा:

“ज्या देवांनी आकाश आणि पृथ्वी बनवली नाही,

ते पृथ्वीवरून आणि आकाशाखालून नाहीसे होतील.”+

१२ त्यानेच आपल्या शक्‍तीने पृथ्वी बनवली,

आपल्या बुद्धीने सुपीक जमीन बनवली.+

आणि त्यानेच आपल्या समजशक्‍तीने आकाश पसरवलं.+

१३ त्याचा आवाज ऐकून आकाशातल्या पाण्याचा मोठा गडगडाट होतो.+

तो पृथ्वीच्या टोकांवरून ढग* वर चढवतो;+

तो पावसासाठी विजा चमकवतो.*

आपल्या कोठारांतून तो वाऱ्‍याला बाहेर आणतो.+

१४ प्रत्येक जण मूर्खपणे आणि ज्ञान नसल्यासारखं वागतोय.

धातूकाम करणारा प्रत्येक माणूस आपण बनवलेल्या कोरीव मूर्तींमुळे लज्जित होईल;+

कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत,

आणि त्यांच्यात जीव* नाही.+

१५ त्या शून्यवत* आहेत. त्या थट्टा करण्याच्या लायकीच्या आहेत.+

त्यांचा हिशोब घेण्याचा दिवस येईल, तेव्हा त्या नष्ट होतील.

१६ पण याकोबचा देव* त्यांच्यासारखा नाही.

कारण तो सर्वकाही निर्माण करणारा आहे,

आणि इस्राएल त्याच्या वारशाची काठी आहे.+

सैन्यांचा देव यहोवा असं त्याचं नाव आहे.+

१७ हे वेढ्यात सापडलेली स्त्री!

जमिनीवरून आपलं गाठोडं उचल.

१८ कारण यहोवा असं म्हणतो:

“या देशातल्या लोकांना मी या वेळी गोफणीतून भिरकावून देईन.+

मी त्यांच्यावर संकट आणीन.”

१९ हाय हाय! मला किती मोठी जखम झाली आहे!*+

ती बरी होऊ शकत नाही.

आणि मी म्हणाले: “ही जखम माझ्या वाट्याला आली आहे आणि मी ती सोसलीच पाहिजे.

२० माझा तंबू उद्ध्‌वस्त झालाय,

आणि माझ्या तंबूचे दोर कापून टाकण्यात आलेत.+

माझी मुलं मला सोडून गेलीत; ती माझ्यासोबत नाहीत.+

माझा तंबू उभा करायला आणि त्याचं कापड ताणायला कोणीही उरलं नाही.

२१ मेंढपाळ मूर्खपणे वागले आहेत,+

आणि यहोवाची इच्छा काय आहे, हे त्यांनी माहीत करून घेतलेलं नाही.+

म्हणून ते सुज्ञतेने* वागले नाहीत,

आणि त्यांच्या सगळ्या कळपाची पांगापांग झाली आहे.”+

२२ ऐका! बातमी ऐका! शत्रू येत आहे!

उत्तरेकडून सैन्यांच्या पावलांचा मोठा आवाज येत आहे.+

तो यहूदाच्या शहरांना ओसाड करायला आणि त्यांना कोल्ह्यांच्या राहण्याचं ठिकाण बनवायला येत आहे.+

२३ हे यहोवा! मला हे चांगलं माहीत आहे, की मनुष्य आपला मार्ग ठरवू शकत नाही.

त्याला तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.+

२४ हे यहोवा, न्याय करून माझी चूक सुधार.

पण रागाने नको,+ नाहीतर मी नष्ट होऊन जाईन.+

२५ तुझ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या राष्ट्रांवर

आणि तुझ्या नावाचा आदर न करणाऱ्‍या घराण्यांवर, आपल्या क्रोधाचा वर्षाव कर.+

कारण त्यांनी याकोबला गिळून टाकलं आहे;+

हो, त्याचा पूर्णपणे नाश होईपर्यंत त्यांनी त्याला गिळून टाकलं आहे.+

आणि त्यांनी त्याचा देश उद्ध्‌वस्त केला आहे.+

११ यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २ “या करारातले शब्द सर्व लोकांनी ऐकावेत!

तू* यहूदाच्या माणसांशी आणि यरुशलेमच्या लोकांशी बोल, ३ आणि त्यांना सांग, ‘इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: “जो कोणी या करारात लिहिलेल्या गोष्टी पाळत नाही, तो शापित आहे.+ ४ ज्या दिवशी मी तुमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून, लोखंड वितळवणाऱ्‍या भट्टीतून बाहेर आणलं,+ त्या दिवशी मी त्यांना या करारातल्या गोष्टी पाळायला सांगितल्या होत्या.+ मी त्यांना म्हणालो होतो: ‘माझं ऐका आणि माझ्या सगळ्या आज्ञा पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईन.+ ५ मी तुमच्या वाडवडिलांना दूध आणि मध वाहत असलेला देश देण्याचं जे वचन दिलं होतं, ते मी पूर्ण करीन.+ आणि ते पूर्ण होत असल्याचं तुम्ही पाहत आहात.’”’”

तेव्हा मी म्हणालो: “हे यहोवा, असंच घडो.”*

६ मग यहोवा मला म्हणाला: “यहूदाच्या सगळ्या शहरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर अशी घोषणा कर: ‘या करारात काय सांगितलंय ते ऐका आणि त्याप्रमाणे वागा. ७ कारण मी तुमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून बाहेर आणलं त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्यांना वारंवार असं बजावून सांगत आलोय, की “माझ्या आज्ञा पाळा.”+ ८ पण त्यांनी माझं ऐकलं नाही, किंवा माझ्या सांगण्याकडे कान दिले नाहीत. उलट, प्रत्येक जण हट्टी बनला आणि आपल्या दुष्ट मनाला येईल तसं वागत राहिला.+ मी जो करार त्यांना पाळायला सांगितला होता तो त्यांनी पाळला नाही, म्हणून त्या करारात सांगितल्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा केली.’”

९ मग यहोवा मला म्हणाला: “यहूदाच्या आणि यरुशलेमच्या लोकांनी माझ्याविरुद्ध कट रचलाय. १० त्यांच्या वाडवडिलांनी पूर्वी जे अपराध केले होते, तेच अपराध ते करत आहेत; ज्यांनी माझं ऐकायला नकार दिला त्या त्यांच्या वाडवडिलांच्या अपराधांकडे ते वळालेत.+ ते इतर देवांच्या नादी लागले आहेत आणि त्यांची सेवा करत आहेत.+ इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्याने मी त्यांच्या वाडवडिलांसोबत केलेला करार मोडलाय.+ ११ म्हणून यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी त्यांच्यावर संकट आणतोय.+ त्यापासून ते पळू शकणार नाहीत. ते मला मदतीसाठी हाक मारतील, पण मी त्यांचं ऐकणार नाही.+ १२ तेव्हा यहूदाच्या शहरातले आणि यरुशलेममधले लोक ज्या देवांसाठी बलिदानं देतात त्यांच्याकडे ते वळतील आणि त्यांना मदत मागतील.+ पण त्यांच्या संकटाच्या काळात त्यांचे देव त्यांना मुळीच वाचवू शकणार नाहीत. १३ कारण, हे यहूदा! तुझ्या देवांची संख्या तुझ्या शहरांइतकी जास्त झाली आहे. आणि यरुशलेममध्ये जितके रस्ते आहेत, तितक्या वेदी तू घृणास्पद दैवतासाठी बनवल्या आहेत; बआल दैवताला बलिदानं देण्यासाठी तू त्या बनवल्या आहेत.’+

१४ तू* मात्र या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस. त्यांच्यासाठी माझ्याकडे धावा करू नकोस किंवा विनंती करू नकोस.+ कारण, जेव्हा त्यांच्यावर संकट येईल आणि ते मला हाक मारतील, तेव्हा मी त्यांचं ऐकणार नाही.

१५ माझ्या प्रिय लोकांना माझ्या मंदिरात असण्याचा काय अधिकार आहे?

त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांनी दुष्ट कामं केलीत.

तुझ्यावर* येणारं संकट ते काय पवित्र मांसाने* टाळू शकतील?

टाळू शकले तर त्या वेळी खुशाल जल्लोष कर!

१६ यहोवाने तुला हिरवंगार जैतुनाचं झाड,

चांगल्या फळांनी लगडलेलं एक सुंदर झाड असं नाव दिलं होतं.

पण आता त्याने मोठी गर्जना करून तुला आग लावली आहे,

आणि तुझ्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आहेत.

१७ तुझी लागवड करणारा,+ सैन्यांचा देव यहोवा याने अशी घोषणा केली आहे, की तुझ्यावर संकट येईल. कारण इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्यांनी दुष्ट कामं केली आहेत; त्यांनी बआलसाठी बलिदानं देऊन माझा क्रोध भडकवलाय.”+

१८ हे यहोवा, मला कळावं म्हणून तू मला हे सांगितलंस;

ते काय करत आहेत, हे त्या वेळी तू मला दाखवलंस.

१९ मी तर कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्‍या शांत कोकऱ्‍यासारखा होतो.

ते माझ्याविरुद्ध कट रचत असल्याचं मला माहीत नव्हतं;+ ते म्हणत होते:

“चला, आपण या झाडाचा फळांसकट नाश करू,

आणि त्याचं नामोनिशाण मिटवून टाकू.

म्हणजे यापुढे कोणालाही त्याची आठवण राहणार नाही.”

२० पण, सैन्यांचा देव यहोवा नीतीने न्याय करतो;

तो मनातले खोल विचार* आणि हृदय पारखतो.+

हे देवा, मी तुझ्याकडे फिर्याद केली आहे,

म्हणून तू त्यांचा सूड घे आणि मला तो पाहू दे.

२१ अनाथोथची+ जी माणसं माझा जीव घ्यायला टपली आहेत आणि असं म्हणत आहेत, की “यहोवाच्या नावाने भविष्यवाणी करू नकोस,+ नाहीतर आम्ही तुला मारून टाकू,” त्यांच्याविरोधात यहोवा बोलला आहे. २२ सैन्यांचा देव यहोवा म्हणाला: “पाहा, मी त्यांच्याकडून हिशोब घेईन. त्यांची तरुण माणसं तलवारीने+ आणि त्यांची मुलं-मुली दुष्काळाने मारली जातील.+ २३ अनाथोथच्या+ लोकांपैकी कोणीच वाचणार नाही. कारण ज्या वर्षी मी त्यांच्याकडून हिशोब घेईन, त्या वर्षी मी त्यांच्यावर संकट आणीन.”

१२ हे यहोवा, मी तुझ्याकडे जेव्हा तक्रार घेऊन येतो,

आणि न्यायाविषयी तुझ्याशी बोलतो, तेव्हा तूच नीतिमान ठरतोस.+

पण मग दुष्ट लोक आपल्या कामात यशस्वी का होतात?+

आणि विश्‍वासघातकी लोक निश्‍चिंत का असतात?

 २ तू त्यांना एखाद्या रोपासारखं जमिनीत लावलं आणि त्यांनी मूळ धरलं.

ते वाढले आणि त्यांनी फळ दिलं.

त्यांच्या ओठांवर तर तू आहेस, पण त्यांच्या मनातल्या विचारांपासून तू फार दूर आहेस.+

 ३ पण हे यहोवा, तू मला चांगलं ओळखतोस,+ तू मला पाहतोस;

तू माझं मन पारखलंस आणि तुला दिसून आलं, की ते तुला विश्‍वासू आहे.+

तू त्यांना कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्‍या मेंढरांसारखं वेगळं काढ;

कत्तल करण्याच्या दिवसासाठी तू त्यांना राखून ठेव.

 ४ आणखी किती काळ देशाचा असाच नाश होत राहील?

आणखी किती दिवस रानातली झाडं-झुडपं सुकत राहतील?+

लोकांच्या दुष्ट कामांमुळे जनावरांचा आणि पक्ष्यांचा नाश झाला आहे.

कारण लोक म्हणतात: “आपलं काय होईल हे तो पाहू शकत नाही.”

 ५ मग देव मला म्हणाला: “पायी चालणाऱ्‍यांसोबत तू धावताना दमलास,

तर घोड्यांसोबत तू शर्यतीत कसा धावशील?+

शांतीच्या देशात तुला सुरक्षित वाटतंय,

पण यार्देन नदीच्या काठावर असलेल्या दाट जंगलांत तू काय करशील?

 ६ कारण तुझे स्वतःचे भाऊ, तुझ्या वडिलांचं घराणंच तुझ्याशी विश्‍वासघाताने वागलंय.+

त्यांनी तुझ्याविरुद्ध आवाज चढवलाय.

पण तू त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नकोस,

ते तुझ्याशी गोडगोड बोलले तरी त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नकोस.”

 ७ “मी माझ्या घराचा त्याग केलाय;+ मी माझ्या वारशाचा त्याग केलाय.+

जी मला परमप्रिय आहे, तिला मी तिच्या शत्रूंच्या हवाली केलंय.+

 ८ माझा वारसा मला जंगलातल्या सिंहासारखा झालाय.

त्याने माझ्यावर गर्जना केली.

म्हणून मी त्याचा द्वेष करतो.

 ९ माझा वारसा माझ्यासाठी ठिपकेदार* शिकारी पक्ष्यासारखा झालाय;

इतर शिकारी पक्षी त्याला घेरतात आणि त्याच्यावर हल्ला करतात.+

रानातल्या सगळ्या प्राण्यांनो, या! एकत्र होऊन खायला या!+

१० अनेक मेंढपाळांनी माझा द्राक्षमळा उद्ध्‌वस्त करून टाकलाय;+

त्यांनी माझ्या हिश्‍शाची जमीन तुडवली आहे.+

त्यांनी माझ्या आवडीची जमीन ओसाड रान करून टाकली आहे.

११ ती पडीक झाली आहे.

तिचा नाश झालाय;*

ती माझ्यासमोर ओसाड पडून आहे.+

संपूर्ण देशाला उजाड करून टाकण्यात आलंय,

पण कोणालाही त्याची पर्वा नाही.+

१२ ओसाड रानातल्या सगळ्या पाऊलवाटांवर नाश करणारे आले आहेत.

कारण यहोवाची तलवार एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत देशाचा नाश करत आहे.+

तिथे कोणालाही शांती नाही.

१३ त्यांनी गव्हाची पेरणी केली, पण कापणीच्या वेळी त्यांच्या वाट्याला काटेकुसळेच आले.+

त्यांनी बरीच मेहनत केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.

यहोवाच्या जळजळीत क्रोधामुळे,

त्यांना आपल्या पिकाची लाज वाटेल.”

१४ यहोवा असं म्हणतो: “जो वारसा मी माझ्या इस्राएली लोकांना दिला होता, त्याला हात लावणाऱ्‍या माझ्या सगळ्या दुष्ट शेजाऱ्‍यांना+ मी त्यांच्या देशातून उपटून टाकीन.+ आणि मी यहूदाच्या घराण्यालाही त्यांच्यातून उपटून टाकीन. १५ पण त्यांना उपटून टाकल्यावर, मी पुन्हा त्यांच्यावर दया करीन. आणि त्यांच्यातल्या प्रत्येकाला त्याच्या वारशाच्या प्रदेशाकडे परत आणीन.”

१६ “ते जर माझ्या लोकांच्या चालीरिती शिकले, आणि जसं त्यांनी माझ्या लोकांना बआलच्या नावाने शपथ घ्यायला शिकवलं, तसं ते माझ्या नावाने शपथ घ्यायला शिकले आणि म्हणाले, ‘यहोवाच्या जीवनाची शपथ!’ तर माझ्या लोकांमध्ये त्यांची वस्ती होईल. १७ पण जर त्यांपैकी एखाद्या राष्ट्राने माझं ऐकलं नाही, तर मी त्याला उपटून टाकीन आणि त्याचा समूळ नाश करीन,” असं यहोवा म्हणतो.+

१३ यहोवाने मला असं सांगितलं: “जा आणि स्वतःसाठी मलमलीचा* एक पट्टा विकत घे आणि तो कंबरेला बांध. पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.” २ म्हणून, यहोवाने सांगितल्याप्रमाणे मी एक पट्टा विकत घेतला आणि तो कंबरेला बांधला. ३ मग दुसऱ्‍यांदा मला यहोवाचा असा संदेश मिळाला: ४ “तू जो पट्टा विकत घेतलाय आणि कंबरेला बांधलाय, तो घेऊन फरात नदीकडे जा. तिथे तो एका खडकाच्या कपारीत लपवून ठेव.” ५ तेव्हा यहोवाने मला आज्ञा दिल्याप्रमाणे मी फरात नदीकडे गेलो आणि तो पट्टा तिथे लपवून ठेवला.

६ मग बऱ्‍याच दिवसांनंतर यहोवाने मला सांगितलं: “ऊठ आणि फरात नदीकडे जा, आणि मी तुला जो पट्टा तिथे लपवायला सांगितला होता तो परत घे.” ७ म्हणून मी फरात नदीकडे गेलो आणि जिथे तो पट्टा लपवला होता, तिथून तो खोदून बाहेर काढला. मी बघितलं तर तो पट्टा पूर्णपणे खराब झाला होता; तो वापरण्याच्या लायकीचा राहिला नव्हता.

८ त्यानंतर मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ९ “यहोवा असं म्हणतो, ‘अगदी याचप्रमाणे मी यहूदाचा गर्व आणि यरुशलेमचा अहंकार मोडून टाकीन.+ १० हे दुष्ट लोक माझ्या आज्ञा पाळत नाहीत,+ ते हट्टी आहेत आणि आपल्या मनाला येईल तसं वागतात.+ ते इतर देवांच्या नादी लागलेत. ते त्यांची सेवा करतात आणि त्यांच्या पाया पडतात. म्हणून या दुष्ट लोकांची अवस्था या पट्ट्यासारखीच होईल; ते कुठल्याच कामाचे राहणार नाहीत.’ ११ यहोवा म्हणतो, ‘पट्टा जसा माणसाच्या कंबरेला बांधून ठेवतात, तसं मी इस्राएलच्या आणि यहूदाच्या संपूर्ण घराण्याला माझ्याशी बांधून ठेवलं. ते माझे लोक व्हावेत,+ तसंच त्यांनी माझं नाव,+ माझी स्तुती आणि माझी शोभा बनावं म्हणून मी असं केलं. पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही.’+

१२ तू त्यांना असाही संदेश दे, ‘इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: “प्रत्येक मोठं मडकं द्राक्षारसाने भरलेलं असावं.”’ पण ते तुला म्हणतील, ‘प्रत्येक मोठं मडकं द्राक्षारसाने भरलेलं असावं, हे आम्हाला आधीपासूनच माहीत नाही का?’ १३ तेव्हा तू त्यांना सांग, ‘यहोवा म्हणतो: “मी या देशातल्या सगळ्या लोकांना, दावीदच्या राजासनावर बसलेल्या राजांना, याजकांना, संदेष्ट्यांना आणि यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांना नशा येईपर्यंत दारू पाजत राहीन.+ १४ मी त्यांना एकमेकांवर आदळीन; बापाला आणि मुलाला एकमेकांवर आदळीन.+ मी त्यांच्यावर कोणतीही दयामाया करणार नाही किंवा त्यांच्याबद्दल मला काही वाईटही वाटणार नाही. त्यांचा नाश करण्यापासून मला कुठलीही गोष्ट थांबवू शकणार नाही.” असं यहोवा म्हणतो.’ +

१५ ऐका आणि लक्ष द्या.

अहंकाराने वागू नका, कारण यहोवा हे बोलला आहे.

१६ तुमचा देव यहोवा याचा गौरव करा;

त्याने अंधार पाडण्याच्या आत,

आणि संध्याकाळी तुमचे पाय डोंगरांवर अडखळण्याच्या आत त्याचा गौरव करा.

तुम्ही उजेडाची आशा धराल,

पण तो दाट काळोख पाडेल;

तो प्रकाशाला दाट अंधकार बनवेल.+

१७ आणि जर तुम्ही ऐकलं नाही,

तर तुमच्या गर्विष्ठपणामुळे मी एकांतात जाऊन रडेन.

यहोवाच्या कळपाला बंदी बनवून नेल्यामुळे,+

मी आसवे गाळीन आणि माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतील.+

१८ राजाला आणि राजमातेला सांगा,+ की त्यांनी राजासनावरून उतरून खाली बसावं.

कारण त्यांच्या डोक्यावरचा सुंदर मुकुट पडणार आहे.

१९ दक्षिणेकडची शहरं बंद करण्यात आली आहेत;* ती उघडायला कोणीही नाही.

यहूदाच्या सगळ्या लोकांना बंदिवासात नेण्यात आलं आहे; यहूदा पूर्णपणे बंदिवासात गेला आहे.+

२० आपली नजर वर कर आणि उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे बघ.+

तुला दिलेला कळप आणि तुझी सुंदर मेंढरं कुठे आहेत?+

२१ तू सुरुवातीपासून ज्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध जोडलेस,

त्यांच्याकडूनच तुला शिक्षा मिळाल्यावर तू काय म्हणशील?+

स्त्रीला प्रसूतीच्या वेदना होतात, तशाच भयंकर वेदना तुला होणार नाहीत का?+

२२ आणि तू तुझ्या मनात म्हणशील, ‘माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी का घडल्या?’+

तेव्हा लक्षात ठेव, की तुझ्या घोर अपराधांमुळेच हे घडलंय,

आणि त्यामुळेच तुझा झगा काढून टाकण्यात आलाय,+

आणि तुझ्या टाचांना भयंकर वेदना होत आहेत.

२३ कूशी* माणसं आपल्या त्वचेचा रंग, किंवा चित्ते आपल्या अंगावरचे ठिपके बदलू शकतात का?+

ते जर बदलू शकले, तरच वाईट कामं करण्यात पटाईत असलेले तुम्ही लोक चांगली कामं करू शकता.

२४ वाळवंटातला वारा जसं सुकलेलं गवत विखरून टाकतो, तसं मी तुम्हाला विखरून टाकीन.”+

२५ यहोवा म्हणतो: “हाच तुझा वाटा आणि मी तुला मापून दिलेला तुझा हिस्सा आहे.

कारण तू मला विसरून गेलीस+ आणि खोट्या गोष्टींवर भरवसा ठेवलास.+

२६ म्हणून मी तुझा झगा उचलून तुझ्या तोंडावर टाकीन,

आणि तुझी लाज सगळ्यांना दिसून येईल;+

२७ तुझी व्यभिचाराची कामं,+

घोड्यांसारखं तुझं वासनेने खिंकाळणं,

वेश्‍येसारखं तुझं निर्लज्ज वागणं,

सगळ्यांना दिसून येईल.

हे यरुशलेम, तुझा धिक्कार असो!

तू टेकड्यांवर आणि मैदानांत करत असलेली सगळी घृणास्पद कामं मी पाहिली आहेत.+

तू कधीपर्यंत अशीच अशुद्ध अवस्थेत राहशील?”+

१४ दुष्काळाविषयी यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला:+

 २ यहूदा शोक करत आहे,+ आणि त्याचे दरवाजे खाली पडले आहेत.

ते उदास होऊन जमिनीवर पडले आहेत,

आणि यरुशलेममधला रडण्याचा आवाज स्वर्गापर्यंत ऐकू येत आहे.

 ३ तिथले मालक आपल्या सेवकांना पाणी आणायला पाठवतात.

ते विहीरींवर* जातात, पण त्यांना पाणी मिळत नाही.

ते आपली भांडी रिकामीच परत आणतात.

ते लज्जित आणि दुःखी होतात,

आणि आपलं डोकं झाकून घेतात.

 ४ देशात पाऊस पडलेला नाही,+

म्हणून जमिनीला भेगा पडल्या आहेत.

शेतकरी निराश झाले आहेत आणि त्यांनी आपलं डोकं झाकून घेतलं आहे.

 ५ हरिणीसुद्धा नुकत्याच जन्मलेल्या आपल्या पाडसांना सोडून देत आहेत,

कारण कुठेही गवत उरलेलं नाही.

 ६ रानगाढवं उजाड पडलेल्या टेकड्यांवर उभी आहेत.

ती कोल्ह्यांसारखी धापा टाकत आहेत;

झाडपाला नसल्यामुळे त्यांची नजर अंधूक झाली आहे.+

 ७ हे यहोवा! आम्ही अनेकदा तुझ्याशी अविश्‍वासूपणे वागलो,+

आणि तुझ्याविरुद्ध पाप केलं.

आमचे अपराध आमच्याविरुद्ध साक्ष देत असले,

तरी तू आपल्या नावासाठी कार्य कर.+

 ८ हे देवा, तू इस्राएलची आशा आहेस. संकटाच्या काळात तूच इस्राएलचा तारणकर्ता आहेस.+

मग या देशासाठी तू एखाद्या परक्या माणसासारखा का झालास?

रात्र काढायला थांबलेल्या एखाद्या प्रवाशासारखा तू का वागतोस?

 ९ तू सुन्‍न झालेल्या माणसासारखा का झालास?

शक्‍ती असूनही वाचवू न शकणाऱ्‍या योद्ध्यासारखा तू का झालास?

हे यहोवा, तू आमच्यामध्ये आहेस,+

आणि आम्हाला तुझ्या नावाने ओळखलं जातं.+

आम्हाला सोडून देऊ नकोस.

१० यहोवा या लोकांविषयी म्हणतो: “त्यांना भटकायला आवडतं;+ त्यांनी आपले पाय आवरले नाहीत.+ म्हणून यहोवाला ते जराही आवडत नाहीत.+ त्यामुळे तो आता त्यांचे अपराध आठवणीत आणेल, आणि त्यांच्या पापांचा त्यांच्याकडून हिशोब घेईल.”+

११ मग यहोवा मला म्हणाला: “या लोकांचं भलं व्हावं म्हणून माझ्याकडे प्रार्थना करू नकोस.+ १२ ते उपास करतात तेव्हा मी त्यांचा धावा ऐकत नाही.+ ते होमार्पणं आणि अन्‍नार्पणं देतात तेव्हा मला जराही आनंद होत नाही.+ मी तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने त्यांचा नाश करीन.”+

१३ तेव्हा मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! संदेष्टे तर त्यांना असं सांगत आहेत, की ‘तुम्ही तलवार किंवा दुष्काळ पाहणार नाही. उलट, देव तुम्हाला या ठिकाणी खरी शांती देईल.’”+

१४ मग यहोवा मला म्हणाला: “संदेष्टे माझ्या नावाने खोट्या भविष्यवाण्या करत आहेत.+ मी त्यांच्याशी बोललो नाही, त्यांना पाठवलं नाही किंवा कोणती आज्ञाही दिली नाही.+ ते तुम्हाला भविष्यवाणी म्हणून खोटे दृष्टान्त, शकुन आणि आपल्याच मनातल्या खोट्या गोष्टी सांगत आहेत.+ १५ म्हणून ज्या संदेष्ट्यांना मी पाठवलं नाही आणि जे माझ्या नावाने भविष्यवाणी करत आहेत व असं म्हणत आहेत, की या देशावर तलवार किंवा दुष्काळ पाहायची वेळ येणार नाही, त्या संदेष्ट्यांविषयी यहोवा असं म्हणतो: ‘हे संदेष्टे तलवारीने आणि दुष्काळानेच मरतील.+ १६ आणि ज्या लोकांना ते भविष्यवाणी सांगत आहेत, त्या लोकांची प्रेतं तलवारीमुळे आणि दुष्काळामुळे यरुशलेमच्या रस्त्यांवर पडून राहतील; प्रेतं पुरायलाही कोणी उरणार नाही.+ त्यांची, त्यांच्या बायकांची आणि त्यांच्या मुला-मुलींची एकसारखीच दशा होईल. मी त्यांच्यावर भयंकर संकट आणीन, कारण ते त्याच लायकीचे आहेत.’+

१७ तू त्यांना असा संदेश दे,

‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रू वाहू द्या; ते थांबायला नकोत.+

कारण माझ्या कुमारीला, माझ्या लोकांना जबरदस्त तडाखा बसलाय,

ते पूर्णपणे चिरडले गेले आहेत+ आणि त्यांना खोलवर जखम झाली आहे.

१८ मी मैदानावर जाऊन बघतो,

तर तिथे तलवारीने मरून पडलेल्यांची प्रेतं मला दिसतात;+

मी शहरात आलो, तर तिथे मला दुष्काळ आणि रोगराई दिसते.+

कारण संदेष्टे आणि याजक हे त्यांना माहीत नसलेल्या परक्या देशात गेले आहेत.’”+

१९ हे देवा! तू यहूदाला पूर्णपणे नाकारलंय का? तुला सीयोनची किळस आली आहे का?+

तू आम्हाला इतकं का मारलंस, की आम्ही बरे होऊ शकत नाही?+

आम्ही शांतीची आशा धरून होतो, पण काहीच चांगलं झालं नाही.

आम्ही बरं होण्याची वाट पाहत होतो, पण आम्ही घाबरलेलोच आहोत!+

२० हे यहोवा! आम्ही आमचा दुष्टपणा कबूल करतो,

आमच्या वाडवडिलांचे अपराध आम्ही मान्य करतो.

कारण आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केलं आहे.+

२१ हे देवा! तू आपल्या नावासाठी आमचा त्याग करू नकोस;+

आपल्या वैभवी राजासनाला तुच्छ लेखू नकोस.

आमच्याशी केलेला करार आठवणीत ठेव, तो मोडू नकोस.+

२२ राष्ट्रांच्या निरुपयोगी दैवतांपैकी कोणी पाऊस पाडू शकतं का?

किंवा आकाशही स्वतःहून पावसाच्या सरी पाडू शकतं का?

हे आमच्या देवा यहोवा, तुझ्याशिवाय दुसरं कोण हे करू शकतं?+

या सगळ्या गोष्टी करणारा तूच आहेस,

म्हणून आमची आशा तुझ्यावर आहे.

१५ मग यहोवा मला म्हणाला: “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी माझ्यासमोर उभे असते,+ तरी मी या लोकांवर दया केली नसती. यांना माझ्या नजरेसमोरून दूर कर. घालवून दे त्यांना. २ आणि जर ते तुला म्हणाले, ‘आम्ही कुठे जाऊ?’ तर तू त्यांना सांग, ‘यहोवा असं म्हणतो:

“जीवघेण्या रोगासाठी नेमलेल्यांनी, जीवघेण्या रोगाकडे जावं,

तलवारीसाठी नेमलेल्यांनी तलवारीकडे जावं,+

दुष्काळासाठी नेमलेल्यांनी दुष्काळाकडे जावं,

आणि बंदिवासासाठी नेमलेल्यांनी बंदिवासात जावं!”’+

३ यहोवा म्हणतो, ‘मी त्यांच्यावर चार पीडा* आणीन;+ ठार मारायला तलवार, प्रेतं ओढून न्यायला कुत्री, तसंच त्यांना खायला आणि त्यांचा नाश करायला आकाशातले पक्षी व जमिनीवरचे प्राणी.+ ४ यहूदाच्या राजाने, म्हणजे हिज्कीयाचा मुलगा मनश्‍शे याने यरुशलेममध्ये जे केलं,+ त्यामुळे मी त्यांची अशी दशा करीन, की ती पाहून पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांना दहशत बसेल.+

 ५ हे यरुशलेम, कोणाला तुझी दया येईल?

कोणाला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटेल?

आणि कोण थांबून तुझी विचारपूस करेल?’

 ६ यहोवा म्हणतो, ‘त्यांनी मला सोडून दिलं.+

त्यांनी वारंवार माझ्याकडे पाठ फिरवली.*+

म्हणून मी त्यांच्यावर माझा हात उगारीन आणि त्यांचा नाश करीन.+

त्यांना सारखी-सारखी दया दाखवून मी वैतागलोय.

 ७ मी देशाच्या दरवाजांमध्ये त्यांची पाखडणी करून त्यांना वाऱ्‍याने उडवून टाकीन.

मी त्यांची मुलं त्यांच्यापासून दूर करीन.+

मी माझ्या लोकांचा नाश करून टाकीन,

कारण त्यांनी आपल्या मार्गांपासून मागे वळायला नकार दिला.+

 ८ माझ्यासमोर त्यांच्यातल्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा जास्त होईल.

मी भरदुपारी नाश करणाऱ्‍याला त्यांच्याविरुद्ध आणीन; आई आणि तरुण मुलं यांच्याविरुद्ध मी त्याला आणीन.

मी त्यांच्या मनाचा अचानक गोंधळ उडवीन आणि त्यांना भयभीत करीन.

 ९ सात मुलांना जन्म देणारी स्त्री कमजोर झाली आहे;

ती धापा टाकत आहे.

भरदिवसा तिचा सूर्य मावळलाय,

त्यामुळे बदनामी आणि अपमान झालाय.’*

यहोवा म्हणतो ‘त्यांच्यापैकी उरलेल्या लोकांना मी शत्रूच्या तलवारीच्या हवाली करीन.’”+

१० हे माझ्या आई! तू मला जन्म का दिलास?+

देशातले सगळे लोक माझ्याशी भांडतात आणि वाद घालतात.

मी कोणाला उसनं दिलं नाही, की कोणाकडून काही घेतलं नाही;

पण तरी ते सगळे मला शाप देतात.

११ यहोवा म्हणाला: “मी नक्की तुझं भलं करीन;

संकटाच्या काळात मी तुझ्यासाठी नक्की मध्यस्थी करीन;

दुःखाच्या काळात तुझ्या वतीने मी शत्रूंशी बोलीन.

१२ कोणी लोखंडाचे तुकडे-तुकडे करू शकतं का?

कोणी उत्तरेकडच्या लोखंडाचे आणि तांब्याचे तुकडे-तुकडे करू शकतं का?

१३ तू* आपल्या सगळ्या प्रदेशांत पापं केली आहेत.

म्हणून मी तुझी सगळी संपत्ती आणि तुझा सगळा खजिना, कोणताही मोबदला न घेता तुझ्या शत्रूंच्या हाती देईन.+

१४ तुला माहीत नाही अशा देशात नेण्यासाठी मी ते सगळं तुझ्या शत्रूंच्या हाती देईन.+

कारण माझ्या क्रोधाची आग पेटली आहे,

आणि ती तुमच्यावर भडकली आहे.”+

१५ हे यहोवा, तुला तर सगळं माहीत आहे.

माझी आठवण कर, माझ्याकडे लक्ष दे.

माझा छळ करणाऱ्‍यांचा सूड घे.+

त्यांच्या बाबतीत तू सहनशीलता दाखवू नकोस, नाहीतर माझा नाश होईल.

मी तुझ्यासाठी निंदा सहन करतोय याची तू जाणीव ठेव.+

१६ मला तुझा संदेश मिळाला आणि मी तो खाल्ला;+

त्या संदेशामुळे मी अतिशय खूश झालो आणि माझं मन आनंदित झालं.

कारण, हे सैन्यांच्या देवा यहोवा! मला तुझ्या नावाने ओळखलं जातं.

१७ मी मौजमजा करणाऱ्‍यांसोबत बसून मौजमजा करत नाही.+

तुझा हात माझ्यावर असल्यामुळे मी एकटाच बसतो,

कारण तू मला क्रोधाने* भरून टाकलं आहेस.+

१८ माझं दुःख दूर का होत नाही? आणि माझी जखम भरून का येत नाही?

ती बरं होण्याचं नावच घेत नाही.

तू माझ्यासाठी अशा एका फसव्या ओढ्यासारखा होणार आहेस का,

ज्यात कधी पाणी असतं तर कधी नसतं?

१९ म्हणून यहोवा असं म्हणतो:

“तू जर माझ्याकडे परत आलास,

तर मी पुन्हा तुझ्यावर कृपा करीन आणि तू माझ्यासमोर उभा राहशील.

तू जर मौल्यवान गोष्टींपासून निरर्थक गोष्टी वेगळ्या केल्यास,

तर तू माझ्या वतीने बोलणारा* होशील.

तुला त्यांच्याकडे जावं लागणार नाही,

उलट त्यांना तुझ्याकडे यावं लागेल.”

२० यहोवा म्हणतो: “मी तुला या लोकांविरुद्ध तांब्याच्या मजबूत भिंतीसारखं बनवत आहे.+

ते तुझ्याशी लढतील, पण तुला हरवू शकणार नाहीत.+

कारण तुला वाचवायला मी तुझ्यासोबत असेन.

२१ मी तुला दुष्ट लोकांच्या हातून सोडवीन,

आणि क्रूर लोकांच्या पंजातून तुझी सुटका करीन.”

१६ यहोवाकडून पुन्हा एकदा मला असा संदेश मिळाला: २ “तू या ठिकाणी लग्न करू नकोस किंवा मुलंबाळं होऊ देऊ नकोस. ३ कारण इथे जन्मलेल्या मुलाबाळांबद्दल आणि या देशात त्यांना जन्म देणाऱ्‍या त्यांच्या आईवडिलांबद्दल यहोवा असं म्हणतो: ४ ‘ते जीवघेण्या आजारांनी मरतील.+ त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही किंवा कोणी त्यांना पुरणार नाही; ते जमिनीवर खत म्हणून पडून राहतील.+ ते तलवारीने आणि दुष्काळाने मरतील.+ आणि त्यांची प्रेतं आकाशातल्या पक्ष्यांसाठी आणि जमिनीवरच्या प्राण्यांसाठी अन्‍न होईल.’

 ५ यहोवा म्हणतो:

‘ज्या घरात शोक करणाऱ्‍यांसाठी जेवण ठेवलं जातं तिथे जाऊ नकोस,

तू शोक करायला किंवा सांत्वन करायला जाऊ नकोस.’+

‘कारण या लोकांमधून मी माझी शांती काढून घेतली आहे,

माझं एकनिष्ठ प्रेम आणि दया मी त्यांच्यामधून काढून घेतली आहे,’ असं यहोवा म्हणतो.+

 ६ ‘या देशातले सगळे लहान-थोर मरतील.

त्यांना कोणी पुरणार नाही,

त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही,

आणि त्यांच्यासाठी कोणीही आपल्या शरीरावर घाव करून घेणार नाही किंवा डोक्याचं मुंडण करणार नाही.*

 ७ शोक करत असलेल्यांचं सांत्वन करायला,

कोणीही जेवण देणार नाही.

त्यांची आई किंवा वडील यांचा जर मृत्यू झाला,

तर कोणीही त्यांना सांत्वनाचा प्याला देणार नाही.

 ८ ज्या घरात मेजवानी आहे तिथे जाऊ नकोस,

त्यांच्यासोबत खायला-प्यायला बसू नकोस.’

९ कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी तुमच्याच जीवनकाळात आणि तुमच्याच डोळ्यांसमोर या ठिकाणी होणारा जल्लोषाचा आणि आनंदोत्सवाचा आवाज बंद करून टाकीन; वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज मी बंद करून टाकीन.’+

१० तू जेव्हा या गोष्टी लोकांना सांगशील, तेव्हा ते तुला असं विचारतील, ‘यहोवा आमच्यावर संकट आणण्याविषयी का बोलला? असं कोणतं पाप किंवा असा कोणता अपराध आम्ही आमच्या देवाविरुद्ध, यहोवाविरुद्ध केलाय?’+ ११ तेव्हा तू त्यांना असं म्हण, ‘यहोवा म्हणतो, “कारण तुमच्या वाडवडिलांनी मला सोडून दिलं+ आणि इतर देवांच्या नादी लागून त्यांनी त्यांची सेवा केली व ते त्यांच्या पाया पडले.+ पण मला मात्र त्यांनी सोडून दिलं, आणि माझे नियम त्यांनी पाळले नाहीत.+ १२ आणि तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही वाईट वागलात.+ तुमच्यापैकी प्रत्येक जण, माझं ऐकण्याऐवजी स्वतःच्या हट्टी आणि दुष्ट मनाचं ऐकतो.+ १३ म्हणून मी तुम्हाला या देशातून काढून टाकीन आणि तुम्हाला व तुमच्या वाडवडिलांना माहीत नसलेल्या देशात फेकून देईन.+ तिथे तुम्हाला रात्रंदिवस इतर देवांची सेवा करावी लागेल,+ कारण मी तुमच्यावर मुळीच दयामाया करणार नाही.”’

१४ यहोवा म्हणतो: ‘पण असे दिवस येत आहेत जेव्हा, “इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणणाऱ्‍या यहोवाच्या जीवनाची शपथ!” असं ते म्हणणार नाहीत.+ १५ याउलट, “इस्राएली लोकांची उत्तरेच्या देशात आणि इतर सर्व देशांत पांगापांग करणाऱ्‍या आणि त्यांना तिथून बाहेर आणणाऱ्‍या यहोवाच्या जीवनाची शपथ!” असं ते म्हणतील. जो देश मी त्यांच्या वाडवडिलांना दिला होता, त्यात मी त्यांना नक्की परत आणीन.’+

१६ यहोवा म्हणतो, ‘पाहा! मी पुष्कळ मच्छीमारांना बोलावतोय,

ते येऊन त्यांना जाळ्यात पकडतील.

त्यानंतर मी पुष्कळ शिकाऱ्‍यांना बोलवीन,

ते प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक टेकडीवर लपलेल्यांना,

तसंच, प्रत्येक खडकाच्या कपारीत लपलेल्यांना शोधून त्यांची शिकार करतील.

१७ कारण ते जे काही करतात त्यावर माझी नजर आहे.

ते माझ्यापासून लपलेले नाहीत,

किंवा त्यांचे अपराध माझ्या नजरेतून सुटलेले नाहीत.

१८ सगळ्यात आधी तर मी त्यांना त्यांच्या अपराधांचा आणि पापांचा पूर्ण मोबदला देईन.+

कारण त्यांनी आपल्या निर्जीव देवांच्या घृणास्पद मूर्तींनी माझा देश दूषित करून टाकलाय,

आणि माझ्या वारशाचा प्रदेश त्यांनी आपल्या किळसवाण्या गोष्टींनी भरून टाकलाय.’”+

१९ हे यहोवा! तूच माझं बळ आणि माझा मजबूत गड आहेस,

संकटाच्या काळात तूच माझं आश्रयस्थान आहेस.+

पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांतल्या राष्ट्रांतून लोक तुझ्याकडे येतील,

आणि म्हणतील: “आमच्या वाडवडिलांना वारशात फक्‍त खोटेपणा मिळाला;

कोणताही फायदा नसलेल्या व्यर्थ गोष्टीच मिळाल्या.”+

२० एखादा माणूस स्वतःसाठी देव बनवू शकतो का?

तो जे काही बनवतो ते मुळात देव नाहीत.+

२१ “म्हणून आता मी त्यांना दाखवून देईन,

या वेळी मी त्यांना माझी शक्‍ती आणि ताकद दाखवून देईन.

तेव्हा त्यांना कळेल, की माझं नाव यहोवा आहे.”

१७ “यहूदाचं पाप लोखंडी लेखणीने लिहिण्यात आलंय.

ते हिऱ्‍याच्या टोकाने त्यांच्या हृदयांवर,

आणि त्यांच्या वेदींच्या शिंगांवर कोरण्यात आलंय.

 २ त्यांच्या मुलांनाही हिरव्यागार वृक्षांजवळ असलेल्या,

आणि टेकड्यांवर व मोकळ्या प्रदेशातल्या डोंगरांवर असलेल्या,+

या वेदींची आणि पुजेच्या खांबांची* आठवण येते.+

 ३ तू तुझ्या संपूर्ण प्रदेशात पाप केलंय.

म्हणून मी तुझी मालमत्ता आणि तुझा सगळा खजिना लूट म्हणून देऊन टाकीन;+

तुझी सगळी उच्च स्थानं* मी लूट म्हणून देऊन टाकीन.+

 ४ मी तुला दिलेला वारसा तू तुझ्याच पापांमुळे गमावून बसशील.+

मी तुला परक्या देशात शत्रूंची गुलामी करायला लावीन.+

कारण तू माझ्या क्रोधाची आग पेटवली आहेस,*+

आणि ती कायम जळत राहील.”

 ५ यहोवा म्हणतो:

“जो* माणसावर भरवसा ठेवतो तो शापित आहे.+

जो माणसाच्या बळावर अवलंबून राहतो,+

आणि ज्याचं मन यहोवापासून दूर जातं, तो शापित आहे.

 ६ तो वाळवंटात एकट्या पडलेल्या झाडासारखा होईल.

त्याच्या वाटेला काहीच चांगलं येणार नाही.

तो ओसाड रानातल्या कोरड्या ठिकाणांत वस्ती करेल,

कोणीही राहू शकत नाही अशा मिठाच्या प्रदेशात तो वस्ती करेल.

 ७ पण जो* यहोवावर भरवसा ठेवतो,

जो यहोवावर विश्‍वास ठेवतो, तो आशीर्वादित आहे.+

 ८ तो अशा एका झाडासारखा होईल जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं असतं,

आणि ज्याची मुळं पाण्याच्या दिशेने पसरलेली असतात.

त्याला उन्हाची झळ बसणार नाही,

उलट त्याची पानं नेहमी टवटवीत राहतील.+

दुष्काळाच्या वर्षी त्याला चिंता वाटणार नाही,

आणि तो आपलं फळ द्यायचं थांबवणार नाही.

 ९ हृदय सगळ्यात जास्त धोका देणारं* आहे आणि ते उतावळं आहे.*+

ते कोण ओळखू शकतं?

१० मी, यहोवा हृदय पारखतो.+

मी प्रत्येकाच्या मनातल्या खोल विचारांचं* परीक्षण करतो,

आणि प्रत्येकाला त्याच्या वागणुकीप्रमाणे,

त्याच्या कामांप्रमाणे प्रतिफळ देतो.+

११ जो माणूस बेइमानीने* धनसंपत्ती मिळवतो,+

तो अशा तितर पक्षिणीसारखा आहे, जी आपण न घातलेली अंडी उबवते.

त्याची धनसंपत्ती त्याच्या आयुष्याच्या मधोमध त्याला सोडून जाईल,

आणि शेवटी तो मूर्ख ठरेल.”

१२ आमचं पवित्र ठिकाण हे सुरुवातीपासून गौरवण्यात आलेलं वैभवशाली राजासन आहे.+

१३ हे यहोवा, तूच इस्राएलची आशा आहेस.

तुला सोडून जाणाऱ्‍या सगळ्यांना लज्जित केलं जाईल.

तुझा त्याग करणारे धुळीत लिहिलेल्या अक्षरांसारखे नाहीसे होतील.+

कारण त्या सगळ्यांनी यहोवाला, जिवंत पाण्याच्या झऱ्‍याला सोडून दिलं आहे.+

१४ हे यहोवा! मला बरं कर, म्हणजे मी बरा होईन.

मला वाचव, म्हणजे माझा बचाव होईल.+

कारण मी तुझीच स्तुती करतो.

१५ बघ! ते मला असं म्हणतात:

“काय झालं यहोवाच्या वचनाचं? अजून का नाही पूर्ण झालं ते?”+

१६ पण माझ्या बाबतीत म्हणायचं, तर मेंढपाळ म्हणून मी तुझ्यामागे चालायचं कधीच सोडलं नाही.

किंवा नाशाचा दिवस यावा अशी अपेक्षाही मी केली नाही.

मी जे काही बोललो, ते सगळं तुला माहीत आहे;

तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही!

१७ मला तुझी दहशत बसू देऊ नकोस.

संकटाच्या दिवशी तूच माझं आश्रयस्थान आहेस.

१८ माझा छळ करणाऱ्‍यांना लज्जित होऊ दे,+

पण मला लज्जित होऊ देऊ नकोस.

त्यांना दहशत बसू दे,

पण मला दहशत बसू देऊ नकोस.

त्यांच्यावर संकटाचा दिवस आण,+

त्यांना चिरडून टाक आणि त्यांचा पूर्णपणे* नाश कर.

१९ यहोवाने मला असं सांगितलं: “ज्या दरवाजाने यहूदाचे राजे ये-जा करतात त्या दरवाजाकडे, म्हणजे ‘लोकांच्या पुत्रांच्या दरवाजाकडे’ आणि यरुशलेमच्या सगळ्या दरवाजांकडे जाऊन उभा राहा.+ २० आणि लोकांना असं म्हण, ‘या दरवाजांतून आत येणाऱ्‍या यहूदाच्या राजांनो, यहूदाच्या सगळ्या लोकांनो आणि यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका. २१ यहोवा म्हणतो: “शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरुशलेमच्या दरवाजांतून कोणतंही ओझं बाहेर नेणार नाही किंवा आत आणणार नाही, याची खबरदारी घ्या.+ २२ शब्बाथाच्या दिवशी आपल्या घरांतून कोणतंही ओझं बाहेर आणू नका आणि कोणतंही काम करू नका.+ मी तुमच्या वाडवडिलांना आज्ञा दिली होती, की त्यांनी शब्बाथाचा दिवस पवित्र मानावा.+ २३ पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. ते हट्टीपणे वागत राहिले आणि त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत किंवा माझी शिस्त स्वीकारली नाही.”’+

२४ ‘यहोवा म्हणतो: “पण जर तुम्ही माझी आज्ञा काटेकोरपणे पाळली आणि शब्बाथाच्या दिवशी या शहराच्या दरवाजांतून कोणतंही ओझं आत आणलं नाही; तसंच शब्बाथाच्या दिवशी कोणतंही काम न करता तुम्ही तो दिवस पवित्र मानला,+ २५ तर दावीदच्या राजासनावर बसणारे राजे आणि अधिकारी+ रथांवर आणि घोड्यांवर बसून या शहराच्या दरवाजांतून आत येतील. राजे आणि त्यांचे अधिकारी, यहूदाची माणसं आणि यरुशलेमचे रहिवासी हे सगळे आत येतील;+ आणि या शहरात कायमची लोकवस्ती होईल. २६ यहूदाच्या शहरांतून, यरुशलेमच्या आसपासच्या ठिकाणांतून, बन्यामीनच्या प्रदेशातून,+ सखल प्रदेशातून,+ डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबहून* लोक येतील. ते आपल्यासोबत होमार्पणं,+ बलिदानं,+ अन्‍नार्पणं,+ ऊद* आणि आभार मानण्याची अर्पणं घेऊन यहोवाच्या मंदिरात येतील.+

२७ पण जर शब्बाथाचा दिवस पवित्र मानण्याची, आणि शब्बाथाच्या दिवशी यरुशलेमच्या दरवाजांतून ओझी आत न आणण्याची आज्ञा तुम्ही पाळली नाही, तर मी यरुशलेमच्या दरवाजांना आग लावीन. त्या आगीत तिचे मजबूत मनोरे* जळून खाक होतील+ आणि ती आग कधीच विझणार नाही.”’”+

१८ यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २ “ऊठ आणि कुंभाराच्या घरी जा.+ तिथे मी तुला माझा संदेश सांगीन.”

३ म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो. त्या वेळी तो त्याच्या चाकावर काम करत होता. ४ पण तो जे मातीचं भांडं बनवत होता, ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेलं. म्हणून मग कुंभाराने त्या मातीला हवा तसा आकार देऊन दुसरं एक भांडं बनवलं.

५ तेव्हा यहोवाकडून मला असा संदेश मिळाला: ६ “यहोवा असं म्हणतो, ‘इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! या कुंभाराने जसं केलं तसं मी तुमच्या बाबतीतही करू शकत नाही का? पाहा! कुंभाराच्या हातात जशी माती असते, तसं हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो, तुम्ही माझ्या हातात आहात.+ ७ एखाद्या राष्ट्राविषयी किंवा राज्याविषयी मी जर असं म्हणालो, की मी ते मुळासकट उपटून टाकीन, किंवा उलथून त्याचा नाश करीन;+ ८ पण त्या राष्ट्राने आपला दुष्टपणा सोडून दिला, तर मीसुद्धा त्याच्यावर संकट आणण्याचा माझा विचार बदलून टाकीन.+ ९ याउलट, एखाद्या राष्ट्राविषयी किंवा राज्याविषयी मी जर म्हणालो, की मी ते स्थापन करून उभारीन; १० पण त्या राष्ट्राने माझ्या नजरेत वाईट ते केलं आणि माझं ऐकलं नाही, तर त्याचं भलं करण्याचा माझा विचार मी बदलून टाकीन.’

११ आता यहूदाच्या माणसांना आणि यरुशलेमच्या लोकांना असं सांग: ‘यहोवा म्हणतो, “पाहा! मी तुमच्याविरुद्ध योजना करतोय आणि तुमच्यावर संकट आणायची तयारी करतोय. कृपा करून तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून द्या, आपली वागणूक सुधारा आणि आपल्या चालीरिती बदला.”’”+

१२ पण ते म्हणाले: “असं करण्यात काय अर्थ आहे?+ आम्हाला वाटतं तसंच आम्ही वागू. आमच्यातला प्रत्येक जण हट्टीपणे आणि आपल्या दुष्ट मनाप्रमाणे वागेल.”+

१३ म्हणून यहोवा असं म्हणतो:

“तुम्ही स्वतः इतर राष्ट्रांकडे जाऊन विचारा.

असं काही कोणी कधी ऐकलंय का?

इस्राएलच्या कुमारीने अतिशय भयंकर कृत्य केलंय.+

१४ लबानोनच्या खडकाळ उतारांवरचा बर्फ कधी नाहीसा होतो का?

किंवा लबानोनच्या डोंगरांवरून वाहणारं थंड पाणी कधी आटतं का?

१५ पण माझे लोक मात्र मला विसरून गेलेत.+

ते व्यर्थ गोष्टींसाठी बलिदानांचं हवन करतात.+

ज्या मार्गाने त्यांचे वाडवडील चालायचे त्या मार्गात ते लोकांना अडखळवतात,+

आणि त्यांना ओबडधोबड असलेल्या आडवाटेने* चालायला लावतात.

१६ त्यामुळे त्यांच्या देशाची कायमची अशी अवस्था होईल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल,+

आणि ते शिट्टी वाजवून त्याची थट्टा करतील.+

तिथून येणारा-जाणारा प्रत्येक जण देशाची अवस्था पाहून चकित होईल आणि थट्टेने आपलं डोकं हलवेल.+

१७ पूर्वेचा वारा जसं सुकलेलं गवत विखरून टाकतो, तसं मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे विखरून टाकीन.

ज्या दिवशी त्यांच्यावर संकट कोसळेल त्या दिवशी मी त्यांच्याकडे बघणारही नाही; मी त्यांच्याकडे पाठ फिरवीन.”+

१८ ते म्हणाले: “चला, आपण यिर्मयाविरुद्ध कट रचू.+ कारण याजकांकडून शिक्षण,* बुद्धिमान लोकांकडून सल्ला आणि संदेष्ट्यांकडून संदेश आपल्याला कायम मिळत राहील. आपण त्याच्यावर आरोप लावू आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू.”

१९ हे यहोवा, माझ्याकडे लक्ष दे.

माझे शत्रू काय बोलत आहेत ते ऐक.

२० चांगल्याची परतफेड वाइटाने करणं बरोबर आहे का?

त्यांनी माझा जीव घ्यायला खड्डा खोदलाय.+

त्यांच्यावरचा तुझा राग शांत व्हावा,

म्हणून त्यांच्याविषयी चांगलं बोलायला मी कसं तुझ्यासमोर उभं राहिलो ते आठव.

२१ त्यांच्या मुलांना दुष्काळाच्या हवाली कर,

आणि त्यांना तलवारीला बळी पडू दे.+

त्यांच्या बायका विधवा होऊ दे आणि त्यांची मुलं त्यांच्यापासून दूर होऊ दे.+

त्यांची माणसं जीवघेण्या रोगाने मरू दे,

आणि त्यांचे तरुण युद्धात तलवारीने ठार होऊ दे.+

२२ तू जेव्हा अचानक त्यांच्याविरुद्ध लुटारूंच्या टोळ्या आणशील,

तेव्हा त्यांच्या घरांतून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येऊ दे.

कारण मला पकडण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे,

आणि मला अडकवण्यासाठी त्यांनी जाळं टाकलं आहे.+

२३ पण हे यहोवा! मला मारण्यासाठी त्यांनी केलेले कट तुला चांगले माहीत आहेत.+

त्यांच्या अपराधांची क्षमा करू नकोस,

आणि तुझ्यासमोरून त्यांचे पाप पुसून टाकू नकोस.

तू त्यांच्यावर क्रोधित होऊन त्यांना शिक्षा करशील,+

तेव्हा त्यांना तुझ्यासमोर अडखळून पडू दे.+

१९ यहोवा असं म्हणाला: “जा, आणि कुंभाराकडून एक मातीचं मडकं विकत घे.+ मग लोकांच्या काही प्रमुखांना आणि याजकांच्या काही प्रमुखांना आपल्यासोबत घे. २ आणि ‘खापर दरवाजाच्या’ प्रवेशाजवळ असलेल्या ‘हिन्‍नोमच्या वंशजांच्या खोऱ्‍यात’+ जा. मी सांगीन तो संदेश तिथे जाहीर कर. ३ तू असं म्हण: ‘यहूदाच्या राजांनो आणि यरुशलेमच्या रहिवाशांनो! यहोवाचा संदेश ऐका. इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो:

“मी लवकरच या जागेवर एक संकट आणणार आहे. आणि जो कोणी त्याबद्दल ऐकेल त्याला धक्का बसेल.* ४ कारण त्यांनी मला सोडून दिलंय.+ आणि त्यांनी या जागेची अशी अवस्था केली आहे, की आता ती ओळखताही येत नाही.+ त्यांना, त्यांच्या वाडवडिलांना किंवा यहूदाच्या राजांनाही माहीत नसलेल्या परक्या दैवतांसाठी ते या ठिकाणी बलिदानं देत आहेत. आणि त्यांनी ही जागा निर्दोष लोकांच्या रक्‍ताने भरून टाकली आहे.+ ५ त्यांनी बआलसाठी उच्च स्थानं* बांधली आहेत. आणि तिथे त्याच्यासाठी होमार्पण म्हणून ते आपल्या मुलांचा अग्नीत होम करत आहेत.+ पण, असं काही करायची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती किंवा त्याबद्दल मी कधी बोललो नव्हतो; असला विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नव्हता.”’+

६ ‘“म्हणून पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा या ठिकाणाला ‘तोफेत’ किंवा ‘हिन्‍नोमच्या वंशजांचं खोरं’ असं म्हटलं जाणार नाही, तर ‘कत्तलीचं खोरं’ म्हटलं जाईल,”+ असं यहोवा म्हणतो. ७ “या ठिकाणी मी यहूदाच्या आणि यरुशलेमच्या सगळ्या योजना उधळून टाकीन. मी त्यांना शत्रूंच्या तलवारीला बळी पाडीन आणि त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांच्या हवाली करीन. मी त्यांची प्रेतं आकाशातल्या पक्ष्यांना आणि जमिनीवरच्या प्राण्यांना अन्‍न म्हणून देईन.+ ८ मी या शहराची अशी अवस्था करीन, की ती बघून लोकांना दहशत बसेल आणि ते शिट्टी वाजवून त्याची थट्टा करतील. तिथून येणारा-जाणारा प्रत्येक जण त्या शहराकडे चकित होऊन पाहील आणि शहरावर आलेल्या सर्व पीडांमुळे थट्टेने शिट्टी वाजवेल.+ ९ मी त्यांना त्यांच्याच मुलाबाळांचं मांस खायला लावीन. कारण त्यांचे शत्रू आणि त्यांच्या जिवावर उठलेले लोक त्यांना वेढा घालतील आणि त्यांची कोंडी करतील. त्या वेळी त्यांची परिस्थिती इतकी वाईट होईल, की त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्याच सोबत्याचं मांस खाईल.”’+

१० मग तुझ्यासोबत आलेल्या माणसांसमोर ते मातीचं मडकं फोडून टाक, ११ आणि त्यांना असं सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “कुंभाराचं मडकं फोडल्यावर ते पुन्हा कधी जोडता येत नाही, तसं मी या लोकांना आणि या शहराला फोडून टाकीन. पुरायला जागा उरणार नाही इतकी प्रेतं ते तोफेतमध्ये पुरतील.”’+

१२ यहोवा म्हणतो, ‘या शहराची आणि इथल्या लोकांची अवस्था तोफेतसारखी व्हावी म्हणून मी असं करीन. १३ यरुशलेममधली घरं आणि यहूदाच्या राजांची घरं तोफेतसारखीच अशुद्ध होतील;+ ज्या घरांच्या छतांवर त्यांनी आकाशाच्या सैन्यांसाठी बलिदानं दिली+ आणि इतर दैवतांसाठी पेयार्पणं ओतली,+ ती सगळी घरं तोफेतसारखीच अशुद्ध होतील.’”

१४ मग यिर्मया तोफेतहून, म्हणजे यहोवाने त्याला भविष्यवाणी करायला पाठवलं होतं तिथून परत आला. आणि यहोवाच्या मंदिराच्या अंगणात जाऊन उभा राहिला. तो सगळ्या लोकांना म्हणाला: १५ “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘पाहा! मी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी या शहरावर आणि त्याच्या सगळ्या नगरांवर संकट आणतोय. कारण हे लोक हट्टीपणे वागलेत, आणि माझ्या आज्ञा पाळायला त्यांनी नकार दिलाय.’”+

२० यिर्मया या गोष्टींची भविष्यवाणी करत होता, तेव्हा इम्मेरच्या मुलाने, म्हणजे पशहूर याजकाने ती ऐकली. तो यहोवाच्या मंदिरातला मुख्य अधिकारीही होता. पशहूरने ती भविष्यवाणी ऐकली, २ तेव्हा त्याने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि त्याला खोड्यांत* अडकवून ठेवलं;+ हे खोडे यहोवाच्या मंदिरातल्या ‘बन्यामीनच्या वरच्या दरवाजाजवळ’ होते. ३ पण, दुसऱ्‍या दिवशी जेव्हा पशहूरने यिर्मयाला खोड्यांतून मोकळं केलं, तेव्हा यिर्मया त्याला म्हणाला:

“यहोवाने तुझं ‘पशहूर’ हे नाव बदलून तुला ‘चौफेर दहशत’ असं नाव दिलंय.+ ४ कारण यहोवा म्हणतो, ‘मी तुझी अशी दशा करीन, की ती पाहून तुला स्वतःला आणि तुझ्या सगळ्या मित्रांना दहशत बसेल. ते सगळे तुझ्या डोळ्यांदेखत शत्रूंच्या तलवारीला बळी पडतील.+ आणि मी संपूर्ण यहूदाला बाबेलच्या* राजाच्या हाती देईन. तो त्यांना बंदी बनवून बाबेलला घेऊन जाईल आणि तलवारीने त्यांना मारून टाकेल.+ ५ मी या शहराची सगळी धनसंपत्ती, मालमत्ता, मौल्यवान गोष्टी आणि यहूदाच्या राजांचा सगळा खजिना शत्रूंच्या हाती देईन.+ ते या सगळ्या गोष्टी लुटतील, त्या जप्त करतील आणि आपल्यासोबत बाबेलला घेऊन जातील.+ ६ आणि हे पशहूर! तुझ्याबद्दल सांगायचं तर, तू आणि तुझ्या घरात राहणारे सगळे जण बंदिवासात जातील. तू बाबेलला जाशील आणि तिथेच मरशील, आणि तुझ्या सगळ्या मित्रांसोबत तुला तिथेच पुरलं जाईल. कारण तू त्यांना खोटी भविष्यवाणी सांगितलीस.’”+

 ७ हे यहोवा! तू मला फसवलंस आणि मी फसलो.

तू वरचढ ठरलास, कारण तू माझ्यापेक्षा जास्त शक्‍तिशाली आहेस.+

मी लोकांसाठी दिवसभर हसण्याचा विषय बनलोय;

जो तो माझी निंदा करतो.+

 ८ कारण जेव्हाही मी बोलतो, तेव्हा “हिंसाचार आणि नाश!” हाच संदेश मला ओरडून सांगावा लागतो.

यहोवाचा संदेश सांगितल्यामुळे, मला दिवसभर अपमान आणि थट्टा सहन करावी लागते.+

 ९ म्हणून मी म्हणालो: “मी यापुढे त्याच्याबद्दल बोलणार नाही,

आणि त्याच्या नावाने संदेशही देणार नाही.”+

पण, तो संदेश माझ्या मनात धगधगत्या आगीसारखा झाला;

माझ्या हाडांमध्ये कोंडलेल्या अग्नीसारखा तो झाला.

तो आवरता-आवरता मी पार थकून गेलो,

आणि मी आणखी गप्प बसू शकलो नाही.+

१० कारण मी बऱ्‍याच वाईट अफवा ऐकल्या आहेत;

भीतीने मला घेरलं आहे.+

ते म्हणाले, “चला आपण त्याची बदनामी करू! त्याला बदनाम करून टाकू!”

माझ्याशी चांगलं वागणारे लोकही माझ्या वाइटावर टपले होते.+

ते म्हणत होते: “तो कदाचित मूर्खासारखं वागून एखादी चूक करेल,

मग आपल्याला त्याच्यावर प्रबळ होऊन बदला घेता येईल.”

११ पण यहोवा एका शूर योद्ध्यासारखा माझ्या पाठीशी उभा होता.+

म्हणून माझा छळ करणारे अडखळतील आणि ते माझ्यावर प्रबळ होणार नाहीत.+

ते लज्जित होतील, कारण ते यशस्वी होऊ शकणार नाहीत.

त्यांना कायमचं अपमानित केलं जाईल आणि त्यांचा तो अपमान कोणीच विसरणार नाही.+

१२ हे सैन्यांच्या देवा यहोवा! तू नीतिमान माणसाचं परीक्षण करतोस.

तू माणसाच्या मनातले खोल विचार* आणि त्याचं हृदय पारखतोस.+

हे देवा, मी तुझ्याकडे फिर्याद केली आहे,+

म्हणून तू त्यांचा सूड घे आणि मला तो पाहू दे.+

१३ यहोवाची स्तुती करा! यहोवासाठी गीत गा!

कारण त्याने दुष्ट लोकांच्या हातून गरिबाला सोडवलं आहे.

१४ माझा जन्म झाला तो दिवस शापित असो!

ज्या दिवशी माझ्या आईने मला जन्म दिला, तो दिवस आशीर्वादित ठरू नये!+

१५ “मुलगा झाला! तुम्हाला मुलगा झाला!”

अशी आनंदाची बातमी देऊन,

माझ्या वडिलांना अतिशय आनंदित करणारा माणूस शापित असो.

१६ त्या माणसाची अवस्था अशा शहरांसारखी होवो, जी शहरं यहोवाने उलथून टाकली आणि त्याबद्दल त्याला मुळीच पस्तावा झाला नाही.

त्याच्या कानावर सकाळी आक्रोशाचा, तर भरदुपारी रणशिंगाचा आवाज पडो.

१७ मी गर्भात होतो तेव्हाच त्याने मला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं!

मग माझ्या आईचा गर्भच माझी कबर बनली असती,

आणि मी कायम तिच्या गर्भात पडून राहिलो असतो.+

१८ मी गर्भातून बाहेर का आलो?

दुःख आणि त्रास पाहण्यासाठी?

आयुष्याच्या अखेरपर्यंत अपमान सहन करण्यासाठी?+

२१ यिर्मयाला यहोवाकडून एक संदेश मिळाला. त्याला हा संदेश तेव्हा मिळाला जेव्हा सिद्‌कीया+ राजाने मासेयाचा मुलगा सफन्या+ याजक आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर+ यांना यिर्मयाकडे असं विचारायला पाठवलं होतं: २ “बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर* आमच्याशी युद्ध करायला आलाय.+ म्हणून कृपा करून आमच्यासाठी यहोवाकडे मार्गदर्शन माग. कदाचित यहोवा आमच्यासाठी काहीतरी महान कार्य करेल, आणि बाबेलचा राजा आमच्यापासून निघून जाईल.”+

३ त्यावर यिर्मया त्यांना म्हणाला: “तुम्ही सिद्‌कीयाला जाऊन सांगा, ४ ‘इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: “शहराच्या भिंतींबाहेर वेढा देणाऱ्‍या बाबेलच्या राजाशी आणि खास्दी लोकांशी लढण्यासाठी तुमच्या हातात जी शस्त्रं आहेत, ती मी तुमच्यावरच उलटवीन.+ आणि ती* शहराच्या मधोमध गोळा करीन. ५ मी स्वतः तुमच्याशी लढाई करीन.+ मी माझा शक्‍तिशाली हात तुमच्यावर उचलीन आणि रागाने, संतापाने आणि मोठ्या क्रोधाने तुमच्याशी लढीन.+ ६ मी या शहरातल्या सगळ्या माणसांना आणि प्राण्यांना मारून टाकीन. ते सगळे जीवघेण्या रोगांनी मरतील.”’+

७ ‘यहोवा म्हणतो “त्यानंतर मी यहूदाचा राजा सिद्‌कीया याला, त्याच्या सेवकांना आणि शहरातले जे लोक रोगराईपासून, तलवारीपासून व दुष्काळापासून वाचतील त्या सगळ्यांना त्यांच्या शत्रूंच्या, त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांच्या आणि बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हवाली करीन.+ तो त्यांना तलवारीने मारून टाकेल. तो कोणाचीही गय करणार नाही, किंवा कोणालाही दयामाया दाखवणार नाही.”’+

८ आणि या लोकांना तू असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “मी तुम्हाला जीवनाचा मार्ग किंवा मृत्यूचा मार्ग निवडायची संधी देतोय. ९ जे लोक या शहरात राहतील ते तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मरतील. पण जो कोणी बाहेर पडेल आणि शहराला वेढा घातलेल्या खास्दी लोकांना शरण जाईल तो जिवंत राहील; तो आपला जीव वाचवेल.”’+

१० ‘“कारण, मी या शहराचं भलं नाही, तर त्याचा नाश करायचा पक्का निश्‍चय केलाय,”+ असं यहोवा म्हणतो. “हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती दिलं जाईल,+ आणि तो ते जाळून टाकेल.”+

११ हे यहूदाच्या राजाच्या घराण्या! यहोवाचा संदेश ऐक. १२ हे दावीदच्या घराण्यातल्या लोकांनो, यहोवा असं म्हणतो:

“दररोज खरेपणाने न्याय करा,

आणि जो लुबाडला जातोय, त्याला लुबाडणाऱ्‍याच्या हातून सोडवा.+

नाहीतर, तुमच्या दुष्ट कामांमुळे+ माझा क्रोध आगीसारखा तुमच्यावर भडकेल,+

आणि तो कोणीही शांत करू शकणार नाही.”’

१३ ‘हे खोऱ्‍यात राहणाऱ्‍या रहिवाशा! हे सपाट प्रदेशातल्या खडका!

बघ, मी तुझ्या विरोधात येतोय.’ असं यहोवा म्हणतो.

‘आणि तुम्ही जे असं म्हणता: “कोण आमच्या विरोधात येण्याची हिंमत करेल?

आणि कोण आमच्या वस्त्यांवर हल्ला करू शकेल?”

१४ त्या तुमच्याकडून मी तुमच्या कामांनुसार हिशोब घेईन,’+ असं यहोवा म्हणतो.

‘मी तुमच्या जंगलाला आग लावून टाकीन,

आणि त्यात तुमच्या आजूबाजूचं सगळं काही भस्म होऊन जाईल.’”+

२२ यहोवा असं म्हणतो: “यहूदाच्या राजाच्या महालात जा आणि हा संदेश सांग. २ तू असं म्हण, ‘दावीदच्या राजासनावर बसणाऱ्‍या यहूदाच्या राजा! तू, तुझे सेवक आणि या दरवाजांतून आत येणारे सगळे लोक, यहोवाचा संदेश काय आहे तो ऐका. ३ यहोवा असं म्हणतो: “न्यायाने आणि नीतीने वागा. जो लुबाडला जातोय, त्याला लुबाडणाऱ्‍याच्या हातून सोडवा. तुमच्यात राहणाऱ्‍या विदेशी लोकांना वाईट वागणूक देऊ नका. अनाथांचं* आणि विधवांचं नुकसान करू नका.+ आणि या ठिकाणी निर्दोष रक्‍त सांडू नका.+ ४ तुम्ही या गोष्टींचं काळजीपूर्वक पालन केलं, तर दावीदच्या राजासनावर+ बसणारे राजे रथांवर आणि घोड्यांवर बसून या महालाच्या दरवाजांतून आत येतील; त्यांच्यासोबत त्यांचे सेवक आणि सगळे लोकही येतील.”’+

५ ‘पण जर तुम्ही या गोष्टींचं पालन केलं नाही, तर मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, की हा राजमहाल पूर्णपणे उद्ध्‌वस्त होऊन जाईल,’ असं यहोवा म्हणतो.+

६ यहूदाच्या राजाच्या महालाविषयी यहोवा म्हणतो,

‘तू माझ्यासाठी गिलादसारखा,

लबानोनच्या शिखरासारखा आहेस.

पण मी तुला ओसाड रान बनवून टाकीन;

तुझ्या एकाही शहरात लोक राहणार नाहीत.+

 ७ आणि मी नाश करणाऱ्‍यांना तुझा नाश करण्यासाठी नेमीन;

ते सगळे शस्त्रं घेऊन येतील.+

ते तुझी देवदाराची चांगली-चांगली झाडं कापून आगीत टाकतील.+

८ आणि या शहराजवळून येणारे-जाणारे इतर राष्ट्रांचे लोक एकमेकांना विचारतील: “यहोवाने या महान शहराची अशी अवस्था का केली?”+ ९ तेव्हा ते म्हणतील: “कारण त्यांनी त्यांचा देव यहोवा याचा करार मोडला, आणि इतर दैवतांच्या पाया पडून त्यांनी त्यांची उपासना केली.”’+

१० जो मेलाय त्याच्यासाठी रडू नका,

त्याच्यासाठी शोक करू नका.

याउलट, जो बंदिवासात चाललाय त्याच्यासाठी ढसाढसा रडा.

कारण तो आपली जन्मभूमी पाहायला परत कधीच येऊ शकणार नाही.

११ जो आपल्या वडिलांच्या जागी राजा बनला+ आणि आता बंदिवासात गेलाय, त्या योशीयाच्या मुलाबद्दल, म्हणजे यहूदाचा राजा शल्लूम*+ याच्याबद्दल यहोवा असं म्हणतो: ‘तो परत कधीच इथे येणार नाही. १२ कारण, ज्या ठिकाणी त्याला बंदी बनवून नेण्यात आलंय, त्याच ठिकाणी तो मरेल. तो हा देश पुन्हा कधीच पाहू शकणार नाही.’+

१३ जो नीतीने आपलं घरं बांधत नाही,

आणि न्यायाने वरच्या खोल्या बांधत नाही, त्याचा धिक्कार असो!

जो आपल्या सोबत्याकडून फुकट सेवा करून घेतो,

जो त्याला त्याची मजुरी देत नाही;+

त्याचा धिक्कार असो!

१४ जो म्हणतो, ‘मी स्वतःसाठी एक आलिशान घर बांधीन,

आणि वरती मोठमोठ्या खोल्या काढीन.

मी त्या घराला खिडक्या बनवीन,

देवदाराच्या लाकडांच्या चौकटी बसवीन,

आणि त्याला लाल रंग देईन,

त्याचा धिक्कार असो!’

१५ तुला काय वाटतं, तू इतरांपेक्षा जास्त देवदाराची लाकडं वापरून राजमहाल बांधलास म्हणून तुझं राज्य टिकून राहील?

तुझ्या वडिलानेही खाणंपिणं केलं,

पण त्याने खरेपणाने न्याय केला आणि तो नीतीने वागला,+ म्हणून त्याचं भलं झालं.

१६ त्याच्याकडे आलेल्या दीनदुबळ्यांना आणि गरिबांना त्याने न्याय दिला, म्हणून त्याचं चांगलं झालं.

‘मला ओळखण्याचा हाच अर्थ होत नाही का?’ असं यहोवा म्हणतो.

१७ ‘पण तुझे डोळे आणि तुझं मन हे फक्‍त बेइमानीच्या कमाईकडे, निर्दोष रक्‍त सांडण्याकडे,

आणि फसवणूक व लुबाडणूक करण्याकडे लागलंय.’

१८ म्हणून यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्याविषयी यहोवा म्हणतो,

‘लोक सहसा शोक करताना म्हणतात:

“अरेरे, माझ्या भावा! अरेरे, माझ्या बहिणी!”

पण, त्याच्यासाठी कोणीही शोक करून असं म्हणणार नाही:

“अरेरे! माझ्या मालकाचं वैभव कसं नाहीसं झालं!”

१९ गाढवाच्या शवाचं जसं केलं जातं,

तसंच त्याच्या बाबतीतही केलं जाईल;+

त्याचं प्रेत यरुशलेमच्या दरवाजांबाहेर फरफटत नेऊन फेकून दिलं जाईल.’+

२० वर लबानोनकडे जा आणि आक्रोश कर,

बाशानमध्ये गळा काढून रड, आणि अबारीममधून मोठ्याने शोक कर.+

कारण तुझ्या सगळ्या प्रियकरांना चिरडून टाकण्यात आलंय.+

२१ तुझं सगळं काही सुरळीत चाललं होतं तेव्हा मी तुझ्याशी बोललो,

पण तू म्हणालीस, ‘मी नाही ऐकणार.’+

तुझ्या तरुणपणापासून तू असंच वागत आलीस,

तू कधीच माझं ऐकलं नाही.+

२२ वारा तुझ्या सगळ्या मेंढपाळांना उधळून लावेल,+

आणि तुझे सगळे प्रियकर बंदिवासात जातील.

तेव्हा तुझ्यावर आलेल्या सगळ्या संकटांमुळे तू लज्जित आणि अपमानित होशील.

२३ हे लबानोनमध्ये राहणारी स्त्री,+

देवदाराच्या झाडांमध्ये घरटं करून राहणारी स्त्री!+

बाळाला जन्म देणाऱ्‍या स्त्रीप्रमाणे जेव्हा तुला कळा येतील,

तुला प्रसूतीच्या वेदना होतील, तेव्हा तू किती कण्हशील!”+

२४ “यहोवा म्हणतो, ‘हे यहोयाकीमच्या+ मुला, हे यहूदाच्या राजा कोन्या!*+ माझ्या जीवनाची शपथ, तू माझ्या उजव्या हातातली मुद्रेची अंगठी जरी असतास, तरी मी तुला काढून फेकून दिलं असतं! २५ मी तुला तुझ्या जिवावर टपलेल्यांच्या आणि ज्यांची तुला भीती वाटते त्यांच्या हाती देईन; मी तुला बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या आणि खास्दी लोकांच्या हाती देईन.+ २६ मी तुला आणि तुला जन्म देणाऱ्‍या तुझ्या आईला एका परक्या देशात फेकून देईन; जिथे तुझा जन्म झाला नाही अशा एका देशात मी तुम्हाला फेकून देईन. आणि तिथेच तुम्ही मराल. २७ तुला आपल्या देशात परत यायची आस लागेल, पण तू तिथे कधीच परत येणार नाहीस.+

२८ हा कोन्या तुच्छ आणि फुटक्या मडक्यासारखा आहे का?

कोणालाही नको असलेल्या भांड्यासारखा तो आहे का?

त्याला आणि त्याच्या वंशजांना खाली का फेकण्यात आलंय?

त्यांना माहीत नाही अशा देशात त्यांना का फेकण्यात आलंय?’+

२९ हे पृथ्वी!* हे पृथ्वी! हे पृथ्वी! यहोवाचा संदेश ऐक.

३० यहोवा असं म्हणतो:

‘या माणसाविषयी असं लिही, की याला मुलबाळ नाही,

त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याला यश मिळणार नाही.

कारण त्याच्या वंशजांपैकी कोणीही,

दावीदच्या राजासनावर बसणार नाही किंवा यहूदावर शासन करणार नाही.’”+

२३ यहोवा म्हणतो: “माझ्या कुरणातल्या मेंढरांचा नाश करणाऱ्‍या आणि त्यांची पांगापांग करणाऱ्‍या मेंढपाळांचा धिक्कार असो!”+

२ इस्राएलचा देव यहोवा आपल्या लोकांची राखण करणाऱ्‍या मेंढपाळांविषयी म्हणतो: “तुम्ही माझ्या मेंढरांना विखरून टाकलंत; तुम्ही त्यांची पांगापांग करत राहिलात आणि त्यांची काळजी घेतली नाही.”+

“म्हणून आता तुमच्या दुष्ट कामांमुळे मी तुमचा समाचार घेईन,” असं यहोवा म्हणतो.

३ “मग ज्या सगळ्या देशांमध्ये मी माझ्या मेंढरांची पांगापांग केली, तिथून मी माझ्या उरलेल्या मेंढरांना गोळा करीन+ आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन;+ ते फलदायी होतील व त्यांची संख्या वाढेल.+ ४ आणि त्यांच्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे मनापासून त्यांचा सांभाळ करतील.+ त्यानंतर माझी मेंढरं परत कधीच घाबरणार नाहीत, त्यांना कधीच भीती वाटणार नाही आणि त्यांच्यातलं एकही मेंढरू कधीच हरवणार नाही,” असं यहोवा म्हणतो.

५ “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी दावीदच्या वंशातून एक नीतिमान अंकुर उगवीन.*+ तो राजा म्हणून सुज्ञतेने, न्यायाने आणि नीतीने देशात शासन करेल,” असं यहोवा म्हणतो.+ ६ “त्याच्या शासनकाळात यहूदाचा बचाव होईल+ आणि इस्राएल सुरक्षित राहील.+ आणि त्याला, ‘यहोवा आमचं नीतिमत्त्व,’ या नावाने ओळखलं जाईल.”+

७ यहोवा म्हणतो: “पण असे दिवस येत आहेत जेव्हा, ‘इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणणाऱ्‍या यहोवाच्या जीवनाची शपथ!’ असं ते म्हणणार नाहीत.+ ८ याउलट, ‘इस्राएलच्या घराण्यातल्या वंशजांची उत्तरेच्या आणि इतर सर्व देशांत पांगापांग करणाऱ्‍या आणि त्यांना तिथून बाहेर काढून परत आणणाऱ्‍या यहोवाच्या जीवनाची शपथ!’ असं ते म्हणतील. आणि ते आपल्या स्वतःच्या देशात राहतील.”+

९ संदेष्ट्यांसाठी असलेला संदेश:

माझं मन अतिशय दुःखी झालं आहे.

माझी सगळी हाडं थरथर कापत आहेत.

यहोवामुळे आणि त्याच्या पवित्र शब्दांमुळे,

मी नशेत असलेल्या माणसासारखा झालो आहे,

द्राक्षारस पिऊन झिंगलेल्या माणसासारखा मी झालो आहे.

१० कारण संपूर्ण देश व्यभिचारी लोकांनी भरून गेला आहे;+

देश शापित झाल्यामुळे शोक करत आहे,+

आणि रानातली कुरणं वाळून गेली आहेत.+

लोकांची वृत्ती वाईट झाली आहे आणि ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत.

११ “संदेष्टे आणि याजक दोघंही भ्रष्ट* झाले आहेत.+

माझ्या मंदिरातसुद्धा मला त्यांचा दुष्टपणा पाहायला मिळालाय,” असं यहोवा म्हणतो.+

१२ “म्हणून त्यांचा मार्ग निसरडा आणि अंधकारमय होईल;+

त्यांना ढकलून दिलं जाईल आणि ते पडतील.

कारण, ज्या वर्षी मी त्यांच्याकडून हिशोब घेईन त्या वर्षी मी त्यांच्यावर संकट आणीन,” असं यहोवा म्हणतो.

१३ “मी शोमरोनच्या+ संदेष्ट्यांमध्ये किळसवाण्या गोष्टी पाहिल्या आहेत.

ते बआलच्या नावाने भविष्यवाण्या करतात,

आणि माझ्या इस्राएली लोकांची दिशाभूल करतात.

१४ मी यरुशलेमच्या संदेष्ट्यांमध्येही भयंकर गोष्टी पाहिल्या आहेत.

ते व्यभिचार करतात+ आणि लबाडीने वागतात;+

ते वाईट कामं करणाऱ्‍यांना उत्तेजन देतात,

आणि आपल्या दुष्ट कामांपासून ते मागे वळत नाहीत.

माझ्यासाठी ते सगळे सदोमसारखे झाले आहेत,+

आणि या शहरात राहणारे सगळे लोक माझ्यासाठी गमोरासारखे झाले आहेत.”+

१५ म्हणून सैन्यांचा देव यहोवा या संदेष्ट्यांविषयी असं म्हणतो:

“पाहा, मी त्यांना कडूदवणा* खायला लावीन,

आणि त्यांना विषारी पाणी प्यायला देईन.+

कारण यरुशलेमच्या संदेष्ट्यांमुळे देशातले सगळे लोक देवाला सोडून दूर गेले आहेत.”*

१६ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“तुम्हाला भविष्यवाणी सांगणाऱ्‍या संदेष्ट्यांकडे लक्ष देऊ नका.+

ते तुम्हाला फसवत आहेत.*

ते सांगत असलेले दृष्टान्त त्यांच्या स्वतःच्याच मनाचे आहेत;+

ते यहोवाकडून नाहीत.+

१७ माझा अनादर करणाऱ्‍यांना ते वारंवार म्हणतात,

‘यहोवाने म्हटलंय: “तुम्ही सुखात राहाल.”’+

तर स्वतःच्या हट्टी मनाप्रमाणे वागणाऱ्‍यांना ते म्हणतात,

‘तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही.’+

१८ यहोवाच्या मित्रमंडळीत त्याचा संदेश ऐकायला आणि तो समजून घ्यायला कोण उभा आहे?

कोणी त्याचा संदेश लक्ष देऊन ऐकलाय?

१९ पाहा! यहोवाच्या क्रोधाचं भयानक वादळ सुटेल;

चक्रीवादळासारखं ते गरगर फिरत दुष्ट लोकांच्या डोक्यावर येऊन आदळेल.+

२० जोपर्यंत यहोवा आपल्या मनात ठरवलेल्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करत नाही,

तोपर्यंत त्याचा क्रोध शांत होणार नाही.

शेवटच्या काळात तुम्हाला या गोष्टी स्पष्टपणे कळतील.

२१ मी संदेष्ट्यांना पाठवलं नाही, तरी ते धावत सुटले.

मी त्यांच्याशी बोललो नाही, तरी त्यांनी भविष्यवाण्या सांगितल्या.+

२२ पण ते जर माझ्या मित्रमंडळीत असते,

तर त्यांनी माझ्या लोकांना माझा संदेश सांगितला असता,

आणि त्यांना आपल्या दुष्ट मार्गांपासून मागे फिरायला आणि आपली वाईट कामं सोडून द्यायला लावलं असतं.”+

२३ यहोवा म्हणतो: “मी फक्‍त जवळ असतानाच देव आहे का?

दूर असतानाही मी देव नाही का?”

२४ यहोवा म्हणतो: “जर कोणी गुप्त ठिकाणी लपून बसला, तर मी त्याला पाहू शकणार नाही का?”+

यहोवा म्हणतो: “स्वर्गात आणि पृथ्वीवर अशी एकतरी गोष्ट आहे का, जी माझ्या नजरेतून सुटू शकते?+

२५ माझ्या नावाने खोट्या भविष्यवाण्या करणाऱ्‍या संदेष्ट्यांना मी असं म्हणताना ऐकलं, ‘मी एक स्वप्न पाहिलंय! मी एक स्वप्न पाहिलंय!’+ २६ हे संदेष्टे आणखी किती दिवस खोट्या भविष्यवाण्या करत राहतील? ते आपल्याच मनाच्या गोष्टी सांगणारे फसवे संदेष्टे आहेत.+ २७ त्यांचे वाडवडील जसं बआल दैवतामुळे माझं नाव विसरून गेले,+ तसं माझ्या लोकांनीही माझं नाव विसरून जावं, म्हणून हे संदेष्टे एकमेकांना स्वप्नं सांगत आहेत. २८ एखाद्या संदेष्ट्याला जर स्वप्न पडलं, तर त्याला ते सांगू द्या; पण ज्याच्याकडे माझा संदेश आहे त्याने तो खरा-खरा सांगावा.”

“धान्यापुढे गवताच्या काडीची काय किंमत?” असं यहोवा म्हणतो.

२९ यहोवा म्हणतो, “माझा संदेश आगीसारखा+ आणि खडकांचा चुराडा करणाऱ्‍या हातोड्यासारखा नाही का?”+

३० यहोवा म्हणतो, “म्हणून पाहा! इतर संदेष्ट्यांकडून माझा संदेश चोरणाऱ्‍या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन.”+

३१ यहोवा म्हणतो, “जे संदेष्टे म्हणतात, ‘देवाकडून असा संदेश आहे!’ त्यांना मी शिक्षा करीन.”+

३२ यहोवा म्हणतो, “फुशारक्या मारून आणि खोटी स्वप्नं सांगून माझ्या लोकांची दिशाभूल करणाऱ्‍या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन.”+

“मी त्यांना पाठवलं नाही किंवा त्यांना आज्ञाही दिली नाही. म्हणून त्यांच्यापासून या लोकांना काहीच फायदा होणार नाही,”+ असं यहोवा म्हणतो.

३३ “जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा एखादा याजक तुला असं म्हणेल: ‘यहोवाचा संदेश ओझ्यासारखा आहे,’ तेव्हा तू त्यांना म्हण, ‘“तुम्ही स्वतःच एक ओझं आहात! आणि मी तुम्हाला टाकून देईन,”+ असं यहोवा म्हणतो.’ ३४ जे लोक किंवा जो संदेष्टा किंवा जो याजक असं म्हणतो, की ‘यहोवाचा संदेश एक ओझं आहे,’ त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला मी शिक्षा करीन. ३५ तुमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या सोबत्याला आणि आपल्या भावाला असं विचारतो, ‘यहोवाने काय उत्तर दिलं? यहोवा आपल्याला काय म्हणाला?’ ३६ तेव्हा असं म्हणायचं बंद करा, की यहोवाचा संदेश एक ओझं आहे. तुम्ही आपल्या जिवंत देवाच्या संदेशाचा, सैन्यांचा देव यहोवा याच्या संदेशाचा स्वतःच्या मनाप्रमाणे अर्थ लावलाय आणि त्यात फेरबदल केलाय. आणि म्हणून तो तुमच्यासाठी ओझ्यासारखा झालाय.

३७ तू संदेष्ट्यांना असं म्हण, ‘यहोवाने काय उत्तर दिलं? यहोवा तुम्हाला काय म्हणाला? ३८ तुम्ही जर असं म्हणत राहिलात, की “यहोवाचा संदेश एक ओझं आहे!” तर यहोवा म्हणतो: “‘यहोवाचा संदेश एक ओझं आहे’ असं म्हणू नका इतकं सांगूनही तुम्ही म्हणत राहता, ‘यहोवाचा संदेश एक ओझं आहे!’ ३९ म्हणून पाहा! मी तुम्हाला उचलून माझ्यासमोरून दूर फेकून देईन; जे शहर मी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिलं होतं, त्या शहरासकट मी तुम्हाला फेकून देईन. ४० मी तुम्हाला कायमचं लज्जित करीन. आणि तुमचा असा अपमान करीन, की तो कधीही विसरला जाणार नाही.”’”+

२४ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने यहूदाच्या राजाला, म्हणजे यहोयाकीमचा मुलगा+ यखन्या*+ याला यरुशलेममधून बाबेलला बंदी बनवून नेलं. तसंच, त्याने यहूदाच्या अधिकाऱ्‍यांना, कारागिरांना आणि धातूकाम करणाऱ्‍यांनाही* बंदिवासात नेलं.+ त्यानंतर, यहोवाने मला अंजिरांनी भरलेल्या दोन टोपल्या दाखवल्या. त्या यहोवाच्या मंदिरासमोर ठेवल्या होत्या. २ एका टोपलीत खूप चांगली अंजिरं होती; पहिल्या हंगामातल्या पिकलेल्या फळांसारखी ती होती. तर दुसऱ्‍या टोपलीत खूप खराब अंजिरं होती; कोणीही खाऊ शकणार नाही इतकी ती खराब होती.

३ मग यहोवाने मला विचारलं: “यिर्मया, तुला काय दिसतंय?” तेव्हा मी म्हणालो: “मला अंजिरं दिसत आहेत. चांगली अंजिरं खूप चांगली आहेत. पण खराब अंजिरं इतकी खराब आहेत, की ती खाण्यालायक नाहीत.”+

४ मग यहोवाकडून मला असा संदेश मिळाला: ५ “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, ‘मी ज्यांना या ठिकाणाहून खास्दी लोकांच्या देशात बंदिवासात पाठवलंय, त्या यहूदाच्या लोकांना मी या चांगल्या अंजिरांसारखं समजेन. ६ त्यांचं भलं व्हावं म्हणून माझं लक्ष कायम त्यांच्यावर राहील. आणि मी त्यांना परत या देशात घेऊन येईन.+ मी त्यांचा नाश करणार नाही, तर त्यांची भरभराट करीन. मी त्यांना मुळासकट उपटून टाकणार नाही, तर त्यांना रोपासारखं लावीन.+ ७ आणि मी यहोवा आहे हे ओळखणारं हृदय मी त्यांना देईन.+ ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.+ कारण ते पूर्ण मनाने माझ्याकडे परत येतील.+

८ पण खाण्यालायक नसलेल्या खराब अंजिरांबद्दल+ यहोवा असं म्हणतो: “यहूदाचा राजा सिद्‌कीया,+ त्याचे अधिकारी आणि या देशात व इजिप्तमध्ये राहत असलेले यरुशलेमचे उरलेले लोक यांना+ मी या खराब अंजिरांसारखं समजेन. ९ मी त्यांच्यावर असं संकट आणीन आणि त्यांची अशी दशा करीन, की ती पाहून पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांना दहशत बसेल.+ जिथे-जिथे मी त्यांची पांगापांग करीन,+ तिथे-तिथे लोक त्यांची निंदा करतील, त्यांची टर उडवायला म्हणी रचतील, त्यांची थट्टा करतील आणि त्यांना शिव्याशाप देतील.+ १० आणि जो देश मी त्यांना आणि त्यांच्या वाडवडिलांना दिला होता, त्यातून त्यांचा पूर्णपणे नाश होईपर्यंत मी त्यांच्यावर दुष्काळ, तलवार+ आणि रोगराई पाठवीन.”’”+

२५ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाला यहूदाच्या सगळ्या लोकांविषयी देवाकडून संदेश मिळाला;+ ते वर्ष, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या शासनकाळाचं पहिलं वर्ष होतं. २ यिर्मया संदेष्ट्याने यहूदाच्या सगळ्या लोकांबद्दल* आणि यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांबद्दल* असा संदेश दिला:

३ “यहूदाचा राजा, म्हणजे आमोनचा मुलगा योशीया याच्या शासनकाळाच्या १३ व्या वर्षापासून आजपर्यंत,+ गेली २३ वर्षं मला यहोवाकडून संदेश मिळत राहिला. आणि मी तो वारंवार तुम्हाला सांगत राहिलो. पण तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही.+ ४ यहोवा आपल्या सेवकांना, म्हणजे आपल्या सगळ्या संदेष्ट्यांना वारंवार तुमच्याकडे पाठवत राहिला. पण तुम्ही त्यांचं ऐकलं नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही.+ ५ ते तुम्हाला सांगायचे, ‘कृपा करून, आपल्या वाईट मार्गांपासून मागे वळा आणि आपली वाईट कामं सोडून द्या.+ तुम्ही असं कराल, तर जो देश यहोवाने फार पूर्वी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिला होता त्यात तुम्ही बराच काळ राहाल. ६ इतर देवांच्या नादी लागू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांच्या पाया पडू नका. आणि त्यांच्या मूर्ती बनवून माझा क्रोध भडकवू नका; नाहीतर मी तुमच्यावर संकट आणीन.’

७ ‘पण तुम्ही माझं ऐकलं नाही,’ असं यहोवा म्हणतो. ‘उलट, तुम्ही मूर्ती बनवून माझा क्रोध भडकवला आणि स्वतःवर संकट ओढवून घेतलं.’+

८ त्यामुळे सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘“तुम्ही माझं ऐकलं नाही, ९ म्हणून पाहा, मी उत्तरेकडच्या सगळ्या राष्ट्रांना बोलावून घेतोय,”+ असं यहोवा म्हणतो. “मी माझा सेवक, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याला बोलावून घेतोय.+ मी त्या सगळ्यांना या देशावर, इथल्या रहिवाशांवर आणि आसपासच्या या सर्व राष्ट्रांवर हल्ला करायला आणीन.+ ते येऊन त्यांचा नाश करतील. मी त्यांची अशी अवस्था करीन, की पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल आणि लोक थट्टेने शिट्टी वाजवतील. मी त्यांना कायमचं उद्ध्‌वस्त करून टाकीन. १० तिथे होणारा जल्लोषाचा व आनंदोत्सवाचा आवाज, वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज आणि जात्यावर धान्य दळण्याचा आवाज मी बंद करून टाकीन.+ तसंच, मी तिथल्या दिव्यांचा प्रकाशही विझवून टाकीन. ११ आणि हा संपूर्ण देश उद्ध्‌वस्त होऊन जाईल. पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल अशी याची अवस्था होईल. आणि या सर्व राष्ट्रांना ७० वर्षं बाबेलच्या राजाची गुलामी करावी लागेल.”’+

१२ ‘पण ७० वर्षं पूर्ण झाल्यावर+ मी बाबेलच्या राजाकडून आणि त्या राष्ट्राकडून त्यांच्या अपराधाचा हिशोब घेईन,’*+ असं यहोवा म्हणतो. ‘आणि मी खास्दी लोकांच्या देशाला कायमचं उद्ध्‌वस्त आणि ओसाड करून टाकीन.+ १३ त्या देशाच्या नाशाविषयी मी जे काही बोललो त्यातला एकूण एक शब्द मी पूर्ण करीन; यिर्मयाने सर्व राष्ट्रांविषयी केलेल्या ज्या भविष्यवाण्या या पुस्तकात लिहिल्या आहेत, त्या सगळ्या मी पूर्ण करीन. १४ कारण अनेक राष्ट्रं आणि मोठमोठे राजे+ त्यांना आपले गुलाम बनवतील.+ आणि मी त्यांच्या कृत्यांप्रमाणे व त्यांच्या हातच्या कामांप्रमाणे त्यांची परतफेड करीन.’”+

१५ इस्राएलचा देव यहोवा मला म्हणाला: “माझ्या हातातला हा द्राक्षारसाचा प्याला, हा क्रोधाचा प्याला घे. आणि ज्या राष्ट्रांकडे मी तुला पाठवीन, त्या सर्वांना तो प्यायला लाव. १६ तो प्याला पिऊन ते झोकांड्या खातील आणि वेड्यांसारखं वागतील; कारण मी त्यांच्यामध्ये तलवार पाठवतोय.”+

१७ तेव्हा मी यहोवाच्या हातातला तो प्याला घेतला आणि ज्या राष्ट्रांकडे यहोवाने मला पाठवलं त्या सगळ्यांना मी तो प्यायला लावला.+ १८ मी यरुशलेम आणि यहूदाच्या शहरांपासून सुरुवात केली.+ तिच्या राजांचा आणि अधिकाऱ्‍यांचा नाश व्हावा, त्यांची अवस्था पाहून लोकांना दहशत बसावी, त्यांनी थट्टेने शिट्टी वाजवावी आणि त्यांना शाप द्यावेत, म्हणून मी त्यांना तो प्याला प्यायला लावला.+ आणि आज तसंच घडतंय. १९ मग मी तो प्याला फारोला, म्हणजे इजिप्तच्या राजाला, त्याच्या सेवकांना, अधिकाऱ्‍यांना, त्याच्या सगळ्या लोकांना,+ २० आणि त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यांना प्यायला लावला. याशिवाय, मी ऊस देशातल्या सगळ्या राजांना, पलिष्ट्यांच्या राजांना,+ अष्कलोन,+ गाझा व एक्रोनच्या राजांना, तसंच अश्‍दोदच्या उरलेल्यांना तो प्याला प्यायला लावला. २१ मी अदोम,+ मवाब+ आणि अम्मोनी लोकांना;+ २२ सोर आणि सीदोनच्या सगळ्या राजांना,+ समुद्रातल्या बेटावरच्या राजांना; २३ ददान,+ तेमा, बूज आणि जे आपल्या डोक्याच्या बाजूचे केस* कापतात त्या सगळ्यांना;+ २४ अरबी लोकांच्या+ आणि ओसाड रानात राहणाऱ्‍या विदेश्‍यांच्या सगळ्या राजांना; २५ जिम्री, एलाम+ आणि मेदच्या सगळ्या राजांना+ मी तो प्याला प्यायला लावला; २६ याशिवाय, मी उत्तरेकडे असलेल्या जवळच्या आणि दूरच्या सगळ्या राजांना एकापाठोपाठ एक तो प्याला प्यायला लावला. तसंच, मी पृथ्वीवरच्या इतर सर्व राज्यांनाही तो प्यायला लावला. आणि शेवटी, शेशेखचा*+ राजाही तो प्याला पिईल.

२७ तू त्यांना असं सांग, ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पीत राहा, नशा येईपर्यंत पीत राहा. उलट्या करा, खाली पडा आणि पुन्हा उठू नका.+ कारण, तुम्हाला ठार मारायला मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतोय.”’ २८ पण जर त्यांनी तो प्याला तुझ्या हातून घेतला नाही, तर त्यांना असं सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “तुम्हाला हा प्याला प्यावाच लागेल! २९ कारण पाहा! मी जर माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या शहरावर संकट आणायला सुरुवात केली आहे,+ तर मी तुम्हालाही शिक्षा करणार नाही का?”’+

‘तुम्हाला शिक्षा होईलच. कारण मी पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांविरुद्ध तलवार आणतोय,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

३० तू त्यांना भविष्यवाणीतल्या या सगळ्या गोष्टी सांग. त्यांना असं म्हण:

‘यहोवा उंच ठिकाणावरून गर्जना करेल,

तो आपल्या पवित्र निवासस्थानातून मोठ्या आवाजात बोलेल.

पृथ्वीवर असलेल्या आपल्या राहण्याच्या ठिकाणाविरुद्ध तो मोठ्याने गर्जना करेल.

द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवणारे जसं आनंदाने ओरडतात,

तसं तो पृथ्वीवरच्या लोकांवर मिळवलेल्या विजयामुळे आनंदाने गीत गाईल.’

३१ यहोवा म्हणतो, ‘पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत एक मोठा आवाज घुमत राहील.

कारण यहोवाचा सगळ्या राष्ट्रांशी वाद आहे.

तो स्वतः सगळ्या लोकांचा न्याय करेल,+

आणि दुष्टांना तलवारीच्या हवाली करेल.’

३२ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

‘पाहा! राष्ट्रा-राष्ट्रावर एक संकट कोसळतंय.+

आणि पृथ्वीच्या दुर्गम भागांतून एक मोठं वादळ सुटेल.+

३३ त्या दिवशी, यहोवाच्या हातून मेलेले लोक पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत पडून राहतील. कोणीही त्यांच्यासाठी शोक करणार नाही. किंवा त्यांना गोळा करून पुरणार नाहीत. ते जमिनीसाठी खत म्हणून तसेच पडून राहतील.’

३४ मेंढपाळांनो! शोक करा, मोठ्याने रडा!

कळपातल्या प्रमुखांनो, धुळीत लोळा.

कारण तुमची कत्तल करायची आणि पांगापांग करायची वेळ जवळ आली आहे.

एखाद्या मौल्यवान मातीच्या भांड्यासारखा तुमचा खाली पडून चुराडा होईल!

३५ मेंढपाळांना पळून जायला कुठेही जागा उरली नाही,

आणि कळपातल्या प्रमुखांना निसटून जाणं शक्य नाही.

३६ मेंढपाळांचा आक्रोश ऐका!

कळपातल्या प्रमुखांच्या रडण्याचा आवाज ऐका!

कारण यहोवा त्यांची कुरणं उद्ध्‌वस्त करतोय.

३७ ज्या ठिकाणी सुखशांती असायची,

ती ठिकाणं यहोवाच्या जळजळीत क्रोधामुळे सामसूम झाली आहेत.

३८ गुहेतून बाहेर पडणाऱ्‍या तरुण सिंहाप्रमाणे तो बाहेर पडलाय.+

त्याच्या जळजळीत क्रोधामुळे आणि निर्दयी तलवारीमुळे,

या देशाची अशी अवस्था झाली आहे, की पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल.”

२६ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या सुरुवातीला,+ यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २ “यहोवा म्हणतो, ‘यहोवाच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा, आणि यहोवाच्या मंदिरात उपासना करायला येणाऱ्‍या यहूदाच्या शहरांतल्या सगळ्या लोकांना* संदेश दे. मी तुला सांगीन त्या सगळ्या गोष्टी तू त्यांना सांग; त्यातला एकही शब्द गाळू नकोस. ३ कदाचित ते लक्ष देतील आणि त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून मागे वळेल. मग मीसुद्धा त्यांच्या दुष्ट कामांमुळे त्यांच्यावर संकट आणायचा जो विचार केलाय तो बदलेन.+ ४ त्यांना सांग: “यहोवा असं म्हणतो, ‘मी तुम्हाला दिलेले नियम* जर तुम्ही पाळले नाहीत, ५ आणि माझ्या सेवकांचं, म्हणजे मी वारंवार तुमच्याकडे पाठवत असलेल्या संदेष्ट्यांचं जर तुम्ही ऐकलं नाहीत,+ ६ तर मी या मंदिराची दशा शिलोसारखीच करीन.+ आणि या शहराची अशी अवस्था करीन, की पृथ्वीवरची सगळी राष्ट्रं शाप देताना या शहराचं नाव वापरतील.’”’”+

७ मग याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी यिर्मयाला यहोवाच्या मंदिरात या गोष्टी बोलताना ऐकलं.+ ८ यहोवाने यिर्मयाला आज्ञा केलेल्या सगळ्या गोष्टी त्याने सर्व लोकांना सांगितल्या, तेव्हा याजकांनी व संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी त्याला धरलं. ते त्याला म्हणाले: “तू आता नक्कीच मरशील! ९ तू यहोवाच्या नावाने अशी भविष्यवाणी का केलीस, की ‘या मंदिराची दशा शिलोसारखीच होईल आणि हे शहर उद्ध्‌वस्त होऊन त्यात कोणीही राहणार नाही’?” मग, सगळे लोक यहोवाच्या मंदिरात यिर्मयाभोवती जमा झाले.

१० यहूदाच्या अधिकाऱ्‍यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते राजमहालातून यहोवाच्या मंदिरात आले आणि यहोवाच्या मंदिराच्या नवीन दरवाजाजवळ जाऊन बसले.+ ११ मग याजक आणि संदेष्टे, अधिकाऱ्‍यांना आणि सगळ्या लोकांना म्हणाले: “या माणसाला मृत्युदंडाची शिक्षा झालीच पाहिजे!+ कारण याने या शहराविरुद्ध भविष्यवाणी केली आहे आणि तुम्ही स्वतः ती ऐकली आहे.”+

१२ तेव्हा यिर्मया सगळ्या अधिकाऱ्‍यांना आणि सगळ्या लोकांना म्हणाला: “यहोवानेच मला या मंदिराविरुद्ध आणि या शहराविरुद्ध भविष्यवाणी करायला पाठवलंय. तुम्ही जे काही ऐकलं ते सगळं त्यानेच मला सांगायला लावलंय.+ १३ म्हणून आता तुमचे मार्ग बदला आणि तुमची वागणूक सुधारा. तुमचा देव यहोवा याचं ऐका. म्हणजे तुमच्यावर संकट आणण्याविषयी यहोवा जे बोललाय, त्याबद्दल तो आपलं मन बदलेल.+ १४ पण माझ्याविषयी म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. माझ्या बाबतीत तुम्हाला जे योग्य वाटतं, जे बरोबर वाटतं ते करा. १५ पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर मला मारून टाकलंत तर तुम्ही स्वतःवर, या शहरावर आणि इथल्या लोकांवर निर्दोष माणसाचा खून केल्याचा दोष ओढवून घ्याल. कारण खरंतर यहोवानेच मला या सगळ्या गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवलंय.”

१६ तेव्हा अधिकारी आणि सगळे लोक याजकांना आणि संदेष्ट्यांना म्हणाले: “या माणसाला मृत्युदंड मिळावा असं काहीच याने केलं नाही. कारण तो आपला देव यहोवा याच्या नावाने आपल्याशी बोललाय.”

१७ त्यानंतर, देशातले काही वडीलजन उठले आणि लोकांच्या संपूर्ण मंडळीला असं म्हणू लागले: १८ “यहूदाचा राजा हिज्कीया+ याच्या शासनकाळात, मोरेशेथ इथला मीखा+ भविष्यवाणी करायचा. तो यहूदाच्या सगळ्या लोकांना म्हणाला, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो:

“सीयोनला एखाद्या शेतासारखं नांगरलं जाईल,

यरुशलेम दगडमातीचा ढिगारा होईल,+

आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या उच्च स्थानांसारखा होईल.”’+

१९ तेव्हा काय यहूदाच्या हिज्कीया राजाने आणि यहूदाच्या सगळ्या लोकांनी त्याला मारून टाकलं? राजाने यहोवाचं भय बाळगलं नाही का, आणि यहोवाकडे दयेची भीक मागितली नाही का? आणि त्यामुळे यहोवानेसुद्धा त्यांच्यावर संकट आणण्याचा आपला विचार बदलला नाही का?+ आता आपणही स्वतःवर मोठं संकट ओढवून घेत आहोत.

२० या शहराविरुद्ध आणि या देशाविरुद्ध यहोवाच्या नावाने यिर्मयासारखीच भविष्यवाणी करणारा आणखी एक जण होता; तो म्हणजे किर्याथ-यारीम+ इथल्या शमायाचा मुलगा उरीया. २१ जेव्हा यहोयाकीम राजा,+ त्याचे सगळे शूर योद्धे आणि त्याचे सगळे अधिकारी यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा राजाने त्याला मारून टाकायचं ठरवलं.+ पण उरीयाला हे कळलं, तेव्हा तो खूप घाबरला आणि इजिप्तला पळून गेला. २२ मग यहोयाकीम राजाने अखबोरचा मुलगा एलनाथान+ याला आणि त्याच्यासोबत काही माणसांना इजिप्तला पाठवलं. २३ त्यांनी उरीयाला इजिप्तहून धरून आणलं आणि यहोयाकीम राजाकडे नेलं. तेव्हा राजाने त्याला तलवारीने मारून टाकलं+ आणि त्याचा मृतदेह सामान्य लोकांच्या कबरस्तानात फेकून दिला.”

२४ पण शाफानचा+ मुलगा अहीकाम+ याचा यिर्मयाला पाठिंबा होता. म्हणून त्याने यिर्मयाला मरण्यासाठी लोकांच्या हाती पडू दिलं नाही.+

२७ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या सुरुवातीला यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २ “यहोवा मला म्हणाला, ‘तू स्वतःसाठी काही जुवं* तयार कर, आणि ती बांधायला पट्टे बनव. मग ती आपल्या मानेवर ठेव. ३ नंतर ती जुवं, यरुशलेममध्ये यहूदाचा राजा सिद्‌कीया याच्याकडे आलेल्या दूतांच्या हातून अदोमच्या+ राजाला, मवाबच्या+ राजाला, अम्मोनी+ लोकांच्या राजाला, सोरच्या+ राजाला आणि सीदोनच्या+ राजाला पाठव. ४ त्या दूतांना आपापल्या राजांना हे सांगायची आज्ञा दे:

“इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, की तुम्ही आपल्या मालकांना असं सांगा: ५ ‘पृथ्वी, मनुष्य आणि पृथ्वीवर राहणारे सगळे प्राणी मीच बनवले आहेत. मीच त्यांना माझ्या अफाट सामर्थ्याने, माझ्या शक्‍तिशाली हातांनी निर्माण केलंय; आणि मला पाहिजे त्याला मी ते देतो.+ ६ आता मी तुमचे देश माझ्या सेवकाला, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याला दिले आहेत.+ जंगलातले प्राणीसुद्धा मी त्याच्या अधिकाराखाली केले आहेत. ७ सगळी राष्ट्रं त्याची, त्याच्या मुलाची आणि त्याच्या नातवाची सेवा करतील. मग त्याच्या देशाची वेळ येईल,+ तेव्हा अनेक राष्ट्रं आणि मोठमोठे राजे त्याला आपला गुलाम बनवतील.’+

८ ‘जे राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याची सेवा करायला नकार देईल, आणि बाबेलच्या राजाच्या जुवाखाली आपली मान ठेवणार नाही, त्या राष्ट्राला मी तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने शिक्षा करीन.+ मी बाबेलच्या राजाच्या हातून त्या राष्ट्राचा पूर्णपणे नाश करेपर्यंत त्याला शिक्षा करीन,’ असं यहोवा म्हणतो.

९ ‘म्हणून जे तुम्हाला सांगतात, की “तुम्हाला बाबेलच्या राजाची सेवा करावी लागणार नाही,” त्या तुमच्या संदेष्ट्यांचं, शकुन व स्वप्न पाहणाऱ्‍यांचं, मंत्रतंत्र करणाऱ्‍यांचं आणि जादूगारांचं ऐकू नका. १० कारण ते तुम्हाला खोट्या भविष्यवाण्या सांगतात. तुम्ही जर त्यांचं ऐकलं, तर तुम्हाला तुमच्या देशातून फार दूर नेलं जाईल. आणि मी तुमची पांगापांग करीन व तुमचा नाश होईल.

११ पण जे राष्ट्र आपली मान बाबेलच्या राजाच्या जुवाखाली ठेवेल आणि त्याची सेवा करेल, त्या राष्ट्राच्या लोकांना मी त्यांच्या स्वतःच्या देशात राहू देईन; ते स्वतःच्या देशात राहतील आणि तिथे शेतीवाडी करतील,’ असं यहोवा म्हणतो.’”’”

१२ मी यहूदाचा राजा सिद्‌कीया+ यालाही तेच सांगितलं. मी त्याला म्हणालो: “तुम्ही सगळे आपल्या माना बाबेलच्या राजाच्या जुवाखाली ठेवा आणि त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा, म्हणजे तुमचा जीव वाचेल.+ १३ तू आणि तुझ्या लोकांनी तलवारीने,+ दुष्काळाने+ आणि रोगराईने का मरावं?+ कारण जे राष्ट्र बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही त्याच्या बाबतीत हेच घडेल, असं यहोवाने सांगितलंय. १४ ‘तुम्हाला बाबेलच्या राजाची सेवा करावी लागणार नाही,’ असं सांगणाऱ्‍या संदेष्ट्यांचं ऐकू नका.+ कारण ते खोट्या भविष्यवाण्या करतात.+

१५ ‘मी त्यांना पाठवलं नाही’ असं यहोवा म्हणतो. ‘ते माझ्या नावाने खोट्या भविष्यवाण्या करतात. तुम्ही जर त्यांचं ऐकलं, तर मी तुमची आणि तुम्हाला भविष्यवाण्या सांगणाऱ्‍या संदेष्ट्यांची पांगापांग करीन व तुमचा नाश होईल.’”+

१६ शिवाय, मी याजकांना आणि या सगळ्या लोकांना असं म्हणालो: “यहोवा म्हणतो, ‘तुमचे जे संदेष्टे तुम्हाला भविष्यवाण्या सांगून असं म्हणतात, की “पाहा! यहोवाच्या मंदिरातली भांडी लवकरच बाबेलमधून परत आणली जातील,” त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.+ कारण ते तुम्हाला खोट्या भविष्यवाण्या सांगतात.+ १७ तुम्ही त्यांचं ऐकू नका. बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.+ नाहीतर या शहराचा नाश होईल. १८ पण, ते जर खरंच संदेष्टे असतील आणि त्यांच्याकडे खरंच यहोवाचा संदेश असेल, तर त्यांनी सैन्यांचा देव यहोवा याच्याकडे अशी याचना करावी, की यहोवाच्या मंदिरात, यहूदाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममध्ये उरलेली भांडी बाबेलला नेली जाऊ नयेत.’

१९ कारण, सैन्यांचा देव यहोवा याने मंदिरातल्या खांबांविषयी,+ गंगाळ-सागराविषयी*+ आणि हाताने ढकलायच्या गाड्यांविषयी+ एक संदेश दिलाय. तसंच, त्याने या शहरात उरलेल्या भांड्यांविषयीही एक संदेश दिलाय; २० म्हणजे, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने जेव्हा यहूदाचा राजा, अर्थात यहोयाकीमचा मुलगा यखन्या याला आणि त्याच्यासोबत यहूदा व यरुशलेमच्या सर्व प्रतिष्ठित माणसांना यरुशलेममधून बाबेलला बंदी बनवून नेलं, तेव्हा जी भांडी त्याने आपल्यासोबत नेली नव्हती, त्यांविषयी देवाने एक संदेश दिलाय.+ २१ हो, यहोवाच्या मंदिरात, यहूदाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममध्ये उरलेल्या भांड्यांविषयी इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा याने असा संदेश दिलाय: २२ ‘“ती बाबेलला नेली जातील.+ आणि मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत ती तिथेच राहतील. मग मी ती परत आणून या ठिकाणी ठेवीन,” असं यहोवा म्हणतो.’”+

२८ त्याच वर्षी, म्हणजे सिद्‌कीया+ राजाच्या शासनकाळाच्या सुरुवातीला, चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात गिबोन+ इथल्या अज्जूरचा मुलगा, म्हणजे हनन्या संदेष्टा हा यहोवाच्या मंदिरात याजकांसमोर आणि सगळ्या लोकांसमोर मला असं म्हणाला: २ “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘मी बाबेलच्या राजाचं जू* मोडून टाकीन.+ ३ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने यहोवाच्या मंदिरातली जी भांडी इथून बाबेलला नेली, ती सगळी मी दोन वर्षांच्या आत या ठिकाणी परत आणीन.’”+ ४ “यहोवा म्हणतो, ‘मी यहूदाच्या राजाला, म्हणजे यहोयाकीमचा+ मुलगा यखन्या+ याला आणि त्याच्यासोबत बाबेलच्या बंदिवासात गेलेल्या यहूदाच्या सगळ्या लोकांना+ या ठिकाणी परत आणीन. कारण मी बाबेलच्या राजाचं जू मोडून टाकीन.’”

५ मग, यहोवाच्या मंदिरात उभे असलेले याजक आणि सगळे लोक यांच्यासमोर यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याशी बोलला. ६ यिर्मया संदेष्टा त्याला म्हणाला: “आमेन!* यहोवा असंच करो! यहोवाच्या मंदिरातली भांडी आणि बंदिवासात गेलेल्या सगळ्या लोकांना यहोवा बाबेलमधून परत या ठिकाणी आणून तुझी भविष्यवाणी पूर्ण करो! ७ पण आता, मी तुला आणि या सगळ्या लोकांना जो संदेश सांगतोय तो कृपा करून ऐक. ८ फार पूर्वी, म्हणजे माझ्या आणि तुझ्या आधी जे संदेष्टे होते, ते अनेक देशांविषयी आणि मोठमोठ्या राज्यांविषयी सहसा अशी भविष्यवाणी करायचे, की त्यांच्यावर युद्धं, संकटं आणि पीडा* येतील. ९ म्हणून जर एखाद्या संदेष्ट्याने त्यांच्यापेक्षा वेगळी अशी शांतीची भविष्यवाणी केली, तर ती खरी ठरल्यावरच दिसून येईल, की त्याला खरोखर यहोवाने पाठवलंय.”

१० तेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरचं जू काढून ते मोडून टाकलं.+ ११ मग, सगळ्या लोकांसमोर हनन्या असं म्हणाला: “यहोवा म्हणतो, ‘अगदी असंच, मी सगळ्या राष्ट्रांवर असलेलं बाबेलच्या राजाचं, नबुखद्‌नेस्सरचं जू दोन वर्षांच्या आत मोडून टाकीन.’”+ त्यानंतर यिर्मया संदेष्टा तिथून निघून गेला.

१२ हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरचं जू मोडून टाकल्यावर, यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १३ “जा, आणि हनन्याला असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “तू लाकडी जू मोडून टाकलंस.+ पण त्याऐवजी आता लोखंडी जू बनवलं जाईल.” १४ कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “या सगळ्या राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याची सेवा करावी, म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवीन. त्या सगळ्यांना त्याची सेवा करावी लागेल.+ जंगलातल्या प्राण्यांनासुद्धा मी त्याच्या अधिकाराखाली करीन.”’”+

१५ मग यिर्मया संदेष्टा हनन्या+ संदेष्ट्याला म्हणाला: “हे हनन्या, ऐक! यहोवाने तुला पाठवलेलं नाही. तू या लोकांना खोट्या गोष्टीवर विश्‍वास ठेवायला लावलंस.+ १६ म्हणून यहोवा असं म्हणतो, ‘बघ! मी पृथ्वीवरून तुझं नामोनिशाण मिटवून टाकीन. तू याच वर्षी मरशील. कारण तू लोकांना यहोवाविरुद्ध बंड करायला लावलंस.’”+

१७ मग त्याच वर्षी, सातव्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला.

२९ नबुखद्‌नेस्सर राजाने ज्या लोकांना यरुशलेममधून बाबेलला बंदी बनवून नेलं होतं, त्या सगळ्या लोकांना, त्यांच्यामध्ये उरलेल्या वडीलजनांना, याजकांना आणि संदेष्ट्यांना यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमहून एक पत्र पाठवलं. २ त्याने हे पत्र राजा यखन्या,+ राजमाता,+ राजदरबारी, यहूदा व यरुशलेमचे अधिकारी; तसंच, कारागीर आणि धातूकाम करणारे* यांना यरुशलेममधून बंदिवासात नेण्यात आलं त्यानंतर पाठवलं.+ ३ यहूदाचा राजा सिद्‌कीया+ याने ज्यांना बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्याकडे बाबेलला पाठवलं होतं, त्या दोघांच्या हातून, म्हणजे शाफानचा+ मुलगा एलासा आणि हिल्कीयाचा मुलगा गमरयाह यांच्या हातून यिर्मयाने ते पत्र पाठवलं. पत्रात असं लिहिलं होतं:

४ “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा बंदिवासात असलेल्या सगळ्या लोकांना, म्हणजे ज्यांना त्याने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात पाठवलं त्या सगळ्यांना असं म्हणतो, ५ ‘घरंदारं बांधा आणि त्यांत राहा. मळे लावा आणि त्यांची फळं खा. ६ लग्न करा आणि मुलाबाळांना जन्म द्या. तुमच्या मुला-मुलींचीही लग्नं करून द्या, म्हणजे त्यांनाही मुलंबाळं होतील. तिथे तुमची संख्या कमी होऊ देऊ नका; ती वाढू द्या. ७ मी ज्या शहरात तुम्हाला बंदी म्हणून पाठवलंय, त्याच्या भल्यासाठी प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. कारण तिथे जर शांती असेल, तर तुम्हीपण शांतीत राहाल.+ ८ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “तुमच्यामध्ये असलेल्या तुमच्या संदेष्ट्यांना आणि शकुन पाहणाऱ्‍यांना तुमची फसवणूक करू देऊ नका.+ तसंच, स्वप्नं पाहणाऱ्‍यांचंही ऐकू नका. ९ कारण ‘ते माझ्या नावाने तुम्हाला खोट्या भविष्यवाण्या सांगतात. मी त्यांना पाठवलेलं नाही,’+ असं यहोवा म्हणतो.”’”

१० “यहोवा म्हणतो, ‘तुम्हाला बाबेलमध्ये राहून ७० वर्षं पूर्ण झाल्यावर मी तुमच्याकडे लक्ष देईन.+ आणि तुम्हाला या ठिकाणी परत आणायचं माझं वचन मी पूर्ण करीन.’+

११ यहोवा म्हणतो, ‘तुमच्यासाठी माझे काय विचार आहेत, हे मला चांगलं माहीत आहे. ते विचार शांतीचे आहेत; संकटाचे नाहीत.+ ते तुम्हाला चांगलं भविष्य आणि आशा देणारे आहेत.+ १२ तुम्ही मला हाक माराल, माझ्याकडे येऊन प्रार्थना कराल आणि मी तुमचं ऐकेन.’+

१३ ‘तुम्ही मला शोधाल आणि मी तुम्हाला सापडेन.+ कारण तुम्ही अगदी मनापासून मला शोधाल.+ १४ हो, मी नक्की तुम्हाला सापडेन,’+ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुमच्या बंदिवानांना गोळा करीन. आणि ज्या-ज्या राष्ट्रांमध्ये व ज्या-ज्या ठिकाणी मी तुमची पांगापांग केली, तिथून मी तुम्हाला एकत्र करीन,’+ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुम्हाला ज्या ठिकाणाहून बंदिवासात पाठवलं, त्या ठिकाणी परत आणीन.’+

१५ तुम्ही मात्र म्हणता, ‘यहोवाने आमच्यासाठी बाबेलमध्ये संदेष्टे नेमले आहेत.’

१६ पण, दावीदच्या राजासनावर बसणाऱ्‍या राजाबद्दल+ आणि या शहरातल्या सगळ्या लोकांबद्दल, म्हणजे तुमच्यासोबत जे बंदिवासात गेले नाहीत त्या तुमच्या भाऊबंदांबद्दल यहोवा काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. १७ ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ आणि रोगराई पाठतोय.+ मी त्यांना सडलेल्या* अंजिरांसारखं करतोय; कोणीही खाऊ शकणार नाही अशा खराब अंजिरांसारखं करतोय.”’+

१८ ‘मी तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने त्यांचा पाठलाग करीन.+ मी त्यांची अशी दशा करीन, की ती पाहून पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांना दहशत बसेल.+ मी राष्ट्रांमध्ये त्यांची पांगापांग करीन आणि ती राष्ट्रं त्यांना शापित समजतील, शिट्टी वाजवून त्यांची थट्टा करतील,+ त्यांना पाहून चकित होतील आणि त्यांची बदनामी करतील.+ १९ कारण मी वारंवार माझ्या सेवकांकडून, संदेष्ट्यांकडून त्यांना संदेश पाठवत राहिलो, पण त्यांनी तो ऐकला नाही,’ असं यहोवा म्हणतो.+

‘आणि तुम्हीसुद्धा तो ऐकला नाही,’+ असं यहोवा म्हणतो.

२० म्हणून बंदिवासात असलेल्या लोकांनो! ज्यांना मी यरुशलेममधून बाबेलला पाठवलं, त्या लोकांनो! मी यहोवा काय म्हणतो ते ऐका. २१ माझ्या नावाने खोट्या भविष्यवाण्या करणारा+ कोलायाचा मुलगा अहाब आणि मासेयाचा मुलगा सिद्‌कीया यांच्याबद्दल इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हाती देईन. तो तुमच्या डोळ्यांदेखत त्यांना मारून टाकेल. २२ आणि त्यांच्या बाबतीत जे घडेल त्यावरून बाबेलमध्ये असलेले यहूदाचे बंदिवान एखाद्याला शाप देताना असं म्हणतील: “बाबेलच्या राजाने जसं सिद्‌कीया आणि अहाबला आगीत जाळलं, तसं यहोवा तुझ्या बाबतीत करो!” २३ कारण ते इस्राएलमध्ये निर्लज्जपणे वागले.+ त्यांनी आपल्या शेजाऱ्‍यांच्या बायकांशी व्यभिचार केला आणि मी आज्ञा केली नसताना माझ्या नावाने खोटा संदेश दिला.+

“या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत, आणि मी या गोष्टींचा साक्षीदार आहे,”+ असं यहोवा म्हणतो.’”

२४ “आणि नेहेलमचा शमाया+ याला तू असं सांग, २५ ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “तू यरुशलेममधल्या सगळ्या लोकांना, मासेयाचा मुलगा सफन्या+ याजक याला, आणि सर्व याजकांना स्वतःच्या नावाने पत्रं पाठवलीस आणि म्हणालास, २६ ‘यहोवाने यहोयादा याजकाच्या जागी तुला यहोवाच्या मंदिराची देखरेख करणारा म्हणून नेमलंय. आणि एखादा वेडा माणूस संदेष्ट्यासारखं वागू लागला, तर त्याचे हातपाय आणि डोकं खोड्यांत* अडकवण्याचा अधिकारही तुझ्याकडे आहे.+ २७ तर मग, तुमच्यासमोर संदेष्ट्यासारखं वागणाऱ्‍या अनाथोथच्या+ यिर्मयाला तू शिक्षा का नाही केलीस?+ २८ त्याने तर इथे बाबेलमध्येही आम्हाला असा संदेश पाठवलाय: “बंदिवास बराच काळ राहील! म्हणून घरंदारं बांधा आणि त्यांत राहा. मळे लावा आणि त्यांचं फळ खा,+​—”’”’”

२९ सफन्या+ याजकाने यिर्मया संदेष्ट्यासमोर हे पत्र वाचून दाखवलं, ३० तेव्हा यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ३१ “बंदिवासात असलेल्या सगळ्या लोकांना असा संदेश पाठव, ‘नेहेलमचा शमाया याच्याबद्दल यहोवा असं म्हणतो: “मी शमायाला पाठवलं नाही. पण तरी त्याने तुम्हाला भविष्यवाणी सांगितली आणि खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवायला लावला.+ ३२ म्हणून यहोवा म्हणतो, ‘पाहा! मी नेहेलमच्या शमायाला आणि त्याच्या वंशजांना शिक्षा करतोय. त्याच्या घराण्यातला एकही माणूस या लोकांमध्ये जिवंत राहणार नाही. मी माझ्या लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी करणार आहे, त्या शमाया पाहणार नाही,’ असं यहोवा म्हणतो. ‘कारण त्याने लोकांना यहोवाविरुद्ध बंड करायला लावलंय.’”’”

३० यिर्मयाला यहोवाकडून जो संदेश मिळाला, तो हा: २ “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी ज्या गोष्टी तुला सांगतोय, त्या सगळ्या एका पुस्तकात लिही. ३ कारण यहोवा म्हणतो, “बघ! असे दिवस येत आहेत, जेव्हा बंदिवासात असलेल्या इस्राएलच्या आणि यहूदाच्या माझ्या लोकांना मी गोळा करीन.”+ यहोवा म्हणतो, “जो देश मी त्यांच्या वाडवडिलांना दिला होता, त्या देशात मी त्यांना परत घेऊन येईन आणि ते पुन्हा तिथे राहतील.”’”+

४ यहोवाने इस्राएल आणि यहूदाला जो संदेश दिला, तो हा:

 ५ यहोवा असं म्हणतो,

“भीतीने किंकाळ्या फोडण्याचा आवाज ऐकू आलाय;

सगळीकडे दहशत आहे, आणि कुठेही शांती नाही.

 ६ जरा विचारा, पुरुष कधी बाळाला जन्म देऊ शकतो का?

मग मला प्रत्येक शक्‍तिशाली पुरुष एखाद्या गर्भवती स्त्रीसारखा पोटावर* हात ठेवलेला का दिसतोय?+

प्रत्येकाचा चेहरा फिका का पडलाय?

 ७ खरंच, तो दिवस किती भयानक असेल!+

त्याच्यासारखा दुसरा दिवस नाही.

याकोबसाठी तो संकटाचा काळ असेल,

पण तरी त्याला त्यातून वाचवलं जाईल.”

८ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “त्या दिवशी मी त्यांच्या मानेवर असलेलं जू मोडून टाकीन आणि त्यांच्या पट्ट्यांचे दोन तुकडे करीन. त्यानंतर परके* लोक पुन्हा कधीच त्यांना आपले गुलाम बनवणार नाहीत. ९ ते आपला देव यहोवा याची सेवा करतील. आणि मी त्यांच्यासाठी ज्याला नेमीन त्या त्यांच्या राजाची, दावीदचीही ते सेवा करतील.”+

१० यहोवा म्हणतो, “हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस.

आणि हे इस्राएल! तू भिऊ नकोस.+

कारण तू जरी दूर असलास, तरी मी तुला वाचवीन,

आणि तुझ्या वंशजांना बंदिवासातल्या देशातून सोडवीन.+

याकोब परत येईल. त्याला घाबरवणारा कोणीही नसेल; तो सुखशांतीत राहील.”+

११ यहोवा म्हणतो, “कारण तुझा बचाव करायला मी तुझ्यासोबत आहे.

ज्या सर्व राष्ट्रांमध्ये मी तुझी पांगापांग केली, त्यांचा मी समूळ नाश करीन;+

पण तुझा मात्र मी समूळ नाश करणार नाही.+

मी तुला योग्य प्रमाणात शिस्त लावीन.*

आणि मी तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.”+

१२ कारण यहोवा असं म्हणतो:

“तुझ्या* जखमांसाठी कोणताही इलाज नाही.+

तुझे घाव बरे होऊ शकत नाहीत.

१३ तुझी बाजू मांडणारा कोणीही नाही,

तुझ्या जखमा काही केल्या बऱ्‍या होऊ शकत नाहीत.

तुझ्यासाठी कोणताही उपचार नाही.

१४ तुझे सगळे प्रियकर तुला विसरून गेलेत.+

ते आता तुला विचारतही नाहीत.

एखाद्या शत्रूसारखा मी तुझ्यावर वार केलाय.+

एखाद्या निर्दयी माणसासारखी मी तुला शिक्षा केली आहे,

कारण तू मोठमोठे अपराध आणि अनेक पापं केली आहेत.+

१५ तुला झालेल्या जखमांमुळे आता का रडतेस?

तुझ्या वेदनांवर काहीच उपाय नाही!

तू केलेल्या मोठमोठ्या अपराधांमुळे आणि अनेक पापांमुळेच,+

मी तुझी अशी अवस्था केली आहे.

१६ तुझा नाश करणाऱ्‍यांचा नक्कीच नाश केला जाईल,+

तुझे सगळे शत्रूही बंदिवासात जातील.+

तुला लुबाडणाऱ्‍यांना लुबाडलं जाईल,

आणि तुझी लूटमार करणाऱ्‍या सगळ्यांना मी लूटमार करणाऱ्‍यांच्या हाती देईन.”+

१७ यहोवा म्हणतो, “त्यांनी तुला ‘कोणीही विचारत नसलेली सीयोन’ असं म्हणून टाकून दिलं.+

पण मी तुला बरं करीन आणि तुझ्या जखमा भरून काढीन.”+

१८ यहोवा असं म्हणतो:

“पाहा! मी याकोबच्या तंबूंमधल्या लोकांना बंदिवासातून गोळा करीन,+

मी त्याच्या वस्तिस्थानांवर दया करीन.

शहर पुन्हा त्याच्या टेकडीवर उभारलं जाईल,+

आणि मजबूत मनोरा आपल्या योग्य ठिकाणी उभा केला जाईल.

१९ त्यांच्यामधून उपकारस्तुतीचा आणि आनंदोत्सवाचा आवाज ऐकू येईल.+

मी त्यांची संख्या वाढवीन, ती कमी होणार नाही;+

मी त्यांची संख्या अगणित करीन,*

आणि त्यांना तुच्छ समजलं जाणार नाही.+

२० याकोबच्या वंशजांची पूर्वीसारखीच भरभराट होईल.

त्याच्या वंशजांपासून मी एक मजबूत राष्ट्र बनवीन.+

आणि त्याचा छळ करणाऱ्‍यांना मी शिक्षा करीन.+

२१ त्याचा वैभवशाली शासक त्याच्या लोकांपैकीच असेल,

तो त्याच्या लोकांमधूनच येईल.

मी त्याला माझ्याजवळ बोलवीन, आणि तो माझ्याजवळ येईल.

नाहीतर माझ्यासमोर यायची हिंमत कोणात आहे?” असं यहोवा म्हणतो.

२२ “तुम्ही माझे लोक व्हाल,+ आणि मी तुमचा देव होईन.”+

२३ पाहा! यहोवाच्या क्रोधाचं भयानक वादळ सुटेल;+

गरगर फिरणाऱ्‍या वावटळीसारखं ते दुष्ट लोकांच्या डोक्यावर येऊन आदळेल.

२४ जोपर्यंत यहोवा आपल्या मनात ठरवलेल्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करत नाही,

तोपर्यंत त्याचा जळजळीत क्रोध शांत होणार नाही.+

शेवटच्या काळात तुम्हाला या गोष्टी स्पष्टपणे कळतील.+

३१ यहोवा म्हणतो: “त्या वेळी, मी इस्राएलच्या सगळ्या घराण्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+

 २ यहोवा म्हणतो, “तलवारीपासून वाचलेल्या लोकांना ओसाड रानात देवाची कृपा मिळाली.

इस्राएल आपल्या विसाव्याच्या ठिकाणी चालला होता.”

 ३ यहोवा दुरून आला आणि त्याने मला दर्शन दिलं. तो मला म्हणाला:

“मी कायम तुझ्यावर प्रेम करत आलोय.

आणि एकनिष्ठ प्रेमाने मी तुला जवळ घेतलंय.*+

 ४ हे इस्राएलच्या कुमारी, मी तुला परत उभारीन आणि तू पुन्हा उभी केली जाशील.+

तू पुन्हा आपल्या हातांत डफ घेशील,

आणि आनंदाने नाचत बाहेर पडशील.+

 ५ तू शोमरोनच्या डोंगरांवर पुन्हा द्राक्षमळे लावशील;+

जे द्राक्षमळे लावतील तेच त्यांचं फळ खातील.+

 ६ कारण असा एक दिवस येईल, जेव्हा एफ्राईमच्या डोंगरांवरचे पहारेकरी अशी हाक मारतील:

‘चला, आपण सीयोनकडे जाऊ; आपला देव यहोवा याच्याकडे जाऊ.’”+

 ७ कारण यहोवा असं म्हणतो:

“तुम्ही याकोबसाठी मोठ्या आनंदाने गीत गा.

आनंदाने जयजयकार करा, कारण सर्व राष्ट्रांमध्ये तुम्ही सगळ्यात पुढे आहात.+

संदेशाची घोषणा करा; देवाची स्तुती करा आणि म्हणा,

‘हे यहोवा! तुझ्या लोकांना वाचव, इस्राएलच्या उरलेल्या लोकांना वाचव.’+

 ८ मी त्यांना उत्तरेकडच्या देशातून परत आणतोय.+

पृथ्वीच्या अगदी दुर्गम भागांतून मी त्यांना गोळा करतोय.+

त्यांच्यामध्ये आंधळे आणि लंगडे असतील;+

तसंच, गरोदर स्त्रिया आणि प्रसूतीची वेळ जवळ आलेल्या स्त्रियाही त्यांच्यामध्ये असतील.

लोकांच्या एका मोठ्या समुदायासारखे ते सगळे इथे परत येतील.+

 ९ ते रडत परत येतील.+

ते दयेची भीक मागत असताना मी त्यांना घेऊन येईन.

त्यांना ठेच लागणार नाही अशा सपाट रस्त्यावरून,

मी त्यांना पाण्याच्या झऱ्‍यांकडे नेईन.+

कारण मी इस्राएलचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.”+

१० राष्ट्रांनो, यहोवाचा संदेश ऐका,

आणि दूरवरच्या बेटांवर अशी घोषणा करा:+

“ज्याने इस्राएली लोकांची पांगापांग केली, तोच त्यांना गोळाही करेल.

मेंढपाळ जसा आपल्या कळपाला सांभाळतो, तसा तोही त्यांचा सांभाळ करेल.+

११ कारण यहोवा याकोबची सुटका करेल,+

आणि याकोबपेक्षा शक्‍तिशाली असलेल्याच्या हातून तो त्याला सोडवेल.*+

१२ ते येतील आणि सीयोनच्या उंच ठिकाणावर आनंदाने जयजयकार करतील.+

यहोवाकडून चांगल्या गोष्टी मिळाल्यामुळे* त्यांच्या चेहऱ्‍यावर आनंद झळकेल;

धान्य, नवा द्राक्षारस+ आणि तेलामुळे,

तसंच, कळपातल्या आणि गुराढोरांतल्या बछड्यांमुळे त्यांच्या चेहऱ्‍यावर आनंद झळकेल.+

ते पुन्हा कधीच कमजोर होणार नाहीत,+

उलट, ते भरपूर पाणी मिळालेल्या बागेसारखे होतील.”+

१३ “त्या वेळी कुमारी आनंदाने नाचू लागेल,

आणि तरुण व वृद्ध माणसंसुद्धा एकत्र नाचतील.+

मी त्यांचा शोक आनंदात बदलून टाकीन.+

मी त्यांचं सांत्वन करीन, आणि त्यांच्या दुःखाच्या बदल्यात त्यांना आनंद देईन.+

१४ मी याजकांना भरपूर अन्‍न देऊन तृप्त करीन,

मी दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे माझे लोक तृप्त होतील,”+ असं यहोवा म्हणतो.

१५ “यहोवा म्हणतो:

‘रामा+ इथून शोक करण्याचा आणि दुःखाने रडण्याचा आवाज ऐकू येतोय:

राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे.+

काही केल्या तिचं सांत्वन होत नाही,

कारण तिची मुलं आता नाहीत.’”+

१६ यहोवा तिला म्हणतो:

“‘रडू नकोस, आपले अश्रू आवर.

कारण तुला तुझ्या कामाचं प्रतिफळ मिळेल.

तुझी मुलं शत्रूच्या देशातून परत येतील,’+ असं यहोवा म्हणतो.

१७ ‘भविष्यासाठी तुला आशा आहे,’+ असं यहोवा म्हणतो.

‘तुझी मुलं आपल्या प्रदेशात परत येतील.’”+

१८ “मी एफ्राईमचं कण्हणं ऐकलंय,

तो म्हणाला, ‘जू वाहण्यासाठी अजून तयार न झालेल्या वासरासारखा मी होतो,

पण तू मला सुधारलंस आणि मी सुधरलो.

हे यहोवा! तू माझा देव आहेस,

म्हणून मला आपल्याकडे वळव आणि मी लगेच वळीन.

१९ मला पस्तावा झाला आणि मी तुझ्याकडे परत आलो;+

तू मला समजावून सांगितलंस, तेव्हा मी दुःखाने मांडीवर मारून घेतलं.

तरुणपणी मी जे केलं, त्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटली,

आणि मी माझ्याच नजरेत पडलो.’”+

२० “एफ्राईम माझ्या नजरेत लाखमोलाचा मुलगा नाही का? ते माझं लाडकं मूल नाही का?+

मी जितक्यांदा त्याला फटकारतो, तितक्यांदा मला त्याची आठवणही येते.

म्हणूनच माझा जीव त्याच्यासाठी हळहळतो.+

मी नक्की त्याच्यावर दया करीन,” असं यहोवा म्हणतो.+

२१ “हे इस्राएलच्या कुमारी, रस्त्यांवर आपल्यासाठी चिन्हं आणि खुणांचे खांब उभे कर.+

ज्या मार्गाने तुला जायचंय, त्या महामार्गाकडे लक्ष दे.+

हे इस्राएलच्या कुमारी, परत ये! तुझ्या या शहरांकडे परत ये.

२२ हे विश्‍वासघात करणाऱ्‍या मुली, तू अजून किती दिवस भटकत राहशील?

यहोवाने पृथ्वीवर काहीतरी नवीन केलंय:

स्त्री आतुरतेने पुरुषाला शोधेल.”

२३ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “मी बंदिवानांना गोळा करून परत आणीन, तेव्हा ते यहूदाच्या देशात आणि त्याच्या शहरांमध्ये पुन्हा असं म्हणतील: ‘हे नीतिमत्त्वाच्या निवासस्थाना,+ हे पवित्र पर्वता,+ यहोवा तुला आशीर्वादित करो!’ २४ आणि यहूदाच्या देशात आणि त्याच्या सगळ्या शहरांत लोकवस्ती होईल; शेतकरी आणि मेंढरांचे कळप घेऊन फिरणारे तिथे शांतीने एकत्र राहतील.+ २५ कारण, थकून गेलेल्या प्रत्येक जिवाला मी ताजंतवानं करीन आणि कमजोर झालेल्या प्रत्येकाला मी बळ देईन.”+

२६ त्यानंतर, मला जाग आली आणि मी डोळे उघडले. मला खूप छान झोप लागली होती.

२७ यहोवा म्हणतो: “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्यातल्या लोकांची संख्या वाढवीन आणि त्यांच्या प्राण्यांची भरभराट करीन.”+

२८ “आणि मी जसं त्यांना उपटून टाकायला, खाली पाडायला, मोडून टाकायला, त्यांचा नाश करायला आणि त्यांचं नुकसान करायला त्यांच्यावर नजर ठेवून होतो,+ तसंच त्यांना पुन्हा रोवायला आणि पुन्हा उभारायला मी त्यांच्यावर नजर ठेवीन,”+ असं यहोवा म्हणतो. २९ “त्या दिवसांत ते परत कधी असं म्हणणार नाहीत: ‘आंबट द्राक्षं वडिलांनी खाल्ली, पण दात मात्र मुलांचे आंबले.’+ ३० उलट, जो आंबट द्राक्षं खाईल त्याचेच दात आंबतील. प्रत्येक जण स्वतःच्याच अपराधामुळे मरेल.”

३१ यहोवा म्हणतो: “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्यासोबत आणि यहूदाच्या घराण्यासोबत एक नवीन करार करीन.+ ३२ मी त्यांच्या वाडवडिलांचा हात धरून त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं, त्या दिवशी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार नसेल.+ ‘मीच त्यांचा खरा मालक* होतो, पण तरीसुद्धा त्यांनी माझा तो करार मोडला,’+ असं यहोवा म्हणतो.”

३३ यहोवा म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन+ आणि ते नियम त्यांच्या हृदयावर लिहीन.+ मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+

३४ “यापुढे कोणीही आपल्या शेजाऱ्‍याला किंवा आपल्या भावाला असं म्हणून शिकवणार नाही, की ‘यहोवाची ओळख करून घे!’+ कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण मला ओळखतील,”+ असं यहोवा म्हणतो. “मी त्यांचे अपराध माफ करीन, आणि त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.”+

३५ ज्याने दिवसा प्रकाश देण्यासाठी सूर्य बनवला,

आणि रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्राला व ताऱ्‍यांना नियम घालून दिले;

जो समुद्राची उलथापालथ करतो आणि त्याच्या लाटांना उसळायला लावतो,

ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे, तो यहोवा असं म्हणतो:+

३६ “‘हे नियम जसे कायम टिकून राहतील,

तसं एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे वंशज कायम माझ्यासमोर टिकून राहतील,’ असं यहोवा म्हणतो.”+

३७ यहोवा म्हणतो: “‘जसं आकाशाचं मोजमाप करणं शक्य नाही आणि जसं पृथ्वीच्या पायाचा शोध लावणं शक्य नाही, तसं इस्राएलच्या वंशजांनी केलेल्या वाईट कामांमुळे मी त्या सगळ्यांचा त्याग करणं शक्य नाही,’ असं यहोवा म्हणतो.”+

३८ यहोवा म्हणतो: “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा यहोवासाठी हे शहर हनानेलच्या बुरुजापासून+ कोपऱ्‍याच्या दरवाजापर्यंत+ बांधलं जाईल.+ ३९ आणि मोजमाप करायची दोरी+ थेट गारेबच्या टेकडीपर्यंत जाईल आणि तिथून पुढे गवाथकडे वळेल. ४० आणि प्रेतांचं व राखेचं* संपूर्ण खोरं, तसंच किद्रोन खोऱ्‍यापर्यंतची+ आणि पूर्वेकडे ‘घोडा फाटकाच्या’+ कोपऱ्‍यापर्यंतची सगळी शेतं यहोवासाठी पवित्र असतील.+ ती पुन्हा कधीच उद्ध्‌वस्त होणार नाहीत किंवा त्यांचा कधीही नाश होणार नाही.”

३२ यहूदाचा राजा सिद्‌कीया याच्या शासनकाळाच्या १० व्या वर्षी, म्हणजे नबुखद्‌नेस्सर राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी यिर्मयाला यहोवाकडून संदेश मिळाला.+ २ त्या वेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता. आणि यिर्मया हा यहूदाच्या राजाच्या महालात, ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’ कैद होता.+ ३ कारण यहूदाचा राजा सिद्‌कीया याने त्याला कैद केलं होतं.+ तो यिर्मयाला म्हणाला, “तू अशी भविष्यवाणी का करतोस? तू म्हणतोस: ‘यहोवा असं म्हणाला, की “मी हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती देईन आणि तो त्यावर कब्जा करेल.+ ४ आणि यहूदाचा राजा सिद्‌कीया हा खास्दी लोकांच्या हातून सुटणार नाही. तो नक्की बाबेलच्या राजाच्या हाती दिला जाईल. सिद्‌कीया आपल्या डोळ्यांनी त्याला पाहील आणि प्रत्यक्ष त्याच्याशी बोलेल.”’+ ५ यहोवा म्हणतो, ‘बाबेलचा राजा हा सिद्‌कीयाला बाबेलला घेऊन जाईल. आणि जोपर्यंत मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत त्याला तिथेच राहावं लागेल. तुम्ही जरी खास्दी लोकांशी लढत राहिलात, तरी तुम्ही जिंकणार नाहीत.’”+

६ यिर्मया म्हणाला, “मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ७ ‘तुझे काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल, “अनाथोथमधलं+ माझं शेत विकत घे. कारण ते विकत घ्यायचा* पहिला हक्क तुझा आहे.”’”+

८ मग यहोवाने सांगितलं होतं तसंच झालं. माझा चुलत भाऊ हानामेल ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’ माझ्याकडे आला आणि मला म्हणाला: “बन्यामीनच्या प्रदेशात अनाथोथमध्ये असलेलं माझं शेत कृपा करून विकत घे. कारण, ते विकत घ्यायचा आणि ते सोडवण्याचा हक्क तुझ्याकडे आहे. तू ते आपल्यासाठी विकत घे.” तेव्हा मला कळलं, की हे यहोवाच्याच इच्छेने होत आहे.

९ म्हणून मग, मी माझा चुलत भाऊ हानामेल याच्याकडून अनाथोथमधलं त्याचं शेत विकत घेतलं. मी त्याला सात शेकेल* आणि दहा चांदीचे तुकडे तोलून दिले.+ १० मग मी खरेदीखत तयार केलं,+ त्यावर मोहर लावली, साक्षीदारांना बोलावलं+ आणि तराजूत पैसे तोलले. ११ नंतर, मी त्या खरेदीखताच्या दोन्ही प्रती घेतल्या; म्हणजे नियमाप्रमाणे व कायद्याप्रमाणे मोहरबंद केलेली एक प्रत, आणि मोहरबंद नसलेली दुसरी प्रत. १२ आणि त्या प्रती मी महसेयाचा नातू, म्हणजे नेरीयाचा+ मुलगा बारूख+ याला दिल्या; माझा चुलत भाऊ हानामेल याच्यासमोर, तसंच खरेदीखतावर सही करणाऱ्‍या साक्षीदारांसमोर आणि ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’+ बसलेल्या सगळ्या यहुद्यांसमोर मी त्या त्याला दिल्या.

१३ मग मी त्यांच्यासमोर बारूखला अशी आज्ञा दिली, १४ “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘खरेदीखताच्या या दोन्ही प्रती, म्हणजे मोहरबंद असलेली आणि मोहरबंद नसलेली प्रत घे आणि एका मातीच्या भांड्यात ठेव, म्हणजे त्या बऱ्‍याच दिवस टिकून राहतील.’ १५ कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘या देशात घरंदारं, शेतीवाडी आणि द्राक्षमळे पुन्हा विकत घेतली जातील.’”+

१६ मग नेरीयाचा मुलगा बारूख याला खरेदीखत दिल्यावर मी यहोवाला प्रार्थना केली; मी म्हणालो: १७ “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! बघ, तू तुझ्या अफाट सामर्थ्याने आणि तुझ्या शक्‍तिशाली हाताने आकाश आणि पृथ्वी बनवली.+ तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही. १८ तू हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करतोस; पण, वडिलांच्या अपराधांबद्दल त्यांच्यामागे त्यांच्या मुलांना शिक्षाही करतोस.+ तूच खरा, महान आणि शक्‍तिशाली देव आहेस. सैन्यांचा देव यहोवा हे तुझं नाव आहे. १९ तुझे उद्देश अद्‌भुत आणि तुझी कार्यं महान आहेत.+ तू माणसांची सगळी कामं पाहतोस+ आणि प्रत्येकाला त्याच्या कामांप्रमाणे आणि वागणुकीप्रमाणे मोबदला देतोस.+ २० तू इजिप्तमध्ये अनेक चिन्हं आणि चमत्कार केलेस. ते आजपर्यंत लोकांना माहीत आहेत. अशा प्रकारे, तू इस्राएलमध्ये आणि सर्व मानवांमध्ये आपलं नाव महान केलंस,+ आणि आजही ते महान आहे. २१ तू इजिप्तमध्ये चिन्हं, चमत्कार आणि दहशत निर्माण करणारी कार्यं केलीस; आणि आपल्या महान सामर्थ्याने, शक्‍तिशाली हाताने तू तुझ्या इस्राएली लोकांना तिथून बाहेर आणलंस.+

२२ मग तू त्यांना हा देश दिलास; त्यांच्या वाडवडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे दूध आणि मध वाहत असलेला हा देश+ तू त्यांना दिलास.+ २३ त्यांनी येऊन या देशाचा ताबा घेतला. पण त्यांनी तुझं ऐकलं नाही आणि तुझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत. तू त्यांना जे काही सांगितलं होतंस, त्यातली एकही गोष्ट त्यांनी पाळली नाही. आणि म्हणून तू ही सगळी संकटं त्यांच्यावर येऊ दिलीस.+ २४ बघ! सैन्याने शहराला वेढा घातलाय. शहर काबीज करण्यासाठी त्यांनी शहराभोवती दगडमातीचा ढिगारा उभारलाय.+ हे शहर तलवारीमुळे,+ दुष्काळामुळे आणि रोगराईमुळे+ हल्ला करणाऱ्‍या खास्दी लोकांच्या हातात नक्कीच पडेल; तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरली आहे, आणि तुला हे दिसतच आहे. २५ हे सर्वोच्च प्रभू यहोवा, हे शहर तर नक्कीच खास्दी लोकांच्या हाती पडणार आहे. मग तू मला असं का म्हणालास की, ‘पैसे देऊन शेत विकत घे आणि साक्षीदारांना बोलव?’”

२६ त्यावर यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २७ “बघ! मी यहोवा, सगळ्या मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य आहे का? २८ म्हणून यहोवा असं म्हणतो, ‘पाहा, मी हे शहर खास्दी लोकांच्या आणि बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हाती देतोय आणि तो या शहरावर कब्जा करेल.+ २९ आणि या शहराविरुद्ध लढणारे खास्दी लोक आत घुसतील आणि शहराला आग लावून ते भस्म करतील.+ तसंच, ज्या घरांच्या छतांवर लोकांनी बआल दैवतासाठी बलिदानं दिली व इतर दैवतांसाठी पेयार्पणं ओतली आणि माझा क्रोध भडकवला, ती सगळी घरंही जळून खाक होतील.’+

३० ‘कारण इस्राएल आणि यहूदाचे लोक त्यांच्या तरुणपणापासून माझ्या नजरेत जे वाईट तेच करत आलेत.+ इस्राएलचे लोक वाईट कामं करून माझा क्रोध भडकवत राहतात,’ असं यहोवा म्हणतो. ३१ ‘हे शहर बांधण्यात आलं तेव्हापासून आजपर्यंत या शहराने नेहमीच माझा राग, माझा क्रोध भडकवलाय.+ म्हणून मी या शहराला माझ्या नजरेसमोरून दूर करतोय.+ ३२ इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी पुष्कळ वाईट कामं करून माझा क्रोध भडकवलाय; त्यांनी, त्यांच्या राजांनी,+ अधिकाऱ्‍यांनी,+ याजकांनी, संदेष्ट्यांनी+ आणि यहूदाच्या व यरुशलेमच्या माणसांनी माझा क्रोध भडकवल्यामुळे मी या शहराला माझ्या नजरेसमोरून दूर करतोय. ३३ माझ्याकडे तोंड करण्याऐवजी त्यांनी नेहमीच माझ्याकडे पाठ फिरवली.+ मी त्यांना शिकवण्याचा वारंवार प्रयत्न करत राहिलो, पण एकानेही माझं ऐकलं नाही; कोणीही माझी शिस्त स्वीकारली नाही.+ ३४ तसंच, माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या मंदिरात आपल्या घृणास्पद मूर्ती ठेवून त्यांनी ते अशुद्ध केलं.+ ३५ शिवाय, त्यांनी बआलसाठी ‘हिन्‍नोम वंशजांच्या खोऱ्‍यात’*+ उच्च स्थानं बांधली; आपल्या मुला-मुलींचा मोलखपुढे आगीत होम करण्यासाठी त्यांनी ती बांधली.+ पण असं काही करायची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती,+ किंवा असला विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नव्हता. असलं घृणास्पद कृत्य करून त्यांनी यहूदाला पाप करायला लावलं.’

३६ म्हणून ज्या शहराविषयी तुम्ही असं म्हणता, की ते तलवारीमुळे, दुष्काळामुळे आणि रोगराईमुळे बाबेलच्या राजाच्या हाती दिलं जाईल, त्या शहराविषयी इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, ३७ ‘पाहा! मी माझ्या रागामुळे, क्रोधामुळे आणि भयंकर संतापामुळे ज्या सर्व देशांमध्ये त्यांची पांगापांग केली, तिथून त्या सगळ्यांना गोळा करून+ मी परत या ठिकाणी आणीन आणि ते इथे सुरक्षित राहतील.+ ३८ ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.+ ३९ त्यांनी कायम माझं भय बाळगावं, म्हणून मी त्यांचं मन एक करीन+ आणि त्या सगळ्यांना एकाच मार्गावर चालवीन. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्यामागे त्यांच्या मुलाबाळांचं भलं होईल.+ ४० मी त्यांच्यासोबत सर्वकाळ टिकणारा करार करीन.+ तो असा, की त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करायचं मी कधीच सोडणार नाही.+ त्यांनी माझ्यापासून बहकू नये, म्हणून मी त्यांच्या मनात माझं भय निर्माण करीन.+ ४१ त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यात मला खूप आनंद वाटेल.+ मी त्यांना मनापासून, अगदी अंतःकरणापासून या देशात कायमचं रुजवीन.’”+

४२ “यहोवा म्हणतो, ‘मी जसं या लोकांवर हे मोठं संकट आणलं, तसंच मी त्यांना चांगल्या गोष्टी देण्याचं माझं वचनही पूर्ण करीन.+ ४३ तुम्ही म्हणता, “हा देश ओसाड आहे. इथे एकही माणूस किंवा प्राणी नाही. आणि हा खास्द्यांच्या हाती देण्यात आलाय.” पण, याच देशात पुन्हा शेतांची खरेदी केली जाईल.’+

४४ ‘बन्यामीनच्या प्रदेशात,+ यरुशलेमच्या आसपासच्या प्रदेशांत, यहूदाच्या शहरांत,+ डोंगराळ प्रदेशातल्या शहरांत, सखल प्रदेशातल्या शहरांत आणि दक्षिणेकडच्या शहरांत पैसे देऊन शेतांची खरेदी केली जाईल. खरेदीखतं तयार करून ती मोहरबंद केली जातील आणि साक्षीदारांना बोलावलं जाईल.+ कारण बंदी बनवून नेलेल्या लोकांना मी परत घेऊन येईन,’+ असं यहोवा म्हणतो.”

३३ यिर्मया अजूनही ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’+ कैद होता. त्या वेळी, त्याला यहोवाकडून दुसऱ्‍यांदा असा संदेश मिळाला: २ “पृथ्वी निर्माण करणारा यहोवा, ती घडवणारा आणि तिला स्थिर करणारा यहोवा, ज्याचं नाव यहोवा आहे तो असं म्हणतो, ३ ‘मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. मी तुला मोठ्या आनंदाने अशा गोष्टी सांगीन ज्या अद्‌भुत आणि समजण्यापलीकडे आहेत; अशा गोष्टी ज्या तुला माहीत नाहीत.’”+

४ “मी यहोवाने, इस्राएलच्या देवाने, यहूदाच्या राजांच्या पाडून टाकण्यात आलेल्या घरांबद्दल आणि या शहरातल्या पाडून टाकण्यात आलेल्या घरांबद्दल एक संदेश दिलाय; शहराभोवती चढ तयार करून तलवारीने हल्ला करायला येणाऱ्‍या सैन्यापासून रक्षण व्हावं, म्हणून जी घरं पाडून टाकण्यात आली त्या घरांबद्दल हा संदेश आहे.+ ५ तसंच, खास्दी लोकांशी लढायला येणाऱ्‍या लोकांबद्दलही, म्हणजे ज्यांना मी माझ्या क्रोधाने आणि संतापाने मारून टाकलं आणि ज्यांच्या प्रेतांनी ही ठिकाणं भरून गेली, आणि ज्यांच्या दुष्ट कामांमुळे मी या शहरापासून माझं तोंड फिरवलंय त्या लोकांबद्दलही हा संदेश आहे. तो असा: ६ ‘पाहा! मी यरुशलेम नगरीला बरं करीन आणि तिला चांगलं आरोग्य देईन.+ मी लोकांनाही बरं करीन. मी त्यांना भरपूर शांती देईन आणि सत्य प्रकट करीन.+ ७ मी यहूदाच्या आणि इस्राएलच्या बंदिवानांना परत घेऊन येईन;+ आणि त्यांची स्थिती पहिल्यासारखी चांगली करीन.+ ८ त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या पापांच्या सगळ्या दोषापासून मी त्यांना शुद्ध करीन.+ आणि त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या पापांची आणि अपराधांची मी त्यांना क्षमा करीन.+ ९ या नगरीचं नाव ऐकून मला अतिशय आनंद होईल. मी तिच्यासाठी ज्या सर्व चांगल्या गोष्टी करीन त्यांबद्दल ऐकून पृथ्वीवरची सगळी राष्ट्रं माझी स्तुती आणि सन्मान करतील.+ मी तिच्यासाठी ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी करीन आणि तिला जी शांती देईन,+ त्यामुळे सर्व राष्ट्रं घाबरतील आणि त्यांचा थरकाप उडेल.’”+

१० “यहोवा म्हणतो: ‘तुम्ही म्हणाल, की ही जागा ओसाड झाली आहे. इथे एकही माणूस किंवा प्राणी नाही. यहूदातली शहरं आणि यरुशलेममधले रस्ते सामसूम पडले आहेत; तिथे ना माणूस राहतो ना प्राणी. पण तिथे पुन्हा एकदा ११ आनंदोत्सवाचा आवाज आणि वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज ऐकू येईल.+ तसंच, तिथे असं म्हणणाऱ्‍यांचाही आवाज ऐकू येईल: “सैन्यांचा देव यहोवा याचे आभार माना! कारण यहोवा चांगला आहे.+ त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम टिकून राहतं!”’+

यहोवा म्हणतो, ‘मी या देशातल्या बंदिवानांना परत घेऊन येईन आणि त्यांची स्थिती आधीसारखीच चांगली करीन. तेव्हा ते यहोवाच्या मंदिरात उपकारस्तुतीची अर्पणं घेऊन येतील.’”+

१२ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘एकही माणूस किंवा प्राणी नसलेल्या या ओसाड देशात आणि इथल्या सगळ्या शहरांमध्ये पुन्हा एकदा हिरवीगार कुरणं पाहायला मिळतील. आणि मेंढरांना विसावा मिळावा म्हणून मेंढपाळ त्यांना तिथे नेतील.’+

१३ ‘डोंगराळ प्रदेशातल्या शहरांत, सखल प्रदेशातल्या शहरांत, दक्षिणेकडच्या शहरांत, बन्यामीनच्या प्रदेशात, यरुशलेमच्या आसपासच्या प्रदेशांत+ आणि यहूदाच्या शहरांत+ मेंढरांचे कळप पुन्हा एकदा त्यांना मोजणाऱ्‍या मेंढपाळांच्या हातांखालून जातील,’ असं यहोवा म्हणतो.”

१४ “यहोवा म्हणतो: ‘पाहा! असे दिवस येत आहेत जेव्हा मी इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्यांचं भलं करण्याचं जे अभिवचन दिलं होतं, ते मी पूर्ण करीन.+ १५ त्या दिवसांत आणि त्या काळात दावीदसाठी एक नीतिमान अंकुर* फुटेल असं मी करीन.+ तो न्यायाने आणि नीतीने देशात शासन करेल.+ १६ त्या दिवसांत, यहूदाचा बचाव होईल+ आणि यरुशलेम नगरी सुरक्षित राहील.+ आणि तिला, ‘यहोवा आमचं नीतिमत्त्व,’ या नावाने ओळखलं जाईल.’”+

१७ “कारण यहोवा म्हणतो: ‘असं कधीही होणार नाही, की इस्राएलच्या घराण्याच्या राजासनावर बसायला दावीदच्या वंशाचा एकही पुरुष नाही.+ १८ तसंच, माझ्यासमोर उभं राहून होमार्पण द्यायला, अन्‍नार्पणांचं हवन करायला आणि इतर बलिदानं द्यायला लेवीय याजकांपैकी एकही पुरुष नाही, असंही कधी होणार नाही.’”

१९ यिर्मयाला यहोवाकडून परत एकदा असा संदेश मिळाला: २० “यहोवा असं म्हणतो: ‘दिवसाने आणि रात्रीने आपल्या ठरावीक वेळी यावं यासाठी मी जो करार केलाय तो जर तुम्ही मोडू शकलात,+ २१ तरच माझा सेवक दावीद याच्याशी मी केलेला करार मोडला जाईल,+ आणि त्याच्या राजासनावर बसायला त्याच्या मुलांपैकी एकही मुलगा नसेल.+ तसंच, मी माझ्या सेवकांशी, म्हणजे लेवीय याजकांशी केलेला करारही मोडेल.+ २२ ज्याप्रमाणे, आकाशातलं सैन्य मोजलं जाऊ शकत नाही आणि समुद्रकिनाऱ्‍यावरची वाळू मापली जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे मी माझा सेवक दावीद याच्या वंशजांची* आणि माझी सेवा करणारे लेवी यांच्या वंशजांची* संख्या इतकी वाढवीन, की ती मोजली जाऊ शकणार नाही.’”

२३ यिर्मयाला यहोवाकडून परत एकदा असा संदेश मिळाला: २४ “हे लोक काय म्हणत आहेत ते तू ऐकलं नाहीस का? ते म्हणतात, ‘यहोवाने जी दोन घराणी निवडलीत, त्यांना तो टाकून देईल.’ ते माझ्या लोकांशी आदराने वागत नाहीत, आणि त्यांना राष्ट्र समजत नाहीत.

२५ यहोवा म्हणतो: ‘मी दिवस व रात्र यांविषयी केलेला करार, आणि आकाश व पृथ्वी यांना घालून दिलेले नियम+ जितके पक्के आहेत,+ २६ तितकीच ही गोष्टही पक्की आहे, की याकोब आणि माझा सेवक दावीद यांच्या वंशजाला* मी कधीच टाकणार नाही; मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या वंशजांवर* राज्य करण्यासाठी दावीदच्या वंशजातून* शासकांना निवडत राहीन. कारण मी त्यांच्या बदिवानांना गोळा करून परत आणीन+ आणि त्यांच्यावर दया करीन.’”+

३४ यिर्मयाला यहोवाकडून एक संदेश मिळाला. त्या वेळी बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर आणि त्याचं संपूर्ण सैन्य आणि त्याच्या अधिकाराखाली असलेली पृथ्वीवरची सगळी राज्यं, तसंच सगळी राष्ट्रं यरुशलेम नगरीविरुद्ध आणि तिच्या सगळ्या शहरांविरुद्ध लढत होती.+ यिर्मयाला मिळालेला संदेश असा:

२ “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, ‘जा आणि यहूदाचा राजा सिद्‌कीया+ याला सांग: “यहोवा असं म्हणतो, ‘पाहा, मी हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती देतोय, आणि तो ते जाळून टाकेल.+ ३ तू त्याच्या हातून निसटणार नाहीस. कारण तुला पकडलं जाईल आणि त्याच्या हवाली केलं जाईल.+ तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला पाहशील आणि तो प्रत्यक्ष तुझ्याशी बोलेल. तू बाबेलला जाशील.’+ ४ पण हे यहूदाच्या राजा सिद्‌कीया, यहोवा आणखी काय म्हणतो तेही ऐक. ‘तुझ्याविषयी यहोवा असं म्हणतो: “तू तलवारीने मरणार नाहीस. ५ तर तू शांतीने मरशील.+ आणि लोकांनी तुझ्या वाडवडिलांसाठी, म्हणजे तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी जसे सुगंधी मसाले जाळले, तसे ते तुझ्यासाठीही जाळतील. आणि ते तुझ्यासाठी शोक करत असं म्हणतील, ‘अरेरे! आमचे महाराज गेले!’ कारण यहोवा म्हणतो, ‘हे मी बोललोय.’”’”’”

६ मग यिर्मया संदेष्ट्याने या सगळ्या गोष्टी यहूदाच्या राजाला, सिद्‌कीयाला यरुशलेममध्ये सांगितल्या. ७ त्या वेळी, बाबेलच्या राजाचं सैन्य यरुशलेमविरुद्ध आणि यहूदाच्या उरलेल्या शहरांविरुद्ध, म्हणजे लाखीश+ आणि अजेका+ यांच्याविरुद्ध लढत होतं;+ कारण यहूदाच्या शहरांपैकी तटबंदी असलेली ही दोनच शहरं उरली होती.

८ यिर्मयाला यहोवाकडून आणखी एक संदेश मिळाला; त्याला हा संदेश सिद्‌कीया राजाने यरुशलेममधल्या लोकांसोबत गुलामांना मुक्‍त करण्याचा करार केल्यानंतर मिळाला.+ ९ या करारानुसार कोणीही आपल्या यहुदी सोबत्याला गुलाम म्हणून ठेवायचं नव्हतं; प्रत्येकाने आपल्या इब्री दास-दासींना मुक्‍त करायचं होतं. १० तेव्हा सर्व अधिकाऱ्‍यांनी आणि लोकांनी या आज्ञेचं पालन केलं. त्यांनी हा करार मान्य केला, की प्रत्येक जण आपल्या दास-दासींना मुक्‍त करेल, आणि त्यांना यापुढे गुलाम म्हणून ठेवणार नाही. त्यांनी तसंच केलं आणि गुलामांना सोडून दिलं. ११ पण नंतर, ज्या दास-दासींना त्यांनी सोडून दिलं होतं, त्यांना त्यांनी परत आणलं आणि त्यांना पुन्हा गुलामी करायला लावली. १२ यामुळे यिर्मयाला यहोवाकडून हा संदेश मिळाला. यहोवा म्हणाला:

१३ “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, ‘ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना गुलामगिरीच्या देशातून,* इजिप्तमधून बाहेर आणलं,+ त्या दिवशी मी त्यांच्यासोबत एक करार केला होता.+ मी म्हणालो होतो: १४ “तुमच्यापैकी प्रत्येकाने, तुम्हाला विकण्यात आलेल्या आणि सहा वर्षं तुमची सेवा केलेल्या तुमच्या इब्री बांधवाला सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्‍त करावं; तुम्ही त्याला मुक्‍त केलंच पाहिजे.”+ पण तुमच्या पूर्वजांनी माझं ऐकलं नाही किंवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. १५ पण तुम्ही आज आपले मार्ग बदलले आणि माझ्या नजरेत जे योग्य ते केलं. तुम्ही तुमच्या सोबत्यांना मुक्‍त केलं आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या मंदिरात माझ्यासमोर एक करार केला. १६ पण नंतर, ज्या दास-दासींना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे मुक्‍त केलं होतं, त्यांना परत आणून आणि गुलामी करायला लावून तुम्ही पुन्हा आपल्या मार्गांपासून मागे वळलात आणि माझं नाव अपवित्र केलं.’+

१७ त्यामुळे यहोवा म्हणतो: ‘गुलामांना मुक्‍त करायची माझी आज्ञा तुम्ही पाळली नाही; तुम्ही आपल्या भावाला आणि सोबत्याला सोडून दिलं नाही.+ म्हणून आता मी तुम्हाला सोडून देईन,’ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुम्हाला तलवारीने, रोगराईने आणि दुष्काळाने मरण्यासाठी सोडून देईन.+ मी तुमची अशी अवस्था करीन, की ती पाहून पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांना दहशत बसेल.+ १८ तसंच, ज्या लोकांनी वासराचे दोन तुकडे केले आणि त्या तुकड्यांमधून चालत जाऊन माझ्यासमोर करार केला;+ पण त्या करारातल्या अटी पाळल्या नाहीत आणि माझ्यासोबत केलेला करार मोडला, त्यांच्या बाबतीत १९ म्हणजे, यहूदाचे अधिकारी, यरुशलेममधले अधिकारी, राजदरबारी, याजक आणि देशातले सगळे लोक जे वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत गेले, त्या सगळ्यांच्या बाबतीत हे घडेल: २० मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या जिवावर टपलेल्यांच्या हाती देईन. त्यांची प्रेतं आकाशातल्या पक्ष्यांसाठी आणि जमिनीवरच्या प्राण्यांसाठी अन्‍न होईल.+ २१ आणि मी यहूदाचा राजा सिद्‌कीया याला आणि त्याच्या अधिकाऱ्‍यांना त्यांच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या जिवावर टपलेल्यांच्या हाती देईन.+ बाबलेच्या राजाचं जे सैन्य मागे निघून चाललंय त्यांच्या हवाली मी त्यांना करीन.’+

२२ यहोवा म्हणतो, ‘पाहा, मी आदेश देईन, आणि त्यांना परत या शहराकडे घेऊन येईन. ते या शहराविरुद्ध लढतील, त्यावर कब्जा मिळवतील आणि शहर जाळून टाकतील.+ आणि यहूदाच्या शहरांना मी ओसाड करून टाकीन; तिथे एकही माणूस राहणार नाही.’”+

३५ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्या शासनकाळात यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २ “रेखाबी लोकांच्या+ घराण्याकडे जा, आणि त्यांच्याशी बोलून त्यांना यहोवाच्या मंदिरातल्या एका जेवणाच्या खोलीत ने आणि द्राक्षारस प्यायला दे.”

३ तेव्हा मी हबसिन्याच्या नातवाला, म्हणजे यिर्मयाचा मुलगा याजन्या याला, त्याच्या भावांना, त्याच्या सगळ्या मुलांना आणि रेखाबी लोकांच्या संपूर्ण घराण्याला ४ यहोवाच्या मंदिरात घेऊन गेलो. मी त्यांना इग्दल्याहचा मुलगा, म्हणजे खऱ्‍या देवाचा माणूस हानान याच्या मुलांच्या जेवणाच्या खोलीत घेऊन गेलो. ही खोली, द्वारपाल शल्लूम याचा मुलगा मासेया याच्या जेवणाच्या खोलीच्या वर असलेल्या अधिकाऱ्‍यांच्या जेवणाच्या खोलीला लागून होती. ५ मग, मी रेखाबी लोकांच्या घराण्यातल्या माणसांसमोर द्राक्षारसाने भरलेले प्याले आणि कटोरे ठेवले आणि त्यांना म्हणालो: “द्राक्षारस प्या.”

६ पण ते म्हणाले: “आम्ही द्राक्षारस पिणार नाही. कारण आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा यहोनादाब,*+ याने आम्हाला अशी आज्ञा दिली आहे, की ‘तुम्ही आणि तुमच्या मुलांनी कधीच द्राक्षारस पिऊ नये. ७ तुम्ही स्वतःसाठी घरंदारं बांधू नये, बी पेरू नये, द्राक्षमळे लावू नयेत किंवा ते विकत घेऊ नयेत. याउलट, तुम्ही नेहमी तंबूंमध्ये राहावं, म्हणजे ज्या देशात तुम्ही विदेशी म्हणून राहताय तिथे तुम्ही बरीच वर्षं जिवंत राहाल.’ ८ म्हणून आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा यहोनादाब याने आम्हाला जे काही सांगितलं, ते आम्ही आजपर्यंत पाळत आलोय. आम्ही, आमच्या बायका, आमची मुलं किंवा आमच्या मुली कोणीही द्राक्षारस पीत नाही. ९ तसंच, आम्ही स्वतःसाठी घरंदारं बांधत नाही, आणि आमच्याकडे द्राक्षमळे, शेतीवाडी, बियाणं वगैरे काहीच नाही. १० आम्ही तंबूंमध्येच राहतो आणि आमचा पूर्वज यहोनादाब* याने आम्हाला ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या सगळ्या आम्ही पाळतो. ११ पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर देशावर हल्ला करायला आला,+ तेव्हा आम्ही म्हणालो, ‘चला, आपण यरुशलेमला जाऊ, म्हणजे आपण खास्दी लोकांच्या आणि सीरियाच्या सैन्यापासून वाचू शकू. आणि म्हणून आता आम्ही यरुशलेममध्ये राहतोय.’”

१२ मग, यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १३ “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘जा आणि यहूदाच्या लोकांना आणि यरुशलेमच्या रहिवाशांना असं सांग: यहोवा म्हणतो, “माझ्या आज्ञा पाळा असं मी तुम्हाला वारंवार आर्जवलं नाही का?+ १४ रेखाबचा मुलगा यहोनादाब याने त्याच्या वंशजांना ‘द्राक्षारस पिऊ नका’ अशी आज्ञा दिली होती. त्याप्रमाणे आजपर्यंत ते द्राक्षारस प्यायले नाहीत. अशा प्रकारे ते आपल्या पूर्वजाने दिलेली आज्ञा पाळत आहेत.+ मी तर वारंवार तुमच्याशी बोलत राहिलो, पण तुम्ही माझं ऐकलं नाही.+ १५ मी माझ्या सेवकांना, माझ्या संदेष्ट्यांना वारंवार तुमच्याकडे पाठवत राहिलो+ आणि सांगत राहिलो, ‘कृपा करून आपल्या वाईट मार्गांपासून मागे वळा+ आणि चांगलं ते करा! इतर दैवतांच्या नादी लागू नका आणि त्यांची सेवा करू नका. म्हणजे जो देश मी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिलाय, त्यात तुम्ही कायम राहाल.’+ पण, तुम्ही माझं ऐकलं नाही किंवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. १६ रेखाबचा मुलगा यहोनादाब याच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजाने दिलेली आज्ञा पाळली.+ पण, या लोकांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.”’”

१७ “म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘पाहा! मी यहूदाला आणि यरुशलेमच्या सगळ्या लोकांना ज्या संकटाबद्दल इशारा दिला होता, ते संकट मी त्यांच्यावर आणतोय.+ कारण मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. मी त्यांना हाक मारत राहिलो, पण त्यांनी उत्तर दिलं नाही.’”+

१८ मग यिर्मया रेखाबी लोकांच्या घराण्याला म्हणाला: “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘तुम्ही तुमचा पूर्वज यहोनादाब याची आज्ञा पाळली. त्याने तुम्हाला जे काही सांगितलं होतं त्याचं तुम्ही काटेकोरपणे पालन करत आहात, १९ म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “माझ्यासमोर सेवा करायला रेखाबचा मुलगा यहोनादाब* याच्या वंशजांपैकी एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.”’”

३६ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २ “एक गुंडाळी घे. आणि योशीयाच्या शासनकाळात मी पहिल्यांदा तुझ्याशी बोललो+ त्या दिवसापासून आजपर्यंत मी इस्राएलविरुद्ध, यहूदाविरुद्ध+ आणि सर्व राष्ट्रांविरुद्ध ज्या गोष्टी बोललो, त्या सगळ्या त्या गुंडाळीवर लिही.+ ३ मी यहूदाच्या घराण्यावर जी सर्व संकटं आणण्याचा विचार केलाय, त्यांबद्दल ऐकून कदाचित ते आपल्या दुष्ट मार्गांपासून वळतील. आणि मी त्यांच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करीन.”+

४ तेव्हा, यिर्मयाने नेरीयाचा मुलगा बारूख+ याला बोलावून घेतलं. आणि यहोवाने यिर्मयाला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी यिर्मयाने बारूखला सांगितल्या; यिर्मया जसं-जसं बारूखला सांगत गेला, तसं-तसं बारूख गुंडाळीवर लिहीत गेला.+ ५ मग यिर्मया बारूखला म्हणाला: “मी इथे कैदेत आहे. त्यामुळे मी यहोवाच्या मंदिरात जाऊ शकत नाही. ६ म्हणून तू जा, आणि यहोवाचा जो संदेश मी तुला सांगितलाय, आणि जो तू या गुंडाळीवर लिहिलाय तो तिथे मोठ्याने वाच. तो संदेश तू उपासाच्या दिवशी यहोवाच्या मंदिरात सर्व लोकांसमोर आणि यहूदाच्या इतर शहरांतून येणाऱ्‍या सर्व लोकांसमोर मोठ्याने वाच. ७ कदाचित ते यहोवाकडे दयेची भीक मागतील आणि त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गांपासून वळेल. कारण, यहोवा या लोकांवर आपल्या रागाचा आणि क्रोधाचा वर्षाव करण्याविषयी बोललाय, आणि तो क्रोध खूप भयंकर असेल.”

८ तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाचा मुलगा बारूख याने केलं. तो यहोवाच्या मंदिरात गेला आणि गुंडाळीवर लिहिलेला यहोवाचा संदेश त्याने मोठ्याने वाचला.+

९ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्या शासनकाळाच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात, यरुशलेममधल्या सगळ्या लोकांनी आणि यहूदाच्या शहरांतून यरुशलेममध्ये आलेल्या सगळ्या लोकांनी यहोवासाठी उपास केला.+ १० तेव्हा, बारूखने गुंडाळीत लिहिलेला यिर्मयाचा संदेश यहोवाच्या मंदिरात, शाफान+ शास्त्र्याचा* मुलगा गमरयाह+ याच्या खोलीत* सर्व लोकांसमोर मोठ्याने वाचून दाखवला. ही खोली, यहोवाच्या मंदिराच्या नवीन दरवाजाकडे असलेल्या वरच्या अंगणात होती.+

११ शाफानचा नातू, म्हणजे गमरयाहचा मुलगा मीखाया याने जेव्हा गुंडाळीत लिहिलेला यहोवाचा संदेश ऐकला, १२ तेव्हा तो लगेच राजमहालातल्या सचिवाच्या खोलीत गेला. तिथे हे सगळे राजदरबारी बसले होते: सचिव अलीशामा,+ शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा+ मुलगा एलनाथान,+ शाफानचा मुलगा गमरयाह, हनन्याचा मुलगा सिद्‌कीया आणि इतर सर्व राजदरबारी. १३ गुंडाळीतला जो संदेश बारूखने लोकांसमोर वाचला होता आणि जो मीखायाने ऐकला होता, तो मीखायाने सगळ्या राजदरबाऱ्‍यांना सांगितला.

१४ तेव्हा सर्व राजदरबाऱ्‍यांनी नथन्याचा मुलगा यहूदी याला बारूखकडे पाठवलं; यहूदी हा शलेम्याहचा नातू आणि कूशीचा पणतू होता. त्यांनी त्याच्या हातून बारूखला असा निरोप पाठवला: “जी गुंडाळी तू लोकांसमोर वाचून दाखवलीस ती घेऊन इकडे ये.” मग, नेरीयाचा मुलगा बारूख याने ती गुंडाळी आपल्या हातात घेतली आणि तो त्यांच्याकडे गेला. १५ राजदरबारी त्याला म्हणाले: “ये बस. कृपया तो संदेश आम्हाला वाचून दाखव.” तेव्हा बारूखने तो संदेश त्यांच्यासमोर वाचला.

१६ तो संदेश ऐकताच ते फार घाबरले आणि एकमेकांकडे बघू लागले. मग ते बारूखला म्हणाले: “आम्हाला या सगळ्या गोष्टी राजाला सांगितल्याच पाहिजेत.” १७ त्यांनी मग बारूखला विचारलं: “कृपया आम्हाला सांग, तू या सगळ्या गोष्टी कोणाच्या सांगण्यावरून लिहिल्यास? यिर्मयाच्या?” १८ त्यावर बारूखने त्यांना उत्तर दिलं: “हो, यातली एकूण एक गोष्ट यिर्मयाने मला सांगितली आहे. आणि मी ती शाईने या गुंडाळीवर लिहून काढली.” १९ तेव्हा राजदरबारी बारूखला म्हणाले: “तू आणि यिर्मया, तुम्ही दोघं कुठेतरी जाऊन लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.”+

२० मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा सचिवाच्या खोलीत नेऊन ठेवली आणि ते अंगणात, राजाकडे गेले. त्यांनी जे काही ऐकलं होतं, ते सगळं त्यांनी राजाला सांगितलं.

२१ तेव्हा, राजाने यहूदीला ती गुंडाळी आणायला पाठवलं.+ यहूदीने अलीशामा सचिवाच्या खोलीतून ती गुंडाळी आणली, आणि तो ती राजासमोर आणि राजाजवळ उभ्या असलेल्या सगळ्या राजदरबाऱ्‍यांसमोर वाचू लागला. २२ त्या वेळी वर्षातला नववा महिना* चालू होता. आणि राजा थंडीच्या दिवसांत ज्या महालात राहायचा तिथे बसला होता. आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती. २३ यहूदीने गुंडाळीतले तीन-चार भाग वाचले, की राजा लगेच सचिवाच्या सुरीने ते भाग कापून शेगडीतल्या आगीत टाकायचा. असं करत-करत ती संपूर्ण गुंडाळी आगीत जळून खाक झाली. २४ राजाने आणि त्याच्या सगळ्या सेवकांनी गुंडाळीतला संदेश ऐकला, पण ते घाबरले नाहीत किंवा दुःखाने त्यांनी आपले कपडेही फाडले नाहीत. २५ राजाने गुंडाळी जाळू नये अशी एलनाथान,+ दलाया+ आणि गमरयाह+ यांनी त्याला खूप विनंती केली, पण राजाने त्यांचं काहीएक ऐकलं नाही. २६ उलट राजाने, राजपुत्र यरहमेल याला, तसंच अज्रीएलचा मुलगा सराया आणि अब्देलचा मुलगा शलेम्याह यांना बारूख सचिवाला आणि यिर्मया संदेष्ट्याला पकडायचा हुकूम दिला. पण यहोवाने त्या दोघांना लपवून ठेवलं.+

२७ यिर्मयाने सांगितलेल्या गोष्टी बारूखने ज्या गुंडाळीवर लिहिल्या होत्या,+ ती गुंडाळी राजाने जाळून टाकल्यानंतर यिर्मयाला यहोवाकडून परत एक संदेश मिळाला. तो असा: २८ “दुसरी एक गुंडाळी घे आणि यहूदाचा राजा यहोयाकीम याने जी गुंडाळी जाळून टाकली+ त्या गुंडाळीतल्या सगळ्या गोष्टी या गुंडाळीवर परत लिहून काढ. २९ आणि यहूदाचा राजा यहोयाकीम याला असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “तू गुंडाळी जाळून टाकलीस आणि म्हणालास, ‘तू त्यावर असं का लिहिलंस, की “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करेल, आणि या देशात एकही माणूस किंवा प्राणी उरणार नाही”?’+ ३० म्हणून आता, यहूदाचा राजा यहोयाकीम याच्याविषयी यहोवा असं म्हणतो, ‘दावीदच्या राजासनावर बसण्यासाठी त्याच्या वंशात कोणीही उरणार नाही.+ आणि त्याचं प्रेत दिवसाच्या उन्हात आणि रात्रीच्या थंडीत पडून राहील.+ ३१ मी त्याच्याकडून, त्याच्या वंशजांकडून आणि त्याच्या सेवकांकडून त्यांच्या अपराधांचा हिशोब घेईन. मी त्यांच्यावर, यरुशलेमच्या रहिवाशांवर आणि यहूदाच्या माणसांवर जी संकटं आणण्याविषयी बोललो होतो, ती सगळी संकटं मी त्यांच्यावर आणीन.+ कारण त्यांनी माझं ऐकलं नाही.’”’”+

३२ यिर्मयाने मग दुसरी एक गुंडाळी घेतली आणि ती नेरीयाच्या मुलाला, म्हणजे बारूख सचिवाला दिली.+ यहूदाचा राजा यहोयाकीम याने जी गुंडाळी आगीत जाळून टाकली,+ त्यावर लिहिलेल्या सगळ्या गोष्टी यिर्मया सांगत गेला आणि बारूख त्या लिहित गेला. शिवाय, यांसारख्या आणखीही काही गोष्टी गुंडाळीत लिहिण्यात आल्या.

३७ योशीयाचा मुलगा, म्हणजे सिद्‌कीया+ राजा हा यहोयाकीमच्या मुलाच्या, म्हणजे कोन्याच्या*+ जागी राज्य करू लागला. कारण बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने त्याला यहूदावर राजा म्हणून नेमलं होतं.+ २ पण, यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगितलं होतं त्याकडे सिद्‌कीया राजाने, त्याच्या सेवकांनी आणि देशातल्या लोकांनी लक्ष दिलं नाही.

३ सिद्‌कीया राजाने शलेम्याहचा मुलगा यहूकल+ आणि मासेया याजकाचा मुलगा सफन्या+ यांना यिर्मया संदेष्ट्याकडे असं सांगून पाठवलं: “कृपा करून आपला देव यहोवा याच्याकडे आपल्यासाठी प्रार्थना करा.” ४ यिर्मयाला अजूनपर्यंत तुरुंगात टाकण्यात आलं नव्हतं,+ म्हणून तो लोकांमध्ये मोकळेपणे फिरत होता. ५ त्या वेळी, खास्दी लोकांनी यरुशलेमला वेढा घातला होता. पण, फारोचं सैन्य इजिप्तमधून इकडे यायला निघालं आहे,+ हे ऐकून खास्दी लोक यरुशलेमपासून निघून गेले.+ ६ तेव्हा यिर्मया संदेष्ट्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ७ “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, ‘ज्या यहूदाच्या राजाने तुम्हाला माझा सल्ला घ्यायला माझ्याकडे पाठवलंय, त्याला असं सांगा: “बघ! फारोचं जे सैन्य तुम्हाला मदत करायला येतंय, त्याला परत आपल्या देशात, इजिप्तला जावं लागेल.+ ८ आणि खास्दी लोक पुन्हा येऊन शहराविरुद्ध लढतील. ते त्यावर कब्जा मिळवून त्याला जाळून टाकतील.”+ ९ यहोवा म्हणतो, “असं म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, की ‘खास्दी लोक निघून गेलेत, ते परत येणार नाहीत.’ कारण ते नक्की परत येतील. १० तुम्ही तुमच्याशी लढणाऱ्‍या खास्दी लोकांच्या सगळ्या सैन्याला जरी संपवून टाकलंत आणि त्यांचे फक्‍त जखमी सैनिक जरी उरले, तरी ते आपल्या छावणीतून बाहेर येतील आणि हे शहर जाळून टाकतील.”’”+

११ फारोच्या सैन्यामुळे जेव्हा खास्दी लोकांचं सैन्य यरुशलेमपासून निघून गेलं,+ १२ तेव्हा यिर्मया त्याच्या लोकांमधला त्याचा हिस्सा मिळवायला यरुशलेमहून बन्यामीनच्या प्रदेशात जायला निघाला.+ १३ पण, जेव्हा तो ‘बन्यामीनच्या फाटकाजवळ’ पोहोचला, तेव्हा पहारेकऱ्‍यांचा अधिकारी इरीया याने त्याला धरलं; इरीया हा शलेम्याहचा मुलगा आणि हनन्याचा नातू होता. तो यिर्मया संदेष्ट्याला म्हणाला: “तू दगाबाजी करतोयस! तू आम्हाला सोडून खास्द्यांच्या बाजूला चाललायस!” १४ पण यिर्मया त्याला म्हणाला: “नाही, मी दगाबाजी करत नाही! मी खास्द्यांकडे नाही चाललो.” इरीया मात्र त्याचं काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याने यिर्मयाला अटक केली आणि तो त्याला अधिकाऱ्‍यांकडे घेऊन गेला. १५ अधिकारी यिर्मयावर खूप भडकले.+ त्यांनी त्याला बेदम मारलं आणि यहोनाथान सचिवाच्या घरात डांबलं;+ कारण त्याच्या घरालाच तुरुंग बनवण्यात आलं होतं. १६ यिर्मयाला तिथे तळघरात, अंधार कोठडीत टाकण्यात आलं आणि तो बरेच दिवस तिथे राहिला.

१७ मग सिद्‌कीया राजाने यिर्मयाला आपल्या महालात बोलावून घेतलं आणि त्याने एकांतात त्याला काही प्रश्‍न विचारले.+ तो म्हणाला, “यहोवाकडून काही संदेश आहे का?” त्यावर यिर्मया म्हणाला, “हो आहे!” यिर्मया पुढे म्हणाला, “तुला बाबेलच्या राजाच्या हाती दिलं जाईल!”+

१८ यिर्मया सिद्‌कीया राजाला असंही म्हणाला: “मी तुझ्याविरुद्ध, तुझ्या सेवकांविरुद्ध आणि तुझ्या लोकांविरुद्ध असं काय पाप केलंय, की तुम्ही लोकांनी मला तुरुंगात टाकलंत? १९ तुमचे जे संदेष्टे तुम्हाला सांगायचे, की ‘बाबेलचा राजा तुमच्याविरुद्ध आणि या देशाविरुद्ध लढायला येणार नाही,’ ते आता कुठे गेले?+ २० आता हे राजा, माझ्या प्रभू, कृपा करून माझी एक विनंती ऐक. माझ्यावर दया कर, कृपया मला परत यहोनाथान सचिवाच्या घरी पाठवू नकोस,+ नाहीतर मी तिथे मरून जाईन.”+ २१ म्हणून, सिद्‌कीया राजाने यिर्मयाला ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’+ कैदेत ठेवण्याचा हुकूम दिला. शहरातली सगळी भाकर संपेपर्यंत+ यिर्मयाला दररोज भटारांच्या गल्लीतून एक भाकर दिली जायची.+ अशा प्रकारे, यिर्मया ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’ राहिला.

३८ यिर्मया लोकांना जो संदेश सांगत होता, तो संदेश मत्तानचा मुलगा शपत्याह, पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याहचा मुलगा युकाल+ आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर+ यांनी ऐकला. यिर्मया असं सांगत होता: २ “यहोवा म्हणतो, ‘जो कोणी या शहरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मरेल.+ पण जो कोणी खास्दी लोकांना शरण जाईल तो आपला जीव वाचवेल; तो मरणार नाही, तर जिवंत राहील.’+ ३ यहोवा असं म्हणतो, ‘हे शहर नक्की बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हाती दिलं जाईल, आणि तो त्यावर कब्जा मिळवेल.’”+

४ तेव्हा अधिकारी राजाला म्हणाले: “या माणसाला मारून टाका.+ कारण असल्या गोष्टी सांगून, तो या शहरात उरलेल्या सैनिकांचं आणि सगळ्या लोकांचं मनोबल खचवतोय. हा माणूस लोकांच्या भल्याचा नाही, तर वाइटाचा विचार करतोय.” ५ त्यावर सिद्‌कीया राजा म्हणाला: “बघा! तो तुमच्या हाती आहे. कारण राजा तुम्हाला रोखू शकत नाही.”

६ म्हणून त्यांनी यिर्मयाला धरलं आणि ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’+ असलेल्या राजपुत्र मल्कीया याच्या विहिरीत टाकलं. त्यांनी त्याला दोरांनी विहिरीत सोडलं. त्या विहिरीत पाणी नव्हतं, फक्‍त चिखल होता. आणि यिर्मया त्या चिखलात रुतू लागला.

७ यिर्मयाला त्यांनी विहिरीत टाकलं आहे, ही गोष्ट एबद-मलेख+ राजदरबाऱ्‍याला,* जो मूळचा इथियोपियाचा होता त्याला कळली. त्या वेळी राजा ‘बन्यामीनच्या फाटकाजवळ’+ बसला होता. ८ म्हणून एबद-मलेख राजमहालातून निघाला आणि राजाकडे गेला. तो त्याला म्हणाला: ९ “हे राजा, माझ्या प्रभू! बघा, या लोकांनी यिर्मया संदेष्ट्यासोबत किती वाईट केलं! त्यांनी त्याला विहिरीत फेकलंय. तो तिथे उपासमारीने मरून जाईल, कारण शहरात खायला अन्‍न उरलेलं नाही.”+

१० तेव्हा राजाने इथियोपियाच्या एबद-मलेखला अशी आज्ञा दिली: “इथून ३० माणसं घेऊन जा आणि यिर्मया संदेष्टाला तो मरायच्या आधी बाहेर काढ.” ११ मग एबद-मलेखने आपल्यासोबत माणसं घेतली आणि ते सगळे महालात, राजभांडाराच्या खाली असलेल्या एका खोलीत गेले.+ त्यांनी तिथून काही जुनीपुराणी फडकी आणि चिंध्या घेतल्या. आणि दोरांच्या साहाय्याने त्या यिर्मयाकडे विहिरीत खाली सोडल्या. १२ मग इथियोपियाचा एबद-मलेख यिर्मयाला म्हणाला: “ही फडकी आणि चिंध्या तुझ्या काखेत दोरांखाली धर, म्हणजे दोर तुला रुतणार नाहीत.” तेव्हा यिर्मयाने तसंच केलं. १३ मग त्यांनी यिर्मयाला दोरांच्या साहाय्याने विहिरीतून ओढून बाहेर काढलं. त्यानंतर तो ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणातच’ राहिला.+

१४ सिद्‌कीया राजाने यिर्मयाला निरोप पाठवून यहोवाच्या मंदिराच्या तिसऱ्‍या प्रवेशद्वाराजवळ बोलावून घेतलं. मग राजा त्याला म्हणाला: “मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. माझ्यापासून काहीच लपवू नका.” १५ त्यावर यिर्मया सिद्‌कीयाला म्हणाला: “मी जर तुला सांगितलं, तर तू मला नक्कीच मारून टाकशील. आणि मी जर तुला सल्ला दिला, तर तू माझं ऐकणार नाहीस.” १६ तेव्हा सिद्‌कीया राजा एकांतात यिर्मयाला शपथ घेऊन म्हणाला: “ज्या देवाने आपल्याला जीवन दिलंय त्या यहोवाच्या जीवनाची शपथ, मी तुम्हाला मारून टाकणार नाही किंवा तुमच्या जिवावर टपलेल्या माणसांच्या हातीही तुम्हाला देणार नाही.”

१७ त्यावर यिर्मया सिद्‌कीयाला म्हणाला: “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘तू बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्‍यांना शरण गेलास, तर तुझा जीव वाचेल आणि हे शहरही जाळून टाकलं जाणार नाही. तुझा आणि तुझ्या घराण्याचा बचाव होईल.+ १८ पण जर तू बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्‍यांना शरण गेला नाहीस, तर हे शहर खास्दी लोकांच्या हाती दिलं जाईल. ते हे शहर जाळून टाकतील+ आणि तू त्यांच्या तावडीतून सुटणार नाहीस.’”+

१९ तेव्हा सिद्‌कीया यिर्मयाला म्हणाला: “जे यहुदी लोक खास्द्यांना जाऊन मिळालेत, त्यांची मला भीती वाटते. कारण मला जर त्यांच्या हाती दिलं गेलं, तर ते माझ्याशी क्रूरपणे वागतील.” २० पण यिर्मया त्याला म्हणाला: “तुला त्यांच्या हाती दिलं जाणार नाही. मी यहोवाचा जो संदेश तुला सांगतोय, कृपा करून त्याप्रमाणे कर; म्हणजे तुझं भलं होईल आणि तुझा जीव वाचेल. २१ पण तू जर त्यांना शरण गेला नाहीस, तर यहोवाने मला काय प्रकट केलंय, ते ऐक: २२ पाहा! यहूदाच्या राजाच्या महालात उरलेल्या सगळ्या स्त्रियांना बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्‍यांकडे+ बाहेर नेलं जातंय. आणि त्या म्हणत आहेत,

‘ज्या माणसांवर तुम्ही भरवसा ठेवला,

त्यांनी तुम्हाला फसवलंय आणि ते वरचढ ठरलेत.+

त्यांच्यामुळे तुमचा पाय चिखलात रुतलाय

आणि ते तुम्हाला सोडून मागे निघून गेलेत.’

२३ ते तुझ्या सगळ्या बायकांना आणि मुलांना बाहेर खास्दी लोकांकडे घेऊन जात आहेत. तूही त्यांच्या हातून निसटणार नाहीस. बाबेलचा राजा तुला नक्की धरेल+ आणि तुझ्यामुळे हे शहर जाळून टाकलं जाईल.”+

२४ मग सिद्‌कीया यिर्मयाला म्हणाला: “यातलं काहीही कोणाला सांगू नका, नाहीतर तुमचा जीव जाईल. २५ मी तुमच्याशी बोललोय ही गोष्ट जर अधिकाऱ्‍यांना कळली आणि त्यांनी येऊन तुम्हाला असं विचारलं, की ‘तुम्ही राजाला काय सांगितलं ते आम्हाला सांगा. आमच्यापासून काही लपवू नका, म्हणजे आम्ही तुम्हाला ठार मारणार नाही.+ राजा तुमच्याशी काय बोलला ते आम्हाला सांगा.’ २६ तर तुम्ही असं उत्तर द्या: ‘मी राजाला विनंती करत होतो, की त्याने मला परत यहोनाथानच्या घरी पाठवू नये, नाहीतर मी मरून जाईन.’”+

२७ काही काळाने सगळे अधिकारी यिर्मयाकडे आले आणि चौकशी करू लागले. तेव्हा राजाने आज्ञा केली होती, त्याप्रमाणे त्याने त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी यिर्मयाला आणखी काही विचारलं नाही. कारण त्या दोघांमध्ये झालेलं बोलणं कोणीही ऐकलं नव्हतं. २८ यरुशलेमवर कब्जा होईपर्यंत, यिर्मया ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणातच’ राहिला;+ यरुशलेम काबीज करण्यात आलं तेव्हाही तो तिथेच होता.+

३९ यहूदाचा राजा सिद्‌कीया याच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर आपलं सगळं सैन्य घेऊन यरुशलेमवर हल्ला करायला आला, आणि त्याने येऊन शहराला वेढा घातला.+

२ मग सिद्‌कीया राजाच्या शासनकाळाच्या ११ व्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी शहराच्या भिंतीला खिंडार पाडलं.+ ३ त्यानंतर बाबेलच्या राजाचे सगळे अधिकारी आत घुसले आणि ‘मधल्या दरवाजात’ जाऊन बसले.+ त्या अधिकाऱ्‍यांची नावं अशी: नेर्गल-शरेसर समगार,* नबो-सर्सखीम रबसारीस,* आणि नेर्गल-शरेसर रबमाग.* त्यांच्यासोबत बाबेलच्या राजाचे इतर अधिकारीही होते.

४ यहूदाचा राजा सिद्‌कीया आणि त्याचे सगळे सैनिक यांनी जेव्हा त्यांना पाहिलं, तेव्हा ते रातोरात शहराबाहेर पळून गेले;+ ते राजाच्या बागेजवळ असलेल्या दोन भिंतींच्या मधल्या दरवाजातून अराबाकडे जाणाऱ्‍या रस्त्याने पळाले.+ ५ पण, खास्दी लोकांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि यरीहोच्या ओसाड रानात त्यांनी सिद्‌कीयाला गाठलं.+ मग त्यांनी त्याला कैद करून हमाथ+ प्रदेशातल्या रिब्ला इथे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्याकडे आणलं.+ तिथे त्याने त्याला शिक्षा सुनावली. ६ बाबेलच्या राजाने रिब्ला इथे सिद्‌कीयासमोर त्याच्या मुलांना ठार मारलं. तसंच, त्याने यहूदाच्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांचीही कत्तल केली.+ ७ मग त्याने सिद्‌कीयाचे डोळे फोडले आणि बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला तांब्याच्या बेड्या घातल्या.+

८ नंतर खास्दी लोकांनी राजाचा महाल आणि लोकांची घरं जाळून टाकली.+ तसंच, त्यांनी यरुशलेम शहराभोवती असलेली भिंतही पाडून टाकली.+ ९ रक्षकांचा प्रमुख नबुजरदान+ याने शहरात उरलेल्या लोकांना बाबेलला बंदी बनवून नेलं. तसंच, त्याच्या बाजूने झालेल्या लोकांना आणि इतर उरलेल्या लोकांनाही त्याने बंदी बनवून नेलं.

१० पण, जे फार गरीब आणि कंगाल होते त्यांना मात्र रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने यहूदाच्या प्रदेशात मागे ठेवलं. त्या दिवशी त्याने त्यांना काम* करण्यासाठी द्राक्षमळे आणि शेतं दिली.+

११ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याला यिर्मयाविषयी असा हुकूम दिला: १२ “जा, त्याला शोध आणि त्याची काळजी घे. त्याला काही करू नकोस. तो तुझ्याकडे जे काही मागेल ते त्याला दे.”+

१३ तेव्हा रक्षकांचा प्रमुख नबुजरदान, रबसारीस* नबू-शजबान, रबमाग* नेर्गल-शरेसर आणि बाबेलच्या राजाचे सगळे प्रमुख लोक यांनी आपली माणसं पाठवली, १४ आणि यिर्मयाला ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणातून’+ बाहेर काढलं. शाफानचा+ नातू, म्हणजे अहीकामचा+ मुलगा गदल्या+ याने त्याला आपल्या घरी न्यावं, म्हणून त्यांनी यिर्मयाला त्याच्याकडे सोपवलं. अशा प्रकारे यिर्मया लोकांमध्ये राहिला.

१५ यिर्मया जेव्हा ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’ कैदेत होता,+ तेव्हा त्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १६ “जा, आणि इथियोपियाच्या एबद-मलेखला+ असं सांग, ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पाहा! मी या शहराचं भलं करण्याविषयी नाही, तर त्यावर संकट आणण्याविषयी जे बोललो होतो, ते मी पूर्ण करतोय. ज्या दिवशी हे घडेल, त्या दिवशी तू स्वतः ते पाहशील.”’

१७ ‘पण त्या दिवशी मी तुला वाचवीन. ज्या लोकांची तुला भीती वाटते, त्यांच्या हाती तुला दिलं जाणार नाही,’ असं यहोवा म्हणतो.

१८ ‘मी नक्की तुला वाचवीन. तू तलवारीला बळी पडणार नाहीस. तू माझ्यावर भरवसा ठेवलास,+ म्हणून तुझ्या जिवाचं रक्षण केलं जाईल,’+ असं यहोवा म्हणतो.”

४० रक्षकांचा प्रमुख नबुजरदान+ याने रामा+ इथे यिर्मयाला मुक्‍त केल्यावर, यहोवाकडून यिर्मयाला एक संदेश मिळाला; यरुशलेम आणि यहूदाच्या सर्व लोकांना नबुजरदान बंदी बनवून बाबेलला घेऊन चालला होता, तेव्हा त्याने त्यांच्यासोबत यिर्मयालाही बेड्या घालून रामा इथे आणलं होतं. २ रक्षकांचा प्रमुख यिर्मयाला बोलावून म्हणाला: “तुझ्या देवाने, यहोवाने सांगितलं होतं, की तो या जागेवर संकट आणेल. ३ आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने केलं. कारण, तुम्ही लोकांनी यहोवाविरुद्ध पाप केलंय आणि त्याचं ऐकलं नाही. म्हणून तुमच्या बाबतीत हे सगळं घडलंय.+ ४ आता हे बघ! मी तुझ्या हातांतल्या बेड्या काढून तुला मोकळं करतोय. तुला माझ्यासोबत बाबेलला यायची इच्छा असेल, तर ये; मी तुझी चांगली काळजी घेईन. पण जर तुला माझ्यासोबत बाबेलला यायचं नसेल, तर येऊ नकोस. बघ, संपूर्ण देश तुझ्यासमोर आहे, तुला जिथे जायचंय तिथे जा.”+

५ यिर्मया अजून मागे गेलाही नव्हता, तोच नबुजरदान त्याला म्हणाला: “शाफानचा+ नातू, म्हणजे अहीकामचा+ मुलगा गदल्या+ याच्याकडे तू परत जा. बाबेलच्या राजाने त्याला यहूदाच्या शहरांवर अधिकारी म्हणून नेमलंय. तेव्हा त्याच्याकडे जा आणि आपल्या लोकांसोबत राहा; किंवा मग तुला पाहिजे तिकडे जा.”

नंतर रक्षकांच्या प्रमुखाने त्याला काही अन्‍नसामग्री आणि भेटवस्तू देऊन पाठवून दिलं. ६ म्हणून मग यिर्मया, मिस्पा+ इथे अहीकामचा मुलगा गदल्या याच्याकडे गेला आणि त्याच्याबरोबर देशात उरलेल्या लोकांमध्ये राहिला.

७ काही काळाने, जे सेनाधिकारी आपल्या सैनिकांसोबत रानावनात राहत होते त्यांनी ऐकलं, की बाबेलच्या राजाने अहीकामचा मुलगा गदल्या याला देशावर अधिकारी म्हणून नेमलं आहे; ज्या गरीब लोकांना बाबेलला बंदी बनवून नेलं नाही त्या माणसांवर, स्त्रियांवर आणि मुलाबाळांवर त्याला अधिकारी म्हणून नेमलं आहे.+ ८ तेव्हा ते मिस्पा इथे गदल्याकडे आले;+ त्यांची नावं अशी: नथन्याचा मुलगा इश्‍माएल,+ कारेहची मुलं योहानान+ आणि योनाथान, तन्हूमेथचा मुलगा सराया, नटोफा इथे राहणाऱ्‍या रफैची मुलं आणि एका माकाथी माणसाचा मुलगा यजन्या;+ हे सर्व आपल्या माणसांना घेऊन गदल्याकडे आले. ९ तेव्हा शाफानचा नातू, म्हणजे अहीकामचा मुलगा गदल्या त्या सेनाधिकाऱ्‍यांना आणि त्यांच्या माणसांना शपथ घेऊन म्हणाला: “खास्दी लोकांची सेवा करायला घाबरू नका. या देशात राहा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचं भलं होईल.+ १० मी इथे मिस्पामध्ये राहीन आणि आपल्याकडे येणाऱ्‍या खास्दी लोकांशी तुमच्या वतीने बोलेन. पण तुम्ही मात्र द्राक्षारस, उन्हाळ्यातली फळं आणि तेल जमा करून भाड्यांमध्ये भरून ठेवा. आणि जी शहरं तुम्ही ताब्यात घेतलीत त्यांमध्ये राहा.”+

११ बाबेलच्या राजाने यहूदामध्ये काही लोकांना राहू दिलं आहे, आणि शाफानचा नातू, म्हणजे अहीकामचा मुलगा गदल्या याला त्यांच्यावर अधिकारी म्हणून नेमलं आहे ही गोष्ट मवाब, अम्मोन, अदोम आणि इतर सर्व देशांत राहणाऱ्‍या यहुदी लोकांनीही ऐकली. १२ त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी यहुदी लोकांची पांगापांग झाली होती, तिथून ते सगळे यहूदाच्या प्रदेशात परत येऊ लागले. ते मिस्पा इथे गदल्याकडे आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्षारस आणि उन्हाळ्यातली फळं जमा केली.

१३ कारेहचा मुलगा योहानान आणि रानावनात असलेले सगळे सेनाधिकारी मिस्पामध्ये गदल्याकडे आले. १४ ते त्याला म्हणाले: “तुला माहीत नाही का, की अम्मोनी+ लोकांचा राजा बालीस याने नथन्याचा मुलगा इश्‍माएल याला तुझा खून करायला पाठवलंय?”+ पण अहीकामचा मुलगा गदल्या याने त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला नाही.

१५ मग, कारेहचा मुलगा योहानान हा मिस्पामध्ये गदल्याकडे येऊन त्याला एकांतात म्हणाला: “मी जाऊन नथन्याचा मुलगा इश्‍माएल याला मारून टाकतो. कोणालाही याची खबर लागणार नाही. त्याने तुझा जीव का घ्यावा? आणि तुझ्याकडे आलेल्या यहूदाच्या सगळ्या लोकांची पांगापांग का व्हावी? आणि यहूदात उरलेल्या लोकांचा नाश का व्हावा?” १६ पण अहीकामचा मुलगा गदल्या+ कारेहच्या मुलाला, योहानानला म्हणाला: “असं अजिबात करू नकोस. कारण इश्‍माएलबद्दल तू जे काही म्हणतोस ते खोटंय.”

४१ मग सातव्या महिन्यात अलीशामाचा नातू, म्हणजे नथन्याचा मुलगा इश्‍माएल+ हा दहा माणसांना सोबत घेऊन मिस्पा इथे अहीकामचा मुलगा गदल्या याच्याकडे आला; इश्‍माएल हा राजवंशातला असून राजाच्या प्रमुख माणसांपैकी एक होता. मिस्पामध्ये+ ते एकत्र जेवण करत असताना, २ नथन्याचा मुलगा इश्‍माएल आणि त्याच्यासोबत असलेली दहा माणसं उठली आणि त्यांनी शाफानचा नातू, म्हणजे अहीकामचा मुलगा गदल्या याला तलवारीने मारून टाकलं; बाबेलच्या राजाने ज्याला देशावर अधिकारी म्हणून नेमलं होतं, त्याला इश्‍माएलने अशा प्रकारे ठार मारलं. ३ याशिवाय, त्याने मिस्पामध्ये गदल्यासोबत असलेल्या सगळ्या यहुदी लोकांना आणि खास्दी सैनिकांनाही मारून टाकलं.

४ मग दुसऱ्‍या दिवशी, म्हणजे गदल्याचा खून झाल्यावर आणि या गोष्टीची कोणालाही खबर लागण्यापूर्वी असं झालं, की ५ शखेम,+ शिलो+ आणि शोमरोन+ इथून ८० माणसं आली. त्यांनी आपल्या दाढ्या कापल्या होत्या, कपडे फाडले होते आणि अंगावर जखमा करून घेतल्या होत्या.+ तसंच, यहोवाच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी त्यांच्या हातांत अन्‍नार्पणं आणि ऊद*+ होता. ६ तेव्हा नथन्याचा मुलगा इश्‍माएल मिस्पामधून बाहेर रडत-रडत त्यांना भेटायला गेला. त्यांना भेटल्यावर तो त्यांना म्हणाला: “चला, आपण अहीकामच्या मुलाकडे, गदल्याकडे जाऊ.” ७ पण जेव्हा ते शहरात आले, तेव्हा नथन्याचा मुलगा इश्‍माएल आणि त्याची माणसं यांनी त्या लोकांची कत्तल केली आणि त्यांना कोरड्या विहिरीत फेकून दिलं.

८ पण, त्यांच्यामधली दहा माणसं इश्‍माएलला म्हणाली: “आमचा जीव घेऊ नकोस. कारण आमच्याकडे गव्हाचा, तेलाचा, जवाचा आणि मधाचा साठा आहे, आणि आम्ही तो शेतामध्ये लपवून ठेवलाय.” म्हणून त्याने त्यांना सोडून दिलं; त्यांच्या भावांसोबत त्याने त्यांना ठार मारलं नाही. ९ इश्‍माएलने ज्या माणसांची कत्तल केली होती, त्यांची प्रेतं त्याने एका मोठ्या विहिरीत टाकून दिली; इस्राएलचा राजा बाशा+ याच्या भीतीमुळे आसा राजाने ही विहीर खणली होती. नथन्याचा मुलगा इश्‍माएल याने ही विहीर कत्तल केलेल्या माणसांच्या प्रेतांनी भरून टाकली.

१० इश्‍माएलने मिस्पामध्ये उरलेल्या सगळ्या लोकांना,+ म्हणजे रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने अहीकामचा मुलगा गदल्या याच्या अधिकाराखाली दिलेल्या सगळ्या लोकांना बंदी बनवलं. या लोकांमध्ये राजाच्या मुली आणि मिस्पामध्ये उरलेले सगळे लोकही होते.+ या सर्व लोकांना बंदी बनवून नथन्याचा मुलगा इश्‍माएल पलीकडे अम्मोनी लोकांच्या प्रदेशाकडे जायला निघाला.+

११ नथन्याचा मुलगा इश्‍माएल याने जी सगळी दुष्ट कामं केली होती, त्यांबद्दल कारेहचा मुलगा योहानान+ आणि त्याचे सगळे सेनाधिकारी यांनी ऐकलं. १२ तेव्हा ते आपल्यासोबत सगळ्या माणसांना घेऊन नथन्याचा मुलगा इश्‍माएल याच्याशी लढायला निघाले. आणि त्यांना तो गिबोनच्या मोठ्या जलाशयाजवळ* सापडला.

१३ इश्‍माएलने ज्या लोकांना बंदी बनवून नेलं होतं, त्यांनी जेव्हा कारेहचा मुलगा योहानान याला आणि त्याच्यासोबत त्याच्या सगळ्या सेनाधिकाऱ्‍यांना पाहिलं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. १४ मग ते सगळे लोक, म्हणजे इश्‍माएलने मिस्पामधून+ बंदी बनवून नेलेले सगळे लोक, मागे फिरले आणि कारेहचा मुलगा योहानान याच्याकडे गेले. १५ पण, नथन्याचा मुलगा इश्‍माएल आणि त्याची आठ माणसं मात्र योहानानच्या हातून निसटली, आणि ते अम्मोनी लोकांकडे पळून गेले.

१६ अहीकामचा मुलगा गदल्या याचा खून केल्यानंतर+ नथन्याचा मुलगा इश्‍माएल याने मिस्पामधून ज्या उरलेल्या माणसांना, सैनिकांना, स्त्रियांना, मुलांना आणि राजदरबाऱ्‍यांना बंदी बनवून नेलं होतं, त्या सगळ्या लोकांना कारेहचा मुलगा योहानान आणि त्याच्यासोबत असलेले सगळे सेनाधिकारी यांनी सोडवलं आणि गिबोनमधून परत आणलं. १७ मग ते इजिप्तला जाण्याच्या उद्देशाने+ बेथलेहेमजवळ+ असलेल्या किम्हामच्या विश्रामगृहात थांबले. १८ कारण त्यांना खास्दी लोकांची भीती वाटत होती. बाबेलच्या राजाने अहीकामच्या ज्या मुलाला, म्हणजे गदल्याला देशावर अधिकारी म्हणून नेमलं होतं,+ त्याचा नथन्याच्या मुलाने, इश्‍माएलने खून केला होता. म्हणून त्यांना खास्दी लोकांची भीती वाटत होती.

४२ त्यानंतर कारेहचा मुलगा योहानान,+ होशायाचा मुलगा यजन्या, सगळे सेनाधिकारी आणि सगळे लहान-मोठे लोक येऊन २ यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले: “आमच्यापैकी खूप कमी लोक उरलेत हे तर तुम्ही पाहतच आहात. तेव्हा कृपा करून आमची विनंती ऐका. उरलेल्या या लोकांसाठी, आमच्यासाठी तुमचा देव यहोवा याच्याकडे प्रार्थना करा.+ ३ आम्ही काय करावं आणि कोणत्या मार्गाने चालावं, हे तुमचा देव यहोवा याने आम्हाला कळवावं.”

४ त्यावर यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला: “ठीक आहे. तुमच्या विनंतीप्रमाणे मी तुमच्या देवाकडे, यहोवाकडे प्रार्थना करीन. आणि यहोवा मला जे काही सांगेल, ते मी तुम्हाला कळवीन. मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही.”

५ तेव्हा ते यिर्मयाला म्हणाले: “तुमचा देव यहोवा तुमच्याद्वारे आम्हाला जे काही सांगेल त्याप्रमाणे जर आम्ही केलं नाही, तर यहोवा आमच्याविरुद्ध खरा आणि विश्‍वासू साक्षीदार बनो. ६ पाहा! ज्या आमच्या देवाकडे, यहोवाकडे आम्ही तुम्हाला पाठवत आहोत, तो आम्हाला जे काही सांगेल ते आम्ही करू; मग ते आम्हाला पसंत असो किंवा नसो. म्हणजे मग आमचा देव यहोवा याचं ऐकल्यामुळे आमचं भलं होईल.”

७ मग दहा दिवसांनी यिर्मयाला यहोवाकडून संदेश मिळाला. ८ म्हणून त्याने कारेहचा मुलगा योहानान आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या सेनाधिकाऱ्‍यांना, तसंच लहान-मोठ्या सगळ्या लोकांना बोलावून घेतलं.+ ९ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मला ज्याच्याकडे विनंती करायला पाठवलं होतं, तो इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: १० ‘तुम्ही जर या देशात राहिलात, तर मी तुम्हाला उभारीन, मी तुम्हाला पाडणार नाही; मी रोपासारखं तुम्हाला लावीन, तुम्हाला उपटून टाकणार नाही. आणि मी तुमच्यावर जे संकट आणलंय त्याबद्दल मला वाईट वाटेल.+ ११ बाबेलच्या ज्या राजाची तुम्हाला भीती वाटते, त्याला घाबरू नका.’+

यहोवा म्हणतो: ‘त्याला घाबरू नका, कारण तुम्हाला वाचवायला आणि त्याच्या हातून सोडवायला मी तुमच्यासोबत आहे. १२ मी तुमच्यावर दया करीन.+ तोसुद्धा तुमच्यावर दया करेल आणि तुम्हाला तुमच्या देशात परत पाठवेल.

१३ ‘पण जर तुम्ही म्हणालात, की “नाही, आम्ही या देशात राहणार नाही!” आणि तुमचा देव यहोवा याचं जर तुम्ही ऐकलं नाही, १४ आणि म्हणालात, “आम्ही त्याऐवजी इजिप्तला जाऊ.+ तिथे आम्हाला युद्ध पाहावं लागणार नाही, रणशिंगाचा आवाज ऐकावा लागणार नाही, किंवा आमची उपासमार होणार नाही; आम्ही तिथेच जाऊन राहू,” १५ तर हे यहूदाच्या उरलेल्या लोकांनो, यहोवा काय म्हणतो ते ऐका. इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “जर इजिप्तला जायचा तुमचा निर्णय पक्का असेल, आणि तुम्ही तिथे जाऊन राहिलात,* १६ तर ज्या तलवारीची तुम्हाला भीती वाटते, ती इजिप्तमध्ये तुम्हाला गाठेल. आणि ज्या दुष्काळाची तुम्हाला भीती वाटते, तो इजिप्तमध्ये तुमचा पाठलाग करेल आणि तुम्ही तिथेच मराल.+ १७ ज्या-ज्या लोकांनी इजिप्तला जाऊन राहायचं ठरवलंय, ते सगळे तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मरतील. मी जे संकट त्यांच्यावर आणणार आहे, त्यातून कोणीही वाचणार नाही किंवा सुटणार नाही.”’

१८ कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘तुम्ही जर इजिप्तला गेलात, तर मी जसा यरुशलेमच्या रहिवाशांवर माझ्या क्रोधाचा आणि संतापाचा वर्षाव केला होता,+ तसा तुमच्यावरही करीन. तुम्ही शापित व्हाल, तुमची अवस्था पाहून लोकांना दहशत बसेल, ते तुम्हाला शिव्याशाप देतील आणि तुमची बदनामी करतील.+ तुम्ही परत कधीच हे ठिकाण पाहणार नाही.’

१९ हे यहूदाच्या उरलेल्या लोकांनो, यहोवाने तुमच्याविरुद्ध संदेश दिलाय. इजिप्तला जाऊ नका. लक्षात ठेवा, आज मी तुम्हाला इशारा देतोय, की २० तुम्ही जर ही चूक केली, तर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल. कारण तुमचा देव यहोवा याच्याकडे मला पाठवताना तुम्ही म्हणाला होता, ‘आमचा देव यहोवा याच्याकडे आमच्यासाठी प्रार्थना कर. आणि आमचा देव यहोवा जे काही सांगेल, ते सगळं आम्हाला सांग. आणि आम्ही त्याप्रमाणेच करू.’+ २१ बघा, आज ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. पण तुम्ही तुमचा देव यहोवा याचं ऐकणार नाही, किंवा त्याने माझ्याद्वारे तुम्हाला जे काही कळवलंय त्याप्रमाणे करणार नाही.+ २२ म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला राहायची इच्छा आहे तिथे तुम्ही नक्की तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मराल.”+

४३ अशा प्रकारे यिर्मयाने सर्व लोकांना, त्यांचा देव यहोवा याच्याकडून मिळालेला संदेश सांगितला; त्यांच्या देवाने, यहोवाने यिर्मयाला जो संदेश सांगायला पाठवलं होतं, त्यातला एकूण एक शब्द त्याने त्या लोकांना सांगितला. २ तेव्हा, होशायाचा मुलगा अजऱ्‍या, कारेहचा मुलगा योहानान+ आणि इतर सगळी गर्विष्ठ माणसं यिर्मयाला म्हणाली: “तू जे सांगतोस ते साफ खोटंय! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन राहू नका,’ असं सांगायला आमच्या देवाने, यहोवाने तुला पाठवलं नाही. ३ खरंतर, आम्ही खास्द्यांच्या हाती पडून मरावं किंवा त्यांनी आम्हाला बाबेलला बंदिवासात न्यावं, म्हणून नेरीयाचा मुलगा बारूख+ हाच तुला आमच्याविरुद्ध चिथवतोय.”+

४ असं बोलून कारेहचा मुलगा योहानान, त्याचे सगळे सेनाधिकारी आणि सगळे लोक यांनी यहूदा देशात राहण्याची यहोवाची आज्ञा पाळली नाही. ५ उलट, कारेहचा मुलगा योहानान आणि त्याचे सगळे सेनाधिकारी यांनी यहूदामध्ये उरलेल्या लोकांनाही, म्हणजे ज्यांची वेगवेगळ्या राष्ट्रांत पांगापांग झाली होती आणि जे परत यहूदा देशात राहायला आले होते, त्या सगळ्या लोकांनाही आपल्याबरोबर घेतलं.+ ६ त्यांनी आपल्यासोबत पुरुषांना, स्त्रियांना, मुलांना आणि राजाच्या मुलींना घेतलं. तसंच, रक्षकांचा प्रमुख नबुजरदान+ याने ज्यांना शाफानचा+ नातू, म्हणजे अहीकामचा+ मुलगा गदल्या+ याच्या अधिकाराखाली दिलं होतं, त्या सगळ्या लोकांनाही त्यांनी आपल्यासोबत घेतलं. याशिवाय, त्यांनी यिर्मया संदेष्ट्याला आणि नेरीयाचा मुलगा बारूख यालाही आपल्यासोबत घेतलं. ७ मग ते इजिप्तला गेले. त्यांनी यहोवाची आज्ञा पाळली नाही. आणि ते तहपन्हेस+ इथपर्यंत जाऊन पोहोचले.

८ मग तहपन्हेसमध्ये यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ९ “मोठमोठे दगड घे, आणि तहपन्हेसमध्ये फारोच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ विटांनी बनवलेला जो ओटा आहे, तिथे सगळ्या यहुदी माणसांसमोर ते बांधकामाच्या चुन्यात लपव. १० आणि त्या माणसांना असं सांग, ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पाहा! मी माझा सेवक, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याला पाठवतोय.+ जे दगड मी लपवलेत त्यांवरच तो आपलं राजासन मांडेल, आणि त्यांवर तो आपला शाही तंबू पसरवेल.+ ११ तो येऊन इजिप्तवर हल्ला करेल.+ तेव्हा काही लोक तलवारीला बळी पडतील, काही जीवघेण्या रोगाने मरतील आणि काहींना बंदिवासात नेलं जाईल.+ १२ मी इजिप्तच्या देवांच्या मंदिरांना आग लावीन.+ तो राजा ती मंदिरं जाळून टाकेल आणि त्यांना बंदी बनवेल. मेंढपाळ जितक्या सहजपणे आपल्या अंगावर घोंगडी घेतो, तितक्याच सहजपणे तो संपूर्ण इजिप्तला काबीज करेल आणि विजयी होऊन परत जाईल. १३ तो इजिप्तमध्ये असलेल्या बेथ-शेमेशच्या* खांबांचा चुराडा करेल आणि इजिप्तमधल्या दैवतांची मंदिरं जाळून टाकेल.”’”

४४ इजिप्त देशातल्या मिग्दोल,+ तहपन्हेस,+ नोफ*+ या ठिकाणी राहणाऱ्‍या, आणि पथ्रोस+ प्रदेशात राहणाऱ्‍या सर्व यहुदी लोकांसाठी+ यिर्मयाला असा संदेश मिळाला: २ “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी यरुशलेमवर आणि यहूदाच्या सगळ्या शहरांवर जी सर्व संकटं आणली, ती तुम्ही पाहिलीच आहेत.+ आजही ती शहरं उद्ध्‌वस्त अवस्थेत पडून आहेत आणि तिथे कोणीही राहत नाही.+ ३ त्यांची ही अवस्था यामुळे झाली, कारण त्या लोकांनी वाईट कामं करून माझा क्रोध भडकवला; जी दैवतं तुम्हाला किंवा तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नव्हती, अशा परक्या दैवतांची त्यांनी सेवा केली+ आणि त्यांना बलिदानं अर्पण केली.+ ४ मी माझ्या सेवकांना, माझ्या संदेष्ट्यांना वारंवार तुमच्याकडे पाठवत राहिलो, आणि सांगत राहिलो: “कृपा करून असलं घृणास्पद कृत्य करू नका. मला त्याचा तिरस्कार वाटतो.”+ ५ पण त्यांनी माझं ऐकलं नाही किंवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी इतर दैवतांना बलिदानं अर्पण करण्याचा आपला दुष्टपणा सोडला नाही.+ ६ म्हणून माझा राग व माझा क्रोध भडकला, आणि त्यात यहूदाची शहरं व यरुशलेमचे रस्ते जळून खाक झाले. आणि त्यामुळेच ते आजही ओसाड आणि उद्ध्‌वस्त अवस्थेत पडून आहेत.’+

७ आणि आता इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘तुम्ही स्वतःवर इतकं भयंकर संकट का ओढवून घेताय, की यहूदाच्या लोकांमधल्या प्रत्येक माणसाचा, स्त्रीचा, मुलाचा आणि तान्ह्या बाळाचा नाश होऊन कोणीही उरणार नाही? ८ ज्या इजिप्त देशात तुम्ही राहायला गेलात, तिथे तुम्ही इतर दैवतांना बलिदानं अर्पण करून माझा क्रोध का भडकवताय? यामुळे तुमचा नाश होईल, आणि पृथ्वीवरची सगळी राष्ट्रं तुम्हाला शिव्याशाप देतील आणि तुमची बदनामी करतील.+ ९ यहूदाच्या प्रदेशात आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर तुमच्या वाडवडिलांनी, यहूदाच्या राजांनी+ आणि त्यांच्या बायकांनी जी दुष्ट कामं केली;+ शिवाय, तुम्ही आणि तुमच्या बायकांनीही जी दुष्ट कामं केली, ती सगळी तुम्ही विसरलात का?+ १० आजपर्यंत त्यांनी स्वतःला नम्र केलं नाही* आणि माझं भय बाळगलं नाही.+ मी त्यांना आणि त्यांच्या वाडवडिलांना जे नियम व कायदे दिले होते त्याप्रमाणेही ते चालले नाहीत.’+

११ म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘पाहा, मी तुमच्यावर संकट आणायचं ठरवलंय, मी यहूदाचा नाश करून टाकायचं ठरवलंय. १२ यहूदाच्या ज्या उरलेल्या लोकांनी इजिप्तमध्ये जाऊन राहायचा पक्का निश्‍चय केला होता, त्यांना मी धरीन. आणि इजिप्तमध्येच त्या सगळ्यांचा नाश होईल.+ त्यांच्यातले लहानमोठे सगळे लोक तलवारीने आणि दुष्काळाने मरतील. ते शापित होतील आणि त्यांची अवस्था पाहून लोकांना दहशत बसेल. लोक त्यांना शिव्याशाप देतील आणि त्यांची बदनामी करतील.+ १३ मी जशी यरुशलेमच्या लोकांना शिक्षा केली, तशी इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या लोकांना तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने शिक्षा करीन.+ १४ यहूदाचे जे उरलेले लोक इजिप्तमध्ये राहायला गेलेत, ते यहूदामध्ये परत यायला वाचणार नाहीत किंवा जिवंत राहणार नाहीत. त्यांना यहूदाच्या प्रदेशात परत येऊन राहायची आस लागेल, पण ते परत येऊ शकणार नाहीत. त्यांच्यातले फक्‍त काही जण वाचतील आणि परत मागे येतील.’”

१५ तेव्हा, ज्या माणसांना माहीत होतं, की त्यांच्या बायका इतर दैवतांना बलिदानं अर्पण करतात ती सगळी माणसं, आणि तिथे उभ्या असलेल्या सगळ्या बायकांचा मोठा घोळका; तसंच इजिप्तमधल्या पथ्रोस+ या ठिकाणी राहणारे सगळे लोक+ यिर्मयाला म्हणाले: १६ “तू यहोवाच्या नावाने आम्हाला जे काही सांगितलंस ते आम्ही ऐकणार नाही. १७ याउलट, आमच्या तोंडून निघालेल्या प्रत्येक शब्दाप्रमाणे आम्ही करू. आम्ही ‘स्वर्गाच्या राणीला’* बलिदानं अर्पण करू आणि तिच्यासमोर पेयार्पणं ओतू.+ आम्ही, आमच्या वाडवडिलांनी, आमच्या राजांनी आणि अधिकाऱ्‍यांनी यहूदाच्या शहरांमध्ये आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर जशी बलिदानं दिली आणि पेयार्पणं ओतली, तसं आम्ही करत राहू. त्या वेळी आम्हाला खाण्यापिण्याची कसलीच कमी नव्हती, आमची परिस्थिती चांगली होती, आणि आमच्यावर कोणतंही संकट येत नव्हतं. १८ पण जेव्हापासून आम्ही ‘स्वर्गाच्या राणीला’* बलिदानं अर्पण करायचं आणि तिच्यासाठी पेयार्पणं ओतायचं बंद केलं, तेव्हापासून आम्हाला सगळ्या गोष्टींची कमी पडायला लागली. आणि तलवारीमुळे व दुष्काळामुळे आमचा नाश व्हायला लागला.”

१९ स्त्रिया पुढे म्हणाल्या: “आम्ही ‘स्वर्गाच्या राणीसाठी’* बलिदानं द्यायचो, पेयार्पणं ओतायचो आणि तिच्या प्रतिमेच्या पोळ्या बनवायचो, हे सगळं काय आम्ही आमच्या नवऱ्‍यांना विचारल्याशिवाय करायचो का?”

२० तेव्हा यिर्मया त्याच्याशी बोलणाऱ्‍या सर्व माणसांना, त्यांच्या बायकांना आणि लोकांना म्हणाला: २१ “यहूदाच्या शहरांमध्ये आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर तुम्ही, तुमच्या वाडवडिलांनी, तुमच्या राजांनी, अधिकाऱ्‍यांनी आणि देशातल्या लोकांनी जी बलिदानं अर्पण केली+ ती सगळी यहोवाच्या लक्षात आहेत, तो ती विसरलेला नाही! २२ शेवटी, तुमची दुष्ट कामं आणि घृणास्पद कृत्यं यहोवाला सहन झाली नाहीत. आणि म्हणून तुमचा देश उद्ध्‌वस्त झाला. त्याची भयानक अवस्था झाली, तो शापित आणि ओसाड झाला; आणि आजही तो तसाच आहे.+ २३ तुम्ही ही बलिदानं दिल्यामुळे आणि यहोवाविरुद्ध पाप केल्यामुळेच असं घडलंय. तुम्ही यहोवाचं ऐकलं नाही. तुम्ही त्याचे नियम, कायदे आणि त्याच्या स्मरण-सूचना* पाळल्या नाहीत; म्हणूनच आज हे संकट तुमच्यावर ओढवलंय.”+

२४ पुढे यिर्मया सर्व लोकांना आणि सर्व स्त्रियांना म्हणाला: “इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या यहूदाच्या सगळ्या लोकांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका. २५ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘तुम्ही आणि तुमच्या बायकांनी जे नवस केले होते, ते तुम्ही पूर्ण केलेत. तुम्ही म्हणाला होता: “‘स्वर्गाच्या राणीसाठी’* बलिदानं अर्पण करण्याचे आणि पेयार्पणं ओतण्याचे जे नवस आम्ही केलेत, ते आम्ही नक्की फेडू.”+ तुम्ही आणि तुमच्या बायका नक्की तुमचा नवस फेडाल.’

२६ पण इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या यहूदाच्या लोकांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका: यहोवा म्हणतो, “पाहा, मी स्वतःच्या महान नावाची शपथ घेऊन सांगतो, की यापुढे इजिप्तमध्ये राहणारा यहूदातला एकही माणूस शपथ घेताना, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा याच्या जीवनाची शपथ!’+ असं म्हणून माझं नाव घेणार नाही.+ २७ पाहा, आता मी त्यांचं भलं करायला नाही, तर त्यांच्यावर संकट आणायला त्यांच्यावर नजर ठेवून असेन.+ इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या यहूदाच्या सगळ्या माणसांचं नामोनिशाण मिटेपर्यंत त्यांचा तलवारीने आणि दुष्काळाने नाश होईल.+ २८ फक्‍त थोडेफार लोकच तलवारीपासून वाचतील आणि इजिप्तमधून परत यहूदाच्या प्रदेशात जातील.+ त्या वेळी, इजिप्तमध्ये राहायला आलेल्या यहूदाच्या उरलेल्या लोकांना कळेल, की कोणाचा शब्द खरा ठरला, माझा की त्यांचा!”’”

२९ “यहोवा म्हणतो, ‘मी याच ठिकाणी तुम्हाला शिक्षा करीन, हे दाखवायला मी तुम्हाला एक चिन्ह देतोय; म्हणजे तुम्हाला कळून येईल, की तुमच्यावर संकट आणण्याविषयी मी जे बोललोय ते नक्की घडेल. ३० यहोवा म्हणतो: “पाहा, मी इजिप्तच्या राजाला, फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूंच्या आणि त्याच्या जिवावर टपलेल्यांच्या हाती देईन. मी जसं यहूदाचा राजा सिद्‌कीया याला त्याच्या जिवावर टपलेल्या शत्रूच्या, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हाती दिलं, तसं त्याच्या बाबतीत करीन.”’”+

४५ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी,+ नेरीयाच्या मुलाने, बारूखने+ यिर्मया संदेष्ट्याचा संदेश पुस्तकात लिहून काढला. यिर्मया जस-जसा त्याला संदेश सांगत गेला, तस-तसा बारूख तो लिहित गेला.+ त्या वेळी, यिर्मया बारूखला म्हणाला:

२ “हे बारूख, इस्राएलचा देव यहोवा तुझ्याविषयी म्हणतो, ३ ‘तू म्हणालास: “अरेरे! यहोवाने माझ्या दुःखात आणखी भर घातली आहे! कण्हून कण्हून मी पार थकून गेलोय. आणि मला कुठेच विसावा मिळत नाही.”’

४ म्हणून देव म्हणाला बारूखला सांग: ‘यहोवा असं म्हणतो, “पाहा! जो देश मी बांधलाय, तो मी पाडून टाकतोय, आणि जो देश मी रोपासारखा लावलाय, तो मी मुळासकट उपटून टाकतोय.+ ५ पण, तू मोठमोठ्या गोष्टी मिळवायची इच्छा बाळगतोस. अशा इच्छा बाळगू नकोस.”’

‘कारण, बघ! लवकरच मी सर्व लोकांवर संकट आणतोय.+ पण तू जिथे कुठे जाशील, तिथे मी तुझा जीव वाचवीन,’+ असं यहोवा म्हणतो.”

४६ यहोवाने यिर्मया संदेष्ट्याला वेगवेगळ्या राष्ट्रांविषयी संदेश दिला.+ २ इजिप्तबद्दल हा संदेश देण्यात आला;+ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी,+ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीश इथे इजिप्तच्या राजाच्या सैन्याला, म्हणजे फारो नखोच्या+ सैन्याला हरवलं होतं; त्या सैन्याविषयी असा संदेश देण्यात आला:

 ३ “तुमच्या छोट्या ढाली* आणि मोठ्या ढाली तयार करा,

आणि युद्ध करायला निघा.

 ४ घोडेस्वारांनो, घोडे तयार करून त्यांच्यावर स्वार व्हा.

डोक्यावर टोप घालून आपल्या जागी तैनात व्हा.

भाले घासून चकचकीत करा आणि आपल्या अंगावर चिलखत चढवा.

 ५ यहोवा म्हणतो, ‘ते इतके घाबरलेले का दिसत आहेत?

ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे हरलेत.

ते घाबरल्यामुळे पळून गेलेत.

त्यांच्या शूरवीरांनी मागे वळूनही पाहिलं नाही.

सगळीकडे दहशत पसरली आहे.

 ६ चपळ असलेल्यांना पळून जाता येणार नाही, आणि योद्ध्यांना निसटून जाता येणार नाही.

उत्तरेकडे, फरात नदीच्या किनाऱ्‍यावर,

ते अडखळून पडले आहेत.’+

 ७ नाईल नदीसारखा हा कोण येतोय?

नदीच्या उसळणाऱ्‍या प्रवाहासारखा हा कोण येतोय?

 ८ नाईल नदीसारखा, नदीच्या उसळणाऱ्‍या प्रवाहासारखा येणारा हा इजिप्त आहे.+

तो म्हणतोय: ‘मी चढाई करून जाईन आणि संपूर्ण पृथ्वी झाकून टाकीन.

मी शहराचा आणि त्यात राहणाऱ्‍या लोकांचा नाश करून टाकीन.’

 ९ घोड्यांनो! पळत सुटा!

रथांनो, बेफाम धावा!

योद्ध्यांनो, पुढे जा;

ढाली हाताळणारे कूश आणि पूट पुढे जा,+

धनुर्धारी आणि धनुष्य वाकवणारा+ लूदीम,+ तूसुद्धा पुढे जा.

१० तो दिवस सर्वोच्च प्रभूचा, सैन्यांचा देव यहोवा याचा आहे; त्याच्या शत्रूंचा बदला घेण्याचा, त्यांच्यावर आपला सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार त्यांना खाऊन तृप्त होईल आणि त्यांचं रक्‍त पिऊन ती आपली तहान भागवेल. कारण सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा याने उत्तरेच्या देशात, फरात नदीजवळ बलिदान तयार केलंय.+

११ हे इजिप्तची कुमारी,

तू बाल्सम* घ्यायला गिलादला जा.+

खरंतर, तुझ्यासाठी कोणताही इलाज नाही,+

तू उगीचच इतके औषधोपचार करतेस.

१२ तुझ्या झालेल्या अपमानाबद्दल सगळ्या राष्ट्रांनी ऐकलंय,+

तुझा आक्रोश देशभर ऐकू येतोय.

कारण योद्धे एकमेकांमुळे अडखळत आहेत,

आणि ते खाली पडत आहेत.”

१३ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर, इजिप्तवर हल्ला करायला येणार होता, त्याच्याविषयी यिर्मया संदेष्ट्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला:+

१४ “इजिप्तमध्ये हे जाहीर करा, मिग्दोलमध्ये+ याची घोषणा करा,

नोफ* आणि तहपन्हेस+ यांनाही कळवा.

असं म्हणा, ‘आपापल्या जागी तैनात व्हा आणि सज्ज व्हा,

कारण तुमच्या आसपासच्या सगळ्या लोकांना तलवार खाऊन टाकणार आहे.

१५ तुझे शक्‍तिशाली पुरुष नाहीसे का झालेत?

ते आपल्या जागी टिकू शकले नाहीत,

कारण यहोवाने त्यांना ढकलून खाली पाडलंय.

१६ त्यांच्यातल्या अडखळून पडणाऱ्‍यांची संख्या फार मोठी आहे.

ते एकमेकांना म्हणत आहेत:

“चला! या क्रूर तलवारीपासून आपण पळ काढू,

आणि आपल्या देशात, आपल्या लोकांकडे परत जाऊ.”’

१७ तिथे ते असं म्हणत आहेत,

‘इजिप्तचा राजा फारो, नुसता बाता मारणारा आहे,

त्याने हाताशी आलेली संधी गमावली आहे.’+

१८ ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे तो राजा म्हणतो, ‘मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, की

तो* डोंगरांमधल्या ताबोरसारखा,+

आणि समुद्राजवळच्या कर्मेलसारखा+ येईल.

१९ हे इजिप्तमध्ये राहणारी कुमारी!

बंदिवासात जाण्यासाठी आपलं सामान बांध.

कारण, नोफची* अवस्था अशी होईल की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल;

ते जाळून टाकलं जाईल,* आणि तिथे कोणीही उरणार नाही.+

२० इजिप्त ही एका सुंदर तरण्या गाईसारखी* असली,

तरी उत्तरेकडून डंख मारणाऱ्‍या माश्‍या तिच्याविरुद्ध येतील.

२१ तिचे भाडोत्री सैनिक धष्टपुष्ट वासरांसारखे आहेत,

पण तेसुद्धा पाठ दाखवून पळून गेले आहेत.

ते आपल्या जागी टिकू शकले नाहीत,+

कारण त्यांच्या संकटाचा दिवस त्यांच्यावर कोसळलाय,

त्यांच्याकडून हिशोब घ्यायची वेळ आली आहे.’

२२ ‘तिचा आवाज सरसरत, पळून चाललेल्या सापासारखा आहे.

कारण ते कुऱ्‍हाडी घेऊन तिच्या मागे येत आहेत;

झाडं कापून टाकणाऱ्‍या माणसांसारखे ते पूर्ण ताकदीने तिच्या मागे येत आहेत.’

२३ यहोवा म्हणतो, ‘तिच्या दाट जंगलात कोणी घुसू शकत नसलं,

तरी ते येऊन तिचं जंगल तोडून टाकतील.

कारण त्यांची संख्या टोळांपेक्षा जास्त आहे;

कोणीही ती मोजू शकत नाही.

२४ इजिप्तच्या कुमारीला लज्जित केलं जाईल.

तिला उत्तरेच्या लोकांच्या हवाली केलं जाईल.’+

२५ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘आता मी माझं लक्ष नोवरून*+ आमोनकडे+ वळवतोय. मी माझं लक्ष फारोकडे, इजिप्तकडे, तिच्या देवांकडे+ आणि तिच्या राजांकडे वळवतोय; हो, मी माझं लक्ष फारोकडे आणि त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या सगळ्यांकडे वळवतोय.’+

२६ ‘आणि मी त्यांना त्यांच्या जिवावर टपलेल्यांच्या हवाली करीन; मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या आणि त्याच्या सेवकांच्या हवाली करीन.+ पण नंतर मात्र इजिप्तमध्ये पूर्वीसारखीच लोकवस्ती होईल,’ असं यहोवा म्हणतो.+

२७ ‘हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस.

आणि हे इस्राएल! तू भिऊ नकोस.+

कारण तू जरी दूर असलास, तरी मी तुला वाचवीन,

मी तुझ्या वंशजांना* बंदिवासातल्या देशातून सोडवीन.+

याकोब परत येईल. त्याला घाबरवणारा कोणीही नसेल; तो सुखशांतीत राहील.+

२८ म्हणून हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे,’ असं यहोवा म्हणतो.

‘ज्या सर्व राष्ट्रांमध्ये मी तुझी पांगापांग केली, त्यांचा मी समूळ नाश करीन;+

पण तुझा मात्र मी समूळ नाश करणार नाही.+

मी तुला योग्य प्रमाणात शिस्त लावीन.*+

पण, मी तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.’”

४७ फारोने गाझावर हल्ला केला, त्याआधी यिर्मया संदेष्टयाला पलिष्टी लोकांबद्दल+ यहोवाकडून असा संदेश मिळाला: २ यहोवा म्हणतो,

“पाहा! उत्तरेकडून पाणी वर चढतय.

ते वाढत जाऊन मोठा पूर येईल.

त्या पुरामुळे संपूर्ण देश आणि त्यातलं सगळं काही पाण्याखाली जाईल.

शहर आणि त्यातले सगळे लोक बुडून जातील.

माणसं रडतील, देशातले सगळे लोक आक्रोश करतील.

 ३ त्याच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून,

त्याच्या रथांचा खडखडाट,

आणि चाकांचा घडघडाट ऐकून,

वडिलांचे हात गळून जातील,

पळताना ते मागे वळून आपल्या मुलांकडेही पाहणार नाहीत.

 ४ कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस जवळ येतोय;+

त्या दिवशी सोर+ आणि सीदोनच्या+ उरलेल्या सगळ्या मित्र-राष्ट्रांचा नाश होईल.

कारण यहोवा पलिष्ट्यांचा,

म्हणजे कफतोर* बेटावरच्या उरलेल्या लोकांचा नाश करेल.+

 ५ गाझाचं मुंडण केलं जाईल.*

अष्कलोनला गप्प करण्यात आलंय.+

त्यांच्या खोऱ्‍यातल्या उरलेल्या लोकांनो,

तुम्ही कधीपर्यंत स्वतःच्या अंगावर जखमा करून घेत राहाल?+

 ६ हे यहोवाची तलवार!+

तू कधी शांत होशील?

आपल्या म्यानात परत जा.

शांत हो आणि विश्रांती घे.

 ७ पण, ती कशी शांत बसू शकेल?

कारण यहोवानेच तिला आज्ञा दिली आहे.

त्याने तिला अष्कलोन आणि समुद्रकिनाऱ्‍यावरच्या प्रदेशांविरुद्ध+ नेमलंय.”

४८ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा, मवाबविषयी+ असं म्हणतो:

“अरेरे! पाहा नबोचा+ कसा नाश करण्यात आलाय!

किर्याथाईमला+ काबीज करून कसं लज्जित करण्यात आलंय!

सुरक्षित आश्रयस्थानाचा* चुराडा झालाय आणि ते लज्जित करण्यात आलंय.+

 २ ते आता मवाबची प्रशंसा करत नाहीत.

हेशबोनमध्ये+ त्यांनी तिच्या नाशाचा कट रचलाय. ते म्हणतात:

‘चला, आपण या राष्ट्राचं नामोनिशाण मिटवून टाकू.’

हे मदमेन! तूपण शांत बस.

कारण तलवार तुझाही पाठलाग करत आहे.

 ३ होरानाइममधून आक्रोश ऐकू येतोय.+

कारण त्या नगराचा नाश होऊन ते जमीनदोस्त झालंय.

 ४ मवाबला उद्ध्‌वस्त करण्यात आलंय.

तिची लहान मुलं रडत आहेत.

 ५ लूहीथच्या चढावर चढून जाताना ते सतत अश्रू गाळत आहेत.

होरानाइमहून खाली उतरताना त्यांना ओरडण्याचा,

संकट कोसळल्यामुळे लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतोय.+

 ६ पळा! आपला जीव वाचवा!

ओसाड रानातल्या गंधसरूच्या झाडासारखे व्हा.

 ७ हे मवाब! तुला तुझ्या कार्यांवर आणि तुझ्या खजिन्यांवर खूप भरवसा आहे,

म्हणून तुलाही काबीज केलं जाईल.

तुझा देव कमोश+ बंदिवासात जाईल,

तो आपल्या पुजाऱ्‍यांसोबत आणि अधिकाऱ्‍यांसोबत बंदिवासात जाईल.

 ८ नाश करणारा येऊन सगळ्या शहरांवर हल्ला करेल,

त्याच्या हातून एकही शहर सुटणार नाही.+

खोऱ्‍याचा नाश होईल,

आणि सपाट प्रदेशही उद्ध्‌वस्त केला जाईल,

यहोवाने म्हटल्याप्रमाणेच घडेल.

 ९ मवाबसाठी रस्त्यावर चिन्ह उभारा,

कारण तिची शहरं उद्ध्‌वस्त होताच शहरातले लोक पळू लागतील.

लोकांना दहशत बसेल अशी तिच्या शहरांची अवस्था होईल,

त्यांत कोणीही राहणार नाही.+

१० यहोवाने दिलेल्या कामात जो हलगर्जीपणा करतो, तो शापित आहे!

जो आपली तलवार रक्‍त सांडण्यापासून आवरतो, तो शापित आहे!

११ मवाबी लोक आपल्या तरुणपणापासून सुखात आहेत,

गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखे ते आहेत.

त्यांना कधीही एका भांड्यातून दुसऱ्‍या भांड्यात ओतण्यात आलं नाही,

आणि ते कधीच बंदिवासात गेले नाहीत.

म्हणून त्यांची चव आहे तशीच आहे,

आणि त्यांचा वासही बदललेला नाही.

१२ पण यहोवा म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा त्यांना उलथून टाकायला मी माणसं पाठवीन. ते त्यांना पालथं करून त्यांची भांडी रिकामी करतील, आणि त्यांच्या मोठमोठ्या मडक्यांचा चुराडा करतील. १३ तेव्हा मवाबचे लोक आपल्या कमोश दैवतामुळे लज्जित होतील; बेथेलमधल्या खोट्या उपासनेवर भरवसा ठेवल्यामुळे इस्राएलचं घराणं जसं लज्जित झालंय, तसं मवाबचे लोक लज्जित होतील.+

१४ तुमची अशी म्हणायची हिंमत तरी कशी झाली, की “आम्ही शूरवीर आहोत आणि युद्धासाठी तयार आहोत”?’+

१५ ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे, तो राजा असं म्हणतो,+

‘मवाबचा नाश झालाय,

तिच्या शहरांवर हल्ला झालाय,+

तिथल्या सगळ्यात चांगल्या तरुणांची कत्तल झाली आहे.’+

१६ मवाबच्या लोकांवर लवकरच संकट कोसळेल.

त्यांचा नाश वेगाने जवळ येतोय.+

१७ त्यांच्या आसपासच्या लोकांना आणि त्यांचं नाव माहीत असलेल्या लोकांना, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल.

ते म्हणतील: ‘अरेरे! ही मजबूत छडी, सौंदर्याची काठी कशी मोडली गेली आहे!’

१८ हे दीबोनमध्ये+ राहणाऱ्‍या मुली!

आपल्या वैभवावरून खाली उतर आणि तहानलेलीच* बसून राहा.

कारण मवाबचा नाश करणारा तुझ्यावर हल्ला करायला आलाय,

तो तुझे मजबूत किल्ले धुळीस मिळवेल.+

१९ अरोएरच्या+ रहिवाशा, रस्त्याच्या कडेला उभा राहा आणि बघ.

पळून जाणाऱ्‍या माणसाला आणि निसटून जाणाऱ्‍या स्त्रीला विचार, ‘काय झालं?’

२० मवाबला लज्जित करण्यात आलंय आणि तिला दहशत घालण्यात आली आहे.

मोठ्याने रडा, आक्रोश करा.

आर्णोनमध्ये+ घोषणा करा, की मवाबचा नाश करण्यात आलाय.

२१ देवाने सपाट प्रदेशातल्या नगरांवरही न्यायदंड बजावलाय.+ त्याने होलोन, याहस,+ मेफाथ,+ २२ दीबोन,+ नबो,+ बेथ-दिबलाथाईम, २३ किर्याथाईम,+ बेथ-गामूल, बेथ-मौन,+ २४ करियोथ+ आणि बस्रा या नगरांवर; तसंच, मवाबच्या जवळच्या आणि दूरच्या सगळ्या शहरांवर न्यायदंड बजावलाय.

२५ ‘मवाबचं शिंग* तोडण्यात आलंय;

त्याचा हात मोडून टाकण्यात आलाय,’ असं यहोवा म्हणतो.

२६ ‘मवाब स्वतःला यहोवापेक्षा मोठं समजतोय,+ म्हणून नशा येईपर्यंत त्याला दारू पाजा.+

तो स्वतःच्याच ओकारीत लोळतोय,

आणि प्रत्येक जण त्याची थट्टा करतोय.

२७ तू इस्राएलची थट्टा करायचास ना?+

तो काय चोरांच्या टोळीत सापडला होता का,

म्हणून तू डोकं हालवून त्याची थट्टा करतोस आणि त्याच्याविरुद्ध बोलतोस?

२८ मवाबच्या रहिवाशांनो! आपली शहरं सोडून द्या, आणि खडकांमध्ये जाऊन राहा.

कडेकपारींमध्ये घरटी करून राहणाऱ्‍या कबुतरांसारखं व्हा.’”

२९ “मवाबला किती गर्व आहे, याबद्दल आम्ही ऐकलंय. तो अतिशय घमेंडी आहे.

तो किती उद्धट, गर्विष्ठ, मगरूर आणि अहंकारी आहे, याबद्दल आम्ही ऐकलंय.”+

३० “यहोवा म्हणतो, ‘मवाब किती रागीट आहे, हे मला माहीत आहे.

तो बढाया मारतो, पण त्या पोकळ आहेत.

मवाबी लोक काहीही करणार नाहीत.

३१ म्हणून मी मवाबसाठी आक्रोश करीन.

मी संपूर्ण मवाबसाठी मोठ्याने रडीन,

आणि कीर-हरेसच्या लोकांसाठी शोक करीन.+

३२ हे सिब्माच्या+ द्राक्षवेली! मी तुझ्यासाठी रडीन,

मी याजेरसाठी+ जितका रडलो, त्यापेक्षा जास्त तुझ्यासाठी रडीन.

जोमाने वाढणाऱ्‍या तुझ्या फांद्या समुद्रापलीकडे गेल्या आहेत.

त्या समुद्रापर्यंत, याजेरपर्यंत पोहोचल्या आहेत.

तुझ्या उन्हाळी फळांची आणि कापणी केलेल्या द्राक्षांची नासधूस करायला नाश करणारा आलाय.+

३३ फळबागांतून आणि मवाब देशातून,

आनंदोत्सवाचा आणि जल्लोषाचा आवाज नाहीसा करण्यात आलाय.+

मी द्राक्षकुंडातून वाहणाऱ्‍या द्राक्षरसाचा प्रवाह बंद केलाय.

पुन्हा कधीच कोणी आनंदोत्सव करत द्राक्षं तुडवणार नाही.

तिथून आवाज ऐकू येईल, पण तो जल्लोषाचा नसेल.’”+

३४ “‘हेशबोनपासून+ पार एलालेपर्यंत+ आक्रोश ऐकू येतोय.

ते इतक्या मोठ्याने ओरडत आहेत, की त्यांचा आवाज याहसपर्यंत+ ऐकू येतोय.

सोअरपासून पार होरानाइम+ आणि एगलाथ-शलि-शीया इथपर्यंत त्यांचा आवाज पोहोचलाय.

निम्रीममधले पाण्याचे प्रवाहसुद्धा आटून जातील.’+

३५ यहोवा म्हणतो, ‘मी मवाबची अशी दशा करीन, की

तिथल्या उच्च स्थानावर अर्पणं वाहणारा,

आणि आपल्या दैवतासाठी बलिदानं देणारा कोणीही उरणार नाही.

३६ म्हणून मवाबसाठी आणि कीर-हरेसच्या लोकांसाठी,

माझं मन बासरीसारखं* शोक करेल.+

त्याने जमा केलेली सगळी धनसंपत्ती नष्ट होईल.

३७ प्रत्येकाने आपल्या डोक्याचं मुंडण केलंय,+

आणि आपली दाढी कापून टाकली आहे.

प्रत्येकाने आपल्या हातावर घाव केलेत,+

आणि कमरेला गोणपाट गुंडाळलंय!’”+

३८ “‘मवाबच्या सगळ्या घरांच्या छतांवर,

आणि तिच्या सगळ्या चौकांमध्ये,

फक्‍त शोक केला जातोय.

कारण टाकून दिलेल्या मडक्यासारखा मी मवाबचा चुराडा केलाय,’ असं यहोवा म्हणतो.

३९ ‘बघा, ती कशी घाबरली आहे! तिच्यासाठी गळा काढून रडा!

बघा, मवाबने कशी लज्जेने आपली पाठ फिरवली आहे!

मवाब थट्टेचा विषय बनली आहे,

तिची दशा पाहून आसपासचे सगळे लोक घाबरलेत.’”

४० “कारण यहोवा म्हणतो:

‘पाहा! झडप घालणाऱ्‍या गरुडाप्रमाणे,+

शत्रू आपल्या पंखांनी मवाबला झाकून टाकेल.+

४१ तिच्या नगरांवर कब्जा केला जाईल,

तिचे मजबूत किल्ले काबीज केले जातील.

त्या दिवशी मवाबच्या शूरवीरांचं हृदय,

प्रसूतीच्या वेदना होणाऱ्‍या स्त्रीसारखं भीतीने धडधडू लागेल.’”

४२ “‘मवाबचा नाश होईल आणि तो राष्ट्र म्हणून उरणार नाही,+

कारण तो स्वतःला यहोवापेक्षा मोठं समजतो.’+

४३ यहोवा म्हणतो, ‘मवाबच्या रहिवाशांनो!

तुमच्यापुढे दहशत, खड्डा आणि सापळा आहे.

४४ जो दहशतीपासून पळेल तो खड्ड्यात पडेल,

आणि जो त्या खड्ड्यातून वर येईल, तो सापळ्यात अडकेल.’

यहोवा म्हणतो, ‘कारण मी ठरवलंय त्या वर्षी मी मवाबला शिक्षा करीन.

४५ हेशबोनच्या सावलीत आश्रयासाठी पळून जाणारे हतबल होतील.

कारण हेशबोनमधून आग येईल,

आणि सीहोनमधून ज्वाला भडकेल.+

ती मवाबचं कपाळ आणि दंगेखोरांच्या मुलांच्या कवट्या भस्म करून टाकेल.’+

४६ ‘हे मवाब! तुझा धिक्कार असो!

कमोशची+ उपासना करणाऱ्‍या लोकांचा नाश झालाय.

आणि तुझ्या मुला-मुलींना बंदिवासात नेण्यात आलंय.+

४७ पण शेवटच्या काळात मी मवाबच्या बंदिवानांना पुन्हा गोळा करीन,’ असं यहोवा म्हणतो.

‘मवाबबद्दलचा न्यायदंडाचा संदेश इथे संपतो.’”+

४९ अम्मोनी लोकांबद्दल+ यहोवा असं म्हणतो:

“इस्राएलला काय मुलं नाहीत का?

त्याला कोणी वारस नाही का?

मग मल्कामने+ गादचा ताबा का घेतला?+

आणि त्याचे लोक इस्राएलच्या शहरांमध्ये का राहत आहेत?”

 २ “‘म्हणून पाहा!’ यहोवा म्हणतो, ‘असे दिवस येत आहेत,

जेव्हा अम्मोनी लोकांच्या+ राब्बाविरुद्ध मी युद्धाची घोषणा करीन.*+

राब्बा उद्ध्‌वस्त झालेली टेकडी होईल,

तिची आसपासची नगरं जाळून टाकली जातील.

आणि इस्राएलचा जो प्रदेश त्यांनी बळकावला होता, तो प्रदेश इस्राएल त्यांच्याकडून परत मिळवेल.’+ असं यहोवा म्हणतो.

 ३ ‘हे हेशबोन! गळा काढून रड. कारण, आय शहराचा नाश झालाय!

राब्बाच्या आसपासच्या नगरांनो! मोठ्याने रडा, आणि गोणपाट घाला.

आक्रोश करत दगडी मेंढवाड्यांमध्ये इकडे-तिकडे पळा.

कारण मल्काम त्याच्या पुजाऱ्‍यांसोबत आणि अधिकाऱ्‍यांसोबत बंदिवासात जाणार आहे.+

 ४ हे विश्‍वासघात करणाऱ्‍या मुली! तू तुझ्या खोऱ्‍यांबद्दल* फुशारक्या का मारतेस?

भरपूर पाणी असलेल्या तुझ्या सपाट प्रदेशांबद्दल तू बढाया का मारतेस?

तू तुझ्या खजिन्यांवर भरवसा ठेवतेस,

आणि म्हणतेस: “माझ्या विरोधात कोण येईल?”’”

 ५ “पण सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो,

‘बघ, मी तुझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांकडून तुझ्यावर भयंकर संकट आणतोय.

तुझी चारही दिशांना पांगापांग केली जाईल,

आणि पळून जाणाऱ्‍यांना कोणीही गोळा करणार नाही.’”

 ६ “‘पण नंतर मी अम्मोनी लोकांच्या बंदिवानांना गोळा करीन,’ असं यहोवा म्हणतो.”

 ७ अदोमबद्दल सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“तेमानमध्ये+ आता कोणी बुद्धिमान राहिला नाही का?

समंजस लोकांकडे चांगले सल्ले उरले नाहीत का?

त्यांच्या बुद्धीला काय कीड लागली आहे का?

 ८ हे ददानच्या+ रहिवाशांनो! मागे फिरा, पळून जा!

खोल जागांमध्ये जाऊन राहा.

कारण एसावला शिक्षा द्यायची वेळ येईल,

तेव्हा मी एसाववर संकट आणीन.

 ९ द्राक्षं गोळा करणारे तुझ्याकडे आले,

तर ते काही द्राक्षं मागे सोडून जाणार नाहीत का?

किंवा रात्री चोर आले, तर त्यांना हवं तेवढं मिळेपर्यंतच ते नासधूस करणार नाहीत का?+

१० पण एसावचं मात्र मी सगळं काही काढून घेईन.

त्याच्या लपण्याची सगळी ठिकाणं मी उघड करीन, म्हणजे तो कुठेही लपू शकणार नाही.

त्याच्या सगळ्या मुलाबाळांचा, भाऊबंदांचा आणि शेजाऱ्‍यांचा नाश होईल,+

आणि त्याचं नामोनिशाण मिटून जाईल.+

११ तुझी अनाथ* मुलं माझ्याकडे सोडून दे,

म्हणजे मी त्यांना जिवंत ठेवीन.

आणि तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवतील.”

१२ यहोवा म्हणतो: “ज्यांना क्रोधाचा प्याला प्यायची शिक्षा झाली नाही, त्यांना जर तो प्यावा लागेल, तर मग तू कसा काय शिक्षा झाल्याशिवाय राहशील? तुला शिक्षा होईलच. तुला तो प्याला प्यावाच लागेल.”+

१३ यहोवा म्हणतो, “मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, बस्राची दशा अशी होईल की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल.+ बस्रा उद्ध्‌वस्त होईल, तिची बदनामी होईल आणि ती शापित होईल. तिची सगळी शहरं कायमची उजाड होतील.”+

१४ मला यहोवाकडून एक बातमी मिळाली आहे,

राष्ट्रांकडे एका राजदूताला पाठवण्यात आलंय. तो म्हणतो:

“सगळे एकत्र या आणि अदोमवर हल्ला करा; युद्धाची तयारी करा.”+

१५ “कारण पाहा! मी तुला राष्ट्रांमध्ये कवडीमोल केलंय,

लोक तुला तुच्छ समजतात.+

१६ हे खडकाच्या कपारींमध्ये राहणारी,

सगळ्यात उंच टेकडीवर राहणारी, अदोम!

तू पसरवलेल्या दहशतीमुळे तुझीच फसवणूक झाली आहे,

तुझ्या गर्विष्ठ मनाने तुलाच फसवलंय.

तू जरी गरुडासारखं उंच ठिकाणी आपलं घरटं बनवलंस,

तरी मी तुला तिथून खाली पाडीन,” असं यहोवा म्हणतो.

१७ “अदोमची दशा अशी होईल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल.+ तिच्या बाजूने जाणारा प्रत्येक जण तिच्यावर आलेल्या पीडा बघून चकित होईल, आणि शिट्टी वाजवून तिची थट्टा करेल. १८ सदोम, गमोरा आणि त्याच्या आसपासच्या नगरांचा नाश झाल्यावर जसं घडलं,+ तसंच अदोमच्या बाबतीत घडेल. तिथे कोणीही राहणार नाही, एकही माणूस तिथे वस्ती करणार नाही,” असं यहोवा म्हणतो.+

१९ “पाहा! यार्देनजवळ असलेल्या दाट जंगलातून जसा सिंह येतो, तसा कोणीतरी येईल.+ तो येऊन अदोमच्या सुरक्षित कुरणांवर हल्ला करेल. आणि एका क्षणात मी त्यांना तिच्यापासून दूर पळायला लावीन. मग ज्याला निवडण्यात आलंय, त्याला मी तिच्यावर नेमीन. कारण माझ्यासारखा दुसरा कोण आहे, आणि कोण मला आव्हान देऊ शकतो? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहू शकतो?+ २० म्हणून, अहो माणसांनो! यहोवाने अदोमच्या विरोधात काय निर्णय घेतलाय, आणि तेमानच्या+ रहिवाशांबद्दल त्याने कोणता विचार केलाय, तो ऐका:

कळपातून छोट्या-छोट्या कोकरांना नक्कीच ओढून नेलं जाईल,

त्यांचं राहण्याचं ठिकाण अदोम आणि तेमानच्या लोकांमुळे उद्ध्‌वस्त केलं जाईल.+

२१ त्यांच्या कोसळण्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली आहे.

सगळीकडे आरडाओरड होत आहे!

आणि तो आवाज पार तांबड्या समुद्रापर्यंत पोहोचलाय.+

२२ पाहा! गरुड जसा वर उडतो आणि झडप घालतो,+

तसा शत्रू झडप घालेल आणि बस्राला आपल्या पंखांनी झाकून टाकेल.+

त्या दिवशी अदोमच्या शूरवीरांचं हृदय,

प्रसूतीच्या वेदना होणाऱ्‍या स्त्रीसारखं भीतीने धडधडू लागेल.”

२३ दिमिष्कबद्दल संदेश:+

“हमाथ+ आणि अर्पाद लज्जित झालेत,

कारण त्यांनी वाईट बातमी ऐकली आहे.

भीतीने त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालंय.

समुद्रात खळबळ माजली आहे. तो शांत होऊ शकत नाही.

२४ दिमिष्कचं धैर्य खचलंय.

ती पळ काढायला मागे वळली, पण भीतीने तिला ग्रासून टाकलंय.

बाळाला जन्म देणाऱ्‍या स्त्रीसारखं,

दुःखाने आणि वेदनेने तिला घेरलंय.

२५ लोक अजूनही स्तुतिपात्र शहर सोडून, आनंदोत्सवाचं नगर सोडून का गेले नाहीत?

२६ कारण, त्या दिवशी तिचे तरुण तिच्या चौकांमध्ये मरून पडणार आहेत.

आणि तिच्या सगळ्या सैनिकांचा नाश होणार आहे,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

२७ “मी दिमिष्कच्या तटबंदीला आग लावीन.

त्या आगीत बेन-हदादचे मजबूत बुरूज जळून खाक होतील.”+

२८ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने केदारला+ आणि हासोरच्या राज्यांना हरवलं होतं, त्यांच्याबद्दल यहोवा असं म्हणतो:

“उठा, केदारला जा,

आणि पूर्वेकडच्या मुलांचा नाश करून टाका.

२९ त्यांचे तंबू आणि कळप लुटा.

त्यांच्या तंबूंचं कापड, त्यांचे उंट आणि त्यांचं सगळं सामानसुमान घेऊन जा.

लोक म्हणतील, ‘सगळीकडे दहशत आहे!’”

३० “अहो हासोरच्या रहिवाशांनो! पळून जा! दूर पळून जा!

आणि खोल जागांमध्ये जाऊन राहा,” असं यहोवा म्हणतो.

“कारण बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने तुमच्याविरुद्ध रणनीती आखली आहे.

त्याने तुमच्यावर संकट आणायची योजना केली आहे.”

३१ “उठा, जे राष्ट्र सुखशांतीत आहे, सुरक्षित आहे त्यावर हल्ला करा,” असं यहोवा म्हणतो.

“त्या राष्ट्राला दरवाजेही नाहीत आणि अडसरही नाहीत; तिथले लोक सगळ्यांपासून दूर एकटे राहतात.

३२ त्यांचे उंट आणि मोठमोठे कळप लुटले जातील.

आपल्या डोक्याच्या बाजूचे केस* कापणाऱ्‍यांची,+

मी चारही दिशांना पांगापांग करीन,

आणि सगळीकडून त्यांच्यावर संकट आणीन,” असं यहोवा म्हणतो.

३३ “हासोर कोल्ह्यांच्या राहण्याचं ठिकाण बनेल,

ती कायमची ओसाड होईल.

तिथे कोणीही राहणार नाही,

एकही माणूस तिच्यात वस्ती करणार नाही.”

३४ यहूदाचा राजा सिद्‌कीया+ याच्या शासनकाळाच्या सुरुवातीला, यिर्मया संदेष्ट्याला एलामबद्दल+ यहोवाकडून असा संदेश मिळाला: ३५ “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी एलामच्या शक्‍तीचा स्रोत, त्यांचं धनुष्य मोडून टाकतोय.+ ३६ मी एलामवर आकाशाच्या चार टोकांमधून चार वारे आणीन. आणि या वाऱ्‍यांच्या दिशेने मी एलामच्या लोकांची पांगापांग करीन. असं एकही राष्ट्र उरणार नाही जिथे एलामचे लोक विखुरले जाणार नाहीत.’”

३७ “एलामच्या लोकांचा मी त्यांच्या शत्रूंपुढे आणि त्यांच्या जिवावर टपलेल्या लोकांपुढे चुराडा करून टाकीन. मी त्यांच्यावर संकट आणीन, माझा जळजळीत क्रोध त्यांच्यावर भडकेल,” असं यहोवा म्हणतो. “जोपर्यंत मी त्यांचा समूळ नाश करत नाही तोपर्यंत मी त्यांच्यामागे तलवार पाठवीन.”

३८ “मी एलाममध्ये माझं राजासन मांडीन,+ आणि तिथल्या राजाचा आणि अधिकाऱ्‍यांचा नाश करीन,” असं यहोवा म्हणतो.

३९ “पण, शेवटच्या काळात मी एलामच्या बंदिवानांना पुन्हा गोळा करीन,” असं यहोवा म्हणतो.

५० यहोवाने बाबेलबद्दल, म्हणजे खास्दी लोकांच्या देशाबद्दल यिर्मया संदेष्ट्याकडून दिलेला संदेश असा:+

 २ “राष्ट्रांमध्ये घोषणा करा आणि जाहीर करा;

निशाणी म्हणून झेंडा उभारा आणि जाहीर करा.

काहीही लपवू नका!

असं म्हणा, ‘बाबेलवर कब्जा करण्यात आलाय.+

बेल दैवताला लज्जित करण्यात आलंय.+

मरोदख दैवताचा थरकाप उडालाय.

बाबेलमधल्या मूर्तींना लज्जित करण्यात आलंय.

तिच्यातल्या घृणास्पद मूर्तींचा* भीतीने थरकाप उडालाय.’

 ३ कारण उत्तरेकडच्या एका राष्ट्राने तिच्यावर हल्ला केलाय.+

त्याने तिच्या देशाची अशी अवस्था केली आहे, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसते;

तिच्यात कोणीही वस्ती करत नाही.

माणसांनी आणि प्राण्यांनी तिथून पळ काढलाय;

ते सगळे पळून गेले आहेत.”

४ यहोवा म्हणतो: “त्या दिवसांत आणि त्या काळात, इस्राएलचे लोक आणि यहूदाचे लोक एकत्र जमून येतील.+ ते सगळे रडत येतील+ आणि सोबत मिळून आपला देव यहोवा याला शोधतील.+ ५ ते सीयोनकडे तोंड करतील आणि तिकडे जायचा रस्ता विचारतील.+ ते म्हणतील, ‘चला, आपण यहोवासोबत एक करार करून त्याला जडून राहू; एक असा करार करू जो कायम राहील आणि कधीही विसरला जाणार नाही.’+ ६ माझे लोक हरवलेल्या मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत.+ त्यांच्या मेंढपाळांमुळेच ते भरकटले आहेत.+ त्यांनी त्यांना दूर डोंगरांमध्ये नेलं; कधी डोंगरांवर, तर कधी टेकड्यांवर भटकायला लावलं. ते आपलं विसाव्याचं ठिकाण विसरून गेलेत. ७ ज्या कोणाला ते सापडले त्यांनी त्यांना फाडून खाल्लं.+ आणि त्यांचे शत्रू म्हणाले, ‘यात आमची काही चूक नाही. त्यांनीच यहोवाविरुद्ध पाप केलंय. त्यांनी त्यांचं नीतिमत्त्वाचं निवासस्थान आणि त्यांच्या पूर्वजांची आशा असलेल्या यहोवाविरुद्ध पाप केलंय.’”

 ८ “बाबेलमधून पळ काढा,

खास्दी लोकांच्या देशातून बाहेर निघा,+

कळपापुढे चालणारे बकरे आणि एडके यांच्यासारखे व्हा.

 ९ कारण उत्तरेकडच्या देशातून मी मोठमोठ्या राष्ट्रांचा एक जमाव उभारतोय,

आणि त्यांना बाबेलवर हल्ला करायला आणतोय.+

सैन्यदल रचून ते तिच्यावर हल्ला करतील;

तिथून ते तिला काबीज करतील.

त्यांचे बाण योद्ध्यांच्या बाणांसारखे आहेत,

त्यांमुळे मुलं आईवडिलांपासून हिरावली जातील;+

त्यांचा नेम कधीच चुकत नाही.

१० खास्दी लोकांचा देश लुटला जाईल.+

तिला लुटणारे सगळे तृप्त होतील,”+ असं यहोवा म्हणतो.

११ “कारण माझा वारसा, माझा देश लुटताना,+

तुम्ही आनंदोत्सव आणि जल्लोष करत होता;+

तुम्ही तरण्या गाईसारखं* गवतावर आनंदाने बागडत होता,

आणि घोड्यांसारखे खिंकाळत होता.

१२ तुमची आई लज्जित झाली आहे.+

तुम्हाला जन्म देणारी निराश झाली आहे.

पाहा! राष्ट्रांमध्ये तिची किंमत सगळ्यात कमी आहे,

ती पाणी नसलेल्या ओसाड रानासारखी आणि वाळवंटासारखी आहे.+

१३ यहोवाचा क्रोध तिच्यावर भडकल्यामुळे तिच्यात कधीही लोकवस्ती होणार नाही;+

ती पूर्णपणे उजाड होईल.+

बाबेलजवळून जाणारा प्रत्येक जण तिची अवस्था पाहून चकित होईल,

आणि तिच्यावर आलेल्या सगळ्या पीडांमुळे तो शिट्टी वाजवून तिची थट्टा करेल.+

१४ धनुष्य चालवणाऱ्‍यांनो,

सैन्यदल रचून चारही बाजूंनी बाबेलवर हल्ला करा.

तिच्यावर बाणांचा मारा करा, एकही बाण राखून ठेवू नका.+

कारण तिने यहोवाविरुद्ध पाप केलंय.+

१५ चारही बाजूंनी तिच्याविरुद्ध युद्धाच्या घोषणा करा.

तिने हार मानली आहे.

तिचे खांब कोसळून पडलेत आणि तिच्या भिंती पाडण्यात आल्यात.+

कारण यहोवाने तिच्यावर सूड उगवलाय.+

तुम्ही तिचा बदला घ्या,

ती तुमच्याशी जसं वागली, तसंच तिच्याशी वागा.+

१६ बाबेलमधून पेरणी करणाऱ्‍याचा,

आणि कापणीच्या वेळी विळा चालवणाऱ्‍याचा नाश करा.+

त्या क्रूर तलवारीमुळे प्रत्येक जण आपल्या लोकांकडे परत जाईल,

प्रत्येक जण आपल्या देशात पळून जाईल.+

१७ इस्राएलचे लोक भरकटलेली मेंढरं आहेत.+ सिंहांनी त्यांची पांगापांग केली आहे.+ आधी अश्‍शूरच्या राजाने त्यांना फाडून खाल्लं,+ मग बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने त्यांची हाडं चावून खाल्ली.+ १८ म्हणून इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘मी अश्‍शूरच्या राजाला जशी शिक्षा केली,+ तशीच बाबेलच्या राजाला व त्याच्या देशालाही करीन. १९ आणि इस्राएलला मी परत त्याच्या कुरणात घेऊन येईन.+ तो कर्मेल आणि बाशानवर चरेल.+ एफ्राईम+ आणि गिलादच्या डोंगरांवर+ त्याचा जीव तृप्त होईल.’”

२० यहोवा म्हणतो, “त्या दिवसांत आणि त्या काळात,

इस्राएलमध्ये दोष आणि यहूदामध्ये पाप शोधूनसुद्धा सापडणार नाही.

कारण ज्यांना मी जिवंत राहू देईन, त्यांना मी क्षमा करीन.”+

२१ यहोवा म्हणतो, “मराथाईमच्या देशावर आणि पकोडच्या+ रहिवाशांवर हल्ला कर.

त्यांची कत्तल करून त्यांचा समूळ नाश कर.

मी तुला सांगितलंय ते सगळं कर.

२२ देशात युद्धाचा, एक भयंकर संकट कोसळल्याचा आवाज येतोय.

२३ पाहा! पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांचा चुराडा करणारा हातोडा कसा मोडून-तोडून टाकण्यात आलाय!+

पाहा! सगळ्या राष्ट्रांमध्ये बाबेलची कशी दशा झाली आहे!

ती बघून सगळ्यांना दहशत बसते.+

२४ हे बाबेल, मी तुझ्यासाठी सापळा लावला आणि त्यात तू अडकलीस.

तुला ते कळलंसुद्धा नाही.

तू यहोवाचा विरोध केलास,

म्हणून तुला शोधून पकडण्यात आलं.+

२५ यहोवाने आपल्या शस्त्रांचं भांडार उघडलंय.

त्यातून त्याने आपल्या क्रोधाची शस्त्रं बाहेर काढलीत.+

कारण सर्वोच्च प्रभूला, सैन्यांचा देव यहोवा याला,

खास्दी लोकांच्या देशात एक काम पूर्ण करायचंय.

२६ दूरदूरच्या ठिकाणांहून तिच्यावर हल्ला करायला या.+

तिची धान्यांची कोठारं उघडा,+

धान्यांच्या ढिगाऱ्‍यासारखा तिचा ढिग लावा.

तिचा पूर्णपणे नाश करा.+

तिच्यातल्या एकालाही सोडू नका.

२७ तिच्या सगळ्या तरण्या बैलांना मारून टाका,+

त्या सगळ्यांना कत्तल होण्यासाठी पाठवून द्या.

त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांच्याकडून हिशोब घ्यायचा दिवस जवळ आलाय.

२८ बाबेलमधून पळून जाणाऱ्‍यांचा आवाज येतोय,

तिथून निसटून जाणाऱ्‍यांचा आवाज कानी पडतोय;

आपला देव यहोवा याने सूड उगवलाय,

त्याने आपल्या मंदिरासाठी बदला घेतलाय,+

ही गोष्ट सीयोनमध्ये जाहीर करण्यासाठी पळणाऱ्‍यांचा आवाज ऐकू येतोय.

२९ बाबेलवर हल्ला करायला तिरंदाजांना बोलावून घ्या,

धनुष्य चालवणाऱ्‍या सगळ्यांना बोलावून घ्या.+

तिला चारही बाजूंनी घेरा; तिच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका.

तिने केलेल्या कामांची तिला परतफेड करा.+

तिने जसं केलं, तसंच तिचंही करा.+

कारण ती इस्राएलच्या पवित्र देवाविरुद्ध,

यहोवाविरुद्ध मगरूरपणे वागली आहे.+

३० म्हणून तिचे सगळे तरुण चौकांत मरून पडतील,+

तिच्या सगळ्या सैनिकांचा त्या दिवशी नाश होईल,” असं यहोवा म्हणतो.

३१ सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “हे बंडखोर बाबेल!+ बघ, मी तुझ्या विरोधात आहे.+

कारण तुझा न्याय करण्याचा दिवस येईल;

मी तुझ्याकडून हिशोब घेईन ती वेळ नक्की येईल.

३२ हे बंडखोर बाबेल, तू अडखळून पडशील,

आणि तुला उचलायला कोणीही नसेल.+

मी तुझ्या शहरांना आग लावीन,

आणि त्यात तुझ्या आजूबाजूला असलेलं सगळं काही जळून खाक होईल.”

३३ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“इस्राएल आणि यहूदाच्या लोकांवर जुलूम होत आहेत,

ज्यांनी त्यांना बंदी बनवून नेलंय, त्यांनी त्यांना अजूनपर्यंत सोडलेलं नाही.+

ते त्यांना जाऊ द्यायला तयार नाहीत.+

३४ पण, त्यांचा सोडवणारा शक्‍तिशाली आहे.+

सैन्यांचा देव यहोवा हे त्याचं नाव आहे.+

तो नक्कीच त्यांच्या बाजूने खटला लढेल,+

म्हणजे त्यांच्या देशाला विश्रांती मिळेल,+

आणि बाबेलच्या रहिवाशांमध्ये खळबळ माजेल.”+

३५ यहोवा म्हणतो, “खास्दी लोकांवर तलवार चालवली जाईल;

बाबेलचे रहिवासी, तिचे अधिकारी आणि तिचे बुद्धिमान लोक या सगळ्यांवर,

तलवार चालवली जाईल.+

३६ पोकळ गोष्टी बोलणाऱ्‍यांवर* तलवार चालवली जाईल आणि ते वेड्यांसारखे वागतील.

तिच्या योद्ध्यांवर तलवार चालवली जाईल आणि ते भीतीने थरथर कापतील.+

३७ त्यांच्या घोड्यांवर, युद्ध-रथांवर आणि तिच्यात राहणाऱ्‍या सर्व विदेश्‍यांवर तलवार चालवली जाईल.

ते सगळे एखाद्या घाबरलेल्या स्त्रीसारखे होतील.+

तिच्या खजिन्यांवर तलवार चालेल आणि ते सगळे लुटले जातील.+

३८ तिचे सगळे जलाशय नष्ट होतील, आणि त्यांचं पाणी आटून जाईल.+

कारण बाबेल देश कोरीव मूर्तींनी भरून गेलाय,+

आणि भयभीत करणारे दृष्टान्त बघितल्यामुळे तिथले लोक वेड्यांसारखे वागतात.

३९ म्हणून, तिथे वाळवंटातले प्राणी आणि ओरडणारे प्राणी सोबत राहतील,

आणि शहामृग तिच्यात वस्ती करतील.+

पुन्हा कधीच तिच्यामध्ये लोकवस्ती होणार नाही,

पिढ्या न्‌ पिढ्या कोणीही तिच्यात राहणार नाही.”+

४० यहोवा म्हणतो, “सदोम, गमोरा आणि त्याच्या आसपासच्या नगरांचा+ देवाने नाश केल्यावर जसं घडलं,+ तसंच बाबेलच्या बाबतीतही घडेल. तिथे कोणीही राहणार नाही, एकही माणूस तिथे वस्ती करणार नाही.+

४१ पाहा! उत्तरेकडून लोक येतील;

पृथ्वीच्या सगळ्या दुर्गम भागांतून,+

एक मोठं राष्ट्र आणि महान राजे उठतील.+

४२ ते धनुष्य आणि बरची* चालवणारे आहेत.+

ते क्रूर आहेत आणि कोणावरही दयामाया करत नाहीत.+

ते घोड्यांवर स्वार होऊन येतात, तेव्हा त्यांचा आवाज खवळलेल्या समुद्राच्या गर्जनेसारखा वाटतो.+

हे बाबेलच्या मुली! ते सगळे एक होऊन, सैन्यदल रचून तुझ्यावर हल्ला करायला सज्ज आहेत.+

४३ बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल ऐकलंय,+

आणि ते ऐकून त्याचे हातपाय गळून गेले आहेत.+

तो भीतीने आणि चिंतेने ग्रासून गेलाय,

बाळाला जन्म देणाऱ्‍या स्त्रीसारख्या त्याला वेदना होत आहेत.

४४ पाहा! यार्देनजवळ असलेल्या दाट जंगलातून जसा सिंह येतो, तसा कोणीतरी येईल. तो येऊन बाबेलच्या सुरक्षित कुरणांवर हल्ला करेल. आणि एका क्षणात मी त्यांना तिच्यापासून दूर पळायला लावीन. मग ज्याला निवडण्यात आलंय, त्याला मी तिच्यावर नेमीन.+ कारण माझ्यासारखा दुसरा कोण आहे, आणि कोण मला आव्हान देऊ शकतो? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहू शकतो?+ ४५ म्हणून, अहो माणसांनो! यहोवाने बाबेलच्या विरोधात काय निर्णय घेतलाय,+ आणि खास्दी लोकांच्या देशाविरुद्ध त्याने कोणता विचार केलाय, तो ऐका:

कळपातून छोट्या-छोट्या कोकरांना नक्कीच ओढून नेलं जाईल.

त्यांचं राहण्याचं ठिकाण बाबेलच्या लोकांमुळे, खास्दी लोकांमुळे उद्ध्‌वस्त केलं जाईल.+

४६ बाबेलवर कब्जा करण्यात येईल, तेव्हा इतका मोठा आवाज होईल, की त्यामुळे पृथ्वी हादरून जाईल,

आणि राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये तिच्या किंकाळ्या ऐकू येतील.”+

५१ यहोवा म्हणतो:

“पाहा, मी बाबेलवर आणि लेब-कामाईच्या* लोकांवर,

एक विनाशकारी वादळ आणतोय.+

 २ मी उफणणी* करणाऱ्‍यांना बाबेलला पाठवीन,

ते तिची उफणणी करतील आणि तिचा संपूर्ण देश रिकामा करतील.

संकटाच्या दिवशी ते सगळ्या बाजूंनी तिच्यावर हल्ला करतील.+

 ३ बाबेलच्या तिरंदाजांना धनुष्य चालवू देऊ नका,

कोणालाही चिलखत घालून उभं राहायची संधी देऊ नका.

तिच्या तरुणांना दयामाया दाखवू नका.+

तिच्या सगळ्या सैन्याचा नाश करून टाका.

 ४ म्हणजे खास्दी लोकांच्या देशात त्यांची प्रेतं पडून राहतील,

भोसकले गेलेले बाबेलच्या रस्त्यांवर पडून राहतील.+

 ५ कारण इस्राएलच्या पवित्र देवाच्या नजरेत त्यांचा देश* अपराधांनी भरून गेलाय.

पण, इस्राएल आणि यहूदा काही विधवा नाहीत; त्यांच्या देवाने, सैन्यांचा देव यहोवा याने त्यांना सोडून दिलेलं नाही.+

 ६ बाबेलमधून पळ काढा,

आपला जीव वाचवायला तिथून पळून जा.+

तिच्या अपराधांमुळे स्वतःचा नाश होऊ देऊ नका.

कारण सूड उगवायची यहोवाची वेळ आली आहे.

तो तिच्या कामांची तिला परतफेड करणार आहे.+

 ७ बाबेल ही यहोवाच्या हातातला सोन्याचा प्याला होती;

तिने पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना नशा येईपर्यंत दारू पाजली.+

तिचा द्राक्षारस पिऊन राष्ट्रं झिंगली आहेत; ती वेडी झाली आहेत.+

 ८ बाबेल अचानक कोसळून पडली आहे; ती मोडली आहे.+

तिच्यासाठी मोठ्याने रडा!+

तिच्या वेदनांसाठी मलम* घेऊन या,

म्हणजे कदाचित ती बरी होईल.”

 ९ “आम्ही बाबेलला बरं करायचा प्रयत्न केला, पण ती काही बरी झाली नाही.

तिला सोडून द्या आणि चला, आपण आपापल्या देशात निघून जाऊ.+

कारण तिचे अपराध आकाशापर्यंत,

वर ढगांपर्यंत पोहोचले आहेत.+

१० यहोवाने आपल्याला न्याय मिळवून दिलाय.+

चला, आपण सीयोनला जाऊन आपला देव यहोवा याच्या कार्यांबद्दल सांगू.”+

११ “आपले बाण घासून चकचकीत करा;+ हातात गोल ढाली घ्या.*

यहोवाने मेदच्या राजांना युद्धासाठी प्रवृत्त केलंय,+

कारण त्याने बाबेलचा नाश करायचं ठरवलंय.

यहोवा सूड उगवतोय; तो आपल्या मंदिरासाठी बदला घेतोय.

१२ बाबेलच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी चिन्ह म्हणून झेंडा उभारा.+

पहारा मजबूत करा; पहारेकरी तैनात करा.

लपून हल्ला करणाऱ्‍या सैनिकांना तयार ठेवा.

कारण यहोवाने रणनीती आखली आहे.

आणि बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध तो जे काही बोललाय, ते तो नक्की पूर्ण करेल.”+

१३ “हे स्त्री! तू अनेक जलाशयांवर बसली आहेस,+

तुझ्याकडे भरपूर खजिना आहे.+

पण आता तुझा अंत जवळ आलाय,

तुझी कमाई बंद पडायची वेळ आली आहे.+

१४ सैन्यांचा देव यहोवा स्वतःची शपथ घेऊन म्हणालाय:

‘मी तुझ्यात टोळांच्या धाडीइतकी असंख्य माणसं भरीन,

आणि ते तुझ्यावर विजय मिळवून जल्लोष करतील.’+

१५ त्याने आपल्या ताकदीने पृथ्वी बनवली,

आपल्या बुद्धीने सुपीक जमीन बनवली.+

आणि त्यानेच आपल्या समजशक्‍तीने आकाश पसरवलं.+

१६ त्याचा आवाज ऐकून आकाशातल्या पाण्याचा मोठा गडगडाट होतो.

तो पृथ्वीच्या टोकांवरून ढग* वर चढवतो;

तो पावसासाठी विजा चमकवतो.*

आपल्या कोठारांतून तो वाऱ्‍याला बाहेर आणतो.+

१७ प्रत्येक जण मूर्खपणे आणि ज्ञान नसल्यासारखं वागतोय.

धातूकाम करणारा प्रत्येक माणूस आपण बनवलेल्या कोरीव मूर्तींमुळे लज्जित होईल;+

कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत,

आणि त्यांच्यात जीव* नाही.+

१८ त्या शून्यवत* आहेत.+

त्या थट्टा करण्याच्या लायकीच्या आहेत.

त्यांचा हिशोब घ्यायचा दिवस येईल तेव्हा त्या नष्ट होतील.

१९ पण याकोबचा देव* त्यांच्यासारखा नाही,

कारण तो सर्वकाही निर्माण करणारा आहे.

तोच त्याच्या वारशाची काठी आहे.*+

सैन्यांचा देव यहोवा हे त्याचं नाव आहे.”+

२० “तू माझ्यासाठी एक युद्धाचं शस्त्र आहेस.

तू माझ्यासाठी एक सोटा आहेस.

कारण तुझा उपयोग करून मी राष्ट्रांचा चुराडा करीन.

तुझ्याद्वारे मी राज्यांचा नाश करीन.

२१ तुझा उपयोग करून मी घोड्यांचा आणि घोडेस्वारांचा चुराडा करीन.

तुझ्याद्वारे मी युद्ध-रथांचा आणि त्यांच्या स्वारांचा नाश करीन.

२२ तुझा उपयोग करून मी स्त्री-पुरुषांचे तुकडे करीन.

तुझा उपयोग करून मी वृद्धांचे आणि मुलांचे,

तरुणांचे आणि तरुणींचे तुकडे करीन.

२३ तुझा उपयोग करून मी मेंढपाळाचा आणि त्याच्या कळपाचा,

शेतकऱ्‍याचा आणि त्याच्या बैलांच्या जोडीचा चुराडा करीन.

तुझ्याद्वारे मी राज्यपालांचे आणि अधिकाऱ्‍यांचे तुकडे करीन.

२४ मी बाबेलला आणि खास्दी लोकांना त्यांच्या दुष्ट कामांची परतफेड करीन.

कारण त्यांनी सीयोनमध्ये तुमच्या डोळ्यांसमोर बरीच दुष्ट कामं केलीत,”+ असं यहोवा म्हणतो.

२५ “हे विनाशकारी पर्वता! संपूर्ण पृथ्वीचा नाश करणाऱ्‍या पर्वता!+

बघ, मी तुझ्या विरोधात येतोय.+

मी तुझ्यावर हात उगारीन आणि तुला खडकांवरून खाली लोटून देईन,

मी तुला जळून खाक झालेल्या पर्वतासारखं करीन,” असं यहोवा म्हणतो.

२६ “कोणीही पाया घालण्यासाठी किंवा कोपऱ्‍यासाठी तुझ्यातला दगड घेणार नाही.

कारण तू कायमचा उद्ध्‌वस्त होशील,”+ असं यहोवा म्हणतो.

२७ “देशात निशाणी म्हणून झेंडा उभारा.+

राष्ट्रांमध्ये रणशिंग फुंका.

तिच्यावर हल्ला करायला राष्ट्रं निवडा.

अरारात,+ मिन्‍नी आणि आष्कनाज+ या राज्यांना तिच्याविरुद्ध बोलावून घ्या.

सैनिकांची भरती करणाऱ्‍या अधिकाऱ्‍याची नेमणूक करा.

घोड्यांना तिच्यावर हल्ला करायला आणा; राठ केस असलेल्या टोळांच्या धाडीसारखं त्यांना तिच्यावर हल्ला करायला आणा.

२८ तिच्या विरोधात राष्ट्रांना नेमा;

मेदच्या+ राजांना, राज्यपालांना, अधिकाऱ्‍यांना,

आणि त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या सगळ्या देशांना तिच्या विरोधात नेमा.

२९ पृथ्वी हादरून जाईल आणि थरथर कापेल,

कारण यहोवाने बाबेलचं जे काही करायचं ठरवलंय ते पूर्ण होईल.

तो बाबेलची अशी अवस्था करेल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल. तिच्यात कोणीही राहणार नाही.+

३० बाबेलच्या योद्ध्यांनी लढायचं सोडून दिलंय.

ते आपल्या मजबूत किल्ल्यांमध्ये बसून राहिलेत.

त्यांचं धैर्य खचलंय.+

त्यांची अवस्था एखाद्या घाबरलेल्या स्त्रीसारखी झाली आहे.+

बाबेलच्या सगळ्या घरांना आग लावण्यात आली आहे.

तिच्या दरवाजांचे अडसर मोडून टाकण्यात आले आहेत.+

३१ एक संदेशवाहक दुसऱ्‍या संदेशवाहकाला,

आणि एक दूत दुसऱ्‍या दूताला धावत जाऊन भेटतोय.

बाबेलच्या राजाचं शहर सगळ्या बाजूंनी काबीज करण्यात आलंय,

ही बातमी राजाला सांगायला ते धावत आहेत;+

३२ नदीच्या उतारांचा ताबा घेण्यात आलाय,+

लव्हाळ्याच्या* नावा जाळून टाकण्यात आल्या आहेत,

आणि सैनिक भयभीत झाले आहेत,

ही बातमी राजाला सांगायला दूत आणि संदेशवाहक धावत आहेत.”

३३ कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“बाबेलची मुलगी खळ्याच्या* जमिनीसारखी आहे.

तिला आता तुडवून कठीण करायची वेळ आली आहे.

लवकरच तिच्या कापणीची वेळ येईल.”

३४ “बाबेलच्या राजाने, नबुखद्‌नेस्सरने मला गिळून टाकलंय;+

त्याने मला गोंधळात टाकलंय.

त्याने मला रिकाम्या भांड्यासारखं करून टाकलंय.

मोठ्या सापाने गिळावं, तसं त्याने मला गिळून टाकलंय;+

माझ्या चांगल्या-चांगल्या गोष्टी खाऊन त्याने आपलं पोट भरलंय.

त्याने मला फेकून दिलंय.*

३५ सीयोनचा रहिवासी म्हणतो, ‘माझ्यावर आणि माझ्या शरीरावर जे जुलूम झालेत, ते बाबेलवरही होवोत!’+

आणि यरुशलेम म्हणते, ‘माझ्या रक्‍ताचा दोष खास्दी लोकांवर येवो!’”

३६ म्हणून यहोवा असं म्हणतो:

“मी तुझ्या बाजूने खटला लढीन,+

आणि तुझ्यासाठी बदला घेईन.+

मी तिचा समुद्र आटवून टाकीन आणि तिच्या विहिरी कोरड्या करीन.+

३७ बाबेल दगडमातीचा ढिगारा बनेल,+

ती कोल्ह्यांचं राहण्याचं ठिकाण होईल.+

तिच्यात एकही माणूस राहणार नाही.

तिची अशी अवस्था होईल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल,

आणि लोक शिट्टी वाजवून तिची थट्टा करतील.+

३८ ते सगळे मिळून तरुण सिंहांसारखी गर्जना करतील.

सिंहाच्या छाव्यांसारखे ते गुरगुरतील.”

३९ “ते उत्तेजित होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देऊन नशा येईपर्यंत दारू पाजीन,

म्हणजे ते जल्लोष करतील;+

मग ते कायमचे झोपतील,

त्या झोपेतून ते परत कधीच उठणार नाहीत,”+ असं यहोवा म्हणतो.

४० “मी त्यांना कोकरांसारखं, एडक्यांसारखं आणि बकऱ्‍यांसारखं कत्तल करायला घेऊन जाईन.”

४१ “बघा! शेशेखवर* कसा कब्जा मिळवण्यात आलाय!+

सगळ्या जगात जिची प्रशंसा केली जायची, ती कशी काबीज करण्यात आली आहे!+

राष्ट्रांमध्ये बाबेलची अशी अवस्था झाली आहे, की ती पाहून लोकांना दहशत बसते!

४२ समुद्र बाबेलवर लोटलाय.

त्याच्या असंख्य लाटांनी तिला झाकून टाकलंय.

४३ तिच्या शहरांची अशी अवस्था झाली आहे, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसते.

ती वाळवंटासारखी आणि कोरड्या प्रदेशासारखी झाली आहेत.

त्यांमध्ये कोणी वस्ती करणार नाही,

आणि कोणी माणूस तिथून ये-जा करणार नाही.+

४४ मी बाबेलमधल्या बेल+ दैवताचा समाचार घेईन,

त्याने जे गिळलंय ते मी त्याच्या तोंडातून खेचून बाहेर काढीन.+

राष्ट्रांचा प्रवाह परत कधीच त्याच्याकडे वाहणार नाही,

आणि बाबेलची भिंत कोसळून पडेल.+

४५ माझ्या लोकांनो! तिच्यामधून निघा!+

यहोवाच्या जळजळीत क्रोधापासून+ वाचण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन पळा!+

४६ देशात जी बातमी ऐकायला मिळेल, तिच्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका किंवा घाबरू नका.

एका वर्षी एक बातमी ऐकायला मिळेल,

तर दुसऱ्‍या वर्षी दुसरी;

ती अशी की, देशात हिंसाचार होतोय आणि एक शासक दुसऱ्‍या शासकाच्या विरोधात उठलाय.

४७ म्हणून पाहा! असे दिवस येत आहेत,

जेव्हा मी बाबेलच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन.

तिच्या सगळ्या देशाला लज्जित केलं जाईल,

आणि तिचे कत्तल झालेले सगळे लोक तिच्यात पडून राहतील.+

४८ बाबेल पडेल तेव्हा आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्यातलं सगळं काही आनंदाने जयजयकार करेल.+

कारण तिचा नाश करणारे उत्तरेकडून येतील,”+ असं यहोवा म्हणतो.

४९ “बाबेलने फक्‍त इस्राएली लोकांचीच कत्तल केली असं नाही,+

तर तिने तिच्यात राहणाऱ्‍या पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांचीही कत्तल केली आहे.

५० तलवारीपासून वाचलेल्यांनो! थांबू नका, चालत राहा!+

तुम्ही दूर असलात तरी यहोवाची आठवण करा,

आपल्या मनात यरुशलेमबद्दल विचार करा.”+

५१ “आम्हाला लज्जित करण्यात आलंय,

कारण आमची निंदा होत असल्याचं आम्ही ऐकलंय.

आमच्या तोंडाला काळिमा फासण्यात आलाय,

कारण विदेशी* लोक यहोवाच्या मंदिरातल्या पवित्र ठिकाणांविरुद्ध आले आहेत.”+

५२ यहोवा म्हणतो, “म्हणून पाहा! असे दिवस येत आहेत,

जेव्हा मी तिच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन,

आणि तिच्या संपूर्ण देशात जखमी लोकांचं कण्हणं ऐकू येईल.”+

५३ “बाबेल आकाशापर्यंत जरी पोहोचली,+

आणि तिने आपले उंच किल्ले आणखी मजबूत जरी केले,

तरी मी तिच्या विरोधात नाश करणारे पाठवीन आणि ते तिचा नाश करतील,”+ असं यहोवा म्हणतो.

५४ “ऐका! बाबेलमधून आक्रोश ऐकू येतोय,+

खास्दी लोकांच्या देशातून भयंकर संकट कोसळल्याचा आवाज ऐकू येतोय,+

५५ कारण यहोवा बाबेलचा नाश करतोय.

तो तिचा मोठा आवाज बंद करेल,

आणि तिचे शत्रू महासागराच्या लाटांसारख्या गर्जना करतील.

लोकांना त्यांचा आवाज ऐकू येईल.

५६ कारण नाश करणारा बाबेलवर हल्ला करेल;+

तिचे योद्धे कैद केले जातील,+

त्यांच्या धनुष्यांचे तुकडे-तुकडे केले जातील,

कारण यहोवा प्रत्येकाला योग्य ती शिक्षा देणारा देव आहे.+

तो परतफेड केल्याशिवाय राहणार नाही.+

५७ मी तिच्या अधिकाऱ्‍यांना आणि बुद्धिमान माणसांना,

तिच्या राज्यपालांना, उपअधिकाऱ्‍यांना आणि योद्ध्यांना नशा येईपर्यंत दारू पाजीन.+

मग ते कायमचे झोपतील,

त्या झोपेतून ते परत कधीच उठणार नाहीत.”+

ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे, त्या राजाचे हे शब्द आहेत.

५८ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

“बाबेलची भिंत रुंद असली, तरी ती पूर्णपणे पाडून टाकली जाईल,+

तिचे दरवाजे उंच असले, तरी ते जाळून टाकले जातील.

लोकांनी केलेली सगळी मेहनत वाया जाईल;

राष्ट्रांनी ज्यासाठी श्रम केले होते, ते सगळं आगीत भस्म होईल.”+

५९ यहूदाचा राजा सिद्‌कीया याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी सराया सिद्‌कीयासोबत बाबेलला गेला, तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने सरायाला काही सूचना दिल्या. सराया हा नेरीयाचा+ मुलगा आणि महसेयाचा नातू होता आणि राजाचा खासगी व्यवस्थापक होता. ६० बाबेलवर येणारी सगळी संकटं, म्हणजे बाबेलविरुद्ध लिहिलेल्या या सगळ्या गोष्टी यिर्मयाने एका पुस्तकात लिहून काढल्या. ६१ मग, यिर्मया सरायाला म्हणला: “तू बाबेलला पोहोचशील आणि ते शहर पाहशील, तेव्हा या सगळ्या गोष्टी तिथे मोठ्याने वाच. ६२ नंतर असं म्हण, ‘हे यहोवा! या जागेबद्दल तू असं म्हणालास, की तिचा नाश होईल आणि तिच्यात कोणीही राहणार नाही; ना माणूस ना प्राणी. ती कायम ओसाड पडून राहील.’+ ६३ मग हे पुस्तक वाचून झाल्यावर, त्याला एक दगड बांध आणि ते फरात नदीत फेकून दे. ६४ आणि असं म्हण, ‘बाबेलच्या बाबतीतही असंच घडेल. मी तिच्यावर जे संकट आणणार आहे, त्यामुळे ती कायमची बुडेल आणि पुन्हा कधीच वर येणार नाही.+ तिचे रहिवासी थकून जातील.’”+

यिर्मयाचा संदेश इथे संपतो.

५२ सिद्‌कीया+ राजा बनला तेव्हा तो २१ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव हमूटल+ असून ती लिब्ना इथे राहणाऱ्‍या यिर्मयाची मुलगी होती. २ यहोयाखीनप्रमाणेच सिद्‌कीया यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ ३ यरुशलेममध्ये आणि यहूदामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या, कारण यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला होता; आणि शेवटी त्याने त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करून टाकलं.+ पुढे सिद्‌कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केलं.+ ४ सिद्‌कीया राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर आपलं सगळं सैन्य घेऊन यरुशलेमवर हल्ला करायला आला. त्यांनी येऊन शहरासमोर छावणी दिली आणि वेढा घालण्यासाठी शहराभोवती भिंत उभारली.+ ५ शहराला पडलेला हा वेढा, सिद्‌कीया राजाच्या शासनकाळाच्या ११ व्या वर्षापर्यंत राहिला.

६ मग चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी,+ शहरातला दुष्काळ भयंकर वाढला होता आणि लोकांकडे खायला काहीही उरलं नव्हतं.+ ७ शेवटी, शहराच्या भिंतीचा काही भाग पाडण्यात आला. आणि खास्दी लोकांनी शहराला वेढा घातलेला असताना, शहरातले सर्व सैनिक राजाच्या बागेजवळ असलेल्या दोन भिंतींच्या मधल्या दरवाजातून रातोरात पळून गेले. ते अराबाकडे जाणाऱ्‍या रस्त्याने पळाले.+ ८ पण खास्दी लोकांच्या सैन्याने सिद्‌कीया राजाचा पाठलाग केला आणि यरीहोच्या ओसाड रानात त्याला गाठलं.+ तेव्हा राजाचे सर्व सैनिक त्याला सोडून इकडे-तिकडे पळून गेले. ९ मग त्यांनी राजाला कैद करून हमाथ देशातल्या रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आणलं; तिथे त्याने त्याला शिक्षा सुनावली. १० मग बाबेलच्या राजाने रिब्लामध्ये सिद्‌कीयासमोर त्याच्या मुलांना मारून टाकलं. तसंच, त्याने यहूदाच्या सगळ्या अधिकाऱ्‍यांचीही तिथे कत्तल केली. ११ नंतर बाबेलच्या राजाने सिद्‌कीयाचे डोळे फोडले+ आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला आणलं. तिथे सिद्‌कीया मरेपर्यंत कैदेतच राहिला.

१२ मग पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या शासनकाळाच्या १९ व्या वर्षी, नबुजरदान यरुशलेममध्ये आला;+ तो बाबेलच्या राजाचा सेवक असून त्याच्या रक्षकांचा प्रमुख होता. १३ त्याने यरुशलेममधलं यहोवाचं मंदिर, राजाचा महाल आणि तिथली सगळी घरं जाळून टाकली.+ तसंच, त्याने तिथल्या प्रत्येक प्रतिष्ठित माणसाचं घरही जाळून टाकलं. १४ मग रक्षकांच्या प्रमुखासोबत असलेल्या खास्द्यांच्या सैन्याने यरुशलेमभोवती असलेली तटाची भिंत पाडून टाकली.+

१५ रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने काही गोरगरिबांना आणि शहरात उरलेल्या लोकांना बंदी बनवून नेलं. तसंच, त्याने बाबेलच्या राजाच्या बाजूने झालेल्या लोकांना आणि शहरात उरलेल्या कुशल कारागिरांनाही बंदी बनवून नेलं.+ १६ पण देशात उरलेल्या काही गरीब व कंगाल लोकांना मात्र त्याने द्राक्षमळ्यांत काम करण्यासाठी आणि सक्‍तीची मजुरी करण्यासाठी मागे ठेवलं.+

१७ खास्दी लोकांनी यहोवाच्या मंदिरात असलेले तांब्याचे स्तंभ+ फोडून त्यांचे तुकडे-तुकडे केले. तसंच, त्यांनी यहोवाच्या मंदिरात असलेल्या तांब्याच्या गाड्या+ आणि तांब्याचा गंगाळ-सागर+ यांचेही तुकडे-तुकडे करून टाकले. त्यानंतर हे सगळं तांबं घेऊन ते बाबेलला गेले.+ १८ याशिवाय, मंदिरात वापरले जाणारे प्याले,+ फावडी, आग विझवायच्या कातरी, कटोरे,+ राख काढायच्या बादल्या आणि सर्व तांब्याची भांडी ते घेऊन गेले. १९ तसंच, गंगाळं,+ धूप जाळण्याची पात्रं, कटोरे, राख काढायच्या बादल्या, दीपवृक्ष,*+ प्याले, इतर कटोरे आणि शुद्ध सोन्या-चांदीचं+ होतं नव्हतं तेवढं सगळं रक्षकांचा प्रमुख घेऊन गेला. २० शलमोन राजाने यहोवाच्या मंदिरासाठी जे दोन स्तंभ, तांब्याच्या गाड्या, गंगाळ-सागर आणि त्याखाली असलेले तांब्याचे १२ बैल बनवले होते,+ त्या सगळ्यांच्या तांब्याचं वजन इतकं होतं की ते मोजताही येत नव्हतं.

२१ मंदिरातल्या दोन स्तंभांपैकी प्रत्येक स्तंभ १८ हात* उंच होता, आणि त्याचा घेर मोजायला १२ हात लांबीची दोरी लागायची.+ स्तंभाची जाडी चार बोटं* होती, आणि तो पोकळ होता. २२ त्यावर पाच हात उंचीचा तांब्याचा कळस होता.+ कळसाभोवती असलेली जाळी व डाळिंबांची नक्षीसुद्धा तांब्याची होती. दुसरा स्तंभही असाच होता. २३ कळसाच्या सर्व बाजूंवर ९६ डाळिंबं होती; कळसाभोवती असलेल्या जाळीला एकूण १०० डाळिंबं होती.+

२४ रक्षकांच्या प्रमुखाने मुख्य याजक सराया,+ सहायक याजक सफन्या+ आणि तीन द्वारपाल+ यांनाही बंदी बनवून नेलं. २५ तसंच, त्याने सैनिकांवर अधिकारी असलेल्या दरबाऱ्‍याला आणि शहरात असलेल्या राजाच्या सात खास सल्लागारांनाही बंदी बनवून नेलं; याशिवाय, देशातल्या सैन्याची जमवाजमव करणाऱ्‍या सेनापतीच्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या ६० सामान्य माणसांनाही तो घेऊन गेला. २६ या सगळ्यांना घेऊन रक्षकांचा प्रमुख नबुजरदान हा रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आला. २७ तेव्हा, बाबेलच्या राजाने त्या सर्वांना हमाथ देशातल्या रिब्ला+ इथे मारून टाकलं. अशा प्रकारे, यहूदाच्या लोकांना त्यांच्या देशातून कैद करून बंदिवासात नेण्यात आलं.+

२८ नबुखद्‌नेस्सरने आपल्या शासनकाळाच्या सातव्या वर्षी ३,०२३ यहुदी लोकांना बंदी बनवून नेलं.+

२९ नबुखद्‌नेस्सर राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी+ ८३२ लोकांना यरुशलेममधून बंदी बनवून नेण्यात आलं.

३० आणि नबुखद्‌नेस्सर राजाच्या शासनकाळाच्या २३ व्या वर्षी, रक्षकांचा प्रमुख नबुजरदान याने ७४५ यहुदी लोकांना बंदिवासात नेलं.+

अशा प्रकारे एकूण ४,६०० लोक बंदिवासात गेले.

३१ यहूदाचा राजा यहोयाखीन+ याच्या बंदिवासाच्या ३७ व्या वर्षी, अवील-मरोदख हा बाबेलचा राजा बनला. त्याच वर्षाच्या १२ व्या महिन्याच्या २५ व्या दिवशी त्याने यहोयाखीनची सुटका केली आणि त्याला तुरुंगातून बाहेर काढलं.+ ३२ अवील-मरोदखने त्याला चांगली वागणूक दिली आणि त्याला बाबेलमधल्या इतर राजांपेक्षा जास्त मानाचं पद दिलं. ३३ यहोयाखीनने आपले तुरुंगातले कपडे बदलले आणि तो आयुष्यभर बाबेलच्या राजासोबत त्याच्या मेजावर जेवू लागला. ३४ यहोयाखीन जिवंत होता तोपर्यंत बाबेलचा राजा त्याला दररोज अन्‍न पुरवत राहिला; मरेपर्यंत त्याला राजाकडून अन्‍न मिळत राहिलं.

कदाचित याचा अर्थ “यहोवा सन्मानित करतो,” असा होतो.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मी तुला निवडलं होतं.”

किंवा “वेगळं केलं.”

किंवा “तरुण मुलगा.”

शब्दशः “जागं होणाऱ्‍याची.”

किंवा “मोठ्या तोंडाचं भांडं.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “मिसर.”

किंवा “द्वीपांकडे.”

किंवा “मेम्फिस.”

म्हणजे, नाईल नदीची एक शाखा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “परक्या दैवतांच्या.”

किंवा “छातीला बांधले जाणारे पट्टे.”

किंवा “परक्या दैवतांसोबत.”

किंवा कदाचित, “पती.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “छाती बडवा.”

दया किंवा सहानुभूती दाखवण्यासाठी लोकांना मुलीची उपमा देण्यात आली आहे.

शब्दशः “टेहळणी करणारे,” म्हणजे, शहरावर केव्हा हल्ला करायचा हे ठरवण्यासाठी शहरावर नजर ठेवणारे.

किंवा कदाचित, “मी हल्ला करणाऱ्‍यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकलाय.”

किंवा “बुद्धिमान.”

किंवा “मला पस्तावा होणार नाही.”

शब्दशः “ते कमजोर झाले नाहीत.”

किंवा कदाचित, “तो अस्तित्वात नाही.”

किंवा “वडील नसलेल्या मुलांना.”

अतिशय उंच इमारत.

किंवा “गार.”

किंवा “माझं शिक्षण नाकारलं.”

शब्दार्थसूची पाहा.

एक सुगंधी वनस्पती.

म्हणजे, भाल्यासारखं एक शस्त्र.

म्हणजे, यिर्मयाला.

भट्टी पेटती ठेवण्यासाठी त्यात वारा भरण्याचं साधन.

शब्दशः “या,” म्हणजे मंदिराच्या आवारात असलेल्या सगळ्या इमारती.

किंवा “वडील नसलेल्या मुलांवर.”

किंवा “अनंतकाळापासून अनंतकाळापर्यंत.”

देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.

किंवा “क्रोधित करत नाहीत; भडकवत नाहीत.”

किंवा “समर्पित.”

शब्दार्थसूचीत “गेहेन्‍ना” पाहा.

शब्दार्थसूचीत “गेहेन्‍ना” पाहा.

किंवा “नियुक्‍त वेळ.”

किंवा कदाचित, “बगळा.”

किंवा “स्थलांतर करण्याची.”

किंवा “शिक्षण.”

किंवा “सचिवांची.”

किंवा “बाल्सम.”

शब्दशः “मनात त्याच्याविरुद्ध टपून बसतात.”

किंवा “मी दिलेला नियम.”

एक कडू वनस्पती.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कल्ले.”

किंवा “भ्रम.”

पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतात ठेवलेला पुतळा.

किंवा “भ्रम.”

हे वचन मुळात ॲरामेईक (अरामी) भाषेत लिहिलं होतं.

किंवा “वाफा.”

किंवा कदाचित, “तो पावसासाठी पाण्याचे दरवाजे उघडतो.”

किंवा “श्‍वास.”

किंवा “भ्रम.”

शब्दशः “याकोबचा वाटा.”

किंवा “माझं हाड मोडलं आहे.”

किंवा “सखोल समज दाखवून.”

हे यिर्मयाला उद्देशून म्हटलं आहे असं दिसतं.

किंवा “आमेन.”

म्हणजे, यिर्मया.

म्हणजे, यहूदा.

म्हणजे, मंदिरात दिली जाणारी बलिदानं.

किंवा “भावना.”

किंवा “रंगीबेरंगी.”

किंवा कदाचित, “ती शोक करत आहे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “त्यांना वेढा घालण्यात आला आहे.”

किंवा “इथियोपियाची.”

किंवा “कुंडांवर.”

किंवा कदाचित, “चार प्रकारचे न्यायदंड.”

किंवा कदाचित, “ते माघारी जात राहिले.”

किंवा कदाचित, “तो लज्जित आणि अपमानित झालाय.”

हे यहूदा राष्ट्राला सूचित करत असावं.

किंवा “न्यायदंडाच्या संदेशाने.”

किंवा “माझं मुख.”

देवाला सोडून गेलेले इस्राएली लोक मूर्तिपूजक राष्ट्रांच्या या प्रथा पाळायचे.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “कारण तू माझ्या क्रोधाच्या आगीत जळत आहेस.”

किंवा “जो शक्‍तिशाली माणूस.”

किंवा “जो शक्‍तिशाली माणूस.”

किंवा “कपटी.”

किंवा “त्याच्यावर कोणताच इलाज चालत नाही.”

किंवा “भावनांचं.”

किंवा “अन्यायाने.”

किंवा “दोनदा.”

किंवा “दक्षिणेकडून.”

शब्दार्थसूची पाहा.

अतिशय उंच इमारत.

किंवा “न बांधलेल्या रस्त्याने.”

किंवा “नियम.”

शब्दशः “त्याचे कान भणभणतील.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “बॅबिलॉनच्या.”

किंवा “भावना.”

शब्दशः “नबुखद्रेस्सर,” एक वेगळं शब्दलेखन.

किंवा कदाचित, “त्या लोकांना.”

किंवा “वडील नसलेल्या मुलांचं.”

याला यहोआहाज असंही म्हटलं आहे.

याला यहोयाखीन आणि यखन्या असंही म्हटलं आहे.

किंवा “देशा.”

किंवा “वारस पुढे आणीन.”

किंवा “धर्मत्यागी.”

एक कडू वनस्पती.

किंवा “धर्मत्यागी बनले आहेत.”

किंवा “तुम्हाला खोट्या आशा दाखवत आहेत.”

याला यहोयाखीन आणि कोन्या असंही म्हटलं आहे.

किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणाऱ्‍यांनाही.”

किंवा “लोकांना.”

किंवा “रहिवाशांना.”

किंवा “अपराधाबद्दल शिक्षा करीन.”

किंवा “कल्ले.”

हे बाबेलचं दुसरं नाव असावं.

किंवा “लोकांबद्दल.”

किंवा “शिक्षण.”

शब्दार्थसूचीत “जू” पाहा.

म्हणजे, मंदिरातला तांब्याचा मोठा हौद.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “असंच होवो.”

किंवा “रोगराई.”

किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणारे.”

किंवा कदाचित, “फुटलेल्या.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कंबरेवर.”

किंवा “विदेशी.”

किंवा “सुधारीन.”

हे सीयोनला उद्देशून म्हटलंय.

किंवा कदाचित, “मी त्यांना सन्मानित करीन.”

किंवा “मी तुझ्यावर एकनिष्ठ प्रेम करत आलोय.”

किंवा “परत मिळवेल.”

किंवा “यहोवाच्या चांगुलपणामुळे.”

किंवा कदाचित, “पती.”

किंवा “चरबीयुक्‍त राखेचं,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेल्या राखेचं.

शब्दशः “सोडवण्याचा.”

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूचीत “गेहेन्‍ना” पाहा.

किंवा “वारस.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “घरातून.”

शब्दशः “योनादाब,” हे यहोनादाब या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

शब्दशः “योनादाब,” हे यहोनादाब या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

शब्दशः “योनादाब,” हे यहोनादाब या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “प्रती तयार करणाऱ्‍याचा.”

किंवा “जेवणाच्या खोलीत.”

नोव्हेंबरच्या मध्यापासून डिसेंबरच्या मध्यापर्यंत. अति. ख१५ पाहा.

याला यहोयाखीन आणि यखन्या असंही म्हटलं आहे.

शब्दशः “षंढ.” शब्दार्थसूचीत “षंढ” पाहा.

समगार ही एक पदवी असावी असं दिसतं.

किंवा या हिब्रू लिखाणाचं असंही विभाजन करण्यात आलं आहे: “नेर्गल-शरेसर, समगार-नबो, सर्सखीम, रबसारीस.”

किंवा “प्रमुख जादूगार (ज्योतिषी).”

किंवा कदाचित, “सक्‍तीची मजुरी.”

किंवा “प्रमुख राजदरबारी.”

किंवा “प्रमुख जादूगार (ज्योतिषी).”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “मोठ्या तळ्याजवळ.”

किंवा “काही काळासाठी राहिलात.”

किंवा “सूर्याच्या घराच्या (मंदिर),” म्हणजे हिलियोपोलीसच्या.

किंवा “मेम्फिस.”

किंवा “त्यांना वाईट वाटलं नाही.”

देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.

देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.

देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.

शब्दार्थसूची पाहा.

देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे त्या देवतेला दिलेली पदवी. ही कदाचित प्रजननाची देवता असावी.

सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मेम्फिस.”

म्हणजे, इजिप्तवर विजय मिळवणारा.

किंवा “मेम्फिसची.”

किंवा कदाचित, “तो ओसाड होईल.”

किंवा “कालवडीसारखी.”

म्हणजे, थीब्ज.

शब्दशः “बीज.”

किंवा “सुधारीन.”

म्हणजे, क्रीट.

म्हणजे, ते शोकामुळे आणि लज्जित झाल्यामुळे आपल्या डोक्यावरचे केस काढून टाकतील.

किंवा “उंच ठिकाणाचा.”

किंवा कदाचित, “रुक्ष भूमीवरच.”

किंवा “मवाबची ताकद.”

म्हणजे, अंत्यविधीच्या वेळी शोक व्यक्‍त करायला वाजवली जाणारी बासरी.

किंवा कदाचित, “त्यांना युद्धाची घोषणा ऐकायला लावीन.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वडील नसलेली.”

किंवा “कल्ले.”

इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

किंवा “कालवडीसारखं.”

किंवा “खोट्या संदेष्ट्यांवर.”

म्हणजे, भाल्यासारखं एक शस्त्र.

हे बाबेल देशाचं दुसरं नाव असावं.

धान्याच्या दाण्यापासून भूसा वेगळा करण्याची प्रक्रिया.

म्हणजे, खास्दी लोकांचा देश

किंवा “बाल्सम.”

किंवा कदाचित, “भाते बाणांनी भरा.”

किंवा “वाफा.”

किंवा कदाचित, “तो पावसासाठी पाण्याचे दरवाजे उघडतो.”

किंवा “श्‍वास.”

किंवा “भ्रम.”

शब्दशः “याकोबचा वाटा.”

किंवा कदाचित, “त्यानेच त्याच्या वारशाची काठीही बनवली आहे.”

किंवा “पपायरस गवताच्या.” शब्दार्थसूचीत “पपायरस गवत” पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “खंगाळून टाकलंय.”

हे बाबेलचं दुसरं नाव असावं.

किंवा “परके.”

एक प्रकारची समई.

एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

एक बोट जाडी म्हणजे १.८५ सें.मी. (०.७३ इंच). अति. ख१४ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा