वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt उत्पत्ति १:१-५०:२६
  • उत्पत्ती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्पत्ती
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती

उत्पत्ती

१ सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.+

२ पृथ्वीवर काहीच नव्हतं आणि ती ओसाड होती. खोल पाण्यावर*+ अंधार होता आणि देवाची क्रियाशील शक्‍ती*+ पाण्यावर+ इथून तिथे वाहत होती.

३ मग देव म्हणाला: “प्रकाश व्हावा.” तेव्हा प्रकाश झाला.+ ४ त्यानंतर देवाने पाहिलं की प्रकाश चांगला आहे आणि देव प्रकाशाला अंधारापासून वेगळं करू लागला. ५ देवाने प्रकाशाला दिवस, तर अंधाराला रात्र+ असं म्हटलं. मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा पहिला दिवस होता.

६ मग देव म्हणाला: “पाण्याचे, वर आणि खाली असे दोन भाग व्हावेत+ आणि त्यांच्यामध्ये अंतराळ*+ निर्माण व्हावं.” ७ मग देवाने अंतराळ बनवलं आणि अंतराळाच्या खाली असलेल्या पाण्याला अंतराळाच्या वर असलेल्या पाण्यापासून वेगळं केलं.+ आणि तसंच झालं. ८ देवाने अंतराळाला आकाश म्हटलं. मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा दुसरा दिवस होता.

९ त्यानंतर देव म्हणाला: “आकाशाखालचं पाणी एका ठिकाणी जमा व्हावं आणि कोरडी जमीन दिसावी.”+ आणि तसंच झालं. १० कोरड्या जमिनीला देवाने पृथ्वी म्हटलं,+ तर जमलेल्या पाण्याला समुद्र म्हटलं.+ आणि देवाने पाहिलं की ते चांगलं आहे.+ ११ मग देव म्हणाला: “पृथ्वीवर गवत, बिया उत्पन्‍न करणारी झाडं आणि बिया असलेली फळं देणारी झाडं आपापल्या जातींप्रमाणे उगवावीत.” आणि तसंच झालं. १२ तेव्हा पृथ्वीवर गवत, बिया उत्पन्‍न करणारी झाडं+ आणि बिया असलेली फळं देणारी झाडं आपापल्या जातींप्रमाणे उगवू लागली. आणि देवाने पाहिलं की ते चांगलं आहे. १३ मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा तिसरा दिवस होता.

१४ मग देव म्हणाला: “दिवस आणि रात्र यांना वेगळं करण्यासाठी+ आकाशात ज्योती+ व्हाव्यात. त्यांच्या मदतीने ऋतू, दिवस आणि वर्षं ठरवली जातील.+ १५ पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी या ज्योती आकाशात चमकतील.” आणि तसंच झालं. १६ मग देवाने दोन मोठ्या ज्योती बनवल्या, दिवसा उजेड देण्यासाठी मोठी ज्योती+ आणि रात्री उजेड देण्यासाठी लहान ज्योती. तसंच, त्याने तारेही बनवले.+ १७ देवाने त्यांना यासाठी आकाशात ठेवलं की त्यांनी पृथ्वीला प्रकाश द्यावा, १८ दिवसा आणि रात्री उजेड द्यावा आणि प्रकाश व अंधार यांना वेगळं करावं.+ मग देवाने पाहिलं की ते चांगलं आहे. १९ मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा चौथा दिवस होता.

२० मग देव म्हणाला: “समुद्र जीवजंतूंनी* भरून जावा आणि पक्षी व उडणारे जीवजंतू पृथ्वीच्या वर पसरलेल्या उंच आकाशात उडावेत.”+ २१ तेव्हा देवाने समुद्रात राहणारे मोठमोठे प्राणी* आणि पाण्यात राहणारे सर्व जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे आणि सर्व प्रकारचे पक्षी व उडणारे जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे निर्माण केले. मग देवाने पाहिलं की ते चांगलं आहे. २२ त्यानंतर देवाने त्यांना असा आशीर्वाद दिला: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि समुद्रातल्या पाण्याला भरून टाका+ आणि पक्ष्यांची व उडणाऱ्‍या जीवजंतूंची संख्या पृथ्वीवर खूप वाढावी.” २३ मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा पाचवा दिवस होता.

२४ त्यानंतर देव म्हणाला: “पृथ्वीवर आपापल्या जातींप्रमाणे प्राणी* व्हावेत, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी व रांगणारे प्राणी* आपापल्या जातींप्रमाणे व्हावेत.”+ आणि तसंच झालं. २५ मग देवाने पृथ्वीवर राहणारे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे बनवले, तसंच जमिनीवर रांगणारे प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे बनवले. आणि देवाने पाहिलं की ते चांगलं आहे.

२६ त्यानंतर देव म्हणाला: “आपण+ आपल्या प्रतिरूपाचा,+ आपल्यासारखा असलेला माणूस निर्माण करू+ आणि त्याने समुद्रातले मासे, आकाशात उडणारे पक्षी, पाळीव प्राणी व जमिनीवर रांगणारे प्राणी यांवर, तसंच संपूर्ण पृथ्वीवर अधिकार चालवावा.”+ २७ मग देवाने आपल्या प्रतिरूपात माणूस निर्माण केला, त्याने त्याला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केलं; पुरुष आणि स्त्री असं त्याने त्यांना निर्माण केलं.+ २८ देवाने त्यांना असा आशीर्वाद दिला: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका+ आणि तिच्यावर अधिकार चालवा.+ समुद्रातले मासे, आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू, तसंच पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यांवर अधिकार चालवा.”+

२९ मग देव म्हणाला: “मी तुम्हाला बिया उत्पन्‍न करणारी पृथ्वीवरची सर्व झाडं आणि बिया असलेली फळं देणारी सर्व झाडं देतोय. ती तुमच्यासाठी अन्‍न ठरतील.+ ३० पृथ्वीवरच्या सर्व जंगली प्राण्यांना, आकाशात उडणाऱ्‍या पक्ष्यांना व जीवजंतूंना, तसंच पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्व जिवांना मी हिरवं गवत आणि झाडंझुडपं अन्‍न म्हणून देतोय.”+ आणि तसंच झालं.

३१ त्यानंतर, आपण बनवलेलं सर्वकाही खूप चांगलं आहे+ असं देवाने पाहिलं. मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा सहावा दिवस होता.

२ अशा प्रकारे, आकाश व पृथ्वी आणि त्यांत असलेलं सर्वकाही* बनवून पूर्ण झालं.+ २ देव करत असलेलं काम सातवा दिवस सुरू होईपर्यंत पूर्ण झालं होतं आणि आपण करत असलेल्या सर्व कामातून त्याने सातव्या दिवशी विश्रांती घ्यायला सुरुवात केली.+ ३ मग देवाने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि त्याला पवित्र ठरवलं. कारण देवाने ज्या सर्व गोष्टी बनवण्याचं ठरवलं होतं,* त्या निर्माण करण्याच्या कामातून तो त्या दिवसापासून विश्रांती घेत आहे.

४ आकाश आणि पृथ्वी बनवण्यात आली त्या काळाचा, म्हणजेच यहोवा* देवाने पृथ्वी आणि आकाश निर्माण केलं+ त्या दिवसाचा हा वृत्तान्त आहे.

५ पृथ्वीवर अजून कोणतीही झाडंझुडपं उगवली नव्हती, कारण यहोवा देवाने पृथ्वीवर अजून पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यासाठी कोणी माणूस नव्हता. ६ पण पृथ्वीवरून धुकं वर जायचं आणि सगळ्या जमिनीला भिजवायचं.

७ मग यहोवा देवाने जमिनीतली माती घेऊन माणूस बनवला+ आणि त्याच्या नाकपुड्यांमध्ये जीवनाचा श्‍वास फुंकला,+ तेव्हा तो माणूस जिवंत प्राणी* बनला.+ ८ नंतर यहोवा देवाने पूर्वेकडे एदेनमध्ये एक बाग+ लावली आणि आपण बनवलेल्या माणसाला+ तिथे ठेवलं. ९ यहोवा देवाने दिसायला सुंदर आणि चांगली फळं देणारं प्रत्येक झाड जमिनीतून उगवायला लावलं. तसंच, बागेच्या मधोमध त्याने जीवनाचं झाड+ आणि चांगल्यावाइटाचं ज्ञान देणारं झाडही+ उगवायला लावलं.

१० बागेला पाणी देण्यासाठी एदेनमधून एक नदी वाहायची. पुढे तिला फाटे फुटून चार नद्या झाल्या. ११ पहिल्या नदीचं नाव पीशोन; ही नदी संपूर्ण हवीला देशाला वळसा घालते; तिथे सोनं सापडतं. १२ त्या देशाचं सोनं चांगल्या प्रतीचं आहे. तिथे गुग्गुळाचा डिंक आणि गोमेद रत्नंही आहेत. १३ दुसऱ्‍या नदीचं नाव गीहोन आहे. ती संपूर्ण कूश देशाला वळसा घालते. १४ तिसऱ्‍या नदीचं नाव हिद्दकेल*+ आहे. ही नदी अश्‍शूरच्या+ पूर्वेकडे वाहते आणि चौथी नदी फरात+ आहे.

१५ यहोवा देवाने माणसाला एदेन बागेची मशागत करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी तिथे ठेवलं.+ १६ यहोवा देवाने माणसाला अशी आज्ञाही दिली: “तू बागेतल्या सगळ्या झाडांची फळं पोटभर खाऊ शकतोस.+ १७ पण चांगल्यावाइटाचं ज्ञान देणाऱ्‍या झाडाचं फळ खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू त्याचं फळ खाशील त्या दिवशी तू नक्की मरशील.”+

१८ मग यहोवा देव म्हणाला: “माणसाने एकटं राहावं हे चांगलं नाही. मी त्याच्यासाठी एक सहायक, एक योग्य असा साथीदार बनवीन.”+ १९ यहोवा देव मातीपासून सर्व प्रकारचे जंगली प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू बनवत होता. माणूस त्यांना काय नावं देतो हे पाहण्यासाठी तो त्यांना त्याच्याकडे आणू लागला; आणि त्याने प्रत्येक प्राण्याला* जे नाव दिलं तेच त्याचं नाव पडलं.+ २० मग माणसाने सर्व प्रकारच्या जंगली आणि पाळीव प्राण्यांना, तसंच, आकाशातल्या पक्ष्यांना आणि जीवजंतूंना नावं दिली, पण त्याच्यासाठी कोणीही योग्य सहायक नव्हता. २१ म्हणून यहोवा देवाने माणसाला गाढ झोप आणली आणि तो झोपेत असताना, त्याने त्याची एक फासळी* काढून ती जागा मांसाने भरून काढली. २२ मग यहोवा देवाने माणसातून काढलेल्या फासळीची स्त्री बनवली आणि तिला त्याच्याकडे आणलं.+

२३ तेव्हा माणूस म्हणाला:

“ही तर माझ्या हाडांतलं हाड;

माझ्या मांसातलं मांस आहे.

हिला स्त्री म्हटलं जाईल,

कारण हिला पुरुषापासून बनवलं आहे.”+

२४ म्हणून माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील* आणि ते दोघं एकदेह होतील.+ २५ तो पुरुष आणि त्याची बायको दोघंही नग्न होते+ तरी त्यांना लाज वाटत नव्हती.

३ यहोवा देवाने बनवलेल्या सर्व जंगली प्राण्यांपैकी साप+ हा सगळ्यात सावध* होता. तो स्त्रीला म्हणाला: “बागेतल्या सगळ्या झाडांची फळं खाऊ नका असं देवाने खरंच तुम्हाला सांगितलं आहे का?”+ २ तेव्हा स्त्री सापाला म्हणाली: “आम्ही बागेतल्या झाडांची फळं खाऊ शकतो.+ ३ पण बागेच्या मधोमध असलेल्या झाडाच्या+ फळाबद्दल देवाने असं सांगितलं आहे: ‘ते खाऊ नका, त्याला हातही लावू नका; नाहीतर तुम्ही मराल.’” ४ हे ऐकून साप स्त्रीला म्हणाला: “तुम्ही मुळीच मरणार नाही.+ ५ उलट देवाला माहीत आहे, की ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील; तुम्ही देवासारखे व्हाल आणि चांगलं काय आणि वाईट काय हे तुम्हाला समजू लागेल.”+

६ तेव्हा स्त्रीने पाहिलं, की त्या झाडाचं फळ खायला चांगलं आणि दिसायला सुंदर आहे. ते झाड दिसायला खरोखर खूप छान होतं. म्हणून तिने त्याचं फळ तोडलं आणि ते खाल्लं.+ नंतर, तिचा नवरा तिच्यासोबत असताना तिने त्यालाही ते फळ दिलं, आणि त्याने ते खाल्लं.+ ७ तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत हे त्यांना कळलं. म्हणून त्यांनी अंजिराच्या झाडाची पानं शिवून कमरेला गुंडाळली.+

८ नंतर, दिवस मावळण्याच्या वेळी* यहोवा देव बागेतून चालत असताना, त्यांना त्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा यहोवा देवाने आपल्याला पाहू नये म्हणून तो माणूस आणि त्याची बायको बागेतल्या झाडांमध्ये लपली. ९ यहोवा देव त्याला हाक मारून म्हणू लागला: “तू कुठे आहेस?” १० शेवटी त्याने उत्तर दिलं: “मी बागेत तुझा आवाज ऐकला, पण मी उघडा* असल्यामुळे घाबरलो. म्हणून मी लपलो.” ११ तेव्हा देव म्हणाला: “तू उघडा* आहेस+ हे तुला कोणी सांगितलं? ज्या झाडाचं फळ खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती,+ त्या झाडाचं फळ तू खाल्लंस का?” १२ माणसाने उत्तर दिलं: “जी स्त्री तू मला दिलीस, तिने मला त्या झाडाचं फळ दिलं आणि म्हणून मी ते खाल्लं.” १३ मग यहोवा देव स्त्रीला म्हणाला: “तू हे काय केलंस?” स्त्री म्हणाली: “सापाने मला फसवलं, म्हणून मी ते खाल्लं.”+

१४ तेव्हा यहोवा देव सापाला+ म्हणाला: “तू हे केलंस, त्यामुळे सगळ्या पाळीव प्राण्यांमध्ये आणि जंगली प्राण्यांमध्ये तू शापित आहेस. तू आपल्या पोटावर सरपटत चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. १५ आणि मी तुझ्यामध्ये+ व स्त्रीमध्ये+ आणि तुझ्या संततीमध्ये*+ व तिच्या संततीमध्ये*+ शत्रुत्व*+ निर्माण करीन. तो तुझं डोकं ठेचेल*+ आणि तू त्याच्या टाचेवर घाव करशील.”*+

१६ तो स्त्रीला म्हणाला: “मी तुझ्या गरोदरपणाचा त्रास खूप वाढवीन; मुलांना जन्म देताना तुला वेदना होतील. तुला तुझ्या नवऱ्‍याची ओढ असेल आणि तो तुझ्यावर अधिकार गाजवेल.”

१७ मग देव आदामला* म्हणाला: “तू तुझ्या बायकोचं ऐकलं आणि ज्या झाडाबद्दल मी तुला अशी आज्ञा दिली होती,+ की ‘त्याचं फळ खाऊ नकोस,’ त्या झाडाचं फळ तू खाल्लंस; म्हणून जमीन तुझ्यामुळे शापित आहे.+ तिच्यातून अन्‍न पिकवण्यासाठी तुला आयुष्यभर कष्ट* करावे लागतील.+ १८ ती तुझ्यासाठी काटेकुसळे उत्पन्‍न करेल आणि तू शेतातला भाजीपाला खाशील. १९ तुला जमिनीपासून बनवण्यात आलं आहे.+ त्यामुळे जोपर्यंत तू जमिनीला जाऊन मिळत नाहीस, तोपर्यंत अन्‍नासाठी घाम गाळत राहशील. तू माती आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील.”+

२० यानंतर आदामने आपल्या बायकोचं नाव हव्वा* असं ठेवलं, कारण ती सगळ्या मानवजातीची* आई होणार होती.+ २१ मग यहोवा देवाने आदामसाठी आणि त्याच्या बायकोसाठी चामड्याचे लांब झगे बनवले.+ २२ त्यानंतर यहोवा देव म्हणाला: “माणसाला आता आपल्यासारखं चांगलं काय आणि वाईट काय हे कळू लागलंय.+ आता कदाचित तो हात पुढे करून जीवनाच्या झाडाचंही+ फळ खाईल आणि सर्वकाळ जिवंत राहील. म्हणून . . . . ” २३ तेव्हा ज्या जमिनीपासून माणसाला बनवण्यात आलं होतं+ तिची मशागत करण्यासाठी यहोवा देवाने त्याला एदेन बागेतून+ बाहेर काढलं. २४ त्याने माणसाला हाकलून दिलं आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्‍या मार्गाचं रक्षण करण्यासाठी, एदेन बागेच्या पूर्वेकडे करुबांना*+ उभं केलं, तसंच सतत फिरणारी एक जळती तलवारही ठेवली.

४ नंतर आदामने आपली बायको हव्वा हिच्याशी संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिली.+ तिने काइनला+ जन्म दिला, तेव्हा ती म्हणाली: “मी यहोवाच्या मदतीने एका मुलाला जन्म दिला आहे.” २ पुढे तिने त्याचा भाऊ हाबेल+ याला जन्म दिला.

हाबेल मेंढपाळ झाला, तर काइन शेती करू लागला. ३ काही काळानंतर, काइनने आपल्या शेतात उगवणाऱ्‍या काही गोष्टी यहोवाला अर्पण करण्यासाठी आणल्या. ४ पण हाबेलने आपल्या कळपातून पहिली जन्मलेली+ काही कोकरं त्यांच्या चरबीसोबत अर्पण केली. यहोवाने हाबेलचा आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला.+ ५ पण, त्याने काइनचा आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला नाही. यामुळे काइनला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला.* ६ तेव्हा यहोवा काइनला म्हणाला: “तू इतका का रागावलास आणि तुझा चेहरा असा का उतरला आहे? ७ जर तू आपला मार्ग बदलून चांगली कामं करू लागलास, तर मी तुझा स्वीकार करणार नाही का? पण जर तू आपला मार्ग बदलून चांगली कामं केली नाहीस, तर तुझ्यावर ताबा मिळवण्यासाठी पाप दाराजवळ टपून बसलं आहे; पण तू त्याच्यावर विजय मिळव.”

८ मग काइन आपला भाऊ हाबेल याला म्हणाला: “चल आपण शेतात जाऊ.” ते शेतात असताना काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं.+ ९ नंतर यहोवाने काइनला विचारलं: “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” त्याने उत्तर दिलं: “मला माहीत नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” १० यावर देव म्हणाला: “तू हे काय केलंस? ऐक! तुझ्या भावाचं रक्‍त जमिनीतून ओरडून माझ्याकडे न्याय मागत आहे.+ ११ तू शापित आहेस. कारण तू तुझ्या भावाचं रक्‍त सांडलं आणि ज्या जमिनीने तोंड उघडून ते शोषून घेतलं, तिच्यावरून तुला हाकलून दिलं जात आहे.+ १२ तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती तुला उपज* देणार नाही. तू पृथ्वीवर वणवण फिरशील आणि जीव मुठीत घेऊन पळत राहशील.” १३ हे ऐकून काइन यहोवाला म्हणाला: “माझ्या अपराधाची ही शिक्षा सहन करण्यापलीकडे आहे. १४ आज तू मला या ठिकाणाहून हाकलून देत आहेस आणि मला तुझ्या नजरेआड जावं लागेल; मी पृथ्वीवर वणवण फिरेन आणि जीव मुठीत घेऊन पळत राहीन. मी जर कोणाच्या हाती सापडलो तर तो मला नक्कीच मारून टाकेल.” १५ तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “यामुळे जो कोणी काइनचा जीव घेईल त्याचा सातपटीने सूड घेतला जाईल.”

काइन जर एखाद्याच्या हाती सापडला, तर त्याने त्याचा जीव घेऊ नये म्हणून यहोवाने काइनसाठी एक चिन्ह ठरवलं.* १६ मग काइन यहोवाच्या समोरून निघून गेला आणि एदेनच्या पूर्वेकडे+ असलेल्या नोद नावाच्या प्रदेशात* राहू लागला.

१७ नंतर, काइनने त्याच्या बायकोशी संबंध ठेवले+ व ती गरोदर राहिली आणि तिने हनोखला जन्म दिला. मग काइनने एक शहर बांधलं आणि आपल्या मुलाच्या नावावरून त्या शहराला हनोख असं नाव दिलं. १८ हनोखला इराद झाला आणि इरादला महुयाएल झाला. मग, महुयाएलला मथुशाएल झाला आणि मथुशाएलला लामेख झाला.

१९ लामेखच्या दोन बायका होत्या. एकीचं नाव आदा आणि दुसरीचं नाव सिल्ला होतं. २० आदाने याबालला जन्म दिला. तो तंबूंमध्ये राहणाऱ्‍या आणि गुरंढोरं पाळणाऱ्‍या लोकांचा मूळपुरुष झाला. २१ त्याच्या भावाचं नाव युबाल होतं. तो वीणा* आणि बासरी वाजवणाऱ्‍यांचा मूळपुरुष होता. २२ सिल्ला हिने तुबल-काइन याला जन्म दिला. तो सर्व प्रकारची तांब्याची आणि लोखंडाची हत्यारं बनवायचा. तुबल-काइनच्या बहिणीचं नाव नामा होतं. २३ मग लामेखने आदा आणि सिल्ला या आपल्या बायकांना ही कविता ऐकवली:

“लामेखच्या बायकांनो, माझं ऐका;

माझ्या शब्दांकडे लक्ष द्या:

मला जखमी केलेल्या एका माणसाला,

माझ्यावर हल्ला करणाऱ्‍या एका तरुणाला

मी ठार मारलं आहे.

२४ जर काइनचा सूड सात पटींनी घेतला जाईल,+

तर लामेखचा ७७ पटींनी.”

२५ आदामने पुन्हा आपल्या बायकोशी संबंध ठेवल्यावर तिने एका मुलाला जन्म दिला. तिने त्याचं नाव शेथ*+ ठेवलं, कारण ती म्हणाली: “काइनने हाबेलला ठार मारल्यामुळे+ देवाने त्याच्या जागी मला आणखी एक संतती* दिली आहे.” २६ पुढे शेथलाही एक मुलगा झाला आणि त्याने त्याचं नाव अनोश+ ठेवलं. त्या काळात लोकांनी यहोवाला नावाने हाक मारायला सुरुवात केली.

५ हा आदामच्या वंशावळीचा वृत्तान्त आहे. देवाने आदामला निर्माण केलं, त्या दिवशी त्याने त्याला आपल्यासारखं*+ बनवलं. २ त्याने त्यांना पुरुष आणि स्त्री असं निर्माण केलं.+ त्यांना निर्माण करण्यात आलं+ त्या दिवशी, देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि माणूस* असं नाव दिलं.

३ आदाम १३० वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्यासारखाच* एक मुलगा झाला आणि त्याने त्याचं नाव शेथ+ ठेवलं. ४ शेथच्या जन्मानंतर आदाम ८०० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. ५ अशा रितीने आदाम ९३० वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.+

६ शेथ १०५ वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश+ झाला. ७ अनोशच्या जन्मानंतर शेथ ८०७ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. ८ अशा रितीने शेथ ९१२ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.

९ अनोश ९० वर्षांचा झाल्यावर त्याला केनान झाला. १० केनानच्या जन्मानंतर अनोश ८१५ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. ११ अशा रितीने अनोश ९०५ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.

१२ केनान ७० वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल+ झाला. १३ महललेलच्या जन्मानंतर केनान ८४० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. १४ अशा रितीने केनान ९१० वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.

१५ महललेल ६५ वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद+ झाला. १६ यारेदच्या जन्मानंतर महललेल ८३० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. १७ अशा रितीने महललेल ८९५ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.

१८ यारेद १६२ वर्षांचा झाल्यावर त्याला हनोख+ झाला. १९ हनोखच्या जन्मानंतर यारेद ८०० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. २० अशा रितीने यारेद ९६२ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.

२१ हनोख ६५ वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह+ झाला. २२ मथुशलहच्या जन्मानंतर हनोख ३०० वर्षं खऱ्‍या देवासोबत* चालत राहिला. त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. २३ अशा रितीने हनोख ३६५ वर्षं जगला. २४ हनोख खऱ्‍या देवासोबत चालत राहिला.+ मग तो नाहीसा झाला, कारण देवाने त्याला नेलं.+

२५ मथुशलह १८७ वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख+ झाला. २६ लामेखच्या जन्मानंतर मथुशलह ७८२ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. २७ अशा रितीने मथुशलह ९६९ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.

२८ लामेख १८२ वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला. २९ त्याने त्याचं नाव नोहा*+ ठेवलं आणि तो म्हणाला: “यहोवाने जमिनीला शाप दिल्यामुळे आपल्याला जे मेहनतीचं काम आणि काबाडकष्ट करावे लागत आहेत,+ त्यांपासून हा आपल्याला सांत्वन* देईल.” ३० नोहाच्या जन्मानंतर लामेख ५९५ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. ३१ अशा रितीने लामेख ७७७ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.

३२ नोहा ५०० वर्षांचा झाल्यावर, त्याला शेम,+ हाम+ आणि याफेथ+ झाले.

६ पृथ्वीवर मानवांची संख्या वाढू लागली आणि त्यांना मुली झाल्या, २ तेव्हा खऱ्‍या देवाच्या मुलांनी*+ पाहिलं, की मानवांच्या मुली दिसायला सुंदर आहेत. म्हणून त्यांपैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी बायका करून घेतल्या. ३ मग यहोवा म्हणाला: “मनुष्य पापी असल्यामुळे* मी त्याला नेहमीसाठी सहन करणार नाही.+ म्हणून त्याचे दिवस १२० वर्षं असतील.”+

४ त्या काळात आणि नंतरही पृथ्वीवर नेफिलीम* होते. तेव्हा खऱ्‍या देवाच्या मुलांनी मानवांच्या मुलींशी संबंध ठेवले आणि त्यांच्यापासून त्यांना मुलं झाली. ही जुन्या काळातली शक्‍तिशाली आणि नावाजलेली माणसं होती.

५ यहोवा देवाने पाहिलं, की पृथ्वीवर माणसांचा दुष्टपणा फार वाढला आहे आणि त्यांच्या मनातला प्रत्येक विचार आणि इच्छा ही नेहमी वाईटच असते.+ ६ पृथ्वीवर मानवाला निर्माण केल्याचा यहोवाला पस्तावा झाला* आणि त्याला मनापासून वाईट वाटलं.*+ ७ म्हणून यहोवा म्हणाला: “मी निर्माण केलेल्या मानवांचा मी या पृथ्वीवरून नाश करीन. मानवांसोबत पाळीव प्राणी, रांगणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू यांचाही मी नाश करीन. कारण त्यांना बनवल्याचा मला पस्तावा होत आहे.” ८ पण यहोवाच्या नजरेत नोहा चांगला माणूस होता.

९ हा नोहाचा वृत्तान्त आहे.

नोहा एक नीतिमान माणूस होता.+ त्याच्या काळातल्या लोकांमध्ये* तो निर्दोष होता. नोहा खऱ्‍या देवासोबत चालला.+ १० पुढे नोहाला तीन मुलं झाली, शेम, हाम आणि याफेथ.+ ११ खऱ्‍या देवाच्या नजरेत पृथ्वी भ्रष्ट झाली होती आणि सगळीकडे हिंसाचार चालला होता. १२ देवाने पृथ्वीकडे पाहिलं, तेव्हा ती खरोखर भ्रष्ट झाली होती.+ पृथ्वीवरचे सर्व लोक वाईट मार्गाला लागले होते.+

१३ यानंतर देव नोहाला म्हणाला: “मी सगळ्या मानवांचा नाश करायचं ठरवलं आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर हिंसाचार खूप वाढला आहे. म्हणून मी त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करीन.+ १४ तू आपल्यासाठी चांगल्या लाकडापासून* एक जहाज* बनव.+ त्यामध्ये खोल्या बनव आणि त्याला आतून बाहेरून डांबर+ लाव. १५ जहाज अशा प्रकारे बनव: जहाजाची लांबी ३०० हात,* रुंदी ५० हात आणि उंची ३० हात असावी. १६ उजेड येण्यासाठी जहाजाच्या छतापासून एक हात लांबीची खिडकी* बनव. जहाजाच्या एका बाजूला त्याचा दरवाजा बनव.+ आणि जहाजात खालचा, दुसरा आणि तिसरा मजला बनव.

१७ मी पृथ्वीवर जलप्रलय* आणणार आहे+ आणि ज्यांच्यात जीवनाचा श्‍वास* आहे अशा आकाशाखालच्या सगळ्या प्राण्यांचा नाश करणार आहे. पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टींचा नाश होईल.+ १८ पण मी तुझ्यासोबत एक करार करतो. तू जहाजात जा आणि आपल्यासोबत आपली मुलं, बायको आणि आपल्या सुनांनाही घेऊन जा.+ १९ आणि तुझ्यासोबत सर्व प्रकारच्या प्राण्यांचा+ जीव वाचावा म्हणून, त्यांच्यातल्या नर आणि मादी+ अशा दोन-दोन प्राण्यांना जहाजात घेऊन जा; २० आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे, पाळीव प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे, तसंच, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे तुझ्याकडे येतील. तू त्यांना जिवंत वाचवावं म्हणून प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणी तुझ्याकडे येतील.+ २१ तू आपल्यासाठी आणि प्राण्यांसाठी लागणारं सर्व प्रकारचं अन्‍न गोळा करून आपल्यासोबत जहाजात ने.”+

२२ देवाने जे काही करण्याची आज्ञा दिली होती त्याप्रमाणे नोहाने केलं. त्याने अगदी तसंच केलं.+

७ मग यहोवा नोहाला म्हणाला: “तू तुझ्या पूर्ण कुटुंबासोबत जहाजात जा, कारण या पिढीतल्या लोकांपैकी तूच माझ्या नजरेत नीतिमान आहेस.+ २ प्रत्येक प्रकारच्या शुद्ध प्राण्यांपैकी नर आणि मादी असे सात,*+ आणि प्रत्येक प्रकारच्या अशुद्ध प्राण्यांपैकी नर आणि मादी असे फक्‍त दोन प्राणी आपल्यासोबत ने. ३ तसंच, आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू यांपैकी नर आणि मादी असे सात* आपल्यासोबत जहाजात ने; म्हणजे त्यांच्या जाती सबंध पृथ्वीवर जिवंत राहतील.+ ४ कारण फक्‍त सात दिवसांनंतर, मी ४० दिवस आणि ४० रात्री+ पृथ्वीवर पाऊस पाडीन+ आणि मी बनवलेल्या सर्व जिवांचा पृथ्वीवरून नाश करीन.”+ ५ तेव्हा यहोवाने जे काही करण्याची आज्ञा दिली होती, ते सर्व नोहाने केलं.

६ पृथ्वीवर जलप्रलय आला तेव्हा नोहा ६०० वर्षांचा होता.+ ७ जलप्रलय सुरू होण्याआधी नोहा आपल्या मुलांना, बायकोला आणि आपल्या सुनांना घेऊन जहाजात गेला.+ ८ प्रत्येक शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू, तसंच जमिनीवर चालणारे सर्व प्राणी,+ ९ नर आणि मादी असे दोन-दोन प्राणी, देवाने नोहाला आज्ञा दिल्याप्रमाणे जहाजात त्याच्याकडे गेले. १० मग सात दिवसांनंतर पृथ्वीवर जलप्रलय सुरू झाला.

११ नोहा ६०० वर्षांचा झाला त्या वर्षी, दुसऱ्‍या महिन्याच्या १७ व्या दिवशी पृथ्वीवर जलप्रलय आला. त्या दिवशी आकाशातले पाण्याचे सर्व झरे फुटले आणि आकाशातली पाण्याची दारं उघडली.+ १२ मग ४० दिवस आणि ४० रात्री पृथ्वीवर मुसळधार पाऊस पडला. १३ त्याच दिवशी, नोहा आणि त्याची बायको, तसंच शेम, हाम आणि याफेथ+ ही त्याची मुलं आणि त्यांच्या तीन बायकाही जहाजात गेल्या.+ १४ त्यांच्यासोबत सर्व जंगली प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे, सर्व पाळीव प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे आणि आकाशात उडणारे सर्व पक्षी आणि जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे जहाजात गेले. १५ ज्यांच्यात जीवनाचा श्‍वास* होता असे सर्व प्राणी दोन-दोन करून जहाजात नोहाकडे गेले. १६ अशा रितीने, देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व प्रकारच्या प्राण्यांपैकी, नर आणि मादी यांच्या जोड्या जहाजात गेल्या. मग यहोवाने जहाजाचं दार बंद केलं.

१७ पृथ्वीवर ४० दिवस सतत पाऊस पडत राहिला. पाणी वाढत गेलं आणि जमिनीपासून बऱ्‍याच उंचावर, जहाज पाण्यावर तरंगू लागलं. १८ पृथ्वीवर मोठा पूर आला आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं, पण जहाज पाण्यावर तरंगत राहिलं. १९ पृथ्वीवर इतका मोठा पूर आला, की आकाशाखालचे सर्व उंच पर्वत पाण्याखाली गेले.+ २० पाणी पर्वतांच्याही वर १५ हात* चढलं.

२१ अशा रितीने, पृथ्वीवर चालणारे सर्व प्राणी मेले.+ आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, इतर लहान प्राणी* आणि सर्व मानव मरून गेले.+ २२ ज्यांच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्‍वास* होता, असे जमिनीवर राहणारे सर्व जीव मेले.+ २३ अशा प्रकारे, देवाने पृथ्वीवरून मानव, प्राणी, रांगणारे प्राणी, आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू अशा सर्वांचा नाश केला. ते सर्व पृथ्वीवरून नाहीसे झाले;+ फक्‍त नोहा आणि जे जहाजात त्याच्यासोबत होते तेच जिवंत राहिले.+ २४ आणि पुराचं पाणी पृथ्वीवर १५० दिवस तसंच राहिलं.+

८ पण देव नोहाला आणि त्याच्यासोबत जहाजात असलेल्या सर्व जंगली व पाळीव प्राण्यांना विसरला नव्हता.*+ म्हणून देवाने पृथ्वीवर वारा वाहायला लावला आणि पाणी हळूहळू कमी होऊ लागलं. २ आकाशातले पाण्याचे झरे आणि पाण्याची दारं बंद झाली आणि त्यामुळे पाऊस पडायचा थांबला.+ ३ मग हळूहळू पृथ्वीवरचं पाणी कमी होऊ लागलं. १५० दिवसांनी पाणी ओसरलं. ४ सातव्या महिन्याच्या १७ व्या दिवशी, जहाज अरारात पर्वतांवर येऊन टेकलं. ५ दहाव्या महिन्यापर्यंत पाणी सतत ओसरत राहिलं. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, पर्वतांची शिखरं दिसू लागली.+

६ मग ४० दिवसांनंतर, नोहाने जहाजाला जी खिडकी+ बनवली होती, ती त्याने उघडली ७ आणि एक कावळा बाहेर सोडला. पृथ्वीवरचं पाणी सुकेपर्यंत तो इकडेतिकडे उडून परत यायचा.

८ त्यानंतर, जमिनीवरचं पाणी ओसरलं आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्याने एक कबुतर बाहेर सोडलं. ९ पण अजूनही संपूर्ण पृथ्वी पाण्याने झाकलेली असल्यामुळे,+ त्याला कुठेही बसायला* जागा मिळाली नाही. म्हणून ते कबुतर नोहाकडे जहाजात परत आलं. तेव्हा नोहाने हात पुढे करून त्याला जहाजात घेतलं. १० त्याने आणखी सात दिवस वाट पाहिली आणि मग पुन्हा एकदा कबुतराला जहाजाबाहेर सोडलं. ११ संध्याकाळी जेव्हा ते कबुतर परत आलं, तेव्हा नोहाने पाहिलं की त्याच्या चोचीत नुकतंच तोडलेलं जैतुनाचं पान होतं! तेव्हा नोहाला कळलं, की पृथ्वीवरून पाणी ओसरलं आहे.+ १२ त्याने आणखी सात दिवस वाट पाहिली. मग त्याने पुन्हा कबुतराला बाहेर सोडलं, पण या वेळी ते त्याच्याकडे परत आलं नाही.

१३ नोहा ६०१ वर्षांचा झाला त्या वर्षी,+ पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरून पाणी ओसरलं होतं. नोहाने जहाजाचं छत उघडून पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं की जमीन सुकत आहे. १४ दुसऱ्‍या महिन्याच्या २७ व्या दिवशी, पृथ्वी पूर्णपणे कोरडी झाली होती.

१५ मग देव नोहाला म्हणाला: १६ “तू तुझ्या बायकोला, मुलांना आणि सुनांना घेऊन जहाजाबाहेर जा.+ १७ आपल्यासोबत सर्व प्रकारचे प्राणी,+ आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू, तसंच जमिनीवर राहणारे जीवजंतू आणि रांगणारे प्राणी यांना जहाजाबाहेर आण. म्हणजे ते फलदायी होऊन त्यांची संख्या वाढत जाईल आणि ते पृथ्वीला भरून टाकतील.”+

१८ तेव्हा नोहा आपल्या मुलांना,+ बायकोला आणि आपल्या सुनांना घेऊन जहाजाबाहेर गेला. १९ सर्व प्राणी, म्हणजे रांगणारे प्राणी, उडणारे पक्षी व जीवजंतू आणि पृथ्वीवर चालणारे सर्व जीवजंतू हे आपापल्या जातींप्रमाणे जहाजाबाहेर गेले.+ २० मग नोहाने यहोवासाठी एक वेदी बांधली+ आणि सर्व शुद्ध प्राणी आणि सर्व शुद्ध पक्षी+ यांपैकी काही घेऊन त्या वेदीवर होमार्पणं दिली.+ २१ त्या सुवासाने यहोवाला आनंद झाला.* यहोवा आपल्या मनात म्हणाला: “मानवाच्या मनातल्या कल्पना लहानपणापासून वाईटच असतात.+ म्हणून यापुढे मी कधीही मानवामुळे जमिनीला शाप देणार नाही+ आणि पुन्हा कधीही सर्व प्राण्यांचा असा नाश करणार नाही.+ २२ आतापासून पृथ्वीवर पेरणी व कापणी, थंडी व उष्णता, उन्हाळा व हिवाळा आणि दिवस व रात्र हे सर्व व्हायचे थांबणार नाहीत.”+

९ मग देव नोहाला आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद देऊन म्हणाला: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका.+ २ मी पृथ्वीवरच्या प्रत्येक प्राण्याला, आकाशात उडणाऱ्‍या प्रत्येक पक्ष्याला व जीवजंतूला, तसंच जमिनीवर चालणाऱ्‍या सर्व जीवजंतूंना आणि समुद्रातल्या सर्व माशांना तुमच्या हाती देत आहे.*+ त्यांना तुमची भीती आणि धाक राहील. ३ पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी तुमचं अन्‍न होतील.+ जसं मी तुम्हाला अन्‍न म्हणून झाडंझुडपं आणि भाजीपाला दिला होता,+ तसंच सर्व प्राणीही देतो. ४ पण मांसासोबत रक्‍त खाऊ नका,+ कारण रक्‍त म्हणजे जीवन*+ आहे. ५ तसंच, मी तुमच्या रक्‍ताबद्दल* हिशोब मागीन; प्रत्येक प्राण्याकडून आणि माणसाकडून मी हिशोब मागीन; प्रत्येक माणसाकडून त्याच्या भावाच्या जिवाबद्दल मी हिशोब मागीन.+ ६ जो कोणी माणसाचं रक्‍त सांडेल, त्याचंही रक्‍त माणसाकडून सांडलं जाईल,+ कारण मी माणसाला माझ्या प्रतिरूपात निर्माण केलं आहे.+ ७ तुम्ही मात्र फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पृथ्वी भरून टाका.”+

८ मग देव नोहाला आणि त्याच्या मुलांना म्हणाला: ९ “मी तुमच्यासोबत आणि तुमच्या येणाऱ्‍या संततीसोबत करार करतो;+ १० तसंच तुमच्याबरोबर असलेले सर्व प्राणी,* म्हणजेच जे जहाजातून बाहेर आले असे सर्व पशुपक्षी आणि जमिनीवर राहणारे जीवजंतू+ यांच्यासोबत मी करार करतो. ११ मी तुमच्यासोबत असा करार करतो, की पुन्हा कधीही सर्व जिवांचा आणि पृथ्वीचा जलप्रलयामुळे नाश होणार नाही.”+

१२ देव पुढे म्हणाला: “मी तुमच्यासोबत, तसंच तुमच्याबरोबर असलेल्या सर्व जिवांसोबत, येणाऱ्‍या सर्व पिढ्यांसाठी जो करार करत आहे, त्याचं हे चिन्ह असेल. १३ मी ढगांमध्ये माझं मेघधनुष्य ठेवतो; ते माझ्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये असलेल्या कराराचं चिन्ह असेल. १४ जेव्हाही मी पृथ्वीवर ढग आणीन, तेव्हा ढगांमध्ये मेघधनुष्य दिसेल. १५ आणि मी तुमच्यासोबत आणि प्रत्येक जातीच्या सर्व जिवांसोबत जो करार केला आहे, त्याची मला आठवण होईल; आणि पुन्हा कधीही सर्व जिवांचा जलप्रलयाने नाश होणार नाही.+ १६ आणि जेव्हाही ढगांमध्ये मेघधनुष्य येईल, तेव्हा मी ते पाहीन; आणि पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्व जिवांसोबत मी जो कायमचा करार केला आहे, त्याची मला आठवण होईल.”

१७ देव नोहाला पुन्हा म्हणाला: “मी पृथ्वीवरच्या सर्व जिवांसोबत जो करार केला आहे, त्याचं हे चिन्ह आहे.”+

१८ नोहाची जी मुलं जहाजातून बाहेर आली होती, त्यांची नावं शेम, हाम आणि याफेथ+ अशी होती. पुढे हामला एक मुलगा झाला. त्याचं नाव कनान+ होतं. १९ नोहाच्या या तीन मुलांपासूनच पृथ्वीवरचे सर्व लोक आले आणि सगळीकडे पसरले.+

२० पुढे नोहा शेती करू लागला आणि त्याने एक द्राक्षमळा लावला. २१ एकदा तो द्राक्षारस पिऊन नशेत असताना, आपल्या तंबूत उघडा पडला. २२ तेव्हा कनानचा पिता हाम याने आपल्या पित्याची नग्नता पाहिली आणि बाहेर जाऊन आपल्या दोन भावांना त्याबद्दल सांगितलं. २३ मग शेम आणि याफेथ यांनी एक कापड आपल्या खांद्यावर ठेवलं; आणि पाठमोरे चालत जाऊन ते आपल्या पित्याच्या उघड्या अंगावर टाकलं. पाठमोरे असल्यामुळे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता पाहिली नाही.

२४ नोहा शुद्धीवर आला, तेव्हा त्याच्या धाकट्या मुलाने त्याच्यासोबत जे केलं होतं, ते त्याला कळलं. २५ तो म्हणाला:

“कनान शापित आहे.+

तो आपल्या भावांच्या दासांचा दास बनेल.”+

२६ पुढे तो म्हणाला:

“शेमचा देव यहोवा याची स्तुती करा!

कनान शेमचा दास बनेल.+

२७ देव याफेथला भरपूर जमीन देईल,

आणि तो शेमच्या तंबूंमध्ये राहील.

कनान त्याचाही दास बनेल.”

२८ जलप्रलयानंतर नोहा आणखी ३५० वर्षं जगला.+ २९ अशा रितीने, नोहा एकूण ९५० वर्षं जगला आणि मग त्याचा मृत्यू झाला.

१० नोहाची मुलं शेम,+ हाम आणि याफेथ यांचा हा वृत्तान्त आहे.

जलप्रलयानंतर त्यांना मुलं झाली.+ २ याफेथच्या मुलांची नावं गोमर,+ मागोग,+ मादय, यावान, तुबाल,+ मेशेख+ आणि तीरास+ अशी होती.

३ गोमरच्या मुलांची नावं आष्कनाज,+ रीपाथ आणि तोगार्मा+ अशी होती.

४ यावानच्या मुलांची नावं एलीशा,+ तार्शीश,+ कित्तीम+ आणि दोदानीम अशी होती.

५ यांचे वंशज बेटांवर* राहू लागले. पुढे ते आपापली भाषा, कूळ, आणि राष्ट्र यांप्रमाणे वेगवेगळ्या देशांत पसरले.

६ हामच्या मुलांची नावं कूश, मिस्राईम,+ पूट+ आणि कनान+ अशी होती.

७ कूशच्या मुलांची नावं सबा,+ हवीला, साब्ता, रामा+ आणि साब्तका अशी होती.

रामाच्या मुलांची नावं शबा आणि ददान अशी होती.

८ कूशला एक मुलगा झाला. त्याचं नाव निम्रोद होतं. तो पृथ्वीवरचा पहिला शक्‍तिशाली योद्धा होता. ९ तो यहोवाचा विरोध करणारा एक ताकदवान शिकारी बनला. म्हणूनच अशी म्हण पडली: “निम्रोदसारखा यहोवाचा विरोध करणारा ताकदवान शिकारी.” १० सुरुवातीला तो शिनार प्रदेशातल्या+ बाबेल,+ एरक,+ आक्काद आणि कालने या शहरांवर राज्य करत होता. ११ त्या प्रदेशातून तो अश्‍शूरला+ गेला आणि तिथे त्याने निनवे,+ रहोबोथ-ईर आणि कालह ही शहरं बांधली. १२ तसंच निनवे आणि कालह या शहरांच्या मध्ये त्याने रेसन हे शहर बांधलं. हे मोठं शहर आहे.*

१३ मिस्राईमच्या मुलांची नावं लूदीम,+ अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,+ १४ पात्रुसीम,+ कास्लूहीम आणि कफतोरी+ अशी होती. कास्लूहीम याच्यापासून पलिष्टी लोक+ आले.

१५ कनानच्या पहिल्या मुलाचं नाव सीदोन+ होतं. नंतर त्याला हेथ+ झाला. १६ तसंच यबूसी,+ अमोरी,+ गिर्गाशी, १७ हिव्वी,+ आर्की, शीनी, १८ अर्वादी,+ समारी आणि हमाथी+ हे लोकही त्याच्यापासून आले. पुढे, कनानी लोकांची कुळं वेगवेगळ्या ठिकाणी पसरली. १९ कनानी लोकांच्या प्रदेशाची सीमा सीदोनपासून गाझाजवळच्या+ गरारपर्यंत,+ तसंच सदोम, गमोरा,+ आदमा आणि लेशाजवळच्या सबोईमपर्यंत+ होती. २० ही सर्व हामची मुलं होती आणि ही त्यांची कुळं, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रं होती.

२१ शेमलाही मुलं झाली. शेम आपला सर्वात मोठा भाऊ याफेथ याच्या पाठचा होता* आणि एबरच्या+ सर्व मुलांचा पूर्वज होता. २२ शेमच्या मुलांची नावं एलाम,+ अश्‍शूर,+ अर्पक्षद,+ लूद आणि अराम+ अशी होती.

२३ अरामच्या मुलांची नावं ऊस, हूल, गेतेर आणि मश अशी होती.

२४ अर्पक्षदच्या मुलाचं नाव शेलह+ आणि शेलहच्या मुलाचं नाव एबर होतं.

२५ एबरला दोन मुलं झाली. एकाचं नाव पेलेग*+ होतं, कारण त्याच्या काळात पृथ्वीची* वाटणी झाली. त्याच्या भावाचं नाव योकतान+ होतं.

२६ योकतानच्या मुलांची नावं अलमोदाद, शेलेफ, हसरमावेथ, येरह,+ २७ हदोराम, ऊजाल, दिक्ला, २८ ओबाल, अबीमाएल, शबा, २९ ओफीर,+ हवीला आणि योबाब अशी होती; ही सर्व योकतानची मुलं होती.

३० त्यांचं राहण्याचं ठिकाण मेशापासून पूर्वेकडच्या सफारच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत होतं.

३१ ही सर्व शेमची मुलं होती आणि ही त्यांची कुळं, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रं होती.+

३२ नोहाच्या मुलांच्या वंशावळीप्रमाणे आणि राष्ट्रांप्रमाणे ही त्यांची कुळं होती. त्यांच्यापासूनच जलप्रलयानंतर पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रं झाली.+

११ तेव्हा सबंध पृथ्वीवर एकच भाषा आणि एकच बोली होती. २ लोक पूर्वेकडे प्रवास करू लागले तेव्हा त्यांना शिनार प्रदेशात+ एक मैदान दिसलं आणि ते तिथे राहू लागले. ३ मग ते एकमेकांना म्हणाले: “चला! आपण विटा बनवू आणि त्या आगीत भाजू.” म्हणून त्यांनी दगडांऐवजी विटा वापरल्या आणि चुना म्हणून डांबर वापरलं. ४ ते म्हणाले: “चला! आपण आपल्यासाठी एक शहर आणि एक बुरूज बांधू. त्या बुरुजाचं शिखर आकाशापर्यंत जाईल आणि आपलं नाव मोठं होईल आणि सबंध पृथ्वीवर आपली पांगापांग होणार नाही.”*+

५ मग यहोवाने खाली जाऊन मानवांनी बांधलेलं शहर आणि बुरूज पाहिला. ६ तेव्हा यहोवा म्हणाला: “पाहा! हे सर्व लोक एक आहेत आणि त्यांची भाषाही एक आहे+ आणि त्यांनी हे काय करायला सुरुवात केली आहे! आता त्यांच्या मनात आलेली कोणतीही गोष्ट करणं त्यांना अशक्य होणार नाही. ७ म्हणून चला! आपण+ खाली जाऊन त्यांच्या भाषेत गोंधळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांची भाषा कळणार नाही.” ८ मग यहोवाने सबंध पृथ्वीवर त्यांची पांगापांग केली+ आणि हळूहळू त्यांनी ते शहर बांधण्याचं सोडून दिलं. ९ म्हणूनच त्या शहराचं नाव बाबेल*+ पडलं, कारण तिथे यहोवाने पृथ्वीवरच्या सर्व लोकांच्या भाषेत गोंधळ केला आणि यहोवाने त्यांची सबंध पृथ्वीवर पांगापांग केली.

१० हा शेमचा+ वृत्तान्त आहे.

जलप्रलयाच्या दोन वर्षांनंतर, शेम १०० वर्षांचा असताना त्याला अर्पक्षद+ झाला. ११ अर्पक्षदच्या जन्मानंतर शेम ५०० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.+

१२ अर्पक्षद ३५ वर्षांचा झाल्यावर त्याला शेलह+ झाला. १३ शेलहच्या जन्मानंतर अर्पक्षद ४०३ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.

१४ शेलह ३० वर्षांचा झाल्यावर त्याला एबर+ झाला. १५ एबरच्या जन्मानंतर शेलह ४०३ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.

१६ एबर ३४ वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग+ झाला. १७ पेलेगच्या जन्मानंतर एबर ४३० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.

१८ पेलेग ३० वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ+ झाला. १९ रऊच्या जन्मानंतर पेलेग २०९ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.

२० रऊ ३२ वर्षांचा झाल्यावर त्याला सरुग झाला. २१ सरुगच्या जन्मानंतर रऊ २०७ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.

२२ सरुग ३० वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला. २३ नाहोरच्या जन्मानंतर सरुग २०० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.

२४ नाहोर २९ वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह+ झाला. २५ तेरहच्या जन्मानंतर नाहोर ११९ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.

२६ तेरह ७० वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम,+ नाहोर+ आणि हारान ही मुलं झाली.

२७ हा तेरहचा वृत्तान्त आहे.

तेरहला अब्राम, नाहोर आणि हारान ही मुलं झाली; आणि हारानला लोट+ झाला. २८ हारानचा पिता तेरह जिवंत असतानाच, आपल्या जन्माच्या ठिकाणी म्हणजे खास्द्यांच्या+ ऊर+ देशात हारानचा मृत्यू झाला. २९ अब्राम आणि नाहोर यांची लग्नं झाली. अब्रामच्या बायकोचं नाव साराय+ आणि नाहोरच्या बायकोचं नाव मिल्का+ होतं. मिल्का ही हारानची मुलगी होती आणि त्याला मिल्का आणि इस्का या मुली होत्या. ३० साराय वांझ होती;+ तिला मूलबाळ नव्हतं.

३१ नंतर, तेरह आपला मुलगा अब्राम आणि आपला नातू लोट,+ जो हारानचा मुलगा होता, तसंच आपली सून साराय यांना घेऊन, खास्द्यांच्या ऊर देशातून कनान+ देशात जायला निघाला. मग ते हारानला+ पोहोचले आणि तिथे राहू लागले. ३२ तेरह २०५ वर्षं जगला आणि हारानमध्ये त्याचा मृत्यू झाला.

१२ यहोवा अब्रामला म्हणाला: “तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या वडिलांचं घर सोडून, मी दाखवीन त्या देशात जा.+ २ मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनवीन. मी तुझं नाव मोठं करीन आणि तू इतरांसाठी आशीर्वाद ठरशील.+ ३ जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन.+ आणि पृथ्वीवरच्या सगळ्या कुटुंबांना तुझ्यामुळे आशीर्वाद मिळेल.”*+

४ मग यहोवाने सांगितल्याप्रमाणे अब्राम तिथून निघाला आणि लोटही त्याच्यासोबत निघाला. अब्रामने हारान सोडलं+ तेव्हा तो ७५ वर्षांचा होता. ५ अब्राम आपली बायको साराय,+ आपल्या भावाचा मुलगा लोट,+ तसंच त्यांनी जमवलेली मालमत्ता+ आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेले दासदासी यांना घेऊन कनान देशात+ जायला निघाला. ते कनान देशात पोहोचले, ६ तेव्हा अब्राम त्या देशातून प्रवास करत शेखेम+ इथे पोहोचला. हे ठिकाण मोरेच्या मोठ्या झाडांजवळ+ होतं. त्या काळात कनानी लोक त्या देशात राहत होते. ७ मग यहोवा अब्रामसमोर प्रकट होऊन म्हणाला: “मी तुझ्या संततीला*+ हा देश देईन.”+ त्यानंतर अब्रामने त्या जागेवर यहोवासाठी एक वेदी बांधली. तिथेच तो अब्रामला प्रकट झाला होता. ८ नंतर तो तिथून बेथेलच्या+ पूर्वेकडे असलेल्या डोंगराळ भागात गेला. तिथे त्याने तंबू ठोकला. त्याच्या पश्‍चिमेकडे बेथेल, तर पूर्वेकडे आय+ नावाचं ठिकाण होतं. त्याने तिथे यहोवासाठी वेदी बांधली+ आणि तो यहोवाच्या नावाने प्रार्थना करू लागला.+ ९ काही काळानंतर अब्रामने तिथून तळ हलवला आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करत नेगेबच्या+ दिशेने गेला.

१० त्या काळी देशात खूप मोठा दुष्काळ पडला+ म्हणून अब्राम काही काळासाठी* इजिप्तमध्ये* राहायला गेला.+ ११ इजिप्तच्या जवळ असताना अब्राम सारायला म्हणाला: “हे बघ, तू दिसायला खूप सुंदर आहेस.+ १२ पण जेव्हा इजिप्तचे लोक तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ‘ही तर याची बायको आहे.’ म्हणून ते मला मारून टाकतील पण तुला जिवंत ठेवतील. १३ त्यामुळे त्यांना सांग, की तू माझी बहीण आहेस. म्हणजे ते माझ्याशी चांगलं वागतील आणि माझा जीव वाचेल.”+

१४ अब्राम इजिप्तमध्ये पोहोचताच तिथल्या लोकांनी पाहिलं, की साराय दिसायला खूप सुंदर आहे. १५ फारोच्या राजकुमारांनीही तिला पाहिलं आणि ते फारोजवळ तिची स्तुती करू लागले. तेव्हा तिला फारोच्या घरी नेण्यात आलं. १६ तिच्यामुळे फारो अब्रामशी चांगला वागला आणि त्याने अब्रामला मेंढरं, गुरंढोरं, गाढवं, उंट आणि दासदासी दिल्या.+ १७ मग यहोवाने सारायमुळे फारो आणि त्याच्या घराण्यावर मोठ्या पीडा आणल्या. १८ तेव्हा फारो अब्रामला बोलावून म्हणाला: “तू माझ्यासोबत असं का केलंस? ती तुझी बायको आहे ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस? १९ ‘ती माझी बहीण आहे’+ असं का बोललास? तुझ्या बायकोला घेऊन तू इथून निघून जा.” २० मग फारोने आपल्या सेवकांना आज्ञा दिली आणि त्यांनी अब्रामला आणि त्याच्या बायकोला पाठवून दिलं. अब्रामकडे जे काही होतं, त्यासोबत फारोने त्याला तिथून पाठवून दिलं.+

१३ मग अब्राम इजिप्तमधून त्याच्या बायकोला आणि त्याच्याकडे जे काही होतं ते सर्व घेऊन नेगेबला+ गेला. लोटही त्याच्यासोबत होता. २ अब्रामकडे खूप सोनं, चांदी आणि गुरंढोरं होती.+ ३ तो नेगेबपासून जागोजागी मुक्काम करत बेथेलच्या दिशेने निघाला. तो बेथेल आणि आयच्या+ मध्ये येऊन पोहोचला. त्याच ठिकाणी त्याने आधी तंबू ठोकला होता ४ आणि तिथेच त्याने वेदीही बांधली होती. त्या ठिकाणी त्याने यहोवाच्या नावाने प्रार्थना केली.

५ अब्रामसोबत प्रवास करणाऱ्‍या लोटकडेही मेंढरं, गुरंढोरं आणि तंबू होते. ६ म्हणून त्यांना एकाच ठिकाणी राहण्यासाठी जमीन कमी पडू लागली; त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती, की त्यांना एकत्र राहणं शक्य नव्हतं. ७ यामुळे अब्रामच्या आणि लोटच्या मेंढपाळांमध्ये भांडण झालं. (त्या काळात कनानी आणि परिज्जी लोक त्या प्रदेशात राहत होते.)+ ८ तेव्हा अब्राम लोटला+ म्हणाला: “हे बघ, आपण दोघं भाऊ आहोत. म्हणून तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये आणि तुझ्या मेंढपाळांमध्ये व माझ्या मेंढपाळांमध्ये भांडण व्हायला नको. ९ तेव्हा तू माझ्यापासून वेगळा हो आणि या प्रदेशाचा हवा तो भाग निवड. जर तू डावीकडे गेलास, तर मी उजवीकडे जाईन. आणि जर तू उजवीकडे गेलास, तर मी डावीकडे जाईन.” १० तेव्हा लोटने आपली नजर सगळीकडे फिरवली आणि पाहिलं, की यार्देनच्या+ आसपासच्या प्रदेशात भरपूर पाणी होतं. (यहोवाने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधी असं होतं.) हा प्रदेश सोअरपर्यंत,+ यहोवाच्या बागेसारखा*+ आणि इजिप्त देशासारखा होता. ११ तेव्हा लोटने यार्देनच्या आसपासचा प्रदेश स्वतःसाठी निवडला आणि आपला तंबू पूर्वेकडे हलवला. अशा रितीने अब्राम आणि लोट एकमेकांपासून वेगळे झाले. १२ अब्राम कनान देशात राहायचा, पण लोट यार्देन प्रदेशातल्या शहरांमध्ये राहायचा.+ शेवटी लोटने सदोमजवळ आपला तंबू ठोकला. १३ सदोमचे लोक दुष्ट होते आणि यहोवाविरुद्ध घोर पापं करायचे.+

१४ लोट अब्रामपासून वेगळा झाल्यावर यहोवा अब्रामला म्हणाला: “तू ज्या ठिकाणी आहेस तिथून आपली नजर सगळीकडे फिरव आणि उत्तरेपासून दक्षिणेकडे व पूर्वेपासून पश्‍चिमेकडे बघ. १५ कारण जो देश तू पाहत आहेस, तो मी तुला आणि तुझ्या संततीला* कायमचा देईन.+ १६ आणि मी तुझी संतती* पृथ्वीवरच्या धुळीच्या कणांइतकी करीन. जर कोणाला पृथ्वीवरच्या धुळीचे कण मोजता आले, तर त्यांना तुझी संततीही* मोजता येईल.+ १७ तेव्हा ऊठ आणि जा, या संपूर्ण देशात फीर, कारण मी तो तुला देणार आहे.” १८ मग अब्राम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तंबूंमध्ये राहिला. काही काळाने तो हेब्रोनमध्ये+ मम्रे+ इथल्या मोठ्या झाडांजवळ राहू लागला. तिथे त्याने यहोवासाठी एक वेदी बांधली.+

१४ शिनारचा+ राजा अम्राफेल, एल्लासारचा राजा अर्योक, एलामचा+ राजा कदारलागोमर+ आणि गोयीमचा राजा तिदाल यांच्या काळात, २ त्यांनी सदोमचा+ राजा बेरा, गमोराचा+ राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमचा+ राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअरचा राजा यांच्याशी युद्ध केलं. ३ हे सर्व आपापली सैन्यं घेऊन सिद्दीमच्या खोऱ्‍यात,*+ म्हणजेच मृत समुद्राजवळ*+ आले.

४ या पाच राजांनी १२ वर्षं कदारलागोमरची सेवा केली होती, पण १३ व्या वर्षी त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं. ५ म्हणून १४ व्या वर्षी कदारलागोमर आणि त्याच्यासोबतच्या राजांनी अष्टरोथ-कर्णईम इथे रेफाई लोकांना, हाम इथे जूजी लोकांना, शावे-किर्याथाईम इथे एमी लोकांना,+ ६ आणि सेईर+ डोंगरापासून रानाजवळ असलेल्या एल्‌-पारानपर्यंत होरी लोकांना+ हरवलं. ७ मग ते परत फिरले आणि एन्‌-मिशपात म्हणजे कादेश+ इथे आले आणि त्यांनी अमालेकी+ लोकांचा सगळा प्रदेश जिंकला. तसंच, हससोन-तामार+ इथे राहणाऱ्‍या अमोरी+ लोकांचाही सगळा प्रदेश त्यांनी जिंकला.

८ तेव्हा सदोमचा राजा आणि त्याच्यासोबत गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमचा राजा आणि बेला म्हणजे सोअरचा राजा हे त्यांच्याविरुद्ध चालून गेले. त्यांनी सिद्दीमच्या खोऱ्‍यात* आपलं सैन्यदल उभं केलं. ९ आणि एलामचा राजा कदारलागोमर, गोयीमचा राजा तिदाल, शिनारचा राजा अम्राफेल आणि एल्लासारचा+ राजा अर्योक यांच्याविरुद्ध ते लढले. अशा रितीने हे चार राजे त्या पाच राजांशी लढले. १० सिद्दीमच्या खोऱ्‍यात* डांबराने भरलेले बरेच खड्डे होते. जेव्हा सदोम आणि गमोराच्या राजांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते त्या खड्ड्यांमध्ये पडले. जे वाचले ते डोंगराळ भागात पळून गेले. ११ तेव्हा विजयी झालेल्या राजांनी सदोम आणि गमोराची सगळी मालमत्ता लुटली आणि त्यांचं सर्व अन्‍न घेऊन ते निघून गेले.+ १२ तसंच, ते सदोममध्ये+ राहत असलेल्या अब्रामच्या पुतण्याला, म्हणजे लोटलाही घेऊन गेले. त्यांनी त्याची मालमत्ताही लुटून नेली.

१३ त्यानंतर युद्धातून वाचलेल्या एका माणसाने येऊन अब्रामला* हे सर्व सांगितलं. त्या वेळी अब्राम अष्कोल आणि आनेर यांचा भाऊ+ अमोरी मम्रे, याच्या मोठ्या झाडांजवळ तंबूंमध्ये राहत होता.+ ते त्याचे मित्र होते. १४ अब्रामला कळलं की त्याच्या पुतण्याला*+ बंदी बनवून नेण्यात आलं आहे. तेव्हा त्याने आपल्या घराण्यात जन्म झालेल्या, लढाई करू शकणाऱ्‍या ३१८ सेवकांना सोबत घेतलं आणि दानपर्यंत हल्ला करणाऱ्‍यांचा पाठलाग केला.+ १५ रात्रीच्या वेळी त्याने आपल्या सैन्याचे वेगवेगळे गट केले. मग त्याने आणि त्याच्या सेवकांनी शत्रूंवर हल्ला करून त्यांना हरवलं. त्यांनी त्यांचा दिमिष्कच्या उत्तरेकडे असलेल्या होबापर्यंत पाठलाग केला. १६ शत्रूंनी लुटलेली सर्व मालमत्ता त्याने परत मिळवली. तसंच त्याने लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया आणि इतर लोकांनाही सोडवलं.

१७ कदारलागोमर आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर राजांना हरवून अब्राम परत आला, तेव्हा सदोमचा राजा त्याला शावेच्या खोऱ्‍यात,* म्हणजे राजाच्या खोऱ्‍यात+ भेटायला गेला. १८ तेव्हा शालेमचा राजा+ मलकीसदेक+ भाकरी आणि द्राक्षारस घेऊन आला; तो सर्वोच्च देवाचा याजक होता.+

१९ तो अब्रामला आशीर्वाद देऊन म्हणाला:

“आकाश आणि पृथ्वी बनवणाऱ्‍या

सर्वोच्च देवाने अब्रामला आशीर्वाद द्यावा;

२० आणि तुझ्या शत्रूंना तुझ्या हाती देणाऱ्‍या,

सर्वोच्च देवाची स्तुती व्हावी!”

मग अब्रामने त्याला सर्व गोष्टींतला दहावा भाग दिला.+

२१ तेव्हा सदोमचा राजा अब्रामला म्हणाला: “तू सर्व मालमत्ता तुझ्यासाठी ठेव, फक्‍त ही माणसं मला दे.” २२ पण अब्राम सदोमच्या राजाला म्हणाला: “मी हात वर करून, आकाश आणि पृथ्वी बनवणारा सर्वोच्च देव यहोवा याची शपथ घेतो, २३ की मी तुझ्याकडून काहीही घेणार नाही. एक साधा धागा नाही किंवा जोड्याचे बंदही नाही. नाहीतर तू म्हणशील, की ‘अब्रामला मी श्रीमंत केलं.’ २४ या तरुणांनी जे खाल्लं तेच मी तुझ्याकडून घेतलं आहे. पण माझ्यासोबत आलेल्या आनेर, अष्कोल आणि मम्रे+ यांना त्यांचा वाटा घेऊ दे.”

१५ मग यहोवा एका दृष्टान्तात अब्रामला म्हणाला: “अब्राम घाबरू नकोस.+ मी तुझी ढाल आहे.+ मी तुला मोठा आशीर्वाद देईन.”+ २ अब्राम म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, मला तर मूलबाळ नाही. तो आशीर्वाद माझ्या काय कामाचा? दिमिष्कचा अलियेजर+ माझ्या घराचा वारस होईल.” ३ अब्राम पुढे म्हणाला: “तू मला संतती* दिली नाहीस,+ त्यामुळे माझ्या घराण्यातला सेवक माझा वारस होईल.” ४ पण यहोवाने त्याला उत्तर दिलं, “हा माणूस तुझा वारस होणार नाही, तर तुझा स्वतःचा मुलगा* तुझा वारस बनेल.”+

५ मग देव त्याला बाहेर घेऊन आला आणि म्हणाला: “आपली नजर वर करून आकाशाकडे बघ आणि तारे मोजता आले तर मोज.” मग देव म्हणाला: “अशाच प्रकारे तुझी संततीही* अगणित होईल.”+ ६ तेव्हा अब्रामने यहोवावर विश्‍वास ठेवला+ आणि त्यामुळे त्याने अब्रामला नीतिमान ठरवलं.*+ ७ देव पुढे म्हणाला: “हा देश तुला देण्यासाठी, खास्द्यांच्या ऊर देशातून तुला बाहेर आणणारा मी यहोवा आहे.”+ ८ त्यावर अब्राम म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, मला हा देश मिळेल हे कशावरून?” ९ तेव्हा देव त्याला म्हणाला: “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड,* तीन वर्षांची बकरी, तीन वर्षांचा मेंढा, एक पारवा आणि कबुतराचं एक लहान पिल्लू घेऊन ये.” १० मग त्याने या सर्वांना घेतलं आणि त्यांचे कापून दोन भाग केले. त्यानंतर त्याने दोन्ही भागांना समोरासमोर ठेवलं.* पण त्याने पक्ष्यांना कापलं नाही. ११ तेव्हा मांस खाणारे पक्षी त्या मेलेल्या प्राण्यांजवळ येऊ लागले, पण अब्राम त्यांना हाकलत राहिला.

१२ सूर्य मावळण्याची वेळ झाली, तेव्हा अब्रामला गाढ झोप लागली आणि त्याने पाहिलं, की त्याच्या चारही बाजूला भयानक, काळाकुट्ट अंधार आहे. १३ तेव्हा देव अब्रामला म्हणाला: “ही गोष्ट पक्की आहे, की तुझी संतती* एका परक्या देशात विदेशी म्हणून राहील. तिथले लोक त्यांना गुलाम बनवतील आणि ४०० वर्षं त्यांचा छळ करतील.+ १४ पण त्यांना गुलाम बनवणाऱ्‍या राष्ट्राचा मी न्याय करीन+ आणि त्यानंतर ते तिथून खूप संपत्ती घेऊन निघतील.+ १५ पण तू शांतीने तुझ्या पूर्वजांकडे जाशील; तू बरीच वर्षं जगल्यावर तुला पुरलं जाईल.+ १६ पण तुझ्या वंशजांची चौथी पिढी इथे परत येईल,+ कारण अमोरी लोकांना त्यांच्या पापांची शिक्षा देण्याची वेळ अजून आलेली नाही.”+

१७ सूर्य मावळल्यावर सगळीकडे अंधार पसरला, तेव्हा धूर निघत असलेली एक भट्टी प्रकट झाली आणि एक जळती मशाल त्या मेलेल्या प्राण्यांच्या तुकड्यांमधून गेली. १८ त्या दिवशी यहोवाने अब्रामसोबत एक करार केला+ आणि तो म्हणाला: “मी इजिप्तच्या नदीपासून ते महानदीपर्यंतचा, म्हणजेच फरात नदीपर्यंतचा+ हा संपूर्ण देश तुझ्या संततीला* देईन.+ १९ केनी,+ कनिज्जी, कदमोनी, २० हित्ती,+ परिज्जी,+ रेफाई,+ २१ अमोरी, कनानी, गिर्गाशी आणि यबूसी+ या लोकांचा देश मी तुझ्या संततीला देईन.”

१६ अब्रामची बायको साराय हिला मूलबाळ नव्हतं.+ पण तिची एक दासी होती. तिचं नाव हागार+ होतं आणि ती इजिप्तची होती. २ साराय अब्रामला म्हणाली: “पाहा, यहोवाने मला मुलं होऊ दिली नाहीत. म्हणून मी तुम्हाला विनंती करते, की माझ्या दासीचा स्वीकार करा.* कदाचित तिच्यामुळे मला मुलं मिळतील.”+ तेव्हा अब्रामने सारायचं म्हणणं ऐकलं. ३ कनान देशात राहून अब्रामला दहा वर्षं झाल्यावर, सारायने आपली इजिप्तची दासी हागार अब्रामला बायको म्हणून दिली. ४ तेव्हा त्याने हागारशी संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिली. आपण गरोदर आहोत हे तिला कळलं, तेव्हा ती आपल्या मालकिणीला तुच्छ समजू लागली.

५ म्हणून साराय अब्रामला म्हणाली: “तुमच्यामुळेच मला अशी वाईट वागणूक मिळत आहे. मी स्वतःहून माझी दासी तुम्हाला दिली.* पण ती गरोदर आहे हे कळताच ती मला तुच्छ समजू लागली. आता यहोवाने तुमच्यामाझ्यात न्याय करावा.” ६ तेव्हा अब्राम सारायला म्हणाला: “हे बघ, तू तिची मालकीण आहेस. तुला जे योग्य वाटेल ते कर.” मग साराय हागारला छळू लागली आणि ती सारायपासून पळून गेली.

७ नंतर यहोवाच्या स्वर्गदूताला ती रानातल्या एका झऱ्‍याजवळ दिसली. तो झरा शूरला+ जाणाऱ्‍या वाटेवर होता. ८ तेव्हा स्वर्गदूत तिला म्हणाला: “सारायची दासी हागार, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” यावर ती म्हणाली: “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.” ९ मग यहोवाचा स्वर्गदूत तिला म्हणाला: “तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि नम्रपणे तिच्या अधीन राहा.” १० पुढे यहोवाचा दूत म्हणाला: “मी तुझ्या संततीला* इतकं वाढवीन, की कोणीही तिला मोजू शकणार नाही.”+ ११ यहोवाचा दूत असंही म्हणाला: “पाहा, तू गरोदर आहेस आणि तुला एक मुलगा होईल. तू त्याचं नाव इश्‍माएल* ठेव, कारण यहोवाने तुझा छळ पाहिला आहे.* १२ तो रानातल्या गाढवासारखा* असेल. तो सर्वांच्या विरोधात आणि सर्व त्याच्या विरोधात असतील. तो आपल्या भावांच्या समोर वस्ती करेल.”*

१३ मग आपल्याशी बोलत असलेल्या यहोवाचं नाव घेऊन तिने प्रार्थना केली: “तू सर्व पाहणारा देव आहेस.”+ कारण ती म्हणाली: “ज्याची दृष्टी माझ्यावर आहे, त्याला मी खरंच या ठिकाणी पाहिलं आहे का?” १४ म्हणून त्या विहिरीचं नाव बैर-लहाय-रोई* असं पडलं. (ही विहीर कादेश आणि बेरेदच्या मध्ये आहे.) १५ अशा रितीने अब्रामला हागारपासून एक मुलगा झाला आणि अब्रामने त्याचं नाव इश्‍माएल+ ठेवलं. १६ अब्रामला हागारपासून इश्‍माएल झाला तेव्हा अब्राम ८६ वर्षांचा होता.

१७ अब्राम ९९ वर्षांचा असताना यहोवा त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाला: “मी सर्वशक्‍तिमान देव आहे. तू माझ्यासमोर योग्य मार्गाने चाल आणि निर्दोष राहा. २ मी तुझ्यात आणि माझ्यात असलेला माझा करार पूर्ण करीन+ आणि तुझी संतती खूप खूप वाढवीन.”+

३ तेव्हा अब्रामने जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं. मग देव त्याला पुढे म्हणाला: ४ “पाहा! मी तुझ्यासोबत करार केला आहे.+ तू नक्कीच पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनशील.+ ५ यापुढे तुझं नाव अब्राम* नसून, अब्राहाम* असेल. कारण, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनवीन. ६ मी तुला खूप खूप फलदायी करीन आणि तुझ्यापासून पुष्कळ राष्ट्रं आणि राजे येतील.+

७ मी तुझ्यासोबत आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीच्या* सर्व पिढ्यांसोबत केलेला माझा करार पूर्ण करीन.+ हा कायमचा करार आहे आणि मी तुझा आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीचा* देव होईन. ८ ज्या देशात तू विदेशी म्हणून राहिलास,+ तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीला,* कायमचा वारसा म्हणून देईन आणि मी त्यांचा देव होईन.”+

९ देव अब्राहामला पुढे म्हणाला: “तुला आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीच्या* सर्व पिढ्यांना माझा करार पाळावा लागेल. १० हा तुझ्यात व माझ्यात असलेला माझा करार आहे. तुला व तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीला* हा करार पाळावा लागेल: तुमच्यामध्ये असलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता* झाली पाहिजे.+ ११ तुम्ही आपली सुंता करून घेतली पाहिजे आणि हे तुमच्यात व माझ्यात असलेल्या कराराचं चिन्ह असेल.+ १२ तुमच्या येणाऱ्‍या सर्व पिढ्यांमध्ये, तुमच्या घरात जन्मलेल्या आठ दिवसांच्या प्रत्येक पुरुषाची सुंता झाली पाहिजे.+ तुझ्या संततीपैकी* नसलेल्या, तर विदेश्‍याकडून पैसे देऊन विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाचीही सुंता झाली पाहिजे. १३ तुझ्या घरात जन्मलेल्या आणि तुझ्या पैशांनी विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता झाली पाहिजे.+ तुमच्या शरीरावर असलेलं हे चिन्ह दाखवेल, की मी तुमच्यासोबत कायमचा करार केला आहे. १४ जर एखाद्या पुरुषाने सुंता केली नाही, तर त्याला* ठार मारलं जावं कारण त्याने माझा करार मोडला आहे.”

१५ मग देव अब्राहामला म्हणाला: “तू आपल्या बायकोला साराय*+ म्हणू नकोस, कारण यापुढे तिचं नाव सारा* असेल. १६ मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून तुला एक मुलगा होईल.+ मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून राष्ट्रं आणि राजे येतील.” १७ यावर अब्राहामने जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं आणि तो हसून मनातल्या मनात म्हणाला:+ “१०० वर्षांच्या माणसाला मूल होईल का, आणि ९० वर्षांची सारा खरंच मुलाला जन्म देईल का?”+

१८ म्हणून अब्राहाम खऱ्‍या देवाला म्हणाला: “कृपा करून इश्‍माएलला आशीर्वाद दे!”+ १९ तेव्हा देव म्हणाला: “तुझी बायको सारा हिच्यापासून तुला नक्कीच एक मुलगा होईल आणि तू त्याचं नाव इसहाक*+ ठेव. मी त्याच्यासोबत केलेला माझा करार पूर्ण करीन. हा त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर येणाऱ्‍या त्याच्या संततीसाठी* कायमचा करार असेल.+ २० इश्‍माएलबद्दल तुझी विनंती मी ऐकली आहे. पाहा! मी त्याला आशीर्वाद देईन आणि त्याला फलदायी करीन आणि त्याची संतती खूप खूप वाढवीन. त्याच्यापासून १२ प्रधान येतील आणि मी त्याला एक मोठं राष्ट्र बनवीन.+ २१ पण मी माझा करार इसहाकशी करीन.+ पुढच्या वर्षी याच वेळी सारा इसहाकला जन्म देईल.”+

२२ अब्राहामशी बोलून झाल्यावर देव तिथून निघून वर गेला. २३ मग देवाने सांगितल्याप्रमाणे, अब्राहामने त्याचा मुलगा इश्‍माएल आणि त्याच्या घरात जन्मलेले सर्व पुरुष, तसंच त्याने पैसे देऊन विकत घेतलेले सर्व दास यांची त्याच दिवशी सुंता केली. अशा रितीने, त्याने आपल्या घरातल्या प्रत्येक पुरुषाची सुंता केली.+ २४ अब्राहामची सुंता झाली+ तेव्हा तो ९९ वर्षांचा होता. २५ त्याचा मुलगा इश्‍माएल याची सुंता झाली तेव्हा तो १३ वर्षांचा होता.+ २६ त्याच दिवशी, अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्‍माएल यांची सुंता झाली. २७ त्याच्या घरातल्या सर्व पुरुषांची, म्हणजेच त्याच्या घरात जन्मलेल्या आणि त्याने विदेश्‍यांकडून पैशांनी विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाचीही त्याच्यासोबत सुंता झाली.

१८ काही काळाने, अब्राहाम दुपारच्या वेळी मम्रेच्या मोठ्या झाडांजवळ,+ आपल्या तंबूच्या दाराशी बसला असताना यहोवा+ त्याच्यासमोर प्रकट झाला. २ त्याने नजर वर करून पाहिलं, तेव्हा त्याला काही अंतरावर तीन माणसं उभी असलेली दिसली.+ त्यांना पाहिल्यावर तो आपल्या तंबूच्या दाराजवळून धावत त्यांना भेटायला गेला आणि त्याने जमिनीपर्यंत वाकून त्यांना नमस्कार केला. ३ मग तो म्हणाला: “हे यहोवा, जर तू माझा स्वीकार केला असशील, तर कृपा करून आपल्या या दासाजवळ थोडा वेळ थांब. ४ मी थोडं पाणी आणून तुमचे पाय धुतो,+ मग तुम्ही झाडाखाली विश्रांती घ्या. ५ तुम्ही तुमच्या दासाकडे आला आहात, तर मी तुमच्यासाठी थोडी भाकर आणतो म्हणजे तुमचा थकवा दूर होईल. मग तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला जा.” तेव्हा ते म्हणाले: “ठीक आहे, तू म्हणतोस तसं कर.”

६ मग अब्राहाम घाईघाईने तंबूत साराकडे जाऊन म्हणाला: “पटकन तीन मापं* चांगलं पीठ घे आणि ते मळून भाकरी बनव.” ७ त्यानंतर अब्राहाम पळत आपल्या कळपाजवळ गेला आणि त्याने त्यातून एक चांगलं कोवळं वासरू निवडलं. मग त्याने ते आपल्या सेवकाकडे दिलं आणि सेवक घाईघाईने ते बनवायच्या तयारीला लागला. ८ मग त्याने लोणी, दूध आणि तयार केलेल्या वासराचं मांस घेतलं आणि त्यांना वाढलं. ते जेवत असताना तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.+

९ त्यांनी त्याला विचारलं: “तुझी बायको सारा कुठे आहे?”+ तो म्हणाला: “ती तंबूत आहे.” १० तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाला: “मी पुढच्या वर्षी याच वेळी तुझ्याकडे नक्की येईन आणि तेव्हा साराला एक मुलगा झालेला असेल.”+ सारा त्या माणसाच्या मागे, तंबूच्या दाराजवळ हे बोलणं ऐकत होती. ११ अब्राहाम आणि सारा यांचं खूप वय झालं होतं.+ साराचं मूलबाळ होण्याचं वय निघून गेलं होतं.+ १२ तेव्हा सारा स्वतःशीच हसून म्हणाली: “मी तर म्हातारी झाली आहे आणि माझ्या प्रभूचंही वय झालं आहे, मग मला खरंच हे सुख मिळेल का?”+ १३ तेव्हा यहोवा अब्राहामला म्हणाला: “सारा का हसली आणि ‘मला म्हातारपणी खरंच मूल होईल का’ असं का म्हणाली? १४ यहोवाला कोणतीही गोष्ट अशक्य आहे का?+ मी पुढच्या वर्षी याच वेळी तुझ्याकडे येईन आणि तेव्हा साराला एक मुलगा झालेला असेल.” १५ पण साराने ही गोष्ट मान्य केली नाही कारण ती घाबरली होती. ती म्हणाली, “मी नाही हसले!” तेव्हा तो म्हणाला: “नाही! तू हसलीस.”

१६ मग ती माणसं जायला निघाली आणि त्यांनी खाली सदोमच्या+ दिशेने पाहिलं. अब्राहामही त्यांना सोडायला त्यांच्यासोबत निघाला. १७ यहोवा म्हणाला: “मी जे करणार आहे ते मी अब्राहामपासून लपवून ठेवणार नाही.+ १८ कारण त्याच्यापासून नक्की एक मोठं आणि शक्‍तिशाली राष्ट्र येईल आणि अब्राहाममुळे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.*+ १९ मी त्याला चांगलं ओळखतो आणि मला खातरी आहे, की तो त्याच्या मुलांना आणि वंशजांना, योग्य आणि न्यायीपणे वागून यहोवाच्या मार्गाने चालण्याची आज्ञा देईल.+ तेव्हा मी यहोवा, अब्राहामविषयी दिलेलं माझं वचन पूर्ण करीन.”

२० मग यहोवा म्हणाला: “सदोम आणि गमोराविरुद्ध आक्रोश फार वाढला आहे+ आणि त्यांचं पाप खूप भयंकर आहे.+ २१ त्यांच्याविरुद्धचा आक्रोश खरा आहे का, आणि ते खरोखर इतकी वाईट कामं करत आहेत का, हे पाहण्यासाठी मी खाली जाईन. कारण मला हे जाणून घ्यायचं आहे.”+

२२ तेव्हा ती माणसं तिथून सदोमच्या दिशेने निघून गेली, पण यहोवा+ अब्राहामसोबत थांबला. २३ मग अब्राहाम जवळ येऊन म्हणाला: “तू खरंच दुष्टांसोबत नीतिमान लोकांचाही नाश करशील का?+ २४ समज, शहरात ५० नीतिमान लोक असतील, तर तू त्यांचाही नाश करशील का? त्या ५० नीतिमान लोकांसाठी तू त्या शहराला क्षमा करणार नाहीस का? २५ तू दुष्टासोबत नीतिमान माणसाचाही नाश करशील आणि नीतिमान व दुष्ट यांना सारखाच मोबदला देशील,+ ही कल्पनाही करवत नाही. खरंच, असा विचारही करवत नाही!+ सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही का?”+ २६ तेव्हा यहोवा म्हणाला: “मला सदोममध्ये ५० नीतिमान माणसं जरी सापडली, तरी मी त्यांच्यासाठी संपूर्ण शहराला क्षमा करीन.” २७ अब्राहाम पुन्हा म्हणाला: “माफ कर, मी धूळ आणि राख असूनही यहोवाशी बोलण्याचं धाडस करत आहे. २८ पण समज त्या ५० नीतिमान लोकांत पाच कमी असतील, तर त्या पाच लोकांमुळे तू संपूर्ण शहराचा नाश करशील का?” यावर तो म्हणाला: “मला तिथे ४५ जरी सापडले, तरी मी त्या शहराचा नाश करणार नाही.”+

२९ पण अब्राहाम पुन्हा त्याला म्हणाला: “समज फक्‍त ४० असतील तर?” त्याने उत्तर दिलं: “त्या ४० लोकांसाठी मी शहराचा नाश करणार नाही.” ३० अब्राहाम पुन्हा म्हणाला: “यहोवा कृपा करून रागावू नकोस,+ मला बोलू दे. जर फक्‍त ३० लोक सापडले तर?” त्याने उत्तर दिलं: “त्या ३० लोकांसाठी मी नाश करणार नाही.” ३१ तरी तो पुढे म्हणाला: “माफ कर, मी यहोवाशी बोलण्याचं धाडस करत आहे. पण जर फक्‍त २० सापडले तर?” तो म्हणाला: “त्या २० लोकांसाठी मी नाश करणार नाही.” ३२ शेवटी तो म्हणाला: “यहोवा कृपा करून रागावू नकोस, मला आणखी एकदाच बोलू दे. जर फक्‍त दहा लोक सापडले तर?” त्याने उत्तर दिलं: “मी त्या दहा लोकांसाठी नाश करणार नाही.” ३३ अब्राहामशी बोलून झाल्यावर यहोवा तिथून निघून गेला+ आणि अब्राहाम आपल्या घरी परत गेला.

१९ संध्याकाळपर्यंत ते दोन स्वर्गदूत सदोमला पोहोचले, तेव्हा लोट शहराच्या फाटकाजवळ बसला होता. लोटने त्यांना पाहिलं, तेव्हा तो त्यांना भेटायला उठला आणि त्याने जमिनीवर डोकं टेकवून त्यांना नमस्कार केला.+ २ तो त्यांना म्हणाला: “माझ्या प्रभूंनो, कृपा करून आज रात्री या दासाच्या घरी येऊन मुक्काम करा आणि मला तुमचे पाय धुऊ द्या. हवं तर पहाटेच तुम्ही आपल्या प्रवासाला निघू शकता.” यावर ते म्हणाले: “नाही, आम्ही चौकातच रात्र काढू.” ३ पण त्याने इतका आग्रह केला की शेवटी ते त्याच्या घरी गेले. मग त्याने त्यांच्यासाठी मेजवानी केली आणि बेखमीर* भाकरी बनवल्या आणि ते जेवले.

४ ते झोपणार, इतक्यात सदोम शहराच्या माणसांनी त्या घराला घेरलं. तरुण मुलांपासून म्हाताऱ्‍यांपर्यंत शहरातले सर्व पुरुष तिथे जमले. ५ ते लोटला हाका मारून म्हणू लागले: “तुझ्या घरी मुक्कामाला आलेली माणसं कुठे आहेत? त्यांना बाहेर आण. आम्हाला त्यांच्याशी संभोग करायचा आहे.”*+

६ मग लोट त्यांच्याकडे बाहेर गेला आणि त्याने आपल्यामागे दार लावून घेतलं. ७ तो म्हणाला: “माझ्या भावांनो, कृपा करून असा दुष्टपणा करू नका. ८ बघा, मला दोन मुली आहेत आणि त्या अजून कुमारी आहेत. मी त्यांना बाहेर तुमच्याकडे आणतो. तुम्हाला त्यांच्यासोबत जे योग्य वाटेल ते करा. पण कृपा करून या माणसांना काही करू नका, कारण त्यांनी माझ्या घरी आश्रय घेतला आहे.”*+ ९ तेव्हा ते म्हणाले: “हो बाजूला!” मग ते म्हणाले: “हा परदेशी इथे राहायला आला आणि याची हिंमत तर पाहा, आपला न्याय करायला निघालाय! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षाही वाईट हाल करू.” मग ते लोटला धक्काबुक्की करू लागले आणि दार तोडायला पुढे आले. १० तेव्हा घरातल्या त्या दोन माणसांनी हात बाहेर काढून लोटला घरात घेतलं आणि दार बंद केलं. ११ मग घराच्या दाराजवळ जमलेल्या लहानमोठ्या सर्व माणसांना त्यांनी आंधळं करून टाकलं आणि त्यामुळे ती माणसं दार शोधताशोधता थकून गेली.

१२ तेव्हा ती दोन माणसं लोटला म्हणाली: “इथे तुझे कोणी नातेवाईक आहेत का? तुझे जावई, मुलं, मुली आणि शहरातल्या तुझ्या सर्व माणसांना इथून बाहेर काढ! १३ आम्ही या शहराचा नाश करणार आहोत, कारण यहोवासमोर यांच्याविरुद्धची तक्रार खूप वाढली आहे,+ आणि म्हणून यहोवाने आम्हाला या शहराचा नाश करायला पाठवलं आहे.” १४ तेव्हा लोट बाहेर गेला आणि त्याच्या मुलींची लग्नं ज्यांच्याशी ठरली होती, त्या आपल्या जावयांना म्हणू लागला: “चला लवकर! या शहरातून बाहेर निघा कारण यहोवा या शहराचा नाश करणार आहे!” पण त्याच्या जावयांना वाटलं की तो मस्करी करत आहे.+

१५ पहाट होत आली तेव्हा स्वर्गदूत घाई करत लोटला म्हणाले: “चल लवकर! आपल्या बायकोला आणि दोन मुलींना घेऊन इथून निघ, म्हणजे या दुष्ट शहरासोबत तुझा नाश होणार नाही!”+ १६ तो उशीर करू लागला, तेव्हा यहोवाची त्याच्यावर दया असल्यामुळे+ त्या माणसांनी त्याचा, त्याच्या बायकोचा आणि मुलींचा हात धरून त्यांना शहराबाहेर आणून उभं केलं.+ १७ ते शहराच्या बाहेर येताच स्वर्गदूतांपैकी एक जण म्हणाला: “आपला जीव वाचवण्यासाठी पळून जा. मागे वळून पाहू नका+ आणि या भागात कुठेही थांबू नका!+ डोंगरांकडे पळून जा म्हणजे तुमचा नाश होणार नाही.”

१८ पण लोट त्यांना म्हणाला: “यहोवा, कृपा करून मला तिथे जायला सांगू नकोस. १९ तू आपल्या या दासावर कृपा केली आहेस आणि मला जिवंत ठेवून खूप दया* दाखवली आहेस.+ पण मला डोंगरांकडे पळून जाता येणार नाही, कारण तिथे पोहोचण्याआधीच माझ्यावर संकट येऊन मी मरून जाईन अशी मला भीती वाटते.+ २० जवळच एक नगर आहे, मी तिथे पळून जाऊ शकतो. ते नगर लहान आहे. मी तिथे गेलो तर चालेल का? त्या लहानशा नगरात गेलो तर माझा जीव वाचेल.” २१ तेव्हा तो त्याला म्हणाला: “ठीक आहे. मी तुझी विनंती मान्य करतो+ आणि तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही.+ २२ चल लवकर! इथून निघ. कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मी काही करू शकत नाही.”+ म्हणून त्या नगराचं नाव सोअर*+ पडलं.

२३ लोट सोअरला पोहोचला तोपर्यंत सकाळ झाली होती. २४ मग यहोवाने सदोम आणि गमोरा शहरांवर गंधकाचा आणि आगीचा वर्षाव केला. तो वर्षाव आकाशातून, यहोवाकडून झाला.+ २५ अशा रितीने त्याने त्या शहरांचा, खरंतर त्या संपूर्ण भागाचा आणि तिथल्या सगळ्या लोकांचा आणि झाडांचाही नाश केला.+ २६ लोटची बायको त्याच्या मागे चालत होती. तिने मागे वळून पाहिलं, तेव्हा ती मिठाचा खांब बनली.+

२७ अब्राहाम पहाटेच उठून, ज्या ठिकाणी तो यहोवासमोर उभा होता तिथे गेला.+ २८ त्याने खाली सदोम आणि गमोराच्या दिशेने पाहिलं, तेव्हा त्या संपूर्ण भागाचं भयानक दृश्‍य त्याला दिसलं! भट्टीतून निघतो तसा धूर तिथून निघत होता.+ २९ अशा प्रकारे देवाने त्या शहरांचा नाश केला, तेव्हा त्याने तिथे राहणाऱ्‍या लोटला बाहेर पाठवून+ अब्राहामची आठवण ठेवली.

३० नंतर लोट आपल्या दोन मुलींना घेऊन डोंगराळ भागात राहायला गेला,+ कारण त्याला सोअरमध्ये+ राहायची भीती वाटत होती. तो आपल्या मुलींसोबत एका गुहेत राहू लागला. ३१ नंतर त्याची मोठी मुलगी आपल्या धाकट्या बहिणीला म्हणाली: “आपल्या वडिलांचं वय झालं आहे आणि जगाच्या रीतीप्रमाणे आपल्याशी लग्न करण्यासाठी कोणीही पुरुष नाही. ३२ म्हणून चल, आपण आपल्या वडिलांना द्राक्षारस पाजू आणि त्यांचा वंश टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्याशी संबंध ठेवू.”

३३ म्हणून त्या रात्री त्यांनी आपल्या वडिलांना खूप द्राक्षारस पाजला; मग मोठी मुलगी आपल्या वडिलांजवळ जाऊन झोपली. पण ती केव्हा झोपली आणि केव्हा उठून गेली हे त्याला कळलं नाही. ३४ दुसऱ्‍या दिवशी मोठी मुलगी धाकटीला म्हणाली: “मी काल रात्री आपल्या वडिलांजवळ झोपले होते. आज रात्रीही आपण त्यांना द्राक्षारस पाजू. मग तू त्यांच्याजवळ जाऊन झोप, म्हणजे आपल्या वडिलांचा वंश टिकून राहील.” ३५ म्हणून त्या रात्रीही त्यांनी आपल्या वडिलांना खूप द्राक्षारस पाजला; मग धाकटी मुलगी आपल्या वडिलांजवळ जाऊन झोपली. पण ती केव्हा झोपली आणि केव्हा उठून गेली हे त्याला कळलं नाही. ३६ अशा रितीने, लोटच्या दोन्ही मुली आपल्या वडिलांपासून गरोदर राहिल्या. ३७ मोठ्या मुलीला एक मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव मवाब+ ठेवलं. तो आजच्या मवाबी लोकांचा मूळपुरुष आहे.+ ३८ धाकटीलाही मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव बेनअम्मी ठेवलं. तो आजच्या अम्मोनी लोकांचा+ मूळपुरुष आहे.

२० अब्राहामने आपला मुक्काम हलवला+ आणि तो नेगेब देशात गेला. तो कादेश+ आणि शूर+ यांच्या मध्ये असलेल्या एका ठिकाणी राहू लागला.* अब्राहाम गरारमध्ये+ राहत होता तेव्हा, २ त्याने पुन्हा आपली बायको सारा हिच्याबद्दल म्हटलं: “ही माझी बहीण आहे.”+ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख याने आपल्या माणसांना पाठवून साराला आपल्याकडे आणलं.+ ३ नंतर, देव अबीमलेखला रात्री स्वप्नात येऊन म्हणाला: “तू या स्त्रीला आणून स्वतःवर मृत्यू ओढवून घेतला आहेस.+ कारण तिचं लग्न झालेलं आहे आणि ती दुसऱ्‍या माणसाची बायको आहे.”+ ४ पण अबीमलेख अजून तिच्या जवळ गेला नव्हता.* म्हणून तो म्हणाला: “यहोवा, तू खरंच एका निर्दोष* राष्ट्राचा नाश करणार आहेस का? ५ ‘ती माझी बहीण आहे’ असं तोच म्हणाला नव्हता का, आणि ‘तो माझा भाऊ आहे’ असं तीही म्हणाली नव्हती का? माझं मन साफ आहे आणि मी निर्दोष आहे.” ६ तेव्हा स्वप्नात खरा देव त्याला म्हणाला: “तू हे साफ मनाने केलंस हे मला माहीत आहे. म्हणूनच मी तुला माझ्याविरुद्ध पाप करण्यापासून अडवलं आणि तिला हात लावू दिला नाही. ७ आता त्या माणसाची बायको त्याला परत कर, कारण तो एक संदेष्टा आहे.+ तो तुझ्यासाठी याचना करेल+ आणि तू जिवंत राहशील. पण जर तू तिला परत केलं नाहीस, तर लक्षात ठेव, तू आणि तुझे सर्व लोक नक्की मरतील.”

८ अबीमलेखने पहाटेच उठून आपल्या सगळ्या सेवकांना बोलावलं आणि त्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या. हे ऐकून ते खूप घाबरले. ९ तेव्हा अबीमलेख अब्राहामला बोलावून म्हणाला: “तू आमच्यासोबत असं का केलंस? मी तुझ्याविरुद्ध कोणतं पाप केलं होतं, की तू माझ्यावर आणि माझ्या राज्यावर इतकं मोठं संकट आणणार होतास? तू जे केलंस ते योग्य नाही.” १० अबीमलेख अब्राहामला पुढे म्हणाला: “तू कोणत्या उद्देशाने हे केलंस?”+ ११ अब्राहाम म्हणाला: “मी विचार केला, की ‘इथे कोणालाही देवाची भीती नाही आणि माझ्या बायकोमुळे हे लोक मला मारून टाकतील.’+ १२ आणि तसं पाहिलं तर ती माझी बहीणच आहे, कारण ती माझ्या वडिलांची मुलगी आहे, पण माझ्या आईची नाही आणि मी तिच्याशी लग्न केलं.+ १३ त्यामुळे देवाच्या सांगण्यावरून जेव्हा मी माझ्या वडिलांचं घर सोडून+ ठिकठिकाणी प्रवास करू लागलो, तेव्हा मी तिला म्हणालो: ‘आपण जिथेजिथे जाऊ तिथेतिथे, “हा माझा भाऊ आहे”+ असं सांगून तू माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखव.’”

१४ मग अबीमलेखने अब्राहामला त्याची बायको परत केली. तसंच, त्याने त्याला मेंढरं, गुरंढोरं आणि दास व दासीही दिल्या. १५ शिवाय, तो अब्राहामला म्हणाला: “माझा सगळा देश तुझ्यासमोर आहे. तुला वाटेल तिथे तू राहू शकतोस.” १६ मग तो साराला म्हणाला: “बघ, मी तुझ्या भावाला+ १,००० चांदीचे तुकडे देत आहे. तुझ्यासोबत असलेल्यांसाठी आणि इतर सर्व लोकांसाठी, तू निर्दोष असल्याचं हे चिन्ह आहे. तू निष्कलंक आहेस.” १७ तेव्हा अब्राहामने खऱ्‍या देवाकडे याचना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची बायको व त्याच्या दासींना बरं केलं आणि त्यांना मुलं होऊ लागली. १८ कारण यहोवाने अब्राहामची बायको सारा+ हिच्यामुळे, अबीमलेखच्या घरातल्या सर्व स्त्रियांना वांझ केलं होतं.*

२१ यहोवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने साराची आठवण केली आणि साराविषयी दिलेलं वचन यहोवाने पूर्ण केलं.+ २ सारा गरोदर राहिली+ आणि अब्राहामच्या म्हातारपणी, देवाने त्याला वचन दिलेल्या वेळी,+ तिने अब्राहामच्या मुलाला जन्म दिला. ३ अब्राहामने सारापासून झालेल्या आपल्या मुलाचं नाव इसहाक+ ठेवलं. ४ देवाच्या आज्ञेप्रमाणे,+ अब्राहामने आपला मुलगा इसहाक आठ दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता केली. ५ इसहाक झाला तेव्हा अब्राहाम १०० वर्षांचा होता. ६ तेव्हा सारा म्हणाली: “देवाने मला हसवलं आहे; जो कोणी हे ऐकेल तोही माझ्यासोबत हसेल.”* ७ मग ती म्हणाली: “‘सारा मुलांना दूध पाजेल,’ असं अब्राहामला कोणी म्हणालं असतं का? तरीही मी त्याच्या म्हातारपणी त्याच्या मुलाची आई झाले आहे.”

८ इसहाक मोठा झाला. त्याचं दूध तोडण्याच्या दिवशी अब्राहामने मोठी मेजवानी दिली. ९ पण इजिप्तच्या हागारला+ अब्राहामपासून जो मुलगा झाला होता, तो इसहाकला चिडवत आहे+ असं साराने पाहिलं. १० म्हणून ती अब्राहामला म्हणाली: “या दासीला आणि तिच्या मुलाला इथून हाकलून द्या. या दासीचा मुलगा माझ्या मुलासोबत, इसहाकसोबत वारस होणार नाही!”+ ११ पण आपल्या मुलाबद्दल साराचं हे बोलणं अब्राहामला मुळीच आवडलं नाही.+ १२ तेव्हा देव अब्राहामला म्हणाला: “तुझ्या मुलाबद्दल आणि दासीबद्दल सारा जे बोलली त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तिचं* ऐक, कारण जे इसहाकपासून येतील त्यांना तुझी संतती* म्हटलं जाईल.+ १३ आणि या दासीच्या मुलापासूनही+ मी एक राष्ट्र बनवीन,+ कारण तोही तुझा मुलगा* आहे.”

१४ मग अब्राहामने पहाटे उठून हागारला भाकर आणि चामड्याच्या पिशवीत पाणी भरून दिलं. त्याने ते तिच्या खांद्यावर ठेवलं आणि तिला तिच्या मुलासोबत पाठवून दिलं.+ तेव्हा ती निघून गेली आणि बैर-शेबाच्या+ रानात भटकत राहिली. १५ शेवटी त्या चामड्याच्या पिशवीतलं पाणी संपलं, तेव्हा तिने आपल्या मुलाला झुडपांच्या खाली ठेवलं. १६ मग ती काही अंतरावर जाऊन बसली, कारण ती म्हणाली: “मी माझ्या मुलाला मरताना पाहू शकत नाही.” असं म्हणून ती तिथेच बसून मोठ्याने रडू लागली.

१७ तेव्हा देवाने त्या मुलाचा आवाज ऐकला+ आणि देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारला विचारलं:+ “हागार, काय झालं? घाबरू नकोस, कारण देवाने तुझ्या मुलाचा आवाज ऐकला आहे. १८ ऊठ आणि आपल्या मुलाला उभं राहायला मदत कर आणि त्याला आपल्या हाताचा आधार दे, कारण मी त्याला एक मोठं राष्ट्र बनवीन.”+ १९ तेव्हा देवाने तिचे डोळे उघडले आणि तिला एक विहीर दिसली. मग तिने जाऊन चामड्याच्या पिशवीत पाणी भरलं आणि ते आपल्या मुलाला प्यायला दिलं. २० तो मुलगा+ मोठा होत गेला आणि देव त्याच्यासोबत होता. तो रानात राहू लागला आणि तिरंदाज* झाला. २१ तो पारानच्या रानात+ राहू लागला आणि त्याच्या आईने इजिप्तच्या एका मुलीशी त्याचं लग्न करून दिलं.

२२ त्याच काळात अबीमलेख आणि त्याचा सेनापती पीकोल अब्राहामला म्हणाले: “तू जे काही करतोस त्यात देव तुझ्यासोबत आहे.+ २३ म्हणून आता तू इथे देवाची अशी शपथ घे, की तू माझ्याशी, माझ्या मुलांशी आणि माझ्या वंशजांशी कधीही बेइमानी करणार नाहीस; आणि जसं मी तुला एकनिष्ठ प्रेम दाखवलं आहे, तसंच एकनिष्ठ प्रेम तूही मला आणि ज्या देशात तू राहत आहेस त्या देशाच्या लोकांना दाखवशील.”+ २४ तेव्हा अब्राहाम म्हणाला: “मी शपथ घेतो.”

२५ पण अबीमलेखच्या सेवकांनी जबरदस्तीने बळकावलेल्या विहिरीबद्दल+ अब्राहामने त्याच्याकडे तक्रार केली. २६ अबीमलेखने उत्तर दिलं: “मी याबद्दल आजच ऐकतोय. हे कोणी केलं मला माहीत नाही; तूही मला काही सांगितलं नाहीस.” २७ तेव्हा अब्राहामने अबीमलेखला मेंढरं आणि गुरंढोरं दिली आणि त्या दोघांनी एकमेकांशी करार केला. २८ अब्राहामने कळपातून सात मेंढ्या वेगळ्या केल्या, २९ तेव्हा अबीमलेखने अब्राहामला विचारलं: “तू या सात मेंढ्या वेगळ्या का काढल्यास?” ३० तेव्हा अब्राहाम म्हणाला: “ही विहीर मी खोदली आहे, याची साक्ष म्हणून या सात मेंढ्या तू माझ्याकडून घे.” ३१ यावरून त्याने त्या ठिकाणाचं नाव बैर-शेबा* असं ठेवलं,+ कारण तिथे त्या दोघांनी शपथ घेतली होती. ३२ अशा रितीने, त्यांनी बैर-शेबा इथे एकमेकांशी करार केला.+ त्यानंतर अबीमलेख आणि त्याचा सेनापती, पीकोल हे पलिष्ट्यांच्या+ देशात निघून गेले. ३३ मग अब्राहामने बैर-शेबा इथे एशेलचं* झाड लावलं आणि तिथे त्याने सर्वकाळाचा देव+ यहोवा, याचं नाव घेऊन प्रार्थना केली.+ ३४ अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात बराच काळ* राहिला.*+

२२ यानंतर खऱ्‍या देवाने अब्राहामची परीक्षा घेतली.+ तो त्याला म्हणाला: “अब्राहाम!” तेव्हा त्याने उत्तर दिलं: “मी इथे आहे!” २ देव त्याला म्हणाला: “कृपा करून तुझ्या एकुलत्या एका मुलाला, ज्याच्यावर तुझं इतकं प्रेम आहे,+ त्या इसहाकला+ घेऊन मोरिया+ देशात जा. तिथे मी सांगेन त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर.”

३ म्हणून अब्राहामने पहाटे उठून गाढवावर खोगीर घातलं आणि दोन सेवकांना आणि आपला मुलगा इसहाक याला आपल्यासोबत घेतलं. त्याने होमार्पणासाठी लाकूड तोडलं आणि मग तो खऱ्‍या देवाने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघाला. ४ तिसऱ्‍या दिवशी, अब्राहामने समोर पाहिलं तेव्हा त्याला दुरून ते ठिकाण दिसलं. ५ तेव्हा अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला: “तुम्ही इथेच गाढवाजवळ थांबा. मी आणि इसहाक तिकडे जाऊन देवाची उपासना करून परत येतो.”

६ मग अब्राहामने होमार्पणाचं लाकूड घेतलं आणि इसहाकच्या पाठीवर ठेवलं. त्याने हातात आग आणि सुरा घेतला आणि ते दोघं चालत निघाले. ७ तेव्हा इसहाक अब्राहामला म्हणाला: “बाबा!” त्याने उत्तर दिलं: “बोल माझ्या बाळा!” इसहाक म्हणाला: “आपल्याजवळ आग आणि लाकडं तर आहेत, पण होमार्पणासाठी मेंढरू कुठे आहे?” ८ यावर अब्राहाम म्हणाला: “बाळा, होमार्पणासाठी मेंढरू+ देवच पुरवेल.” मग ते दोघं पुढे चालत गेले.

९ शेवटी, ते खऱ्‍या देवाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. अब्राहामने तिथे एक वेदी बांधून त्यावर लाकडं ठेवली. त्यानंतर त्याने आपला मुलगा इसहाक याचे हातपाय बांधून त्याला वेदीवरच्या लाकडांवर ठेवलं.+ १० मग अब्राहामने आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा उचलला,+ ११ तेवढ्यात यहोवाचा दूत त्याला आकाशातून हाक मारून म्हणाला: “अब्राहाम, अब्राहाम!” त्यावर तो म्हणाला: “मी इथे आहे!” १२ तेव्हा स्वर्गदूत म्हणाला: “त्या मुलाला मारू नकोस, त्याला काहीही करू नकोस. तू देवाला भिऊन वागणारा आहेस, हे आता मला कळलं आहे. कारण तू तुझ्या एकुलत्या एका मुलालाही, मला अर्पण करायला मागेपुढे पाहिलं नाहीस.”+ १३ मग अब्राहामने समोर पाहिलं, तेव्हा जवळच एका झुडपात त्याला एक मेंढा दिसला. त्याची शिंगं त्या झुडपात अडकली होती. अब्राहामने जाऊन तो मेंढा घेतला आणि आपल्या मुलाऐवजी त्याचं होमार्पण केलं. १४ अब्राहामने त्या ठिकाणाचं नाव यहोवा-यिरे* ठेवलं. म्हणून अजूनही असं म्हटलं जातं: “यहोवाच्या डोंगरावर ते पुरवलं जाईल.”+

१५ मग यहोवाच्या दूताने अब्राहामला दुसऱ्‍यांदा आकाशातून हाक मारली. १६ तो म्हणाला: “यहोवा म्हणतो: ‘मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो,+ की तू हे जे केलंस, म्हणजे आपल्या एकुलत्या एका मुलालाही मला अर्पण करायला मागेपुढे पाहिलं नाहीस,+ १७ म्हणून मी नक्की तुला आशीर्वाद देईन आणि तुझी संतती* आकाशातल्या ताऱ्‍यांसारखी आणि समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी वाढवीन.+ तुझी संतती* आपल्या शत्रूंच्या शहरांचा* ताबा घेईल.+ १८ आणि तुझ्या संततीमुळे*+ पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल,* कारण तू माझं ऐकलं आहेस.’”+

१९ त्यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत गेला आणि ते तिथून बैर-शेबाला+ आले. अब्राहाम पुढेही बैर-शेबामध्येच राहिला.

२० काही काळानंतर, अब्राहामला असं सांगण्यात आलं: “मिल्का हिलासुद्धा तुझा भाऊ नाहोर+ याच्यापासून मुलं झाली आहेत: २१ मोठ्याचं नाव ऊस, त्याचा भाऊ बूज, अरामचा पिता कमुवेल, २२ केसद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल.”+ २३ बथुवेलला रिबका+ झाली. मिल्काला अब्राहामचा भाऊ नाहोर याच्यापासून झालेली ही आठ मुलं. २४ त्याची उपपत्नी रेऊमा हिला झालेल्या मुलांची नावं अशी: तेबाह, गहाम, तहश आणि माका.

२३ सारा एकूण १२७ वर्षं जगली.+ २ मग कनान+ देशात किर्याथ-अर्बा+ म्हणजेच हेब्रोन+ इथे तिचा मृत्यू झाला. तेव्हा अब्राहाम सारासाठी शोक करून रडू लागला. ३ त्यानंतर तो आपल्या बायकोच्या मृतदेहासमोरून उठला आणि हेथच्या+ मुलांना म्हणाला: ४ “मी तुमच्यामध्ये राहायला आलेला एक विदेशी आहे.+ मला माझ्या बायकोला पुरण्यासाठी तुमच्या जमिनीतून थोडी जागा द्या.” ५ यावर हेथची मुलं त्याला म्हणाली: ६ “हे प्रभू, आमचं ऐक. तू आमच्यामध्ये देवाचा प्रधान* आहेस.+ आमच्या पुरण्याच्या जागांमधून तुला पाहिजे त्या ठिकाणी तुझ्या बायकोला तू पुरू शकतोस. आमच्यापैकी कोणाचीही पुरण्याची जागा तू वापरू शकतोस, तुला कोणीही अडवणार नाही.”

७ तेव्हा अब्राहाम उठला आणि त्या देशाच्या लोकांसमोर म्हणजे हेथच्या+ मुलांसमोर वाकून ८ त्यांना म्हणाला: “माझ्या बायकोला पुरण्यासाठी तुम्ही मला जमीन द्यायला तयार असाल, तर माझं ऐका आणि सोहरचा मुलगा एफ्रोन याला ९ त्याच्या मालकीची मकपेला नावाची गुहा मला विकण्याची विनंती करा. ती गुहा त्याच्या शेताच्या कडेला आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्याने माझ्याकडून तिच्या पूर्ण किंमतीइतकी चांदी घेऊन ती गुहा मला विकावी,+ म्हणजे मला माझ्या बायकोला पुरण्यासाठी जागा मिळेल.”+

१० हेथच्या मुलांसोबत एफ्रोनही तिथे बसला होता. म्हणून हित्ती एफ्रोन याने हेथच्या मुलांसमोर आणि त्याच्या शहराच्या फाटकातून येणाऱ्‍या सर्वांसमोर+ अब्राहामला असं उत्तर दिलं: ११ “नाही प्रभू माझं ऐक, माझ्या लोकांच्या साक्षीने मी माझं शेत आणि त्यात असलेली गुहा, दोन्ही तुला देतो. तू आपल्या बायकोला तिथे पूर.” १२ तेव्हा अब्राहाम त्या लोकांसमोर खाली वाकला १३ आणि त्या सर्वांसमोर एफ्रोनला म्हणाला: “कृपा करून माझं ऐक. तुझ्या शेतासाठी मी तुला चांदीची पूर्ण किंमत देतो. ती घे, म्हणजे मला माझ्या बायकोला तिथे पुरता येईल.”

१४ मग एफ्रोन अब्राहामला म्हणाला: १५ “हे प्रभू, माझं ऐक. त्या जागेची किंमत ४०० चांदीचे शेकेल* इतकी आहे. पण ते इतकं महत्त्वाचं नाही. तू जाऊन आपल्या बायकोला पूर.” १६ अब्राहामने एफ्रोनचं म्हणणं ऐकलं आणि हेथच्या मुलांसमोर एफ्रोनने सांगितली होती तितकी चांदी त्याला मोजून दिली. व्यापाऱ्‍यांनी ठरवलेल्या वजनाप्रमाणे त्याने ४०० चांदीचे शेकेल* त्याला दिले.+ १७ अशा रितीने मम्रेच्या समोर मकपेला इथे असलेलं एफ्रोनचं शेत; म्हणजेच ते शेत, त्यात असलेली गुहा, आणि शेताच्या हद्दीत असलेली सगळी झाडं, ही ठरल्याप्रमाणे १८ अब्राहामच्या मालकीची झाली. हेथच्या मुलांच्या आणि त्याच्या शहराच्या फाटकातून येणाऱ्‍या सगळ्यांच्या साक्षीने हा व्यवहार झाला. १९ त्यानंतर अब्राहामने आपली बायको सारा हिला मकपेलाच्या शेतात असलेल्या गुहेत पुरलं. हे शेत कनान देशातल्या मम्रेच्या, म्हणजेच हेब्रोनच्या समोर होतं. २० अशा रितीने हेथच्या मुलांनी ते शेत आणि त्यात असलेली गुहा, पुरण्यासाठी जागा म्हणून अब्राहामच्या ताब्यात दिली.+

२४ आता अब्राहाम म्हातारा झाला होता, त्याचं बरंच वय झालं होतं आणि यहोवाने अब्राहामला सर्व बाबतींत आशीर्वाद दिला होता.+ २ अब्राहाम आपल्या घरातल्या सर्व गोष्टींवर देखरेख करणाऱ्‍या सगळ्यात जुन्या सेवकाला+ म्हणाला: “कृपा करून, तुझा हात माझ्या मांडीखाली ठेव ३ आणि आकाश व पृथ्वीचा देव यहोवा याची शपथ घे, की ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींमधून तू माझ्या मुलासाठी बायको शोधणार नाहीस.+ ४ त्याऐवजी तू माझ्या देशात, माझ्या नातेवाइकांकडे जा+ आणि माझा मुलगा इसहाक याच्यासाठी मुलगी शोधून आण.”

५ पण तो सेवक त्याला म्हणाला: “जर ती मुलगी माझ्यासोबत या देशात यायला तयार नसेल तर? मग मी तुमच्या मुलाला, तुम्ही जिथून आला आहात त्या देशात नेऊ का?”+ ६ यावर अब्राहाम त्याला म्हणाला: “माझ्या मुलाला तिथे मुळीच नेऊ नकोस.+ ७ स्वर्गाचा देव यहोवा, ज्याने मला माझ्या वडिलांच्या घरातून आणि माझ्या नातेवाइकांच्या देशातून बाहेर आणलं+ आणि ज्याने माझ्याशी बोलून मला असं वचन दिलं,+ की ‘मी तुझ्या संततीला*+ हा देश देईन,’+ तो तुझ्यापुढे एका दूताला पाठवेल+ आणि तू नक्कीच त्या देशातून माझ्या मुलासाठी एक मुलगी शोधून आणशील.+ ८ जर ती मुलगी या देशात यायला तयार झाली नाही, तर तू या शपथेतून मोकळा होशील. पण तू माझ्या मुलाला तिथे घेऊन जाऊ नकोस.” ९ तेव्हा त्या सेवकाने आपला मालक अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवला आणि या गोष्टीबद्दल शपथ घेतली.+

१० मग तो सेवक आपल्या मालकाचे दहा उंट घेऊन निघाला. त्याने आपल्या मालकाकडून बऱ्‍याच प्रकारच्या भेटवस्तूही सोबत घेतल्या. तिथून प्रवास करत तो मेसोपटेम्याला, नाहोरच्या नगराकडे जायला निघाला. ११ त्या नगराजवळ आल्यावर त्याने एका विहिरीजवळ आपल्या उंटांना बसवलं. तेव्हा संध्याकाळची वेळ होती आणि सहसा या वेळी बायका पाणी भरायला निघायच्या. १२ मग तो म्हणाला: “यहोवा, माझा मालक अब्राहाम याच्या देवा, कृपा करून आज मला यश दे आणि माझा मालक अब्राहाम याच्यावरचं तुझं एकनिष्ठ प्रेम दाखव. १३ मी या विहिरीजवळ उभा आहे आणि गावातल्या मुली पाणी भरायला येत आहेत. १४ असं होऊ दे, की ज्या मुलीला मी म्हणेन, ‘कृपा करून, मला तुझ्या घागरीतून थोडं पाणी प्यायला दे’ आणि जी मला म्हणेल, ‘हो घ्या ना आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,’ तीच मुलगी तू आपला सेवक इसहाक याच्यासाठी निवडलेली मुलगी असू दे; यावरून मला कळेल की माझ्या मालकावर तुझं एकनिष्ठ प्रेम आहे.”

१५ त्याचं बोलणं संपण्याआधीच, रिबका आपल्या खांद्यावर पाण्याची घागर घेऊन तिथे आली. ती अब्राहामचा भाऊ नाहोर+ याला, त्याची बायको मिल्का+ हिच्यापासून झालेल्या बथुवेलची+ मुलगी होती. १६ ती खूप सुंदर होती. ती कुमारी होती, कोणत्याही पुरुषाने आजपर्यंत तिच्याशी संबंध ठेवले नव्हते. ती खाली विहिरीजवळ गेली आणि आपली घागर भरून पुन्हा वर आली. १७ तेव्हा अब्राहामचा सेवक धावत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला: “कृपा करून तुझ्या घागरीतून मला घोटभर पाणी प्यायला दे.” १८ तेव्हा ती म्हणाली: “घ्या प्रभू, प्या.” असं म्हणून तिने लगेच आपली घागर खांद्यावरून उतरवली आणि त्याला पाणी दिलं. १९ त्याला पाणी दिल्यावर ती म्हणाली: “मी तुमच्या उंटांसाठीही हवं तितकं पाणी काढते.” २० तेव्हा तिने लगेच आपली घागर हौदात रिकामी केली आणि मग ती पुन्हापुन्हा विहिरीकडे जाऊन त्याच्या सगळ्या उंटांसाठी पाणी काढत राहिली. २१ हे सर्व घडत असताना, तो सेवक तिच्याकडे आश्‍चर्याने पाहत होता आणि यहोवाने आपला प्रवास यशस्वी केला आहे की नाही, यावर मनातल्या मनात विचार करत होता.

२२ उंटांचं पाणी पिऊन झाल्यावर, त्या माणसाने अर्धा शेकेल* वजनाची एक सोन्याची नथ आणि दहा शेकेल* वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या तिच्यासाठी काढल्या, २३ आणि तो तिला म्हणाला: “तू कोणाची मुलगी आहेस हे कृपा करून मला सांगशील का? तुझ्या वडिलांच्या घरी आम्हाला रात्री मुक्काम करण्यासाठी एखादी खोली आहे का?” २४ तेव्हा ती त्याला म्हणाली: “मी नाहोरला+ मिल्कापासून झालेल्या बथुवेलची मुलगी+ आहे.” २५ ती पुढे म्हणाली: “हो आमच्याकडे मुक्कामासाठी जागा आहे आणि उंटांसाठी भरपूर चारा आणि पेंढाही आहे.” २६ मग त्याने जमिनीवर डोकं टेकवून यहोवाचे आभार मानले, २७ आणि म्हणाला: “माझा मालक अब्राहाम याचा देव यहोवा याची स्तुती असो! कारण त्याने माझ्या मालकाबद्दल एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखवायचं सोडलं नाही. यहोवानेच मला माझ्या मालकाच्या भावांच्या घरापर्यंत आणलं आहे.”

२८ तेव्हा ती मुलगी या सर्व गोष्टी आपल्या आईला आणि घरातल्या इतरांना सांगायला धावत गेली. २९ रिबकाला लाबान नावाचा एक भाऊ होता.+ तो त्या माणसाकडे विहिरीजवळ धावत गेला. ३० जेव्हा लाबानने नथ आणि आपल्या बहिणीच्या हातातल्या बांगड्या पाहिल्या, आणि “तो माणूस मला असं-असं म्हणाला” हे रिबकाचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या माणसाला भेटायला गेला. तो माणूस अजूनही विहिरीजवळ उंटांसोबत उभा होता. ३१ तो त्याला म्हणाला: “चला ना, तुम्ही इथे का उभे आहात? यहोवाचा खरोखरच तुमच्यावर आशीर्वाद आहे. मी तुमच्या मुक्कामासाठी घरात सगळी व्यवस्था केली आहे. उंटांसाठीही जागा आहे.” ३२ तेव्हा तो माणूस घरात आला आणि त्याने* उंटांना मोकळं केलं आणि त्यांना चारा आणि पेंढा दिला. तसंच त्याने त्या माणसाला आणि त्याच्यासोबत असलेल्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिलं. ३३ मग जेवण वाढण्यात आलं तेव्हा तो म्हणाला: “मी जोपर्यंत सगळी हकिगत तुम्हाला सांगत नाही, तोपर्यंत काहीही खाणार नाही.” तेव्हा लाबान म्हणाला: “बोला.”

३४ तो म्हणाला: “मी अब्राहामचा सेवक आहे.+ ३५ यहोवाने माझ्या मालकाला खूप आशीर्वाद दिला आहे आणि त्याला गुरंढोरं, सोनंचांदी, दासदासी आणि उंट व गाढवं देऊन खूप श्रीमंत केलं आहे.+ ३६ माझ्या मालकाची बायको सारा, हिने तिच्या म्हातारपणी त्याच्या मुलाला जन्म दिला.+ मालक आपल्याजवळ असलेलं सगळं त्यालाच देतील.+ ३७ माझ्या मालकाने मला अशी शपथ दिली: ‘ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींमधून तू माझ्या मुलासाठी बायको शोधू नकोस.+ ३८ तर तू माझ्या वडिलांच्या घरी, माझ्या नातेवाइकांकडे जा+ आणि माझ्या मुलासाठी मुलगी शोधून आण.’+ ३९ पण मी माझ्या मालकाला म्हणालो: ‘जर ती मुलगी माझ्यासोबत या देशात यायला तयार नसेल तर?’+ ४० मालक मला म्हणाले: ‘ज्या यहोवा देवाच्या मार्गावर मी चाललो आहे,+ तो तुझ्यापुढे एका दूताला पाठवेल+ आणि तुझा प्रवास नक्कीच यशस्वी करेल आणि तू माझ्या नातेवाइकांतून आणि माझ्या वडिलांच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी एक मुलगी शोधून आण.+ ४१ जर तू माझ्या नातेवाइकांकडे गेलास आणि त्यांनी त्यांच्या मुलीला तुझ्यासोबत पाठवायला नकार दिला, तर तू या शपथेतून मोकळा होशील.’+

४२ आज जेव्हा मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी म्हणालो: ‘यहोवा, माझा मालक अब्राहाम याच्या देवा, माझा प्रवास यशस्वी होऊ दे. ४३ मी या विहिरीजवळ उभा आहे. असं होऊ दे, की जी मुलगी+ पाणी भरायला येईल आणि मी तिला म्हणेन, “कृपा करून, मला तुझ्या घागरीतून थोडं पाणी प्यायला दे,” ४४ आणि जी मला म्हणेल, “हो घ्या ना आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,” तीच मुलगी यहोवाने माझ्या मालकाच्या मुलासाठी निवडलेली मुलगी असू दे.’+

४५ मी मनातल्या मनात असं बोलत असतानाच, रिबका खांद्यावर आपली घागर घेऊन तिथे आली. ती खाली विहिरीजवळ जाऊन पाणी भरू लागली. तेव्हा मी तिला म्हणालो: ‘कृपा करून, मला प्यायला थोडं पाणी दे.’+ ४६ तेव्हा ती लगेच खांद्यावरून घागर उतरवून म्हणाली: ‘घ्या,+ आणि मी तुमच्या उंटांसाठीही पाणी काढते.’ मग मी पाणी प्यायलो आणि तिने उंटांनाही पाणी पाजलं. ४७ त्यानंतर मी तिला विचारलं, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’ तेव्हा ती म्हणाली: ‘मी नाहोरला मिल्कापासून झालेल्या बथुवेलची मुलगी आहे.’ मग मी तिच्या नाकात नथ आणि हातांत बांगड्या घातल्या.+ ४८ तेव्हा मी जमिनीवर डोकं टेकवून यहोवाला नमन केलं आणि माझा मालक अब्राहाम याचा देव यहोवा याची स्तुती केली,+ कारण त्याने माझ्या मालकाच्या मुलासाठी, त्याच्या भावाच्या मुलीला घेऊन जाता यावं, म्हणून मला योग्य मार्ग दाखवला. ४९ तर आता मला सांगा, की तुम्ही माझ्या मालकाबद्दल एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखवायला तयार आहात का? तुमची इच्छा नसेल, तर मला तसं सांगा, म्हणजे पुढे काय करायचं* ते मला ठरवता येईल.”+

५० मग लाबान आणि बथुवेल त्याला म्हणाले: “हे सगळं यहोवाने घडवून आणलं आहे. हो किंवा नाही म्हणणारे आम्ही कोण?* ५१ रिबका तुमच्यासमोर आहे. तिला घेऊन जा आणि यहोवाने म्हटल्याप्रमाणे ती तुमच्या मालकाच्या मुलाची बायको होईल.” ५२ अब्राहामच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्याने लगेच जमिनीवर डोकं टेकवून यहोवाला नमन केलं. ५३ मग त्याने आपल्याजवळचे सोन्याचांदीचे दागिने आणि कपडे रिबकाला दिले. तसंच, त्याने तिच्या भावाला आणि आईलाही मौल्यवान भेटवस्तू दिल्या. ५४ यानंतर, त्याने आणि त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाणंपिणं केलं आणि रात्री तिथेच मुक्काम केला.

सकाळी उठल्यावर अब्राहामचा सेवक म्हणाला: “आता तुमची परवानगी असेल, तर मी माझ्या मालकाकडे परत जातो.” ५५ यावर रिबकाचा भाऊ आणि तिची आई म्हणाली: “आमच्या मुलीला दहा दिवस तरी आमच्याजवळ राहू द्या. मग तिला घेऊन जा.” ५६ पण तो त्यांना म्हणाला: “यहोवाने माझा प्रवास यशस्वी केला आहे. तेव्हा आता मला अडवू नका. मला निरोप द्या म्हणजे मी माझ्या मालकाकडे परत जाईन.” ५७ तेव्हा ते म्हणाले: “आपण मुलीला बोलावून तिलाच विचारू.” ५८ मग त्यांनी रिबकाला बोलावलं आणि तिला विचारलं: “तू यांच्यासोबत जायला तयार आहेस का?” ती म्हणाली: “हो, मी तयार आहे.”

५९ तेव्हा त्यांनी आपली बहीण रिबका+ आणि तिची दाई*+ यांना अब्राहामचा सेवक आणि त्याच्या माणसांसोबत पाठवून दिलं. ६० आणि त्यांनी रिबकाला आशीर्वाद दिला आणि ते तिला म्हणाले: “हे रिबका, तू हजारो लाखो वंशजांची आई हो आणि तुझी संतती* त्यांच्या शत्रूंच्या फाटकांचा* ताबा घेवो.”+ ६१ मग रिबका आणि तिच्या दासी उठल्या आणि उंटांवर बसून त्या माणसाच्या मागोमाग निघाल्या. अशा रितीने, अब्राहामचा सेवक रिबकाला घेऊन परत जायला निघाला.

६२ इसहाक नेगेब+ देशात राहत होता. बैर-लहाय-रोईच्या+ रस्त्याकडून येऊन तो ६३ संध्याकाळच्या वेळी एका शेतात फेरफटका मारत, आपल्या मनाशीच विचार करत होता.+ त्याने समोर पाहिलं तेव्हा त्याला उंट येताना दिसले! ६४ रिबकाने समोर पाहिलं, तेव्हा तिला इसहाक दिसला आणि ती लगेच उंटावरून खाली उतरली. ६५ मग तिने सेवकाला विचारलं: “आपल्याला भेटायला येणारा तो माणूस कोण आहे?” सेवक म्हणाला: “तो माझा मालक आहे.” तेव्हा तिने डोक्यावर पदर घेतला. ६६ मग आपण केलेल्या सर्व गोष्टी सेवकाने इसहाकला सांगितल्या. ६७ त्यानंतर इसहाकने रिबकाला आपली आई सारा हिच्या तंबूमध्ये आणलं.+ त्याने रिबकाशी लग्न केलं; तो तिच्या प्रेमात पडला+ आणि आपल्या आईच्या मृत्यूमुळे झालेल्या दुःखातून तो सावरला.*+

२५ अब्राहामने पुन्हा लग्न केलं. त्याच्या बायकोचं नाव कटूरा होतं. २ पुढे तिला अब्राहामपासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान,+ इश्‍बाक आणि शूह+ ही मुलं झाली.

३ यक्षानला शबा आणि ददान ही मुलं झाली.

अश्‍शूरी, लटूशी आणि लऊमी ही ददानची मुलं होती.

४ मिद्यानला एफा, एफर, हनोख, अबीदा आणि एल्दा ही मुलं झाली.

ही सर्व कटूराची मुलं होती.

५ नंतर अब्राहामने आपलं सर्वकाही इसहाकला+ दिलं. ६ पण अब्राहामने आपल्या उपपत्नींच्या मुलांना भेटवस्तू दिल्या. तो जिवंत असतानाच, त्याने आपल्या उपपत्नींच्या मुलांना इसहाकपासून दूर,+ पूर्वेकडच्या देशात पाठवून दिलं. ७ अब्राहाम १७५ वर्षं जगला. ८ बरीच वर्षं जगल्यावर, अब्राहाम म्हातारा होऊन सुखाने मरण पावला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.* ९ इसहाक आणि इश्‍माएल या त्याच्या मुलांनी त्याला मम्रेच्या समोर असलेल्या मकपेलाच्या गुहेत पुरलं. ही गुहा हित्ती सोहरचा मुलगा एफ्रोन याच्या शेतात होती.+ १० हे शेत अब्राहामने हेथच्या मुलांकडून विकत घेतलं होतं. तिथे अब्राहामची बायको सारा हिला पुरण्यात आलं होतं आणि तिथेच अब्राहामलाही पुरण्यात आलं.+ ११ अब्राहामच्या मृत्यूनंतर देव त्याचा मुलगा इसहाक+ याला आशीर्वाद देत राहिला. इसहाक बैर-लहाय-रोईजवळ+ राहायचा.

१२ इजिप्तची हागार,+ जी साराची दासी होती तिला अब्राहामपासून झालेल्या मुलाचा, म्हणजेच इश्‍माएलचा+ हा वृत्तान्त आहे.

१३ इश्‍माएलच्या मुलांच्या घराण्यांनुसार त्यांची नावं अशी: इश्‍माएलच्या पहिल्या मुलाचं नाव नबायोथ.+ त्याच्यानंतर केदार,+ अदबील, मिबसाम,+ १४ मिश्‍मा, दुमा, मस्सा, १५ हदाद, तेमा, यतूर, नाफीश आणि केदमा. १६ ही इश्‍माएलची मुलं होती. त्यांच्या वस्त्यांनुसार आणि छावण्यांनुसार,* त्यांच्या १२ कुळांच्या १२ प्रधानांची+ ही नावं होती. १७ इश्‍माएल १३७ वर्षं जगला. मग तो मरण पावला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.* १८ मग इश्‍माएलच्या वंशजांनी हवीलापासून+ अश्‍शूरपर्यंत वस्ती केली. हवीला शूरजवळ+ आहे आणि शूर इजिप्तजवळ आहे. ते सर्व आपल्या भावांच्या जवळ वस्ती करू लागले.*+

१९ अब्राहामचा मुलगा इसहाक+ याचा हा वृत्तान्त आहे.

इसहाक अब्राहामचा मुलगा होता. २० इसहाक ४० वर्षांचा असताना त्याने रिबकाशी लग्न केलं. ती पदन-अराम इथे राहणाऱ्‍या अरामी बथुवेलची मुलगी+ आणि लाबानची बहीण होती. २१ इसहाकची बायको वांझ होती. त्यामुळे तो यहोवाला तिच्याबद्दल याचना करत होता. यहोवाने त्याची याचना ऐकली आणि रिबका गरोदर राहिली. २२ तिच्या पोटात असलेली मुलं एकमेकांशी भांडू लागली.+ तेव्हा ती म्हणाली: “असं असेल तर मी जगून काय उपयोग?” म्हणून तिने यहोवाला याबद्दल विचारलं. २३ मग यहोवा तिला म्हणाला: “तुझ्या पोटात दोन मुलं* आहेत+ आणि त्यांच्यापासून दोन राष्ट्रं बनतील.+ एक राष्ट्र दुसऱ्‍यापेक्षा शक्‍तिशाली असेल+ आणि मोठा धाकट्याची सेवा करेल.”+

२४ तिचे दिवस भरल्यानंतर, तिला जुळी मुलं झाली. २५ मोठ्याचा जन्म झाला तेव्हा त्याचं अंग लाल होतं आणि तो खूप केसाळ होता.+ म्हणून त्यांनी त्याचं नाव एसाव*+ ठेवलं. २६ त्याच्यानंतर त्याच्या भावाचा जन्म झाला. त्याने आपल्या हाताने एसावची टाच धरली होती.+ म्हणून त्याचं नाव याकोब* ठेवण्यात आलं.+ रिबकाने त्या मुलांना जन्म दिला तेव्हा इसहाक ६० वर्षांचा होता.

२७ मग ती मुलं मोठी झाली. एसाव एक कुशल शिकारी बनला.+ तो सहसा रानात भटकायचा. पण याकोब शांत स्वभावाचा* होता. तो तंबूंमध्ये राहायचा.+ २८ इसहाकचं एसाववर प्रेम होतं कारण तो त्याच्यासाठी मांस आणायचा. पण रिबकाचा याकोबवर जीव होता.+ २९ एकदा एसाव रानातून थकून आला, तेव्हा याकोब वरण बनवत होता. ३० एसाव याकोबला म्हणाला: “मला पटकन ते थोडं लाल वरण खायला दे, कारण मी खूप दमून आलोय.”* म्हणून त्याचं नाव अदोम*+ पडलं. ३१ यावर याकोब म्हणाला: “पण आधी तुझा प्रथमपुत्राचा हक्क मला वीक!”+ ३२ हे ऐकून एसाव त्याला म्हणाला: “इथे मी मरायला टेकलोय. तो हक्क माझ्या काय कामाचा?” ३३ पण याकोब म्हणाला: “आधी तू शपथ घे!” तेव्हा एसावने शपथ घेतली आणि आपला प्रथमपुत्राचा हक्क याकोबला विकला.+ ३४ मग याकोबने एसावला भाकर आणि वरण दिलं. त्याचं खाणंपिणं झाल्यावर तो उठून निघून गेला. अशा रितीने एसावने दाखवलं, की प्रथमपुत्र असण्याच्या हक्काची त्याला काही किंमत नव्हती.

२६ पूर्वी अब्राहामच्या दिवसांत जसा दुष्काळ पडला होता,+ तसाच देशात पुन्हा दुष्काळ पडला. म्हणून, इसहाक गरारमध्ये पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याच्याकडे गेला. २ तेव्हा यहोवा इसहाकसमोर प्रकट होऊन म्हणाला: “इजिप्तला जाऊ नकोस, तर मी सांगेन त्या देशात राहा. ३ त्या देशात तू विदेश्‍यासारखा राहा.+ मी तुझ्यासोबत असेन आणि तुला आशीर्वाद देईन. कारण हे सगळे देश मी तुला आणि तुझ्या संततीला* देणार आहे+ आणि तुझा पिता अब्राहाम याला दिलेली ही शपथ मी पूर्ण करीन:+ ४ ‘मी तुझी संतती* आकाशातल्या ताऱ्‍यांसारखी वाढवीन+ आणि मी हे सगळे देश तुझ्या संततीला* देईन.+ तुझ्या संततीमुळे* पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’*+ ५ कारण अब्राहामने माझं ऐकलं आणि तो माझे नियम, माझ्या आज्ञा, माझे आदेश आणि माझे कायदे पाळत राहिला.”+ ६ म्हणून इसहाक गरारमध्येच राहिला.+

७ तिथली माणसं त्याच्या बायकोबद्दल विचारायची, तेव्हा तो म्हणायचा: “ही माझी बहीण आहे.”+ कारण त्याला, “ही माझी बायको आहे” हे सांगायला भीती वाटायची. रिबका दिसायला सुंदर असल्यामुळे,+ “हे लोक तिच्यामुळे मला मारून टाकतील” असा तो विचार करायचा. ८ काही काळाने, पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याने एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा त्याला इसहाक आपली बायको रिबका हिला मिठी मारताना दिसला.+ ९ तेव्हा अबीमलेखने लगेच इसहाकला बोलावलं आणि तो त्याला म्हणाला: “ती तर तुझी बायको आहे! मग ‘ती माझी बहीण आहे’ असं तू का म्हणालास?” यावर इसहाक त्याला म्हणाला: “तिच्यामुळे मला कोणी मारून टाकेल अशी मला भीती वाटली.”+ १० पण अबीमलेख त्याला म्हणाला: “तू आमच्यासोबत असं का केलंस?+ एखाद्या माणसाने तुझ्या बायकोसोबत काही वाईट काम केलं असतं तर तुझ्यामुळे आमच्यावर दोष आला असता!”+ ११ मग अबीमलेखने आपल्या सर्व लोकांना अशी आज्ञा दिली: “जो कोणी या माणसाला आणि त्याच्या बायकोला हात लावेल त्याला नक्की ठार मारलं जाईल!”

१२ इसहाकने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्या वर्षी त्याने जितकं पेरलं, त्याच्या १०० पट पीक त्याला मिळालं, कारण त्याच्यावर यहोवाचा आशीर्वाद होता.+ १३ तो धनवान झाला आणि त्याची आणखी भरभराट झाल्यामुळे तो खूप श्रीमंत झाला. १४ त्याच्याजवळ मेंढरांचे कळप, गुरंढोरं आणि पुष्कळ दासदासी झाल्या.+ म्हणून पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले.

१५ त्यामुळे पलिष्टी लोकांनी त्याचा पिता अब्राहाम याच्या सेवकांनी ज्या विहिरी पूर्वी खोदल्या होत्या, त्या सगळ्या माती टाकून बुजवून टाकल्या.+ १६ मग अबीमलेख इसहाकला म्हणाला: “तू इथून निघून जा कारण तू आमच्यापेक्षा खूप शक्‍तिशाली बनला आहेस.” १७ म्हणून इसहाक तिथून निघाला आणि गरारच्या खोऱ्‍यात+ तंबू ठोकून तिथे राहू लागला. १८ इसहाकचा पिता अब्राहाम याच्या काळात खोदण्यात आलेल्या, पण पलिष्टी लोकांनी अब्राहामच्या मृत्यूनंतर बुजवून टाकलेल्या विहिरी इसहाकने पुन्हा खोदल्या.+ त्याच्या पित्याने त्या विहिरींना जी नावं दिली होती, तीच नावं त्याने त्यांना दिली.+

१९ इसहाकचे सेवक खोऱ्‍यात खोदकाम करत असताना त्यांना एक स्वच्छ पाण्याची विहीर सापडली. २० तेव्हा गरारचे मेंढपाळ इसहाकच्या मेंढपाळांसोबत भांडू लागले आणि म्हणाले, “हे पाणी आमचं आहे!” म्हणून त्याने त्या विहिरीचं नाव एसेक* असं ठेवलं, कारण ते त्याच्याशी भांडले होते. २१ मग त्याचे सेवक आणखी एक विहीर खोदू लागले, तेव्हा ते पुन्हा त्यांच्याशी भांडू लागले. म्हणून त्याने तिचं नाव सितना* ठेवलं. २२ नंतर तो तिथून निघून दुसरीकडे गेला आणि त्याने तिथेही एक विहीर खोदली. पण या वेळी ते त्याच्याशी भांडले नाहीत. म्हणून त्याने तिचं नाव रेहोबोथ* ठेवलं आणि तो म्हणाला: “कारण यहोवाने आता आम्हाला भरपूर जागा दिली आहे, आणि या देशात आमची भरभराट केली आहे.”+

२३ मग तो तिथून निघून बैर-शेबाला+ गेला. २४ त्या रात्री यहोवा त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाला: “मी तुझा पिता अब्राहाम याचा देव आहे.+ घाबरू नकोस,+ कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला आशीर्वाद देईन आणि माझा सेवक अब्राहाम याच्यामुळे तुझी संतती* खूप वाढवीन.”+ २५ म्हणून त्याने तिथे एक वेदी बांधली आणि यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना केली.+ इसहाकने तिथे आपला तंबू ठोकला+ आणि त्याच्या सेवकांनी तिथे एक विहीर खोदली.

२६ नंतर अबीमलेख गरारहून आपला वैयक्‍तिक सल्लागार, अहुज्जाथ आणि आपला सेनापती पीकोल+ यांना घेऊन इसहाककडे आला. २७ तेव्हा इसहाक त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा हेवा करून मला आपल्याइथून घालवून दिलं, मग आता माझ्याकडे का आला आहात?” २८ यावर ते म्हणाले: “यहोवा तुझ्यासोबत आहे हे आम्हाला स्पष्टपणे दिसून आलं आहे.+ म्हणून आम्ही विचार केला, की ‘आपण एकमेकांना शांती राखण्याचं वचन देऊ आणि आपसात असा करार करू,+ २९ की जसं आम्ही तुझं काहीही वाईट केलं नाही, तसं तूही आमचं काही वाईट करणार नाहीस. कारण आम्ही तुझ्याशी चांगलं वागलो आणि शांतीने तुला तिथून जाऊ दिलं. आता यहोवाचा आशीर्वाद तुझ्यावर आहे.’” ३० मग त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांनी खाणंपिणं केलं. ३१ त्यांनी पहाटे उठून एकमेकांना वचन दिलं+ आणि इसहाकने त्यांना पाठवून दिलं. मग, ते शांतीने तिथून निघून गेले.

३२ त्या दिवशी इसहाकच्या सेवकांनी येऊन आपण खोदलेल्या विहिरीबद्दल त्याला सांगितलं.+ ते म्हणाले: “विहिरीला पाणी लागलं!” ३३ म्हणून त्याने त्या विहिरीचं नाव शेबा ठेवलं. त्यावरून आजपर्यंत त्या शहराला बैर-शेबा+ या नावाने ओळखलं जातं.

३४ एसाव ४० वर्षांचा असताना त्याने हित्ती बैरी याची मुलगी यहूदीथ, तसंच हित्ती एलोन याची मुलगी बासमथ यांच्याशी लग्न केलं.+ ३५ त्यांच्यामुळे इसहाक आणि रिबका यांना खूप दुःख* झालं.+

२७ इसहाक म्हातारा झाला होता आणि त्याची नजर कमजोर झाली होती. तो आपल्या मोठ्या मुलाला, एसावला+ बोलावून म्हणाला: “माझ्या मुला!” एसाव त्याला म्हणाला: “मी इथे आहे.” २ तेव्हा इसहाक म्हणाला: “मी आता म्हातारा झालोय. मला कधीही मरण येऊ शकतं. ३ म्हणून आता आपला धनुष्यबाण घेऊन रानात जा आणि माझ्यासाठी शिकार करून आण.+ ४ मग माझ्या आवडीचं जेवण तयार कर आणि माझ्याकडे आण. म्हणजे मी ते खाईन आणि मरण्याआधी तुला आशीर्वाद देईन.”

५ पण इसहाक एसावशी बोलत असताना रिबका ते बोलणं ऐकत होती. मग एसाव शिकार करण्यासाठी रानात गेला.+ ६ तेव्हा रिबका आपला मुलगा याकोब याला म्हणाली:+ “मी आताच तुझ्या बाबांना तुझा भाऊ एसाव याला असं म्हणताना ऐकलं, ७ ‘माझ्यासाठी शिकार करून आण आणि चविष्ट जेवण बनव. म्हणजे मी ते खाईन आणि मरण्याआधी तुला यहोवासमोर आशीर्वाद देईन.’+ ८ म्हणून माझ्या मुला, आता लक्ष देऊन ऐक आणि मी सांगते तसं कर.+ ९ जा आणि कळपातून सर्वात चांगल्या, दोन लहान बकऱ्‍या घेऊन ये. मी तुझ्या बाबांसाठी त्यांच्या आवडीचं चविष्ट जेवण बनवते. १० मग ते घेऊन तुझ्या बाबांकडे जा आणि त्यांना खायला दे. म्हणजे ते मरण्याआधी तुला आशीर्वाद देतील.”

११ याकोब रिबकाला म्हणाला: “माझा भाऊ एसाव केसाळ आहे,+ पण माझी त्वचा तर गुळगुळीत आहे. १२ बाबांनी मला हात लावून पाहिलं तर?+ त्यांना वाटेल मी त्यांची थट्टा करतोय आणि मला आशीर्वादाऐवजी शाप मिळेल.” १३ यावर त्याची आई त्याला म्हणाली: “तुला दिलेला शाप माझ्यावर येऊ दे. मी सांगते तसं कर, जा आणि त्या बकऱ्‍या घेऊन ये.”+ १४ म्हणून त्याने जाऊन आपल्या आईला बकऱ्‍या आणून दिल्या आणि तिने त्याच्या वडिलांच्या आवडीचं चविष्ट जेवण तयार केलं. १५ मग रिबकाने घरात असलेले एसावचे सर्वात चांगले कपडे घेऊन ते याकोबला+ घातले. १६ तसंच, तिने त्याच्या हातांवर आणि मानेवर बकऱ्‍यांची कातडी लावली.+ १७ मग आपण बनवलेलं चविष्ट जेवण आणि भाकर तिने याकोबकडे दिली.+

१८ तेव्हा याकोब त्याच्या वडिलांकडे जाऊन म्हणाला: “बाबा!” त्यावर तो म्हणाला: “मी इथे आहे. तू कोण, माझ्या मुला?” १९ याकोब आपल्या वडिलांना म्हणाला: “मी एसाव, तुमचा मोठा मुलगा.+ तुम्ही सांगितलं तसं मी केलं. कृपा करून उठून बसा. मी शिकार करून आणलेलं मांस खा आणि मला आशीर्वाद द्या.”+ २० तेव्हा इसहाक आपल्या मुलाला म्हणाला: “माझ्या मुला, तुला एवढ्या लवकर शिकार कशी मिळाली?” तो म्हणाला: “कारण तुमचा देव यहोवा यानेच ती माझ्यासमोर आणली.” २१ मग इसहाक याकोबला म्हणाला: “माझ्या मुला, जरा जवळ ये, म्हणजे मी तुला हात लावून पाहीन, की तू खरंच माझा मुलगा एसाव आहेस की नाही.”+ २२ तेव्हा याकोब इसहाकजवळ गेला आणि इसहाकने त्याला हात लावून पाहिलं. मग तो म्हणाला: “आवाज तर याकोबचा आहे, पण हात तर एसावचे आहेत.”+ २३ त्याने याकोबला ओळखलं नाही, कारण त्याचे हात त्याचा भाऊ एसाव याच्यासारखे केसाळ होते. म्हणून इसहाकने त्याला आशीर्वाद दिला.+

२४ मग त्याने विचारलं: “तू खरंच माझा मुलगा एसाव आहेस ना?” यावर तो म्हणाला: “हो मीच आहे.” २५ मग इसहाक म्हणाला: “माझ्या मुला, तू आणलेलं शिकारीचं मांस मला खायला दे. त्यानंतर मी तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा त्याने त्याला खायला आणून दिलं आणि त्याने ते खाल्लं. मग त्याने त्याला द्राक्षारस आणून दिला आणि तो द्राक्षारस प्यायला. २६ त्यानंतर त्याचा पिता इसहाक त्याला म्हणाला: “माझ्या मुला जरा माझ्या जवळ ये आणि माझं चुंबन घे.”+ २७ तेव्हा याकोबने त्याच्याजवळ जाऊन त्याचं चुंबन घेतलं आणि इसहाकला त्याच्या कपड्यांचा वास आला.+ मग तो त्याला आशीर्वाद देत म्हणाला:

“पाहा, यहोवाने आशीर्वाद दिलेल्या रानाच्या सुगंधासारखा माझ्या मुलाचा सुगंध आहे. २८ खरा देव तुला आकाशातलं दव+ व सुपीक जमीन+ आणि भरपूर पीक व नवीन द्राक्षारस+ देवो. २९ लोक तुझी सेवा करोत आणि राष्ट्रं तुला नमन करोत. तू आपल्या सर्व भावांचा मालक हो आणि तुझ्या आईची मुलं तुला नमन करोत.+ जो कोणी तुला शाप देईल त्याला शाप लागो, आणि जो कोणी तुला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद मिळो.”+

३० इसहाकचा नुकताच याकोबला आशीर्वाद देऊन झाला होता. याकोब त्याच्यासमोरून जातो न जातो, तोच एसाव शिकार करून परत आला.+ ३१ त्यानेही चविष्ट जेवण तयार केलं आणि ते आपल्या वडिलांजवळ आणून तो म्हणाला: “बाबा उठा, मी आणलेल्या शिकारीचं मांस खाऊन मला आशीर्वाद द्या.” ३२ यावर त्याचा पिता इसहाक याने त्याला विचारलं: “तू कोण आहेस?” तेव्हा तो म्हणाला: “मी तुमचा मोठा मुलगा एसाव.”+ ३३ हे ऐकून इसहाक थरथर कापू लागला आणि म्हणाला: “मग ज्याने माझ्यासाठी शिकार करून आणली तो कोण होता? तू येण्याआधीच मी जेवलो आणि त्याला आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद त्याला नक्कीच मिळेल!”

३४ आपल्या वडिलांचे शब्द ऐकल्यावर एसाव अतिशय दुःखाने ओरडून रडू लागला आणि म्हणाला: “बाबा! मलाही आशीर्वाद द्या.”+ ३५ पण तो म्हणाला: “तुझ्या भावाने येऊन मला फसवलं आणि तुझ्यासाठी असलेला आशीर्वाद घेतला.” ३६ यावर एसाव म्हणाला: “म्हणूनच त्याचं नाव याकोब* आहे, कारण दोन्ही वेळा त्याने माझी जागा घेतली.+ प्रथमपुत्र असण्याचा माझा अधिकार त्याने आधीच घेतला होता+ आणि आता तर माझ्यासाठी असलेला आशीर्वादही त्याने घेतला आहे!”+ तो पुढे म्हणाला: “तुम्ही माझ्यासाठी एकही आशीर्वाद ठेवला नाही का?” ३७ तेव्हा इसहाक एसावला म्हणाला: “मी त्याला तुझ्यावर मालक नेमलं आहे+ आणि त्याच्या सर्व भावांना त्याचे सेवक केलं आहे. मी त्याला धान्य आणि द्राक्षारस दिला आहे.+ माझ्या मुला, तुला देण्यासाठी आता माझ्याकडे काय उरलंय?”

३८ एसाव आपल्या वडिलांना म्हणाला: “बाबा तुमच्याकडे एकतरी आशीर्वाद असेल ना? मलाही आशीर्वाद द्या बाबा!” आणि एसाव मोठ्याने ओरडून रडू लागला.+ ३९ तेव्हा इसहाकने त्याला उत्तर दिलं:

“पाहा, तू पृथ्वीच्या सुपीक जमिनींपासून आणि आकाशातल्या दवापासून दूर राहशील.+ ४० तू आयुष्यभर तलवार चालवशील+ आणि तुझ्या भावाची सेवा करशील.+ पण जेव्हा तुला त्रास सहन होणार नाही, तेव्हा तू आपल्या मानेवरून त्याचं जू* काढून टाकशील.”*+

४१ एसावच्या मनात याकोबबद्दल वैर होतं, कारण त्याच्या वडिलांनी याकोबला आशीर्वाद दिला होता.+ एसाव मनात म्हणत राहिला: “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस लवकरच येतील,+ त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला मारून टाकीन.” ४२ एसावचे हे शब्द रिबकाच्या कानावर आले, तेव्हा तिने ताबडतोब याकोबला बोलावून घेतलं आणि त्याला म्हटलं: “हे बघ, तुझा भाऊ एसाव सूड घेण्यासाठी तुला ठार मारण्याचा कट रचतोय.* ४३ म्हणून माझ्या मुला, मी सांगते तसं कर. हारानमध्ये राहणारा माझा भाऊ लाबान याच्याकडे पळून जा.+ ४४ तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत काही काळ त्याच्याजवळच राहा. ४५ मग त्याचा राग शांत झाल्यावर आणि तू त्याच्यासोबत जे केलंस ते तो विसरून गेल्यावर, मी तुला तिथून बोलावून घेईन. नाहीतर मला तुम्हा दोघांनाही एकाच दिवशी गमवावं लागेल.”

४६ त्यानंतर रिबका इसहाकला म्हणाली: “हेथच्या मुलींमुळे मला जीव नकोसा झालाय.+ जर याकोबनेही हेथच्या मुलींपैकी, या देशातल्या एखाद्या मुलीशी लग्न केलं, तर मी जगून काय करू?”+

२८ तेव्हा इसहाकने याकोबला बोलावलं आणि त्याला आशीर्वाद देऊन अशी आज्ञा दिली: “तू कनानच्या मुलींपैकी कोणाशीही लग्न करू नकोस.+ २ तर तू पदन-अराम इथे तुझे आजोबा* बथुवेल यांच्या घरी जा आणि आपला मामा लाबान याच्या मुलींमधून+ आपल्यासाठी बायको कर. ३ सर्वशक्‍तिमान देव तुला आशीर्वाद देऊन फलदायी करेल आणि तुझा वंश वाढवेल. तुझ्यापासून लोकांचा समुदाय येईल.+ ४ तो तुला आणि तुझ्यासोबत तुझ्या संततीलाही* अब्राहामचा आशीर्वाद देईल+ आणि ज्या देशात तू विदेशी म्हणून राहत आहेस, तो देश तू ताब्यात घेशील कारण देवाने तो अब्राहामला दिला आहे.”+

५ असं म्हणून इसहाकने याकोबला पाठवून दिलं. तेव्हा याकोब पदन-अराम इथे लाबानकडे जायला निघाला. लाबान हा याकोब आणि एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ+ आणि अरामी बथुवेलचा+ मुलगा होता.

६ एसावला कळलं की इसहाकने याकोबला आशीर्वाद देऊन पदन-अराम इथल्या मुलीशी लग्न करायला तिथे पाठवलं आहे. तसंच त्याला कळलं, की इसहाकने याकोबला आशीर्वाद देताना अशी आज्ञा दिली: “तू कनानच्या मुलींपैकी कोणाशीही लग्न करू नकोस.”+ ७ याकोब आपल्या आईवडिलांचं ऐकून पदन-अरामला गेला+ आहे, हे त्याने पाहिलं. ८ आपले वडील इसहाक यांना कनानच्या मुली पसंत नाहीत, या गोष्टीची एसावला जाणीव झाली.+ ९ तेव्हा त्याने अब्राहामचा मुलगा इश्‍माएल याच्याकडे जाऊन त्याची मुलगी महलथ, जी नबायोथची बहीण होती, तिच्याशी लग्न केलं.+ अशा रितीने, एसावने दोन बायका असताना आणखी एक लग्न केलं.

१० बैर-शेबा इथून याकोब हारानकडे जायला निघाला.+ ११ काही वेळाने, तो एका ठिकाणी पोहोचला आणि सूर्य मावळल्यामुळे त्याने तिथेच रात्र घालवण्याची तयारी केली. तिथला एक दगड उशाला घेऊन तो झोपला.+ १२ तेव्हा त्याला एक स्वप्न पडलं आणि त्यात पृथ्वीपासून आकाशापर्यंत जाणारी एक शिडी* त्याला दिसली. देवाचे दूत तिच्यावरून वरखाली जात होते.+ १३ आणि त्याने पाहिलं, की शिडीच्या वरच्या टोकाला यहोवा होता. तो याकोबला म्हणाला:

“मी तुझा पिता अब्राहाम आणि इसहाक याचा देव यहोवा आहे.+ जिथे तू झोपला आहेस तो देश मी तुला आणि तुझ्या संततीला* देईन.+ १४ आणि तुझी संतती* पृथ्वीवरच्या धुळीच्या कणांइतकी होईल+ आणि तुझे वंशज पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरतील. तुझ्यामुळे आणि तुझ्या संततीमुळे* पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.*+ १५ मी तुझ्यासोबत आहे आणि तू जिथेही जाशील तिथे मी तुझं रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन.+ मी तुला जे वचन दिलं आहे, ते पूर्ण करेपर्यंत मी तुला कधीही सोडणार नाही.”+

१६ मग याकोबला जाग आली आणि तो म्हणाला: “यहोवा खरंच या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हतं.” १७ त्याला भीती वाटली आणि तो म्हणाला: “हे ठिकाण किती विस्मयकारक आहे! हे देवाचं घरच असू शकतं+ आणि हेच स्वर्गाचं दार आहे.”+ १८ मग याकोब पहाटेच उठला आणि त्याने उशाला घेतलेला तो दगड स्मारक म्हणून तिथे उभा केला आणि त्यावर तेल ओतलं.+ १९ म्हणून त्याने त्या ठिकाणाचं नाव बेथेल* ठेवलं, पण पूर्वी त्या शहराचं नाव लूज+ होतं.

२० मग याकोब शपथ घेऊन म्हणाला: “जर देव माझ्यासोबत राहिला आणि माझ्या प्रवासात त्याने माझं रक्षण केलं आणि मला खायला भाकर आणि घालायला कपडे दिले, २१ आणि जर मी माझ्या वडिलांच्या घरी सुखरूप परत आलो, तर यहोवा खरंच माझा देव असल्याचं सिद्ध होईल. २२ तेव्हा मी स्मारक म्हणून उभा केलेला हा दगड, देवाचं घर बनेल+ आणि तू मला जे काही देशील त्या सगळ्यातला दहावा भाग मी तुला न चुकता देईन.”

२९ त्यानंतर याकोब पुढच्या प्रवासाला निघाला आणि तो पूर्वेकडच्या लोकांच्या देशात येऊन पोहोचला. २ त्याला मैदानात एक विहीर दिसली. त्या विहिरीजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. मेंढपाळ सहसा त्या विहिरीतून आपल्या मेंढरांना पाणी पाजायचे. त्या विहिरीच्या तोंडावर एक मोठा दगड ठेवला होता. ३ सगळ्या कळपांना जमा केल्यावर मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरचा दगड काढायचे, मेंढरांना पाणी पाजायचे आणि मग तो दगड पुन्हा विहिरीच्या तोंडावर ठेवायचे.

४ याकोब त्यांना म्हणाला: “माझ्या भावांनो, तुम्ही कुठले?” यावर ते म्हणाले: “आम्ही हारानचे.”+ ५ मग तो त्यांना म्हणाला: “नाहोरचा+ नातू लाबान+ याला तुम्ही ओळखता का?” यावर ते म्हणाले: “हो, ओळखतो.” ६ तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “तो बरा आहे ना?” ते म्हणाले: “हो, बरा आहे. ती बघा त्याची मुलगी राहेल+ मेंढरांना घेऊन येत आहे!” ७ मग तो म्हणाला: “आताशी दुपार झाली आहे. कळपांना जमा करण्याची ही वेळ नाही. मेंढरांना पाणी पाजा आणि त्यांना चरायला न्या.” ८ यावर ते म्हणाले: “सगळे कळप जमा झाल्यावरच ते विहिरीच्या तोंडावरचा दगड काढतात आणि तेव्हाच आम्ही मेंढरांना पाणी पाजतो. तोपर्यंत आम्हाला मेंढरांना पाणी पाजण्याची परवानगी नाही.”

९ तो त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या वडिलांच्या मेंढरांना घेऊन तिथे आली, कारण ती मेंढरं राखायची. १० याकोबने आपला मामा लाबान याची मुलगी राहेल हिला आणि त्याच्या मेंढरांना पाहिलं, तेव्हा त्याने लगेच जाऊन विहिरीच्या तोंडावरचा दगड काढला आणि आपला मामा लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजलं. ११ मग याकोबने राहेलचं चुंबन घेतलं आणि तो मोठ्याने रडू लागला. १२ त्यानंतर याकोबने राहेलला सांगितलं, की तो तिच्या वडिलांचा नातेवाईक,* म्हणजे रिबकाचा मुलगा आहे. तेव्हा ती हे सांगायला पळत आपल्या वडिलांकडे गेली.

१३ आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याचं ऐकताच, लाबान+ पळत त्याला भेटायला गेला. त्याने त्याला मिठी मारून त्याचं चुंबन घेतलं आणि त्याला घरी आणलं. मग याकोबने त्याला सगळी हकिगत सांगितली. १४ लाबान त्याला म्हणाला: “तुझंमाझं रक्‍ताचं नातं आहे.”* म्हणून तो त्याच्याकडे महिनाभर राहिला.

१५ मग लाबान याकोबला म्हणाला: “तू माझा नातेवाईक*+ आहेस, म्हणून मी काय तुझ्याकडून फुकट काम करून घेऊ? सांग तुला काय मजुरी देऊ?”+ १६ लाबानला दोन मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव लेआ आणि धाकटीचं नाव राहेल+ होतं. १७ लेआच्या डोळ्यांत चमक नव्हती, पण राहेल खूप देखणी आणि सुंदर होती. १८ याकोब राहेलच्या प्रेमात पडला होता, म्हणून तो म्हणाला: “मी तुमची धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी सात वर्षं तुमची सेवा करायला तयार आहे.”+ १९ यावर लाबान म्हणाला: “तिला परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला दिलेलं बरं. तू माझ्याकडे राहा.” २० मग याकोबने राहेलसाठी सात वर्षं सेवा केली.+ पण तिच्यावर प्रेम असल्यामुळे त्याला ती वर्षं फक्‍त काही दिवसांसारखी वाटली.

२१ त्यानंतर याकोब लाबानला म्हणाला: “माझ्या सेवेची वर्षं पूर्ण झाली आहेत. आता माझी बायको मला द्या म्हणजे मला तिच्यासोबत राहता येईल.”* २२ तेव्हा लाबानने तिथल्या सर्व लोकांना मेजवानी दिली. २३ पण संध्याकाळी असं झालं, की त्याने आपली मुलगी लेआ हिला याकोबकडे नेलं आणि याकोबने तिच्याशी संबंध ठेवले. २४ लाबानने आपली दासी जिल्पा, ही लेआला दासी म्हणून दिली.+ २५ सकाळी याकोबने पाहिलं तर त्याच्याजवळ लेआ होती! तेव्हा तो लाबानला म्हणाला: “तुम्ही माझ्यासोबत हे काय केलं? मला का फसवलं?+ मी राहेलसाठी तुमची सेवा केली होती ना?” २६ यावर लाबान म्हणाला: “आमच्याकडे मोठीच्या आधी धाकटीचं लग्न करण्याची पद्धत नाही. २७ हा आठवडा तू लेआसोबत साजरा कर. त्यानंतर तुला दुसरीही देईन. पण त्यासाठी तुला आणखी सात वर्षं माझी सेवा करावी लागेल.”+ २८ याकोबने त्याच्या सांगण्यानुसार तो आठवडा लेआसोबत साजरा केला. त्यानंतर लाबानने त्याला राहेल बायको म्हणून दिली. २९ तसंच, लाबानने आपली दासी बिल्हा,+ ही राहेलला दासी म्हणून दिली.+

३० मग याकोबने राहेलसोबतही संबंध ठेवले. त्याचं लेआपेक्षा राहेलवर जास्त प्रेम होतं आणि त्याने आणखी सात वर्षं लाबानची सेवा केली.+ ३१ याकोबचं लेआवर प्रेम नाही,* हे पाहिल्यावर यहोवाने तिला मुलं होऊ दिली,*+ पण राहेल वांझ होती.+ ३२ लेआ गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तिने त्याचं नाव रऊबेन*+ ठेवलं, कारण ती म्हणाली: “यहोवाने माझं दुःख पाहिलं आहे.+ आता माझा नवरा माझ्यावर प्रेम करू लागेल.” ३३ मग ती पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “यहोवाने माझं ऐकलं आहे. माझ्या नवऱ्‍याचं माझ्यावर प्रेम नव्हतं, म्हणून देवाने मला हा आणखी एक मुलगा दिला आहे.” त्यामुळे तिने त्याचं नाव शिमोन*+ ठेवलं. ३४ मग ती पुन्हा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “आता माझा नवरा माझ्याजवळ राहील कारण मी त्याला तीन मुलं दिली आहेत.” म्हणून तिने त्याचं नाव लेवी*+ ठेवलं. ३५ यानंतर ती आणखी एकदा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “या वेळी मी यहोवाची स्तुती करीन.” म्हणून तिने त्याचं नाव यहूदा*+ ठेवलं. यानंतर तिला मुलं होण्याचं थांबलं.

३० याकोबपासून आपल्याला मुलं झाली नाहीत, हे पाहून राहेल आपल्या बहिणीवर जळू लागली आणि याकोबला म्हणाली: “मला मुलं दे, नाहीतर मी मरून जाईन.” २ हे ऐकल्यावर याकोब राहेलवर संतापला आणि म्हणाला: “तुला मुलं न होऊ द्यायला, मी काय देव आहे?” ३ तेव्हा ती म्हणाली: “माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार कर+ आणि तिच्याशी संबंध ठेव म्हणजे ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल.* तिच्यामुळे मलाही मुलं मिळतील.” ४ मग तिने आपली दासी बिल्हा ही त्याला बायको म्हणून दिली आणि याकोबने तिच्याशी संबंध ठेवले.+ ५ बिल्हा गरोदर राहिली आणि तिला याकोबपासून एक मुलगा झाला. ६ तेव्हा राहेल म्हणाली: “देवाने माझा न्याय केला आहे आणि माझीही प्रार्थना ऐकून मला एक मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचं नाव दान*+ ठेवलं. ७ राहेलची दासी बिल्हा पुन्हा गरोदर राहिली आणि तिला याकोबपासून आणखी एक मुलगा झाला. ८ मग राहेल म्हणाली: “मी माझ्या बहिणीशी जोर लावून झुंजले आणि जिंकले!” म्हणून तिने त्याचं नाव नफताली*+ ठेवलं.

९ आपल्याला आता मुलं होत नाहीत, हे पाहून लेआने आपली दासी जिल्पा ही याकोबला बायको म्हणून दिली.+ १० मग लेआची दासी जिल्पा हिला याकोबपासून मुलगा झाला. ११ तेव्हा लेआ म्हणाली: “माझं कल्याण झालं!” म्हणून तिने त्याचं नाव गाद*+ ठेवलं. १२ त्यानंतर लेआची दासी जिल्पा हिला याकोबपासून दुसरा मुलगा झाला. १३ तेव्हा लेआ म्हणाली: “मला आनंद झालाय! आता सगळ्या बायका* मला आनंदी म्हणतील.”+ म्हणून तिने त्याचं नाव आशेर*+ ठेवलं.

१४ काही काळाने गव्हाच्या कापणीच्या दिवसांत रऊबेन+ शेतातून जात असताना त्याला दूदाफळं* दिसली. ती फळं त्याने आपली आई लेआ हिच्याकडे आणली. तेव्हा राहेल लेआला म्हणाली: “तुझ्या मुलाने आणलेली काही दूदाफळं मलाही दे.” १५ यावर लेआ राहेलला म्हणाली: “माझ्या नवऱ्‍याला बळकावलंस हे काय कमी होतं?+ आता माझ्या मुलाने आणलेली दूदाफळंही हवी आहेत का तुला?” तेव्हा राहेल म्हणाली: “ठीक आहे. आज रात्री तो तुझ्याजवळ राहील पण त्याच्या बदल्यात तुझ्या मुलाने आणलेली दूदाफळं मला दे.”

१६ संध्याकाळी याकोब शेतातून येत असताना, लेआ त्याला भेटायला गेली आणि म्हणाली: “आज रात्री तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात, कारण माझ्या मुलाने आणलेल्या दूदाफळांच्या मोबदल्यात मी तुम्हाला मागून घेतलं आहे.” तेव्हा तो त्या रात्री तिच्यासोबत राहिला. १७ देवाने लेआच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं व ती गरोदर राहिली आणि तिला याकोबपासून पाचवा मुलगा झाला. १८ तेव्हा लेआ म्हणाली: “मी माझी दासी माझ्या नवऱ्‍याला दिल्यामुळे, देवाने मला माझी मजुरी* दिली आहे.” म्हणून तिने त्याचं नाव इस्साखार*+ ठेवलं. १९ मग लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला याकोबपासून सहावा मुलगा झाला.+ २० तेव्हा लेआ म्हणाली: “देवाने मला खरंच एक चांगली भेट दिली आहे. आता तरी माझा नवरा माझा स्वीकार करेल,+ कारण मी त्याला सहा मुलं दिली आहेत.”+ म्हणून तिने त्याचं नाव जबुलून*+ ठेवलं. २१ त्यानंतर तिला एक मुलगी झाली आणि तिने तिचं नाव दीना+ ठेवलं.

२२ शेवटी देवाने राहेलची आठवण केली. त्याने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला मुलं होऊ दिली.*+ २३ मग ती गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “देवाने माझा कलंक दूर केला आहे!”+ २४ तिने आपल्या मुलाचं नाव योसेफ*+ ठेवलं आणि ती म्हणाली: “यहोवाने मला आणखी एक मुलगा दिला आहे.”

२५ राहेलने योसेफला जन्म दिल्यानंतर याकोब लगेच लाबानला म्हणाला: “मला आता जाऊ दे, म्हणजे मी माझ्या देशात, माझ्या घरी परत जाईन.+ २६ ज्यांच्यासाठी मी तुझ्याकडे सेवा केली, ती माझी बायकामुलं मला दे म्हणजे मला जाता येईल. मी आतापर्यंत तुझी किती विश्‍वासूपणे सेवा केली,+ हे तुला चांगलं माहीत आहे.” २७ तेव्हा लाबान त्याला म्हणाला: “कृपा करून मला सोडून जाऊ नकोस, कारण शकुन* पाहिल्यावर मला कळलं आहे, की तुझ्यामुळेच यहोवा मला आशीर्वाद देत आहे.” २८ मग तो पुढे म्हणाला: “तुझी मजुरी काय आहे ते सांग, मी ती तुला देईन.”+ २९ तेव्हा याकोब त्याला म्हणाला: “मी तुझी कशी सेवा केली आणि तुझी गुरंढोरं माझ्यामुळे कशी वाढली,+ हे तुला चांगलं माहीत आहे; ३० मी येण्याआधी तुझ्याजवळ फार कमी संपत्ती होती, पण आता तुझे कळप भरपूर वाढले आहेत आणि मी आल्यापासून यहोवाने तुला खूप आशीर्वाद दिले आहेत. मग माझ्या घरादाराकडे मी कधी लक्ष देणार?”+

३१ तेव्हा तो म्हणाला: “मी तुला काय देऊ?” यावर याकोब म्हणाला: “मला तुझ्याकडून काहीही नको! फक्‍त एक गोष्ट कर, मग मी तुझ्या कळपांना चारत राहीन आणि त्यांची राखण करत राहीन.+ ३२ आज मी तुझ्या सगळ्या कळपातून फिरेन. तू माझ्यासाठी कळपातून ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेल्या सगळ्या मेंढ्या, तपकिरी रंगाचे सगळे मेंढे आणि ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेल्या सगळ्या बकऱ्‍या बाजूला काढ. आजपासून ही माझी मजुरी असेल.+ ३३ पुढे ज्या दिवशी तू माझ्या मजुरीचा हिशोब घ्यायला येशील, तेव्हा माझा प्रामाणिकपणा* तुला दिसून येईल. जर माझ्या कळपात एखादी ठिपकेदार आणि रंगीत डाग नसलेली बकरी किंवा तपकिरी रंग नसलेला एखादा मेंढा दिसला, तर तो चोरलेला आहे हे तुला समजेल.”

३४ यावर लाबान म्हणाला: “ठीक आहे! तू म्हणतोस तसंच करू.”+ ३५ मग त्या दिवशी त्याने चट्टेपट्टे आणि रंगीत डाग असलेले सगळे बकरे आणि ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेल्या सगळ्या बकऱ्‍या, तसंच, पांढरे डाग असलेले आणि तपकिरी रंगाचे सगळे मेंढे, वेगळे काढून आपल्या मुलांकडे सांभाळायला दिले. ३६ त्यानंतर त्याने आपल्यामध्ये आणि याकोबमध्ये तीन दिवसांच्या प्रवासाचं अंतर ठेवलं. याकोब लाबानच्या उरलेल्या कळपांची राखण करू लागला.

३७ मग याकोबने लिवने,* बदाम आणि अर्मोन* या झाडांच्या काठ्या घेतल्या. त्याने त्या जागोजागी अशा सोलल्या, की त्यांच्यातला पांढरा भाग दिसू लागला. ३८ मग कळप जिथे पाणी प्यायला यायचे, तिथे त्याने त्या सोललेल्या काठ्या नाल्यांमध्ये आणि हौदांमध्ये त्यांच्यासमोर ठेवल्या. म्हणजे, कळप जेव्हा पाणी प्यायला येतील, तेव्हा त्या काठ्यांसमोर ते समागम करतील.

३९ कळप त्या काठ्यांसमोर समागम करायचे आणि त्यांना चट्टेपट्टे असलेली, ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेली पिल्लं व्हायची. ४० मग याकोबने हे मेंढे वेगळे केले. नंतर त्याने लाबानच्या कळपांना, चट्टेपट्टे आणि तपकिरी रंग असलेल्या कळपाकडे वळवलं. मग त्याने आपले कळप आणि लाबानचे कळप वेगवेगळे केले आणि त्यांना पुन्हा एकत्र केलं नाही. ४१ जेव्हा धष्टपुष्ट मेंढरांची समागम करण्याची वेळ यायची, तेव्हा याकोब नाल्यांमध्ये त्यांच्यासमोर त्या काठ्या ठेवायचा, म्हणजे त्या काठ्यांसमोर ती समागम करतील. ४२ पण जेव्हा मेंढरं दुबळी असायची, तेव्हा तो त्यांच्यासमोर काठ्या ठेवत नव्हता. म्हणून दुबळी मेंढरं नेहमी लाबानला मिळायची पण धष्टपुष्ट याकोबला मिळायची.+

४३ अशा रितीने याकोबची खूप भरभराट झाली आणि त्याच्याकडे पुष्कळ कळप, उंट, गाढवं आणि दासदासी झाल्या.+

३१ काही काळानंतर, याकोबने लाबानच्या मुलांना असं बोलताना ऐकलं: “याकोबने आमच्या वडिलांचं सगळं काही घेतलं. त्यातूनच त्याने त्याची संपत्ती जमवली आहे.”+ २ लाबानकडे पाहिल्यावर याकोबला कळायचं, की आपल्याशी त्याचं वागणं पहिल्यासारखं राहिलं नव्हतं.+ ३ शेवटी यहोवा याकोबला म्हणाला: “तू आपल्या वडिलांच्या आणि नातेवाइकांच्या देशात परत जा+ आणि मी नेहमी तुझ्यासोबत राहीन.” ४ मग याकोबने राहेल आणि लेआ यांना मैदानात आपल्या कळपाजवळ येण्यासाठी निरोप पाठवला. ५ तो त्यांना म्हणाला:

“मला असं दिसतंय की आता तुमचा पिता माझ्याशी पहिल्यासारखा वागत नाही.+ पण माझ्या वडिलांचा देव माझ्यासोबत आहे.+ ६ मी माझी सगळी ताकद लावून तुमच्या पित्याची सेवा केली,+ हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. ७ पण त्याने मला फसवण्याचा प्रयत्न केला आणि माझी मजुरी दहा वेळा बदलली; तरी देवाने त्याला माझं काही नुकसान करू दिलं नाही. ८ जेव्हा तो म्हणायचा: ‘ठिपकेदार मेंढरं ही तुझी मजुरी असेल,’ तेव्हा सगळ्या कळपात ठिपकेदार मेंढरं जन्माला यायची. पण जेव्हा तो म्हणायचा: ‘चट्टेपट्टे असणारी मेंढरं ही तुझी मजुरी असेल,’ तेव्हा सगळ्या कळपात चट्टेपट्टे असणारी मेंढरं जन्माला यायची.+ ९ म्हणून देव तुमच्या वडिलांची मेंढरं घेऊन, ती मला देत राहिला. १० एकदा जेव्हा कळपाची समागम करण्याची वेळ आली होती, तेव्हा मी स्वप्नात पाहिलं, की समागम करणारे बकरे चट्टेपट्टे असलेले, ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेले होते.+ ११ तेव्हा खऱ्‍या देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला: ‘याकोब!’ त्यावर मी उत्तर दिलं, ‘मी इथे आहे.’ १२ तो पुढे म्हणाला, ‘जरा नजर वर करून बघ, समागम करणारे सगळे बकरे चट्टेपट्टे असलेले, ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेले आहेत. कारण लाबानने तुझ्यासोबत जे काही केलं,+ ते मी पाहिलं आहे. १३ मी बेथेल+ इथला खरा देव आहे. तिथे तू स्मारक उभारून त्याचा अभिषेक केला होतास आणि शपथ घेतली होतीस.+ आता ऊठ आणि जिथे तुझा जन्म झाला त्या आपल्या देशात जायला नीघ.’”+

१४ तेव्हा राहेल आणि लेआ त्याला म्हणाल्या: “आमच्या वडिलांच्या घरात, आता आमच्या वारसाचा काही भाग उरला आहे का? १५ ते आम्हाला परकं समजतात, कारण ते आम्हाला विकून मिळालेल्या धनावर जगत आहेत.+ १६ देवाने आमच्या वडिलांकडून काढून घेतलेलं सगळं धन, आमचं आणि आमच्या मुलांचं आहे.+ तेव्हा देवाने तुम्हाला जसं सांगितलं आहे, त्याप्रमाणेच करा.”+

१७ मग याकोब उठला आणि त्याने आपल्या बायकामुलांना उंटांवर बसवलं.+ १८ त्याने पदन-अराम इथे जमवलेली सगळी गुरंढोरं आणि सगळी संपत्ती+ घेतली आणि तो आपला पिता इसहाक याच्या कनान देशात जायला निघाला.+

१९ लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरायला गेला होता, तेव्हा राहेलने त्याच्या कुलदैवतांच्या मूर्ती*+ चोरल्या.+ २० इतकंच नाही तर याकोब, अरामी लाबानशी चलाखीने वागला, कारण आपण निघून जात आहोत हे त्याने त्याला सांगितलं नव्हतं. २१ मग त्याच्याकडे जे काही होतं ते सर्व घेऊन तो पळून गेला आणि त्याने नदी* पार केली.+ तिथून तो गिलादच्या डोंगराळ प्रदेशाकडे+ जायला निघाला. २२ याकोब पळून गेला आहे, ही गोष्ट लाबानला तिसऱ्‍या दिवशी कळली. २३ तेव्हा आपल्या भावांना* घेऊन तो याकोबचा पाठलाग करत निघाला आणि सात दिवस प्रवास करून त्याने त्याला गिलादच्या डोंगराळ प्रदेशात गाठलं. २४ मग त्या रात्री देव अरामी लाबानच्या+ स्वप्नात+ येऊन म्हणाला: “तू याकोबशी चांगलंवाईट जे काही बोलशील, ते सांभाळून बोल.”+

२५ याकोबने आपला तंबू गिलादच्या डोंगराळ भागात ठोकला होता आणि लाबाननेही आपल्या भावांसोबत जवळच तंबू ठोकला. मग तो याकोबला भेटायला गेला. २६ तेव्हा लाबान याकोबला म्हणाला: “तू हे काय केलंस? मला फसवून, माझ्या मुलींना युद्धातल्या कैद्यांसारखं का घेऊन आलास? २७ तू चोरासारखा का पळून आलास? मला का फसवलंस, काही सांगितलं का नाहीस? सांगितलं असतंस, तर मी तुला आनंदाने गाणी गात, डफ आणि वीणा वाजवत पाठवलं असतं. २८ तू मला माझ्या नातवांचं* आणि मुलींचं चुंबनही घेऊ दिलं नाहीस. तू मूर्खासारखा वागलास. २९ मला हवं तर मी तुझं बरंवाईट करू शकतो. पण तुझ्या वडिलांचा देव काल रात्री माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला, ‘तू याकोबशी चांगलंवाईट जे काही बोलशील, ते सांभाळून बोल.’+ ३० तुला तुझ्या वडिलांच्या घरी जाण्याची ओढ लागली होती, म्हणून तू निघालास. पण तू माझे देव का चोरलेस?”+

३१ याकोबने लाबानला उत्तर दिलं: “कारण मी घाबरलो आणि मनात म्हणालो, ‘तू तुझ्या मुलींना माझ्याकडून जबरदस्तीने घेऊन जाशील.’ ३२ आता आपल्या भाऊबंदांसमोर माझ्या वस्तूंची झडती घे आणि जे काही तुझं असेल ते घे. तुझे देव तुला ज्याच्याकडे सापडतील तो जिवंत राहणार नाही.” पण राहेलने मूर्ती चोरल्या आहेत हे याकोबला माहीत नव्हतं. ३३ तेव्हा लाबान याकोबच्या तंबूमध्ये गेला. मग तो लेआच्या आणि दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला,+ पण त्याला मूर्ती सापडल्या नाहीत. तो लेआच्या तंबूमधून बाहेर आल्यावर राहेलच्या तंबूमध्ये गेला. ३४ पण यादरम्यान, राहेलने कुलदैवतांच्या मूर्ती घेऊन त्या उंटाच्या खोगिरात* लपवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. म्हणून लाबानने पूर्ण तंबूत शोधूनही त्याला त्या सापडल्या नाहीत. ३५ तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली: “प्रभू, माझ्यावर रागवू नका. माझी मासिक पाळी सुरू असल्यामुळे मी तुमच्यासमोर उठून उभी राहू शकत नाही.”+ मग लाबानने खूप शोधलं पण त्याला कुलदैवतांच्या मूर्ती सापडल्या नाहीत.+

३६ यावर याकोब चिडला आणि लाबानला म्हणू लागला: “एखाद्या गुन्हेगारासारखा माझा पाठलाग का करत आहेस? मी कोणतं पाप केलंय? ३७ तू माझ्या सगळ्या गोष्टींची झडती घेतलीस, तेव्हा तुला तुझ्या घरचं काय सापडलं? जर काही सापडलं असेल, तर ते इथे आपल्या भाऊबंदांसमोर ठेव आणि त्यांना तुझ्यामाझ्यात न्याय करू दे. ३८ मी तुझ्यासोबत २० वर्षं होतो, तेव्हा कधीही तुझ्या मेंढ्यांचा व बकऱ्‍यांचा गर्भपात झाला नाही+ आणि मी कधीही तुझ्या कळपातले मेंढे खाल्ले नाहीत. ३९ जंगली प्राण्यांनी मारलेली गुरंढोरं+ मी कधीही तुला दाखवायला आणली नाहीत. मी स्वतः त्यांचं नुकसान सहन करायचो. गुरंढोरं दिवसा चोरीला गेली असोत किंवा रात्री, तू माझ्याकडून भरपाई मागायचास. ४० मी दिवसा गरमीने आणि रात्री थंडीने बेजार व्हायचो आणि माझी झोप उडून जायची.+ ४१ मी १४ वर्षं तुझ्या मुलींसाठी आणि ६ वर्षं तुझ्या कळपासाठी, अशी २० वर्षं तुझ्या घरी तुझी सेवा केली. आणि तू दहा वेळा माझी मजुरी बदलत राहिलास.+ ४२ जर माझ्या वडिलांचा देव,+ अब्राहामचा देव आणि ज्या देवाचं इसहाक भय मानतो*+ तो माझ्यासोबत नसता, तर तू मला रिकाम्या हाताने पाठवलं असतंस. देवाने माझं दुःख आणि माझी मेहनत पाहिली आहे, म्हणून त्याने काल रात्री तुला ताकीद दिली.”+

४३ तेव्हा लाबान याकोबला म्हणाला: “या मुली माझ्या मुली आहेत आणि ही मुलं माझी नातवंडं आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तुझ्यासमोर आहे, ते माझं आणि माझ्या मुलींचं आहे. मी माझ्याच मुलींचं आणि नातवंडांचं नुकसान कसं करू शकतो? ४४ चल आता आपण दोघं आपसात एक करार करू. हा करार आपल्यामधला साक्षीदार असेल.” ४५ तेव्हा याकोबने एक दगड घेतला आणि तो स्मारक म्हणून ठेवला.+ ४६ त्यानंतर तो त्याच्या भाऊबंदांना म्हणाला: “दगड उचलून आणा.” त्यांनी दगड आणले आणि त्यांची रास बनवली. मग ते त्या दगडांच्या राशीजवळ जेवले. ४७ लाबानने त्या राशीला यगर-सहदूथा* असं नाव दिलं पण याकोबने तिला गालेद* म्हटलं.

४८ मग लाबान म्हणाला: “ही दगडांची रास आज आपल्यात साक्षीदार आहे.” म्हणून तिचं नाव गालेद+ ४९ आणि टेहळणी बुरूज असं पडलं. कारण तो म्हणाला: “आपण एकमेकांपासून दूर जाऊ, तेव्हा यहोवाचं तुझ्यामाझ्यावर लक्ष असू दे. ५० जर तू माझ्या मुलींशी वाईट वागलास किंवा माझ्या मुलींशिवाय आणखीन बायका केल्यास, तर लक्षात ठेव, की जरी कोणी माणसाने हे पाहिलं नाही, तरी देव आपल्यात साक्षीदार असेल.” ५१ लाबान पुढे याकोबला म्हणाला: “ही दगडांची रास इथे आहे आणि हे स्मारक मी आपल्यामध्ये उभं केलं आहे. ५२ ही दगडांची रास साक्षीदार असेल आणि हे स्मारक साक्ष देईल,+ की ही रास ओलांडून मी तुझं बरंवाईट करायला येणार नाही आणि तूसुद्धा ही रास आणि हे स्मारक ओलांडून माझं बरंवाईट करायला येणार नाहीस. ५३ अब्राहामचा देव,+ नाहोरचा देव आणि त्यांच्या वडिलांचा देव तुझ्यामाझ्यामध्ये न्याय करो.” तेव्हा याकोबने त्याचा पिता इसहाक ज्या देवाचं भय मानायचा,*+ त्या देवाच्या नावाने शपथ घेतली.

५४ मग याकोबने डोंगरावर बलिदान अर्पण केलं आणि आपल्या भाऊबंदांना जेवायला बोलावलं. तेव्हा ते जेवले आणि त्यांनी रात्री डोंगरावरच मुक्काम केला. ५५ लाबान पहाटे उठला आणि त्याने आपल्या नातवंडांचं* आणि मुलींचं चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला.+ मग तो आपल्या घरी परत गेला.+

३२ मग याकोब पुढच्या प्रवासाला निघाला आणि वाटेत त्याला देवाचे दूत भेटले. २ त्यांना पाहताच याकोब म्हणाला: “ही देवाच्या सैन्याची छावणी आहे!” म्हणून त्याने त्या जागेचं नाव महनाइम* ठेवलं.

३ नंतर याकोबने आपल्या सेवकांना सेईर+ देशातल्या अदोमच्या प्रदेशात,+ आपला भाऊ एसाव याच्याकडे निरोप घेऊन पाठवलं. ४ त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही माझा प्रभू एसाव याला असं सांगा, ‘तुझा सेवक याकोब म्हणतो: “मी लाबानसोबत बराच काळ राहिलो,*+ ५ आणि माझ्याकडे पुष्कळ बैल, गाढवं, मेंढरं आणि दासदासी झाल्या आहेत.+ माझ्या प्रभूची माझ्यावर कृपा व्हावी म्हणून मी तुला हा निरोप पाठवत आहे.”’”

६ काही काळाने ते सेवक याकोबकडे परत येऊन म्हणाले: “आम्ही तुझा भाऊ एसाव याला भेटलो आणि आता तो तुला भेटायला ४०० माणसांना घेऊन निघाला आहे.”+ ७ तेव्हा याकोब खूप घाबरला आणि चिंतेत पडला.+ म्हणून त्याने त्याच्यासोबत असलेल्या लोकांचे, तसंच कळपांचे, गुराढोरांचे आणि उंटांचे दोन गट केले. ८ तो म्हणाला: “जर एसावने एका गटावर हल्ला केला, तर दुसऱ्‍या गटाला पळून जाता येईल.”

९ त्यानंतर याकोबने अशी प्रार्थना केली: “माझा पिता अब्राहाम आणि माझा पिता इसहाक यांच्या देवा यहोवा, तू मला म्हणाला होतास, ‘आपल्या देशात आपल्या नातेवाइकांकडे परत जा आणि मी तुझं भलं करीन.’+ १० तू आपल्या सेवकाला दाखवलेल्या एकनिष्ठ प्रेमाच्या आणि विश्‍वासूपणाच्या मी लायक नाही.+ कारण मी यार्देन पार केली तेव्हा माझ्याकडे फक्‍त एक काठी होती, पण आता माझ्याकडे इतकं आहे, की मला त्याचे दोन गट करावे लागले.+ ११ कृपा करून मला माझा भाऊ एसाव याच्या हातून वाचव.+ कारण मला भीती वाटते, की तो येऊन माझ्यावर आणि स्त्रियांवर व मुलांवर हल्ला करेल.+ १२ पण तू म्हणालास: ‘मी तुझं भलं करीन आणि तुझी संतती* समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी अगणित करीन.’”+

१३ मग त्याने रात्री तिथे मुक्काम केला. नंतर त्याने आपल्याजवळ जे होतं, त्यातून काही आपला भाऊ एसाव याच्यासाठी भेट म्हणून काढलं.+ १४ म्हणजे, २०० बकऱ्‍या, २० बकरे, २०० मेंढ्या, २० मेंढे, १५ पिल्लांना दूध पाजणाऱ्‍या ३० उंटिणी, तसंच ४० गायी, १० बैल, २० गाढव्या आणि १० गाढवं काढली.+

१६ त्याने हे कळप, एकामागे एक आपल्या सेवकांकडे सोपवले आणि तो त्यांना म्हणाला: “तुम्ही माझ्यापुढे निघा आणि प्रत्येक कळपामध्ये अंतर ठेवा.” १७ त्याने पहिला कळप घेऊन जाणाऱ्‍या सेवकाला अशीही आज्ञा दिली: “जर माझा भाऊ एसाव तुला भेटला आणि त्याने विचारलं, ‘तुझा मालक कोण, तू कुठे चाललास आणि ही गुरंढोरं कोणाची आहेत?’ १८ तर तू असं बोल, ‘तुझा सेवक याकोब याची. माझा प्रभू एसाव+ याच्यासाठी त्याने ही भेट पाठवली आहे आणि पाहा तो स्वतः आमच्या मागोमाग येत आहे.’” १९ मग त्याने दुसऱ्‍या, तिसऱ्‍या आणि त्यांच्या मागोमाग कळप घेऊन जाणाऱ्‍या सर्व सेवकांना अशी आज्ञा दिली: “जेव्हा तुम्ही एसावला भेटाल, तेव्हा मी जसं सांगितलं तसंच बोला. २० आणि त्याला हेही सांगा, ‘तुझा सेवक याकोब आमच्या मागोमाग येत आहे.’” कारण याकोब मनातल्या मनात म्हणाला: “जर मी माझ्याआधी भेट पाठवून त्याला शांत केलं,+ तर मी त्याला भेटल्यावर तो कदाचित माझं प्रेमाने स्वागत करेल.” २१ तेव्हा भेट घेऊन जाणारे पुढे निघाले, पण याकोबने रात्री तिथेच तंबूमध्ये मुक्काम केला.

२२ नंतर त्या रात्री तो उठला आणि त्याने आपल्या दोन बायका,+ दोन दासी+ आणि आपल्या ११ मुलांना घेऊन यब्बोक+ नदीचा उथळ भाग पार केला आणि तो पलीकडे गेला. २३ अशा रितीने त्याने त्यांना नदीपलीकडे* आणलं. तसंच, त्याच्याकडे असलेलं सर्वकाही तो नदीपलीकडे घेऊन आला.

२४ शेवटी याकोब एकटाच राहिला. तेव्हा एक माणूस येऊन पहाट होईपर्यंत त्याच्याशी कुस्ती करू लागला.+ २५ जेव्हा त्याने पाहिलं की आपण याकोबला हरवू शकत नाही, तेव्हा त्याने त्याच्या मांडीच्या सांध्याला स्पर्श केला; त्यामुळे कुस्ती करताना याकोबच्या मांडीचा सांधा निखळला.+ २६ त्यानंतर तो म्हणाला: “पहाट होत आली, मला जाऊ दे.” यावर याकोब म्हणाला: “जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस, तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही.”+ २७ तेव्हा त्याने त्याला विचारलं: “तुझं नाव काय आहे?” यावर तो म्हणाला: “याकोब.” २८ मग तो म्हणाला: “आतापासून तुझं नाव याकोब नाही तर इस्राएल* असेल,+ कारण तू देवासोबत आणि माणसांसोबत लढलास+ आणि शेवटी विजयी झाला आहेस.” २९ तेव्हा याकोब त्याला म्हणाला: “कृपा करून मला तुझं नाव सांग.” पण तो म्हणाला: “माझं नाव का विचारतोस?”+ मग त्याने त्याला तिथे आशीर्वाद दिला. ३० म्हणून याकोबने त्या जागेचं नाव पनुएल*+ ठेवलं कारण तो म्हणाला: “मी देवाला समोरासमोर पाहिलं आणि तरी माझा जीव वाचला.”+

३१ तो पनुएल* इथून पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला होता, पण मांडीला इजा झाल्यामुळे तो लंगडत होता.+ ३२ त्यामुळे आजपर्यंत इस्राएलची मुलं प्राण्यांच्या मांडीच्या सांध्याजवळची नस खात नाहीत. कारण त्या माणसाने याकोबच्या मांडीच्या सांध्याला स्पर्श केला होता.

३३ यानंतर, याकोबने समोर पाहिलं आणि त्याला एसाव ४०० माणसांसोबत येताना दिसला.+ तेव्हा त्याने लेआ, राहेल आणि त्याच्या दोन दासींकडे आपापली मुलं दिली.+ २ त्याने आपल्या दासींना आणि त्यांच्या मुलांना सर्वात पुढे ठेवलं.+ त्यांच्यामागे लेआला व तिच्या मुलांना+ आणि शेवटी राहेल+ व योसेफ यांना ठेवलं. ३ मग तो स्वतः त्यांच्यापुढे गेला आणि जेव्हा तो त्याच्या भावाजवळ आला, तेव्हा त्याने सात वेळा जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमस्कार केला.

४ पण एसाव पळत त्याला भेटायला आला आणि त्याने त्याला मिठी मारून त्याचं चुंबन घेतलं आणि ते दोघं रडू लागले. ५ एसावने नजर वर करून पाहिलं, तेव्हा त्याला स्त्रिया आणि मुलं दिसली. त्याने विचारलं: “तुझ्यासोबत हे कोण आहेत?” त्यावर याकोब म्हणाला: “देवाने तुझ्या सेवकाला दिलेल्या आशीर्वादामुळे झालेली ही मुलं आहेत.”+ ६ तेव्हा दासी आपल्या मुलांना घेऊन पुढे आल्या आणि त्यांनी त्याला वाकून नमस्कार केला. ७ मग लेआही आपल्या मुलांना घेऊन पुढे आली आणि त्यांनी त्याला वाकून नमस्कार केला. त्यानंतर, योसेफ आणि राहेल पुढे आले आणि त्यांनीही त्याला वाकून नमस्कार केला.+

८ एसाव म्हणाला: “मला जी माणसं आणि गुरंढोरं भेटली ती तू का पाठवलीस?”+ यावर याकोब म्हणाला: “माझ्या प्रभूची माझ्यावर कृपा व्हावी म्हणून.”+ ९ तेव्हा एसाव म्हणाला: “माझ्या भावा, माझ्याकडे खूप धनसंपत्ती आहे.+ तुझं आहे ते तुझ्याकडेच राहू दे.” १० पण याकोब त्याला म्हणाला: “असं म्हणू नकोस. जर तुझी माझ्यावर कृपा झाली असेल, तर तू माझी भेट स्वीकारलीच पाहिजे. तुझा चेहरा पाहता यावा म्हणून मी ही भेट आणली होती. तू माझं प्रेमाने स्वागत केल्यामुळे, तुझा चेहरा पाहून मला देवाचा चेहरा पाहिल्यासारखं वाटलं.+ ११ तेव्हा आता कृपा करून माझी ही भेट स्वीकार.+ कारण देवाने मला आशीर्वाद दिला आहे आणि माझ्याकडे मला हवं असलेलं सर्वकाही आहे.”+ तो आग्रह करत राहिला, म्हणून एसावने त्याची भेट स्वीकारली.

१२ नंतर एसाव म्हणाला: “चल, आता आपण निघू आणि पुढचा प्रवास सोबत करू.” १३ पण याकोब त्याला म्हणाला: “प्रभू, तुला तर माहीत आहे, की ही मुलं नाजूक आहेत.+ आणि दूध पाजणाऱ्‍या मेंढ्यांना आणि गुराढोरांनाही मला सांभाळलं पाहिजे. कारण त्यांना एक दिवस जरी जोरात हाकलं, तर सगळा कळप मरून जाईल. १४ म्हणून हे प्रभू, तू कृपा करून तुझ्या या सेवकाच्या पुढे नीघ. आणि मी मागून माझ्या गुराढोरांना आणि मुलाबाळांना सोसेल तसा प्रवास करीन आणि तुला सेईर इथे भेटीन.”+ १५ तेव्हा एसाव म्हणाला: “माझं ऐक. माझ्या काही माणसांना तुझ्यासोबतच राहू दे.” यावर याकोब म्हणाला: “कशासाठी? फक्‍त तुझी कृपा माझ्यावर असू दे प्रभू.” १६ म्हणून त्या दिवशी एसाव सेईरला परत जायला निघाला.

१७ याकोब प्रवास करत सुक्कोथला+ पोहोचला. तिथे त्याने स्वतःसाठी घर आणि आपल्या गुराढोरांसाठी गोठे बांधले. म्हणून त्याने त्या ठिकाणाचं नाव सुक्कोथ* ठेवलं.

१८ पदन-अराम+ इथून प्रवास करत याकोब कनान+ देशातल्या शखेम+ या शहरात सुखरूप येऊन पोहोचला. त्याने त्या शहराजवळ तळ दिला. १९ मग, ज्या मैदानात त्याने आपला तंबू ठोकला होता, त्याचा काही भाग त्याने शखेमचा पिता हमोर याच्या मुलांकडून १०० चांदीचे तुकडे देऊन विकत घेतला.+ २० तिथे त्याने एक वेदी बांधली आणि तिला, देव हा इस्राएलचा देव आहे असं नाव दिलं.+

३४ याकोबला लेआपासून+ झालेली मुलगी, दीना ही नेहमी त्या देशातल्या मुलींना भेटायला* जायची.+ २ तेव्हा शखेम, जो देशाचा प्रधान, हिव्वी+ हमोर याचा मुलगा होता, त्याने दीनाला पाहिलं आणि त्याने तिला नेऊन तिची अब्रू लुटली. ३ याकोबची मुलगी दीना हिच्यात त्याचा जीव अडकला आणि तो तिच्या प्रेमात पडला. तिचं मन जिंकण्यासाठी तो तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी करू लागला.* ४ शेवटी शखेम आपला पिता हमोर+ याला म्हणाला: “माझं या मुलीशी लग्न करून द्या.”

५ शखेमने आपली मुलगी दीना हिची अब्रू लुटली हे याकोबला कळलं, तेव्हा त्याची मुलं त्याच्या गुरांना रानात घेऊन गेली होती. म्हणून आपली मुलं परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला. ६ नंतर शखेमचा पिता हमोर याकोबशी बोलायला आला. ७ पण याकोबच्या मुलांना सगळी हकिगत कळली आणि ती ताबडतोब रानातून परत आली. ती दुखावली गेली होती आणि अतिशय संतापली होती, कारण शखेमने याकोबच्या मुलीची अब्रू लुटून एक दुष्ट कृत्य+ केलं होतं आणि इस्राएलचा अपमान केला होता.+

८ हमोर त्यांना म्हणाला: “माझा मुलगा शखेम याचा जीव तुमच्या मुलीत अडकलाय.* कृपा करून तिचं त्याच्याशी लग्न करून द्या. ९ आमच्याशी लग्नाचे संबंध जोडा.* तुमच्या मुली आम्हाला द्या आणि आमच्या मुली तुम्ही करा.+ १० तुम्ही आमच्यामध्ये राहू शकता. आमचा सगळा देश तुमच्यासाठी खुला आहे. इथे राहा, व्यापार करा आणि आपली धनसंपत्ती वाढवा.” ११ मग शखेम तिच्या वडिलांना आणि तिच्या भावांना म्हणाला: “माझ्यावर ही कृपा करा, तुम्ही जे मागाल ते द्यायला मी तयार आहे. १२ तुम्हाला वाटेल तितका मोठा मोबदला* आणि आहेर तुम्ही मागू शकता.+ तुम्ही म्हणाल ते द्यायला मी तयार आहे. फक्‍त तुमच्या मुलीशी मला लग्न करू द्या.”

१३ पण, याकोबच्या मुलांनी शखेम आणि त्याचा पिता हमोर याला कपटीपणाने उत्तर दिलं, कारण त्याने त्यांची बहीण दीना हिची अब्रू लुटली होती. १४ ते त्यांना म्हणाले: “सुंता न झालेल्या माणसाशी आमच्या बहिणीचं लग्न लावून देण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही.+ आमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. १५ फक्‍त एका अटीवर आम्ही होकार देऊ: तुमच्यापैकी सर्व पुरुषांनी सुंता करून आमच्यासारखं झालं पाहिजे.+ १६ तेव्हाच आम्ही आमच्या मुली तुम्हाला देऊ आणि तुमच्या मुली आम्ही करू आणि तुमच्यासोबत राहू व आपण एक राष्ट्र बनू. १७ पण जर तुम्ही ही अट मान्य करून सुंता केली नाही, तर आम्ही आमच्या मुलीला घेऊन जाऊ.”

१८ त्यांची ही गोष्ट हमोर+ आणि त्याचा मुलगा शखेम+ याला पटली. १९ त्याने वेळ न घालवता त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं,+ कारण तो याकोबच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. शिवाय, त्याच्या वडिलांच्या घराण्यात तो सर्वात आदरणीय होता.

२० म्हणून हमोर आणि त्याचा मुलगा शखेम शहराच्या फाटकाजवळ गेले आणि शहराच्या माणसांना+ म्हणाले: २१ “या लोकांना आपल्यासोबत शांतीने राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्यांना आपल्या देशात राहू द्या आणि व्यापार करू द्या. कारण त्यांच्यासाठीही आपल्या देशात भरपूर जागा आहे. आपण त्यांच्या मुलींशी लग्नं करू आणि आपल्या मुलीही त्यांना देऊ.+ २२ आपल्यासोबत राहण्यासाठी आणि एक राष्ट्र होण्यासाठी त्यांची फक्‍त एक अट आहे: आपल्यापैकी प्रत्येक पुरुषाने त्यांच्यासारखी सुंता केली पाहिजे.+ २३ आपण असं केलं, तर त्यांची धनसंपत्ती, मालमत्ता आणि गुरंढोरं आपलीच आहेत. म्हणून आपण त्यांची ही अट मान्य करू, म्हणजे ते आपल्यामध्ये राहतील.” २४ शहराच्या फाटकाजवळ जमलेल्या सर्वांनी हमोर आणि त्याचा मुलगा शखेम यांचं म्हणणं ऐकलं आणि तिथे जमलेल्या सर्व पुरुषांनी सुंता केली.

२५ पण, तिसऱ्‍या दिवशी ते अजूनही वेदनेने बेजार असताना, शिमोन आणि लेवी या याकोबच्या दोन मुलांनी, म्हणजे दीनाच्या भावांनी+ आपापली तलवार घेतली आणि शहरात जाऊन सर्व बेसावध पुरुषांची कत्तल केली.+ २६ त्यांनी हमोर आणि त्याचा मुलगा शखेम यांना तलवारीने ठार मारलं आणि मग दीनाला शखेमच्या घरातून घेऊन ते निघून गेले. २७ मग जिथे माणसांची कत्तल झाली होती, तिथे येऊन याकोबच्या इतर मुलांनी शहर लुटलं, कारण तिथे त्यांच्या बहिणीची अब्रू लुटली गेली होती.+ २८ त्यांनी त्यांचे कळप, गुरंढोरं, गाढवं आणि शहरात आणि रानात त्यांचं जे काही होतं ते सर्व लुटलं. २९ तसंच त्यांनी त्यांची सगळी मालमत्ता घेतली, त्यांच्या लहान मुलांना आणि बायकांना बंदी बनवलं आणि त्यांच्या घरांत होतं नव्हतं ते सगळं लुटून नेलं.

३० तेव्हा याकोब शिमोन आणि लेवी यांना म्हणाला:+ “तुम्ही मला मोठ्या संकटात टाकलं आहे.* माझे लोक आधीच फार थोडे आहेत. आणि आता या देशातले कनानी आणि परिज्जी लोक माझा द्वेष करतील* आणि ते एकत्र येऊन नक्की माझ्यावर हल्ला करतील. ते माझा आणि माझ्या घराण्याचा सर्वनाश करतील.” ३१ पण ते त्याला म्हणाले: “कोणी आमच्या बहिणीला वेश्‍येसारखं वागवावं का?”

३५ त्यानंतर देव याकोबला म्हणाला: “ऊठ आणि बेथेलला+ जाऊन राहा. तुझा भाऊ एसाव याच्यापासून तू पळत होतास,+ तेव्हा जो तुझ्यासमोर प्रकट झाला होता, त्या खऱ्‍या देवासाठी तिथे एक वेदी बांध.”

२ मग याकोब आपल्या घराण्यातल्या आणि आपल्यासोबत असलेल्या सर्व लोकांना म्हणाला: “तुमच्याजवळ असलेले सर्व परके देव काढून टाका+ आणि स्वतःला शुद्ध करून कपडे बदला. ३ आणि चला आपण बेथेलला जाऊ या. माझ्या दुःखाच्या काळात ज्या खऱ्‍या देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि मी जिथेजिथे गेलो तिथेतिथे* जो माझ्यासोबत होता,+ त्या देवासाठी मी एक वेदी बांधीन.” ४ तेव्हा त्यांनी आपल्याजवळ असलेले सगळे परके देव आणि आपल्या कानातली कुंडले याकोबला दिली. त्याने ते सर्व शखेमच्या जवळ असलेल्या मोठ्या झाडाखाली पुरलं.*

५ तिथून ते पुढे प्रवास करू लागले, तेव्हा आसपासच्या सर्व शहरांना देवाची दहशत बसली, आणि त्यामुळे त्यांनी याकोबच्या मुलांचा पाठलाग केला नाही. ६ शेवटी याकोब आणि त्याच्यासोबत असलेले सर्व लोक कनान देशात, लूज+ म्हणजेच बेथेल इथे येऊन पोहोचले. ७ तिथे त्याने एक वेदी बांधून त्या ठिकाणाला एल-बेथेल* असं नाव दिलं. कारण तो आपला भाऊ एसाव याच्यापासून पळत असताना, याच ठिकाणी खरा देव त्याच्यासमोर प्रकट झाला होता.+ ८ नंतर रिबकाची दाई, दबोरा+ मरण पावली आणि तिला बेथेलच्या पायथ्याशी असलेल्या एका अल्लोनच्या* झाडाखाली पुरण्यात आलं. म्हणून त्याने त्या झाडाचं नाव अल्लोन-बाकूथ* ठेवलं.

९ याकोब पदन-अरामवरून येत असताना, देवाने पुन्हा एकदा त्याच्यासमोर प्रकट होऊन त्याला आशीर्वाद दिला. १० देव त्याला म्हणाला: “तुझं नाव याकोब आहे.+ पण यापुढे तुझं नाव याकोब नाही, तर इस्राएल असेल.” आणि तेव्हापासून तो त्याला इस्राएल या नावाने हाक मारू लागला.+ ११ देव त्याला पुढे म्हणाला: “मी सर्वशक्‍तिमान देव आहे.+ फलदायी हो आणि आपली संख्या वाढव. तुझ्यापासून पुष्कळ राष्ट्रं आणि राष्ट्रांचा समुदाय येईल.+ तुझ्या वंशातून राजे येतील.+ १२ जो देश मी अब्राहामला आणि इसहाकला दिला आहे, तो मी तुला आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीला* देईन.”+ १३ मग त्या ठिकाणी त्याच्याशी बोलल्यावर, देव तिथून निघून गेला.

१४ तेव्हा ज्या ठिकाणी देव याकोबशी बोलला होता, तिथे याकोबने स्मारक म्हणून एक दगड उभा केला आणि त्यावर त्याने पेयार्पण आणि तेल ओतलं.+ १५ आणि जिथे देव त्याच्याशी बोलला होता, त्या ठिकाणाला याकोब बेथेल असं म्हणू लागला.+

१६ मग ते बेथेलहून पुढच्या प्रवासाला निघाले. ते एफ्राथपासून काही अंतरावर असताना, राहेलला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. मुलाला जन्म देताना तिला खूप त्रास झाला. १७ तिला असह्‍य वेदना होत असताना सुईण तिला म्हणाली: “घाबरू नकोस, तुझ्या या मुलाचाही सुखरूप जन्म होईल.”+ १८ राहेल अगदी मरायला टेकली होती. तिचा जीव जात असताना तिने आपल्या मुलाचं नाव बेन-ओनी* ठेवलं. पण त्याच्या वडिलांनी त्याचं नाव बन्यामीन*+ ठेवलं. १९ अशा रितीने, एफ्राथ म्हणजेच बेथलेहेमच्या+ मार्गावर राहेलचा मृत्यू झाला आणि तिला तिथेच पुरण्यात आलं. २० याकोबने तिच्या कबरेवर एक मोठा दगड उभा केला. आजही तो दगड राहेलच्या कबरेवर आहे.

२१ त्यानंतर, इस्राएल पुढच्या प्रवासाला निघाला आणि त्याने एदर बुरुजाच्या पलीकडे काही अंतरावर आपला तंबू ठोकला. २२ इस्राएल त्या देशात राहत असताना, एकदा रऊबेनने जाऊन आपल्या वडिलांची उपपत्नी बिल्हा हिच्याशी संबंध ठेवले आणि इस्राएलला या गोष्टीबद्दल समजलं.+

याकोबला १२ मुलं होती. २३ याकोबचा पहिला मुलगा रऊबेन,+ मग शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार आणि जबुलून ही त्याला लेआपासून झालेली मुलं होती. २४ राहेलपासून त्याला योसेफ आणि बन्यामीन ही मुलं झाली. २५ राहेलची दासी, बिल्हा हिच्यापासून याकोबला दान आणि नफताली ही मुलं झाली. २६ आणि लेआची दासी, जिल्पा हिला गाद आणि आशेर ही मुलं झाली. पदन-अराम इथे याकोबला झालेली ही मुलं होती.

२७ शेवटी याकोब मम्रे इथे आपला पिता इसहाक याच्याकडे आला.+ हे ठिकाण किर्याथ-अर्बा म्हणजेच हेब्रोन इथे असून, अब्राहाम आणि इसहाक या ठिकाणी विदेशी म्हणून राहिले होते.+ २८ इसहाक १८० वर्षं जगला.+ २९ अशा रितीने, बरीच वर्षं जगल्यावर, इसहाक म्हातारा होऊन सुखाने मरण पावला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.* मग एसाव आणि याकोब या त्याच्या मुलांनी त्याला पुरलं.+

३६ एसाव म्हणजेच अदोम+ याचा हा वृत्तान्त आहे.

२ एसावने कनान देशातल्या या मुलींशी लग्न केलं: हित्ती एलोन+ याची मुलगी आदा,+ आणि अनाची मुलगी, म्हणजे हिव्वी सिबोन याची नात अहलीबामा;+ ३ आणि इश्‍माएलची मुलगी, म्हणजे नबायोथची+ बहीण बासमथ.+

४ एसाव याला आदापासून अलीफज आणि बासमथपासून रगुवेल ही मुलं झाली.

५ तसंच, त्याला अहलीबामापासून यऊश, यालाम, आणि कोरह+ ही मुलं झाली.

एसावला ही मुलं कनान देशात झाली. ६ त्यानंतर एसाव आपल्या बायका, मुलं, मुली, आपल्या घराण्यातले सर्व लोक,* आपले कळप आणि इतर सर्व जनावरं, तसंच, कनान देशात त्याने जमवलेली सगळी संपत्ती+ घेऊन आपला भाऊ याकोब याच्यापासून दूर, दुसऱ्‍या देशात राहायला गेला.+ ७ कारण त्यांची मालमत्ता खूप वाढल्यामुळे त्यांना एकत्र राहणं शक्य नव्हतं आणि ज्या देशात ते राहत होते* तिथली जमीन त्यांच्या कळपांना कमी पडू लागली. ८ म्हणून, एसाव सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशात राहू लागला. एसाव म्हणजे अदोम.+

९ सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या अदोमी लोकांचा मूळपुरुष एसाव, याचा हा वृत्तान्त आहे.

१० एसावच्या मुलांची नावं: आदापासून झालेला अलीफज आणि बासमथपासून झालेला रगुवेल.+

११ अलीफजला तेमान,+ ओमार, सपो, गाताम आणि कनाज ही मुलं झाली.+ १२ एसावचा मुलगा अलीफज याच्या उपपत्नीचं नाव तिम्ना होतं. पुढे अलीफजला तिच्यापासून अमालेक+ झाला. ही एसावची बायको आदा हिची मुलं आहेत.

१३ रगुवेलच्या मुलांची नावं: नहाथ, जेरह, शाम्मा, आणि मिज्जा. ही एसावची बायको, बासमथ+ हिची मुलं होती.

१४ एसावची बायको अहलीबामा, जी अनाची मुलगी म्हणजे सिबोनची नात होती, तिच्यापासून एसावला झालेल्या मुलांची नावं: यऊश, यालाम, आणि कोरह.

१५ एसावच्या मुलांपासून आलेले शेख* हे होते:+ एसावचा पहिला मुलगा अलीफज याची मुलं: शेख तेमान, शेख ओमार, शेख सपो, शेख कनाज,+ १६ शेख कोरह, शेख गाताम, आणि शेख अमालेक. अदोमच्या देशात अलीफजपासून+ आलेले हे शेख आहेत. ही आदापासून झालेली मुलं आहेत.

१७ एसावचा मुलगा रगुवेल याच्या मुलांची नावं: शेख नहाथ, शेख जेरह, शेख शाम्मा, आणि शेख मिज्जा. अदोम+ देशात रगुवेलपासून आलेले हे शेख आहेत. ही एसावची बायको बासमथ हिच्यापासून झालेली मुलं आहेत.

१८ एसावची बायको अहलीबामा हिच्या मुलांची नावं: शेख यऊश, शेख यालाम, आणि शेख कोरह. हे एसावची बायको, म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा हिच्यापासून आलेले शेख आहेत.

१९ ही एसाव म्हणजे अदोम+ याची मुलं आणि त्यांच्यापासून आलेले शेख आहेत.

२० त्या देशात राहणाऱ्‍या लोकांची, म्हणजे होरी सेईर याच्या मुलांची नावं:+ लोटान, शोबाल, सिबोन, अना,+ २१ दिशोन, एजेर, आणि दिशान.+ हे अदोम देशात राहणाऱ्‍या होरी लोकांचे शेख, म्हणजे सेईरची मुलं आहेत.

२२ होरी आणि हेमाम ही लोटानची मुलं होती आणि लोटानच्या बहिणीचं नाव तिम्ना+ होतं.

२३ शोबालच्या मुलांची नावं: अलवान, मानाहथ, एबाल, शपो, आणि ओनाम.

२४ सिबोनच्या+ मुलांची नावं: अय्या आणि अना. अना हा आपला पिता सिबोन याच्या गाढवांची राखण करत असताना, त्याला रानात गरम पाण्याचे झरे सापडले होते.

२५ अनाच्या मुलांची नावं: दिशोन आणि अनाची मुलगी अहलीबामा.

२६ दिशोनच्या मुलांची नावं: हेमदान, एश्‍बान, इथ्रान, आणि करान.+

२७ एजेरच्या मुलांची नावं: बिल्हान, जावान, आणि अकान.

२८ दिशानच्या मुलांची नावं: ऊस आणि अरान.+

२९ होरी लोकांचे शेख: शेख लोटान, शेख शोबाल, शेख सिबोन, शेख अना, ३० शेख दिशोन, शेख एजेर, आणि शेख दिशान.+ सेईर देशात राहणारे हे होरी लोकांचे शेख आहेत.

३१ इस्राएली* लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्याआधी,+ अदोम+ देशात या राजांनी राज्य केलं. ३२ बौरचा मुलगा बेला याने अदोमवर राज्य केलं आणि त्याच्या शहराचं नाव दिन्हाबा होतं. ३३ बेला मरण पावल्यावर, बस्रा इथल्या जेरहचा मुलगा योबाब त्याच्या जागी राज्य करू लागला. ३४ योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशातला हूशाम त्याच्या जागी राज्य करू लागला. ३५ हूशाम मरण पावल्यावर, बदादचा मुलगा हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला. हदादने मवाबच्या प्रदेशात* मिद्यानी+ लोकांना हरवलं होतं आणि त्याच्या शहराचं नाव अवीत होतं. ३६ हदाद मरण पावल्यावर, मास्रेका इथला साम्ला त्याच्या जागी राज्य करू लागला. ३७ साम्ला मरण पावल्यावर, नदीच्या जवळ असलेल्या रहोबोथचा शौल त्याच्या जागी राज्य करू लागला. ३८ शौल मरण पावल्यावर, अखबोरचा मुलगा बाल-हनान त्याच्या जागी राज्य करू लागला. ३९ अखबोरचा मुलगा बाल-हनान मरण पावल्यावर, हदार त्याच्या जागी राज्य करू लागला. त्याच्या शहराचं नाव पाऊ होतं. त्याच्या बायकोचं नाव महेटाबेल होतं. ती मात्रेदची मुलगी आणि मेजाहाबची नात होती.

४० एसावपासून आलेले शेख, त्यांची घराणी, त्यांची राहण्याची ठिकाणं आणि त्यांची नावं अशी आहेत: शेख तिम्ना, शेख आल्वा, शेख यतेथ,+ ४१ शेख अहलीबामा, शेख एलाह, शेख पीनोन, ४२ शेख कनाज, शेख तेमान, शेख मिब्सार, ४३ शेख माग्दीएल, आणि शेख ईराम. देशातल्या वेगळ्यावेगळ्या भागात आपापल्या वस्त्यांमध्ये राहणारे हे अदोमचे शेख आहेत.+ एसाव हा अदोमी लोकांचा मूळपुरुष आहे.+

३७ याकोब कनान देशातच राहू लागला. या देशात त्याचा पिताही विदेशी म्हणून राहिला होता.+

२ हा याकोबच्या कुटुंबाचा वृत्तान्त आहे.*

योसेफ+ १७ वर्षांचा असताना, आपल्या वडिलांच्या बायका बिल्हा आणि जिल्पा यांच्या मुलांसोबत+ कळप चारायला जायचा.+ एकदा योसेफने त्यांच्या वाईट वागणुकीबद्दल आपल्या वडिलांना येऊन सांगितलं. ३ आपल्या सर्व मुलांपेक्षा+ इस्राएलचं योसेफवर जास्त प्रेम होतं, कारण तो त्याला म्हातारपणी झाला होता. त्याने योसेफसाठी एक खास झगा* बनवून घेतला होता. ४ आपल्या वडिलांचं योसेफवर सर्वात जास्त प्रेम आहे हे त्याच्या भावांनी पाहिलं, तेव्हा ते त्याचा द्वेष करू लागले. ते कधीच त्याच्याशी प्रेमाने बोलत नव्हते.

५ पुढे, योसेफला एक स्वप्न पडलं आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितलं.+ तेव्हा, ते त्याचा आणखीनच द्वेष करू लागले. ६ तो त्यांना म्हणाला: “मला पडलेलं स्वप्न ऐका. ७ आपण सर्व जण शेतात पेंढ्या बांधत होतो. तेव्हा, माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती उभ्या राहून, माझ्या पेंढीला नमन करू लागल्या.”+ ८ त्याचे भाऊ त्याला म्हणाले: “तू काय आता आमचा राजा होऊन आमच्यावर अधिकार चालवणार आहेस?”+ अशा रितीने, योसेफच्या स्वप्नांमुळे आणि तो जे बोलला त्यामुळे त्याच्या भावांना त्याचा द्वेष करण्याचं आणखी एक कारण मिळालं.

९ यानंतर त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं आणि त्याने तेही आपल्या भावांना सांगितलं. तो म्हणाला: “मी अजून एक स्वप्न पाहिलं. यावेळी सूर्य, चंद्र आणि ११ तारे मला वाकून नमन करत होते.”+ १० मग त्याने ते स्वप्न आपल्या भावांसोबत आपल्या वडिलांनाही सांगितलं. तेव्हा, त्याचे वडील त्याला रागावून म्हणाले: “तुझ्या या स्वप्नाचा अर्थ काय आहे? म्हणजे मी, तुझी आई आणि तुझे भाऊ तुझ्यासमोर येऊन जमिनीपर्यंत वाकून तुला नमन करू?” ११ त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले,+ पण त्याच्या वडिलांनी योसेफचे शब्द आपल्या मनात ठेवले.

१२ नंतर त्याचे भाऊ त्यांच्या वडिलांच्या कळपांना चारायला शखेमजवळ+ गेले. १३ तेव्हा इस्राएल योसेफला म्हणाला: “तुझे भाऊ कळपांना घेऊन शखेमजवळ गेले आहेत ना? तर तू आता त्यांच्याकडे जा.” तेव्हा तो म्हणाला: “हो, मी जातो.” १४ मग तो योसेफला म्हणाला: “जरा जाऊन तुझे भाऊ बरे आहेत ना, आणि कळपही ठीक आहेत ना ते बघ आणि मला येऊन सांग.” असं म्हणून त्याने योसेफला हेब्रोनच्या+ खोऱ्‍यातून* पाठवलं आणि योसेफ पुढे शखेमला गेला. १५ नंतर, तो रानात भटकत असताना एक माणूस त्याला भेटला आणि म्हणाला: “काय शोधत आहेस?” १६ तेव्हा तो म्हणाला: “मी माझ्या भावांना शोधतोय. ते कुठे कळप चारत आहेत, हे सांगाल का मला?” १७ तो माणूस म्हणाला: “ते इथून पुढे गेले आहेत. कारण ‘आपण दोथानला जाऊ या’ असं मी त्यांना म्हणताना ऐकलं.” म्हणून योसेफ आपल्या भावांना शोधायला गेला आणि ते त्याला दोथान इथे दिसले.

१८ मग त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिलं आणि तो त्यांच्याजवळ पोहोचण्याआधीच ते त्याला मारून टाकण्याचा कट रचू लागले. १९ ते एकमेकांना म्हणू लागले: “तो बघा, आला स्वप्न पाहणारा!+ २० चला आपण त्याला मारून टाकू आणि एका खड्ड्यात फेकून देऊ. एखाद्या जंगली प्राण्याने त्याला फाडून खाल्लं असं सांगू. मग पाहू काय होतं त्याच्या स्वप्नांचं.” २१ जेव्हा रऊबेनने+ हे ऐकलं, तेव्हा त्याने योसेफला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. तो त्यांना म्हणाला: “त्याचा जीव नको घ्यायला.”+ २२ रऊबेन पुढे म्हणाला: “रक्‍त सांडू नका.+ हवं तर त्याला रानातल्या या खड्ड्यात टाकून द्या, पण त्याला काही इजा करू नका.”*+ रऊबेनला त्याला त्यांच्यापासून वाचवून आपल्या वडिलांकडे परत न्यायचं असल्यामुळे तो असं बोलला.

२३ योसेफ आपल्या भावांजवळ पोहोचताच, त्यांनी त्याच्या अंगावरचा खास झगा काढून घेतला,+ २४ आणि त्याला धरून त्या खड्ड्यात फेकून दिलं. त्या खड्ड्यात पाणी नव्हतं, तो कोरडा होता.

२५ मग ते जेवायला बसले. त्यांनी समोर पाहिलं, तेव्हा त्यांना गिलादहून येत असलेला इश्‍माएली+ लोकांचा एक काफिला दिसला. ते आपल्या उंटांवर सुगंधी डिंक, बाल्सम,* आणि झाडांची सुगंधी साल+ लादून खाली इजिप्तला जात होते. २६ तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला: “स्वतःच्या भावाचा जीव घेऊन आणि त्याचा खून लपवून आपल्याला काय मिळणार आहे?+ २७ त्यापेक्षा चला, आपण त्याला या इश्‍माएली लोकांना विकून टाकू.+ आपण त्याला इजा का करावी? शेवटी तो आपलाच भाऊ, आपल्याच हाडामांसाचा आहे.” तेव्हा त्यांनी आपल्या भावाचं म्हणणं ऐकलं. २८ मग ते मिद्यानी+ व्यापारी त्यांच्याजवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफला त्या खड्ड्यातून बाहेर काढलं आणि चांदीच्या २० तुकड्यांच्या मोबदल्यात त्याला त्या इश्‍माएली लोकांना विकून टाकलं.+ ती माणसं योसेफला इजिप्तला घेऊन गेली.

२९ नंतर जेव्हा रऊबेनने त्या खड्ड्याजवळ येऊन योसेफ तिथे नसल्याचं पाहिलं, तेव्हा त्याने दुःखाने आपले कपडे फाडले. ३० तो त्याच्या भावांजवळ जाऊन म्हणाला: “ते लेकरू तिथे नाही! आता मी काय करू?”

३१ तेव्हा त्यांनी योसेफचा झगा घेतला आणि एक मेंढा कापून त्याच्या रक्‍तात तो बुडवला. ३२ मग त्यांनी तो खास झगा आपल्या वडिलांकडे पाठवला आणि सोबत असा निरोप पाठवला: “आम्हाला हा झगा सापडला. हा तुमच्या मुलाचा आहे की नाही ते पाहा.”+ ३३ तेव्हा त्याने तो तपासून पाहिला आणि म्हणाला: “हा माझ्याच मुलाचा झगा आहे! एखाद्या जंगली प्राण्याने त्याला खाल्लं असेल! नक्कीच योसेफचे फाडून तुकडे केले असतील त्याने!” ३४ मग, याकोबने दुःखाने आपले कपडे फाडले आणि कमरेभोवती गोणपाट गुंडाळून तो बरेच दिवस आपल्या मुलासाठी शोक करत राहिला. ३५ त्याच्या सर्व मुलांनी आणि मुलींनी त्याचं सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या त्याचं सांत्वन झालं नाही. तो सारखा म्हणत राहिला: “मी माझ्या मुलासाठी असाच शोक करत कबरेत*+ जाईन!” आणि योसेफचा पिता त्याच्यासाठी रडत राहिला.

३६ मिद्यानी लोकांनी योसेफला इजिप्तमध्ये फारोच्या दरबारात एक अधिकारी आणि पहारेकऱ्‍यांचा प्रमुख असलेल्या पोटीफरला+ विकलं.

३८ त्या सुमारास, यहूदाने आपल्या भावांना सोडून, हीरा नावाचा एक अदुल्लामी माणूस जिथे राहायचा, त्या ठिकाणाजवळ आपला तंबू ठोकला. २ तिथे त्याने शूवा नावाच्या एका कनानी माणसाच्या मुलीला+ पाहिलं आणि त्याने लग्न करून तिच्याशी संबंध ठेवले. ३ तेव्हा ती गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. त्याने त्याचं नाव एर+ ठेवलं. ४ मग ती पुन्हा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तिने त्याचं नाव ओनान ठेवलं. ५ यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव शेला ठेवलं. तो झाला तेव्हा यहूदा अकजीब+ इथे राहत होता.

६ काही काळाने, यहूदाने आपला मोठा मुलगा एर याचं तामार+ नावाच्या मुलीशी लग्न लावून दिलं. ७ पण यहूदाचा मोठा मुलगा एर हा यहोवाच्या नजरेत दुष्ट होता, त्यामुळे यहोवाने त्याला मारून टाकलं. ८ म्हणून यहूदा ओनानला म्हणाला: “आपल्या भावाचा वंश चालवण्यासाठी तू त्याच्या बायकोशी लग्न करून दिराचं कर्तव्य पूर्ण कर.”+ ९ पण होणारं मूल आपलं समजलं जाणार नाही हे ओनानला माहीत होतं.+ त्यामुळे जेव्हा तो आपल्या भावजयीशी संबंध ठेवायचा, तेव्हा तो आपलं वीर्य जमिनीवर पाडायचा. आपल्या भावाला संतती मिळू नये म्हणून तो असं करायचा.+ १० ओनानने केलेली ही गोष्ट यहोवाच्या नजरेत वाईट होती. म्हणून त्याने ओनानलाही मारून टाकलं.+ ११ आपला मुलगा शेला याचं तामारशी लग्न करून दिलं, तर तोही त्याच्या भावांसारखा मरून जाईल+ असा यहूदाने विचार केला. म्हणून तो आपली सून तामार हिला म्हणाला: “माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत तू आपल्या वडिलांच्या घरी जाऊन विधवा म्हणून राहा.” तेव्हा, तामार आपल्या वडिलांच्या घरी जाऊन राहू लागली.

१२ काही काळ गेल्यावर, यहूदाची बायको, म्हणजेच शूवाची मुलगी+ मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचा काळ संपल्यावर, यहूदा आपला मित्र अदुल्लामी हीरा+ याच्यासोबत तिम्ना+ इथे आपल्या मेंढरांची लोकर कातरणाऱ्‍यांकडे गेला. १३ तेव्हा कोणीतरी तामारला सांगितलं: “तुझा सासरा तिम्नाला त्याच्या मेंढरांची लोकर कातरायला जात आहे.” १४ हे ऐकताच तिने विधवेचे कपडे बदलून, अंगाभोवती शाल गुंडाळली आणि पदराने आपलं तोंड झाकलं. मग ती तिम्नाच्या मार्गावर असलेल्या एनाईम गावाच्या फाटकाजवळ जाऊन बसली. शेला वयात येऊनही आपल्या सासऱ्‍याने त्याच्याशी आपलं लग्न करून दिलेलं नाही,+ हे पाहून तिने असं केलं.

१५ तिने आपला चेहरा झाकला असल्यामुळे, तिला पाहताच ती एक वेश्‍या आहे असं यहूदाला वाटलं. १६ ती आपली सून आहे हे माहीत नसल्यामुळे, तो रस्त्याच्या कडेला तिच्याजवळ जाऊन म्हणाला: “मला तुझ्याशी संबंध ठेवू देशील का?”+ पण ती म्हणाली: “याच्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल?” १७ यावर तो म्हणाला: “मी माझ्या कळपातलं एक बकरीचं पिल्लू तुझ्यासाठी पाठवून देईन.” पण ती म्हणाली: “ते पाठवेपर्यंत तुम्ही तारण म्हणून काय ठेवाल?” १८ तो म्हणाला: “तारण म्हणून तुला काय हवंय?” यावर ती म्हणाली: “तुमची मुद्रेची अंगठी,+ गोफ आणि तुमच्या हातात असलेली काठी मला द्या.” तेव्हा त्याने त्या वस्तू तिला दिल्या आणि तिच्याशी संबंध ठेवले आणि ती त्याच्यापासून गरोदर राहिली. १९ मग ती तिथून निघून गेली आणि तिने आपल्या अंगावरची शाल काढून पुन्हा विधवेचे कपडे घातले.

२० नंतर, तारण म्हणून त्या बाईजवळ दिलेल्या वस्तू परत आणण्यासाठी, यहूदाने आपल्या अदुल्लामी मित्राच्या+ हातून तिच्यासाठी बकरीचं एक पिल्लू पाठवलं. २१ त्याच्या मित्राने तिथल्या लोकांना विचारलं: “एनाईमच्या मार्गावर बसणारी ती वेश्‍या* कुठे आहे?” पण ते त्याला म्हणाले: “आमच्या इथे कधीच कोणी वेश्‍या* नव्हती.” २२ शेवटी तो यहूदाकडे परत येऊन म्हणाला: “मला ती सापडलीच नाही आणि तिथले लोक म्हणाले: ‘त्यांच्या इथे कधीच कोणी वेश्‍या* नव्हती.’” २३ यावर यहूदा म्हणाला: “मग त्या वस्तू तिच्याजवळच राहू दे, नाहीतर आपली बदनामी होईल. मी तर तुझ्या हाती हे बकरीचं पिल्लू पाठवलं होतं, पण ती तुला सापडलीच नाही.”

२४ पण साधारण तीन महिन्यांनी, कोणीतरी यहूदाला सांगितलं: “तुझी सून तामार वेश्‍या बनली आहे आणि आता गरोदर आहे.” तेव्हा यहूदा म्हणाला: “तिला बाहेर काढा आणि जाळून टाका.”+ २५ मग ते तिला घेऊन जाऊ लागले, तेव्हा तिने आपल्या सासऱ्‍याला असा निरोप पाठवला: “या वस्तू ज्या माणसाच्या आहेत, त्याच्यापासूनच मी गरोदर राहिले.” ती असंही म्हणाली: “ही मुद्रेची अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहे, ते जरा तपासून पाहा.”+ २६ त्या वस्तू पाहिल्यावर यहूदा म्हणाला: “ती माझ्यापेक्षा नीतिमान आहे, कारण मी माझा मुलगा शेला याचं लग्न तिच्याशी करून दिलं नाही.”+ यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा कधीच संबंध ठेवले नाहीत.

२७ मूल होण्याच्या वेळी, तिच्या पोटात जुळी असल्याचं दिसून आलं. २८ प्रसूती होताना, आधी एका मुलाचा हात बाहेर आला. तेव्हा सुइणीने लगेच एक लाल दोरा घेऊन त्याच्या हाताला बांधला आणि म्हणाली: “आधी हा बाहेर आला.” २९ पण त्याने हात मागे घेताच त्याचा भाऊ बाहेर आला. तेव्हा ती सुईण म्हणाली: “तू तर भेग पाडून बाहेर आलास!” म्हणून त्याचं नाव पेरेस*+ ठेवण्यात आलं. ३० मग हाताला लाल दोरा बांधलेला त्याचा भाऊ बाहेर आला आणि त्याचं नाव जेरह+ ठेवण्यात आलं.

३९ इश्‍माएली+ लोक योसेफला इजिप्तला घेऊन आले.+ तिथे पोटीफर+ नावाच्या इजिप्तच्या एका माणसाने त्याला त्यांच्याकडून विकत घेतलं. पोटीफर हा फारोच्या दरबारातला एक अधिकारी आणि पहारेकऱ्‍यांचा प्रमुख होता. २ पण यहोवा योसेफसोबत होता.+ त्यामुळे, त्याला यश मिळत गेलं आणि त्याला त्याच्या मालकाच्या घरावर कारभारी म्हणून नेमण्यात आलं. ३ यहोवा त्याच्यासोबत आहे आणि यहोवा त्याला सर्व गोष्टींत यश देत आहे, हे त्याच्या मालकाने पाहिलं.

४ योसेफचा मालक त्याच्यावर खूप खूश होता आणि तो त्याचा सगळ्यात भरवशाचा सेवक बनला. म्हणून त्याने योसेफला आपल्या घरावर अधिकारी नेमलं आणि आपला सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला. ५ योसेफ त्या घराचा कारभार पाहू लागला, तेव्हापासून यहोवा इजिप्तमधल्या त्याच्या मालकाच्या घरावर आशीर्वाद देत राहिला. त्याच्या मालकाच्या सर्व घरादारावर आणि शेतीवाडीवर यहोवाचा आशीर्वाद होता.+ ६ हळूहळू त्याने आपल्या मालकीचं सर्वकाही योसेफला सोपवून दिलं आणि आपण काय खावं, हे ठरवण्याशिवाय तो इतर कोणत्याही गोष्टीची चिंता करत नव्हता. योसेफ आता उंचापुरा आणि देखणा झाला होता.

७ काही काळाने, योसेफच्या मालकाची बायको त्याच्याकडे आकर्षित झाली आणि ती त्याला म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव.” ८ पण त्याने नकार दिला आणि तो म्हणाला: “माझ्या मालकांनी घराचा सर्व कारभार माझ्या ताब्यात दिला आहे. आणि त्यामुळे ते घरातल्या कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाहीत. ९ या घरात मलाच सर्वात जास्त अधिकार आहे आणि तुम्हाला सोडून बाकी सर्वकाही त्यांनी माझ्या हातात दिलं आहे, कारण तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. तर मग, इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?”+

१० ती दररोज योसेफशी बोलायची, पण तो तिच्याशी संबंध ठेवायला किंवा तिच्यासोबत थांबायला कधीही तयार झाला नाही. ११ एकदा, तो काही कामासाठी घरात गेला, त्या वेळी घरात कोणीही नोकरचाकर नव्हते. १२ तेव्हा तिने त्याच्या अंगावरचं वस्त्र धरलं आणि ती म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव!” पण ते वस्त्र तिच्या हातात सोडून योसेफ तिथून बाहेर पळून गेला. १३ योसेफ वस्त्र आपल्या हातातच सोडून बाहेर पळून गेला हे पाहिल्यावर, १४ तिने आरडाओरडा करून घरातल्या माणसांना बोलावलं आणि ती त्यांना म्हणाली: “पाहा, यांनी या इब्री माणसाला आपला अपमान करण्यासाठी* इथे आणलं आहे. त्याला माझ्यासोबत संबंध ठेवायचे होते, पण मी मोठ्याने आरडाओरडा केला. १५ माझा आरडाओरडा ऐकून तो आपल्या अंगावरचं वस्त्र माझ्याजवळ सोडून बाहेर पळून गेला.” १६ मग त्याचा मालक घरी परत येईपर्यंत, तिने ते वस्त्र आपल्याजवळच ठेवलं.

१७ मग तिने त्यालाही तीच गोष्ट सांगितली: “तुम्ही ज्या इब्री नोकराला इथे आणलंत, तो माझा अपमान करायला माझ्याकडे आला होता. १८ पण मी आरडाओरडा करू लागताच, तो आपल्या अंगावरचं वस्त्र माझ्याजवळ सोडून बाहेर पळून गेला.” १९ “तुमच्या सेवकाने माझ्यासोबत असं केलं,” हे बायकोचे शब्द ऐकताच योसेफचा मालक भडकला. २० म्हणून त्याने योसेफला धरून, राजाच्या कैद्यांना जिथे ठेवलं जायचं त्या तुरुंगात टाकलं आणि योसेफ तिथेच राहिला.+

२१ पण यहोवा योसेफसोबत होता आणि तो त्याला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला. त्यामुळे तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याची त्याच्यावर कृपा झाली.+ २२ तेव्हा तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याने योसेफला सर्व कैद्यांवर नेमलं. तोच त्यांच्याकडून सगळी कामं करून घ्यायचा.+ २३ योसेफवर सोपवलेल्या कोणत्याही कामाकडे तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याला लक्ष द्यावं लागायचं नाही, कारण यहोवा योसेफसोबत होता आणि तो जे काही करायचा त्यात यहोवा त्याला यश द्यायचा.+

४० नंतर, इजिप्तच्या राजाचा मुख्य प्यालेबरदार*+ आणि मुख्य आचारी यांनी आपल्या प्रभूविरुद्ध, म्हणजेच इजिप्तच्या राजाविरुद्ध अपराध केला. २ तेव्हा फारो त्याच्या या दोन अधिकाऱ्‍यांवर, म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार आणि मुख्य आचारी+ यांच्यावर संतापला. ३ म्हणून, त्याने त्यांना पहारेकऱ्‍यांच्या प्रमुखाच्या+ घरात असलेल्या तुरुंगात टाकलं. योसेफही त्याच तुरुंगात कैद होता.+ ४ मग पहारेकऱ्‍यांच्या प्रमुखाने योसेफला त्यांच्यासोबत राहून त्यांची सेवा करायला नेमलं.+ ते काही काळ* तिथे कैदेत होते.

५ तुरुंगात असताना एका रात्री इजिप्तच्या राजाचा प्यालेबरदार आणि आचारी या दोघांनाही स्वप्न पडलं आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा अर्थ वेगवेगळा होता. ६ दुसऱ्‍या दिवशी सकाळी योसेफ त्यांना भेटायला गेला, तेव्हा ते दोघंही उदास दिसत होते. ७ तेव्हा योसेफने त्याच्या मालकाच्या घरात आपल्यासोबत कैदेत असलेल्या फारोच्या अधिकाऱ्‍यांना विचारलं: “आज तुमचे चेहरे असे उतरलेले का दिसतात?” ८ यावर ते त्याला म्हणाले: “आम्हा दोघांनाही स्वप्नं पडली, पण त्यांचा अर्थ सांगणारा कोणीही नाही.” तेव्हा योसेफ त्यांना म्हणाला: “अर्थ सांगणारा देवच नाही का?+ कृपा करून तुमची स्वप्नं मला सांगा.”

९ मग मुख्य प्यालेबरदाराने आपलं स्वप्न योसेफला सांगितलं. तो म्हणाला: “स्वप्नात मी एक द्राक्षाचा वेल पाहिला. १० त्या वेलाला तीन फांद्या होत्या आणि त्यांना कोंब फुटले होते. त्यांना फुलं येऊन नंतर द्राक्षांचे गुच्छ बनले. ११ आणि माझ्या हातात फारोचा प्याला होता. मी ती द्राक्षं घेऊन फारोच्या प्याल्यात पिळली आणि मग तो प्याला फारोच्या हातात दिला.” १२ तेव्हा योसेफ त्याला म्हणाला: “त्याचा अर्थ असा आहे: त्या तीन फांद्या म्हणजे तीन दिवस. १३ आजपासून तीन दिवसांनी फारो तुला इथून बाहेर काढेल* आणि तुला तुझं पद परत देईल.+ तू आधी प्यालेबरदार असताना जसा फारोच्या हातात प्याला द्यायचास, तसाच पुन्हा देशील.+ १४ पण जेव्हा तुझं भलं होईल, तेव्हा माझी आठवण ठेव. कृपा करून माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखव आणि माझी इथून सुटका करण्यासाठी फारोला माझ्याबद्दल सांग. १५ खरंतर, मला इब्री लोकांच्या देशातून+ पळवून आणलं आहे आणि मला तुरुंगात* टाकलं जावं, असं कोणतंही काम मी इथे केलेलं नाही.”+

१६ योसेफने सांगितलेला अर्थ चांगला आहे, हे पाहिल्यावर मुख्य आचारी त्याला म्हणाला: “मला स्वप्नात माझ्या डोक्यावर पांढऱ्‍या भाकरींच्या तीन टोपल्या दिसल्या. १७ सर्वात वरच्या टोपलीत फारोसाठी सगळ्या प्रकारचे भाजलेले पदार्थ होते आणि माझ्या डोक्यावरच्या टोपलीतून पक्षी ते पदार्थ खात होते.” १८ तेव्हा योसेफ म्हणाला: “त्याचा अर्थ असा आहे: तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस. १९ आजपासून तीन दिवसांनी फारो तुझं डोकं उडवेल* आणि तुला वधस्तंभावर लटकवेल आणि पक्षी तुझं मांस खातील.”+

२० तीन दिवसांनी फारोचा वाढदिवस होता+ आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली. मग त्याने आपल्या मुख्य प्यालेबरदाराला आणि मुख्य आचाऱ्‍याला, आपल्या सर्व सेवकांसमोर बाहेर आणण्याची* आज्ञा दिली. २१ त्याने आपल्या मुख्य प्यालेबरदाराला त्याचं पद पुन्हा दिलं आणि तो आधीसारखाच फारोला प्याला देण्याचं काम करू लागला. २२ पण योसेफने स्वप्नांचा अर्थ सांगितल्याप्रमाणे, फारोने मुख्य आचाऱ्‍याला वधस्तंभावर लटकवलं.+ २३ मुख्य प्यालेबरदाराने मात्र योसेफची आठवण ठेवली नाही, तो त्याला विसरून गेला.+

४१ याच्या दोन वर्षांनंतर फारोला एक स्वप्न पडलं+ आणि आपण नाईल नदीच्या काठावर उभे आहोत, असं त्याला दिसलं. २ त्याला सात सुंदर, धष्टपुष्ट गायी नदीतून वर येताना दिसल्या आणि त्या नाईल नदीजवळच्या गवतात चरू लागल्या.+ ३ त्यांच्या पाठोपाठ त्याला नाईल नदीतून आणखी सात, कुरूप आणि हडकुळ्या गायी वर येताना दिसल्या. त्या गायी नाईलच्या काठावर असलेल्या धष्टपुष्ट गायींच्या बाजूला उभ्या राहिल्या. ४ मग त्या कुरूप, हडकुळ्या गायी सात सुंदर, धष्टपुष्ट गायींना खाऊ लागल्या. तेवढ्यात फारोला जाग आली.

५ मग तो पुन्हा झोपला आणि त्याला आणखी एक स्वप्न पडलं. त्याला एकाच ताटाला सात चांगली आणि दाण्यांनी भरलेली कणसं येताना दिसली.+ ६ त्यानंतर आणखी सात कणसं आली. ती बारीक आणि पूर्वेकडच्या वाऱ्‍याने करपलेली होती. ७ मग ती बारीक कणसं सात चांगल्या आणि दाण्यांनी भरलेल्या कणसांना गिळू लागली. तेवढ्यात फारोला जाग आली आणि हे स्वप्न होतं, हे त्याला कळलं.

८ सकाळ झाल्यावर त्याचं मन अस्वस्थ झालं. म्हणून त्याने इजिप्तच्या सर्व मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांना आणि सर्व विद्वानांना बोलावून घेतलं. फारोने त्यांना आपली स्वप्नं सांगितली, पण कोणालाही त्यांचा अर्थ सांगता आला नाही.

९ तेव्हा मुख्य प्यालेबरदार फारोला म्हणाला: “आज मी माझी पापं कबूल करतो. १० एकदा तुम्ही आपल्या सेवकांवर रागावला होता आणि मला व मुख्य आचाऱ्‍याला, तुम्ही पहारेकऱ्‍यांचा प्रमुख असलेल्या अधिकाऱ्‍याच्या घरातल्या तुरुंगात टाकलं होतं.+ ११ त्यानंतर आम्हा दोघांनाही एकाच रात्री स्वप्नं पडली. दोघांच्याही स्वप्नांचा अर्थ वेगवेगळा होता.+ १२ तिथे आमच्यासोबत पहारेकऱ्‍यांच्या प्रमुखाचा एक तरुण इब्री सेवक होता.+ आम्ही त्याला आमची स्वप्नं सांगितली,+ तेव्हा त्याने आम्हा दोघांच्याही स्वप्नांचा अर्थ सांगितला. १३ आणि त्याने अर्थ सांगितल्याप्रमाणेच घडलं. मला माझं पद परत मिळालं, पण त्या दुसऱ्‍या माणसाला वधस्तंभावर लटकवण्यात आलं.”+

१४ तेव्हा फारोने योसेफला बोलावून घेतलं+ आणि त्याच्या माणसांनी त्याला लगेच तुरुंगातून* बाहेर काढलं.+ योसेफने दाढी करून* कपडे बदलले आणि मग तो फारोसमोर गेला. १५ तेव्हा फारो योसेफला म्हणाला: “मला एक स्वप्न पडलं, पण कोणीही त्याचा अर्थ सांगू शकलं नाही. मी असं ऐकलंय, की तुला स्वप्न ऐकून त्याचा अर्थ सांगता येतो.”+ १६ तेव्हा योसेफ फारोला म्हणाला: “मी नाही, तर देवच तुम्हाला चांगला संदेश देईल.”+

१७ मग फारो योसेफला म्हणाला: “माझ्या स्वप्नात मी नाईल नदीच्या काठावर उभा होतो. १८ तेव्हा मी सात सुंदर, धष्टपुष्ट गायी नदीतून वर येताना पाहिल्या. त्या नदीजवळच्या गवतात चरू लागल्या.+ १९ त्यांच्या पाठोपाठ मला आणखी सात गायी वर येताना दिसल्या. त्या अगदीच दुबळ्या, कुरूप आणि हडकुळ्या होत्या. मी पूर्ण इजिप्त देशात अशा कुरूप गायी कधीच बघितल्या नव्हत्या. २० मग त्या हडकुळ्या, कुरूप गायी आधीच्या सात धष्टपुष्ट गायींना खाऊ लागल्या. २१ पण त्यांनी त्यांना खाल्लं असं कोणी म्हटलं नसतं, कारण त्या आधीसारख्याच हडकुळ्या दिसत होत्या. तेवढ्यात मला जाग आली.

२२ मग मला स्वप्नात एका ताटाला, सात चांगली आणि दाण्यांनी भरलेली कणसं आलेली दिसली.+ २३ त्यानंतर आणखी सात कणसं आली. ती सुकलेल्या दाण्यांची, बारीक आणि पूर्वेकडच्या वाऱ्‍याने करपलेली होती. २४ तेव्हा बारीक कणसं, दाण्यांनी भरलेल्या कणसांना गिळू लागली. मी मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांना+ हे सर्व सांगितलं, पण कोणीच मला त्याचा अर्थ सांगू शकलं नाही.”+

२५ मग योसेफ फारोला म्हणाला: “तुमच्या दोन्ही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. खरा देव काय करणार आहे, हे त्याने तुम्हाला सांगितलं आहे.+ २६ सात चांगल्या गायी म्हणजे सात वर्षं. तसंच, सात चांगल्या कणसांचाही अर्थ सात वर्षंच होतो. तुमच्या दोन्ही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. २७ नंतर आलेल्या सात दुबळ्या व हडकुळ्या गायी म्हणजे सात वर्षं आणि सात सुकलेली व पूर्वेकडच्या वाऱ्‍याने करपलेली कणसं म्हणजे दुष्काळाची सात वर्षं असतील. २८ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, खरा देव जे करणार आहे ते त्याने तुम्हाला दाखवलं आहे.

२९ इजिप्त देशात सात वर्षं मोठ्या भरभराटीची असतील. ३० पण त्यानंतर दुष्काळाची सात वर्षं येतील. तेव्हा इजिप्त देशातल्या भरभराटीचा काळ सगळे विसरतील, कारण दुष्काळामुळे देश उद्ध्‌वस्त होईल.+ ३१ दुष्काळ खूपच भयंकर असल्यामुळे, आधीचा समृद्धीचा काळ कोणालाही आठवणार नाही. ३२ तुम्हाला दोनदा स्वप्न पडलं, कारण खऱ्‍या देवाने ही गोष्ट पक्की ठरवली आहे आणि तो लवकरच ती घडवून आणणार आहे.

३३ म्हणून आता तुम्ही एक असा माणूस निवडा, जो समजदार आणि बुद्धिमान आहे आणि त्याला संपूर्ण इजिप्त देशावर नियुक्‍त करा. ३४ तसंच, देशात देखरेख करणारे नेमा आणि भरभराटीच्या सात वर्षांदरम्यान+ इजिप्तमध्ये होणाऱ्‍या उत्पन्‍नाचा पाचवा भाग गोळा करा. ३५ आणि येणाऱ्‍या चांगल्या वर्षांत त्यांनी सगळं अन्‍नधान्य गोळा करावं, आणि अन्‍नाच्या पुरवठ्यासाठी ते शहरांमध्ये फारोच्या कोठारांत साठवून त्याची राखण करावी.+ ३६ इजिप्तमध्ये येणाऱ्‍या दुष्काळाच्या सात वर्षांत या अन्‍नधान्याचा पुरवठा केला जावा, म्हणजे दुष्काळामुळे देशाचा नाश होणार नाही.”+

३७ फारोला आणि त्याच्या सर्व सेवकांना ही कल्पना आवडली. ३८ म्हणून फारो आपल्या सेवकांना म्हणाला: “ज्याच्यात देवाची शक्‍ती कार्य करत आहे, असा याच्यासारखा दुसरा कोण आपल्याला सापडेल?” ३९ मग फारो योसेफला म्हणाला: “देवाने तुला या सर्व गोष्टी कळवल्या आहेत, त्यामुळे तुझ्यासारखा समजदार आणि बुद्धिमान कोणीच नाही. ४० मी तुला माझ्या घरावर नेमतो आणि माझे सर्व लोक तुझी प्रत्येक आज्ञा मानतील.+ फक्‍त राजा असल्यामुळे* मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.” ४१ फारो योसेफला पुढे म्हणाला: “मी तुला संपूर्ण इजिप्त देशावर नियुक्‍त करतो.”+ ४२ मग फारोने आपल्या बोटातली मुद्रेची अंगठी काढून ती योसेफच्या बोटात घातली आणि त्याला चांगल्या प्रतीच्या मलमलीचे कपडे घालून त्याच्या गळ्यात सोन्याचा हार घातला. ४३ इतकंच काय, तर त्याने त्याला राजाच्या दुसऱ्‍या रथात बसवलं आणि त्याच्यापुढे “अवरेख!”* अशी घोषणा करण्याची आज्ञा दिली. अशा रितीने, फारोने योसेफला संपूर्ण इजिप्त देशावर अधिकारी नेमलं.

४४ मग फारो योसेफला म्हणाला: “मी फारो आहे, पण तुझ्या परवानगीशिवाय इजिप्त देशात कोणीही कोणतंच काम करू शकणार नाही.”*+ ४५ यानंतर, फारोने योसेफला सापनाथ-पानेह हे नाव दिलं आणि ओनचा* पुजारी पोटीफरा याची मुलगी आसनथ+ हिच्यासोबत त्याचं लग्न लावून दिलं. मग, योसेफ इजिप्त देशावर देखरेख* करू लागला.+ ४६ योसेफ इजिप्तचा राजा फारो याची सेवा करू लागला, तेव्हा तो ३० वर्षांचा+ होता.

मग योसेफ फारोकडून निघाला आणि इजिप्तच्या संपूर्ण देशाचा दौरा करू लागला. ४७ भरभराटीच्या सात वर्षांत देशात खूप* पीक आलं. ४८ त्या सात वर्षांत योसेफ इजिप्तच्या देशातून अन्‍नधान्य गोळा करत राहिला आणि ते शहरांमध्ये साठवत राहिला. प्रत्येक शहरात तो आसपासच्या शेतांतलं अन्‍नधान्य साठवायचा. ४९ योसेफने अन्‍नधान्याचा इतका मोठा साठा केला, की तो समुद्रकिनाऱ्‍याच्या वाळूसारखा झाला. शेवटी, त्यांनी तो मोजायचं सोडून दिलं कारण तो मोजणं शक्य नव्हतं.

५० दुष्काळाचं पहिलं वर्ष सुरू होण्याआधी, योसेफला ओनचा* पुजारी पोटीफरा याची मुलगी आसनथ हिच्यापासून दोन मुलं झाली.+ ५१ योसेफने आपल्या पहिल्या मुलाचं नाव मनश्‍शे*+ ठेवलं, कारण तो म्हणाला, “देवाने मला माझी सगळी दुःखं आणि माझ्या वडिलांचं घर विसरायला लावलं आहे.” ५२ त्याने आपल्या दुसऱ्‍या मुलाचं नाव एफ्राईम*+ ठेवलं कारण तो म्हणाला: “देवाने मला माझ्या दुःखाच्या देशात फलदायी केलं आहे.”+

५३ मग इजिप्तच्या देशात भरभराटीची सात वर्षं संपली,+ ५४ आणि योसेफने सांगितल्याप्रमाणे सात वर्षांचा दुष्काळ सुरू झाला.+ हा दुष्काळ सर्व देशांमध्ये पसरला, पण इजिप्तच्या संपूर्ण देशात अन्‍न होतं.+ ५५ शेवटी, इजिप्तच्या संपूर्ण देशातही दुष्काळ पडला आणि लोक फारोकडे अन्‍नाची भीक मागू लागले.+ तेव्हा फारो इजिप्तच्या सर्व लोकांना म्हणाला: “योसेफकडे जा आणि तो जे सांगेल, ते करा.”+ ५६ संपूर्ण पृथ्वीवर दुष्काळ होता.+ मग, योसेफने धान्याची कोठारं उघडली आणि तो इजिप्तच्या लोकांना धान्य विकू लागला,+ कारण सगळा देश दुष्काळाच्या विळख्यात होता. ५७ पृथ्वीवरचे सर्व लोक योसेफकडून धान्य विकत घ्यायला इजिप्तला येऊ लागले, कारण सगळी पृथ्वीच दुष्काळाच्या विळख्यात होती.+

४२ इजिप्तमध्ये अन्‍नधान्य आहे,+ हे याकोबला कळलं, तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला: “नुसतंच एकमेकांकडे का पाहताय?” २ तो पुढे म्हणाला: “इजिप्तमध्ये अन्‍नधान्य आहे असं मी ऐकलंय. म्हणून तिथे जाऊन आपल्यासाठी धान्य विकत आणा, नाहीतर आपण भुकेने मरून जाऊ.”+ ३ तेव्हा योसेफचे दहा भाऊ+ धान्य विकत घेण्यासाठी खाली इजिप्तला गेले. ४ पण याकोबने योसेफचा भाऊ बन्यामीन+ याला त्याच्या भावांसोबत पाठवलं नाही, कारण तो म्हणाला: “कदाचित त्याच्या जिवाचं काही बरंवाईट होईल.”+

५ मग इस्राएलची मुलं इतर लोकांसोबत धान्य विकत घ्यायला आली, कारण दुष्काळ कनान देशातही पसरला होता.+ ६ इजिप्त देशावर योसेफचा अधिकार होता+ आणि इतर देशांतून येणाऱ्‍या लोकांना तोच धान्य विकायचा.+ म्हणून योसेफच्या भावांनी येऊन त्याला जमिनीवर डोकं टेकवून नमस्कार केला.+ ७ योसेफने आपल्या भावांना पाहताच ओळखलं, पण त्याने स्वतःची ओळख दाखवली नाही.+ तो त्यांना कठोरपणे म्हणाला: “कुठून आलात तुम्ही?” यावर ते म्हणाले: “आम्ही कनान देशातून इथे धान्य विकत घ्यायला आलो आहोत.”+

८ योसेफने आपल्या भावांना ओळखलं होतं, पण त्यांनी त्याला ओळखलं नाही. ९ त्याला लगेच आपल्या भावांबद्दल पाहिलेली त्याची स्वप्नं आठवली.+ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही गुप्तहेर आहात! आमचा देश कुठे कमजोर आहे, हे तुम्ही पाहायला आला आहात!” १० तेव्हा ते त्याला म्हणाले: “नाही प्रभू, तुझे सेवक इथे धान्य विकत घ्यायला आले आहेत. ११ आम्ही सर्व एकाच वडिलांची मुलं आहोत. आम्ही गुप्तहेर नाही, तर सरळसाधी माणसं आहोत.” १२ पण तो त्यांना म्हणाला: “हे खरं नाही! तुम्ही हा देश कुठे कमजोर आहे हे पाहायला आला आहात.” १३ यावर ते त्याला म्हणाले: “प्रभू, आम्ही १२ भाऊ आहोत+ आणि कनान देशात राहणाऱ्‍या एकाच माणसाची+ मुलं आहोत. आमचा सर्वात धाकटा भाऊ आमच्या वडिलांसोबत आहे+ आणि एक भाऊ आता आमच्यात नाही.”+

१४ तेव्हा योसेफ त्यांना म्हणाला: “मी म्हणतो तसंच आहे; तुम्ही गुप्तहेरच आहात! १५ फारोच्या जिवाची शपथ, जोपर्यंत तुमचा धाकटा भाऊ इथे येत नाही, तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही.+ याच गोष्टीने तुमची परीक्षा होईल. १६ तुमच्यापैकी एकाला, तुमच्या भावाला आणायला पाठवा आणि तोपर्यंत तुम्ही इथेच कैदेत राहाल. यावरून कळेल, की तुम्ही बोलत आहात ते खरं आहे की नाही. जर असं नसेल, तर फारोच्या जिवाची शपथ, तुम्ही गुप्तहेर आहात.” १७ असं म्हणून, त्याने त्या सर्वांना तीन दिवस कैदेत ठेवलं.

१८ तिसऱ्‍या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला: “मी देवाचं भय मानतो, म्हणून मी जे सांगतो ते करा, म्हणजे जिवंत राहाल. १९ जर तुम्ही सरळसाधी माणसं असाल, तर तुमच्यापैकी एकाला कैदेत राहू द्या आणि बाकी सर्व भाऊ धान्य घेऊन जाऊ शकता, म्हणजे तुमच्या घरच्यांची उपासमार होणार नाही.+ २० मग तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे तुम्ही खरं बोलत आहात हे सिद्ध होईल आणि तुमचा जीव वाचेल.” तेव्हा त्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं.

२१ मग ते एकमेकांना म्हणू लागले: “आपल्या भावामुळेच आपल्याला ही शिक्षा सहन करावी लागत आहे.+ तो आपल्याकडे दयेची भीक मागत होता. त्याला किती दुःख* झालं हे आपण पाहिलं, तरी आपण त्याचं ऐकलं नाही. म्हणून हे दुःख आज आपल्यावर आलं आहे.” २२ तेव्हा रऊबेन त्यांना म्हणाला: “‘त्या लेकराविरूद्ध पाप करू नका,’ असं मी म्हणालो होतो ना? पण तुम्ही माझं ऐकलं नाही.+ आता त्याच्या रक्‍ताचा हिशोब आपल्याकडून घेतला जातोय.”+ २३ पण आपलं बोलणं योसेफला कळत आहे हे त्यांना माहीत नव्हतं, कारण त्यांच्यामध्ये अनुवादक* होता. २४ मग तो त्यांच्यापासून लांब जाऊन रडू लागला.+ जेव्हा तो त्यांच्याशी बोलायला परत आला, तेव्हा त्याने शिमोनला+ त्यांच्यातून वेगळं करून त्यांच्यासमोर बांधलं.+ २५ नंतर योसेफने त्यांच्या गोणींमध्ये धान्य भरण्याची, त्यासोबतच त्यांच्यापैकी प्रत्येकाने दिलेले पैसे ज्याच्या त्याच्या गोणीत परत ठेवण्याची, तसंच त्यांना प्रवासासाठी लागणाऱ्‍या वस्तू देण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे त्यांची व्यवस्था करण्यात आली.

२६ मग त्यांनी त्यांचं धान्य गाढवांवर लादलं आणि ते तिथून निघाले. २७ एका ठिकाणी मुक्कामासाठी थांबले असताना, त्यांच्यापैकी एकाने गाढवाला चारा देण्यासाठी आपली गोण उघडली, तेव्हा त्याला गोणीत आपले पैसे दिसले. २८ हे पाहून तो आपल्या भावांना म्हणाला: “माझे पैसे मला परत दिले आहेत आणि ते माझ्या गोणीत आहेत!” तेव्हा ते घाबरले आणि थरथर कापू लागले. ते एकमेकांना म्हणू लागले: “देवाने हे आपल्यासोबत काय केलं आहे?”

२९ कनान देशात आपला पिता याकोब याच्याकडे परत आल्यानंतर, त्यांनी आपल्यासोबत घडलेली सगळी हकिगत त्याला सांगितली. ते म्हणाले: ३० “त्या देशाचा मुख्य अधिकारी आमच्याशी कठोरपणे बोलला+ आणि आम्ही त्या देशात गुप्तहेर म्हणून गेलो असा आरोप त्याने लावला. ३१ पण आम्ही त्याला म्हणालो: ‘आम्ही गुप्तहेर नाही, तर सरळसाधी माणसं आहोत.+ ३२ आम्ही १२ भाऊ+ एकाच माणसाची मुलं आहोत. आमचा एक भाऊ आता आमच्यात नाही+ आणि सर्वात धाकटा भाऊ आमच्या वडिलांसोबत कनान देशात आहे.’+ ३३ पण तो मुख्य अधिकारी आम्हाला म्हणाला: ‘तुम्ही सरळसाधी माणसं असाल, तर तुमच्यापैकी एकाला माझ्याकडे राहू द्या+ आणि तुमच्या घरच्यांची उपासमार व्हायला नको म्हणून धान्य घेऊन जा.+ ३४ आणि तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मला कळेल की तुम्ही गुप्तहेर नाही तर सरळसाधी माणसं आहात. तेव्हाच मी तुम्हाला तुमचा भाऊ परत देईन आणि तुम्ही या देशातून धान्य विकत घेऊ शकता.’”

३५ जेव्हा ते आपल्या गोणी रिकाम्या करत होते, तेव्हा प्रत्येकाला आपापल्या गोणीत आपले पैसे मिळाले. त्यांनी आणि त्यांच्या पित्याने पैशांच्या थैल्या पाहिल्या तेव्हा ते घाबरले. ३६ त्यांचा पिता याकोब त्यांना म्हणाला: “तुम्ही माझ्या मुलांना माझ्यापासून दूर नेत आहात!+ योसेफ गेला,+ शिमोनही गेला,+ आणि आता तुम्ही बन्यामीनलाही नेत आहात! माझ्यावरच ही सर्व दुःखं का येत आहेत?” ३७ तेव्हा रऊबेन आपल्या पित्याला म्हणाला: “तुम्ही त्याला माझ्याकडे सोपवा. मी त्याची काळजी घेईन आणि त्याला परत तुमच्याकडे आणीन.+ जर मी त्याला तुमच्याकडे परत आणलं नाही, तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका.”+ ३८ पण याकोब म्हणाला: “मी माझ्या मुलाला तुमच्यासोबत पाठवणार नाही, कारण त्याचा भाऊ आधीच मेला आहे आणि तो एकटाच उरला आहे.+ वाटेत त्याचं काही बरंवाईट झालं, तर तुमच्यामुळे मला म्हातारपणी दुःख करत कबरेत*+ जावं लागेल.”+

४३ देशात कडाक्याचा दुष्काळ पडला होता.+ २ इजिप्तवरून आणलेलं धान्य संपल्यावर,+ त्यांचा पिता त्यांना म्हणाला: “पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडं धान्य घेऊन या.” ३ तेव्हा यहूदा त्याला म्हणाला: “त्या माणसाने आम्हाला अशी स्पष्ट ताकीद दिली होती, की ‘जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला आणत नाही, तोपर्यंत माझं तोंड पाहू नका.’+ ४ जर तुम्ही त्याला आमच्यासोबत पाठवलं, तरच आम्ही तुमच्यासाठी धान्य विकत आणायला जाऊ. ५ पण, जर तुम्ही त्याला पाठवणार नसाल, तर आम्ही जाणार नाही. कारण तो माणूस आम्हाला म्हणाला, ‘जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला आणत नाही, तोपर्यंत माझं तोंड पाहू नका.’”+ ६ तेव्हा इस्राएल+ म्हणाला: “तुम्हाला आणखी एक भाऊ आहे, ही गोष्ट त्या माणसाला सांगून तुम्ही माझ्यावर हे संकट का आणलंत?” ७ ते म्हणाले: “त्या माणसाने आम्हाला सरळ आमच्याबद्दल आणि आमच्या नातेवाइकांबद्दल असं विचारलं, ‘तुमचा पिता अजून जिवंत आहे का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का?’ म्हणून आम्ही त्याला या गोष्टी सांगितल्या.+ ‘तुमच्या भावाला इथे घेऊन या,’+ असं तो म्हणेल, हे आम्हाला काय माहीत होतं?”

८ यहूदाने आपला पिता इस्राएल याला अशी विनंती केली: “त्याला माझ्यासोबत पाठवा+ म्हणजे आम्हाला जाता येईल. नाहीतर, तुमच्यासोबत आम्ही आणि आमची मुलंबाळंही भुकेने मरून जातील.+ ९ त्याच्या सुरक्षेची खातरी मी देतो.*+ तुम्ही मला जबाबदार ठरवू शकता. जर मी त्याला तुमच्याकडे परत आणलं नाही, तर या पापाचा दोष माझ्यावर मरेपर्यंत राहील. १० आपण एवढा वेळ घालवला नसता, तर इतक्यात आम्ही दोनदा तिथे जाऊन परत आलो असतो.”

११ तेव्हा त्यांचा पिता इस्राएल त्यांना म्हणाला: “असं असेल, तर मी सांगतो ते करा. आपल्या देशातल्या सर्वात चांगल्या वस्तू आपल्या गोणींमध्ये भरा आणि त्या माणसासाठी भेट म्हणून घेऊन जा.+ बाल्सम,+ मध, सुगंधी डिंक, झाडांची सुगंधी साल,+ बदाम आणि पिस्ते घेऊन जा. १२ सोबत दुप्पट पैसे घेऊन जा आणि तुमच्या गोणींमधून परत आलेले पैसेही न्या,+ कदाचित काही चूक झाली असेल. १३ तुमच्या भावाला घ्या आणि त्या माणसाकडे जा. १४ त्या माणसाने तुम्हाला दया दाखवावी, यासाठी सर्वशक्‍तिमान देव तुम्हाला मदत करो. म्हणजे तो बन्यामीनला आणि तुमच्या दुसऱ्‍या भावालाही जाऊ देईल. पण जर मी माझ्या मुलांना गमावणारच असेन, तर माझा नाइलाज आहे.”+

१५ मग त्यांनी ती भेट आणि दुप्पट पैसे सोबत घेतले. तसंच त्यांनी बन्यामीनलाही सोबत घेतलं आणि ते खाली इजिप्तला गेले आणि योसेफसमोर जाऊन उभे राहिले.+ १६ योसेफने बन्यामीनला त्यांच्यासोबत पाहिलं, तेव्हा त्याने लगेच आपल्या घरावर देखरेख करणाऱ्‍या माणसाला म्हटलं: “या माणसांना घरी घेऊन जा. प्राणी कापून जेवण तयार करा, कारण दुपारी ही माणसं माझ्यासोबत जेवतील.” १७ त्या माणसाने लगेच योसेफच्या म्हणण्याप्रमाणे केलं+ आणि तो त्यांना योसेफच्या घरी घेऊन गेला. १८ पण योसेफच्या घरी पोहोचल्यावर ती माणसं घाबरली आणि म्हणू लागली: “मागच्या वेळी आपल्या गोणींमध्ये परत मिळालेल्या पैशांमुळे आपल्याला इथे आणलं आहे. आता हे लोक आपल्यावर हल्ला करून आपल्याला गुलाम बनवतील आणि आपली गाढवंही घेतील!”+

१९ तेव्हा ते योसेफच्या घरावर देखरेख करणाऱ्‍या माणसाकडे गेले आणि घराच्या दारासमोर त्याच्याशी बोलले. २० ते म्हणाले: “माफ करा प्रभू, मागच्या वेळी आम्ही इथे धान्य विकत घ्यायला आलो होतो,+ २१ पण जेव्हा आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी थांबून आमच्या गोणी उघडल्या, तेव्हा आमच्या प्रत्येकाच्या गोणीत आमचे सगळे पैसे तसेच होते,+ म्हणून आम्हाला ते पैसे परत करायचे आहेत. २२ ते पैसे आमच्या गोणींमध्ये कोणी ठेवले, हे आम्हाला माहीत नाही. आता धान्य विकत घेण्यासाठी आम्ही आणखी पैसे आणले आहेत.”+ २३ तेव्हा तो म्हणाला: “ठीक आहे, घाबरू नका. मला माहीत आहे, की तुम्ही पैसे दिले होते. तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या देवानेच तुमच्या गोणींमध्ये ते धन ठेवलं.” मग तो शिमोनला त्यांच्याकडे घेऊन आला.+

२४ त्यानंतर तो माणूस त्यांना योसेफच्या घरात घेऊन गेला आणि त्याने त्यांना पाय धुवायला पाणी दिलं, तसंच त्यांच्या गाढवांना चाराही दिला. २५ योसेफ दुपारी येणार म्हणून त्यांनी त्याच्यासाठी आणलेली भेट तयार केली,+ कारण दुपारी ते तिथे जेवणार आहेत, असं त्यांनी ऐकलं होतं.+ २६ योसेफ घरी आला, तेव्हा ते त्यांच्याकडे असलेली भेट त्याच्यासमोर घेऊन आले आणि त्यांनी जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमन केलं.+ २७ मग योसेफने त्यांची चौकशी केली आणि तो म्हणाला: “तुम्ही ज्यांच्याबद्दल सांगितलं होतं, ते तुमचे म्हातारे वडील कसे आहेत? ते अजून जिवंत आहेत का?”+ २८ यावर ते म्हणाले: “तुमचे सेवक, आमचे वडील बरे आहेत, ते अजून जिवंत आहेत.” मग त्यांनी वाकून जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमन केलं.+

२९ जेव्हा त्याने आपला भाऊ,* बन्यामीन+ याला पाहिलं तेव्हा तो म्हणाला: “तुम्ही मला ज्याच्याबद्दल सांगितलं होतं, तो तुमचा धाकटा भाऊ हाच आहे का?”+ तो पुढे म्हणाला: “मुला, तुझ्यावर देवाची कृपा असो.” ३० मग योसेफ लगेच तिथून बाहेर गेला, कारण आपल्या भावाला पाहून त्याच्या भावना अनावर झाल्या आणि त्याला रडू आलं. तो आतल्या खोलीत जाऊन रडू लागला.+ ३१ नंतर त्याने आपलं तोंड धुतलं आणि स्वतःला सावरून तो बाहेर आला आणि म्हणाला: “जेवण वाढा.” ३२ मग सेवकांनी योसेफला वेगळं जेवायला वाढलं आणि त्याच्या भावांची ताटं वेगळी वाढली. त्याच्यासोबत असलेले इजिप्तचे लोकही वेगळे जेवायला बसले. कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांसोबत जेवत नव्हते. ती त्यांच्यासाठी एक किळसवाणी गोष्ट आहे.+

३३ त्याचे सगळे भाऊ* त्याच्यासमोर बसले होते. मोठा भाऊ आपल्या प्रथमपुत्राच्या अधिकाराप्रमाणे+ आणि बाकीचे भाऊ आपापल्या वयाप्रमाणे बसले होते आणि ते एकमेकांकडे आश्‍चर्याने पाहत होते. ३४ योसेफ आपल्या मेजावरून त्यांच्यासाठी पक्वान्‍ने पाठवत राहिला, पण त्याने बन्यामीनसाठी इतरांपेक्षा पाचपट जास्त पक्वान्‍ने पाठवली.+ मग त्यांनी त्याच्यासोबत मनसोक्‍त खाणंपिणं केलं.

४४ मग योसेफने आपल्या घरावर देखरेख करणाऱ्‍या माणसाला अशी आज्ञा दिली: “या माणसांच्या गोणींत, त्यांना नेता येईल इतकं धान्य भर आणि त्यांच्या पैशांच्या थैल्या त्यांच्या गोणींत ठेव.+ २ पण सगळ्यात धाकट्याच्या गोणीत त्याच्या पैशांच्या थैलीसोबत माझा चांदीचा प्यालाही ठेव.” तेव्हा योसेफने सांगितल्याप्रमाणे त्याने केलं.

३ सकाळ झाल्यावर त्यांना त्यांच्या गाढवांसोबत पाठवून देण्यात आलं. ४ ते शहरापासून थोड्याच अंतरावर पोहोचल्यावर, योसेफ त्याच्या घरावर देखरेख करणाऱ्‍या माणसाला म्हणाला: “ऊठ! त्यांचा पाठलाग कर! त्यांना गाठल्यावर त्यांना असं म्हण: ‘तुम्ही चांगल्याची परतफेड वाइटाने का केली? ५ माझा मालक ज्या प्याल्यातून पितो आणि ज्याने शकुन पाहतो, तो तुम्ही का घेतला? तुम्ही केलं ते फार वाईट केलं.’”

६ मग त्याने त्यांना गाठलं आणि योसेफने सांगितल्याप्रमाणे तो त्यांना बोलला. ७ पण ते त्याला म्हणाले: “प्रभू, हे तुम्ही काय बोलत आहात? असं काही करण्याचा विचारही तुमचे सेवक करू शकत नाहीत. ८ जे पैसे आम्हाला आमच्या गोणींमध्ये सापडले, ते आम्ही कनान देशातून परत तुमच्याकडे घेऊन आलो.+ मग, आम्ही तुमच्या मालकाच्या घरातलं सोनंचांदी का चोरू? ९ जर तो प्याला तुमच्या या सेवकांपैकी कोणाकडे सापडला, तर त्याला ठार मारलं जावं आणि बाकीचे आम्ही सर्व तुमचे गुलाम होऊ.” १० तेव्हा तो म्हणाला: “तुम्ही म्हणता तसंच होईल. ज्याच्याकडे तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल, पण बाकीचे सर्व निर्दोष ठरतील.” ११ मग प्रत्येकाने आपली गोण जमिनीवर ठेवून ती उघडली. १२ त्याने मोठ्या भावापासून धाकट्यापर्यंत सर्वांची कसून झडती घेतली. शेवटी तो प्याला बन्यामीनच्या गोणीत मिळाला.+

१३ तेव्हा त्यांनी दुःखाने आपले कपडे फाडले आणि प्रत्येकाने आपलं सामान गाढवावर लादून ते पुन्हा शहरात आले. १४ यहूदा+ आणि त्याचे भाऊ योसेफच्या घरी आले, तेव्हा तो अजूनही तिथेच होता; मग त्यांनी त्याच्यापुढे जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमन केलं.+ १५ योसेफ त्यांना म्हणाला: “तुम्ही हे काय केलंत? मी शकुन पाहू शकतो, हे तुम्हाला माहीत नव्हतं का?”+ १६ यावर यहूदा म्हणाला: “प्रभू, आम्ही तुम्हाला काय सांगणार आणि काय बोलणार? आम्ही निर्दोष आहोत हे कसं पटवून देऊ? खऱ्‍या देवानेच तुमच्या या सेवकांचा अपराध उघड केला आहे.+ आता हे माझ्या प्रभू, आम्ही सर्व आणि ज्याच्या हातात प्याला सापडला तोही तुमचा गुलाम झाला आहे.” १७ पण तो म्हणाला: “असा विचारही मी करू शकत नाही! ज्याच्या हातात प्याला सापडला, तोच माझा गुलाम होईल.+ बाकीचे तुम्ही सर्व जण, शांतीने आपल्या वडिलांकडे परत जा.”

१८ तेव्हा यहूदा त्याच्या जवळ जाऊन म्हणाला: “माझ्या प्रभू, मी विनंती करतो. कृपा करून तुमच्या सेवकाला तुमच्यासमोर बोलू द्या आणि तुमच्या सेवकावर रागावू नका कारण तुम्ही तर फारोसारखेच आहात.+ १९ माझ्या प्रभूने आपल्या सेवकांना विचारलं होतं, ‘तुमचे वडील आहेत का आणि तुम्हाला एखादा भाऊ आहे का?’ २० तेव्हा आम्ही आमच्या प्रभूला म्हणालो होतो, की ‘आमचे वडील म्हातारे आहेत आणि त्यांच्या म्हातारपणी झालेला एक धाकटा भाऊ आम्हाला आहे.+ पण आता तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा आहे,+ कारण त्याचा भाऊ मरण पावला.+ म्हणून आमच्या वडिलांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे.’ २१ तेव्हा तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला होता, ‘मला त्याला पाहायचं आहे, म्हणून त्याला इथे घेऊन या.’+ २२ पण आम्ही आमच्या प्रभूला म्हणालो होतो, ‘तो आपल्या वडिलांना सोडून इथे येऊ शकत नाही. तो त्यांना सोडून आला, तर ते जिवंत राहणार नाहीत.’+ २३ तेव्हा तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला होता, ‘जोपर्यंत तुम्ही आपल्या धाकट्या भावाला इथे आणत नाही, तोपर्यंत माझं तोंड पाहू नका.’+

२४ म्हणून आम्ही तुमचे सेवक, आमचे वडील यांच्याकडे गेलो आणि माझ्या प्रभूचे शब्द त्यांना सांगितले. २५ नंतर आमचे वडील म्हणाले, ‘परत जाऊन आपल्यासाठी थोडं धान्य विकत आणा.’+ २६ पण आम्ही म्हणालो, ‘आम्ही जाऊ शकत नाही. आमचा धाकटा भाऊ आमच्यासोबत आला तरच आम्ही जाऊ. कारण, जोपर्यंत आम्ही त्याला आपल्यासोबत नेत नाही, तोपर्यंत आम्ही त्या माणसाचं तोंड पाहू शकत नाही.’+ २७ तेव्हा तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या बायकोकडून मला दोनच मुलं झाली,+ हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. २८ पण त्यांच्यापैकी एक मला सोडून गेला आणि मी म्हणालो: “नक्कीच एखाद्या जंगली प्राण्याने त्याचे तुकडे केले असतील!”+ आणि मी आजपर्यंत त्याला पाहिलेलं नाही. २९ आता तुम्ही यालाही माझ्या डोळ्यांसमोरून दूर नेलं, आणि जर त्याचं काही बरंवाईट झालं, तर तुमच्यामुळे मला शोक करत कबरेत* जावं लागेल.’+

३० तुमचे सेवक, माझे वडील यांचा या मुलावर इतका जीव आहे, की जर मी आता त्यांच्याकडे या मुलाशिवाय गेलो, ३१ तर तो आमच्यासोबत नाही हे पाहताक्षणी ते प्राण सोडतील आणि तुमच्या या सेवकांमुळे खरोखर आमचे वडील शोक करत कबरेत* जातील. ३२ प्रभू, मी माझ्या वडिलांना या मुलाच्या सुरक्षेची खातरी दिली होती आणि म्हणालो होतो, की ‘जर मी त्याला तुमच्याकडे परत आणलं नाही, तर या पापाचा दोष कायमचा माझ्यावर राहील.’+ ३३ म्हणून, आता कृपा करून त्या मुलाच्या ऐवजी तुमच्या या सेवकाला गुलाम म्हणून इथे राहू द्या, म्हणजे त्याला त्याच्या भावांसोबत परत जाता येईल. ३४ या मुलाशिवाय मी आपल्या वडिलांकडे कसा परत जाऊ? माझ्या वडिलांवर हे संकट कोसळताना मी पाहू शकणार नाही!”

४५ हे ऐकल्यावर योसेफला आपल्या सर्व सेवकांपुढे आपल्या भावना आवरणं कठीण झालं,+ म्हणून तो म्हणाला: “सर्वांना बाहेर पाठवा!” मग सगळे जण बाहेर गेल्यावर, योसेफने आपल्या भावांना स्वतःची ओळख दिली.+

२ मग तो इतक्या मोठ्याने रडू लागला, की तिथे असलेल्या इजिप्तच्या लोकांनी ते ऐकलं आणि ही बातमी फारोच्या घरापर्यंत पोहोचली. ३ शेवटी योसेफ आपल्या भावांना म्हणाला: “मी योसेफ आहे. माझे वडील जिवंत आहेत का?” पण त्याच्या भावांना इतका धक्का बसला होता, की ते काहीच बोलू शकले नाहीत. ४ तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला: “माझ्या जवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ आले.

मग तो म्हणाला: “मी योसेफ, तुमचा भाऊ, ज्याला तुम्ही इजिप्तमध्ये विकलं होतं.+ ५ पण तुम्ही मला इथे विकलं, म्हणून आता एकमेकांवर रागावू नका आणि एकमेकांना दोषही देऊ नका; कारण, आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठी देवानेच मला तुमच्यापुढे इथे पाठवलं आहे.+ ६ देशातल्या दुष्काळाचं हे दुसरं वर्ष आहे+ आणि आणखीन पाच वर्षांपर्यंत नांगरणी किंवा कापणी होणार नाही. ७ देवाने अद्‌भुत रितीने तुमची सुटका करण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबांचा नाश होऊ नये,* म्हणून तुमच्यासाठी मला इथे पाठवलं.+ ८ खरंतर तुम्ही मला पाठवलं नाही, तर मी फारोचा मुख्य सल्लागार,* त्याच्या घरादाराचा अधिकारी आणि इजिप्तच्या संपूर्ण देशाचा शासक+ बनावं, म्हणून खऱ्‍या देवानेच मला इथे पाठवलं.

९ लवकरात लवकर माझ्या वडिलांकडे परत जाऊन त्यांना म्हणा, ‘तुमचा मुलगा योसेफ असं म्हणतो, “देवाने मला संपूर्ण इजिप्तचा अधिकारी बनवलं आहे.+ तेव्हा आता उशीर न करता माझ्याकडे निघून या.+ १० तुम्ही गोशेन प्रांतात राहा,+ म्हणजे तुम्ही माझ्याजवळ असाल. तुम्ही, तुमची मुलं, तुमची नातवंडं, तुमचे कळप, तुमची गुरंढोरं आणि तुमचं सर्वकाही घेऊन इथे राहा. ११ मी तुम्हाला अन्‍नधान्य पुरवीन, कारण दुष्काळाची अजून पाच वर्षं बाकी आहेत.+ नाहीतर दुष्काळामुळे तुमची आणि तुमच्या घरच्यांची उपासमार होईल आणि तुमच्याकडे असलेलं सर्वकाही तुम्हाला गमवावं लागेल.”’ १२ तुम्ही आणि माझा भाऊ बन्यामीन स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहात, की तुमच्याशी बोलणारा मीच आहे.+ १३ म्हणून इजिप्तमध्ये माझं सगळं वैभव आणि तुम्ही जे काही पाहिलं, त्याबद्दल माझ्या वडिलांना जाऊन सांगा आणि त्यांना लवकरात लवकर इथे घेऊन या.”

१४ मग तो आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारून रडू लागला आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.+ १५ त्यानंतर त्याने आपल्या सर्व भावांचं चुंबन घेतलं आणि तो त्यांच्यासोबत रडला. मग त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले.

१६ “योसेफचे भाऊ आले आहेत,” ही बातमी फारोच्या घरापर्यंत पोहोचली. हे ऐकून फारोला आणि त्याच्या सेवकांना आनंद झाला. १७ तेव्हा फारो योसेफला म्हणाला: “आपल्या भावांना सांग, ‘आपलं सामान जनावरांवर लादून कनान देशात जा, १८ तुमच्या पित्याला आणि तुमच्या कुटुंबांना घेऊन माझ्या देशात या. मी तुम्हाला इजिप्त देशातल्या सर्वात चांगल्या वस्तू देईन आणि देशात उत्पन्‍न होणाऱ्‍या सर्वात चांगल्या गोष्टी तुम्ही खाल.’”*+ १९ फारोने योसेफला त्यांना असंही सांगण्याची आज्ञा दिली:+ “तुमच्या मुलांना आणि बायकांना आणण्यासाठी इजिप्त देशातून बैलगाड्या घेऊन जा+ आणि तुमच्या वडिलांनाही बैलगाडीत बसवून इथे आणा.+ २० आपल्या मालमत्तेची काळजी करू नका,+ कारण इजिप्त देशातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी तुमच्याच आहेत.”

२१ तेव्हा इस्राएलच्या मुलांनी तसंच केलं आणि फारोच्या आज्ञेप्रमाणे योसेफने त्यांना बैलगाड्या आणि प्रवासासाठी लागणाऱ्‍या वस्तू दिल्या. २२ त्याने प्रत्येकाला कपड्यांचा एकेक जोड दिला, पण बन्यामीनला त्याने कपड्यांचे पाच जोड आणि ३०० चांदीचे तुकडे दिले.+ २३ त्याने इजिप्तच्या चांगल्या वस्तू दहा गाढवांवर, तसंच प्रवासासाठी लागणारं अन्‍नधान्य आणि गरजेच्या इतर वस्तू दहा गाढवींवर लादून आपल्या वडिलांसाठी पाठवल्या. २४ अशा रितीने, त्याने आपल्या भावांना पाठवून दिलं आणि ते जायला निघाले, तेव्हा तो त्यांना म्हणाला: “रस्त्याने जाताना एकमेकांवर रागावू नका.”+

२५ तेव्हा ते इजिप्तमधून निघून कनान देशात त्यांचा पिता याकोब याच्याकडे आले. २६ त्यांनी त्याला सांगितलं: “योसेफ अजून जिवंत आहे आणि तो संपूर्ण इजिप्त देशाचा शासक आहे!”+ पण, त्यांच्या बोलण्यावर त्याचा विश्‍वासच बसला नाही आणि तो सुन्‍न झाला.+ २७ पण जेव्हा त्यांनी योसेफने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या, आणि त्याला आणण्यासाठी योसेफने पाठवलेल्या बैलगाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा कुठे त्याच्या जिवात जीव आला. २८ इस्राएल म्हणाला: “आता माझी खातरी पटली! माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे! मरण्याआधी मला जाऊन त्याला पाहायचंय!”+

४६ तेव्हा इस्राएल आपलं जे काही होतं, ते* घेऊन निघाला. तो बैर-शेबा+ इथे पोहोचला, तेव्हा त्याने आपला पिता इसहाक याच्या देवाला+ बलिदानं अर्पण केली. २ मग देव रात्री इस्राएलला एका दृष्टान्तात म्हणाला: “याकोब, याकोब!” त्यावर तो म्हणाला: “मी इथे आहे!” ३ देव म्हणाला: “मी खरा देव आहे, मी तुझ्या पित्याचा देव आहे.+ इजिप्तला जायला घाबरू नकोस, कारण तिथे मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करीन.+ ४ मी स्वतः तुझ्यासोबत इजिप्तला येईन आणि तुला तिथून परतही आणीन+ आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकेल.”*+

५ मग याकोब बैर-शेबा इथून निघाला आणि इस्राएलच्या मुलांनी आपला पिता याकोब याला आणि आपल्या बायकामुलांना, फारोने पाठवलेल्या बैलगाड्यांमध्ये बसवून नेलं. ६ कनान देशात त्यांनी जमवलेली सगळी मालमत्ता आणि गुरंढोरंही त्यांनी आपल्यासोबत नेली. अशा रितीने याकोब आणि त्याच्यासोबत त्याचं सगळं कुटुंब इजिप्तमध्ये आलं. ७ तो आपल्या मुलांना, मुलींना आणि नातवंडांना, म्हणजे आपल्या सगळ्या वंशजांना इजिप्तमध्ये घेऊन आला.

८ इजिप्तमध्ये आलेल्या इस्राएलच्या मुलांची, म्हणजे याकोब आणि त्याच्या मुलांची नावं ही आहेत:+ याकोबच्या मोठ्या मुलाचं नाव रऊबेन+ होतं.

९ रऊबेनला हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी ही मुलं झाली.+

१० शिमोनला+ यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, सोहर, आणि एका कनानी स्त्रीपासून झालेला शौल,+ ही मुलं झाली.

११ लेवीला+ गेर्षोन, कहाथ आणि मरारी ही मुलं झाली.+

१२ यहूदाला+ एर, ओनान, शेला,+ पेरेस+ आणि जेरह+ ही मुलं झाली. पण एर आणि ओनान यांचा कनान देशातच मृत्यू झाला.+

पेरेसला हेस्रोन आणि हामूल ही मुलं झाली.+

१३ इस्साखारला तोला, पूवा, योब, आणि शिम्रोन ही मुलं झाली.+

१४ जबुलूनला+ सेरेद, एलोन आणि याहलेल ही मुलं झाली.+

१५ पदन-अराम इथे याकोबला लेआपासून ही मुलं, आणि दीना+ ही मुलगी झाली. त्याला एकूण ३३ मुलं व मुली झाल्या.

१६ गादला+ सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी आणि अरेली ही मुलं झाली.+

१७ आशेरला+ इम्नाह, इश्‍वा, इश्‍वी आणि बरीया ही मुलं, आणि सेराह ही मुलगी झाली.

बरीयाला हेबेर आणि मालकीएल ही मुलं झाली.+

१८ लाबानने लेआला दिलेली दासी जिल्पा+ हिच्यापासून याकोबला झालेली ही मुलं आहेत. याकोबला तिच्यापासून एकूण १६ मुलं झाली.

१९ याकोबची बायको राहेल हिला योसेफ+ आणि बन्यामीन+ ही मुलं झाली.

२० इजिप्तमध्ये योसेफला ओनचा* पुजारी पोटीफरा याची मुलगी आसनथ,+ हिच्यापासून मनश्‍शे+ आणि एफ्राईम+ ही मुलं झाली.

२१ बन्यामीनला+ बेला, बेकेर, अशबेल, गेरा,+ नामान, एही, रोश, मुप्पीम, हुप्पीम+ आणि अर्द+ ही मुलं झाली.

२२ राहेलपासून याकोबला झालेली ही मुलं आहेत. याकोबला तिच्यापासून एकूण १४ मुलं झाली.

२३ दानला+ हुशीम हा मुलगा* झाला.+

२४ नफतालीला+ यहसेल, गूनी, येसेर, आणि शिल्लेम ही मुलं झाली.+

२५ लाबानने राहेलला दिलेली दासी बिल्हा हिच्यापासून याकोबला झालेली ही मुलं आहेत. याकोबला तिच्यापासून एकूण सात मुलं झाली.

२६ याकोबचे जे वंशज इजिप्तमध्ये गेले, त्यांची संख्या, याकोबच्या मुलांच्या बायका सोडून ६६ इतकी होती.+ २७ योसेफला इजिप्तमध्ये दोन मुलं झाली. अशा रितीने याकोबच्या कुटुंबातले ७० लोक इजिप्तला आले.+

२८ मग, याकोबने आपण गोशेनच्या मार्गावर आहोत, हे योसेफला सांगायला यहूदाला पुढे पाठवलं.+ जेव्हा ते गोशेन+ देशात पोहोचले, २९ तेव्हा योसेफ आपला रथ तयार करून, आपला पिता इस्राएल याला गोशेन इथे भेटायला गेला. तो याकोबच्या समोर आला, तेव्हा याकोबने लगेच त्याला मिठी मारली आणि तो खूप रडला.* ३० मग इस्राएल योसेफला म्हणाला: “आज मी तुला पाहिलं आणि तू अजूनही जिवंत आहेस हे मला कळलं, आता मला मरण आलं तरी चालेल.”

३१ तेव्हा योसेफ आपल्या भावांना आणि आपल्या वडिलांच्या घरातल्या सर्वांना म्हणाला: “मी आता फारोकडे जातो आणि त्याला सांगतो,+ ‘माझे भाऊ आणि माझ्या वडिलांचं कुटुंब कनान देशातून इथे आलं आहे.+ ३२ ते लोक मेंढपाळ आहेत+ आणि ते गुरंढोरं पाळतात.+ ते आपले कळप, गुरंढोरं आणि त्यांचं सर्वकाही इथे घेऊन आले आहेत.’+ ३३ जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुम्ही काय करता?’ ३४ तेव्हा तुम्ही त्याला असं सांगा, ‘तुमचे सेवक लहानपणापासून आतापर्यंत गुरंढोरं पाळत आले आहेत. आमचे पूर्वजही हेच काम करायचे.’+ मग तुम्हाला गोशेन प्रांतात राहता येईल,+ कारण इजिप्तच्या लोकांना मेंढपाळांची किळस येते.”+

४७ मग योसेफने जाऊन फारोला सांगितलं:+ “माझे वडील आणि भाऊ त्यांचे कळप, गुरंढोरं आणि त्यांच्याजवळ असलेलं सर्वकाही घेऊन कनान देशातून आले आहेत आणि ते गोशेन+ प्रांतात आहेत.” २ योसेफ आपल्या पाच भावांना फारोसमोर घेऊन आला.+

३ फारो त्यांना म्हणाला: “तुम्ही काय काम करता?” यावर ते म्हणाले: “तुमचे सेवक मेंढपाळ आहेत. आमचे पूर्वजही हेच काम करायचे.”+ ४ मग ते म्हणाले: “आम्ही या देशात विदेशी म्हणून राहायला आलो आहोत,+ कारण कनान देशात इतका भयंकर दुष्काळ आहे, की आमच्या कळपांना चरायला गवत नाही.+ म्हणून कृपा करून तुमच्या सेवकांना गोशेन प्रांतात राहू द्या.”+ ५ तेव्हा फारो योसेफला म्हणाला: “तुझे वडील आणि भाऊ इथे तुझ्याकडे आले आहेत. ६ इजिप्तचा सगळा देश तुझ्यासमोर आहे. देशाच्या सगळ्यात चांगल्या भागात तुझ्या वडिलांना आणि भावांना राहू दे.+ त्या सर्वांना गोशेन प्रांतात राहू दे आणि त्यांच्यापैकी तुला जी माणसं योग्य वाटतील, त्यांना माझ्या कळपांवर नेम.”

७ मग योसेफ आपला पिता याकोब याला फारोसमोर घेऊन आला आणि याकोबने फारोला आशीर्वाद दिला. ८ फारोने याकोबला विचारलं: “तुमचं वय किती?” ९ याकोब फारोला म्हणाला: “मी १३० वर्षांचा आहे. माझ्या वाडवडिलांच्या तुलनेत माझ्या आयुष्याची वर्षं फार कमी आणि दुःखाने भरलेली होती.+ या सर्व वर्षांत मीही माझ्या पूर्वजांप्रमाणेच ठिकठिकाणी जाऊन* विदेशी म्हणून राहिलो.”+ १० मग फारोला आशीर्वाद देऊन, याकोब तिथून निघून गेला.

११ योसेफने आपल्या वडिलांना आणि भावांना इजिप्त देशात राहायला जमीन दिली. फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे, त्याने त्यांना देशातल्या सगळ्यात चांगल्या भागात, म्हणजेच रामसेस+ प्रांतात जागा दिली. १२ मग, योसेफ आपल्या वडिलांना आणि भावांना, आणि आपल्या वडिलांच्या संपूर्ण घराण्याला, प्रत्येक कुटुंबातल्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्‍न* पुरवत राहिला.

१३ दुष्काळ खूपच कडाक्याचा असल्यामुळे आता संपूर्ण इजिप्त आणि कनान देशात अजिबात अन्‍न* नव्हतं. दुष्काळामुळे या देशांची फार वाईट स्थिती झाली होती.+ १४ इजिप्त आणि कनान देशांतल्या लोकांनी धान्य खरेदी करण्यासाठी+ आणलेला सर्व पैसा योसेफ फारोच्या घरात जमा करत राहिला. १५ काही काळाने, इजिप्त आणि कनान देशातल्या लोकांजवळचे सर्व पैसे संपले आणि इजिप्तचे लोक योसेफकडे येऊन म्हणू लागले: “आमच्याजवळचे पैसे संपले आहेत. आम्हाला अन्‍न दे, नाहीतर आम्ही तुझ्या डोळ्यांदेखत मरून जाऊ!” १६ यावर योसेफ म्हणाला: “तुमच्याजवळचे पैसे संपले असतील तर तुमची गुरंढोरं द्या, म्हणजे त्यांच्या बदल्यात मी तुम्हाला धान्य देईन.” १७ मग ते आपली जनावरं योसेफकडे आणू लागले. योसेफ त्यांना त्यांच्या गुराढोरांच्या, मेंढरांच्या, घोड्यांच्या आणि गाढवांच्या बदल्यात धान्य देत राहिला. त्याने त्यांना वर्षभर जनावरांच्या बदल्यात धान्य दिलं.

१८ ते वर्ष संपलं, तेव्हा पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे येऊन म्हणू लागले: “प्रभू, तुझ्यापासून काय लपवायचं? आमच्याजवळ असलेला सगळा पैसा आणि जनावरं आम्ही आधीच तुला दिली आहेत. तेव्हा प्रभू, आता आमचं शरीर आणि जमीन सोडून आमच्याजवळ द्यायला काही उरलेलं नाही. १९ आता आम्ही तुझ्या डोळ्यांदेखत मरून जाऊ आणि आमची जमीनही ओसाड पडेल. म्हणून, तू आम्हाला विकत घे आणि आमच्या जमिनीही घे आणि बदल्यात आम्हाला अन्‍न दे. आम्हाला बियाणं दे, नाहीतर आम्ही मरून जाऊ आणि आमच्या जमिनी ओसाड पडतील.” २० मग योसेफने इजिप्तच्या सर्व लोकांच्या जमिनी फारोसाठी विकत घेतल्या. दुष्काळ खूपच कडाक्याचा असल्यामुळे इजिप्तच्या प्रत्येकाने आपली जमीन विकली. अशा रितीने, संपूर्ण देशातली जमीन फारोची झाली.

२१ मग त्याने लोकांना इजिप्तच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंतच्या शहरांमध्ये हलवलं.+ २२ फक्‍त पुजाऱ्‍यांच्या जमिनी त्याने विकत घेतल्या नाहीत,+ कारण पुजाऱ्‍यांना फारोकडून अन्‍नधान्य पुरवलं जायचं आणि पुजारी त्यावरच जगायचे. म्हणून त्यांनी आपल्या जमिनी विकल्या नाहीत. २३ मग योसेफ लोकांना म्हणाला: “मी तुमच्यासोबतच तुमच्या मालकीच्या जमिनीही फारोसाठी विकत घेतल्या आहेत. हे बियाणं घ्या आणि जमिनीत पेरणी करा. २४ पीक आल्यावर, पाचवा भाग फारोला द्या.+ बाकीचे चार भाग तुमचे असतील. ते तुम्ही पेरणीसाठी, तसंच तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी आणि मुलांसाठी अन्‍न म्हणून वापरा.” २५ तेव्हा ते म्हणाले: “प्रभू, तू आमचा जीव वाचवला आहेस.+ तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे आणि आम्ही फारोचे दास होऊन राहू.”+ २६ मग, योसेफने असं फर्मान काढलं, की पाचवा भाग फारोचा असेल. हे फर्मान आजही इजिप्त देशात पाळलं जातं. फक्‍त पुजाऱ्‍यांची जमीन फारोच्या मालकीची झाली नाही.+

२७ अशा रितीने, इस्राएलचं घराणं इजिप्त देशातल्या गोशेन+ प्रांतात राहू लागलं आणि ते तिथे फलदायी होऊन त्यांची संख्या खूप वाढली.+ २८ याकोब इजिप्त देशात १७ वर्षं राहिला आणि तो १४७ वर्षांचा झाला.+

२९ इस्राएलचा मृत्यू जवळ आला+ तेव्हा तो आपला मुलगा योसेफ याला जवळ बोलावून म्हणाला: “कृपा करून माझ्याबद्दल तुझं एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखव. माझ्या मांडीखाली हात ठेवून मला वचन दे, की तू मला इजिप्तमध्ये पुरणार नाहीस.+ ३० माझा मृत्यू झाल्यावर,* मला इजिप्तमधून बाहेर ने आणि माझ्या वाडवडिलांच्या कबरस्तानात पूर.”+ तेव्हा योसेफ त्याला म्हणाला: “तुम्ही म्हणता तसंच मी करीन.” ३१ मग तो म्हणाला: “शपथ घे.” तेव्हा त्याने शपथ घेतली+ आणि इस्राएलने आपल्या पलंगाच्या उशाशी डोकं टेकवून देवाला नमन केलं.+

४८ यानंतर योसेफला अशी बातमी मिळाली: “तुझ्या वडिलांची तब्येत खालावत चालली आहे.” तेव्हा योसेफ आपली दोन मुलं मनश्‍शे आणि एफ्राईम+ यांना याकोबकडे घेऊन गेला. २ मग कोणीतरी याकोबला सांगितलं: “तुमचा मुलगा योसेफ तुम्हाला भेटायला आला आहे.” तेव्हा इस्राएल कसाबसा पलंगावर उठून बसला. ३ मग तो योसेफला म्हणाला:

“सर्वशक्‍तिमान देवाने कनान देशात लूज इथे माझ्यासमोर प्रकट होऊन मला आशीर्वाद दिला.+ ४ तो मला म्हणाला, ‘मी तुला फलदायी करीन आणि तुझी संख्या वाढवीन. तुझ्यापासून लोकांचा समुदाय येईल+ आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीला* मी हा देश कायमचा देईन.’+ ५ मी इजिप्तला येण्याआधी जी दोन मुलं तुला इथे झाली, ती माझी आहेत.+ रऊबेन आणि शिमोन जसे माझे आहेत,+ तसेच एफ्राईम आणि मनश्‍शेही माझे होतील. ६ पण त्यांच्यानंतर जी मुलं तुला होतील, ती तुझीच असतील. त्यांना त्यांच्या भावांच्या वारशातून वाटा मिळेल.+ ७ जेव्हा मी पदनवरून निघालो, तेव्हा एफ्राथपासून+ बऱ्‍याच अंतरावर असताना, राहेलचा कनान देशात माझ्यासमोर मृत्यू झाला.+ म्हणून मी तिला एफ्राथच्या, म्हणजे बेथलेहेमच्या+ वाटेवर असताना पुरलं.”

८ मग इस्राएलने योसेफच्या मुलांना पाहिलं आणि विचारलं: “हे कोण आहेत?” ९ तेव्हा योसेफ आपल्या वडिलांना म्हणाला: “देवाने मला इथे दिलेली, ही माझी मुलं आहेत.”+ यावर इस्राएल म्हणाला: “त्यांना माझ्याजवळ आण, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”+ १० इस्राएलचं वय झाल्यामुळे त्याला नीट दिसत नव्हतं, म्हणून योसेफ आपल्या मुलांना त्याच्या जवळ घेऊन आला आणि इस्राएलने त्यांना मिठी मारून त्यांचं चुंबन घेतलं. ११ इस्राएल योसेफला म्हणाला: “मला पुन्हा कधी तुझा चेहरा पाहायला मिळेल, असा मी विचारही केला नव्हता.+ पण देवाने तर मला तुझ्या संततीलाही* पाहू दिलं!” १२ मग योसेफने आपल्या मुलांना इस्राएलच्या गुडघ्यांपासून बाजूला केलं आणि त्यानंतर त्याने आपलं डोकं जमिनीवर टेकवून त्याला नमस्कार केला.

१३ योसेफने आपल्या दोघा मुलांना इस्राएलच्या जवळ आणलं. त्याने आपल्या उजव्या हाताने एफ्राईमला+ इस्राएलच्या डाव्या बाजूला आणि आपल्या डाव्या हाताने मनश्‍शेला+ इस्राएलच्या उजव्या बाजूला उभं केलं. १४ पण एफ्राईम धाकटा असूनही इस्राएलने आपला उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवला, आणि त्याने आपला डावा हात मनश्‍शेच्या डोक्यावर ठेवला. खरंतर, मनश्‍शे हा प्रथमपुत्र होता,+ पण तरीही इस्राएलने आपले हात जाणूनबुजून अशा रितीने ठेवले. १५ मग त्याने योसेफला असा आशीर्वाद दिला:+

“ज्या खऱ्‍या देवासमोर माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक चालले,+

तसंच, ज्या खऱ्‍या देवाने आजपर्यंत, माझ्या संपूर्ण आयुष्यात मेंढपाळाप्रमाणे माझा सांभाळ केला,+

१६ आणि, ज्याने आपल्या स्वर्गदूताद्वारे मला सर्व संकटांतून वाचवलं,+ त्याने या मुलांना आशीर्वाद द्यावा.+

त्यांना माझ्या, आणि अब्राहाम व इसहाक या माझ्या पूर्वजांच्या नावाने ओळखलं जावं,

आणि त्यांची संख्या पृथ्वीवर खूप वाढावी.”+

१७ आपल्या पित्याने त्याचा उजवा हात एफ्राईमच्या डोक्यावर ठेवला आहे, हे योसेफने पाहिलं तेव्हा त्याला ते आवडलं नाही. म्हणून त्याने आपल्या पित्याचा हात एफ्राईमच्या डोक्यावरून काढून, तो मनश्‍शेच्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. १८ योसेफ आपल्या पित्याला म्हणाला: “बाबा, असं नाही, प्रथमपुत्र हा आहे.+ तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.” १९ पण त्याच्या पित्याने त्याचं ऐकलं नाही. तो म्हणाला: “मला माहीत आहे बेटा, मला माहीत आहे. याच्यापासूनही एक मोठं आणि महान राष्ट्र बनेल. पण याचा धाकटा भाऊ याच्यापेक्षाही महान बनेल+ आणि त्याची संतती* इतकी वाढेल, की त्यांची संख्या बऱ्‍याच राष्ट्रांइतकी होईल.”+ २० तो त्यांना त्या दिवशी आशीर्वाद देऊन+ पुढे म्हणाला:

“इस्राएलचे लोक आशीर्वाद देताना असं म्हणतील,

‘देवाने तुला एफ्राईम आणि मनश्‍शेसारखं बनवावं.’”

अशा रितीने तो पुन्हापुन्हा मनश्‍शेच्या आधी एफ्राईमचं नाव घेत राहिला.

२१ मग इस्राएल योसेफला म्हणाला: “बघ, मी आता जास्त दिवस जगणार नाही,+ पण देव नक्कीच तुझ्यासोबत असेल आणि तो तुला तुझ्या पूर्वजांच्या देशात परत घेऊन जाईल.+ २२ मी तुला तुझ्या भावांपेक्षा जमिनीचा एक वाटा* जास्त देतो. ती जमीन मी माझ्या तलवारीने आणि धनुष्याने अमोरी लोकांकडून घेतली होती.”

४९ मग याकोब आपल्या मुलांना बोलावून म्हणाला: “सगळे एकत्र जमा म्हणजे पुढे तुमच्यासोबत काय होईल, हे मी तुम्हाला सांगीन. २ याकोबच्या मुलांनो, एकत्र जमा आणि तुमचा पिता इस्राएल काय सांगतो ते ऐका.

३ रऊबेन,+ तू माझा प्रथमपुत्र,+ माझं सामर्थ्य आणि माझ्या पुरुषत्वाचं प्रथमफळ आहेस. सन्मान आणि सामर्थ्य यांत तू अत्यंत श्रेष्ठ आहेस. ४ पुराच्या उसळत्या पाण्यासारखं तू स्वतःला आवरलं नाहीस, म्हणून तू श्रेष्ठ ठरणार नाहीस. तू तुझ्या वडिलांच्या पलंगावर चढलास+ आणि तू माझं अंथरूण भ्रष्ट* केलंस. खरंच, याने असं काम केलं!

५ शिमोन आणि लेवी भाऊ आहेत.+ ते आपल्या तलवारींनी हिंसाचार करतात.+ ६ माझ्या जिवा,* त्यांची संगत धरू नकोस. माझ्या मना,* त्यांच्या घोळक्यात जाऊ नकोस. कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांची हत्या केली+ आणि मौज म्हणून त्यांनी बैलांच्या पायांच्या शिरा कापल्या. ७ त्यांचा राग आणि त्यांचा क्रोध शापित असो, कारण त्यांचा राग क्रूर आणि त्यांचा क्रोध निर्दयी आहे.+ मी याकोबच्या देशात त्यांची पांगापांग करीन आणि इस्राएलच्या देशात त्यांना विखरून टाकीन.+

८ यहूदा,+ तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील.+ तुझा हात तुझ्या शत्रूंची मान धरेल.+ तुझ्या वडिलांची मुलं तुला वाकून नमन करतील.+ ९ यहूदा सिंहाचा छावा* आहे.+ माझ्या मुला, तू शिकार खाऊन उठशील. तो सिंहासारखा जमिनीवर लोळतो आणि आळोखेपिळोखे देतो. त्याला छेडण्याचं धैर्य कोणात? १० शिलो* येईपर्यंत+ राजदंड यहूदाच्या हातून जाणार नाही+ आणि अधिकाऱ्‍याची काठी त्याच्या पायांमधून हलणार नाही. सर्व लोक त्याच्या अधीन होतील.*+ ११ तो आपलं गाढव द्राक्षवेलीला बांधेल आणि गाढवीचं पिल्लू उत्तम द्राक्षवेलीला बांधेल. तो मद्यात* आपले कपडे आणि द्राक्षांच्या रसात आपला झगा धुईल. १२ द्राक्षारस पिऊन त्याचे डोळे लाल भडक झाले आहेत आणि दूध पिऊन त्याचे दात पांढरे झाले आहेत.

१३ जबुलून+ समुद्रकिनाऱ्‍याजवळ वस्ती करेल; जहाजं जिथे नांगर टाकतात,+ अशा किनाऱ्‍यावर तो राहील. त्याच्या प्रदेशाची सीमा सिदोनपर्यंत असेल.+

१४ इस्साखार+ दणकट गाढव आहे; तो खोगिराच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या गोणींसहित आराम करू शकतो. १५ विश्रांती घेण्याची जागा चांगली आहे आणि आपल्या वाट्याला आलेली जमीन उत्तम आहे, असं तो पाहील. तो ओझं वाहण्यासाठी आपला खांदा वाकवेल आणि दासासारखा मजुरी करायला तयार होईल.

१६ इस्राएलचा एक वंश या नात्याने दान+ आपल्या लोकांचा न्याय करेल.+ १७ दान रस्त्याच्या कडेला असलेला साप होईल. तो मार्गावरचा विषारी साप* होईल. तो घोड्याच्या टाचेला दंश करेल आणि घोड्यावरचा स्वार मागे उलटून पडेल.+ १८ हे यहोवा, मी तारणासाठी तुझी वाट पाहीन.

१९ गादवर+ लुटारूंची टोळी हल्ला करेल, पण तो त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करेल.+

२० आशेरजवळ+ भरपूर* अन्‍न* असेल आणि तो राजासाठी योग्य असं अन्‍न पुरवेल.+

२१ नफताली+ एक नाजूक हरीण आहे. त्याचे शब्द मधुर आहेत.+

२२ योसेफ+ एका फलदायी झाडाची फांदी आहे. तो झऱ्‍याजवळ लावलेल्या अशा एका फलदायी झाडासारखा आहे, ज्याच्या फांद्या भिंत ओलांडून जातात. २३ पण तिरंदाज त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला करत राहिले. त्यांनी त्याला बाण मारले आणि ते मनोमन त्याचा द्वेष करत राहिले.+ २४ आणि तरीसुद्धा त्याचं धनुष्य स्थिर राहिलं+ आणि त्याचे हात मजबूत आणि चपळ राहिले.+ जो याकोबचा सामर्थ्यवान, त्याचा मेंढपाळ आणि त्याला आधार देणारा खडक आहे, त्याच्या हातून हे घडून आलं. २५ तो* तुला साहाय्य करणाऱ्‍या देवाचं वरदान आहे. तुला आशीर्वाद देणाऱ्‍या सर्वशक्‍तिमान देवाशी त्याची जवळीक आहे. देव तुला वरून आकाशाचा आणि खोलवर असलेल्या जलाशयाचा आशीर्वाद देईल.+ तो तुला भरपूर मुलंबाळं आणि गुरंढोरं देऊन आशीर्वाद* देईल. २६ तुझ्या पित्याचे आशीर्वाद सर्वकाळाच्या पर्वतांच्या आशीर्वादांपेक्षा श्रेष्ठ असतील, कायम टिकणाऱ्‍या टेकड्यांवरच्या सुंदर वस्तूंपेक्षा ते श्रेष्ठ असतील.+ हे आशीर्वाद नेहमीसाठी योसेफच्या डोक्यावर राहतील, आपल्या सर्व भावांमधून ज्याला निवडण्यात आलं, त्याच्या मस्तकावर ते राहतील.+

२७ बन्यामीन+ फाडणाऱ्‍या लांडग्यासारखा होईल.+ तो सकाळी आपली शिकार खाईल, आणि संध्याकाळी लुटीचे वाटे करेल.”+

२८ हे सर्व इस्राएलचे १२ वंश आहेत आणि त्यांना आशीर्वाद देताना त्यांच्या पित्याने बोललेले हे शब्द आहेत. त्याने त्यांच्यापैकी प्रत्येकाला योग्य असा आशीर्वाद दिला.+

२९ त्यानंतर त्याने त्यांना या आज्ञा दिल्या: “मी आता माझ्या पूर्वजांना जाऊन मिळेन.*+ मला हित्ती एफ्रोनच्या शेतातल्या गुहेत माझ्या वाडवडिलांसोबत पुरा.+ ३० ही गुहा कनान देशात मम्रेसमोरच्या मकपेला नावाच्या शेतात आहे. अब्राहामने हे शेत पुरण्यासाठी जमीन म्हणून हित्ती एफ्रोनकडून विकत घेतलं होतं. ३१ तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची बायको सारा हिला पुरलं होतं.+ तिथेच त्यांनी इसहाक+ आणि त्याची बायको रिबका हिला पुरलं आणि तिथेच मी लेआला पुरलं. ३२ ते शेत आणि त्यातली गुहा हेथच्या मुलांकडून विकत घेतलेली आहे.”+

३३ अशा रितीने, याकोबने आपल्या मुलांना या सर्व सूचना दिल्या. मग त्याने पलंगावर आपले पाय वर घेतले आणि प्राण सोडला आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.*+

५० मग योसेफ आपल्या वडिलांच्या अंगावर पडून+ त्यांचे मुके घेऊ लागला आणि खूप रडला. २ त्यानंतर योसेफने आपल्या सेवकांना, म्हणजे वैद्यांना त्याच्या वडिलांच्या मृतदेहाला सुगंधी पदार्थ लावून तो दफनविधीसाठी तयार करण्याची+ आज्ञा दिली. तेव्हा वैद्यांनी इस्राएलचा मृतदेह दफनविधीसाठी तयार केला. ३ या कामाला ४० दिवस लागले. कारण मृतदेहाला सुगंधी पदार्थ लावून तो दफनविधीसाठी तयार करायला इतका काळ लागायचा. मग इजिप्तचे लोक याकोबसाठी ७० दिवसांपर्यंत शोक करत राहिले.

४ त्याच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या दरबारातल्या अधिकाऱ्‍यांना म्हणाला: “माझ्यावर तुमची कृपा झाली असेल, तर फारोला माझा हा निरोप द्या: ५ ‘माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली होती+ आणि ते मला म्हणाले होते: “मी आता मरणार आहे.+ कनान देशात, माझ्या मालकीच्या पुरण्याच्या जागेत जी कबर मी खोदून घेतली आहे,+ तिथे नेऊन मला पूर.”+ म्हणून आता मला जाऊन माझ्या वडिलांना पुरू द्या. त्यानंतर मी परत येईन.’” ६ फारो त्याला म्हणाला: “तुझ्या वडिलांनी तुला जी शपथ घ्यायला लावली होती, त्याप्रमाणे त्यांना जाऊन पूर.”+

७ म्हणून योसेफ आपल्या पित्याला पुरायला गेला आणि फारोचे सर्व सेवक, दरबारातले उच्च अधिकारी+ आणि इजिप्त देशातली सगळी वडीलधारी मंडळी त्याच्यासोबत गेली. ८ तसंच, योसेफच्या कुटुंबातले सर्व जण, त्याचे भाऊ आणि त्याच्या वडिलांच्या घराण्यातले सर्व जण+ त्याच्यासोबत गेले. फक्‍त लहान मुलांना, गुराढोरांना आणि मेंढरांना त्यांनी गोशेनमध्येच ठेवलं. ९ त्याच्यासोबत रथ+ आणि घोडेस्वारही गेले. अशा रितीने पुष्कळ लोकांचा एक मोठा समूह कनानला जायला निघाला. १० मग ते यार्देनच्या प्रदेशात असलेल्या अटादाच्या खळ्याजवळ* आले. तिथे त्यांनी त्याच्यासाठी खूप मोठ्याने रडून शोक केला. योसेफ तिथेच सात दिवस आपल्या पित्यासाठी शोक करत राहिला. ११ कनान देशातल्या लोकांनी त्यांना अटादाच्या खळ्यात* शोक करताना पाहिलं, तेव्हा ते आश्‍चर्याने म्हणाले: “इजिप्तचे लोक किती शोक करत आहेत!” म्हणून यार्देनच्या प्रदेशात असलेल्या त्या ठिकाणाचं नाव अबेलमिस्राइम* पडलं.

१२ अशा रितीने याकोबने आपल्या मुलांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केलं.+ १३ त्याच्या मुलांनी त्याला कनान देशात नेऊन, मम्रेसमोर मकपेलाच्या शेतात असलेल्या गुहेत पुरलं. हे शेत अब्राहामने हित्ती एफ्रोनकडून पुरण्याची जागा म्हणून विकत घेतलं होतं.+ १४ आपल्या पित्याला पुरल्यानंतर योसेफ, त्याचे भाऊ आणि त्याच्यासोबत त्याच्या पित्याला पुरायला गेलेले सर्व जण इजिप्तला परत आले.

१५ आपल्या पित्याचा मृत्यू झाला आहे हे योसेफच्या भावांनी पाहिलं, तेव्हा ते एकमेकांना म्हणाले: “कदाचित योसेफच्या मनात आपल्याबद्दल राग असेल, कारण आपण त्याच्यासोबत खूप वाईट वागलो होतो आणि आता तो त्या सर्व गोष्टींचा सूड उगवेल.”+ १६ म्हणून त्यांनी योसेफला असा निरोप पाठवला: “आपल्या पित्याने मरण्याआधी अशी आज्ञा दिली होती: १७ ‘योसेफला असं सांगा: “मी तुला विनंती करतो, की तुझ्या भावांनी तुझा छळ करून तुझ्याविरुद्ध जो अपराध आणि जे पाप केलं, त्याबद्दल तू त्यांना क्षमा कर.”’ म्हणून, कृपा करून तुझ्या वडिलांच्या देवाच्या या सेवकांना तू क्षमा कर.” त्यांचं हे बोलणं ऐकून योसेफ रडू लागला. १८ मग त्याचे भाऊ स्वतः त्याच्याकडे आले आणि त्याच्यासमोर वाकून म्हणाले: “आम्ही तुझे दास आहोत!”+ १९ योसेफ त्यांना म्हणाला: “घाबरू नका. मी काय देव आहे? २० तुम्हाला जरी माझं वाईट करायचं होतं,+ तरी यातून काहीतरी चांगलं घडावं आणि पुष्कळ लोकांचा जीव वाचावा, अशी देवाची इच्छा होती. आणि आज तो हेच करत आहे.+ २१ म्हणून तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना अन्‍न पुरवत राहीन.”+ अशा रितीने योसेफने आपल्या भावांशी प्रेमाने बोलून त्यांना दिलासा दिला.

२२ योसेफ आणि त्याच्या वडिलांच्या घराण्यातले सर्व जण पुढे इजिप्तमध्येच राहिले. योसेफ एकूण ११० वर्षं जगला. २३ त्याने एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली.+ तसंच त्याने मनश्‍शेचा मुलगा माखीर,+ याच्या मुलांनाही पाहिलं. योसेफला ही मुलं स्वतःच्या मुलांसारखी होती.* २४ नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला: “मी आता जास्त जगणार नाही, पण देव नक्की तुमच्याकडे लक्ष देईल+ आणि तो तुम्हाला या देशातून काढून, त्याने अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना ज्या देशाबद्दल वचन दिलं, त्या देशात नेईल.”+ २५ मग योसेफने इस्राएलच्या मुलांना शपथ घ्यायला लावली आणि त्यांना म्हणाला: “देव नक्कीच तुमच्याकडे लक्ष देईल आणि तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी* आपल्यासोबत घेऊन जा.”+ २६ मग योसेफ ११० वर्षांचा झाल्यावर त्याचा मृत्यू झाला आणि त्यांनी त्याच्या मृतदेहाला सुगंधी पदार्थ लावले+ आणि त्याला इजिप्तमध्ये एका शवपेटीत ठेवण्यात आलं.

किंवा “उसळत्या पाण्यावर.”

किंवा “देवाची पवित्र शक्‍ती.”

किंवा “अंतरिक्ष; अवकाश; पोकळी.”

किंवा “जिवांनी.”

किंवा “महाकाय प्राणी.”

किंवा “जीव.”

किंवा “जमिनीवर चालणारे प्राणी,” यात सरपटणारे प्राणी आणि इतर प्रकारच्या वेगवेगळ्या प्राण्यांचा समावेश होतो.

शब्दशः “आणि त्यांचं सर्व सैन्य.”

किंवा “संकल्प केला होता.”

יהוה (य-ह-व-ह ) हे देवाचं खास वैयक्‍तिक नाव इथे पहिल्यांदा येतं. अति. क४ पाहा.

किंवा “जीव.” हिब्रू भाषेत निफेश.  याचा शब्दशः अर्थ “श्‍वास घेणारा प्राणी” असा होतो. शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.

किंवा “टायग्रीस.”

किंवा “जिवाला.”

किंवा “बरगडी.”

किंवा “बायकोला जडून राहील.”

किंवा “सगळ्यात हुशार; सगळ्यात चलाख.”

किंवा “दररोजच्या वारा वाहण्याच्या वेळी.”

किंवा “नग्न.”

किंवा “नग्न.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

किंवा “वैर.”

किंवा “जखम करेल; वार करेल.”

किंवा “जखम करशील; ठेचशील.”

म्हणजे “मानव; मानवजात.” हा शब्द “पृथ्वी” किंवा “जमीन” या अर्थाच्या हिब्रू भाषेतल्या शब्दाशी संबंधित असावा.

शब्दशः “वेदना.”

म्हणजे, “जीवित.”

शब्दशः “जिवंत असलेल्या सर्वांची.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तो नाराज झाला.”

शब्दशः “ताकद.”

यहोवाने इतरांना ताकीद म्हणून दिलेल्या एका आदेशाला हे सूचित करत असावं.

किंवा “हद्दपार केलेल्यांच्या प्रदेशात.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, “नियुक्‍त केलेला; ठरवलेला.”

शब्दशः “बीज.”

किंवा “आपल्या प्रतिरूपात.”

किंवा “आदाम; मानवजात.”

किंवा “त्याच्या प्रतिरूपाचा.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे कदाचित, “विश्रांती; दिलासा.”

किंवा “सुटका.”

स्वर्गदूतांना सूचित करणारा हिब्रू भाषेतला एक वाक्प्रचार.

किंवा “मनुष्य आपल्या शरीराच्या इच्छांप्रमाणे वागत असल्यामुळे.”

म्हणजे कदाचित, “पाडणारे,” म्हणजे जे इतरांना खाली पाडतात. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दुःख झालं.”

किंवा “त्याचं मन दुःखी झालं.”

शब्दशः “त्याच्या पिढ्यांमध्ये.”

शब्दशः “गोफेरची झाडं,” रेझीनयुक्‍त लाकूड कदाचित सायप्रस झाडाचं लाकूड.

शब्दशः “पेटी.” हे चौकोनी कोपरे आणि खालचा भाग सपाट असलेल्या पेटीच्या आकाराच्या एका लांबुळक्या जहाजाला सूचित करतं.

एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

हिब्रू भाषेत सोहर.  काहींचं म्हणणं आहे, की सोहर  हा शब्द उजेडासाठी असलेल्या झरोक्याला किंवा खिडकीला सूचित करत नाही, तर, एक हात लांबीचा उतार असलेल्या छताला सूचित करतो.

किंवा “पूर.”

किंवा “जीवन शक्‍ती.”

किंवा कदाचित, “प्रत्येक शुद्ध प्राण्याच्या सात जोड्या.”

किंवा कदाचित, “आकाशात उडणाऱ्‍या पक्ष्यांच्या आणि जीवजंतूंच्या सात जोड्या.”

किंवा “जीवन शक्‍ती.”

एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

हे कदाचित घोळक्यांत राहणाऱ्‍या लहान जीवजंतूना सूचित करतं.

किंवा “जीवन शक्‍ती.”

शब्दशः “आठवण आली.”

किंवा “पाय ठेवायला.”

किंवा “समाधान झालं.” शब्दशः “शांतिदायक.”

किंवा “तुम्हाला त्यांच्यावर अधिकार देत आहे.”

किंवा “जीव.”

किंवा “जिवांच्या रक्‍ताबद्दल.”

किंवा “जीव.”

किंवा “समुद्राजवळच्या प्रदेशांत.”

किंवा कदाचित, “ते मिळून मोठं शहर बनलं आहे.”

किंवा कदाचित, “याफेथचा मोठा भाऊ होता.”

म्हणजे, “विभागणी.”

किंवा “पृथ्वीच्या लोकसंख्येची.”

किंवा “वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणार नाही.”

म्हणजे, “गोंधळ.”

किंवा “स्वतःसाठी आशीर्वाद मिळवतील.”

शब्दशः “बीज.”

किंवा “परदेशी म्हणून.”

किंवा “मिसरमध्ये.”

म्हणजे, एदेन बागेसारखा.

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

किंवा “खालच्या मैदानात.”

शब्दशः “क्षार समुद्र.”

किंवा “खालच्या मैदानात.”

किंवा “खालच्या मैदानात.”

शब्दशः “इब्री अब्रामला.”

शब्दशः “भावाला.”

किंवा “खालच्या मैदानात.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “तुझ्या आतल्या भागांतून येणारा.”

शब्दशः “बीज.”

किंवा “गणलं.”

किंवा “गाय.”

किंवा “त्यांचे तुकडे एकमेकांशी जुळतील असे ठेवले.”

किंवा “वंशज.” शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

किंवा “दासीशी संबंध ठेवा.”

शब्दशः “तुमच्या उराशी दिली.”

शब्दशः “बीज.”

म्हणजे, “देव ऐकतो.”

शब्दशः “ऐकला आहे.”

काहींच्या मते हा शब्द झेब्रा या प्राण्याला सूचित करतो. कदाचित त्याच्या स्वतंत्र वृत्तीमुळे हे उदाहरण देण्यात आलं असावं.

किंवा कदाचित, “तो त्याच्या सगळ्या भावांच्या विरोधात असेल.”

म्हणजे, “मला पाहणाऱ्‍या जिवंत देवाची विहीर.”

म्हणजे, “पित्याचा सन्मान करण्यात आला आहे.”

म्हणजे, “लोकसमुदायाचा पिता; अनेकांचा पिता.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “बीज.”

किंवा “त्या जिवाला.”

म्हणजे कदाचित, “वाद घालणारी.”

म्हणजे, “राजकुमारी.”

म्हणजे, “हसणं.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “सेया मापं.” एक सेया म्हणजे ७.३३ ली. अति. ख१४ पाहा.

किंवा “स्वतःसाठी आशीर्वाद मिळवतील.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “त्यांच्याशी संबंध ठेवायचा आहे.”

किंवा “संरक्षणासाठी आले आहेत.” शब्दशः “छाया.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

म्हणजे, “लहान.”

किंवा “विदेशी म्हणून राहू लागला.”

म्हणजे, त्याने तिच्याशी संबंध ठेवले नव्हते.

किंवा “नीतिमान.”

किंवा “अबीमलेखच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांचं गर्भाशय बंद केलं होतं.”

किंवा कदाचित, “माझ्यावर हसेल.”

शब्दशः “तिचा आवाज.”

शब्दशः “बीज.”

किंवा “संतती.” शब्दशः “बीज.”

किंवा “धनुष्यबाण चालवणारा.”

म्हणजे कदाचित, “शपथेची विहीर” किंवा “सातांची विहीर.”

एक हिरवंगार झाड. याला बारीक पानं आणि पांढरी व गुलाबी फुलं असतात.

शब्दशः “खूप दिवस.”

किंवा “विदेशी म्हणून राहिला.”

म्हणजे, “यहोवा पुरवेल; यहोवा लक्ष देईल.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

किंवा “फाटकांचा.”

शब्दशः “बीज.”

किंवा “स्वतःसाठी आशीर्वाद मिळवतील.”

किंवा कदाचित, “एक महान प्रधान.”

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

शब्दशः “बीज.”

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

कदाचित हे लाबानला सूचित करत असावं.

शब्दशः “उजव्या हाताला वळायचं की डाव्या.”

किंवा “आम्ही तुम्हाला चांगलंवाईट काय हे सांगू शकत नाही.”

म्हणजे, तिची लहानपणीची दाई, जी आता तिची दासी होती.

शब्दशः “बीज.”

किंवा “शहरांचा.”

किंवा “त्याला सांत्वन मिळालं.”

काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.

किंवा “सभोवती भिंती असलेल्या छावण्यांनुसार.”

काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.

किंवा कदाचित, “आपल्या सगळ्या भावांशी त्यांचं शत्रुत्व होतं.”

शब्दशः “राष्ट्रं.”

म्हणजे, “केसाळ.”

म्हणजे, “टाच धरणारा; दुसऱ्‍याची जागा घेणारा.”

किंवा “निर्दोष.”

किंवा “मला खूप भूक लागली आहे.”

म्हणजे, “लाल.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

किंवा “स्वतःसाठी आशीर्वाद मिळवतील.”

म्हणजे, “भांडण.”

म्हणजे, “आरोप.”

म्हणजे, “मोकळ्या जागा.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “जिवाचा कडवटपणा.”

म्हणजे, “टाच धरणारा; दुसऱ्‍याची जागा घेणारा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तू त्याच्या गुलामीतून बाहेर येशील.”

किंवा “तुला ठार मारण्याच्या विचारांनी स्वतःचं सांत्वन करतोय.”

किंवा “आईचे वडील.”

शब्दशः “बीज.”

किंवा “जिना.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

किंवा “स्वतःसाठी आशीर्वाद मिळवतील.”

म्हणजे, “देवाचं घर.”

शब्दशः “भाऊ.”

किंवा “तू माझ्या हाडामांसाचा आहेस.”

शब्दशः “भाऊ.”

किंवा “मी तिच्याशी संबंध ठेवीन.”

शब्दशः “नावडती.”

शब्दशः “तिचं गर्भाशय उघडलं.”

म्हणजे, “पाहा, मुलगा!”

म्हणजे, “ऐकणं.”

म्हणजे, “निष्ठा; जडून राहणं.”

म्हणजे, “स्तुती; स्तुती करण्यासारखा.”

शब्दशः “माझ्या गुडघ्यांवर जन्म देईल.”

म्हणजे, “न्यायाधीश.”

म्हणजे, “माझ्या झुंजी.”

म्हणजे, “कल्याण.”

शब्दशः “मुली,” त्या देशातल्या स्त्रियांना सूचित करणारा शब्द.

म्हणजे, “आनंदी; आनंद.”

बटाट्याच्या जातीचं, फळ देणारं एक झाड.

किंवा “मजुराची मजुरी.”

म्हणजे, “तो मजुरी आहे.”

म्हणजे, “स्वीकार.”

शब्दशः “देवाने तिचं ऐकलं आणि तिचं गर्भाशय उघडलं.”

योसिफिया या नावाचं संक्षिप्त रूप. याचा अर्थ “याह भर घालो (वाढवो)” असा होतो.

किंवा “पुरावा.”

किंवा “नीतिमानपणा.”

सुंदर आणि सुगंधी फुलांचं एक झाड.

लांबपर्यंत पसरणाऱ्‍या फांद्या असणारं आणि खोडाची साल निघणारं एक झाड.

किंवा “तेराफीम मूर्ती.”

म्हणजे, “फरात.”

किंवा “नातेवाइकांना.”

शब्दशः “मुलं.”

अशा प्रकारच्या खोगिरांमध्ये वस्तू ठेवण्यासाठी जागा असायची.

शब्दशः “इसहाकचं भय.”

ॲरामेईक (अरामी) भाषेतला एक वाक्यांश, ज्याचा अर्थ “साक्षीदाराची रास” असा होतो.

एक हिब्रू वाक्यांश, ज्याचा अर्थ “साक्षीदाराची रास” असा होतो.

शब्दशः “त्याचा पिता इसहाक याच्या भयाने.”

शब्दशः “मुलं.”

म्हणजे, “दोन गट.”

किंवा “परदेशी म्हणून राहिलो.”

शब्दशः “बीज.”

किंवा “नदी वाहणाऱ्‍या खोऱ्‍यापलीकडे.”

म्हणजे, “देवासोबत लढणारा (तग धरून राहणारा) किंवा देव लढतो.”

म्हणजे, “देवाचा चेहरा.”

किंवा “पनिएल.”

म्हणजे, “मंडप, आसरा.”

किंवा “मुलींसोबत वेळ घालवायला.”

शब्दशः “त्या तरुणीच्या हृदयाशी बोलू लागला.”

किंवा “शखेम याचं तुमच्या मुलीवर मन बसलंय.”

किंवा “सोयरीक करा.”

किंवा “वधुदक्षिणा.”

किंवा “तुमच्यामुळे मला वाळीत टाकलं जाईल.”

शब्दशः “मला दुर्गंधी असं केलं.”

किंवा “त्या मार्गावर.”

किंवा “लपवलं.”

म्हणजे, “बेथेलचा देव.”

मोठ्या वृक्षांची एक जात. इंग्रजीत या वृक्षांना “ओक”  म्हणतात.

म्हणजे, “रडवणारं झाड.”

शब्दशः “बीज.”

म्हणजे, “माझ्या दुःखाचा मुलगा.”

म्हणजे, “उजव्या हाताचा मुलगा,” किंवा माझा आवडता मुलगा.

काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.

किंवा “जीव.”

किंवा “विदेशी म्हणून राहत होते.”

किंवा “लोकांचा सरदार, अधिपती.” हा शब्द “हजार” या अर्थाच्या मूळ हिब्रू शब्दावरून आला आहे आणि त्याचा अर्थ “हजार लोकांचा सरदार” असा होतो.

शब्दशः “इस्राएलची मुलं.”

शब्दशः “मैदानात.”

किंवा “याकोबचा वृत्तान्त आहे.”

किंवा “सुंदर लांब झगा.”

किंवा “खालच्या मैदानातून.”

किंवा “त्याच्यावर हात टाकू नका.”

काही झुडपांपासून आणि वृक्षांपासून बनवलं जाणारं सुगंधी तेल. शब्दार्थसूची पाहा.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मंदिरातली वेश्‍या.” ही संज्ञा कदाचित कनानी देवतांच्या उपासनेशी संबंधित असलेली वेश्‍यावृत्ती करणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करत असावी.

किंवा “मंदिरातली वेश्‍या.” ही संज्ञा कदाचित कनानी देवतांच्या उपासनेशी संबंधित असलेली वेश्‍यावृत्ती करणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करत असावी.

किंवा “मंदिरातली वेश्‍या.” ही संज्ञा कदाचित कनानी देवतांच्या उपासनेशी संबंधित असलेली वेश्‍यावृत्ती करणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करत असावी.

म्हणजे, “भेग,” कदाचित गर्भाशयमुखाला भेग पडण्याला हा शब्द सूचित करत असावा.

शब्दशः “आपल्यावर हसण्यासाठी.”

राजाला द्राक्षारस किंवा इतर पेयं देणारा दरबारातला अधिकारी.

शब्दशः “दिवस.”

शब्दशः “तुझं डोकं वर करेल.”

शब्दशः “कुंड; खड्डा.”

शब्दशः “तुझ्यापासून तुझं डोकं वर करेल.”

शब्दशः “त्याने डोकं वर केलं.”

शब्दशः “कुंड; खड्डा.”

मूळ हिब्रू शब्दाचा अर्थ, दाढी करण्यासोबतच मुंडण करणं असाही होऊ शकतो.

किंवा “राजासनामुळे.”

हा शब्द एखाद्याला आदर आणि मान दिला जावा हे सांगण्यासाठी वापरला जायचा असं दिसतं.

शब्दशः “आपला हात किंवा पाय उचलू शकणार नाही.”

म्हणजे, “हिलियोपोलीस.”

किंवा “देशात प्रवास.”

शब्दशः “मुठी भरून.”

म्हणजे, “हिलियोपोलीस.”

म्हणजे, “जो विसरायला लावतो.”

म्हणजे, “दुप्पट फलदायी.”

किंवा “त्याच्या जिवाला किती दुःख.”

किंवा “दुभाषी.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मी त्याचा जामीन राहतो.”

किंवा “सख्खा भाऊ.”

शब्दशः “ते.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुमच्यासाठी पृथ्वीवर उरलेले काही जण राहावेत.”

शब्दशः “पित्यासारखा.”

किंवा “गोष्टींवर जगाल.”

किंवा “जे त्याचे होते त्या सर्वांना.”

म्हणजे, “याकोब मेल्यावर त्याचे डोळे झाकेल.”

म्हणजे, “हिलियोपोलीस.”

शब्दशः “मुलं.” कदाचित त्याला इतर मुलंही असतील, पण त्यांचा उल्लेख केलेला नाही.

किंवा “पुन्हापुन्हा त्याच्या गळ्यात पडून रडला.”

किंवा “प्रवास करून.”

शब्दशः “भाकर.”

शब्दशः “भाकर.”

शब्दशः “वाडवडिलांसोबत झोपी गेल्यावर.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

किंवा “उतारावरची एक जमीन.” शब्दशः “एक खांदा.”

किंवा “अशुद्ध.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझ्या गौरवा.”

किंवा “बछडा.”

म्हणजे, “ज्याचं आहे; ज्याच्या मालकीचं ते आहे.”

किंवा “आज्ञेत राहतील.”

किंवा “द्राक्षारसात.”

किंवा “शिंग असलेला फुरशा.”

किंवा “पौष्टिक.”

किंवा “भाकर.”

म्हणजे, “योसेफ.”

शब्दशः “स्तनांचा आणि गर्भाशयाचा आशीर्वाद.”

काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.

काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, “इजिप्तच्या लोकांचा शोक.”

शब्दशः “त्या मुलांचा योसेफच्या गुडघ्यांवर जन्म झाला.” म्हणजे, त्याने त्यांना आपलीच मुलं समजून त्यांच्यावर खास कृपा केली.

किंवा “माझी हाडं.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा