१ शमुवेल
२९ पलिष्टी लोकांनी+ आपलं सगळं सैन्य अफेक इथे जमवलं; आणि इस्राएली सैन्याने इज्रेलच्या+ झऱ्याजवळ छावणी दिली. २ पलिष्ट्यांचे प्रमुख शंभर-शंभर आणि हजार-हजार सैनिकांच्या आपल्या तुकड्या घेऊन पुढे चालत होते. तर, दावीद आणि त्याची माणसं आखीशसोबत+ सैन्याच्या सगळ्यात मागे चालत होती. ३ पण पलिष्ट्यांचे प्रमुख म्हणाले: “हे इब्री लोक इथे काय करत आहेत?” तेव्हा आखीश पलिष्ट्यांच्या प्रमुखांना म्हणाला: “हा दावीद आहे, इस्राएलचा राजा शौल याचा सेवक. गेल्या वर्षभरापासून, खरंतर त्यापेक्षाही जास्त काळापासून तो माझ्याकडे आहे.+ तो माझ्याकडे पळून आला त्या दिवसापासून आजपर्यंत मला त्याच्यात काहीही चुकीचं दिसलं नाही.” ४ पण पलिष्ट्यांचे प्रमुख त्याच्यावर भडकले आणि त्याला म्हणाले: “त्या माणसाला परत पाठवून दे.+ तू त्याला राहायला जे ठिकाण दिलं होतं तिथे त्याला परत पाठव. त्याला आमच्यासोबत युद्धात येऊ देऊ नकोस. नाहीतर तो युद्धात आमच्यावरच उलटायचा.+ कारण, आपल्या मालकाला खूश करण्याची यापेक्षा चांगली संधी त्याला कशी मिळेल? आमच्या सैनिकांची डोकी उडवूनच ना? ५ हा तोच दावीद आहे ना, ज्याच्याबद्दल नाचगाणं करत ते म्हणत होते:
‘शौलने हजारोंना मारलं,
दावीदने लाखोंना मारलं’?”+
६ म्हणून मग आखीशने+ दावीदला बोलावून त्याला म्हटलं: “जिवंत देव यहोवाची शपथ, तू एक साधा-सरळ माणूस आहेस. तुला माझ्या सैन्यासोबत मोहिमेवर घेऊन जायची माझी इच्छा आहे.+ कारण तू माझ्याकडे आलास त्या दिवसापासून आजपर्यंत मला तुझ्यात काहीच चुकीचं दिसलं नाही.+ पण बाकीच्या प्रमुखांचा तुझ्यावर भरवसा नाही.+ ७ म्हणून आता शांतीने परत जा. आणि पलिष्टी प्रमुखांचा राग भडकेल असं काहीही करू नकोस.” ८ तेव्हा दावीद आखीशला म्हणाला: “पण का? माझं काय चुकलं? मी तुमच्याकडे आलो त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हाला माझ्यात काही चुकीचं दिसलं का? मग हे राजा! मी तुमच्या शत्रूंशी, माझ्या प्रभूच्या शत्रूंशी युद्ध करायला तुमच्यासोबत का येऊ नये?” ९ त्यावर आखीश दावीदला म्हणाला: “हे बघ, माझ्यासाठी तर तू स्वर्गदूतासारखा चांगला आहेस.+ पण पलिष्ट्यांचे प्रमुख असं म्हणत आहेत: ‘त्याला आमच्यासोबत युद्धात येऊ देऊ नको.’ १० म्हणून आता, तू आणि तुझ्यासोबत आलेले तुझ्या मालकाचे सेवक, तुम्ही सगळे पहाटेच उठा, आणि दिवस उजाडताच परत निघून जा.”
११ त्यामुळे दावीद आणि त्याची माणसं पहाटेच उठून पलिष्ट्यांच्या देशात जायला निघाली. आणि पलिष्ट्यांचं सगळं सैन्य इज्रेलला गेलं.+