१ शमुवेल
२८ त्या काळात पलिष्टी लोकांनी इस्राएलशी युद्ध करायला आपलं सैन्य एकत्र केलं.+ तेव्हा आखीश दावीदला म्हणाला: “तू आणि तुझी माणसं, तुम्ही माझ्यासोबत युद्धाला येणार आहात, हे तर तुला माहीतच असेल.”+ २ त्यावर दावीद त्याला म्हणाला: “तुमचा सेवक काय करेल हे तुम्हाला चांगलं माहीत आहे.” मग आखीश दावीदला म्हणाला: “त्यामुळेच मी तुला कायमचा माझा अंगरक्षक म्हणून नेमीन.”+
३ शमुवेलचा मृत्यू झाला होता. आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्यासाठी शोक करून त्याला त्याच्या शहरात, रामात दफन केलं होतं.+ तसंच, शौलने भूतविद्या करणाऱ्यांना आणि ज्योतिष्यांना देशातून काढून टाकलं होतं.+
४ पलिष्टी लोक एकत्र जमले आणि त्यांनी शूनेम+ इथे जाऊन छावणी दिली. म्हणून शौलनेसुद्धा सगळ्या इस्राएली सैनिकांना एकत्र केलं आणि त्यांनी गिलबोवा+ इथे छावणी दिली. ५ शौलने जेव्हा पलिष्ट्यांची छावणी पाहिली, तेव्हा तो खूप घाबरला आणि त्याच्या काळजाचा थरकाप उडाला.+ ६ शौल यहोवाकडे मार्गदर्शन मागायचा,+ पण यहोवाने त्याला कधीही उत्तर दिलं नाही; देवाने त्याला स्वप्नं, उरीम+ किंवा संदेष्टे यांपैकी कोणत्याही मार्गाने उत्तर दिलं नाही. ७ शेवटी शौल आपल्या सेवकांना म्हणाला: “भूतविद्या करणारी एखादी स्त्री शोधा.+ म्हणजे मी तिच्याकडे जाईन आणि सल्ला घेईन.” त्यावर त्याचे सेवक त्याला म्हणाले: “एन-दोर इथे एक भूतविद्या करणारी स्त्री आहे.”+
८ मग शौलने आपला वेष बदलला. त्याने दुसरे कपडे घातले आणि आपल्या दोन माणसांना सोबत घेऊन तो रात्री त्या स्त्रीकडे गेला. तो तिला म्हणाला: “कृपया आपल्या भूतविद्येचा+ उपयोग करून मी सांगीन त्याला माझ्यासाठी बोलव, आणि पुढे काय घडणार आहे ते मला सांग.” ९ पण ती स्त्री त्याला म्हणाली: “शौलने काय केलंय हे तुला माहीतच असेल. त्याने भूतविद्या करणाऱ्यांना आणि ज्योतिष्यांना देशातून काढून टाकलंय.+ मग तू मला सापळ्यात का अडकवतोस? तुला काय मला मारायचंय?”+ १० तेव्हा शौलने यहोवाच्या नावाने शपथ घेऊन तिला म्हटलं: “जिवंत देव यहोवाची शपथ, या बाबतीत तुझ्यावर कोणताही दोष येणार नाही!” ११ त्यावर ती स्त्री म्हणाली: “मी तुझ्यासाठी कोणाला बोलवू?” तो म्हणाला: “माझ्यासाठी शमुवेलला बोलव.” १२ त्या स्त्रीने जेव्हा “शमुवेलला”* पाहिलं,+ तेव्हा ती मोठ्याने किंचाळली आणि शौलला म्हणाली: “तुम्ही का फसवलं मला? तुम्ही शौल आहात!” १३ तेव्हा राजा तिला म्हणाला: “घाबरू नकोस. मला सांग तुला कोण दिसतंय?” त्यावर ती शौलला म्हणाली: “मला देवासारखा दिसणारा कोणीतरी जमिनीतून वर येताना दिसतोय.” १४ त्यावर त्याने लगेच तिला विचारलं: “तो दिसायला कसा आहे?” ती म्हणाली: “तो वयस्कर आहे आणि त्याने बिनबाह्यांचा झगा घातलाय.”+ तेव्हा शौलच्या लक्षात आलं, की तो “शमुवेल” आहे. म्हणून त्याने जमिनीवर आपलं डोकं टेकवलं आणि दंडवत घातला.
१५ मग “शमुवेल” शौलला म्हणाला: “तू का मला बोलावून त्रास दिलास?” त्यावर शौल म्हणाला: “मी मोठ्या संकटात सापडलोय. पलिष्टी लोक माझ्याशी लढायला आलेत आणि देवानेही मला सोडून दिलंय. तो आता संदेष्ट्यांकडून किंवा स्वप्नांतून मला उत्तर देत नाही.+ म्हणून आता काय करायचं हे जाणून घ्यायला मी तुम्हाला बोलावून घेतलं.”+
१६ तेव्हा “शमुवेल” म्हणाला: “जर यहोवानेच तुला सोडून दिलंय+ आणि तो तुझा वैरी बनलाय, तर आता तू मला का विचारतोस? १७ यहोवाने माझ्याद्वारे जे सांगितलं होतं, ते तो नक्की करेल: यहोवा तुझ्या हातून राज्य काढून घेईल आणि ते तुझ्या एका साथीदाराला, दावीदला देईल.+ १८ तू यहोवाची आज्ञा पाळली नाहीस आणि त्याचा क्रोध भडकवणाऱ्या अमालेकी लोकांचा समूळ नाश केला नाहीस.+ म्हणून आज यहोवा तुझ्याशी असं वागतोय. १९ शिवाय, यहोवा तुला आणि इस्राएलला पलिष्टी लोकांच्या हाती देईल.+ उद्या तू+ आणि तुझी मुलं+ माझ्यासोबत असतील. आणि यहोवा इस्राएलचं सैन्यही पलिष्ट्यांच्या हाती देईल.”+
२० “शमुवेलचे” हे शब्द ऐकताच शौल खूप घाबरला आणि जमिनीवर कोसळून पडला. त्याच्यात काहीच त्राण उरले नाहीत. कारण त्याने एक संपूर्ण दिवस आणि रात्र काहीही खाल्लं नव्हतं. २१ ती स्त्री शौलकडे आली तेव्हा तिने पाहिलं, की तो खूप घाबरला आहे आणि अस्वस्थ झाला आहे. म्हणून ती त्याला म्हणाली: “हे पाहा, आपल्या या दासीने आपलं म्हणणं ऐकलं. आणि आपला जीव धोक्यात घालून*+ तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं. २२ तर आता कृपा करून आपल्या या दासीचं म्हणणं ऐका. मी तुमच्यासाठी थोडीशी भाकर आणते, ती खाऊन घ्या. म्हणजे परत जाण्यासाठी तुम्हाला थोडीफार ताकद मिळेल.” २३ पण शौल नकार देत म्हणाला: “मी काहीही खाणार नाही.” तरी ती स्त्री आणि त्याचे सेवक त्याला खाण्याचा आग्रह करत राहिले. शेवटी त्याने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला. २४ त्या स्त्रीच्या घरात एक चांगलं धष्टपुष्ट वासरू होतं; तिने ते लगेच कापलं.* तसंच, पीठ मळून तिने बेखमीर* भाकरी बनवल्या. २५ मग तिने शौलला आणि त्याच्या सेवकांना ते अन्न वाढलं. ते खाऊन ते त्याच रात्री तिथून निघून गेले.+