शास्ते
१८ त्या काळात इस्राएलवर कोणी राजा नव्हता.+ आणि दान+ वंशाचे लोक राहण्यासाठी जागा शोधत होते. कारण इस्राएलच्या इतर वंशजांसोबत त्यांना जो प्रदेश मिळाला होता, तो त्यांना कमी पडत होता.+
२ म्हणून दानच्या वंशजांनी देशाची पाहणी करण्यासाठी आणि तो हेरण्यासाठी, सोरा आणि अष्टावोल+ इथून आपल्या घराण्यातल्या पाच शूरवीरांना निवडलं. ते त्यांना म्हणाले: “जा आणि देशाची पाहणी करून या.” ते निघाले आणि एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात आले, तेव्हा त्यांनी मीखाच्या घरी रात्र काढली.+ ३ मीखाच्या घराजवळ असताना त्यांनी त्या तरुण लेवीचा आवाज* ऐकला. तो ओळखून ते त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला विचारलं: “तू इथे कसा? कोणी आणलं तुला इकडे? आणि इथे काय करतोस तू?” ४ तेव्हा मीखाने आपल्यासाठी काय काय केलं ते सर्व त्याने त्यांना सांगितलं. तो म्हणाला: “मीखाने मला याजक म्हणून काम करण्यासाठी पगारावर ठेवून घेतलंय.”+ ५ तेव्हा ते त्याला म्हणाले: “आम्ही ज्या कामासाठी निघालोय, त्यात आम्हाला यश मिळेल की नाही हे जरा देवाला विचारून पाहतोस का?” ६ मग तो याजक त्यांना म्हणाला: “यहोवा तुमच्यासोबत आहे. निश्चिंत होऊन जा.”
७ तेव्हा ते पाच शूरवीर निघाले आणि लईश+ इथे पोहोचले. त्यांनी पाहिलं की तिथले लोक सीदोनी लोकांप्रमाणेच कोणावरही अवलंबून नाहीत. ते शांत आणि निश्चिंत जीवन जगत आहेत.+ त्यांच्यावर हल्ला करणारा कोणीही क्रूर शासक नाही. त्यांचं शहर सीदोनी लोकांपासून फार दूर असून कोणाशीही त्यांचं काहीएक घेणंदेणं नाही.
८ ते सरा आणि अष्टावोल+ इथे आपल्या भाऊबंदांकडे परत आले, तेव्हा त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना विचारलं: “काय खबर आहे?” ९ त्यावर ते म्हणाले: “तो देश खरंच खूप चांगला आहे. तेव्हा मागेपुढे पाहू नका. त्यावर हल्ला करण्यासाठी आणि तो ताब्यात घेण्यासाठी आता वेळ घालवू नका. १० तिथे गेल्यावर तुम्हाला स्वतःलाच दिसेल, की त्या लोकांना कोणत्याही हल्ल्याची भीती नाही; ते अगदी निश्चिंत आहेत.+ आणि तो देशही बराच मोठा आहे. तिथे कुठल्याही गोष्टीची कमी नाही. देवाने तो देश आपल्या हाती दिलाय.”+
११ मग दान वंशातले ६०० हत्यारबंद पुरुष लढाई करण्यासाठी सरा आणि अष्टावोल+ इथून निघाले. १२ ते यहूदाच्या किर्याथ-यारीम+ इथे आले आणि तिथे त्यांनी छावणी दिली. म्हणून किर्याथ-यारीमच्या पश्चिमेकडे असलेल्या या ठिकाणाला आजही महने-दान*+ असं म्हटलं जातं. १३ मग ते तिथून निघाले आणि एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घराजवळ आले.+
१४ तेव्हा लईशचा+ प्रदेश हेरण्यासाठी गेलेल्या पाच माणसांनी आपल्या सोबतच्या बांधवांना म्हटलं: “तुम्हाला माहीत आहे, या घरांमध्ये एक एफोद,* एक कोरीव मूर्ती, एक धातूची मूर्ती आणि कुलदैवतांच्या मूर्ती* आहेत?+ आता काय करायचं ते तुम्हीच ठरवा.” १५ तेव्हा ते तिथेच थांबले. मग ती पाच माणसं मीखाच्या घराजवळ असलेल्या त्या तरुण लेवीच्या घरी गेली+ आणि त्यांनी त्याची विचारपूस केली. १६ यादरम्यान दान वंशातले ते ६०० हत्यारबंद पुरुष+ फाटकाजवळच थांबून राहिले. १७ मग देश हेरण्यासाठी गेलेली ती पाच माणसं+ कोरीव मूर्ती, धातूची मूर्ती,+ एफोद+ आणि कुलदैवतांच्या मूर्ती*+ घेण्यासाठी घरात गेली. (त्या वेळी तो याजक+ ६०० हत्यारबंद पुरुषांसोबत फाटकाजवळ उभा होता.) १८ ते मीखाच्या घरातून कोरीव मूर्ती, धातूची मूर्ती, एफोद आणि कुलदैवतांच्या मूर्ती* घेऊन जात होते, तेव्हा याजक त्यांना म्हणाला: “हे काय करताय तुम्ही?” १९ पण ते त्याला म्हणाले: “शांत बस! तोंड बंद ठेव आणि आमच्यासोबत चल. आमचा सल्लागार* आणि याजक हो. तूच ठरव तुझ्यासाठी काय चांगलंय; एका माणसाच्या घरात याजक होऊन राहणं चांगलंय,+ की इस्राएलच्या एका वंशाचा आणि घराण्याचा याजक होऊन राहणं चांगलंय?”+ २० याजकाला त्यांचं म्हणणं पटलं आणि तो खूश झाला. त्याने ते एफोद, कोरीव मूर्ती+ आणि कुलदैवतांच्या मूर्ती* घेतल्या आणि तो त्या लोकांबरोबर निघाला.
२१ मग दान वंशाचे लोक आपल्या मार्गाने जाऊ लागले. त्यांनी आपली मुलंबाळं, गुरंढोरं आणि मौल्यवान सामान आपल्यापुढे ठेवलं आणि ते स्वतः त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. २२ ते मीखाच्या घरापासून काही अंतर दूर गेल्यावर, मीखाच्या शेजारपाजारचे लोक एकत्र आले आणि त्यांनी दान वंशाच्या लोकांचा पाठलाग करून त्यांना गाठलं. २३ त्यांनी दान वंशाच्या लोकांना मोठ्याने आवाज दिला, तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं आणि ते मीखाला म्हणाले: “काय झालं? तू इतक्या लोकांना घेऊन का आलास?” २४ तेव्हा मीखा म्हणाला: “मी बनवलेल्या देवांच्या मूर्ती तुम्ही घेतल्या आणि माझ्या याजकालाही तुम्ही घेऊन चाललात. आता माझ्याकडे काय उरलंय? आणि वरून विचारता, ‘काय झालं?’” २५ त्यावर दान वंशाचे लोक त्याला म्हणाले: “आवाज चढवून बोलू नकोस. आमच्या माणसांना राग आला तर ते तुला सोडणार नाहीत. ते तुझा आणि तुझ्या घराण्यातल्या सगळ्यांचा जीव घेतील.” २६ मग दान वंशाचे लोक आपल्या मार्गाने गेले. आणि ते लोक आपल्यावर भारी पडतील हे पाहून मीखासुद्धा आपल्या घरी परत आला.
२७ दान वंशाचे लोक, मीखाने बनवलेल्या वस्तू आणि त्याच्या याजकाला घेऊन लईश+ शहराकडे आले; त्या शहरातले लोक शांतीने राहत होते आणि आपल्यावर कोणी हल्ला करेल असा कधी त्यांनी विचारही केला नव्हता.+ तेव्हा दानच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तलवारीने ठार मारलं आणि त्यांचं शहर जाळून टाकलं. २८ त्या शहराला वाचवायला येणारं कोणीही नव्हतं. कारण, ते सीदोनपासून फार दूर होतं आणि इतर लोकांशी त्यांचं काहीएक घेणंदेणं नव्हतं. लईश शहर हे बेथ-रहोबच्या+ प्रदेशात असलेल्या खोऱ्यात होतं. दान वंशजांनी ते शहर पुन्हा बांधलं आणि ते त्यात राहू लागले. २९ शिवाय, त्यांनी त्या शहराचं नाव बदललं आणि त्याला आपला पूर्वज दान+ याच्या नावावरून दान हे नाव दिलं; दान हा इस्राएलचा मुलगा होता.+ त्या शहराचं पूर्वीचं नाव लईश होतं.+ ३० त्यानंतर दान वंशजांनी त्या कोरीव मूर्तीची तिथे स्थापना केली+ आणि योनाथानला आपला याजक बनवलं. योनाथान+ हा गेर्षोमचा+ मुलगा आणि मोशेचा नातू होता. त्या देशातले लोक बंदिवासात जाईपर्यंत योनाथान आणि त्याच्या मुलांनी दान वंशजांसाठी याजक म्हणून काम केलं. ३१ खऱ्या देवाचं घर* शिलो+ इथे असेपर्यंत, मीखाने बनवलेली ती कोरीव मूर्ती तिथे स्थापित होती.