यहोशवा
२४ त्यानंतर यहोशवाने इस्राएलच्या सर्व वंशांना शखेम इथे एकत्र केलं. मग त्याने इस्राएली लोकांच्या वडिलांना, प्रमुखांना, न्यायाधीशांना आणि अधिकाऱ्यांना+ बोलावलं, तेव्हा ते सर्व खऱ्या देवासमोर येऊन उभे राहिले. २ मग यहोशवा सर्व लोकांना म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, ‘फार पूर्वी तुमचे पूर्वज+ नदीच्या* पलीकडे राहायचे+ आणि इतर दैवतांची उपासना करायचे;+ अब्राहामचा आणि नाहोरचा पिता तेरह हासुद्धा त्यांच्यापैकी एक होता.
३ काही काळानंतर, मी तुमचा पूर्वज अब्राहाम+ याला नदीच्या* पलीकडून आणलं आणि कनानच्या संपूर्ण देशात फिरायला लावलं. मी त्याची संतती* वाढवली.+ माझ्या आशीर्वादामुळे त्याला इसहाक+ झाला; ४ आणि इसहाकला माझ्या आशीर्वादामुळे याकोब आणि एसाव झाले.+ नंतर मी एसावला सेईर डोंगराचा प्रदेश दिला;+ आणि याकोब व त्याची मुलं खाली इजिप्तला गेली.+ ५ पुढे मी मोशे आणि अहरोन यांना पाठवून+ इजिप्तवर पीडा आणल्या+ आणि तुम्हाला तिथून बाहेर काढलं. ६ मी तुमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून बाहेर आणलं+ आणि ते समुद्राजवळ पोहोचले, तेव्हा इजिप्तचे लोक युद्धाचे रथ आणि घोडेस्वार घेऊन त्यांचा पाठलाग करत तांबड्या समुद्रापर्यंत आले.+ ७ तुमचे पूर्वज मदतीसाठी माझा धावा करू लागले+ तेव्हा मी, यहोवा याने त्यांच्या आणि इजिप्तच्या लोकांमध्ये एक काळा ढग उभा केला; नंतर मी इजिप्तच्या लोकांवर समुद्राचं पाणी आणलं आणि त्यांना बुडवून टाकलं.+ इजिप्तमध्ये मी काय-काय केलं ते इस्राएली लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं.+ त्यानंतर बरीच वर्षं* तुम्ही ओसाड रानात राहिलात.+
८ मग मी तुम्हाला यार्देनच्या पलीकडे* राहत असलेल्या अमोरी लोकांच्या देशात आणलं. त्यांनी तुमच्याशी युद्ध केलं.+ पण मी त्यांना तुमच्या हाती दिलं आणि त्यांचा पूर्णपणे नाश केला; म्हणजे तुम्हाला त्यांच्या देशाचा ताबा घेऊन तिथे राहता येईल.+ ९ मग मवाबचा राजा, म्हणजे सिप्पोरचा मुलगा बालाक इस्राएलविरुद्ध युद्ध करायला उठला. तुम्हाला शाप देण्यासाठी त्याने बौरचा मुलगा बलाम याला बोलावून घेतलं.+ १० पण मी बलामचं ऐकलं नाही.+ उलट मी त्याला प्रत्येक वेळी तुम्हाला आशीर्वादच द्यायला लावला,+ आणि तुम्हाला त्याच्या हातून सोडवलं.+
११ त्यानंतर तुम्ही यार्देन नदी पार करून+ यरीहोमध्ये आलात.+ त्या वेळी यरीहोचे पुढारी,* तसंच अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी लोक तुमच्याशी लढले. पण मी त्यांना तुमच्या हाती दिलं.+ १२ तुम्ही तिथे पोहोचायच्या आधीच मी त्यांचं मनोबल खचवलं.* आणि तुम्ही अमोरी लोकांच्या दोन राजांप्रमाणेच त्यांनाही हाकलून दिलं;+ तुम्ही हे तलवारीच्या किंवा धनुष्याच्या बळावर केलं नाही.+ १३ अशा प्रकारे ज्यासाठी तुम्ही मेहनत केली नाही तो देश आणि तुम्ही बांधली नाहीत ती शहरं, मी तुम्हाला दिली;+ तुम्ही फक्त तिथे जाऊन राहिलात. तसंच जे द्राक्षमळे आणि जैतुनांच्या बागा तुम्ही लावल्या नाहीत त्यांचं फळ तुम्ही खात आहात.’+
१४ म्हणून यहोवाचं भय बाळगा आणि प्रामाणिकपणे* व विश्वासूपणे* त्याची सेवा करा.+ तसंच, नदीच्या* पलीकडे आणि इजिप्तमध्ये तुमचे पूर्वज ज्या दैवतांची उपासना करायचे, त्या दैवतांना तुमच्यामधून काढून टाका+ आणि यहोवाची उपासना करा. १५ आता जर तुम्हाला यहोवाची उपासना करायची इच्छा नसेल, तर आजच ठरवा तुम्ही कोणाची उपासना करणार;+ तुमचे पूर्वज नदीच्या* पलीकडे ज्या दैवतांची उपासना करायचे+ त्यांची, की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहत आहात त्या अमोरी लोकांच्या दैवतांची?+ मी आणि माझं कुटुंब तर यहोवाचीच उपासना करणार.”
१६ त्यावर लोकांनी उत्तर दिलं: “यहोवाला सोडून इतर दैवतांची उपासना करायचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. १७ कारण आमचा देव यहोवा यानेच आम्हाला आणि आमच्या वाडवडिलांना इजिप्तमधून, गुलामगिरीच्या देशातून* बाहेर आणलं.+ त्यानेच आमच्या डोळ्यांसमोर मोठमोठे चमत्कार केले.+ आमच्या संपूर्ण प्रवासादरम्यान त्याने आमचं संरक्षण केलं; आणि ज्या लोकांच्या प्रदेशांतून आम्ही गेलो त्या सर्व लोकांपासून त्यानेच आम्हाला वाचवलं.+ १८ आम्ही या देशात येण्याआधी जे अमोरी आणि इतर लोक इथे राहत होते, त्या सर्वांना यहोवाने घालवून दिलं. म्हणून आम्हीसुद्धा यहोवाचीच उपासना करू, कारण तोच आमचा देव आहे.”
१९ तेव्हा यहोशवा लोकांना म्हणाला: “तुम्ही खरंच यहोवाची सेवा करू शकाल का? कारण तो पवित्र देव आहे;+ आणि तो अशी अपेक्षा करतो, की फक्त त्याचीच उपासना केली जावी.+ तो तुमच्या अपराधांची* आणि पापांची क्षमा करणार नाही.+ २० तुम्ही जर यहोवाला सोडून दिलं आणि परक्या दैवतांची उपासना केली, तर त्याने जरी आधी तुमचं भलं केलेलं असलं, तरी तो तुमच्याकडे पाठ फिरवेल आणि तुमचा पूर्णपणे नाश करेल.”+
२१ पण लोक यहोशवाला म्हणाले: “आम्ही फक्त यहोवाचीच उपासना करू!”+ २२ तेव्हा यहोशवा त्यांना म्हणाला: “तुम्ही स्वतःच्या इच्छेने यहोवाची उपासना करण्याची निवड केली आहे,+ आणि या गोष्टीचे तुम्ही स्वतःच साक्षीदार आहात.” तेव्हा ते म्हणाले: “हो, आम्ही साक्षीदार आहोत.”
२३ त्यावर यहोशवा म्हणाला: “तर मग, तुमच्यामध्ये असलेल्या परक्या दैवतांना काढून टाका, आणि इस्राएलचा देव यहोवा याची पूर्ण मनाने उपासना करा.” २४ तेव्हा लोक यहोशवाला म्हणाले: “आम्ही आमचा देव यहोवा याचीच उपासना करू आणि त्याचंच ऐकू!”
२५ म्हणून यहोशवाने त्या दिवशी लोकांसोबत एक करार केला आणि त्यांना शखेममध्ये कायदा आणि नियम लावून दिला. २६ नंतर, यहोशवाने या गोष्टी देवाच्या नियमशास्त्राच्या पुस्तकात+ लिहून ठेवल्या; मग त्याने एक मोठा दगड+ घेऊन तो यहोवाच्या पवित्र ठिकाणाजवळ एका मोठ्या झाडाखाली उभा केला.
२७ पुढे यहोशवा सर्व लोकांना म्हणाला: “हा दगड आपल्यासाठी साक्ष आहे.+ कारण या दगडासमोरच यहोवाने आपल्याला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर त्याला नाकारलं, तर हा दगड तुमच्याविरुद्ध साक्ष ठरेल.” २८ मग यहोशवाने लोकांना आपापल्या वारशाच्या प्रदेशात परत पाठवून दिलं.+
२९ या सर्व गोष्टी घडल्यावर यहोवाचा सेवक, म्हणजे नूनचा मुलगा यहोशवा वयाच्या ११० व्या वर्षी मरण पावला.+ ३० लोकांनी त्याला तिम्नाथ-सेरह+ इथे त्याच्या वारशाच्या प्रदेशात पुरलं; हे ठिकाण, गाश पर्वताच्या उत्तरेकडे असलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ भागात आहे. ३१ यहोशवा जिवंत असेपर्यंत, तसंच त्याच्या मृत्यूनंतर मागे राहिलेले वडीलजन जिवंत असेपर्यंत, इस्राएली लोक यहोवाची उपासना करत राहिले. यहोवाने इस्राएलसाठी केलेल्या मोठमोठ्या गोष्टी या वडीलजनांनी पाहिल्या होत्या.+
३२ इस्राएली लोकांनी इजिप्तमधून योसेफच्या ज्या अस्थी+ आणल्या होत्या, त्या त्यांनी शखेम इथे एका ठिकाणी पुरल्या. ही जागा, याकोबने १०० चांदीचे तुकडे+ देऊन हमोरच्या मुलांकडून (हमोरच्या एका मुलाचं नाव शखेम होतं) विकत घेतली होती;+ ती योसेफच्या वंशजांच्या वारशाची जागा झाली.+
३३ नंतर अहरोनचा मुलगा एलाजार हासुद्धा मरण पावला.+ आणि त्यांनी त्याला फिनहासची टेकडी म्हटलेल्या ठिकाणी पुरलं. एलाजारचा मुलगा फिनहास+ याला हे ठिकाण, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात देण्यात आलं होतं.