अनुवाद
२ यानंतर यहोवाने मला सांगितल्याप्रमाणे, आपण तिथून तांबड्या समुद्राच्या मार्गाने ओसाड रानाकडे जायला निघालो.+ आपण बरेच दिवस सेईर पर्वताजवळच्या भागात प्रवास केला. २ शेवटी यहोवा मला म्हणाला, ३ ‘तुम्ही या पर्वताजवळ बराच काळ फिरलात. आता उत्तरेकडे वळा. ४ तू लोकांना अशी आज्ञा दे: “तुम्ही सेईरमध्ये+ राहत असलेल्या एसावच्या वंशजांच्या, म्हणजे तुमच्या भावांच्या सीमेवरून जाणार आहात.+ ते तुम्हाला घाबरतील,+ पण तुम्ही त्यांच्याशी सांभाळून वागा. ५ त्यांना त्रास देऊ नका,* कारण मी तुम्हाला त्यांच्या देशातली थोडीही जमीन देणार नाही, पाऊल ठेवता येईल इतकीही नाही; कारण सेईर पर्वत मी एसावला त्याचा वारसा म्हणून दिला आहे.+ ६ तुम्ही पैसे देऊन त्यांच्याकडून अन्न-पाणी विकत घ्या.+ ७ कारण तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आशीर्वाद दिलाय. या मोठ्या ओसाड रानातून तुम्ही प्रवास करताय हे त्याला चांगलं माहीत आहे. या सबंध ४० वर्षांत तुमचा देव यहोवा तुमच्यासोबत होता आणि तुम्हाला काहीच कमी पडलं नाही.”’+ ८ म्हणून आपण आपले भाऊ, म्हणजे एसावचे वंशज+ जिथे राहतात, त्या सेईरच्या कडेकडेने गेलो. पण एलाथ आणि एस्योन-गेबेरवरून,+ तसंच अराबाच्या रस्त्याने आपण गेलो नाही.
मग आपण वळलो आणि मवाबच्या ओसाड रानाच्या वाटेने प्रवास केला.+ ९ त्यानंतर यहोवा मला म्हणाला, ‘मवाबी लोकांना त्रास देऊ नको किंवा त्यांच्याशी युद्ध करू नको. कारण मी आर* हे शहर लोटच्या वंशजांना वारसा म्हणून दिलं आहे.+ म्हणून त्यांच्या देशातली कोणतीही जमीन मी तुला देणार नाही. १० (आधी तिथे एमी+ लोक राहायचे. ते अनाकी लोकांसारखे उंच-धिप्पाड होते. ते शक्तिशाली होते आणि त्यांची संख्या खूप होती. ११ रेफाई+ लोकांनाही अनाकी+ लोकांसारखं समजलं जायचं आणि मवाबी त्यांना एमी लोक म्हणायचे. १२ सेईरमध्ये आधी होरी+ लोक राहायचे, पण एसावच्या वंशजांनी त्यांचा नाश करून त्या जागेचा ताबा मिळवला आणि ते तिथे राहू लागले.+ त्याचप्रमाणे, यहोवा जो देश इस्राएली लोकांना वारसा म्हणून देणार आहे, तिथेही इस्राएली लोक तसंच करतील.) १३ तेव्हा आता जा आणि जेरेदचं खोरं पार करा.’ म्हणून आपण जेरेदचं खोरं पार केलं.+ १४ आपल्याला कादेश-बर्ण्यापासून जेरेदचं खोरं चालत पार करायला ३८ वर्षं लागली. तोपर्यंत, युद्धात भाग घेऊ शकतील अशा सर्व पुरुषांच्या त्या पिढीचा आपल्यातून नाश झाला. यहोवाने शपथ घेऊन त्यांना सांगितल्याप्रमाणे हे घडलं.+ १५ छावणीतून त्यांचा पूर्णपणे नाश होईपर्यंत+ यहोवाचा हात त्यांच्याविरुद्ध होता.
१६ इस्राएली लोकांपैकी युद्धात भाग घेऊ शकतील अशा सर्व पुरुषांचा मृत्यू झाल्यावर,+ १७ यहोवा मला पुन्हा म्हणाला, १८ ‘आज तू मवाबच्या प्रदेशाजवळून, म्हणजेच आरच्या जवळून जाणार आहेस. १९ तू अम्मोनी लोकांच्या प्रदेशाजवळ जाशील, तेव्हा त्यांना त्रास देऊ नकोस किंवा त्यांच्याशी भांडू नकोस, कारण मी त्या देशातली जमीन लोटच्या वंशजांना त्यांचा वारसा म्हणून दिली आहे;+ म्हणून, मी त्यांच्या देशातली कोणतीही जमीन तुला देणार नाही. २० हा देशही रेफाई लोकांचा समजला जायचा.+ (आधी रेफाई लोक तिथे राहायचे आणि अम्मोनी त्यांना जमजुम्मी लोक म्हणायचे. २१ ते अनाकी लोकांसारखे उंच-धिप्पाड होते.+ ते शक्तिशाली होते आणि त्यांची संख्या खूप होती. पण यहोवाने त्यांचा अम्मोनी लोकांसमोर नाश केला. अम्मोनी लोकांनी त्यांना हाकलून लावलं आणि ते त्यांच्या देशात राहू लागले. २२ सध्या सेईर+ इथे राहत असलेल्या एसावच्या वंशजांसाठीही त्याने असंच केलं. एसावच्या वंशजांना होरी+ लोकांच्या देशाचा ताबा घेऊन तिथे राहता यावं, म्हणून त्याने होरी लोकांचा नाश केला; आणि आजही एसावचे वंशज तिथेच राहत आहेत. २३ पूर्वी अव्वी लोकांच्या वस्त्या गाझापर्यंत+ होत्या. मग कफतोरमधून* कफतोरी+ लोक आले आणि त्यांनी अव्वी लोकांचा नाश केला आणि ते त्यांच्या जागी राहू लागले.)
२४ आता ऊठ आणि आर्णोनच्या+ खोऱ्यापलीकडे जा. बघ, मी हेशबोनचा अमोरी राजा सीहोन+ याला तुझ्या हातात दिलं आहे. म्हणून त्याच्याशी युद्ध कर आणि त्याच्या देशाचा ताबा घ्यायला सुरुवात कर. २५ आजपासून आकाशाखालच्या लोकांमध्ये जे कोणी तुमच्याबद्दल ऐकतील, त्यांच्यात मी तुमची भीती आणि दहशत पसरवीन. ते तुम्हाला घाबरतील आणि भीतीने थरथर कापू लागतील.’*+
२६ मग मी कदेमोथच्या+ ओसाड रानातून काही माणसांच्या हाती, हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे हा शांतीचा निरोप पाठवला,+ २७ ‘मला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे. मी उजवीडावीकडे वळणार नाही, तर फक्त मुख्य मार्गावरूनच चालीन.+ २८ तुझ्याकडून घेतलेल्या अन्न-पाण्याचा मी मोबदला देईन. मला फक्त तुझ्या देशातून पलीकडे पायी जाऊ दे, २९ म्हणजे मला यार्देन पार करून, आमचा देव यहोवा जो देश आम्हाला देणार आहे, त्यात जाता येईल. सेईरमध्ये राहणारे एसावचे वंशज आणि आर इथे राहणारे मवाबी, यांनी माझ्यासाठी असंच केलं होतं.’ ३० पण तरीही हेशबोनचा राजा सीहोन याने आपल्याला जाऊ दिलं नाही, कारण तुमचा देव यहोवा याने त्याला कठोर वृत्तीने वागू दिलं+ आणि त्याचं हृदय हट्टी होऊ दिलं; त्या राजाला तुमच्या हाती देण्यासाठी देवाने हे सर्व केलं आणि आज असंच घडलं आहे.+
३१ मग यहोवा मला म्हणाला, ‘बघ, मी सीहोन आणि त्याचा देश तुझ्या हाती दिला आहे. त्याच्या देशाचा ताबा घ्यायला सुरुवात कर.’+ ३२ याहस इथे जेव्हा सीहोन त्याचं सगळं सैन्य घेऊन आपल्याशी लढायला आला,+ ३३ तेव्हा आपला देव यहोवा याने त्याला आपल्या हातात दिलं आणि म्हणून आपण त्याला, त्याच्या मुलांना आणि त्याच्या सर्व लोकांना लढाईत हरवलं. ३४ त्या वेळी आपण त्याची सगळी शहरं काबीज केली आणि प्रत्येक शहर उद्ध्वस्त केलं. पुरुष, स्त्रिया, मुलं यांतल्या कोणालाही आपण जिवंत सोडलं नाही.+ ३५ आपण काबीज केलेल्या शहरांतून लुटीसोबत फक्त गुरंढोरं आणली. ३६ आर्णोन खोऱ्याच्या कडेवर असलेल्या अरोएर+ शहरापासून (तसंच खोऱ्यातलं शहरसुद्धा) गिलादपर्यंत असं एकही शहर नव्हतं, जे आपण काबीज केलं नाही. आपला देव यहोवा याने ती सर्व शहरं आपल्या हातात दिली.+ ३७ पण तुम्ही अम्मोनी लोकांच्या देशात,+ तसंच यब्बोकच्या संपूर्ण खोऱ्यात+ आणि डोंगराळ भागातल्या शहरांत किंवा आपला देव यहोवा याने मनाई केलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी गेला नाहीत.