अनुवाद
१५ प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी तुम्ही कर्जमाफीची घोषणा करा.+ २ कर्जमाफी करण्याची पद्धत अशी असावी: कर्ज देणाऱ्या प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याचं कर्ज माफ करावं. यहोवाचा सन्मान म्हणून कर्जमाफीची घोषणा केली असल्यामुळे, त्याने आपल्या शेजाऱ्याकडून किंवा आपल्या भावाकडून कर्ज फेडण्याची मागणी करू नये.+ ३ तुम्ही विदेश्याकडून कर्ज फेडण्याची मागणी करू शकता,+ पण तुमच्या भावाचं जे काही कर्ज असेल, ते तुम्ही माफ करा. ४ तुमच्यामध्ये राहणारा कोणीही गरीब नसावा, कारण तुमचा देव यहोवा वारसा म्हणून ज्या देशाचा ताबा तुम्हाला देत आहे, त्यात यहोवा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल.+ ५ पण यासाठी तुम्ही तुमचा देव यहोवा याचं मनापासून ऐकलं पाहिजे आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत.+ ६ तेव्हा तुमचा देव यहोवा याने तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, तो तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही बऱ्याच राष्ट्रांना कर्ज द्याल,* पण तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार नाही+ आणि तुम्ही अनेक राष्ट्रांवर अधिकार गाजवाल, पण ते तुमच्यावर अधिकार गाजवू शकणार नाहीत.+
७ तुमचा देव यहोवा जो देश तुम्हाला देत आहे त्यातल्या एखाद्या शहरात, तुमच्या भावांपैकी कोणाला गरिबी आली, तर तुमच्या गरीब भावाबद्दल आपलं मन कठोर करू नका किंवा त्याला काही देताना कंजूसपणा करू नका.+ ८ याउलट, तुम्ही त्याला उदार हाताने द्या+ आणि त्याला ज्या गोष्टींची गरज असेल किंवा त्याच्याकडे ज्या काही गोष्टींची कमी असेल, त्या त्याला उसन्या द्या.* ९ पण, ‘सातवं वर्ष, म्हणजे कर्जमाफीचं वर्ष जवळ आलंय,’+ असा दुष्ट विचार आपल्या मनात ठेवून, आपल्या गरीब भावाला उदारपणे द्यायला मागेपुढे पाहू नका. जर तुम्ही त्याला काहीच दिलं नाही आणि जर त्याने तुमच्याबद्दल यहोवाकडे तक्रार केली, तर ते तुमच्यासाठी पाप ठरेल.+ १० तुम्ही* त्याला कुरकुर करत देऊ नका, तर उदारपणे द्या,+ म्हणजे तुमचा देव यहोवा तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला आशीर्वाद देईल.+ ११ तुमच्या देशात गरीब लोक नेहमीच असतील.+ म्हणून ‘तुम्ही आपल्या देशात राहणाऱ्या, गरीब आणि संकटात असलेल्या भावाला उदार हाताने द्या,’ अशी मी तुम्हाला आज्ञा देत आहे.+
१२ जर तुमच्या इब्री भावांपैकी एखाद्याला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, तुम्हाला विकण्यात आलं आणि त्याने तुमची सहा वर्षं सेवा केली, तर सातव्या वर्षी तुम्ही त्याला मुक्त करा.+ १३ त्याला मुक्त करताना, तुम्ही त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. १४ तुम्ही तुमच्या मेंढरांच्या वा बकऱ्यांच्या कळपातून, तुमच्या पिकातून, तेलातून आणि द्राक्षारसातून उदारतेने त्याला द्या. तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आशीर्वाद दिल्याप्रमाणे, तुम्ही त्याला द्या. १५ तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला तिथून सोडवलं हे विसरू नका; म्हणूनच मी तुम्हाला आज असं करण्याची आज्ञा देत आहे.
१६ पण जर त्या दासाचं तुमच्यावर आणि तुमच्या घराण्यातल्या लोकांवर प्रेम असेल आणि तो आनंदाने तुमच्याकडे राहत असेल आणि म्हणून तो तुम्हाला म्हणाला, ‘मी तुम्हाला सोडून जाणार नाही,’+ १७ तर तुम्ही त्याला दाराजवळ आणून अरीने* त्याचा कान टोचा आणि तो आयुष्यभर तुमचा दास होईल. तुमच्या दासीसोबतही तुम्ही याप्रमाणेच करा. १८ त्या दासाला मुक्त केल्यावर जेव्हा तो जाईल, तेव्हा तुमचं नुकसान झालं असं समजू नका, कारण त्याने तुमच्याकडे सहा वर्षं केलेल्या सेवेचं मोल, मजुराने केलेल्या सेवेच्या दुप्पट मोलाचं आहे आणि तुमचा देव यहोवा याने तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला आशीर्वाद दिला आहे.
१९ तुमच्या गुराढोरांच्या आणि मेंढरांच्या वा बकऱ्यांच्या कळपांमधल्या प्रत्येक पहिल्या जन्मलेल्या नराला, तुमचा देव यहोवा याच्यासाठी वेगळं करा.+ तुमच्या गुराढोरांच्या* पहिल्या जन्मलेल्या प्राण्याला कोणत्याही कामासाठी वापरू नका किंवा बकऱ्यांच्या वा मेंढरांच्या पहिल्या जन्मलेल्यांची लोकर कातरू नका. २० तुमचा देव यहोवा जे ठिकाण निवडेल, तिथे दरवर्षी तुम्ही आणि तुमच्या घराण्याने यहोवासमोर त्या प्राण्याचं मांस खावं.+ २१ पण जर त्याच्यात काही दोष असेल, म्हणजे तो प्राणी लंगडा किंवा आंधळा असेल किंवा त्यात कोणताही मोठा दोष असेल, तर तुम्ही आपला देव यहोवा याच्यासाठी तो प्राणी अर्पण करू नका.+ २२ त्या प्राण्याचं मांस तुम्ही आपल्या शहरांमध्ये* खाऊ शकता. तुम्ही सांबराचं किंवा हरणाचं मांस खाता, त्याच प्रकारे हे मांससुद्धा शुद्ध किंवा अशुद्ध अशी कोणतीही व्यक्ती खाऊ शकते.+ २३ पण तुम्ही त्याचं रक्त खाऊ नका;+ ते पाण्यासारखं जमिनीवर ओतून टाका.+