करिंथकर यांना दुसरं पत्र
६ त्याच्यासोबत कार्य करत असताना,+ आम्ही तुम्हाला अशी विनंतीही करतो, की देवाची अपार कृपा स्वीकारल्यावर ती व्यर्थ ठरेल असं वागू नका.+ २ कारण तो म्हणतो: “कृपेच्या काळात मी तुझं ऐकलं, आणि तारणाच्या दिवशी तुला मदत केली.”+ पाहा! आताच विशेषकरून कृपेचा काळ आहे. पाहा! आताच तारणाचा दिवस आहे.
३ आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचं कारण होत नाही.+ ४ तर, सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो.+ धीराने पुष्कळ दुःखं सोसून, संकटं, अडचणी आणि कठीण प्रसंगांचा सामना करून,+ ५ मारहाण आणि तुरुंगवास सहन करून,+ दंगलींना तोंड देऊन, कष्ट करून, रात्ररात्र जागून, अन्नपाण्याशिवाय दिवस काढून;+ ६ शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने,+ दयाळूपणाने,+ पवित्र शक्तीने,* निष्कपट प्रेमाने,+ ७ खरं बोलण्याद्वारे, देवाच्या सामर्थ्याने;+ उजव्या* आणि डाव्या हातात* नीतिमत्त्वाची शस्त्रं घेऊन,+ ८ गौरवाने आणि अपमानाने, निंदेने आणि स्तुतीने आम्ही स्वतःची शिफारस करतो. आम्हाला फसवणूक करणारे असं समजलं जातं, तरीही आम्ही खरं बोलतो. ९ आम्ही अनोळख्यांसारखे असलो, तरी आम्हाला ओळखलं जातं. आम्ही मरायला टेकलेल्यांसारखे असलो,* तरी पाहा! आम्ही जिवंत आहोत;+ शिक्षा देण्यात आलेल्यांसारखे* असलो, तरी आम्हाला मृत्यूच्या स्वाधीन करण्यात आलेलं नाही.+ १० आम्ही शोक करणाऱ्यांसारखे असून नेहमी आनंदी राहतो; आम्हाला गरीब समजलं जात असूनही, आम्ही पुष्कळ जणांना श्रीमंत करतो; कंगाल समजलं जात असूनही, आमच्याजवळ सगळं काही आहे.+
११ करिंथकरांनो, आम्ही तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोललो आहोत आणि आम्ही आमचं मन मोठं केलं आहे. १२ आम्ही तुमच्यावर अगदी पूर्ण मनाने प्रेम करतो,*+ पण तुमची मनं आमच्याबद्दल संकुचित आहेत.* १३ म्हणूनच, मी तुम्हाला स्वतःची मुलं समजून असं सांगतो, की तुम्हीसुद्धा तुमची मनं मोठी करा.+
१४ विश्वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका.*+ कारण नीती आणि अनीतीचा काय संबंध?+ किंवा उजेड आणि अंधार यांच्यात काय मेळ?+ १५ शिवाय, ख्रिस्त आणि सैतान* यांच्यात काय सारखेपणा?+ विश्वास ठेवणारा* आणि विश्वासात नसलेला यांचा काय संबंध?*+ १६ आणि देवाच्या मंदिराचा, मूर्तींसोबत कसा मेळ बसेल?+ कारण आपण एका जिवंत देवाचं मंदिर आहोत.+ जसं स्वतः देवाने म्हटलं: “मी त्यांच्यामध्ये राहीन+ आणि त्यांच्यामध्ये चालीन, आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+ १७ “ ‘म्हणून, त्यांच्यातून बाहेर निघा आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करा,’ ‘आणि अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका’ ”;+ “ ‘म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन,’ असं यहोवा* म्हणतो.”+ १८ “ ‘मी तुमचा पिता होईन+ आणि तुम्ही माझी मुलं आणि माझ्या मुली व्हाल,’+ असं सर्वसमर्थ देव यहोवा* म्हणतो.”