रोमकर यांना पत्र
४ तसं असेल, तर आपला पूर्वज अब्राहाम याच्याबद्दल काय म्हणता येईल? त्याने काय मिळवलं? २ उदाहरणार्थ, जर अब्राहामला त्याच्या कार्यांमुळे नीतिमान ठरवण्यात आलं असतं तर तो बढाई मारू शकला असता, पण देवासमोर नाही. ३ कारण शास्त्रवचन काय म्हणतं? “अब्राहामने यहोवावर* विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.”+ ४ एखादा माणूस काम करतो, तेव्हा त्याला मिळणारी मजुरी ही त्याच्यावर केलेली कृपा* आहे असं समजलं जात नाही. तर ती त्याची हक्काची कमाई असते. ५ पण जो माणूस आपल्या कार्यांवर अवलंबून न राहता, पापी माणसालाही नीतिमान ठरवणाऱ्या देवावर विश्वास ठेवतो, त्या माणसाला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान ठरवण्यात येतं.+ ६ देव ज्याला कार्यांशिवाय नीतिमान ठरवतो, अशा माणसाला दावीदनेही सुखी म्हटलं. ७ तो म्हणाला: “सुखी आहेत ते, ज्यांच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्यांची पापं झाकण्यात आली आहेत.* ८ सुखी आहे तो माणूस, ज्याच्या पापांचा यहोवा* हिशोब ठेवत नाही.”+
९ तर मग हे सुख फक्त सुंता झालेल्यांनाच मिळतं का, की सुंता न झालेल्यांनाही मिळतं?+ कारण “अब्राहामच्या विश्वासामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आलं,” असं आपण म्हणतो.+ १० त्याला केव्हा नीतिमान ठरवण्यात आलं? सुंता झाल्यावर, की सुंता झाली नव्हती तेव्हा? सुंता झाल्यावर नाही, तर अजून त्याची सुंता झाली नव्हती तेव्हा त्याला नीतिमान ठरवण्यात आलं. ११ सुंता हे त्याला देवाकडून मिळालेलं चिन्ह होतं.+ सुंता झालेली नसतानाही विश्वासाद्वारे नीतिमान ठरवण्यात आल्याचा तो जणू शिक्का* होता. हे यासाठी, की सुंता झालेली नसतानाही जे विश्वास दाखवतात, अशा सगळ्यांचा तो पिता ठरावा+ आणि त्यांनाही या विश्वासाद्वारे नीतिमान ठरवण्यात यावं. १२ तसंच यासाठी, की त्याने सुंता झालेल्यांचा पिता ठरावं. पण जे सुंता करतात फक्त अशांचाच नाही, तर आपला पिता अब्राहाम याचं अनुकरण करून जे सरळ मार्गाने चालतात, अशांचाही तो पिता ठरावा.+ त्याने सुंता झालेली नसतानाही विश्वास दाखवला.
१३ कारण अब्राहाम एका जगाचा* वारस होईल हे वचन त्याला किंवा त्याच्या संततीला,* नियमशास्त्राद्वारे मिळालं नव्हतं.+ तर विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे ते मिळालं होतं.+ १४ कारण नियमशास्त्राचं पालन करणारे जर वारस आहेत, तर मग विश्वास व्यर्थ ठरतो आणि देवाने दिलेलं वचन रद्द झालं आहे. १५ खरं पाहता, नियमशास्त्रामुळे देवाचा क्रोध उत्पन्न होतो.+ पण जिथे नियमशास्त्र नाही तिथे नियम मोडलेही जात नाहीत.+
१६ अब्राहामला त्याच्या विश्वासामुळे ते वचन देण्यात आलं आणि यातून देवाची अपार कृपाही प्रकट झाली.+ त्यामुळे, त्याच्या सर्व संततीला,* ते वचन मिळेल हे निश्चित होतं;+ फक्त ज्यांनी नियमशास्त्राचं पालन केलं त्यांनाच नाही, तर अब्राहामसारखा ज्यांचा विश्वास आहे त्यांनाही. तो तर आपल्या सगळ्यांचा पिता आहे.+ १७ (शास्त्रात लिहिल्याप्रमाणेच हे आहे: “मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता म्हणून नेमलं आहे.”)+ ज्या देवावर त्याचा विश्वास होता, जो मेलेल्यांना जिवंत करतो आणि ज्या अजून घडल्या नाहीत अशा गोष्टींबद्दल त्या घडल्याप्रमाणे* बोलतो, त्या देवासमोर हे झालं. १८ कोणतीच आशा नसताना, त्याने आशेच्या आधारावर असा विश्वास ठेवला की तो पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल. कारण असं सांगण्यात आलं होतं, की “अशाच प्रकारे तुझी संततीही* अगणित होईल.”+ १९ त्याने आपल्या स्वतःच्या शरीराचा विचार केला. त्याचं शरीर एखाद्या मेलेल्या माणसासारखं झालं होतं (कारण तो सुमारे १०० वर्षांचा होता).+ तसंच, साराच्या वांझपणाचाही* त्याने विचार केला.+ पण त्याचा विश्वास कमजोर झाला नाही. २० देवाने वचन दिलं असल्यामुळे त्याचा विश्वास डळमळला नाही. तर त्याच्या विश्वासामुळे त्याला सामर्थ्य मिळालं आणि त्याने देवाचा गौरव केला. २१ आणि जे वचन देवाने दिलं होतं, ते पूर्ण करायला तो समर्थ आहे अशी पक्की खातरी त्याला होती.+ २२ म्हणूनच, “त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.”+
२३ पण, “त्याला नीतिमान ठरवण्यात आलं” हे शब्द फक्त त्याच्यासाठीच लिहिण्यात आले नव्हते.+ २४ तर ते आपल्यासाठीही लिहिण्यात आले आहेत. कारण ज्या देवाने आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून जिवंत केलं, त्याच्यावर आपला विश्वास असल्यामुळे आपल्यालाही नीतिमान ठरवण्यात येईल.+ २५ त्या प्रभू येशूला आपल्या पापांमुळे मृत्यूच्या स्वाधीन करण्यात आलं,+ आणि आपल्याला नीतिमान ठरवण्यासाठी मेलेल्यांतून जिवंत करण्यात आलं.+