लेवीय
२६ तुम्ही आपल्यासाठी निरुपयोगी देव बनवू नका+ आणि कोरलेली मूर्ती किंवा पूजेचा स्तंभ उभारू नका.+ तसंच, तुम्ही आपल्या देशात कुठेही आकृती कोरलेला दगड ठेवून त्याच्यापुढे नमन करू नका,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे. २ तुम्ही माझे शब्बाथ पाळले पाहिजेत आणि माझ्या उपासना मंडपाबद्दल आदर दाखवला पाहिजे.* मी यहोवा आहे.
३ जर तुम्ही नेहमी माझ्या नियमांनुसार चालत राहिलात आणि माझ्या आज्ञा पाळत राहिलात,+ ४ तर मी वेळच्या वेळी पाऊस पाडीन+ आणि जमीन तिचा उपज देईल+ आणि फळझाडं तुम्हाला फळं देतील. ५ तुमचा मळणीचा हंगाम द्राक्षांच्या कापणीपर्यंत चालेल आणि द्राक्षांची कापणी पेरणीच्या हंगामापर्यंत चालेल; तुम्ही पोटभर अन्न खाल आणि तुमच्या देशात सुरक्षित राहाल.+ ६ मी देशात शांती आणीन+ आणि जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा तुम्हाला कोणाचीही भीती वाटणार नाही.+ मी देशातून हिंस्र प्राण्यांना काढून टाकीन आणि तुमच्या देशावर युद्धाची तलवार चालणार नाही. ७ तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील. ८ तुमच्यातले पाच जण १०० जणांचा पाठलाग करतील आणि १०० जण १०,००० जणांचा पाठलाग करतील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तलवारीने पडतील.+
९ मी तुमच्यावर माझा आशीर्वाद पाठवीन* आणि तुम्हाला फलदायी करून तुमची संख्या वाढवीन.+ मी तुमच्यासोबत केलेला माझा करार पाळीन.+ १० तुम्ही मागच्या वर्षाचं पीक खात असतानाच, तुम्हाला नवीन धान्य साठवण्यासाठी जुनं टाकून द्यावं लागेल. ११ मी माझा उपासना मंडप तुमच्यामध्ये उभारीन+ आणि मी* तुम्हाला नाकारणार नाही. १२ मी तुमच्यासोबत असेन आणि तुमचा देव होईन+ आणि तुम्ही माझे लोक व्हाल.+ १३ मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं आणि त्यांच्या गुलामगिरीतून सोडवलं. तुम्हाला ताठ मानेने चालता यावं,* म्हणून मी तुमचं जू* तोडून टाकलं.
१४ पण जर तुम्ही माझं ऐकलं नाही आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,+ १५ आणि जर तुम्ही माझे नियम नाकारले+ आणि तुम्ही* माझ्या न्याय-निर्णयांचा तिरस्कार करून माझ्या सर्व आज्ञांचं पालन केलं नाही आणि जर तुम्ही माझा करार मोडला,+ १६ तर मी तुमच्यासोबत या सर्व गोष्टी करीन: मी तुम्हाला क्षयरोगाने आणि तापाने पीडित करीन. तुमची दृष्टी जाईल आणि तुमची शक्ती नाहीशी होईल. तुम्ही बियाणं पेराल पण तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण तुमचे शत्रू त्याचं पीक खातील.+ १७ मी तुम्हाला नाकारीन आणि तुमचे शत्रू तुम्हाला हरवतील;+ तुमचा द्वेष करणारे तुम्हाला चिरडतील+ आणि कोणी पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळत सुटाल.+
१८ इतकं सगळं होऊनही तुम्ही माझं ऐकलं नाही, तर तुमच्या पापांबद्दल मला तुम्हाला सातपट शिक्षा करावी लागेल. १९ मी तुमचा अहंकार मोडून टाकीन आणि तुमचं आकाश लोखंडासारखं+ आणि तुमची जमीन तांब्यासारखी करीन. २० तुम्ही व्यर्थच आपली शक्ती खर्च कराल, कारण तुमची जमीन पीक देणार नाही+ आणि फळझाडं फळं देणार नाहीत.
२१ तरीही, जर तुम्ही माझ्या विरोधात चालत राहिलात आणि माझं ऐकलं नाहीत, तर तुमच्या पापांबद्दल मला तुम्हाला सातपट शिक्षा करावी लागेल. २२ मी तुमच्यामध्ये रानातल्या हिंस्र प्राण्यांना पाठवीन+ आणि ते तुमच्या मुलांना उचलून नेतील+ आणि तुमच्या गुराढोरांना मारून टाकतील. तुमची संख्या कमी होत जाईल आणि तुमचे रस्ते ओसाड पडतील.+
२३ हे सर्व होऊनही जर तुम्ही माझं ताडन स्वीकारलं नाही+ आणि हट्टीपणे माझ्या विरोधात चालत राहिलात, २४ तर मीही तुमच्या विरोधात चालीन आणि मी तुमच्या पापांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन. २५ माझा करार मोडल्याबद्दल मी तुमच्यावर सूड उगवणारी तलवार आणीन.+ तुम्ही तुमच्या शहरांत आश्रय घेतला, तर मी तुमच्यावर रोगराई पाठवीन+ आणि तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या हातात देईन.+ २६ मी तुमचा अन्नाचा* पुरवठा* नष्ट करीन.+ तेव्हा दहा स्त्रिया मिळून एकाच भट्टीत तुमच्या भाकरी भाजतील आणि तुम्हाला वजनाने मापून देतील.+ तुम्ही खाल, पण तुमचं पोट भरणार नाही.+
२७ इतकं होऊनही जर तुम्ही माझं ऐकलं नाही आणि हट्टीपणे माझ्या विरोधात चालत राहिलात, २८ तर मी तुमचा आणखीन विरोध करीन,+ आणि तुमच्या पापांबद्दल मला तुम्हाला सातपट शिक्षा द्यावी लागेल. २९ तुम्हाला आपल्या मुलामुलींचं मांस खावं लागेल.+ ३० मी तुमची पूजेची उच्च स्थानं नष्ट करीन+ आणि तुमचे धूपस्तंभ कापून टाकीन आणि तुमच्या घृणास्पद मूर्तींच्या* प्रेतांवर तुमच्या प्रेतांचा ढीग लावीन.+ तुमची किळस आल्यामुळे मी* तुमच्याकडे पाठ फिरवीन.+ ३१ मी तुमची शहरं तलवारीच्या हवाली करीन+ आणि तुमची पवित्र ठिकाणं निर्जन करीन. तुमच्या बलिदानांचा सुवास* मला नकोसा होईल. ३२ मी स्वतः तुमचा देश ओसाड करीन+ आणि त्यात राहणारे तुमचे शत्रू त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहतील.+ ३३ मी सर्व राष्ट्रांमध्ये तुमची पांगापांग करीन+ आणि तलवार उपसून ती तुमच्यामागे पाठवीन.+ तुमचा देश ओसाड पडेल+ आणि तुमची शहरं उद्ध्वस्त होतील.
३४ तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात असताना तुमचा देश जितके दिवस ओसाड पडून राहील, तितके दिवस तो आपल्या शब्बाथांची परतफेड करेल. त्या वेळी देश विश्रांती घेईल,* कारण त्याला आपल्या शब्बाथांची परतफेड करावी लागेल.+ ३५ देश जितके दिवस ओसाड पडून राहील, तितके दिवस तो विश्रांती घेईल; कारण तुम्ही त्यात राहत असताना तुमच्या शब्बाथांच्या वेळी त्याला विश्रांती मिळाली नाही.
३६ शिवाय जे वाचतील,+ ते आपल्या शत्रूंच्या देशांत असताना मी त्यांच्या मनात निराशा उत्पन्न करीन. वाऱ्याने उडणाऱ्या पानाच्या आवाजाने ते असे पळू लागतील, जसा कोणी तलवारीपासून लांब पळतो आणि कोणीही पाठलाग करत नसताना ते पडतील.+ ३७ कोणी पाठलाग करत नसतानाही, ते तलवारीपासून लांब पळणाऱ्यांसारखे अडखळून एकमेकांवर पडतील. तुम्ही आपल्या शत्रूंसमोर टिकू शकणार नाही.+ ३८ राष्ट्रांमध्ये तुमचा नाश होईल+ आणि शत्रूंचा देश तुम्हाला गिळून टाकेल. ३९ तुमच्यापैकी जे वाचतील ते तुमच्या अपराधांमुळे तुमच्या शत्रूंच्या देशात सडत पडतील.+ हो, त्यांच्या वाडवडिलांच्या अपराधांमुळे+ ते सडत पडतील. ४० मग ते स्वतःच्या अपराधांची, तसंच आपल्या वाडवडिलांच्या अपराधांची आणि त्यांच्या अविश्वासूपणाची कबुली देतील.+ माझ्या विरोधात जाऊन ते अविश्वासूपणे वागले ही गोष्ट ते मान्य करतील.+ ४१ मग मीसुद्धा त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात पाठवून त्यांचा विरोध करीन.+
कदाचित यामुळे, त्यांचं सुंता न झालेलं* हृदय नम्र होईल+ आणि मग ते आपल्या अपराधांची भरपाई करतील. ४२ तेव्हा मी याकोबसोबत,+ इसहाकसोबत+ आणि अब्राहामसोबत केलेला माझा करार आठवीन+ आणि मी त्या देशाची आठवण करीन. ४३ इस्राएली लोक आपला देश सोडून गेल्यावर त्यांचा देश ओसाड पडून राहील. त्यांचा देश आपल्या शब्बाथांची परतफेड करेल+ आणि ते आपल्या अपराधांची भरपाई करतील, कारण त्यांनी माझे न्याय-निर्णय नाकारले आणि त्यांनी* माझ्या नियमांचा तिरस्कार केला.+ ४४ पण इतकं सर्व होऊनही, ते त्यांच्या शत्रूंच्या देशात असताना मी कधीही त्यांना पूर्णपणे नाकारणार नाही,+ किंवा त्यांचा नाश होईल इतकं दूर त्यांना लोटणार नाही; कारण, यामुळे त्यांच्यासोबत केलेला माझा करार मोडेल.+ मी त्यांचा देव यहोवा आहे. ४५ त्यांच्यासाठी मी त्यांच्या वाडवडिलांसोबत केलेला माझा करार आठवीन.+ मी त्यांचा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना सर्व राष्ट्रांदेखत इजिप्त देशातून बाहेर आणलं.+ मी यहोवा आहे.’”
४६ हे कायदे, न्याय-निर्णय आणि नियम, यहोवाने सीनाय पर्वतावर इस्राएली लोकांना मोशेद्वारे ठरवून दिले.+