लेवीय
१३ यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २ “एखाद्या माणसाच्या त्वचेवर* सूज, खपली किंवा चट्टा आला आणि त्यामुळे त्याच्या त्वचेवर कुष्ठरोग*+ होण्याची शक्यता असेल, तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेल्या त्याच्या मुलांपैकी एकाकडे आणावं.+ ३ याजक त्याच्या त्वचेवर झालेला संसर्ग तपासून पाहील. जर संसर्ग झालेल्या त्वचेवरचे केस पांढरे झाले असतील आणि ती जागा त्वचेपेक्षा खोल गेलेली असेल, तर तो कुष्ठरोग आहे. याजक तो तपासेल आणि त्या माणसाला अशुद्ध घोषित करेल. ४ पण जर त्वचेवरचा चट्टा पांढरा असेल आणि तो त्वचेपेक्षा खोल गेल्यासारखा दिसत नसेल, तसंच, त्यावरचे केस पांढरे झाले नसतील, तर याजक संसर्ग झालेल्या माणसाला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.+ ५ मग याजक सातव्या दिवशी त्याला तपासेल. जर त्याचा संसर्ग थांबल्याचं आणि त्वचेवर पसरलेला नसल्याचं दिसून आलं, तर तो त्या माणसाला आणखी सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.
६ सातव्या दिवशी याजक त्याला पुन्हा तपासेल. जर संसर्ग कमी झाला असेल आणि त्वचेवर पसरला नसेल, तर याजक त्याला शुद्ध घोषित करेल;+ ती फक्त खपली होती. त्या माणसाने आपले कपडे धुवावेत म्हणजे तो शुद्ध होईल. ७ पण स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी तो माणूस याजकासमोर गेल्यावर, जर ती खपली* त्वचेवर पसरल्याचं स्पष्टपणे दिसून आलं, तर त्याला पुन्हा* याजकासमोर जावं लागेल. ८ याजक ती खपली तपासून पाहील आणि जर ती त्वचेवर पसरली असेल, तर तो त्याला अशुद्ध घोषित करेल. हा कुष्ठरोग आहे.+
९ एखाद्याला कुष्ठरोग झाला, तर त्याला याजकाकडे आणलं जावं. १० याजक त्याला तपासून पाहील.+ जर त्वचेला पांढरी सूज आली असेल आणि तिथले केस पांढरे झाले असतील, तसंच त्या सुजलेल्या जागेवर उघडी जखम+ असेल, ११ तर तो त्याच्या त्वचेवरचा जुनाट कुष्ठरोग आहे. याजक त्याला अशुद्ध घोषित करेल. त्याने त्याला पुन्हा तपासण्यासाठी इतरांपासून वेगळं ठेवू नये,+ कारण तो अशुद्ध आहे. १२ जर त्या माणसाच्या संपूर्ण त्वचेवर कुष्ठरोग पसरला असेल, आणि याजकाला त्या माणसाच्या डोक्यापासून पायांपर्यंत कुष्ठरोग पसरल्याचं दिसत असेल; १३ आणि त्याला तपासल्यानंतर जर याजकाला दिसून आलं, की त्या माणसाच्या संपूर्ण त्वचेवर कुष्ठरोग पसरला आहे, तर याजक त्या संसर्ग झालेल्या माणसाला शुद्ध* घोषित करेल. त्याची सगळी त्वचा पांढरी झाली आहे आणि तो शुद्ध आहे. १४ पण त्याच्या त्वचेवर कधीही उघडी जखम दिसून आली, तर तो अशुद्ध होईल. १५ याजकाने ती उघडी जखम पाहिल्यावर तो त्याला अशुद्ध घोषित करेल.+ ती जखम अशुद्ध आहे. तो कुष्ठरोग आहे.+ १६ पण जर ती उघडी जखम पुन्हा पांढरी झाली, तर त्या माणसाने याजकाकडे यावं. १७ याजक त्याला तपासून पाहील+ आणि जर संसर्ग झालेली त्याची जखम पांढरी झाली असेल, तर तो त्या माणसाला शुद्ध घोषित करेल. तो शुद्ध आहे.
१८ एखाद्याच्या त्वचेवर फोड आला आणि तो बरा झाला, १९ पण त्या जागेवर पांढरी सूज किंवा लालसर-पांढरा चट्टा आला, तर त्याने याजकाकडे जावं. २० याजक तो चट्टा तपासून पाहील.+ तो त्वचेपेक्षा खोल गेलेला दिसत असेल आणि तिथले केस पांढरे झाले असतील, तर याजक त्याला अशुद्ध घोषित करेल. हा फोडावर आलेला कुष्ठरोग आहे. २१ पण त्याला तपासल्यावर जर याजकाला दिसून आलं, की तिथले केस पांढरे झालेले नाहीत आणि ती जागा त्वचेपेक्षा खोल गेलेली नाही, तसंच तो चट्टा फिकट झाला आहे, तर याजक त्याला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.+ २२ जर तो चट्टा त्वचेवर पसरल्याचं स्पष्टपणे दिसून आलं, तर याजक त्याला अशुद्ध घोषित करेल. त्याला कुष्ठरोग आहे. २३ पण जर चट्टा तिथेच राहिला आणि पसरला नाही, तर ती फक्त फोडाची सूज आहे. याजक त्या माणसाला शुद्ध घोषित करेल.+
२४ किंवा एखाद्याला आगीने भाजल्यामुळे जखम झाली आणि त्या ओल्या जखमेवर लालसर-पांढरा किंवा पांढरा चट्टा आला, २५ तर याजक तो तपासून पाहील. जर त्या चट्ट्यावरचे केस पांढरे झाले असतील आणि तो त्वचेपेक्षा खोल गेलेला दिसत असेल, तर त्या जखमेत कुष्ठरोग झाला आहे. याजक त्या माणसाला अशुद्ध घोषित करेल. हा कुष्ठरोग आहे. २६ पण याजकाने तो तपासून पाहिल्यावर, त्यावरचे केस पांढरे झालेले नसतील, तो त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल आणि फिकट झाला असेल, तर याजक त्याला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.+ २७ सातव्या दिवशी याजक त्याला तपासून पाहील. जर तो चट्टा त्वचेवर पसरल्याचं स्पष्टपणे दिसत असेल, तर याजक त्याला अशुद्ध घोषित करेल. हा कुष्ठरोग आहे. २८ पण जर तो चट्टा तिथेच राहिला, जर तो पसरला नाही आणि फिकट झाला, तर ती फक्त जखमेवरची सूज आहे. याजक त्या माणसाला शुद्ध घोषित करेल, कारण ती जखमेवरची सूज आहे.
२९ एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला, डोक्यावर किंवा हनुवटीवर संसर्ग झाला, ३० तर याजक तो तपासून पाहील.+ जर तो त्वचेपेक्षा खोल गेला असेल आणि तिथल्या त्वचेवरचे केस पिवळे आणि कमी झाले असतील, तर याजक अशा व्यक्तीला अशुद्ध घोषित करेल. हा डोक्यावरच्या त्वचेचा किंवा दाढीचा संसर्ग आहे. हा डोक्यावरचा किंवा हनुवटीवरचा कुष्ठरोग आहे. ३१ पण जर तो संसर्ग त्वचेपेक्षा खोल गेला नसल्याचं आणि त्या त्वचेवर एकही काळा केस नसल्याचं याजकाला दिसून आलं, तर त्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवावं.+ ३२ सातव्या दिवशी याजक तो संसर्ग तपासून पाहील. जर संसर्ग पसरला नसेल आणि त्यावर एकही पिवळा केस आला नसेल, तसंच, संसर्ग झालेली जागा त्वचेपेक्षा खोल गेल्याचं दिसत नसेल, ३३ तर त्या व्यक्तीने आपल्या डोक्यावरचे किंवा हनुवटीवरचे केस काढावेत, पण संसर्ग झालेल्या जागेवरचे केस काढू नयेत. यानंतर याजक त्या व्यक्तीला सात दिवस इतरांपासून वेगळं ठेवेल.
३४ सात दिवसांनी याजक संसर्ग झालेली जागा पुन्हा तपासेल. जर तो डोक्यावरचा व दाढीचा संसर्ग त्वचेवर पसरला नसेल आणि त्वचेपेक्षा खोल गेला नसेल, तर याजकाने त्या व्यक्तीला शुद्ध घोषित करावं. त्या व्यक्तीने आपले कपडे धुवावेत आणि शुद्ध व्हावं. ३५ पण शुद्ध झाल्यानंतर, जर संसर्ग त्वचेवर पसरल्याचं स्पष्टपणे दिसून आलं, ३६ तर याजक त्या व्यक्तीला तपासून पाहील. जर संसर्ग त्वचेवर पसरला असेल, तर याजकाला पिवळे केस शोधण्याची गरज नाही. ती व्यक्ती अशुद्ध आहे. ३७ पण तपासून पाहिल्यावर जर संसर्ग पसरला नसल्याचं आणि त्यावर काळे केस उगवल्याचं दिसून आलं, तर संसर्ग बरा झाला आहे. ती व्यक्ती शुद्ध आहे. याजकाने तिला शुद्ध घोषित करावं.+
३८ एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या त्वचेवर चट्टे आले आणि ते चट्टे पांढरे असले, ३९ तर याजक त्या व्यक्तीला तपासून पाहील.+ जर त्वचेवरचे चट्टे* फिकट पांढरे असतील, तर तिथे नुसतंच पुरळ उठलं आहे. ती व्यक्ती शुद्ध आहे.
४० एखाद्या माणसाचे केस गळल्यामुळे त्याला टक्कल पडलं, तर तो शुद्ध आहे. ४१ त्याच्या डोक्याच्या पुढच्या भागावरचे केस गळल्यामुळे त्याला तिथे टक्कल पडलं असेल, तर तो शुद्ध आहे. ४२ पण जर त्याच्या डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर किंवा कपाळावर लालसर-पांढरी जखम झाली, तर त्याच्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग झाला आहे. ४३ याजक त्याला तपासून पाहील. त्याच्या डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर किंवा कपाळावर जिथे संसर्ग झाला आहे, तिथे जर लालसर-पांढरी सूज आली असेल, आणि ती त्याच्या त्वचेवर कुष्ठरोगासारखी दिसत असेल, ४४ तर तो कुष्ठरोगी आहे. तो अशुद्ध आहे. त्याच्या डोक्यावरच्या रोगामुळे याजकाने त्याला अशुद्ध घोषित करावं. ४५ त्या कुष्ठरोग्याने फाटके कपडे घालावेत. त्याने आपले केस विंचरू नयेत आणि मिशी झाकून, ‘अशुद्ध, अशुद्ध’ असं ओरडावं. ४६ जितके दिवस त्याला रोग असेल तितके दिवस तो अशुद्ध राहील. अशुद्ध असल्यामुळे त्याने लोकांपासून दूर राहावं. त्याचं राहण्याचं ठिकाण छावणीच्या बाहेर असावं.+
४७ जर लोकरीच्या किंवा मलमलीच्या एखाद्या वस्त्रावर कुष्ठरोगाची लक्षणं दिसू लागली; ४८ आणि जर ही लक्षणं मलमलीच्या किंवा लोकरीच्या वस्त्राच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांमध्ये, किंवा एखाद्या कातडीवर वा कातडीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूवर दिसू लागली; ४९ शिवाय, रोगाचा हिरवट-पिवळा किंवा लालसर डाग एखाद्या वस्त्रावर, कातडीवर, वस्त्राच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांवर, किंवा कातडीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूवर दिसून आला, तर तो कुष्ठरोगाचा डाग आहे. तो याजकाला दाखवावा. ५० याजक तो तपासून पाहील आणि कुष्ठरोग झालेली ती वस्तू सात दिवस वेगळी ठेवेल.+ ५१ सातव्या दिवशी कुष्ठरोग तपासून पाहिल्यावर जर याजकाला तो डाग वस्त्रावर, त्याच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांवर किंवा कातडीवर (मग ती कातडी कशासाठीही वापरली जात असो) पसरल्याचा दिसून आला, तर हा घातक कुष्ठरोग आहे. ती वस्तू अशुद्ध आहे.+ ५२ ज्यात कुष्ठरोग दिसून आला आहे, ते लोकरीचं किंवा मलमलीचं वस्त्र किंवा कातडीपासून बनवलेली वस्तू याजकाने जाळून टाकावी, कारण तो घातक कुष्ठरोग आहे. ती वस्तू आगीत जाळून टाकावी.
५३ पण, जर तपासून पाहिल्यावर त्या वस्त्रात किंवा त्याच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांमध्ये, किंवा कातडीपासून बनवलेल्या वस्तूत रोग पसरला नसल्याचं याजकाला दिसून आलं, ५४ तर त्याने रोगाची लक्षणं दिसून आलेली ती वस्तू धुण्याची आज्ञा द्यावी आणि त्याने ती वस्तू आणखी सात दिवस वेगळी ठेवावी. ५५ ती वस्तू स्वच्छ धुतल्यावर याजकाने ती पुन्हा तपासून पाहावी. रोग पसरला नसला, पण रोगाची लक्षणं तशीच असल्याचं त्याला दिसून आलं, तर ती अशुद्ध आहे. ती वस्तू जाळून टाकली जावी, कारण ती रोगामुळे आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने कुजली आहे.
५६ पण जर याजकाने तपासून पाहिल्यावर, ती वस्तू धुतल्यानंतर रोग झालेला भाग फिकट पडल्याचं त्याला दिसून आलं, तर वस्त्रातला किंवा कातडीतला तेवढा भाग त्याने फाडून टाकावा. ५७ पण, जर यानंतरही रोगाची लक्षणं वस्त्राच्या दुसऱ्या भागावर, त्याच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांवर किंवा कातडीच्या वस्तूवर दिसू लागली, तर रोग पसरत आहे. रोग लागलेली अशी कोणतीही वस्तू जाळून टाकावी.+ ५८ पण जर ते वस्त्र, त्याचे उभे किंवा आडवे धागे, किंवा कातडी वस्तू धुतल्यावर रोगाची लक्षणं नाहीशी झाली, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल.
५९ मलमलीच्या किंवा लोकरीच्या वस्त्रात, त्याच्या उभ्या किंवा आडव्या धाग्यांमध्ये, किंवा कातडीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूत दिसून येणाऱ्या कुष्ठरोगाबद्दल आणि ती वस्तू शुद्ध किंवा अशुद्ध घोषित करण्याबद्दल हा नियम आहे.”