यहेज्केल
८ मग सहाव्या वर्षात, सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदाचे सगळे वडीलजन माझ्यासमोर बसले होते, तेव्हा सर्वोच्च प्रभू यहोवा याची शक्ती माझ्यावर कार्य करू लागली. २ मी बघत होतो, तेव्हा मला आगीच्या स्वरूपात माणसासारखं कोणीतरी दिसलं. त्याच्या कमरेखालचा भाग आगीसारखा दिसत होता.+ आणि कमरेच्या वरचा भाग तेजस्वी दिसत असून सोन्या-चांदीच्या मिश्र धातूसारखा चमकत होता.+ ३ मग त्याने हातासारखं दिसणारं काहीतरी पुढे करून माझ्या डोक्याचे केस धरले. आणि पवित्र शक्तीने* मला देवाकडून मिळालेल्या दृष्टान्तात आकाश आणि पृथ्वीच्या मधे उचलून यरुशलेममध्ये नेलं. तिने मला मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या आतल्या दरवाजाच्या प्रवेशाजवळ आणलं.+ तिथे देवाला ईर्ष्येला पेटवणारी* एक मूर्ती होती.+ ४ आणि पाहा! इस्राएलच्या देवाचं तेज तिथे पसरलं होतं;+ मी खोऱ्यात असताना पाहिलं होतं तसंच ते तेज होतं.+
५ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, जरा आपली नजर वर करून उत्तरेकडे बघ.” म्हणून मी उत्तरेकडे बघितलं. तेव्हा तिथे, म्हणजे वेदीच्या दरवाजाच्या उत्तरेकडे असलेल्या प्रवेशाजवळ, देवाला ईर्ष्येला पेटवणारी ती मूर्ती होती. ६ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, इस्राएलचं घराणं इथे किती भयंकर आणि घृणास्पद कामं करत आहे, हे तू बघतोस ना?+ याच गोष्टी मला माझ्या मंदिरापासून दूर जायला लावतात.+ पण आता तू यांपेक्षाही जास्त भयंकर आणि घृणास्पद गोष्टी बघशील.”
७ नंतर तो मला अंगणाच्या प्रवेशाजवळ घेऊन आला. तिथे मी पाहिलं, तेव्हा मला भिंतीत एक मोठं छिद्र दिसलं. ८ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, भिंत खण.” म्हणून मी भिंत खणली आणि मला आत जाणारा एक रस्ता दिसला. ९ तो मला म्हणाला: “आत जा, आणि इथे हे लोक किती वाईट आणि घृणास्पद कामं करत आहेत ते बघ.” १० म्हणून मी आत गेलो आणि पाहिलं, तेव्हा मला भिंतींवर सर्व प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या, किळसवाण्या जनावरांच्या+ आणि इस्राएलच्या घराण्याच्या सगळ्या घृणास्पद मूर्तींच्या* प्रतिमा+ कोरलेल्या दिसल्या. ११ आणि त्यांच्यासमोर इस्राएलच्या घराण्यातल्या वडीलजनांपैकी ७० जण उभे होते; त्यांच्यामध्ये शाफानचा+ मुलगा याजन्या हासुद्धा होता. त्या प्रत्येकाच्या हातात धूप-पात्र होतं आणि त्यातून सुगंधी धूपाच्या धुराचे लोट निघत होते.+ १२ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या घराण्यातले वडीलजन अंधारात काय करत आहेत, ते तुला दिसतंय ना? प्रत्येक जण आतल्या खोल्यांमध्ये आपल्या मूर्तींपुढे काय करतोय, ते तू पाहतोस ना? ते म्हणत आहेत, ‘यहोवा आपल्याला बघत नाही. यहोवा हा देश सोडून गेलाय.’”+
१३ तो पुढे मला म्हणाला: “ते ज्या घृणास्पद गोष्टी करत आहेत, त्यांपेक्षाही जास्त भयंकर गोष्टी तू आता बघशील.” १४ मग तो मला यहोवाच्या मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजाच्या प्रवेशाजवळ घेऊन आला. तिथे मला तम्मूज दैवतासाठी शोक करत बसलेल्या बायका दिसल्या.
१५ तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, तू हे सगळं बघतोस ना? पण, आता तू यापेक्षाही जास्त घृणास्पद आणि भयंकर गोष्टी पाहशील.”+ १६ मग तो मला यहोवाच्या मंदिरातल्या आतल्या अंगणात घेऊन आला.+ तिथे यहोवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ, म्हणजे वेदीच्या आणि द्वारमंडपाच्या मधे सुमारे २५ माणसं होती. त्यांची पाठ यहोवाच्या मंदिराकडे होती, आणि त्यांची तोंडं पूर्वेकडे असून ते सूर्याला नमन करत होते.+
१७ तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, तू हे बघतोस ना? यहूदाच्या घराण्याने अशी घृणास्पद कामं करणं, देशात सगळीकडे हिंसाचार माजवणं+ आणि माझा क्रोध भडकवणं, ही काय क्षुल्लक गोष्ट वाटते? बघ! ते माझ्या नाकाला फांदी* लावत आहेत. १८ म्हणून मी त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा वर्षाव करीन; मला त्यांच्याबद्दल अजिबात वाईट वाटणार नाही, आणि मी त्यांच्यावर जरासुद्धा दयामाया करणार नाही.+ त्यांनी कितीही ओरडून माझ्याकडे मदत मागितली, तरी मी त्यांचं ऐकणार नाही.”+