यिर्मया
२० यिर्मया या गोष्टींची भविष्यवाणी करत होता, तेव्हा इम्मेरच्या मुलाने, म्हणजे पशहूर याजकाने ती ऐकली. तो यहोवाच्या मंदिरातला मुख्य अधिकारीही होता. पशहूरने ती भविष्यवाणी ऐकली, २ तेव्हा त्याने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि त्याला खोड्यांत* अडकवून ठेवलं;+ हे खोडे यहोवाच्या मंदिरातल्या ‘बन्यामीनच्या वरच्या दरवाजाजवळ’ होते. ३ पण, दुसऱ्या दिवशी जेव्हा पशहूरने यिर्मयाला खोड्यांतून मोकळं केलं, तेव्हा यिर्मया त्याला म्हणाला:
“यहोवाने तुझं ‘पशहूर’ हे नाव बदलून तुला ‘चौफेर दहशत’ असं नाव दिलंय.+ ४ कारण यहोवा म्हणतो, ‘मी तुझी अशी दशा करीन, की ती पाहून तुला स्वतःला आणि तुझ्या सगळ्या मित्रांना दहशत बसेल. ते सगळे तुझ्या डोळ्यांदेखत शत्रूंच्या तलवारीला बळी पडतील.+ आणि मी संपूर्ण यहूदाला बाबेलच्या* राजाच्या हाती देईन. तो त्यांना बंदी बनवून बाबेलला घेऊन जाईल आणि तलवारीने त्यांना मारून टाकेल.+ ५ मी या शहराची सगळी धनसंपत्ती, मालमत्ता, मौल्यवान गोष्टी आणि यहूदाच्या राजांचा सगळा खजिना शत्रूंच्या हाती देईन.+ ते या सगळ्या गोष्टी लुटतील, त्या जप्त करतील आणि आपल्यासोबत बाबेलला घेऊन जातील.+ ६ आणि हे पशहूर! तुझ्याबद्दल सांगायचं तर, तू आणि तुझ्या घरात राहणारे सगळे जण बंदिवासात जातील. तू बाबेलला जाशील आणि तिथेच मरशील, आणि तुझ्या सगळ्या मित्रांसोबत तुला तिथेच पुरलं जाईल. कारण तू त्यांना खोटी भविष्यवाणी सांगितलीस.’”+
७ हे यहोवा! तू मला फसवलंस आणि मी फसलो.
तू वरचढ ठरलास, कारण तू माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहेस.+
मी लोकांसाठी दिवसभर हसण्याचा विषय बनलोय;
जो तो माझी निंदा करतो.+
८ कारण जेव्हाही मी बोलतो, तेव्हा “हिंसाचार आणि नाश!” हाच संदेश मला ओरडून सांगावा लागतो.
यहोवाचा संदेश सांगितल्यामुळे, मला दिवसभर अपमान आणि थट्टा सहन करावी लागते.+
पण, तो संदेश माझ्या मनात धगधगत्या आगीसारखा झाला;
माझ्या हाडांमध्ये कोंडलेल्या अग्नीसारखा तो झाला.
तो आवरता-आवरता मी पार थकून गेलो,
आणि मी आणखी गप्प बसू शकलो नाही.+
१० कारण मी बऱ्याच वाईट अफवा ऐकल्या आहेत;
भीतीने मला घेरलं आहे.+
ते म्हणाले, “चला आपण त्याची बदनामी करू! त्याला बदनाम करून टाकू!”
माझ्याशी चांगलं वागणारे लोकही माझ्या वाइटावर टपले होते.+
ते म्हणत होते: “तो कदाचित मूर्खासारखं वागून एखादी चूक करेल,
मग आपल्याला त्याच्यावर प्रबळ होऊन बदला घेता येईल.”
११ पण यहोवा एका शूर योद्ध्यासारखा माझ्या पाठीशी उभा होता.+
म्हणून माझा छळ करणारे अडखळतील आणि ते माझ्यावर प्रबळ होणार नाहीत.+
ते लज्जित होतील, कारण ते यशस्वी होऊ शकणार नाहीत.
त्यांना कायमचं अपमानित केलं जाईल आणि त्यांचा तो अपमान कोणीच विसरणार नाही.+
१२ हे सैन्यांच्या देवा यहोवा! तू नीतिमान माणसाचं परीक्षण करतोस.
तू माणसाच्या मनातले खोल विचार* आणि त्याचं हृदय पारखतोस.+
१३ यहोवाची स्तुती करा! यहोवासाठी गीत गा!
कारण त्याने दुष्ट लोकांच्या हातून गरिबाला सोडवलं आहे.
१४ माझा जन्म झाला तो दिवस शापित असो!
ज्या दिवशी माझ्या आईने मला जन्म दिला, तो दिवस आशीर्वादित ठरू नये!+
१५ “मुलगा झाला! तुम्हाला मुलगा झाला!”
अशी आनंदाची बातमी देऊन,
माझ्या वडिलांना अतिशय आनंदित करणारा माणूस शापित असो.
१६ त्या माणसाची अवस्था अशा शहरांसारखी होवो, जी शहरं यहोवाने उलथून टाकली आणि त्याबद्दल त्याला मुळीच पस्तावा झाला नाही.
त्याच्या कानावर सकाळी आक्रोशाचा, तर भरदुपारी रणशिंगाचा आवाज पडो.
१७ मी गर्भात होतो तेव्हाच त्याने मला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं!
मग माझ्या आईचा गर्भच माझी कबर बनली असती,
आणि मी कायम तिच्या गर्भात पडून राहिलो असतो.+
१८ मी गर्भातून बाहेर का आलो?
दुःख आणि त्रास पाहण्यासाठी?
आयुष्याच्या अखेरपर्यंत अपमान सहन करण्यासाठी?+