यशया
५ माझं ज्याच्यावर मनापासून प्रेम आहे, त्याच्यासाठी मी एक गीत गाईन.
हे गीत त्याच्याविषयी आणि त्याच्या द्राक्षमळ्याविषयी आहे.+
त्याचा द्राक्षमळा टेकडीच्या सुपीक उतारावर होता.
२ त्याने तिथली जमीन खोदून तिथले दगडगोटे काढून टाकले,
आणि तिथे उत्तम प्रतीच्या लाल द्राक्षांची वेल लावली.
त्याने मळ्याच्या मधोमध एक बुरूज बांधला,
आणि एक द्राक्षकुंडही खणलं.+
त्या द्राक्षवेलीला चांगली द्राक्षं येतील अशी त्याला आशा होती,
पण तिला मात्र जंगली द्राक्षंच आली.+
३ “म्हणून आता, हे यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो आणि यहूदाच्या माणसांनो!
माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा.+
४ मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी काय नाही केलं?
त्याच्यासाठी मी शक्य ते सगळं केलं.+
मग चांगल्या द्राक्षांची आशा ठेवली असताना,
मला जंगली द्राक्षं का मिळाली?
५ आता माझ्या द्राक्षमळ्याच्या बाबतीत मी काय करणार आहे,
ते मी तुम्हाला सांगतो:
मी द्राक्षमळ्याचं कुंपण काढून टाकीन,
आणि मळा जाळून टाकला जाईल.+
मी त्याची दगडी भिंत पाडून टाकीन,
आणि तो पायांखाली तुडवला जाईल.
६ मी तो द्राक्षमळा ओसाड करीन,+
त्याच्यात कधी छाटणी होणार नाही किंवा कुदळ चालवली जाणार नाही,
तो काटेरी झुडपाने आणि जंगली गवताने भरून जाईल,+
आणि ‘त्याच्यावर पाऊस पाडू नका,’ अशी मी ढगांना आज्ञा देईन.+
७ कारण, इस्राएलचं घराणं म्हणजे सैन्यांचा देव यहोवा याचा द्राक्षमळा;+
आणि त्याने आवडीने लागवड केलेल्या द्राक्षवेली, म्हणजे यहूदाची माणसं.
तो त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत राहिला,+
पण पाहा! ते अन्यायीपणे वागले.
त्याने त्यांच्याकडून नीतिमत्त्वाची अपेक्षा केली,
पण पाहा! त्याला फक्त आक्रोश ऐकू आला.”+
८ जागा उरत नाही तोपर्यंत,
जे घराला घर+ आणि शेताला शेत जोडतात,+
आणि सगळ्या जमिनीचे एकटेच मालक म्हणून राहतात,
त्यांचा धिक्कार असो!
९ मी सैन्यांचा देव यहोवा याला अशी शपथ घेताना ऐकलं, की
अनेक सुंदर आणि आलिशान घरं ओसाड पडतील,+
आणि ते पाहून लोक चकित होतील.
१० दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ* उत्पन्न मिळेल,
आणि एक होमर* बियाण्यांपासून फक्त एक एफा* एवढंच उत्पन्न मिळेल.+
११ जे दारू प्यायला पहाटेच उठतात,+
आणि रात्री उशिरापर्यंत दारूच्या नशेत पडून राहतात, त्यांचा धिक्कार असो!
१२ त्यांच्या मेजवान्यांमध्ये वीणा* आणि तंतुवाद्य,
डफ आणि बासरी वाजवली जाते,
आणि तिथे प्यायला द्राक्षारस असतो;
पण यहोवाच्या कार्यांकडे ते लक्ष देत नाहीत,
आणि तो करत असलेल्या कामांची ते दखल घेत नाहीत.
१३ माझे लोक मला ओळखत नाहीत,+
म्हणून ते बंदिवासात जातील.
त्यांच्या प्रतिष्ठित माणसांची उपासमार होईल,+
आणि त्यांच्या सगळ्या लोकांचा जीव तहानेने कासावीस होईल.
१४ कबरेने* आपली जागा वाढवली आहे,
तिने आपलं तोंड मोठं उघडलं आहे;+
यरुशलेमचं* वैभव,* गलबला करणारा तिचा जमाव आणि मौजमजा करणारे तिचे लोक,
हे सगळे नक्कीच त्या कबरेत जातील.
१५ माणूस लज्जित होऊन खाली वाकेल,
त्याला नमवलं जाईल,
आणि गर्विष्ठांची नजर झुकवली जाईल.
१६ पण सैन्यांचा देव यहोवा आपल्या न्यायामुळे गौरवशाली होईल;
खरा आणि पवित्र देव+ नीतिमत्त्वाने आपली पवित्रता दाखवून देईल.+
१७ कोकरं आपल्या कुरणांत असल्यासारखी चरतील;
विदेशी लोक धष्टपुष्ट जनावरांच्या ओसाड जागांवर आपलं पोट भरतील.
१८ एखादं जनावर जसं रस्सीने गाडी ओढतं,
तसं जे फसवणुकीच्या कामांनी आपली पापं ओढतात, त्यांचा धिक्कार असो.
१९ जे असं म्हणतात: “देवाने आपल्या कामाचा वेग वाढवावा;
त्याने आपलं काम लवकर करावं, म्हणजे आम्हाला ते पाहता येईल.
इस्राएलच्या पवित्र देवाने आपला उद्देश लवकर पूर्ण करावा,
म्हणजे आम्हाला तो कळेल!”+
२० जे चांगल्याला वाईट आणि वाइटाला चांगलं म्हणतात,+
जे प्रकाशाला अंधार आणि अंधाराला प्रकाश म्हणतात,
जे गोड गोष्टीला कडू आणि कडू गोष्टीला गोड म्हणतात,
त्यांचा धिक्कार असो!
२४ म्हणून, आगीची ज्वाला जशी धान्याचं धसकट खाऊन टाकते
आणि सुकलेलं गवत जसं आगीत भस्म होतं,
तसाच त्यांचाही नाश होईल.
त्यांची मुळं कुजतील,
त्यांची फुलं धुळीसारखी विखुरली जातील.
२५ त्यामुळे यहोवाचा क्रोध त्याच्या लोकांवर भडकलाय,
आणि त्यांना मारण्यासाठी तो आपला हात उगारेल.+
तेव्हा डोंगर हादरतील, आणि लोकांचे मृतदेह रस्त्यांवर केरकचऱ्यासारखे पडून राहतील.+
त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे त्याचा क्रोध शांत झालेला नाही,
त्यांना मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
२६ दूरच्या राष्ट्रासाठी निशाणी म्हणून त्याने झेंडा उभारलाय,+
त्याने शीळ घालून* त्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांतून बोलावलंय.+
पाहा! ते अगदी वेगाने येत आहेत.+
२७ त्यांच्यातला कोणीही थकलेला नाही किंवा कोणीही अडखळत नाही,
कोणीही डुलकी किंवा झोप घेत नाही.
त्यांच्या कंबरेचा पट्टा सैल झालेला नाही,
आणि त्यांच्या पायांतल्या जोड्यांचे बंद तुटलेले नाहीत.
२८ त्यांचे सगळे बाण तीक्ष्ण आहेत,
आणि त्यांचे सगळे धनुष्य ताणलेले आहेत.*
त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटीच्या दगडासारखे टणक आहेत,
आणि त्यांच्या रथांची चाकं चक्रीवादळासारखी गरगर फिरतात.+
२९ ते सिंहांसारखी गर्जना करतात,
तरुण सिंहांसारखी ते डरकाळी फोडतात.+
ते गुरगुरतील आणि आपल्या शिकारीवर झडप घालतील,
ते आपली शिकार ओढून नेतील आणि कोणीही ती त्यांच्या तावडीतून सोडवू शकणार नाही.
३० त्या दिवशी ते आपल्या शिकारीवर गुरगुरतील,
ते समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील.+
जो कोणी देशावर नजर टाकेल त्याला अंधाराशिवाय आणि संकटाशिवाय काही दिसणार नाही,
आणि ढगांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.+