यशया
२९ “अरीएलचा* धिक्कार असो! दावीदने जिथे तळ दिला होता, त्या अरीएल नगरीचा धिक्कार असो!+
लोकांनो! तुमचे वार्षिक सण+ वर्षानुवर्षं साजरे करत राहा.
ती माझ्यासाठी वेदीवर असलेली जाळण्याची जागा बनेल.+
३ मी सगळ्या बाजूंनी तुला वेढा घालीन,
तुझ्याभोवती टोकदार लाकडांचं कुंपण उभारीन,
आणि दगडमातीचा ढिगारा रचून तुला घेरीन.+
४ तुला अपमानित करून खाली पाडलं जाईल;
तू तिथून बोलशील, पण तुझा आवाज धुळीमुळे दबून जाईल.
जमिनीतून तुझा आवाज भूतविद्या करणाऱ्यासारखा ऐकू येईल,+
आणि धुळीतून तुझे शब्द पुटपुटल्यासारखे ऐकू येतील.
५ तुझ्या शत्रूंचा जमाव बारीक कुटलेल्या चुऱ्यासारखा,+
आणि जुलूम करणाऱ्यांचा जमाव वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखा होईल.+
हे सगळं एका झटक्यात, एकाएकी होईल.+
६ मी, सैन्यांचा देव यहोवा तुला सोडवण्यासाठी तुझ्याकडे आपलं लक्ष वळवीन.
त्या वेळी ढगांचा गडगडाट व भूकंप होईल आणि भयानक आवाज येईल;
वादळी वारा व तुफान येईल, आणि भस्म करणाऱ्या आगीच्या ज्वाला उठतील.”+
७ तेव्हा अरीएलविरुद्ध लढाई करणाऱ्या सगळ्या राष्ट्रांचा जमाव;+
म्हणजे तिच्याशी युद्ध करणारे,
तिच्यावर हल्ला करण्यासाठी बुरूज उभारणारे,
आणि तिच्यावर संकट आणणारे सर्व जण,
हे रात्री पाहिलेल्या स्वप्नासारखे, एका दृष्टान्तासारखे होतील.
८ भुकेला माणूस स्वप्नात आपण जेवत असल्याचं पाहतो,
पण जागं झाल्यावर तो उपाशीच असतो,
आणि तहानेने व्याकूळ असलेला माणूस स्वप्नात पाणी पीत असल्याचं पाहतो,
पण जागं झाल्यावर तो थकलेला आणि तहानलेलाच राहतो,
तशी सीयोन पर्वताविरुद्ध युद्ध करणाऱ्या सगळ्या राष्ट्रांच्या जमावाची अवस्था होईल.+
९ थक्क व्हा, चकित व्हा!+
स्वतःला आंधळं करा, म्हणजे तुम्हाला काही दिसणार नाही.+
ते नशेत आहेत, पण द्राक्षारस प्यायल्यामुळे नाही;
ते झोकांड्या खात आहेत, पण दारू प्यायल्यामुळे नाही.
१० कारण यहोवाने तुमच्यावर गाढ झोप आणली आहे;+
त्याने तुमच्या डोळ्यांना, तुमच्या संदेष्ट्यांना आंधळं केलं आहे.+
त्याने तुमच्या डोक्यांवर, तुमच्या दृष्टान्त पाहणाऱ्यांवर पडदा टाकला आहे.+
११ तुमच्यासाठी प्रत्येक दृष्टान्त हा मोहरबंद पुस्तकासारखा झाला आहे.+ ज्याला वाचता येतं, त्याला ते हे पुस्तक देऊन म्हणतात: “हे जरा मोठ्याने वाच,” तेव्हा तो म्हणतो: “हे मोहरबंद आहे, मी ते वाचू शकत नाही.” १२ आणि ज्याला वाचता येत नाही त्याला जेव्हा हे पुस्तक देऊन ते म्हणतात: “हे जरा वाचशील का?” तेव्हा तो म्हणतो: “मला तर वाचताच येत नाही.”
१३ यहोवा म्हणतो: “हे लोक तोंडाने माझा आदर करतात,
ओठांनी माझा सन्मान करतात,+
पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे;
ते माणसांच्या आज्ञा पाळतात,
पण आपण देवाचं भय बाळगतोय असं त्यांना वाटतं.+
१४ म्हणून पाहा, मी पुन्हा एकदा या लोकांसोबत आश्चर्यकारक गोष्टी करीन,+
मी एकापेक्षा एक अद्भुत गोष्टी करीन;
तेव्हा त्यांच्या बुद्धिमान माणसांची बुद्धी नष्ट होईल,
आणि त्यांच्या समजदार माणसांचा समंजसपणा नाहीसा होईल.”+
१५ जे यहोवापासून आपल्या योजना* लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, त्यांचा धिक्कार असो.+
ते अंधारात आपली कामं करतात,
आणि म्हणतात: “आपल्याला कोण बघतंय?
आपण काय करतोय हे कोणाला कळतंय?”+
१६ तुमचे विचार किती वाईट आहेत!
कुंभाराला मातीसारखंच समजलं जावं का?+
घडवलेल्या वस्तूने आपल्या घडवणाऱ्याबद्दल असं म्हणावं का,
की “त्याने मला घडवलं नाही”?+
आणि बनवलेली वस्तू बनवणाऱ्याबद्दल असं म्हणते का,
की “त्याला काहीच कळत नाही”?+
१८ त्या दिवशी बहिरे त्या पुस्तकातले शब्द ऐकतील,
आणि आंधळे काळोखातून व अंधारातून मुक्त होऊन पाहू लागतील.+
१९ नम्र लोक यहोवामुळे खूप आनंदी होतील,
आणि गरीब लोक इस्राएलच्या पवित्र देवामुळे हर्ष करतील.+
२० कारण जुलूम करणारा राहणार नाही,
फुशारकी मारणाऱ्याचं नामोनिशाण मिटेल,
आणि इतरांचं वाईट करण्यासाठी टपून बसलेल्या सर्वांचा नाश होईल.+
२१ जे खोटं बोलून इतरांना दोषी ठरवतात,
शहराच्या दरवाजाजवळ न्याय मागणाऱ्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात,+
आणि पोकळ युक्तिवाद करून नीतिमान माणसाला न्याय देत नाहीत,+ अशा सगळ्यांचा नाश होईल.
२२ म्हणून ज्याने अब्राहामला सोडवलं,+ तो यहोवा देव याकोबच्या घराण्याला असं म्हणतो:
२३ कारण तो जेव्हा माझ्या हातच्या कृत्यांना,
त्याच्या मुलांना आपल्यामध्ये एकत्र झालेलं पाहील,+
तेव्हा ते माझ्या नावाचा आदर करतील.
हो, ते याकोबच्या पवित्र देवाचा आदर करतील,
आणि इस्राएलच्या देवाचं भय बाळगतील.+
२४ ज्यांचं मन भरकटलंय ते समजबुद्धी मिळवतील,
आणि कुरकुर करणारे शिक्षण स्वीकारतील.”