यशया
२० अश्शूरचा राजा सर्गोन याने ज्या वर्षी तर्तानला* अश्दोदला+ पाठवलं, त्याच वर्षी तर्तानने अश्दोदवर हल्ला करून ते काबीज केलं.+ २ त्या वेळी यहोवा आमोजचा मुलगा यशया+ याला म्हणाला: “जा, आपल्या कमरेला गुंडाळलेलं गोणपाट आणि पायांतले जोडे काढून टाक.” तेव्हा यशयाने तसंच केलं; तो उघडा* आणि अनवाणी चालू लागला.
३ यहोवा मग म्हणाला: “ज्याप्रमाणे माझा सेवक यशया, इजिप्तसाठी+ आणि इथियोपियासाठी+ चिन्ह+ आणि इशारा म्हणून तीन वर्षं उघडा व अनवाणी चालला, ४ त्याचप्रमाणे, अश्शूरचा राजा इजिप्तच्या आणि इथियोपियाच्या लोकांना, त्यांच्या सगळ्या तरुणांना आणि म्हाताऱ्यांना बंदी बनवून उघडं आणि अनवाणी घेऊन जाईल.+ तो त्यांच्या कमरेखालच्या कपड्यांचा मागचा भाग कापून त्यांना घेऊन जाईल. अशा प्रकारे तो इजिप्तला बेअब्रू* करेल. ५ तेव्हा इथियोपियावर भरवसा ठेवणाऱ्या आणि इजिप्तवर गर्व करणाऱ्या* सगळ्यांचा थरकाप उडेल आणि त्यांना त्या देशांची लाज वाटेल. ६ त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरचे रहिवासी म्हणतील: ‘आपण ज्याच्यावर भरवसा ठेवला होता आणि अश्शूरच्या राजापासून वाचायला आपण मदतीसाठी ज्याच्याकडे धाव घेतली होती, त्याचं काय झालं बघा! आता आपल्याला कोण वाचवणार?’”