उपदेशक
९ या सर्व गोष्टींवर मी विचार केला आणि अशा निष्कर्षावर आलो, की नीतिमान आणि बुद्धिमान लोक, तसंच, त्यांची कार्यं खऱ्या देवाच्या हातात असतात.+ माणसांना आपल्याआधी होऊन गेलेल्या लोकांच्या प्रेमाबद्दल आणि द्वेषाबद्दल माहीत नसतं. २ नीतिमान आणि दुष्ट,+ चांगले, शुद्ध आणि अशुद्ध, बलिदान करणारे आणि बलिदान न करणारे, या सर्वांचा शेवट सारखाच असतो.+ चांगला माणूस हा पापी माणसासारखाच असतो; शपथ घेणारा हा शपथ घेण्याबद्दल सावध असलेल्या माणसासारखाच असतो. ३ सूर्याखाली एक दुःखाची गोष्ट घडते: सर्वांचा शेवट सारखाच असल्यामुळे,+ माणसांचं मन वाइटाने भरलेलं असतं. आयुष्यभर त्यांच्या मनात वेडेपणा असतो आणि शेवटी ते मरून जातात!*
४ जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याला आशा असते, कारण मेलेल्या सिंहापेक्षा जिवंत कुत्रा बरा.+ ५ आपण मरणार हे जिवंतांना माहीत असतं,*+ पण मेलेल्यांना तर काहीच माहीत नसतं;+ तसंच त्यांच्यासाठी कोणतंही प्रतिफळ* नसतं, कारण कोणालाही त्यांची आठवण राहत नाही.+ ६ शिवाय त्यांचं प्रेम, त्यांचा द्वेष आणि त्यांचे हेवेदावे संपलेले असतात; सूर्याखाली घडणाऱ्या गोष्टींमध्ये त्यांचा काहीच वाटा नसतो.+
७ आनंदाने जाऊन आपलं अन्न खा आणि खूश होऊन आपला द्राक्षारस पी,+ कारण खरा देव तुझ्या कार्यांवर संतुष्ट आहे.+ ८ नेहमी पांढरेशुभ्र* कपडे घाल आणि डोक्याला तेल लावायला विसरू नकोस.+ ९ देवाने तुला सूर्याखाली दिलेल्या तुझ्या थोड्याशा आयुष्यात, आपल्या प्रिय बायकोसोबत जीवनाचा आनंद घे.+ कारण सूर्याखाली तू करत असलेल्या सगळ्या मेहनतीबद्दल, तुझ्या थोड्याशा आयुष्यात तुला मिळालेला हा वाटा आहे.+ १० तुझ्या हातांना जे काही काम मिळेल, ते मन लावून कर. कारण ज्या कबरेकडे* तू जात आहेस, तिथे कोणतंही काम, योजना, ज्ञान किंवा बुद्धी नाही.+
११ सूर्याखाली मी आणखी एक गोष्ट पाहिली आहे: जे वेगवान असतात, ते नेहमीच शर्यत जिंकत नाहीत; जे शक्तिशाली असतात, ते नेहमीच युद्ध जिंकत नाहीत;+ जे बुद्धिमान असतात, त्यांना नेहमीच अन्न मिळत नाही; जे हुशार असतात, त्यांना नेहमीच संपत्ती लाभत नाही+ आणि जे ज्ञानी असतात, त्यांना नेहमीच यश मिळत नाही,+ कारण वेळ आणि अनपेक्षित घटना त्या सर्वांसोबत घडतात. १२ कारण माणसाला त्याची वेळ माहीत नसते.+ मासे जसे जीवघेण्या जाळ्यात आणि पक्षी जसे पाशात अडकतात, तशीच माणसंसुद्धा संकटाच्या काळात, अचानक कोसळणाऱ्या विपत्तीत सापडतात.
१३ सूर्याखाली मी बुद्धीबद्दल आणखी एक गोष्ट पाहिली आणि मला ती फार लक्षवेधक वाटली: १४ एक लहानसं शहर होतं आणि त्यात थोडीच माणसं राहत होती. मग एका शक्तिशाली राजाने त्या शहरावर हल्ला करून, चारही बाजूंनी त्याला वेढा घातला. १५ त्या शहरात एक गरीब, पण बुद्धिमान माणूस राहत होता. त्याने आपल्या बुद्धिमत्तेने शहराला वाचवलं. पण कोणालाही त्या गरीब माणसाची आठवण राहिली नाही.+ १६ तेव्हा मी मनात म्हणालो: ‘बुद्धी शक्तीपेक्षा श्रेष्ठ असते;+ पण, गरीब माणसाची बुद्धी तुच्छ लेखली जाते आणि त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नाही.’+
१७ मूर्खांच्या राजाचा आरडाओरडा ऐकण्यापेक्षा, बुद्धिमान माणसाने शांतपणे बोललेल्या शब्दांकडे लक्ष देणं बरं.
१८ युद्धाच्या शस्त्रांपेक्षा बुद्धी बरी; पण, एक पापी माणूस पुष्कळ चांगल्या गोष्टींचा नाश करू शकतो.+