उपदेशक
१० जसं मेलेल्या माशांमुळे, सुगंधित तेलाला दुर्गंधी आणि फेस येतो, तसंच थोड्याशा मूर्खपणामुळे, बुद्धीचा आणि सन्मानाचा नाश होतो.+
२ बुद्धिमानाचं मन त्याला योग्य मार्गाने नेतं,* पण मूर्खाचं मन त्याला चुकीच्या मार्गाने नेतं.*+ ३ मूर्ख कोणत्याही मार्गाने चालला तरी त्याच्याजवळ शहाणपण नसतं;+ तो आपला मूर्खपणा सर्वांना दाखवून देतो.+
४ शासकाचा क्रोध* तुझ्यावर भडकला, तरीही आपली जागा सोडू नकोस,+ कारण शांततेमुळे मोठी पापं टळतात.+
५ मी सूर्याखाली एक दुःखाची गोष्ट पाहिली आहे. सत्तेवर असणारे सहसा ही चूक करतात:+ ६ मूर्खांना उच्च पदांवर बसवलं जातं, पण योग्यता असलेले* खालच्या पदांवर राहतात.
७ मी सेवकांना घोड्यावर बसलेलं आणि अधिकाऱ्यांना सेवकांसारखं पायी चालताना पाहिलं आहे.+
८ खड्डा खोदणारा स्वतःच त्यात पडू शकतो;+ भिंत फोडणाऱ्याला साप चावू शकतो.
९ खडक फोडणाऱ्याला त्यांमुळे इजा होऊ शकते; आणि लाकूड तोडणाऱ्याच्या जिवाला धोका असतो.*
१० लोखंडाच्या बोथट हत्याराला धार लावली नाही, तर ते चालवणाऱ्याला खूप जोर लावावा लागेल. पण बुद्धीमुळे यश मिळतं.
११ सापाला वश करण्याआधी जर तो चावला, तर गारुड्याच्या कौशल्याचा काय फायदा?
१२ बुद्धिमानाच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांमुळे त्याच्यावर कृपा होते,+ पण मूर्खाच्या ओठांतून निघणारे शब्द त्याचा नाश करतात.+ १३ त्याच्या तोंडून निघणारे सुरुवातीचे शब्द मूर्खपणाचे असतात+ आणि त्याचे शेवटचे शब्द वेडेपणाचे आणि नुकसानकारक असतात. १४ तरी तो मूर्ख बोलतच राहतो.+
पुढे काय घडेल हे माणसाला माहीत नसतं; मग तो गेल्यावर काय होईल, हे त्याला कोण सांगू शकतं?+
१५ मूर्खाची मेहनत त्याला दमवून टाकते, कारण त्याला शहराकडे जाणारा रस्ताही शोधता येत नाही.
१६ ज्या देशाचा राजा लहान मुलगा आहे+ आणि जिथले अधिकारी सकाळीच मेजवानी सुरू करतात, त्या देशाची किती दुर्दशा होईल! १७ पण, ज्या देशाचा राजा उच्च घराण्यातला असतो आणि जिथले अधिकारी धुंद होण्यासाठी नाही,+ तर ताकद मिळण्यासाठी योग्य वेळी खातात-पितात, तो देश सुखी होतो!
१८ खूप आळशीपणामुळे घराचं छत वाकतं आणि रिकामटेकड्या हातांमुळे घर गळायला लागतं.+
१९ अन्नामुळे* मन आनंदी होतं आणि द्राक्षारसामुळे जीवनात मौज येते;+ पण पैशांमुळे प्रत्येक गरज पूर्ण होते.+
२० मनातल्या मनातही* कधी राजाला शाप देऊ नकोस+ आणि तुझ्या झोपायच्या खोलीत श्रीमंतांना शाप देऊ नकोस; नाहीतर एखादा पक्षी* तुझे शब्द* त्यांच्यापर्यंत नेईल किंवा एखादं पाखरू त्या गोष्टी त्यांना जाऊन सांगेल.