निर्गम
९ मग यहोवा मोशेला म्हणाला: “फारोकडे जाऊन त्याला असं सांग, ‘इब्री लोकांचा देव यहोवा म्हणतो: “माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील.+ २ पण जर तू त्यांना अडवलंस आणि जाऊ दिलं नाहीस, ३ तर बघ! यहोवाचा हात+ तुझ्या जनावरांविरुद्ध उठेल. तुझ्या घोड्यांवर, गाढवांवर, उंटांवर, गुराढोरांवर आणि मेंढरांवर भयानक पीडा येईल.+ ४ यहोवा इस्राएलच्या आणि इजिप्तच्या जनावरांमध्ये नक्कीच फरक करेल. इस्राएली लोकांचं एकही जनावर मरणार नाही.”’”+ ५ मग यहोवाने एक वेळही ठरवली आणि तो म्हणाला: “उद्या यहोवा या देशात असं करेल.”
६ यहोवाने दुसऱ्याच दिवशी तसं केलं. इजिप्तची सगळी जनावरं मरू लागली,+ पण इस्राएलच्या जनावरांपैकी एकही मेलं नाही. ७ फारोने चौकशी केली तेव्हा इस्राएलच्या जनावरांपैकी एकही मेलं नव्हतं. तरीही फारोचं मन हट्टीच राहिलं आणि त्याने लोकांना जाऊ दिलं नाही.+
८ मग यहोवाने मोशे आणि अहरोन यांना म्हटलं: “तुमच्या दोन्ही हातांमध्ये भट्टीतली राख घ्या आणि मोशे ती राख फारोसमोर हवेत फेकेल. ९ त्या राखेची संपूर्ण इजिप्त देशात बारीक धूळ होईल आणि त्या धुळीचे देशातल्या प्रत्येक माणसावर आणि जनावरावर फोड* होतील.”
१० तेव्हा त्यांनी भट्टीतून राख घेतली आणि ते फारोसमोर उभे राहिले. मग मोशेने ती राख हवेत फेकली आणि त्या राखेचे माणसांवर आणि जनावरांवर फोड येऊ लागले. ११ फोड आल्यामुळे मंत्रतंत्र करणारे पुजारी मोशेसमोर उभे राहू शकले नाहीत. त्यांना आणि इजिप्तच्या सर्व लोकांना फोड आले होते.+ १२ पण यहोवाने फारोचं मन कठोर होऊ दिलं. यहोवाने मोशेला सांगितलं होतं, त्याप्रमाणे फारोने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.+
१३ मग यहोवा मोशेला म्हणाला: “पहाटे ऊठ आणि फारोसमोर जाऊन त्याला असं सांग, ‘इब्री लोकांचा देव यहोवा म्हणतो: “माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील. १४ आता मी माझे सगळे वार तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर आणि तुझ्या लोकांवर करीन, म्हणजे तुला कळेल की सगळ्या पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही.+ १५ आतापर्यंत मी माझा हात उगारून तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर भयानक पीडा आणली असती आणि या पृथ्वीवरून तुझा पूर्णपणे नाश केला असता. १६ पण, तुला माझी ताकद दाखवण्यासाठी आणि माझं नाव संपूर्ण पृथ्वीवर जाहीर करण्यासाठी, मी तुला अजून जिवंत ठेवलं आहे.+ १७ माझ्या लोकांना अडवून, तू त्यांच्याशी अजूनही मगरूरपणे वागत आहेस का? १८ बघ, उद्या याच वेळी मी गारांचा पाऊस पाडीन. इजिप्त देश निर्माण झाल्यापासून आजपर्यंत कधीच असा पाऊस पडला नसेल! १९ म्हणून शेतात असलेली तुझी सगळी जनावरं आणि इतर सर्वकाही आत घेऊन ये. त्यांना जर आत आणलं नाहीस, तर जेव्हा गारा पडतील तेव्हा शेतात असलेला प्रत्येक माणूस आणि जनावर मरून जाईल.”’”
२० फारोच्या सेवकांपैकी ज्यांनी यहोवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला,* त्यांनी लगेच आपल्या सेवकांना आणि आपल्या जनावरांना घरांमध्ये आणलं. २१ पण ज्यांनी यहोवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही, त्यांनी आपल्या सेवकांना आणि जनावरांना शेतातच राहू दिलं.
२२ मग यहोवा मोशेला म्हणाला: “आपला हात आकाशाकडे उगार, म्हणजे संपूर्ण इजिप्त देशातल्या माणसांवर, जनावरांवर आणि सगळ्या झाडाझुडपांवर गारांचा पाऊस पडेल.”+ २३ तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाच्या दिशेने उगारली आणि यहोवाने ढगांचा गडगडाट करून गारांचा पाऊस पाडला आणि जमिनीवर आग* पडू लागली. यहोवाने इजिप्तच्या संपूर्ण देशात गारांचा पाऊस पाडला. २४ गारांचा पाऊस पडत असताना, आगीच्या ज्वाला दिसत होत्या. पाऊस इतका मोठा होता, की इजिप्त देश निर्माण झाल्यापासून कधीच असा पाऊस पडला नव्हता.+ २५ इजिप्त देशात गारांचा पाऊस पडल्यामुळे, शेतांत असलेल्या माणसांचा, जनावरांचा, पिकांचा आणि झाडाझुडपांचा नाश झाला.+ २६ फक्त इस्राएली लोक राहत असलेल्या गोशेन प्रांतात गारा पडल्या नाहीत.+
२७ तेव्हा फारोने मोशे आणि अहरोन यांना बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “या वेळी मी पाप केलं आहे. मी आणि माझे लोक चुकलो, पण यहोवा नीतिमान आहे. २८ हा गडगडाट आणि गारा थांबवण्यासाठी यहोवाला विनंती करा. मग मी तुम्हाला जाऊ देईन आणि तुम्हाला इथे थोडा वेळही थांबण्याची गरज नाही.” २९ तेव्हा मोशे त्याला म्हणाला: “शहराबाहेर जाताच मी यहोवाकडे हात पसरून विनंती करीन आणि हा गडगडाट आणि गारांचा पाऊस थांबेल. यावरून तुम्हाला कळेल, की ही पृथ्वी यहोवाची आहे.+ ३० पण मला माहीत आहे, की तुम्ही आणि तुमचे सेवक यानंतरही यहोवा देवाला घाबरणार नाही.”
३१ तेव्हा, अळशीच्या* आणि जवाच्या पिकांचा नाश झाला, कारण जवाला कणसं आली होती आणि अळशीला कळ्या आल्या होत्या. ३२ पण गव्हाचं* पीक उशिरा* येत असल्यामुळे त्याचा नाश झाला नव्हता. ३३ मग मोशे फारोसमोरून निघून शहराबाहेर गेला आणि त्याने यहोवासमोर हात पसरून त्याला विनंती केली. त्यानंतर गडगडाट बंद झाला आणि पृथ्वीवर गारांचा पाऊस पडायचा थांबला.+ ३४ गडगडाट बंद झाला आहे आणि गारांचा पाऊस थांबला आहे, हे पाहून फारोने आणि त्याच्या सेवकांनी पुन्हा आपलं मन कठोर करून पाप केलं.+ ३५ अशा रितीने फारोचं मन कठोरच राहिलं आणि यहोवाने मोशेद्वारे जसं सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.+