निर्गम
८ मग यहोवा मोशेला म्हणाला: “फारोकडे जाऊन त्याला सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील.+ २ तू त्यांना जाऊ द्यायला नकार देत राहिलास, तर मी तुझ्या सगळ्या प्रदेशावर बेडकांची पीडा आणीन.+ ३ नाईल नदी बेडकांनी भरून जाईल आणि ते तिथून तुझ्या घरात, झोपण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणात, तुझ्या सेवकांच्या घरांमध्ये, तुझ्या भट्ट्यांमध्ये आणि पीठ मळण्याच्या परातींमध्ये* शिरतील.+ ४ ते तुला, तुझ्या लोकांना आणि तुझ्या सगळ्या सेवकांना हैराण करून सोडतील.”’”
५ नंतर यहोवा मोशेला म्हणाला: “अहरोनला सांग, ‘तुझी काठी घेऊन नद्यांवर, नाईलच्या नाल्यांवर आणि तलावांवर तुझा हात उगार, म्हणजे त्यांमधून संपूर्ण इजिप्त देशात बेडूक येतील.’” ६ तेव्हा, अहरोनने इजिप्तच्या सगळ्या जलाशयांवर आपला हात उगारला आणि त्यांमधून बेडूक बाहेर येऊ लागले आणि संपूर्ण इजिप्त देश बेडकांनी भरून गेला. ७ पण, मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनीही आपल्या गुप्त विद्येने तसंच करून इजिप्त देशात बेडूक आणले.+ ८ मग फारोने मोशे आणि अहरोन यांना बोलावून म्हटलं: “मला आणि माझ्या लोकांना या बेडकांपासून सुटका मिळावी म्हणून यहोवाला विनंती कर.+ तुमच्या लोकांना यहोवाला बलिदान देता यावं, म्हणून मी त्यांना जाऊ द्यायला तयार आहे.” ९ यावर मोशे फारोला म्हणाला: “तुमच्यापासून, तुमच्या सेवकांपासून, तुमच्या लोकांपासून आणि तुमच्या घरांमधून बेडूक निघून जावेत अशी विनंती मी कधी करावी, हे सांगण्याचा मान मी तुम्हाला देतो. मग फक्त नाईल नदीतच बेडूक उरतील.” १० तेव्हा फारो म्हणाला: “उद्या.” मग मोशे म्हणाला: “तुम्ही म्हणता तसंच होईल आणि यावरून तुम्हाला कळेल, की आमचा देव यहोवा याच्यासारखा दुसरा कोणी नाही.+ ११ तुमच्यापासून, तुमच्या सेवकांपासून, तुमच्या लोकांपासून आणि तुमच्या घरांमधून बेडूक निघून जातील आणि ते फक्त नाईल नदीतच उरतील.”+
१२ तेव्हा मोशे आणि अहरोन फारोसमोरून निघून गेले. यहोवाने फारोवर आणलेली बेडकांची पीडा काढून टाकण्यासाठी मोशेने त्याला विनंती केली.+ १३ मग यहोवाने मोशेची विनंती ऐकली आणि घरांमधले, अंगणांमधले आणि शेतांमधले सगळे बेडूक मरू लागले. १४ लोकांनी ते गोळा करून त्यांचे पुष्कळ ढीग केले आणि सगळ्या देशात घाण वास सुटला. १५ आपली सुटका झाली आहे, हे पाहिल्यावर फारोने पुन्हा आपलं मन कठोर केलं.+ यहोवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.
१६ मग यहोवा मोशेला म्हणाला: “अहरोनला सांग, ‘आपली काठी उगारून ती जमिनीच्या धुळीवर मार, म्हणजे त्या धुळीची संपूर्ण इजिप्त देशात चिलटं* होतील.’” १७ त्यांनी तसंच केलं. अहरोनने आपल्या हातातली काठी उगारून, ती जमिनीच्या धुळीवर मारली. तेव्हा इजिप्तच्या संपूर्ण देशातल्या धुळीची चिलटं होऊन, ती सगळ्या माणसांना आणि प्राण्यांना त्रास देऊ लागली.+ १८ मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनीही आपल्या गुप्त विद्येने चिलटं बनवण्याचा प्रयत्न केला,+ पण त्यांना ते जमलं नाही आणि सगळ्या माणसांना आणि प्राण्यांना चिलटं हैराण करू लागली. १९ तेव्हा मंत्रतंत्र करणारे पुजारी फारोला म्हणाले: “यामागे देवाचा हात* आहे!”+ पण फारोचं मन कठोरच राहिलं आणि यहोवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.
२० मग यहोवा मोशेला म्हणाला: “पहाटे ऊठ आणि फारो जेव्हा नदीकडे जाईल, तेव्हा त्याच्यासमोर जाऊन उभा राहा. त्याला असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील. २१ पण, तू त्यांना जाऊ दिलं नाहीस, तर मी तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या लोकांवर आणि तुमच्या घरांमध्ये गोमाश्या* पाठवीन. इजिप्तची सगळी घरं गोमाश्यांनी भरून जातील. इतकंच काय, तर ते* राहतात ती सगळी जमीनही गोमाश्यांनी झाकून जाईल. २२ त्या दिवशी मी जे करीन, त्यामुळे माझे लोक राहतात तो गोशेन प्रांत वेगळा दिसेल. तिथे एकही गोमाशी नसेल+ आणि यावरून तुला कळेल की मी यहोवा, या देशात आहे.+ २३ अशा रितीने, मी माझ्या आणि तुझ्या लोकांमध्ये फरक करीन. हे चिन्ह उद्या घडेल.”’”
२४ यहोवाने तसंच केलं. गोमाश्यांचे थवेच्या थवे फारोच्या आणि त्याच्या सेवकांच्या घरांमध्ये, तसंच, संपूर्ण इजिप्त देशात शिरले;+ आणि त्यांनी सगळ्या देशाची नासधूस केली.+ २५ शेवटी फारोने मोशे आणि अहरोन यांना बोलावून म्हटलं: “जा, तुमच्या देवाला याच देशात बलिदान अर्पण करा.” २६ पण मोशे म्हणाला: “आम्ही असं करू शकत नाही, कारण आम्ही आमचा देव, यहोवा याला जी बलिदानं अर्पण करू, ती इजिप्तच्या लोकांना किळसवाणी वाटतील.+ जर आम्ही त्यांच्यादेखत त्यांना किळसवाणी वाटणारी बलिदानं अर्पण केली, तर ते आम्हाला दगडमार करतील. २७ आम्ही तीन दिवस प्रवास करून ओसाड रानात जाऊ आणि आमचा देव यहोवा याने सांगितल्याप्रमाणे, तिथे त्याला बलिदानं अर्पण करू.”+
२८ तेव्हा फारो म्हणाला: “तुमचा देव यहोवा याला बलिदानं अर्पण करण्यासाठी, मी तुम्हाला ओसाड रानात जाऊ देईन. पण फार लांब जाऊ नका. माझ्या वतीने तुमच्या देवाला विनंती करा.”+ २९ यावर मोशे म्हणाला: “आता मी जातो आणि यहोवाला विनंती करतो. मग उद्या फारोपासून, तुमच्या सेवकांपासून आणि तुमच्या लोकांपासून गोमाश्या निघून जातील. पण यहोवाला बलिदान अर्पण करायला जाण्यापासून अडवून, फारोने आम्हाला फसवू नये.”+ ३० मग मोशे फारोसमोरून निघून गेला आणि त्याने यहोवाला विनंती केली.+ ३१ तेव्हा यहोवाने मोशेची विनंती ऐकली आणि फारोपासून, त्याच्या सेवकांपासून आणि त्याच्या लोकांपासून गोमाश्या निघून गेल्या. एकही गोमाशी उरली नाही. ३२ पण फारोने पुन्हा आपलं मन कठोर केलं आणि त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.