एस्तेर
८ त्या दिवशी अहश्वेरोश राजाने यहुद्यांच्या शत्रूची,+ हामानची+ सगळी मालमत्ता एस्तेर राणीच्या हवाली केली. मर्दखयसुद्धा राजापुढे आला, कारण त्याचं आपल्याशी काय नातं आहे हे एस्तेरने राजाला सांगितलं होतं.+ २ मग राजाने हामानकडून काढून घेतलेली मुद्रेची अंगठी+ मर्दखयला दिली. आणि एस्तेरने मर्दखयला हामानच्या सगळ्या मालमत्तेवर अधिकारी नेमलं.+
३ एस्तेर पुन्हा राजाशी बोलण्यासाठी त्याच्याकडे गेली आणि त्याच्या पायांजवळ पडून रडायला लागली. यहुद्यांचा नाश करण्यासाठी अगागी हामानने केलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी, अशी विनवणी ती राजाकडे करू लागली.+ ४ तेव्हा राजाने आपला सोन्याचा राजदंड एस्तेरपुढे धरला.+ मग ती उठून राजासमोर उभी राहिली. ५ ती म्हणाली: “राजा माझ्यावर प्रसन्न असेल आणि माझ्यावर राजाची कृपा असेल तर त्यांनी माझी विनंती ऐकावी. राजाला जर योग्य वाटत असेल, तर त्यांनी एक लेखी फर्मान काढावं. आणि अगागी+ हम्मदाथाच्या मुलाने, म्हणजे कटकारस्थान रचणाऱ्या त्या हामानने राजाच्या सर्व प्रांतांतल्या यहुद्यांचा नाश करण्यासाठी जी पत्रं पाठवलीत ती रद्द करावीत.+ ६ कारण माझ्या लोकांवर ओढवलेलं संकट मी कसं सहन करू? आणि माझ्या नातेवाइकांचा होणारा नाश मी उघड्या डोळ्यांनी कसा पाहू?”
७ त्यावर अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहुदी मर्दखयला म्हणाला: “हामानने यहुद्यांना संपवण्याचा कट रचला. म्हणून बघा, मी त्याची सगळी मालमत्ता एस्तेरच्या हवाली केली+ आणि त्याला वधस्तंभावर लटकवलं.+ ८ आता यहुद्यांसाठी तुम्हाला जे योग्य वाटतं ते राजाच्या नावाने लिहा आणि त्यावर राजमुद्रेच्या अंगठीची मोहर लावा. कारण राजाच्या नावाने लिहिलेलं आणि त्याच्या मुद्रेच्या अंगठीची मोहर असलेलं फर्मान रद्द करता येत नाही.”+
९ त्यामुळे राजाच्या सचिवांना तिसऱ्या महिन्याच्या, म्हणजे शिवान* महिन्याच्या २३ व्या दिवशी बोलावण्यात आलं. आणि मर्दखयने यहुद्यांसाठी, सुभेदारांसाठी,+ राज्यपालांसाठी, तसंच हिंदुस्थानापासून इथियोपियापर्यंत १२७ प्रांतांतल्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी+ जे आदेश दिले ते त्यांनी लिहून काढले. त्यांनी प्रत्येक प्रांतातल्या लोकांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत पत्रं लिहिली. त्यांनी यहुद्यांनाही त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत पत्रं लिहिली.
१० मर्दखयने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रं लिहिली आणि त्यावर राजमुद्रेच्या अंगठीची+ मोहर लावली. मग त्याने ती पत्रं दूतांच्या हातून पाठवली. ते दूत राजाच्या सेवेसाठी असलेल्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांवर स्वार होऊन गेले. ११ त्या पत्रांमध्ये राजाने सगळ्या शहरांतल्या यहुद्यांना अशी परवानगी दिली होती, की त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी एकत्र यावं. आणि कोणत्याही प्रांतातल्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, तर त्या सगळ्यांना त्यांच्या बायका-मुलांसह मारून टाकावं; त्यांचा समूळ नाश करावा आणि त्यांची मालमत्ता लुटावी.+ १२ हे सगळं अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत एकाच दिवशी, म्हणजे अदार* या १२ व्या महिन्याच्या १३ व्या दिवशी होणार होतं.+ १३ पत्रांतल्या माहितीला कायद्याचं स्वरूप देऊन सगळ्या प्रांतांत लागू करायचं होतं. आणि सर्व लोकांमध्ये त्याची घोषणा करायची होती. म्हणजे यहुदी लोक आपल्या शत्रूंचा बदला घेण्यासाठी+ त्या दिवशी तयार राहतील. १४ राजाच्या आज्ञेवरून त्याचे दूत त्याच्या सेवेसाठी असलेल्या घोड्यांवर स्वार होऊन लगेच निघाले. हा कायदा शूशन*+ राजवाड्यातही देण्यात आला.
१५ नंतर मर्दखय राजासमोरून निघून गेला. त्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगाची शाही वस्त्रं घातली होती. त्याच्या डोक्यावर सोन्याचा वैभवी मुकुट असून त्याने उत्तम प्रतीच्या लोकरीचा जांभळ्या रंगाचा झगाही घातला होता.+ शूशन* शहरातल्या लोकांनी आनंदोत्सव केला. १६ यहुद्यांना आशा* मिळाली होती. त्यांनी आनंदित होऊन जल्लोष केला, आणि त्यांना मानसन्मान मिळाला. १७ ज्या-ज्या प्रांतांत आणि ज्या-ज्या शहरांत राजाचं फर्मान आणि त्याचा हुकूम पोहोचला, तिथल्या यहुद्यांना अतिशय आनंद झाला. ते मेजवान्या करून उत्सव करू लागले. आणि त्या देशातले अनेक लोक यहुदी बनले,+ कारण त्यांना यहुदी लोकांची दहशत बसली होती.