२ इतिहास
३२ हिज्कीयाने या सगळ्या गोष्टी विश्वासूपणे पूर्ण केल्यानंतर,+ अश्शूरचा राजा सन्हेरीब याने येऊन यहूदावर हल्ला केला. तिथल्या तटबंदीच्या शहरांत घुसून ती काबीज करण्यासाठी त्याने त्या शहरांना वेढा घातला.+
२ हिज्कीयाने जेव्हा पाहिलं, की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमवर हल्ला करण्याचा त्याचा विचार आहे, ३ तेव्हा त्याने अधिकाऱ्यांशी आणि योद्ध्यांशी सल्लामसलत करून शहराबाहेर असलेले पाण्याचे झरे बुजवून टाकायचं ठरवलं.+ आणि या बाबतीत त्यांनी त्याला साथ दिली. ४ मग बरेच लोक एकत्र जमले आणि त्यांनी त्या प्रदेशातून वाहणारे सगळे झरे आणि ओढे बुजवून टाकले. ते म्हणाले: “अश्शूरचे राजे आले, तर त्यांना इथे पाणी मिळायला नको.”
५ शिवाय, शहराच्या भिंतीचा जो भाग पडला होता तो बांधून काढण्याचाही हिज्कीयाने निश्चय केला. त्याने तो सगळा भाग पुन्हा बांधून काढला आणि त्यावर बुरूज बांधले. तसंच, त्याने बाहेरच्या बाजूने आणखी एक भिंत उभी केली. यासोबतच, हिज्कीयाने दावीदपुरात असलेली टेकडीही* दुरुस्त केली.+ आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रं व ढाली बनवल्या. ६ त्यानंतर, त्याने लोकांवर सेनाधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या दरवाजाजवळ असलेल्या चौकात एकत्र जमवलं. मग त्यांना धीर देत तो म्हणाला: ७ “हिंमत धरा! खंबीर व्हा! अश्शूरच्या राजाला आणि त्याच्या सैन्याला घाबरू नका किंवा भिऊ नका.+ कारण त्याच्यासोबत जितके आहेत त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत.+ ८ त्याचा भरवसा मनुष्याच्या बळावर आहे, पण आपला भरवसा आपला देव यहोवा याच्यावर आहे. तोच आपल्याला मदत करेल आणि आपल्यासाठी लढेल.”+ तेव्हा लोकांना यहूदाचा राजा हिज्कीया याच्या शब्दांमुळे हिंमत मिळाली.+
९ अश्शूरचा राजा सन्हेरीब हा आपलं सगळं सैन्यबळ घेऊन लाखीशमध्ये+ होता, तेव्हा त्याने आपल्या सेवकांच्या हातून यरुशलेममध्ये यहूदाचा राजा हिज्कीया याला आणि तिथल्या सगळ्या यहुदी लोकांना असा निरोप पाठवला:+
१० “अश्शूरचा राजा सन्हेरीब म्हणतो: ‘यरुशलेमला वेढा पडलेला असताना, तुम्ही कोणाच्या भरवशावर तिथे राहताय?+ ११ हिज्कीया तुम्हाला फसवतोय. “आपला देव यहोवा आपल्याला अश्शूरच्या राजाच्या हातून वाचवेल,” असं सांगून तो तुम्हाला भुकेने आणि तहानेने मरायला लावतोय.+ १२ हा तोच हिज्कीया आहे ना, ज्याने तुमच्या देवाची उच्च स्थानं+ आणि वेदी काढून टाकल्या?+ आणि मग यहूदाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना म्हणाला, की “तुम्ही फक्त एकाच वेदीपुढे नमन केलं पाहिजे आणि त्यावरच बलिदानांचं हवन केलं पाहिजे”?+ १३ मी आणि माझ्या पूर्वजांनी इतर देशांच्या लोकांचं काय केलं, हे तुम्हाला माहीत नाही का?+ त्या देशांतल्या लोकांचे देव त्यांना माझ्या हातून वाचवू शकले का?+ १४ माझ्या पूर्वजांनी ज्या राष्ट्रांचा सर्वनाश केला, त्या राष्ट्रांतला कोणताही देव त्याच्या लोकांना माझ्या हातून वाचवू शकला नाही. मग तुमचा देव तुम्हाला माझ्या तावडीतून कसा काय वाचवू शकेल?+ १५ हिज्कीयाला तुमची फसवणूक किंवा दिशाभूल करू देऊ नका!+ त्याच्यावर भरवसा ठेवू नका. कारण कोणत्याही राष्ट्राचा किंवा राज्याचा देव त्याच्या लोकांना माझ्या आणि माझ्या पूर्वजांच्या हातून सोडवू शकलेला नाही. तर मग तुमचा देव कसा काय तुम्हाला माझ्या हातून सोडवेल?’”+
१६ सन्हेरीबच्या सेवकांनी तर खरा देव यहोवा आणि त्याचा सेवक हिज्कीया यांची आणखीनच जास्त निंदा केली. १७ सन्हेरीबने इस्राएलचा देव यहोवा याची निंदा करण्यासाठी+ आणि त्याच्या विरोधात बोलण्यासाठी पत्रंही लिहिली.+ त्यात तो म्हणाला: “इतर देशांचे देव जसं त्यांच्या लोकांना माझ्या हातून सोडवू शकले नाहीत,+ तसंच हिज्कीयाचा देवसुद्धा त्याच्या लोकांना माझ्या हातून सोडवू शकणार नाही.” १८ सन्हेरीबचे सेवक यरुशलेम शहराच्या भिंतीवर असलेल्या लोकांशी, मोठमोठ्याने यहुदी लोकांच्या भाषेत बोलत राहिले. लोकांना घाबरवण्याचा आणि त्यांच्या मनात दहशत निर्माण करून शहर काबीज करण्याचा त्यांचा हेतू होता.+ १९ ते पृथ्वीवरच्या राष्ट्रांच्या देवांबद्दल, म्हणजे माणसांनी बनवलेल्या देवांबद्दल जसं वाईट बोलले, तसंच यरुशलेमच्या देवाबद्दल बोलले. २० पण हिज्कीया राजा आणि आमोजचा मुलगा, म्हणजे यशया संदेष्टा+ हे दोघं याविषयी स्वर्गातल्या देवाकडे प्रार्थना करत राहिले आणि त्याच्याकडे मदतीसाठी धावा करत राहिले.+
२१ मग यहोवाने एक स्वर्गदूत पाठवला आणि अश्शूरच्या राजाच्या छावणीतल्या प्रत्येक शूर योद्ध्याला, प्रमुखाला आणि अधिकाऱ्याला मारून टाकलं.+ म्हणून अश्शूरचा राजा अपमानित होऊन आपल्या देशात परत गेला. नंतर जेव्हा तो त्याच्या देवाच्या मंदिरात गेला, तेव्हा त्याच्या स्वतःच्याच काही मुलांनी त्याला तलवारीने मारून टाकलं.+ २२ अशा प्रकारे, यहोवाने हिज्कीयाला आणि यरुशलेमच्या सगळ्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या हातून वाचवलं. तसंच, त्याने आजूबाजूच्या सर्व शत्रूंपासूनही त्यांना सोडवलं आणि विसावा दिला. २३ मग पुष्कळ लोकांनी यरुशलेममध्ये यहोवासाठी भेटी आणल्या आणि यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठीही अनेक मौल्यवान वस्तू आणल्या.+ यानंतर सर्व राष्ट्रं हिज्कीयाला खूप मान देऊ लागली.
२४ त्या काळात, हिज्कीया फार आजारी पडला आणि मरणाला टेकला. तेव्हा त्याने यहोवाला प्रार्थना केली+ आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकून त्याला एक चिन्ह दिलं.+ २५ पण हिज्कीयाने आपल्यावर झालेल्या उपकाराची जाणीव ठेवली नाही, कारण त्याचं मन गर्विष्ठ झालं होतं. आणि त्यामुळे त्याच्यावर, यहूदावर आणि यरुशलेमवर देवाचा क्रोध भडकला. २६ पण हिज्कीयाने स्वतःला नम्र केलं आणि आपला गर्विष्ठपणा सोडून दिला.+ तसंच, यरुशलेमचे लोकही नम्र बनले. आणि म्हणून हिज्कीयाच्या शासनकाळात यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला नाही.+
२७ हिज्कीया अतिशय श्रीमंत आणि वैभवशाली बनला.+ त्याने आपल्याकडे असलेलं सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं, बाल्सम* तेल, ढाली आणि सर्व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी भांडारं बांधली.+ २८ तसंच त्याने धान्य, नवा द्राक्षारस आणि तेल ठेवण्यासाठीही कोठारं बांधली. यासोबतच, त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांसाठी आणि शेरडामेंढरांसाठी तबेले व मेंढवाडे बांधले. २९ शिवाय, त्याने स्वतःसाठी अनेक शहरं बांधली. आणि भरपूर गुरंढोरं व शेरडामेंढरांचे कळप जमवले, कारण देवाने त्याला पुष्कळ धनसंपत्ती दिली होती. ३० हिज्कीयानेच गीहोनच्या+ वरच्या पाटाचं पाणी अडवून+ ते सरळ खाली दावीदपुराच्या+ पश्चिमेकडे आणलं. त्याने जे काही काम हाती घेतलं त्यात त्याला यश मिळत गेलं. ३१ पण, बाबेलच्या* अधिकाऱ्यांनी जेव्हा हिज्कीयाच्या देशात घडलेल्या चिन्हाबद्दल+ विचारायला आपले दूत त्याच्याकडे पाठवले,+ तेव्हा देवाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी+ आणि त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला एकटं सोडलं.+
३२ हिज्कीयाबद्दलची बाकीची माहिती आणि त्याचं एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्या कार्यांबद्दलची माहिती+ ही आमोजच्या मुलाच्या, म्हणजे यशया+ संदेष्ट्याच्या दृष्टान्तांच्या अहवालात लिहिण्यात आली आहे. तसंच, यहूदाचे आणि इस्राएलचे राजे यांच्या इतिहासाच्या पुस्तकातही ती लिहिण्यात आली आहे.+ ३३ नंतर हिज्कीयाचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदच्या मुलांच्या कबरींकडे जाणाऱ्या टेकडीच्या चढावर पुरण्यात आलं;+ यहूदा आणि यरुशलेमच्या सगळ्या लोकांनी मोठ्या सन्मानाने त्याला दफन केलं. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा मनश्शे राजा बनला.