२ शमुवेल
९ पुढे दावीदने विचारलं: “शौलच्या घराण्यातलं कोणी अजून जिवंत आहे का? असेल तर योनाथानसाठी त्याला दया* दाखवायची माझी इच्छा आहे.”+ २ त्या वेळी शौलच्या घराण्यात सीबा+ नावाचा एक सेवक होता. त्यांनी त्याला दावीद राजाकडे आणलं आणि दावीदने त्याला विचारलं: “तूच सीबा आहेस का?” त्यावर तो म्हणाला: “हो मीच तो, आपला सेवक.” ३ पुढे राजाने त्याला विचारलं: “शौलच्या घराण्यातलं कोणी अजून जिवंत आहे का? कारण मला त्याच्यावर देवासारखी दया* करायची इच्छा आहे.” तेव्हा सीबा म्हणाला: “हो, योनाथानचा एक मुलगा अजून जिवंत आहे; तो दोन्ही पायांनी अधू आहे.”+ ४ मग राजाने त्याला विचारलं: “तो कुठे आहे?” त्यावर सीबा म्हणाला: “तो लो-दबार इथे, अम्मीएलचा मुलगा माखीर+ याच्या घरी आहे.”
५ तेव्हा दावीद राजाने लगेच माणसं पाठवली आणि त्याला लो-दबारमधून अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरून बोलावून घेतलं. ६ योनाथानचा मुलगा, म्हणजे शौलचा नातू मफीबोशेथ दावीदकडे आला, तेव्हा त्याने लगेच जमिनीवर पडून दावीदला दंडवत घातला. मग दावीद म्हणाला: “मफीबोशेथ!” त्यावर तो म्हणाला: “हो माझ्या प्रभू.” ७ दावीद त्याला म्हणाला: “घाबरू नकोस. तुझे वडील योनाथान यांच्यासाठी मी नक्की तुला दया* दाखवीन.+ तुझे आजोबा, शौल यांची सगळी जमीन मी तुला परत करीन, आणि तू नेहमी माझ्यासोबत माझ्या मेजावर जेवशील.”+
८ तेव्हा तो राजाला दंडवत घालून म्हणाला: “माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याकडे तुम्ही लक्ष द्यावं,+ अशी तुमच्या या सेवकाची लायकी तरी काय?” ९ राजाने मग शौलचा सहायक सीबा याला बोलावून घेतलं आणि तो त्याला म्हणाला: “शौलच्या आणि त्याच्या घराण्याच्या मालकीचं जे काही होतं, ते सगळं मी तुझ्या मालकाच्या नातवाला देतोय.+ १० तू, तुझी मुलं आणि तुझे सेवक, तुम्ही सगळे त्याच्यासाठी शेती कराल आणि जमिनीचा उपज गोळा कराल. म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचे जे कोणी असतील त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होईल. पण तुझ्या मालकाचा नातू, मफीबोशेथ मात्र कायम माझ्यासोबत माझ्या मेजावर जेवण करेल.”+
सीबाला १५ मुलं होती आणि त्याच्याकडे २० सेवक होते.+ ११ तेव्हा सीबा राजाला म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, तुम्ही तुमच्या या सेवकाला जी आज्ञा दिलीत, त्याप्रमाणे तुमचा हा सेवक सगळं काही करेल.” अशा प्रकारे, मफीबोशेथ दावीदच्या इतर मुलांप्रमाणे दावीदसोबत* त्याच्या मेजावर जेवू लागला. १२ मफीबोशेथला मीखा+ नावाचा एक लहान मुलगाही होता; आणि सीबाच्या घरात राहणारे सगळे मफीबोशेथचे सेवक बनले. १३ मफीबोशेथ यरुशलेममध्येच राहिला. कारण तो नेहमी राजाच्या मेजावर जेवायचा;+ तो दोन्ही पायांनी अधू होता.+