२ शमुवेल
४ शौलचा मुलगा ईश-बोशेथ+ याला* समजलं, की हेब्रोनमध्ये+ अबनेरचा मृत्यू झाला आहे. तेव्हा त्याचा धीर खचला* आणि सर्व इस्राएली लोकही घाबरले. २ शौलच्या मुलाकडे लुटारूंच्या ज्या टोळ्या होत्या त्यांवर दोन अधिकारी होते: एकाचं नाव बानाह, तर दुसऱ्याचं नाव रेखाब. ही दोघं बन्यामीन वंशातल्या रिम्मोनची मुलं होती; रिम्मोन हा बैरोथचा राहणारा होता. (त्या काळात, बैरोथसुद्धा+ बन्यामीनच्या प्रदेशाचाच भाग समजला जायचा. ३ बैरोथचे लोक गित्तइम+ इथे पळून गेले होते, आणि ते आजपर्यंत तिथेच विदेशी म्हणून राहत आहेत.)
४ शौलचा मुलगा योनाथान+ याचा एक मुलगा दोन्ही पायांनी अधू होता.+ तो जेव्हा पाच वर्षांचा होता, तेव्हा शौल आणि योनाथान यांच्या मृत्यूची खबर इज्रेलहून+ आली. ती खबर ऐकून त्याची दाई फार घाबरली आणि त्याला घेऊन पळाली. पण पळत असताना तो तिच्या हातातून पडला आणि अधू झाला. त्याचं नाव मफीबोशेथ.+
५ इकडे, बैरोथमधल्या रिम्मोनची मुलं, रेखाब आणि बानाह भर दुपारी ईश-बोशेथच्या घरी गेली. त्या वेळी, ईश-बोशेथ दुपारची झोप घेत होता. ६ तेव्हा, रेखाब आणि बानाह+ गहू घेण्याच्या निमित्ताने घरात शिरले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले. ७ ते जेव्हा घरात गेले, तेव्हा ईश-बोशेथ आपल्या खोलीत पलंगावर झोपला होता. मग त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला ठार मारलं आणि त्याचं डोकं कापलं. नंतर त्याचं डोकं घेऊन ते संपूर्ण रात्र अराबाला जाणाऱ्या रस्त्याने चालत गेले. ८ मग त्यांनी ईश-बोशेथचं+ डोकं हेब्रोनमध्ये दावीद राजाकडे आणलं आणि ते त्याला म्हणाले: “हे पाहा! तुमच्या जिवावर उठलेला+ तुमचा शत्रू+ शौल याच्या मुलाचं, ईश-बोशेथचं डोकं! आज आमच्या प्रभूसाठी, आमच्या राजासाठी यहोवाने शौलचा आणि त्याच्या वंशजांचा बदला घेतलाय.”
९ पण दावीद बैरोथमधल्या रिम्मोनच्या मुलांना, म्हणजे रेखाब आणि त्याचा भाऊ बानाह यांना म्हणाला: “ज्याने मला माझ्या सर्व संकटांतून वाचवलं त्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ,+ १० सिक्लागमध्ये जेव्हा एकाने मला खबर दिली, की ‘शौल मेला आहे,’+ तेव्हा त्याला असं वाटलं, की तो मला आनंदाची बातमी सांगतोय. पण मी त्याला पकडून ठार मारलं.+ बातमी घेऊन आलेल्या त्या माणसाला मी हेच बक्षीस दिलं! ११ तर मग, एखाद्या निर्दोष माणसाला त्याच्याच घरात घुसून त्याच्या बिछान्यावर ठार मारणाऱ्या दुष्ट माणसांना आणखी किती कडक शिक्षा व्हायला हवी! म्हणून त्याच्या रक्ताचा बदला मी तुमच्याकडून घेईन.+ तुम्हाला मरावंच लागेल!” १२ मग दावीदने आपल्या माणसांना त्यांना मारून टाकण्याचा हुकूम दिला.+ त्यांनी त्या दोघांचे हातपाय कापून टाकले आणि त्यांना हेब्रोनच्या तळ्याजवळ लटकवलं.+ पण ईश-बोशेथचं डोकं त्यांनी हेब्रोनमध्ये अबनेरच्या कबरेत पुरलं.