२ शमुवेल
३ शौलचं घराणं आणि दावीदचं घराणं यांचं आपसात असलेलं युद्ध पुढे बराच काळ चालू राहिलं. दावीद दिवसेंदिवस प्रबळ होत गेला+ आणि शौलचं घराणं कमकुवत होत गेलं.+
२ या काळादरम्यान दावीदला हेब्रोनमध्ये काही मुलं झाली.+ त्याच्या पहिल्या मुलाचं नाव अम्नोन होतं.+ तो त्याला इज्रेलमधल्या अहीनवामपासून+ झाला होता. ३ त्याच्या दुसऱ्या मुलाचं नाव किलाब होतं; तो त्याला कर्मेलमधल्या नाबालची विधवा अबीगईल+ हिच्यापासून झाला होता. त्याचा तिसरा मुलगा अबशालोम;+ तो त्याला माकापासून झाला होता. माका ही गशूरचा राजा तलमय+ याची मुलगी होती. ४ त्याचा चौथा मुलगा अदोनीया,+ हा त्याला हग्गीथ हिच्यापासून झाला होता. त्याचा पाचवा मुलगा शपत्याह, त्याला अबीटलपासून झाला होता. ५ आणि त्याचा सहावा मुलगा इथ्राम होता. हा दावीदला आपली बायको एग्ला हिच्यापासून झाला होता. दावीदला ही मुलं हेब्रोनमध्ये झाली होती.
६ शौलच्या आणि दावीदच्या घराण्यातला लढा चालू असताना, अबनेर+ हा शौलच्या घराण्यात आपलं वर्चस्व वाढवत गेला. ७ शौलची रिस्पा+ नावाची एक उपपत्नी होती; ती अय्या याची मुलगी होती. नंतर, ईश-बोशेथ+ अबनेरला म्हणाला: “तुम्ही माझ्या वडिलांच्या उपपत्नीसोबत संबंध का ठेवले?”+ ८ ईश-बोशेथचं हे बोलणं ऐकून अबनेर खूप भडकला आणि म्हणाला: “मी काय यहूदाचा कुत्रा* आहे? मी आजपर्यंत शौलच्या, तुझ्या बापाच्या घराण्याला, त्याच्या भावांना आणि त्याच्या मित्रांना विश्वासू राहिलो.* शिवाय, तुला दावीदच्या हवाली करून मी तुझा विश्वासघातही केला नाही. आणि तरीही आज एका बाईवरून तू मला जाब विचारतोस? ९ यहोवाने दावीदला वचन दिलं होतं त्याप्रमाणे+ आता जर मी केलं नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो. १० देवाने वचन दिलं होतं, की तो शौलच्या घराण्याकडून राज्य काढून घेईल, आणि दावीदचं राजासन दानपासून बैर-शेबापर्यंत+ संपूर्ण इस्राएलवर आणि यहूदावर स्थापन करेल.” ११ त्यावर ईश-बोशेथ एका शब्दानेही अबनेरला उत्तर देऊ शकला नाही, कारण तो त्याला घाबरून होता.+
१२ त्यानंतर अबनेरने लगेच आपल्या दूतांच्या हातून दावीदला असा संदेश पाठवला: “हा संपूर्ण देश कोणाचा आहे?” पुढे तो म्हणाला: “माझ्यासोबत एक करार करा. मग संपूर्ण इस्राएलचं मन तुमच्याकडे वळवण्यासाठी मला जे काही करावं लागेल ते मी करीन.”+ १३ त्यावर दावीद म्हणाला: “ठीक आहे! मी नक्की तुझ्यासोबत करार करीन, पण एका अटीवर! तू मला भेटायला येशील तेव्हा शौलची मुलगी मीखल+ हिला आपल्यासोबत घेऊन ये. नाहीतर मला आपलं तोंड दाखवू नकोस.” १४ मग दावीदने आपल्या दूतांच्या हातून ईश-बोशेथला,+ शौलच्या मुलाला असा निरोप पाठवला: “माझी बायको मीखल मला दे. पलिष्ट्यांच्या १०० अग्रत्वचा देऊन माझं तिच्याशी लग्न ठरलं होतं.”+ १५ तेव्हा ईश-बोशेथने तिला आणण्यासाठी तिच्या नवऱ्याकडे, म्हणजे लईशचा मुलगा पलतीयेल+ याच्याकडे माणसं पाठवली. १६ पण तिचा नवरा तिच्यासोबत निघाला आणि रडतरडत बहुरीमपर्यंत+ तिच्यामागे गेला. मग अबनेर त्याला म्हणाला: “परत जा!” तेव्हा तो निघून गेला.
१७ यादरम्यान, अबनेरने इस्राएलच्या वडीलजनांना निरोप पाठवला: “तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून दावीदला आपला राजा बनवायचं होतं ना? १८ तर आता तसंच करा. कारण यहोवा दावीदला असं म्हणाला होता: ‘माझा सेवक दावीद+ याच्याच हातून मी माझ्या इस्राएली लोकांना पलिष्ट्यांपासून आणि सगळ्या शत्रूंपासून वाचवीन.’” १९ मग अबनेर बन्यामिनी लोकांशी बोलला.+ आणि इस्राएलने व बन्यामीनच्या संपूर्ण घराण्याने जे काही करायचं मान्य केलंय, ते दावीदला खासगीत सांगण्यासाठी तो हेब्रोनलाही गेला.
२० अबनेर आपली २० माणसं घेऊन हेब्रोनमध्ये दावीदकडे आला, तेव्हा दावीदने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी एक मेजवानी ठेवली. २१ मग अबनेर दावीदला म्हणाला: “आता मला सर्व इस्राएली लोकांना माझ्या प्रभूकडे, राजाकडे एकत्र आणायला जाऊ द्या; म्हणजे ते तुमच्यासोबत एक करार करतील आणि तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व इस्राएलवर राज्य कराल.” म्हणून मग दावीदने अबनेरला पाठवून दिलं आणि तो शांतीने आपल्या मार्गाने गेला.
२२ तेवढ्यात, यवाब आणि दावीदचे सेवक लुटीचा भरमसाट माल घेऊन एका मोहिमेवरून परत आले. पण त्या वेळी अबनेर दावीदसोबत हेब्रोनमध्ये नव्हता; कारण दावीदने त्याला शांतीने पाठवून दिलं होतं. २३ यवाब+ आणि त्याचं सैन्य परत आलं, तेव्हा यवाबला असं सांगण्यात आलं: “नेरचा+ मुलगा अबनेर+ राजाकडे आला होता. आणि राजाने त्याला शांतीने आपल्या मार्गाने पाठवून दिलं.” २४ तेव्हा यवाब राजाकडे गेला आणि म्हणाला: “तुम्ही हे काय केलंत? अबनेर स्वतःहून तुमच्याकडे आला होता. मग तुम्ही त्याला का पाठवून दिलं? तुम्ही त्याला निसटून कसं जाऊ दिलं? २५ नेरचा मुलगा अबनेर कसा आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे! तो तुम्हाला फसवून तुमच्या प्रत्येक हालचालीची आणि तुम्ही काय करताय याची माहिती काढायला इथे आला होता.”
२६ मग यवाब दावीदसमोरून निघून गेला, आणि त्याने अबनेरला बोलावून आणायला काही दूत पाठवले. ते अबनेरला सिरा नावाच्या विहिरीजवळून परत घेऊन आले. पण दावीदला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. २७ अबनेर जेव्हा हेब्रोनला परत आला,+ तेव्हा त्याच्याशी खासगीत बोलण्यासाठी यवाब त्याला फाटकाच्या आत एकीकडे घेऊन गेला. मग आपला भाऊ असाएल याच्या खुनाचा* बदला घेण्यासाठी+ त्याने अबनेरच्या पोटात असा वार केला की तो जागीच मेला.+ २८ दावीदला नंतर हे समजलं तेव्हा तो म्हणाला: “नेरचा मुलगा अबनेर याच्या रक्ताच्या दोषापासून+ मी आणि माझं राज्य यहोवापुढे कायम निर्दोष असू. २९ त्याच्या रक्ताचा दोष यवाबच्या माथ्यावर+ आणि त्याच्या वडिलांच्या संपूर्ण घराण्यावर येवो. यवाबच्या घराण्यात कुष्ठरोगी,+ स्रावी,+ टकळीवर सूत कातणारा,* तलवारीला किंवा उपासमारीला बळी पडणारा माणूस कायम राहो.”+ ३० अशा प्रकारे, यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय+ यांनी अबनेरचा+ खून केला; कारण गिबोनमध्ये झालेल्या लढाईत अबनेरने त्यांच्या भावाला, असाएलला मारून टाकलं होतं.+
३१ मग दावीद यवाबला आणि आपल्यासोबत असलेल्या सगळ्या लोकांना म्हणाला: “आपले कपडे फाडून गोणपाट बांधा आणि अबनेरसाठी शोक करा.” दावीद राजा स्वतः शवयात्रेमागे चालत होता. ३२ त्यांनी अबनेरला हेब्रोनमध्ये पुरलं. दावीद राजा अबनेरच्या कबरेजवळ मोठ्याने रडला, आणि त्याच्यासोबतचे लोकही रडू लागले. ३३ राजाने अबनेरसाठी असं शोकगीत गायलं:
“मूर्खाला यावं तसं मरण अबनेरला यावं का?
३४ तुझे हात बांधलेले नव्हते,
आणि तुझ्या पायांत बेड्याही नव्हत्या.
तरीसुद्धा गुन्हेगारांना* कोणी बळी पडावा तसा तू बळी पडलास.”+
तेव्हा सर्व लोक पुन्हा अबनेरसाठी रडू लागले.
३५ दिवस अजून थोडा उरला होता. तेव्हा सर्व लोक दावीदकडे आले आणि त्याला जेवायचा* आग्रह करू लागले. पण दावीद शपथ घेऊन म्हणाला: “सूर्य मावळण्याआधी मी भाकरीचा एक तुकडा किंवा अन्नाचा एक कण जरी खाल्ला, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो!”+ ३६ सर्व लोकांनी हे पाहिलं तेव्हा राजाचं हे वागणं त्यांना योग्य वाटलं; नेहमीप्रमाणे या वेळीही त्यांना त्याचं वागणं योग्य वाटलं. ३७ त्या दिवशी, सर्व लोकांना आणि संपूर्ण इस्राएलला समजलं, की नेरचा मुलगा अबनेर याच्या खुनासाठी राजा जबाबदार नाही.+ ३८ मग राजा आपल्या सेवकांना म्हणाला: “तुम्हाला माहीत नाही का, आज इस्राएलने एका पुढाऱ्याला, एका महान पुरुषाला गमावलंय?+ ३९ मी जरी एक अभिषिक्त राजा असलो,+ तरी आज मी कमजोर आहे. ही माणसं, सरूवाची+ मुलं फार निर्दयी आहेत.+ यहोवा दुष्टाला त्याच्या दुष्टपणाची शिक्षा करो.”+