२ शमुवेल
१६ इकडे, दावीद डोंगरमाथ्यावरून थोडं पुढे गेला.+ तेव्हा मफीबोशेथचा+ सहायक सीबा+ त्याला भेटायला तिथे आला होता. त्याने आपल्यासोबत सामान लादलेली दोन गाढवं आणली होती. त्यांवर २०० भाकरी, मनुकांच्या १०० ढेपा, उन्हाळी फळांच्या* १०० ढेपा आणि द्राक्षारसाचं एक मोठं मडकं लादलेलं होतं.+ २ तेव्हा राजा सीबाला म्हणाला: “तू हे सगळं कशाला आणलंस?” त्यावर सीबा म्हणाला: “राजाच्या कुटुंबातल्या लोकांना बसण्यासाठी ही गाढवं आहेत, भाकरी आणि उन्हाळी फळं ही तरुण माणसांसाठी आहेत, तर हा द्राक्षारस ओसाड रानात थकल्या-भागलेल्यांसाठी आहे.”+ ३ राजाने मग त्याला विचारलं: “तुझ्या मालकाचा मुलगा* कुठे आहे?”+ तेव्हा सीबा राजाला म्हणाला: “तो यरुशलेममध्येच थांबलाय. कारण तो म्हणतोय, की ‘इस्राएलचं घराणं आज माझ्या वडिलांचं राज्य मला परत देईल.’”+ ४ त्यावर राजा सीबाला म्हणाला: “पाहा! मफीबोशेथचं जे काही आहे ते सगळं आता तुझं आहे.”+ तेव्हा सीबा म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, मी तुम्हाला नमन करतो. तुमची कृपा माझ्यावर राहो.”+
५ दावीद राजा जेव्हा बहुरीममध्ये पोहोचला, तेव्हा शौलच्या घराण्यातला शिमी+ त्याला मोठमोठ्याने शिव्याशाप देत बाहेर आला; तो गेराचा मुलगा होता.+ ६ शिमी हा दावीद राजावर आणि त्याच्या सगळ्या सेवकांवर, तसंच राजासोबत असलेल्या सगळ्या लोकांवर आणि त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शूर योद्ध्यांवर दगड फेकत होता. ७ तो शिव्याशाप देत म्हणत होता: “अरे नीच, खुनी माणसा! चालता हो इथून! नीघ इथून! ८ तू शौलच्या घराण्याचं रक्त सांडलंस आणि त्याचं राज्य बळकावलंस. म्हणून आता यहोवा तुझ्या कृत्यांची परतफेड करतोय. यहोवाने तुझं राज्यपद तुझ्या मुलाला, अबशालोमला दिलंय. तुझ्यावर हे संकट आलंय, कारण तू खुनी आहेस!”+
९ तेव्हा सरूवाचा मुलगा अबीशय+ राजाला म्हणाला: “या मेलेल्या कुत्र्याची+ इतकी हिंमत, की तो माझ्या प्रभूला, राजाला शिव्याशाप देतोय?+ तुम्ही फक्त आज्ञा करा, मी त्याचं मुंडकंच उडवतो.”+ १० पण राजा म्हणाला: “सरूवाच्या मुलांनो,+ तुम्हाला याच्याशी काय घेणंदेणं? त्याला शिव्याशाप देऊ द्या.+ यहोवानेच जर त्याला म्हटलंय,+ की ‘दावीदला शिव्याशाप दे!’ तर त्याला कोण विचारू शकतं, की ‘तू असं का करतोस?’” ११ दावीद मग अबीशयला आणि आपल्या सगळ्या सेवकांना म्हणाला: “माझा स्वतःचा, माझा पोटचा मुलगाच जर माझ्या जिवावर उठलाय,+ तर एका बन्यामिनी+ माणसाकडून मी काय अपेक्षा करणार? सोडून द्या त्याला. देऊ द्या त्याला शिव्याशाप, कारण यहोवानेच त्याला तसं सांगितलंय! १२ कदाचित यहोवा माझं दुःख पाहील+ आणि आजच्या या शिव्याशापांच्या बदल्यात यहोवा मला आशीर्वाद देईल.”+ १३ असं म्हणून दावीद आणि त्याची माणसं आपल्या रस्त्याने पुढे जाऊ लागली. आणि शिमीसुद्धा शिव्याशाप देत,+ दगड फेकत आणि धूळ उडवत त्याच्या बरोबरीने डोंगराच्या कडेने जाऊ लागला.
१४ शेवटी, राजा आणि त्याच्यासोबतचे सगळे लोक ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. ते अतिशय थकले होते म्हणून त्यांनी तिथे विश्रांती घेतली.
१५ इकडे, अबशालोम आणि इस्राएलची सर्व माणसं यरुशलेममध्ये पोहोचली; अबशालोमसोबत अहिथोफेलसुद्धा+ होता. १६ मग दावीदचा मित्र* हूशय+ अर्की+ अबशालोमकडे आला आणि त्याला म्हणाला: “राजाला दीर्घायुष्य लाभो!+ राजाला दीर्घायुष्य लाभो!” १७ तेव्हा अबशालोम हूशयला म्हणाला: “हेच का तुझं मित्रावरचं एकनिष्ठ प्रेम? तू आपल्या मित्रासोबत का नाही गेलास?” १८ त्यावर हूशय अबशालोमला म्हणाला: “ज्याला यहोवाने, या लोकांनी आणि इस्राएलच्या सगळ्या माणसांनी निवडलंय, त्याच्या बाजूने मी आहे. मी त्याच्याच सोबत राहीन. १९ आणि मी पुन्हा एकदा तेच म्हणतो. राजाच्या मुलाशिवाय मी आणखी कोणाची सेवा करणार? मी जशी तुमच्या वडिलांची सेवा केली, तशी तुमचीही सेवा करीन.”+
२० अबशालोम मग अहिथोफेलला म्हणाला: “तुमचा काय सल्ला आहे?+ आपण आता काय करावं?” २१ तेव्हा अहिथोफेल अबशालोमला म्हणाला: “तुझ्या वडिलांनी राजमहाल सांभाळायला ज्या उपपत्नी मागे ठेवल्या आहेत+ त्यांच्याशी संबंध ठेव.+ म्हणजे तू तुझ्या वडिलांचा घोर अपमान केलाय हे सगळ्या इस्राएलला समजेल. आणि जे तुझ्या बाजूने आहेत त्यांना आणखी बळ मिळेल.” २२ म्हणून मग त्यांनी घराच्या छतावर+ अबशालोमसाठी एक तंबू बांधला. आणि अबशालोमने संपूर्ण इस्राएलच्या डोळ्यांदेखत+ आपल्या वडिलांच्या उपपत्नींसोबत+ संबंध ठेवले.
२३ त्या काळात अहिथोफेलचा+ सल्ला खऱ्या देवाचा शब्द मानला जायचा.* दावीद आणि अबशालोम हे दोघं अहिथोफेलने दिलेला सल्ला फार मानायचे.