उत्पत्ती
४६ तेव्हा इस्राएल आपलं जे काही होतं, ते* घेऊन निघाला. तो बैर-शेबा+ इथे पोहोचला, तेव्हा त्याने आपला पिता इसहाक याच्या देवाला+ बलिदानं अर्पण केली. २ मग देव रात्री इस्राएलला एका दृष्टान्तात म्हणाला: “याकोब, याकोब!” त्यावर तो म्हणाला: “मी इथे आहे!” ३ देव म्हणाला: “मी खरा देव आहे, मी तुझ्या पित्याचा देव आहे.+ इजिप्तला जायला घाबरू नकोस, कारण तिथे मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करीन.+ ४ मी स्वतः तुझ्यासोबत इजिप्तला येईन आणि तुला तिथून परतही आणीन+ आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकेल.”*+
५ मग याकोब बैर-शेबा इथून निघाला आणि इस्राएलच्या मुलांनी आपला पिता याकोब याला आणि आपल्या बायकामुलांना, फारोने पाठवलेल्या बैलगाड्यांमध्ये बसवून नेलं. ६ कनान देशात त्यांनी जमवलेली सगळी मालमत्ता आणि गुरंढोरंही त्यांनी आपल्यासोबत नेली. अशा रितीने याकोब आणि त्याच्यासोबत त्याचं सगळं कुटुंब इजिप्तमध्ये आलं. ७ तो आपल्या मुलांना, मुलींना आणि नातवंडांना, म्हणजे आपल्या सगळ्या वंशजांना इजिप्तमध्ये घेऊन आला.
८ इजिप्तमध्ये आलेल्या इस्राएलच्या मुलांची, म्हणजे याकोब आणि त्याच्या मुलांची नावं ही आहेत:+ याकोबच्या मोठ्या मुलाचं नाव रऊबेन+ होतं.
९ रऊबेनला हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी ही मुलं झाली.+
१० शिमोनला+ यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, सोहर, आणि एका कनानी स्त्रीपासून झालेला शौल,+ ही मुलं झाली.
११ लेवीला+ गेर्षोन, कहाथ आणि मरारी ही मुलं झाली.+
१२ यहूदाला+ एर, ओनान, शेला,+ पेरेस+ आणि जेरह+ ही मुलं झाली. पण एर आणि ओनान यांचा कनान देशातच मृत्यू झाला.+
पेरेसला हेस्रोन आणि हामूल ही मुलं झाली.+
१३ इस्साखारला तोला, पूवा, योब, आणि शिम्रोन ही मुलं झाली.+
१४ जबुलूनला+ सेरेद, एलोन आणि याहलेल ही मुलं झाली.+
१५ पदन-अराम इथे याकोबला लेआपासून ही मुलं, आणि दीना+ ही मुलगी झाली. त्याला एकूण ३३ मुलं व मुली झाल्या.
१६ गादला+ सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी आणि अरेली ही मुलं झाली.+
१७ आशेरला+ इम्नाह, इश्वा, इश्वी आणि बरीया ही मुलं, आणि सेराह ही मुलगी झाली.
बरीयाला हेबेर आणि मालकीएल ही मुलं झाली.+
१८ लाबानने लेआला दिलेली दासी जिल्पा+ हिच्यापासून याकोबला झालेली ही मुलं आहेत. याकोबला तिच्यापासून एकूण १६ मुलं झाली.
१९ याकोबची बायको राहेल हिला योसेफ+ आणि बन्यामीन+ ही मुलं झाली.
२० इजिप्तमध्ये योसेफला ओनचा* पुजारी पोटीफरा याची मुलगी आसनथ,+ हिच्यापासून मनश्शे+ आणि एफ्राईम+ ही मुलं झाली.
२१ बन्यामीनला+ बेला, बेकेर, अशबेल, गेरा,+ नामान, एही, रोश, मुप्पीम, हुप्पीम+ आणि अर्द+ ही मुलं झाली.
२२ राहेलपासून याकोबला झालेली ही मुलं आहेत. याकोबला तिच्यापासून एकूण १४ मुलं झाली.
२३ दानला+ हुशीम हा मुलगा* झाला.+
२४ नफतालीला+ यहसेल, गूनी, येसेर, आणि शिल्लेम ही मुलं झाली.+
२५ लाबानने राहेलला दिलेली दासी बिल्हा हिच्यापासून याकोबला झालेली ही मुलं आहेत. याकोबला तिच्यापासून एकूण सात मुलं झाली.
२६ याकोबचे जे वंशज इजिप्तमध्ये गेले, त्यांची संख्या, याकोबच्या मुलांच्या बायका सोडून ६६ इतकी होती.+ २७ योसेफला इजिप्तमध्ये दोन मुलं झाली. अशा रितीने याकोबच्या कुटुंबातले ७० लोक इजिप्तला आले.+
२८ मग, याकोबने आपण गोशेनच्या मार्गावर आहोत, हे योसेफला सांगायला यहूदाला पुढे पाठवलं.+ जेव्हा ते गोशेन+ देशात पोहोचले, २९ तेव्हा योसेफ आपला रथ तयार करून, आपला पिता इस्राएल याला गोशेन इथे भेटायला गेला. तो याकोबच्या समोर आला, तेव्हा याकोबने लगेच त्याला मिठी मारली आणि तो खूप रडला.* ३० मग इस्राएल योसेफला म्हणाला: “आज मी तुला पाहिलं आणि तू अजूनही जिवंत आहेस हे मला कळलं, आता मला मरण आलं तरी चालेल.”
३१ तेव्हा योसेफ आपल्या भावांना आणि आपल्या वडिलांच्या घरातल्या सर्वांना म्हणाला: “मी आता फारोकडे जातो आणि त्याला सांगतो,+ ‘माझे भाऊ आणि माझ्या वडिलांचं कुटुंब कनान देशातून इथे आलं आहे.+ ३२ ते लोक मेंढपाळ आहेत+ आणि ते गुरंढोरं पाळतात.+ ते आपले कळप, गुरंढोरं आणि त्यांचं सर्वकाही इथे घेऊन आले आहेत.’+ ३३ जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुम्ही काय करता?’ ३४ तेव्हा तुम्ही त्याला असं सांगा, ‘तुमचे सेवक लहानपणापासून आतापर्यंत गुरंढोरं पाळत आले आहेत. आमचे पूर्वजही हेच काम करायचे.’+ मग तुम्हाला गोशेन प्रांतात राहता येईल,+ कारण इजिप्तच्या लोकांना मेंढपाळांची किळस येते.”+