उत्पत्ती
२९ त्यानंतर याकोब पुढच्या प्रवासाला निघाला आणि तो पूर्वेकडच्या लोकांच्या देशात येऊन पोहोचला. २ त्याला मैदानात एक विहीर दिसली. त्या विहिरीजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. मेंढपाळ सहसा त्या विहिरीतून आपल्या मेंढरांना पाणी पाजायचे. त्या विहिरीच्या तोंडावर एक मोठा दगड ठेवला होता. ३ सगळ्या कळपांना जमा केल्यावर मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरचा दगड काढायचे, मेंढरांना पाणी पाजायचे आणि मग तो दगड पुन्हा विहिरीच्या तोंडावर ठेवायचे.
४ याकोब त्यांना म्हणाला: “माझ्या भावांनो, तुम्ही कुठले?” यावर ते म्हणाले: “आम्ही हारानचे.”+ ५ मग तो त्यांना म्हणाला: “नाहोरचा+ नातू लाबान+ याला तुम्ही ओळखता का?” यावर ते म्हणाले: “हो, ओळखतो.” ६ तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “तो बरा आहे ना?” ते म्हणाले: “हो, बरा आहे. ती बघा त्याची मुलगी राहेल+ मेंढरांना घेऊन येत आहे!” ७ मग तो म्हणाला: “आताशी दुपार झाली आहे. कळपांना जमा करण्याची ही वेळ नाही. मेंढरांना पाणी पाजा आणि त्यांना चरायला न्या.” ८ यावर ते म्हणाले: “सगळे कळप जमा झाल्यावरच ते विहिरीच्या तोंडावरचा दगड काढतात आणि तेव्हाच आम्ही मेंढरांना पाणी पाजतो. तोपर्यंत आम्हाला मेंढरांना पाणी पाजण्याची परवानगी नाही.”
९ तो त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या वडिलांच्या मेंढरांना घेऊन तिथे आली, कारण ती मेंढरं राखायची. १० याकोबने आपला मामा लाबान याची मुलगी राहेल हिला आणि त्याच्या मेंढरांना पाहिलं, तेव्हा त्याने लगेच जाऊन विहिरीच्या तोंडावरचा दगड काढला आणि आपला मामा लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजलं. ११ मग याकोबने राहेलचं चुंबन घेतलं आणि तो मोठ्याने रडू लागला. १२ त्यानंतर याकोबने राहेलला सांगितलं, की तो तिच्या वडिलांचा नातेवाईक,* म्हणजे रिबकाचा मुलगा आहे. तेव्हा ती हे सांगायला पळत आपल्या वडिलांकडे गेली.
१३ आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याचं ऐकताच, लाबान+ पळत त्याला भेटायला गेला. त्याने त्याला मिठी मारून त्याचं चुंबन घेतलं आणि त्याला घरी आणलं. मग याकोबने त्याला सगळी हकिगत सांगितली. १४ लाबान त्याला म्हणाला: “तुझंमाझं रक्ताचं नातं आहे.”* म्हणून तो त्याच्याकडे महिनाभर राहिला.
१५ मग लाबान याकोबला म्हणाला: “तू माझा नातेवाईक*+ आहेस, म्हणून मी काय तुझ्याकडून फुकट काम करून घेऊ? सांग तुला काय मजुरी देऊ?”+ १६ लाबानला दोन मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव लेआ आणि धाकटीचं नाव राहेल+ होतं. १७ लेआच्या डोळ्यांत चमक नव्हती, पण राहेल खूप देखणी आणि सुंदर होती. १८ याकोब राहेलच्या प्रेमात पडला होता, म्हणून तो म्हणाला: “मी तुमची धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी सात वर्षं तुमची सेवा करायला तयार आहे.”+ १९ यावर लाबान म्हणाला: “तिला परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला दिलेलं बरं. तू माझ्याकडे राहा.” २० मग याकोबने राहेलसाठी सात वर्षं सेवा केली.+ पण तिच्यावर प्रेम असल्यामुळे त्याला ती वर्षं फक्त काही दिवसांसारखी वाटली.
२१ त्यानंतर याकोब लाबानला म्हणाला: “माझ्या सेवेची वर्षं पूर्ण झाली आहेत. आता माझी बायको मला द्या म्हणजे मला तिच्यासोबत राहता येईल.”* २२ तेव्हा लाबानने तिथल्या सर्व लोकांना मेजवानी दिली. २३ पण संध्याकाळी असं झालं, की त्याने आपली मुलगी लेआ हिला याकोबकडे नेलं आणि याकोबने तिच्याशी संबंध ठेवले. २४ लाबानने आपली दासी जिल्पा, ही लेआला दासी म्हणून दिली.+ २५ सकाळी याकोबने पाहिलं तर त्याच्याजवळ लेआ होती! तेव्हा तो लाबानला म्हणाला: “तुम्ही माझ्यासोबत हे काय केलं? मला का फसवलं?+ मी राहेलसाठी तुमची सेवा केली होती ना?” २६ यावर लाबान म्हणाला: “आमच्याकडे मोठीच्या आधी धाकटीचं लग्न करण्याची पद्धत नाही. २७ हा आठवडा तू लेआसोबत साजरा कर. त्यानंतर तुला दुसरीही देईन. पण त्यासाठी तुला आणखी सात वर्षं माझी सेवा करावी लागेल.”+ २८ याकोबने त्याच्या सांगण्यानुसार तो आठवडा लेआसोबत साजरा केला. त्यानंतर लाबानने त्याला राहेल बायको म्हणून दिली. २९ तसंच, लाबानने आपली दासी बिल्हा,+ ही राहेलला दासी म्हणून दिली.+
३० मग याकोबने राहेलसोबतही संबंध ठेवले. त्याचं लेआपेक्षा राहेलवर जास्त प्रेम होतं आणि त्याने आणखी सात वर्षं लाबानची सेवा केली.+ ३१ याकोबचं लेआवर प्रेम नाही,* हे पाहिल्यावर यहोवाने तिला मुलं होऊ दिली,*+ पण राहेल वांझ होती.+ ३२ लेआ गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तिने त्याचं नाव रऊबेन*+ ठेवलं, कारण ती म्हणाली: “यहोवाने माझं दुःख पाहिलं आहे.+ आता माझा नवरा माझ्यावर प्रेम करू लागेल.” ३३ मग ती पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “यहोवाने माझं ऐकलं आहे. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं, म्हणून देवाने मला हा आणखी एक मुलगा दिला आहे.” त्यामुळे तिने त्याचं नाव शिमोन*+ ठेवलं. ३४ मग ती पुन्हा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “आता माझा नवरा माझ्याजवळ राहील कारण मी त्याला तीन मुलं दिली आहेत.” म्हणून तिने त्याचं नाव लेवी*+ ठेवलं. ३५ यानंतर ती आणखी एकदा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “या वेळी मी यहोवाची स्तुती करीन.” म्हणून तिने त्याचं नाव यहूदा*+ ठेवलं. यानंतर तिला मुलं होण्याचं थांबलं.