१ थेस्सलनीकाकर
५ आता बांधवांनो, काळ व समय* यांबद्दल तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. २ कारण, रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा* दिवस येत आहे, हे तुम्हाला स्वतःला चांगल्या प्रकारे माहीत आहे. ३ “शांती आहे, सुरक्षा आहे!” असे जेव्हा ते म्हणत असतील तेव्हा एकाएकी, गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे प्रसूतिवेदना सुरू होतात, त्याप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश येईल, आणि त्यातून त्यांची सुटका होणारच नाही. ४ पण बांधवांनो, तुम्ही मात्र अंधारात नाही; त्यामुळे, दिवसाच्या प्रकाशाने चोराला गाठावे तसा तो दिवस तुम्हाला गाठणार नाही. ५ कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे किंवा अंधाराचेही नाही.
६ म्हणून, आपण इतरांप्रमाणे झोपेत राहू नये, तर जागे व सावध राहावे. ७ कारण झोप घेणारे, रात्री झोपतात आणि मद्य पिऊन झिंगणारे रात्री झिंगतात. ८ पण आपण जे दिवसाचे आहोत, ते आपण सावध राहून विश्वासाचे व प्रेमाचे कवच* आणि तारणाच्या आशेचा टोप घालू या. ९ कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळवण्यासाठी निवडले आहे. १० ख्रिस्त आपल्याकरता मरण पावला, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपलो,* तरी आपण त्याच्यासोबत राहावे. ११ त्यामुळे, आता जसे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन* देत आहात व एकमेकांची उन्नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.
१२ आता बांधवांनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो, की तुमच्यामध्ये जे मेहनत घेतात आणि प्रभूच्या सेवेत जे तुमचे नेतृत्व करतात व तुम्हाला शिक्षण देतात त्यांना आदर दाखवा; १३ आणि ते करत असलेल्या कामाबद्दल प्रेमळपणे त्यांची विशेष कदर करा. एकमेकांबरोबर शांतीने राहा. १४ त्याच वेळी बांधवांनो, आम्ही तुम्हाला अशीही विनंती करतो, की जे शिस्तीने वागत नाहीत त्यांना ताकीद द्या,* निराश झालेल्यांचे सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा. १५ कोणीही वाइटाची फेड वाइटाने करणार नाही, याची काळजी घ्या. आणि नेहमी एकमेकांचे आणि एकंदरीत सगळ्यांचेच भले करण्याचा प्रयत्न करत राहा.
१६ नेहमी आनंदी राहा. १७ प्रार्थना करत राहा. १८ सर्व गोष्टींसाठी आभार माना. तुमच्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. १९ पवित्र आत्म्याची आग विझवू नका. २० भविष्यवाण्यांना तुच्छ लेखू नका. २१ सर्व गोष्टींची खातरी करा; जे चांगले आहे त्याला धरून राहा. २२ सर्व प्रकारच्या दुष्टपणापासून दूर राहा.
२३ शांतीच्या देवाने स्वतः तुम्हाला पूर्णपणे पवित्र करावे. आणि बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी तुमचा आत्मा,* जीव* व शरीर सर्व बाबतींत निर्दोष व परिपूर्ण असे राखले जावे. २४ तुम्हाला बोलावणारा विश्वासू असून तो नक्कीच असे करेल.
२५ बांधवांनो, आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.
२६ सर्व बांधवांना भेटताना बंधुप्रेमाचे चुंबन घ्या.
२७ मी तुम्हाला प्रभूच्या नावाने आग्रह करतो, की हे पत्र सर्व बांधवांना वाचून दाखवावे.
२८ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्यावर असो.