इफिसकर
२ शिवाय, तुम्ही आपल्या अपराधांमुळे व पापांमुळे मेलेले असे होता, तरीसुद्धा देवाने तुम्हाला जिवंत केले. २ आणि तुम्ही आपल्या पापांत एकेकाळी या जगाच्या व्यवस्थेप्रमाणे* चालत होता व जगाच्या मनोवृत्तीवर नियंत्रण करणाऱ्याला शासक मानून चालत होता. ही मनोवृत्ती हवेप्रमाणे सर्वत्र पसरलेली असून, आज्ञा न मानणाऱ्यांमध्ये ती आज कार्य करत आहे. ३ हो, त्या लोकांमध्ये एकेकाळी आपण सर्वच आपल्या शरीराच्या वासनांनुसार चालत होतो. आपण आपल्या शरीराची इच्छा पूर्ण करत होतो आणि आपल्या विचारांनुसार वागत होतो. त्यामुळे, बाकीच्या लोकांप्रमाणेच आपणसुद्धा जन्मापासून क्रोधाची मुले होतो. ४ पण देव अतिशय दयाळू असल्यामुळे, आपल्यावर केलेल्या महान प्रेमापोटी, ५ आपण अपराधांत मेलेले असूनसुद्धा त्याने आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत केले. (देवाच्या अपार कृपेमुळे तुमचे तारण झाले आहे.) ६ शिवाय, आपण ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे त्याने आपल्याला जिवंत करून स्वर्गात त्याच्यासोबत बसवले आहे. ७ यासाठी की, येणाऱ्या काळांत* त्याने ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या आपल्यावर उदारतेने त्याच्या अपार कृपेचा वर्षाव करावा.
८ या अपार कृपेमुळे, विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे; हे तुमच्यामुळे घडले असे नाही, तर हे देवाचे कृपादान आहे. ९ खरोखर, हे तुमच्या कार्यांमुळे घडत नाही, यासाठी की कोणाला बढाई मारण्याचे निमित्त मिळू नये. १० आपण देवाच्या हातची कृती* आहोत आणि ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे चांगली कार्ये करण्यासाठी आपली सृष्टी करण्यात आली आहे. ही कार्ये आपण करावीत हे देवाने पूर्वीच ठरवले होते.
११ म्हणून, हे आठवणीत असू द्या की शारीरिक दृष्टीने विदेशी असलेल्या तुम्हाला, मानवी हातांनी शरीराची “सुंता* झालेले” लोक, एकेकाळी “सुंता न झालेले” म्हणत होते. १२ त्या वेळी तुम्ही ख्रिस्ताविना होता, इस्राएल राष्ट्रापासून वेगळे होता, अभिवचनाच्या करारांत भाग नसलेले, कोणतीही आशा नसलेले आणि जगात देवाशिवाय असे होता. १३ पण आता तुम्ही ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात आहात. एकेकाळी दुरावलेले असे जे तुम्ही होता, ते आता ख्रिस्ताच्या रक्तामुळे जवळ आला आहात. १४ कारण तो आपला शांतिदाता आहे. त्याने दोन्ही गटांना एक केले आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे करणारी भिंत पाडून टाकली. १५ त्याच्या शरीराद्वारे त्याने शत्रुता मिटवून टाकली, म्हणजे ज्यांत आज्ञा होत्या ते नियमशास्त्र रद्द केले; यासाठी की आपल्यासोबत ऐक्यात असलेल्या या दोन गटांपासून एक नवा मनुष्य तयार करावा व शांती स्थापित करावी; १६ तसेच, वधस्तंभाद्वारे* त्या दोन्ही गटांच्या लोकांना एकच शरीर करून देवासोबत त्यांचा पूर्णपणे समेट करावा. कारण, स्वतःचे बलिदान देऊन त्याने ही शत्रुता कायमची नष्ट केली. १७ तो आला व त्याने देवापासून दूर असलेल्या तुम्हाला आणि जे जवळ होते त्यांनासुद्धा शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित केला. १८ कारण त्याच्याद्वारे आपल्याला, म्हणजे दोन्ही गटांच्या लोकांना, एकाच पवित्र आत्म्याद्वारे मोकळेपणाने देवाजवळ जाणे शक्य झाले.
१९ त्यामुळे, आता यापुढे तुम्ही अनोळखी व परके असे राहिला नाहीत, तर तुम्ही पवित्र जनांसोबत सहनागरिक आणि देवाच्या घराण्याचे सदस्य आहात. २० तुम्ही प्रेषितांच्या व संदेष्ट्यांच्या पायावर उभारलेली इमारत आहात. तर, त्या पायातील कोपऱ्याचा दगड स्वतः ख्रिस्त येशू आहे. २१ ही संपूर्ण इमारत त्याच्यासोबत ऐक्यात असून, तिचे सर्व भाग एकमेकांसोबत एकतेत जोडलेले आहेत. आणि, ती यहोवासाठी* एक पवित्र मंदिर होण्याकरता वाढत जात आहे. २२ त्याच्यासोबत ऐक्यात असलेल्या तुम्हा सर्वांनादेखील एकत्र उभारले जात आहे, यासाठी की तुमच्यापासून एक असे निवासस्थान बनावे, जिथे देव आपल्या पवित्र आत्म्याद्वारे राहील.