इफिसकर
१ देवाच्या इच्छेनुसार ख्रिस्त येशूचा एक प्रेषित असलेल्या पौलकडून, इफिसमध्ये असलेल्या व ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात राहणाऱ्या विश्वासू पवित्र जनांना:
२ देव जो आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा व शांती लाभो.
३ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता याची स्तुती असो, कारण त्याने आपल्याला ख्रिस्तासोबत ऐक्यात असल्यामुळे स्वर्गात प्रत्येक आध्यात्मिक वरदान देऊन आशीर्वादित केले आहे. ४ देवाने आपल्याला ख्रिस्तासोबत ऐक्यात असण्याकरता जगाच्या स्थापनेपूर्वी निवडले, यासाठी की आपण देवावर प्रेम करावे आणि त्याच्यासमोर पवित्र व निष्कलंक असावे. ५ कारण त्याला चांगले वाटले त्याप्रमाणे त्याने आपल्या इच्छेनुसार आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र म्हणून दत्तक घेण्यासाठी पूर्वीच नेमले होते. ६ यासाठी, की त्याच्या प्रिय पुत्राद्वारे ज्या वैभवी अपार कृपेचा त्याने आपल्यावर प्रेमळपणे वर्षाव केला, त्या कृपेबद्दल त्याची स्तुती केली जावी. ७ त्याच्याच महान अशा अपार कृपेमुळे, आपल्याला त्याच्या प्रिय पुत्राच्या रक्ताद्वारे खंडणी देऊन मुक्त करण्यात आले आहे, अर्थात, आपल्या पापांची क्षमा झाली आहे.
८ त्याने आपल्याला सर्व बुद्धी व समजशक्ती* देण्याद्वारे आपल्यावर मोठ्या प्रमाणात अपार कृपा केली आहे. ९ हे त्याने त्याच्या इच्छेचे पवित्र रहस्य आपल्याला कळवण्याद्वारे केले. त्याला चांगले वाटले त्याप्रमाणे त्याने स्वतः असा संकल्प केला, १० की सर्व गोष्टी, अर्थात स्वर्गातल्या गोष्टी व पृथ्वीवर असलेल्या गोष्टी, ख्रिस्तामध्ये एकत्रित करण्यासाठी नियुक्त काळांच्या समाप्तीला एक व्यवस्था करावी.* हो, त्याच ख्रिस्तामध्ये ११ ज्याच्यासोबत आम्ही ऐक्यात आहोत आणि ज्याच्यासोबत वारसदार होण्याकरता आम्हाला नेमण्यात आले होते. देव, जो सर्व गोष्टी आपल्या इच्छेनुसार ठरवून पूर्ण करतो, त्याने आपल्या संकल्पानुसार आम्हाला याकरता पूर्वीच नेमले होते. १२ यासाठी की, आम्ही जे ख्रिस्तावर आशा ठेवणारे पहिले होतो, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. १३ पण, तुम्हीदेखील सत्याचे वचन म्हणजेच तुमच्या तारणाविषयीचा आनंदाचा संदेश ऐकल्यानंतर त्याच्यावर आशा ठेवली. तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर, त्याच्याद्वारे तुमच्यावर पूर्वीच वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा* शिक्का मारण्यात आला. १४ हा पवित्र आत्मा आपल्याला मिळणार असलेल्या वारशाची आधीच दिलेली एक हमी* आहे, अशा उद्देशाने की खंडणीद्वारे देवाच्या स्वतःच्या लोकांची* सुटका केली जावी व याद्वारे त्याचा गौरव व स्तुती व्हावी.
१५ म्हणूनच, मीसुद्धा प्रभू येशूमध्ये असलेल्या तुमच्या विश्वासाबद्दल आणि सर्व पवित्र जनांना तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल ऐकल्यापासून १६ सतत तुमच्याविषयी देवाचे आभार मानत आहे. मी नेहमी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमचा उल्लेख करतो, १७ यासाठी की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, म्हणजे आपला गौरवी पिता तुम्हाला ज्या गोष्टी प्रकट करतो, त्या समजून घेण्याची त्याने तुम्हाला बुद्धी द्यावी, जेणेकरून तुम्हाला त्याच्याविषयी अचूक ज्ञान मिळेल. १८ त्याने तुमच्या अंतःकरणाचे डोळे उघडले आहेत. यासाठी की, त्याने तुम्हाला कोणत्या आशेकरता बोलावले आहे; कोणत्या वैभवी आशीर्वादांचा वारसा पवित्र जनांकरता राखून ठेवला आहे; १९ आणि आपण जे विश्वास ठेवतो, त्यांच्याविषयी त्याचे सामर्थ्य किती महान आहे, याची तुम्हाला जाणीव व्हावी. त्याच्या या शक्तिशाली सामर्थ्याचे कार्य, २० ख्रिस्ताच्या बाबतीत दिसून आले. त्याने त्याला मेलेल्यांतून उठवले आणि स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. २१ त्याने त्याला असे स्थान दिले आहे, जे फक्त सध्याच्याच नाही, तर येणाऱ्या व्यवस्थेतील* कोणत्याही सरकारपेक्षा, अधिकारापेक्षा, सत्तेपेक्षा, व शासनापेक्षा; आणि आजवर घेतलेल्या कोणत्याही नावापेक्षा कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे. २२ तसेच, त्याने सर्व गोष्टी त्याच्या अधीन करून त्याच्या पायाखाली ठेवल्या आहेत* आणि मंडळीच्या संबंधाने सर्व गोष्टींवर त्याला मस्तक केले आहे. २३ मंडळी ही त्याचे शरीर असून, ती पूर्णतः त्याने सामावलेली आहे आणि तोच सर्व गोष्टींना पूर्णता देतो.