प्रेषितांची कार्यं
३ पेत्र आणि योहान प्रार्थनेच्या वेळी, दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला* मंदिरात जात होते. २ तेव्हा, लोक जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाला तिथून नेत होते. त्याला मंदिरात जाणाऱ्यांकडे भीक मागता यावी, म्हणून ते दररोज त्याला मंदिराच्या एका फाटकाजवळ बसवायचे, ज्याला ‘सुंदर फाटक’ असे म्हटले जायचे. ३ त्याला पेत्र व योहान मंदिरात जाताना दिसले, तेव्हा तो त्यांच्याकडे भीक मागू लागला. ४ पण पेत्र व योहान यांनी सरळ त्याच्याकडे बघून म्हटले: “आमच्याकडे पाहा.” ५ तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी मिळेल या आशेने तो त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. ६ पण पेत्र म्हणाला: “माझ्याजवळ सोनं किंवा चांदी तर नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला सांगतो, चालू लाग!” ७ असे म्हणून त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उभे केले. त्याच क्षणी त्याच्या पावलांत व घोट्यांत बळ आले. ८ म्हणून तो लगेच उठला आणि चालू लागला आणि त्यांच्यासोबत मंदिरात गेला. तो चालत होता, उड्या मारत होता व देवाची स्तुती करत होता. ९ आणि सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. १० त्यांनी त्याला ओळखले. हाच मनुष्य मंदिराच्या सुंदर फाटकाजवळ भीक मिळण्याच्या आशेने बसायचा हे त्यांच्या लक्षात आले आणि तो बरा झाला आहे हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले व अतिशय आनंद झाला.
११ त्या मनुष्याने अजूनही पेत्र व योहान यांचा हात धरून ठेवला होता. तेवढ्यात सर्व लोक त्यांच्याकडे, म्हणजे ‘शलमोनचा वरांडा’ म्हटलेल्या ठिकाणी धावत आले. ते अतिशय आश्चर्यचकित झाले होते. १२ पेत्रने हे पाहिले तेव्हा तो लोकांना म्हणाला: “इस्राएली लोकांनो, तुम्हाला हे पाहून इतकं आश्चर्य का वाटत आहे आणि तुम्ही आमच्याकडे असे एकटक का पाहत आहात? आम्ही स्वतःच्या सामर्थ्याच्या किंवा सुभक्तीच्या बळावर याला चालायला लावलं असं तुम्हाला वाटतं का? १३ अब्राहामच्या, इसहाकच्या व याकोबच्या देवाने, आमच्या पूर्वजांच्या देवाने त्याचा सेवक, येशू याचा गौरव केला आहे. त्या येशूला तुम्ही पिलातच्या स्वाधीन केलं आणि त्याने त्याची सुटका करण्याचं ठरवलं असतानाही तुम्ही त्याला त्याच्यासमोर नाकारलं. १४ हो, तुम्ही त्या पवित्र व नीतिमान माणसाला नाकारलं आणि त्याच्याऐवजी तुम्ही खूनी असलेल्या एका माणसाची मागणी केली १५ आणि जो जीवन देणारा मुख्य प्रतिनिधी होता, त्याला तुम्ही ठार मारलं. पण, देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं आणि आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहोत. १६ त्याच्याच नावाने व त्याच्या नावावर असलेल्या आमच्या विश्वासाने, हा जो माणूस तुम्ही पाहत आहात व ज्याला तुम्ही ओळखता, तो सुदृढ झाला आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने या मनुष्याला तुम्हा सर्वांसमोर पूर्णपणे बरं केलं आहे. १७ बांधवांनो, तुमच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच तुम्हीही अजाणतेत वागला, हे मला माहीत आहे. १८ पण देवाने सर्व संदेष्ट्यांच्या तोंडून जे पूर्वीच घोषित केलं होतं, म्हणजे ख्रिस्ताला दुःख सोसावं लागेल असं जे त्याने सांगितलं होतं, ते त्याने अशा रीतीने पूर्ण केलं आहे.
१९ म्हणून पश्चात्ताप करा आणि मागे वळा म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जातील आणि खुद्द यहोवाकडून* तुम्हाला तजेला मिळेल २० आणि तो तुमच्याकरता नियुक्त केलेला ख्रिस्त, अर्थात येशू याला पाठवेल. २१ सर्व गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होण्याच्या ज्या काळांविषयी देवाने जुन्या काळातील आपल्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे सांगितलं होतं, ते काळ येईपर्यंत येशूने स्वर्गातच राहणं आवश्यक आहे. २२ मोशेनेही स्वतः असं म्हटलं होतं: ‘तुमचा देव यहोवा* तुमच्या बांधवांतून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्याकरता उभा करेल. तो जे काही सांगेल ते तुम्ही ऐका. २३ खरंतर जो कोणी* त्या संदेष्ट्याचं ऐकणार नाही त्याचा आपल्या लोकांतून पूर्णपणे नाश केला जाईल.’ २४ आणि शमुवेलपासून व त्याच्या नंतर झालेल्या जितक्या संदेष्ट्यांनी देवाचे संदेश सांगितले, त्या सर्वांनी या दिवसांबद्दल अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. २५ तुम्ही त्या संदेष्ट्यांची, व देवाने तुमच्या पूर्वजांसोबत केलेल्या कराराची मुलं आहात. देवाने असं म्हणून अब्राहामशी करार केला होता, की ‘तुझ्या संततीद्वारे* पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना आशीर्वाद मिळतील.’ २६ देवाने आपल्या सेवकाला नियुक्त करून सर्वात आधी तुमच्याकडे पाठवलं, यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला आपली दुष्ट कामं सोडायला मदत करून आशीर्वादित करावं.”