प्रेषितांची कार्यं
१९ नंतर अपुल्लो करिंथमध्ये असताना, पौल किनारपट्टीपासून दूर, आशियाच्या आतल्या भागांतून प्रवास करत खाली इफिसला आला. तिथे त्याला काही शिष्य भेटले, २ तेव्हा त्याने त्यांना विचारले: “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला होता का?” ते त्याला म्हणाले: “पवित्र आत्म्याबद्दल तर आम्ही कधीच ऐकलं नाही.” ३ त्यामुळे तो त्यांना म्हणाला: “तर मग, तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?” ते म्हणाले: “योहानचा बाप्तिस्मा.” ४ पौल म्हणाला: “योहानने पश्चात्तापाचं चिन्ह असलेला बाप्तिस्मा दिला आणि त्याने लोकांना आपल्यामागून येणाऱ्यावर, म्हणजेच येशूवर विश्वास ठेवायला सांगितलं.” ५ हे ऐकल्यावर त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. ६ आणि पौलने त्यांच्यावर आपले हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि ते विदेशी भाषांमध्ये बोलू लागले व भविष्यवाणी करू लागले. ७ ते एकूण बारा जण होते.
८ मग, तीन महिने तो सभास्थानात जाऊन धैर्याने बोलत राहिला. तो देवाच्या राज्याविषयी भाषणे द्यायचा व पटण्याजोगे तर्क लोकांपुढे मांडायचा. ९ पण, काही जण अडून राहिले* आणि त्यांनी विश्वास ठेवायला नकार दिला; तसेच, ते सर्वांसमोर प्रभूच्या मार्गाची निंदा करू लागले. तेव्हा, पौल त्यांच्यामधून निघाला आणि शिष्यांनाही आपल्यासोबत घेऊन तो तुरन्न इथल्या शाळेच्या सभागृहात दररोज भाषणे देऊ लागला. १० असे दोन वर्षांपर्यंत चालले आणि त्यामुळे आशिया प्रांतात राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांना प्रभूचे वचन ऐकण्याची संधी मिळाली.
११ शिवाय, पौलच्या हातून देव अतिशय विलक्षण चमत्कार घडवत राहिला. १२ इतके, की त्याचा स्पर्श झालेले रुमाल व कपडेसुद्धा लोक आजारी माणसांकडे घेऊन जायचे आणि त्यांचे रोग बरे व्हायचे; तसेच, त्यांच्यातील दुरात्मेसुद्धा बाहेर निघायचे. १३ पण यहुद्यांपैकी काही जण, जे ठिकठिकाणी प्रवास करून दुरात्मे काढायचे, त्यांनीसुद्धा प्रभू येशूच्या नावाने दुष्ट आत्मे काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणायचे: “पौल ज्याच्याविषयी प्रचार करतो त्या येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो.” १४ स्किवा नावाच्या एका यहुदी मुख्य याजकाची सात मुलेसुद्धा अशीच करायची. १५ पण, दुष्ट आत्म्याने त्यांना असे उत्तर दिले: “मी येशूला ओळखतो आणि पौललासुद्धा ओळखतो, पण तुम्ही कोण?” १६ असे म्हणून, दुष्ट आत्म्यामुळे पीडित असलेल्या त्या माणसाने त्यांच्यावर झडप घातली आणि एकेकाला आपल्या काबूत आणून तो त्यांच्यावर इतका प्रबळ झाला, की ते जखमी होऊन उघडेच त्या घरातून बाहेर पळाले. १७ इफिसमध्ये राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली, तेव्हा त्या सगळ्यांना दहशत बसली आणि प्रभू येशूच्या नावाची महिमा होत गेली. १८ आणि विश्वास ठेवणारे अनेक जण येऊन आपली पापे कबूल करू लागले व आपण केलेली वाईट कामे उघडपणे सांगू लागले. १९ इतकेच काय, तर जादूटोणा करणाऱ्या पुष्कळ लोकांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांसमोर जाळून टाकली. हिशोब केल्यावर, त्यांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी असल्याचे दिसून आले. २० अशा रीतीने, यहोवाच्या* वचनाचा अतिशय सामर्थ्यशाली पद्धतीने प्रसार होत गेला व त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला.
२१ या गोष्टी घडल्यानंतर, पौलने मासेदोनिया व अखयातून प्रवास केल्यावर पुढे यरुशलेमला जाण्याचे आपल्या मनाशी ठरवले. तो म्हणाला: “तिथे गेल्यावर मला रोमलासुद्धा गेलं पाहिजे.” २२ म्हणून त्याने आपली सेवा करणाऱ्यांपैकी तीमथ्य आणि एरास्त या दोघांना मासेदोनियाला पाठवले. पण, तो स्वतः काही काळ आशिया प्रांतातच राहिला.
२३ त्याच सुमारास, इफिसमध्ये प्रभूच्या मार्गाविषयी बरीच खळबळ माजली. २४ कारण, तिथे अर्तमी देवीची चांदीची देव्हारे बनवणारा देमेत्रिय नावाचा एक सोनार, आपल्या कारागिरांना बराच पैसा मिळवून द्यायचा. २५ त्याने त्यांना आणि इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले: “याच धंद्यातून आपल्याला भरपूर पैसा मिळतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे. २६ पण, ‘हातांनी घडवलेले देव, मुळात देव नाहीत,’ असं शिकवून या पौलने इफिसमध्येच नाही, तर जवळवजळ सर्व आशिया प्रांतात कितीतरी लोकांना भडकवून कशा प्रकारे त्यांची मनं वळवली आहेत, हेसुद्धा तुम्ही पाहिलं आणि ऐकलं आहे. २७ यामुळे आपल्या धंद्याची तर बदनामी होईलच, पण महान देवी अर्तमीच्या मंदिरालाही लोक कवडीमोलाचं समजतील; आणि जिची पूजाअर्चा फक्त आशिया प्रांतातच नाही, तर सबंध जगात केली जाते तिचं ऐश्वर्यसुद्धा धुळीस मिळेल.” २८ हे ऐकून लोक रागाने पेटून उठले आणि “इफिसकरांची अर्तमी देवी महान!” असे मोठमोठ्याने ओरडू लागले.
२९ त्यामुळे सबंध शहरात गोंधळ उडाला आणि सर्व लोक नाट्यगृहाकडे धावत गेले; त्यांनी आपल्यासोबत पौलचे प्रवासातील सोबती, म्हणजे मासेदोनियाचे गायस आणि अरिस्तार्ख यांनाही तिथे फरफटत नेले. ३० पौल तर स्वतः आत लोकांकडे जायला तयार होता, पण शिष्यांनी त्याला अडवले. ३१ इतकेच काय, तर उत्सवांच्या व खेळांच्या आयोजकांपैकी काही, जे पौलच्या परिचयाचे होते, त्यांनी त्याला निरोप पाठवला आणि नाट्यगृहात जाऊन आपला जीव धोक्यात न घालण्याची विनंती केली. ३२ जमावात कोणी काही, तर कोणी काही ओरडत होते; कारण सर्व लोक गोंधळलेले होते आणि त्यांच्यापैकी बहुतेकांना आपण इथे का जमलो आहोत, हेच माहीत नव्हते. ३३ तेव्हा, त्यांनी आलेक्सांद्रला पुढे केले आणि यहुद्यांनी त्याला ढकलत लोकांपुढे आणले. मग, आलेक्सांद्रने लोकांना खुणावून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ३४ पण, तो यहुदी असल्याचे लक्षात येताच, ते सर्व एका आवाजात “इफिसकरांची अर्तमी देवी महान!” असे तब्बल दोन तास ओरडत राहिले.
३५ शेवटी, नगर-प्रमुखाने जमावाला कसेबसे शांत करून म्हटले: “इफिसकरांनो, असा कोण आहे ज्याला हे माहीत नाही, की इफिस शहर महान अर्तमी देवीच्या मंदिराचं आणि आकाशातून पडलेल्या मूर्तीचं रक्षक आहे? ३६ ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही; म्हणून शांत राहा आणि उतावळेपणाने काही करू नका. ३७ कारण ही जी माणसं तुम्ही इथं आणली आहेत, ती मंदिरं लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत. ३८ तर मग, देमेत्रिय आणि त्याच्या कारागिरांची कोणाविरुद्ध काही तक्रार असल्यास, यासाठी विशिष्ट दिवशी न्यायालये उघडी असतात आणि राज्यपालसुद्धा* आहेत. तेव्हा, त्यांनी तिथे जाऊन एकमेकांवर आरोप लावावेत. ३९ पण, याशिवाय तुमची दुसरी काही तक्रार असेल, तर त्याविषयी कायद्याप्रमाणे नेमलेल्या सभेत ठरवलं जाईल. ४० खरंतर, आजच्या या प्रकरणावरून आपल्यावर राजद्रोहाचा आरोप लावला जाऊ शकतो, कारण ही दंगल का झाली यासाठी आपल्याला कोणतंही कारण देता येणार नाही.” ४१ असे म्हणून त्याने लोकांना पाठवून दिले.