प्रेषितांची कार्यं
१८ यानंतर, पौल अथेन्सहून निघाला व करिंथ शहरात आला. २ तिथे त्याला अक्विल्ला नावाचा एक यहुदी मनुष्य भेटला. मुळात तो पंत इथला राहणारा होता. पण, क्लौद्य याने सर्व यहुद्यांना रोम सोडून जाण्याचा हुकूम दिल्यामुळे तो नुकताच आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासोबत इटलीहून आला होता. त्यामुळे, पौल त्यांच्याकडे आला, ३ आणि त्यांचा एकच व्यवसाय असल्यामुळे तो त्यांच्याच घरी राहून त्यांच्यासोबत काम करू लागला. त्यांचा तंबू बनवण्याचा व्यवसाय होता. ४ दर शब्बाथाच्या दिवशी तो सभास्थानात भाषण देऊन* सर्व यहुदी व ग्रीक लोकांना आपण सांगत असलेल्या गोष्टींची खातरी पटवून द्यायचा.
५ मग, सीला आणि तीमथ्य हे दोघे मासेदोनियाहून आले, तेव्हा वचनाच्या कार्यासाठी पौलने स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. यहुद्यांना साक्ष देऊन येशू हाच ख्रिस्त आहे याची तो त्यांना खातरी पटवून देऊ लागला. ६ पण, ते त्याचा विरोध करत राहिले आणि त्याच्याविषयी बरेवाईट बोलत राहिले; तेव्हा आपले कपडे झटकून तो त्यांना म्हणाला: “तुमच्या रक्ताचा दोष तुमच्याच माथी येवो. मी निर्दोष आहे. आतापासून मी विदेशी लोकांकडे जाईन.” ७ मग, त्याने सभास्थान सोडून दिले आणि तो तीत युस्त नावाच्या एका मनुष्याच्या घरी गेला; हा देवाचा एक उपासक असून त्याचे घर सभास्थानाला लागून होते. ८ तेव्हा, सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प व त्याच्या संपूर्ण घराण्याने प्रभूवर विश्वास ठेवला. हे ऐकल्यावर करिंथमधील अनेक लोकांनीही विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. ९ शिवाय, रात्रीच्या वेळी प्रभूने दृष्टान्तात पौलला म्हटले: “घाबरू नकोस! बोलत राहा, शांत राहू नकोस! १० कारण मी तुझ्यासोबत आहे, त्यामुळे कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तुला काही हानी करणार नाही; कारण या शहरात माझे आणखी बरेच लोक आहेत.” ११ त्यामुळे, तो दीड वर्षे तिथे राहून त्यांना देवाचे वचन शिकवत राहिला.
१२ मग, गल्लियो हा अखयाचा राज्यपाल* असताना सर्व यहुदी लोक मिळून पौलविरुद्ध उठले आणि त्याला न्यायासनासमोर नेऊन म्हणाले: १३ “हा माणूस, नियमशास्त्रानुसार योग्य नसलेल्या पद्धतीने देवाची उपासना करायला लोकांना शिकवत आहे.” १४ पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहुद्यांना म्हणाला: “यहुदी लोकांनो! हा एखाद्या अन्यायाचा किंवा गंभीर अपराधाचा प्रश्न असता, तर मी शांतपणे तुमचं ऐकून घेतलं असतं. १५ पण, हा जर शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा प्रश्न असेल, तर तुमचं तुम्हीच पाहा. कारण असल्या प्रकरणांत मी तुमचा न्यायाधीश होऊ इच्छित नाही.” १६ असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले. १७ तेव्हा, त्या सर्वांनी मिळून सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस याला धरले आणि न्यायासनासमोर त्याला मारहाण करू लागले. गल्लियो मात्र त्यांच्या या प्रकरणात मुळीच पडला नाही.
१८ पण, बरेच दिवस बांधवांसोबत राहिल्यानंतर पौलने त्यांचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांच्यासोबत तो समुद्रमार्गाने सूरियाला निघून गेला. त्याने एक नवस केला असल्यामुळे किंख्रियामध्ये त्याने आपल्या डोक्यावरचे केस कापले. १९ मग, इफिसला आल्यावर त्याने त्यांना तिथेच सोडले. पण, तो स्वतः सभास्थानात गेला आणि यहुद्यांसोबत तर्क करू लागला. २० ते त्याला आणखी काही दिवस आपल्यासोबत राहण्याची विनंती करत राहिले, पण तो तयार झाला नाही. २१ उलट, त्यांचा निरोप घेऊन तो म्हणाला: “यहोवाची* इच्छा असेल, तर मी तुमच्याकडे परत येईन.” मग, तो इफिसहून समुद्रमार्गाने निघून २२ खाली कैसरीया इथे आला. मग, वर* जाऊन तो मंडळीला भेटला आणि तिथून निघून खाली अंत्युखियाला गेला.
२३ तिथे काही दिवस राहिल्यानंतर तो निघाला आणि मग गलतीया व फ्रुगिया प्रदेशांत ठिकठिकाणी जाऊन त्याने सर्व शिष्यांचा विश्वास बळकट केला.
२४ तेव्हा, आलेक्सांद्रियाचा रहिवासी असलेला अपुल्लो नावाचा एक यहुदी इफिसला आला; तो उत्तम वक्ता व शास्त्रवचनांचा जाणकार होता. २५ या माणसाला यहोवाच्या* मार्गाचे शिक्षण देण्यात आले होते* आणि आत्म्याने परिपूर्ण असल्यामुळे त्याच्यामध्ये ज्वलंत आवेश होता. तो येशूबद्दलच्या गोष्टी अचूकपणे बोलत व शिकवत होता. पण, त्याला फक्त योहानने प्रचार केलेल्या बाप्तिस्म्याबद्दलच माहीत होते. २६ तो सभास्थानात धैर्याने बोलू लागला. प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी जेव्हा तो शिकवत असलेल्या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांनी त्याला आपल्यासोबत घेतले आणि देवाच्या मार्गाबद्दल त्याला अधिक अचूकपणे समजावून सांगितले. २७ नंतर, त्याने पलीकडे अखयाला जाण्याचा विचार केला तेव्हा तिथल्या शिष्यांनी त्याचे आनंदाने स्वागत करावे, असे बांधवांनी त्यांना लिहून कळवले. तिथे पोचल्यावर त्याने देवाच्या अपार कृपेमुळे विश्वासात आलेल्यांना खूप मदत केली; २८ कारण त्याने जाहीरपणे व अतिशय प्रभावीपणे बोलून यहुद्यांना पूर्णपणे निरुत्तर केले, आणि येशू हाच ख्रिस्त असल्याचे शास्त्रवचनांतून सिद्ध करून दाखवले.