योहान
७ यानंतर येशू गालीलमध्येच फिरू लागला. त्याला यहूदीयात जायचे नव्हते कारण यहुदी लोक त्याला ठार मारण्याची संधी शोधत होते. २ आता यहुद्यांचा मंडपांचा* सण जवळ आला होता. ३ त्यामुळे, त्याचे भाऊ त्याला म्हणाले: “तू करत असलेली कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत म्हणून इथून निघून यहूदीयात जा. ४ लोकांनी आपल्याला ओळखावं असं ज्या कोणाला वाटतं, तो गुप्तपणे काहीही करत नाही. तू या गोष्टी करत आहेस, तर मग स्वतःला जगापुढे प्रकट कर.” ५ खरेतर त्याचे भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. ६ म्हणून, येशू त्यांना म्हणाला: “माझी वेळ अजून आलेली नाही, पण तुमच्यासाठी कोणतीही वेळ योग्य आहे. ७ जगाला तुमचा द्वेष करण्याचं काहीच कारण नाही. पण, जगाची कामे दुष्ट आहेत अशी मी त्याविषयी साक्ष देत असल्यामुळे जग माझा द्वेष करते. ८ तुम्ही वर सणाला जा; पण माझी वेळ अजून आलेली नाही, त्यामुळे मी आताच या सणाला येणार नाही.” ९ त्यांना असे सांगितल्यानंतर तो गालीलमध्येच राहिला.
१० त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही गेला. पण तो उघडपणे गेला नाही, तर गुप्तपणे गेला. ११ त्यामुळे यहुदी त्याला सणात शोधू लागले आणि म्हणाले: “तो माणूस कुठे आहे?” १२ जमलेल्या लोकांमध्येही त्याच्याबद्दल बरीच कुजबूज चालली होती. काही लोक म्हणत होते: “तो चांगला माणूस आहे.” तर इतर जण म्हणत होते: “नाही, तो लोकांना फसवतो.” १३ अर्थात, यहुद्यांच्या भीतीमुळे कोणीही उघडपणे त्याच्याबद्दल काहीही बोलत नव्हते.
१४ सण अर्धा संपल्यावर येशू मंदिरात गेला आणि तिथे शिकवू लागला. १५ तेव्हा यहुदी आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले: “हा मनुष्य धर्मगुरूंच्या शाळांमध्ये* शिकला नाही, मग त्याला शास्त्राचं* इतकं ज्ञान कसं काय?” १६ येशूने त्यांना उत्तर दिले: “मी जे शिकवतो ते माझं स्वतःचं नसून, ज्याने मला पाठवलं त्याच्याकडून आहे. १७ जर कोणाला देवाच्या इच्छेप्रमाणे करायचं असेल, तर ही शिकवण देवाकडून आहे की मी स्वतःच्या मनाने बोलतो, हे तो ओळखेल. १८ जो स्वतःच्या मनाने बोलतो, तो स्वतःची स्तुती व्हावी असा प्रयत्न करतो; पण जो आपल्या पाठवणाऱ्याची स्तुती करण्याचा प्रयत्न करतो, तो खरा आहे आणि त्याच्यामध्ये कसलाच खोटेपणा नाही. १९ मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिलं, नाही का? पण तुमच्यापैकी कोणीही नियमशास्त्राचं पालन करत नाही. तुम्ही माझ्या जिवावर का उठला आहात?” २० लोकसमुदायाने उत्तर दिले: “तुला दुरात्म्याने पछाडलं आहे. कोण तुझ्या जिवावर उठलं आहे?” २१ येशूने त्यांना उत्तर दिले: “मी एक कृत्य केलं आणि तुम्हा सर्वांना त्याचं आश्चर्य वाटत आहे. २२ म्हणून यावर विचार करा: मोशेने तुम्हाला सुंतेविषयीची* आज्ञा दिली होती—अर्थात ती मोशेच्या काळापासून नाही, तर आपल्या पूर्वजांच्या काळापासूनच आहे—आणि त्यामुळे तुम्ही शब्बाथाच्या दिवशीही सुंता करता. २३ मोशेची आज्ञा मोडली जाऊ नये म्हणून तुम्ही शब्बाथाच्या दिवशीही मनुष्याची सुंता करता, तर मग मी एका मनुष्याला शब्बाथाच्या दिवशी पूर्ण बरं केलं, म्हणून तुम्ही माझ्यावर एवढे का संतापला आहात? २४ वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या आधारावर न्याय करण्याचं सोडून द्या, तर खरेपणाने न्याय करा.”
२५ तेव्हा यरुशलेममध्ये राहणारे काही लोक म्हणू लागले: “ज्याला ठार मारण्याचा ते प्रयत्न करत आहेत, तो हाच माणूस आहे ना? २६ तरी पाहा! तो सर्वांसमोर उघडपणे बोलत आहे आणि ते त्याला काहीही म्हणत नाहीत. हाच ख्रिस्त असल्याची अधिकाऱ्यांना खातरी पटली आहे की काय? २७ हा माणूस कुठला आहे हे आपल्याला माहीत आहे; पण, ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला आहे हे कोणालाही माहीत नसेल.” २८ मग मंदिरात शिकवत असताना येशू मोठ्याने म्हणाला: “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्हाला माहीत आहे. आणि मी स्वतःहून आलेलो नाही तर मला पाठवणारा खरा आहे. त्याला तुम्ही ओळखत नाही. २९ मी त्याला ओळखतो कारण मी त्याच्या वतीने आलो आहे आणि त्यानेच मला पाठवलं आहे.” ३० तेव्हा ते त्याला धरण्याची संधी शोधू लागले, पण कोणीही त्याच्यावर हात टाकला नाही कारण त्याची वेळ अजून आली नव्हती. ३१ तरी जमलेल्या लोकांपैकी अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण ते म्हणाले: “ख्रिस्त येईल तेव्हा तो या मनुष्याने केले त्यापेक्षा जास्त चमत्कार* करेल का?”
३२ लोकांमध्ये त्याच्याविषयी चाललेली ही कुजबूज परूश्यांनी ऐकली. तेव्हा, मुख्य याजक व परूशी यांनी त्याला धरण्यासाठी* शिपायांना पाठवले. ३३ तेव्हा येशू म्हणाला: “मी तुमच्यासोबत आता थोडाच काळ असेन. मग मला पाठवणाऱ्याकडे मी परत जाईन. ३४ तुम्ही मला शोधाल, पण मी तुम्हाला सापडणार नाही आणि जिथे मी असेन तिथे तुम्ही येऊ शकत नाही.” ३५ म्हणून यहुदी आपसात म्हणू लागले: “हा माणूस असा कुठे जायला निघाला आहे, की आपल्याला तो सापडणार नाही? यहुद्यांमध्ये विखुरलेल्या ग्रीक लोकांत जाऊन त्यांना शिकवण्याचा तर याचा इरादा नाही ना? ३६ ‘तुम्ही मला शोधाल, पण मी तुम्हाला सापडणार नाही आणि जिथे मी असेन तिथे तुम्ही येऊ शकत नाही,’ या त्याच्या बोलण्याचा काय अर्थ?”
३७ शेवटल्या दिवशी, म्हणजे सणाच्या सर्वात महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला: “जो कोणी तहानलेला असेल त्याने माझ्याकडे यावं, म्हणजे मी त्याला प्यायला पाणी देईन. ३८ जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, ‘त्याच्या अंतःकरणातून जीवन देणाऱ्या पाण्याचे झरे वाहतील,’ हे शास्त्रात लिहिलेले शब्द खरे ठरतील.” ३९ पण तो हे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना लवकरच मिळणार असलेल्या पवित्र आत्म्याच्या संदर्भात बोलला होता; आतापर्यंत त्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता, कारण येशूला अजून गौरवण्यात आले नव्हते. ४० हे शब्द ऐकून लोकसमुदायातले काही म्हणू लागले: “हा खरंच भाकीत केलेला संदेष्टा आहे.” ४१ इतर जण म्हणाले: “हाच ख्रिस्त आहे.” पण काही जण म्हणाले: “ख्रिस्त गालीलमधून येणार नव्हता. ४२ तो तर दावीदच्या वंशातून आणि दावीदच्या गावातून म्हणजे बेथलेहेममधून येईल असं शास्त्रात सांगितलेलं आहे.” ४३ अशा रीतीने, जमलेल्या लोकांत त्याच्यावरून वाद निर्माण झाला. ४४ काहींना त्याला धरण्याची* इच्छा होती, पण कोणीही त्याच्यावर हात टाकला नाही.
४५ मग शिपाई मुख्य याजक व परूशी यांच्याकडे परत गेले. तेव्हा ते शिपायांना म्हणाले: “तुम्ही त्याला का धरून आणलं नाही?” ४६ शिपायांनी उत्तर दिले: “आम्ही कोणालाही आजपर्यंत असं बोलताना ऐकलेलं नाही.” ४७ तेव्हा परूशी म्हणाले: “तुम्हीपण फसला की काय? ४८ अधिकाऱ्यांपैकी किंवा परूश्यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का? ४९ पण या लोकसमुदायाला नियमशास्त्राचं ज्ञान नाही, हे शापित लोक आहेत.” ५० निकदेम जो पूर्वी येशूकडे आला होता आणि जो परूश्यांपैकी एक होता, तो त्यांना म्हणाला: ५१ “एखाद्याचं ऐकून घेतल्याशिवाय आणि तो काय करतो हे जाणून घेतल्याशिवाय आपल्या नियमशास्त्रानुसार त्याला दोषी ठरवता येत नाही, येतं का?” ५२ तेव्हा ते त्याला म्हणाले: “तूसुद्धा गालीलचा आहेस की काय? शास्त्रात शोधून पाहा, गालीलमधून कोणताही संदेष्टा येईल असं सांगितलेलं नाही.”*