योहान
६ यानंतर येशू गालील, म्हणजेच तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. २ आणि लोकांचा एक मोठा समुदाय त्याच्या मागेमागे गेला, कारण तो कशा प्रकारे चमत्कार* करून आजारी लोकांना बरे करत आहे हे त्यांनी पाहिले होते. ३ मग येशू एका डोंगरावर जाऊन आपल्या शिष्यांसोबत बसला. ४ आता वल्हांडण हा यहुदी लोकांचा सण जवळ आला होता. ५ येशूने नजर वर करून पाहिले, तेव्हा त्याला एक मोठा लोकसमुदाय येताना दिसला. तो फिलिप्पला म्हणाला: “या लोकांना खाऊ घालण्यासाठी आपण भाकरी कुठून विकत आणाव्यात?” ६ पण, तो फक्त त्याची परीक्षा पाहण्यासाठी असे म्हणत होता, कारण थोड्याच वेळात आपण काय करणार आहोत हे त्याला माहीत होते. ७ फिलिप्पने त्याला उत्तर दिले: “आपण दोनशे दिनारांच्या* भाकरी आणल्या, तरी प्रत्येकाला थोडीथोडीही मिळणार नाही.” ८ त्याच्या शिष्यांपैकी एक असलेला, शिमोन पेत्रचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला: ९ “इथे एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. पण इतक्या लोकांना हे अन्न कसं पुरणार?”
१० येशू म्हणाला: “माणसांना खाली बसायला सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत असल्यामुळे लोक त्यावर बसले. त्यांत पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार इतकी होती. ११ येशूने त्या भाकरी घेतल्या आणि देवाला धन्यवाद दिल्यावर तिथे बसलेल्या लोकांना त्या वाटून दिल्या; मग दोन लहान मासे घेऊन त्याने तसेच केले आणि प्रत्येकाला पाहिजे तितके दिले. १२ मग सर्व जण पोटभर जेवल्यावर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: “काहीही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” १३ तेव्हा त्यांनी ते गोळा केले आणि पाच जवाच्या भाकरींतून उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या.
१४ त्याने केलेला हा चमत्कार* पाहून लोक म्हणू लागले: “जो संदेष्टा जगात येणार होता, तो हाच आहे.” १५ तेव्हा, लोक आपल्याला बळजबरीने राजा बनवण्यासाठी धरायला येत आहेत, हे ओळखून येशू पुन्हा एकटाच डोंगरावर निघून गेला.
१६ संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले, १७ आणि एका नावेत चढून ते समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमला जायला निघाले. तोपर्यंत अंधार पडला होता, पण येशू अजूनही त्यांच्याजवळ परत आला नव्हता. १८ तसेच, जोराचा वारा वाहत असल्यामुळे समुद्र खवळू लागला होता. १९ पण, सुमारे पाच-सहा किलोमीटरचे* अंतर पार करून गेल्यावर, त्यांना येशू समुद्रावर चालत त्यांच्या नावेकडे येताना दिसला. हे पाहून त्यांना खूप भीती वाटली. २० पण तो त्यांना म्हणाला: “मी आहे, घाबरू नका!” २१ तेव्हा कुठे ते त्याला नावेत घ्यायला तयार झाले, आणि काही वेळातच त्यांची नाव, त्यांना जायचे होते त्या ठिकाणी येऊन पोचली.
२२ दुसऱ्या दिवशी, समुद्राच्या अलीकडे जे लोक थांबले होते त्यांना तिथे असलेली छोटी नाव दिसली नाही. आणि त्यांना कळले की येशू शिष्यांसोबत त्या नावेतून गेला नव्हता, तर फक्त शिष्यच गेले होते. २३ पण, प्रभूने धन्यवाद दिल्यावर ज्या ठिकाणी त्यांनी भाकर खाल्ली होती, त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून काही नावा आल्या. २४ तेव्हा, येशू किंवा त्याचे शिष्यही तिथे नाहीत हे पाहून लोक त्या नावांमध्ये चढले आणि त्याला शोधायला कफर्णहूमला गेले.
२५ समुद्राच्या पलीकडे गेल्यावर तो त्यांना दिसला तेव्हा ते त्याला म्हणाले: “रब्बी,* तुम्ही इथे केव्हा आलात?” २६ येशूने त्यांना उत्तर दिले: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही चमत्कार* पाहिल्यामुळे मला शोधत आला नाहीत, तर भाकरी खाऊन तुमचं पोट भरल्यामुळे शोधत आला आहात. २७ नाश होणाऱ्या अन्नासाठी खटपट करू नका, तर जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं, अशा अन्नासाठी खटपट करा. हे अन्न मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल. कारण त्याच्यावर पित्याने म्हणजे स्वतः देवाने आपल्या पसंतीची मोहर लावली आहे.”
२८ तेव्हा ते त्याला म्हणाले: “देवाची पसंती मिळावी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे?” २९ येशूने त्यांना उत्तर दिले: “देवाने ज्याला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला देवाची पसंती मिळेल.” ३० तेव्हा ते त्याला म्हणाले: “आम्ही पाहून विश्वास ठेवावा म्हणून तू कोणता चमत्कार* करणार आहेस? कोणतं कार्य करणार आहेस? ३१ आमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला. याविषयी असं लिहिलं आहे: ‘त्याने त्यांना स्वर्गातली भाकर खायला दिली.’” ३२ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातली भाकर दिली नाही, पण माझा पिता तुम्हाला स्वर्गातली खरी भाकर देत आहे. ३३ कारण जो स्वर्गातून उतरला आहे आणि जो जगाला जीवन देतो, तोच देवाची भाकर आहे.” ३४ म्हणून ते त्याला म्हणाले: “प्रभू, ही भाकर आम्हाला नेहमी देत जा.”
३५ येशू त्यांना म्हणाला: “मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. ३६ पण जसं मी तुम्हाला म्हणालो होतो, तुम्ही मला पाहिलं आहे, तरीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही. ३७ पित्याने मला जे दिले आहेत, ते सर्व माझ्याकडे येतील आणि जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी कधीही दूर करणार नाही; ३८ कारण मी स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वर्गातून आलो नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे. ३९ आणि मला पाठवणाऱ्याची हीच इच्छा आहे की त्याने मला जे सर्व दिले आहेत, त्यांपैकी एकालाही मी गमावू नये, तर शेवटल्या दिवशी त्यांचं पुनरुत्थान* करावं. ४० कारण माझ्या पित्याची हीच इच्छा आहे, की जो कोणी पुत्राला ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं. शेवटल्या दिवशी मी त्याचं पुनरुत्थान* करेन.”
४१ “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” असे त्याने म्हटल्यामुळे यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले ४२ आणि म्हणू लागले: “हा योसेफचा मुलगा येशूच आहे ना? याच्या आईवडिलांना तर आपण ओळखतो, मग हा असं का म्हणतो, की ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’?” ४३ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “कुरकुर करू नका. ४४ ज्याने मला पाठवलं त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही, आणि मी शेवटल्या दिवशी त्याचं पुनरुत्थान* करेन. ४५ संदेष्ट्यांच्या लिखाणांत असं लिहिलं आहे: ‘ते सर्व यहोवाने* शिकवलेले असे असतील.’ ज्याने माझ्या पित्याचं ऐकलं आहे आणि शिकून घेतलं आहे, तो प्रत्येक जण माझ्याकडे येतो. ४६ कोणत्याही मनुष्याने पित्याला पाहिलेलं नाही; फक्त जो देवाकडून आहे, त्यानेच पित्याला पाहिलं आहे. ४७ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.
४८ जीवन देणारी भाकर मीच आहे. ४९ तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मेले. ५० पण, जो कोणी स्वर्गातून उतरणारी खरी भाकर खाईल तो मरणार नाही. ५१ स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ही भाकर खाणारा प्रत्येक जण सर्वकाळ जगेल; आणि खरोखर, मी देत असलेली भाकर म्हणजे माझं शरीर आहे, जे मी जगाला जीवन मिळावं म्हणून देईन.”
५२ तेव्हा यहुदी एकमेकांसोबत वाद घालू लागले व म्हणू लागले: “हा मनुष्य आपल्याला त्याचं शरीर कसं काय खायला देईल?” ५३ म्हणून येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचं मांस खात नाही आणि त्याचं रक्त पीत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन मिळणार नाही. ५४ जो कोणी माझं मांस खातो आणि माझं रक्त पितो, त्याला सर्वकाळाचं जीवन मिळालं आहे आणि मी शेवटल्या दिवशी त्याचं पुनरुत्थान* करेन; ५५ कारण माझं मांस हे खरं अन्न आहे, आणि माझं रक्त हे खरं पेय आहे. ५६ जो कोणी माझं मांस खातो आणि माझं रक्त पितो तो माझ्यासोबत ऐक्यात राहतो आणि मी त्याच्यासोबत ऐक्यात राहतो. ५७ ज्या प्रकारे जिवंत पित्याने मला पाठवलं आणि मी पित्यामुळे जिवंत आहे, त्याच प्रकारे जो कोणी माझं मांस खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील. ५८ हीच स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी जी खाल्ली आणि तरी मेले, तशी ही भाकर नाही. तर, ही भाकर खाणारा सर्वकाळ जिवंत राहील.” ५९ कफर्णहूमातल्या एका सभास्थानात* शिकवत असताना तो या गोष्टी बोलला.
६० त्या ऐकल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण म्हणाले: “किती धक्कादायक आहे हे! कोण ऐकून घेऊ शकतो अशा गोष्टी?” ६१ पण शिष्य याविषयी कुरकुर करत आहेत हे ओळखून तो त्यांना म्हणाला: “तुम्हाला माझं हे बोलणं धक्कादायक वाटतं का? ६२ मग मनुष्याचा पुत्र जिथून आला तिथे परत जाताना तुम्ही पाहाल, तेव्हा तुम्हाला किती मोठा धक्का बसेल? ६३ देवाचा पवित्र आत्मा हाच जीवनदायी आहे; शरीर काहीही उपयोगाचं नाही. मी ज्या गोष्टी तुम्हाला बोललो त्या आध्यात्मिक स्वरूपाच्या आणि जीवनदायी आहेत. ६४ पण तुमच्यापैकी काही जण विश्वास ठेवत नाहीत.” विश्वास न ठेवणारे कोण आहेत आणि कोण आपल्याला धरून देणार आहे, हे येशूला सुरुवातीपासूनच माहीत असल्यामुळे तो असे बोलला. ६५ तो पुढे म्हणाला: “म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, की पित्याने परवानगी दिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.”
६६ यामुळे, त्याच्या शिष्यांपैकी बऱ्याच जणांनी त्याच्यामागे चालण्याचे सोडून दिले आणि पूर्वी ते ज्या गोष्टी करत होते, त्यांकडे परत गेले. ६७ तेव्हा येशू बारा प्रेषितांना म्हणाला: “तुम्हालाही जायचं आहे का?” ६८ शिमोन पेत्रने त्याला उत्तर दिले: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत. ६९ आम्ही विश्वास ठेवला आहे आणि देवाचा जो पवित्र तो तू आहेस हे आम्ही ओळखलं आहे.” ७० येशूने त्यांना उत्तर दिले: “मी तुम्हा बाराही जणांना निवडलं नव्हतं का? तरी तुमच्यापैकी एक जण निंदक* आहे.” ७१ खरेतर तो शिमोन इस्कर्योत याचा मुलगा यहूदा याच्याविषयी बोलत होता, कारण तो बारा प्रेषितांपैकी असूनसुद्धा येशूचा विश्वासघात करून त्याला धरून देणार होता.