आव्हानांवर पूर्णपणे मात कशी केली जाईल?
देवाच्या राज्यात “विपुल शांती असेल”
फार काळापासून एका राज्याची वाट पाहिली जात आहे. ते म्हणजे देवाचं राज्य किंवा सरकार. देवाने स्थापलेलं हे जागतिक सरकार लवकरच येईल. यात सर्व मानवजात शांतीने आणि एकतेने राहील. तेव्हा “विपुल शांती” अनुभवता येईल असं स्तोत्र ७२:७ मध्ये सांगण्यात आलं आहे. पण हे राज्य नेमकं कधी येईल? ते या सर्व गोष्टी कशा साध्य करेल? आणि या राज्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
देवाचं राज्य कधी येईल?
देवाचं राज्य लवकरच येणार आहे हे दाखवणाऱ्या काही घटनांबद्दल बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. या सर्व घटना एका ‘चिन्हाला’ सूचित करतात. यात जागतिक युद्ध, दुष्काळ, आजार, भूकंप, आणि अनीती वाढणं अशा गोष्टींचा समावेश आहे.—मत्तय २४:३, ७, १२; लूक २१:११; प्रकटीकरण ६:२-८.
आणखी एका भविष्यवाणीत असं सांगितलंय: “शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. कारण, लोक केवळ स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे . . . आईवडिलांचे न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले . . . अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले” असे असतील. (२ तीमथ्य ३:१-४) अशा प्रकारचे गुण काही लोकांमध्ये आधीपासूनच दिसून येत होते, पण अशी वृत्ती असलेले लोक आपल्याला आजकाल सगळीकडेच पाहायला मिळतात.
१९१४ या सालापासून या भविष्यवाण्यांची पूर्णता व्हायला सुरुवात झाली. या वर्षानंतर जग कसं बदललं याबद्दल इतिहासकार, राजकारणी व्यक्ती आणि लेखकांनी प्रतिक्रिया दिली. उदाहरणार्थ, पीटर मंच या डॅनिश इतिहारकाराने असं लिहिलं: “१९१४ मध्ये झालेलं युद्ध मानवाच्या इतिहासाला एक वळण देणारी घटना होती. त्या वर्षाआधी लोकांना वाटत होतं की जगाची परिस्थिती सुधारत चालली आहे . . . पण आपण विनाश, भय आणि द्वेष यांच्या अशा युगात शिरलो जिथे सर्वत्र असुरक्षितताच आहे.”
पण एक चांगली गोष्ट म्हणजे, अशा भयानक घटनांनंतर एक शांतीदायक परिस्थिती लवकरच येईल. यावरून असं दिसून येतं की संपूर्ण पृथ्वीवर लवकरच देवाचं राज्य येणार आहे. खरंतर येशूनेही अंताच्या चिन्हाची ही सकारात्मक बाजू आधीच सांगितली होती. तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल, आणि त्यानंतर अंत येईल.”—मत्तय २४:१४.
यहोवाचे साक्षीदार जो संदेश सांगतात त्याचा मुख्य विषय हाच आनंदाचा संदेश आहे. मानव आणि पृथ्वीसाठी देवाचं राज्य कोणत्या अद्भुत गोष्टी करेल याबद्दल या नियतकालिकात नियमितपणे माहिती दिली जाते.
देवाचे राज्य कसं राज्य करेल?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार मुख्य गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल:
१. हे राज्य चालवण्यासाठी आजच्या कोणत्याही मानवी नेत्यांचा वापर केला जाणार नाही.
२. जगातले मानवी नेते आपला अधिकार सहजासहजी सोडणार नाहीत आणि मूर्खपणे देवाच्या राज्याचा विरोध करतील.—स्तोत्र २:२-९.
३. मानवांवर हुकूम करू पाहणाऱ्या राजनैतिक सरकारांना देवाचं राज्य नष्ट करेल. (दानीएल २:४४; प्रकटीकरण १९:१७-२१) जागतिक पातळीवर होणाऱ्या या शेवटच्या युद्धाला हर्मगिदोन असं म्हटलं आहे.—प्रकटीकरण १६:१४, १६.
४. हर्मगिदोननंतर शांतीपूर्ण नवीन जगात फक्त असेच लोक राहतील, जे स्वतःच्या इच्छेने देवाच्या राज्याला अधीन राहतात. या लाखो लोकांचा मिळून एक “मोठा लोकसमुदाय” असेल असं बायबल सांगतं.—प्रकटीकरण ७:९, १०, १३, १४.
देवाच्या राज्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
देवाच्या राज्याचं नागरिक होण्याची पहिली पायरी म्हणजे त्या राज्याबद्दल शिकणं. येशूनेदेखील प्रार्थनेत त्याच्या पित्याला म्हटलं: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.”—योहान १७:३.
लोक जेव्हा यहोवा देवाला एक व्यक्ती म्हणून ओळखू लागतात तेव्हा त्यांना बरेच फायदे होतात. त्यांतील दोन फायद्यांचा विचार करा. पहिला म्हणजे, त्यांचा देवावरचा विश्वास खूप मजबूत होतो. पुराव्यांवर आधारित असलेल्या विश्वासामुळे त्यांना खात्री पटते की देवाचं राज्य एक खरोखरचं सरकार आहे आणि ते लवकरच राज्य करेल. (इब्री लोकांना ११:१) दुसरा फायदा म्हणजे, देवावर आणि शेजाऱ्यांवर त्यांचं प्रेम वाढू लागतं. देवावर असलेल्या प्रेमामुळे ते त्याची आज्ञा मनापासून पाळतात. शेजाऱ्यावर असलेल्या प्रेमामुळे ते येशूच्या शब्दांचं पालन करण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यात म्हटलं आहे: “लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागा.”—लूक ६:३१.
एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्या निर्माणकर्त्याला आपल्याला नेहमी चांगल्या गोष्टी देण्याची इच्छा असते. आपण “खरे जीवन” याचा आनंद घ्यावा अशी यहोवा देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य ६:१९) आजचं जीवन ‘खरं जीवन’ नाही. आज लाखो लोकांना जीवन जगणं खूप कठीण जातं आणि त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. ‘खरं जीवन’ कसं असेल याची झलक तुम्हाला पाहायची असेल, तर देवाचं राज्य लोकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करेल याकडे लक्ष द्या.
देवाच्या राज्यात लोक सुरक्षित असतील आणि त्यांच्याकडे खाण्यासाठी भरपूर अन्न-धान्य असेल