१ योहान
१ जे सुरुवातीपासून होते, ज्याविषयी आम्ही ऐकले, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले, ज्याचे आम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केले आणि ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला, त्या जीवनाच्या वचनाविषयी, २ (हो, ते जीवन प्रकट झाले आणि आम्ही ते पाहिले; जे पित्याजवळ होते आणि आमच्यासमोर प्रकट झाले, त्या सर्वकाळाच्या जीवनाविषयी आम्ही साक्ष देत आहोत आणि तुम्हाला सांगत आहोत), ३ आम्ही जे पाहिले आणि ऐकले ते तुम्हालाही सांगत आहोत, यासाठी की तुम्हीही आमच्यासोबत जोडले जावे.* आणि आम्ही पित्यासोबत आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यासोबत जोडलेले आहोत. ४ आणि आपल्या सर्वांचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून आम्ही या गोष्टी लिहीत आहोत.
५ जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत तो असा: देव प्रकाश आहे, आणि त्याच्यामध्ये अंधार मुळीच नाही. ६ “आपण त्याच्यासोबत जोडलेले आहोत,” असे जर आपण म्हटले आणि तरीसुद्धा अंधारात चालत राहिलो, तर आपण खोटे बोलत आहोत आणि सत्यानुसार चालत नाही. ७ पण, जसा तो स्वतः प्रकाशात आहे, तसे जर आपणही प्रकाशात चालत राहिलो, तर मात्र आपण एकमेकांशी जोडलेले आहोत आणि त्याचा पुत्र, येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
८ “आपल्यामध्ये पाप नाही,” असे जर आपण म्हटले, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत आणि आपल्यामध्ये सत्य नाही. ९ पण, जर आपण आपली पापे कबूल केली तर तो आपल्याला क्षमा करेल आणि सर्व अनीतीपासून शुद्ध करेल, कारण तो विश्वासू व नीतिमान आहे. १० “आपण पापी नाही,” असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला खोटे ठरवत आहोत आणि त्याचे वचन आपल्यामध्ये नाही.