बायबलमधल्या वचनांचं स्पष्टीकरण
नीतिवचनं २२:६—“मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे”
“मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे, म्हणजे म्हातारपणीही तो त्यापासून वळणार नाही.”—नीतिवचनं २२:६, नवे जग भाषांतर.
“मुलाच्या स्थितीस अनुरूप असें शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणींहि तो त्यापासून परावृत्त होणार नाहीं.”—नीतिसूत्रें २२:६, द होली बायबल मराठी—आर.व्ही.
नीतिवचनं २२:६ याचा अर्थ
जे आईवडील आपल्या मुलांना देवावर प्रेम करायला आणि त्याच्या आज्ञांचा आदर करायला शिकवतात, ते या गोष्टीची खातरी बाळगू शकतात की त्यांच्या मुलांना याचा आयुष्यभर फायदा होईल.
“मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे.” या वाक्यांशाला, “मुलाला योग्य मार्गावर चालायला लाव” अशा पद्धतीनेही म्हटलं जाऊ शकतं. नीतिवचनं या पुस्तकात आईवडिलांना वारंवार असं सांगण्यात आलंय, की त्यांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच चांगल्या-वाइटातला फरक शिकवावा. (नीतिवचनं १९:१८; २२:१५; २९:१५) असं असलं तरी आईवडिलांना जाणीव असते, की मोठ्यांप्रमाणे आपल्या मुलांनाही इच्छास्वातंत्र्य आहे. त्यामुळे काय केलं पाहिजे हे फक्त मुलांना सांगण्याऐवजी ते त्यांच्यासोबत तर्क करू शकतात आणि त्यांना एक जबाबदार आणि प्रौढ व्यक्ती बनायला मदत करू शकतात. यामुळे मुलांना स्वतःहून चांगले निर्णय घेता येतात.—अनुवाद ६:६, ७; कलस्सैकर ३:२१.
काही बायबल विद्वानांच्या मते या वाक्यांशाचा अर्थ “मुलाच्या स्वभावानुसार त्याला शिक्षण दे” असा होतो. हा अर्थ योग्य आणि पटण्यासारखा वाटू शकतो. पण “मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे” या हिब्रू वाक्यांशाच्या भाषांतराचा अर्थ चांगल्या आणि नीतिमान मार्गाने जगायला शिकवणं असा होऊ शकतो. नीतिवचनं पुस्तकात दोन मार्गांबद्दल सांगितलंय. पहिल्या मार्गाला ‘चांगल्या लोकांचा मार्ग,’ ‘बुद्धीचा मार्ग’ आणि “योग्य मार्ग” असं म्हटलंय. (नीतिवचनं २:२०; ४:११; २३:१९) तर दुसऱ्या मार्गाला ‘वाईट लोकांचा मार्ग,’ ‘मूर्खाचा मार्ग’ आणि ‘वाईट मार्ग’ असं म्हटलंय. (नीतिवचनं ४:१४; १२:१५; १६:२९) त्यामुळे “मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे” या वाक्यांशात सांगितलेला योग्य मार्ग, देवाचं वचन बायबल याप्रमाणे जीवन जगण्याला सूचित करतं.—स्तोत्र ११९:१०५.
“म्हणजे म्हातारपणीही तो त्यापासून वळणार नाही.” जेव्हा आईवडील आपल्या मुलाला देवाच्या नैतिक स्तरांबद्दल शिकवतात, तेव्हा तो आयुष्यभर योग्य मार्गावर चालत राहील याची शक्यता जास्त असते. पण याचा असा अर्थ होत नाही, की ज्या मुलाला चांगलं प्रशिक्षण मिळालंय तो कधीच योग्य मार्गापासून किंवा देवाच्या नियमांपासून “वळणार नाही.” जसं की एखादी व्यक्ती जर वाईट लोकांसोबत जास्त वेळ घालवत असेल, तर ती “सरळ मार्ग” सोडू शकते आणि चुकीच्या गोष्टी करू शकते. (नीतिवचनं २:१२-१६; १ करिंथकर १५:३३) असं असलं तरी, आईवडील आपल्या मुलांना देवाच्या स्तरांप्रमाणे चालायला शिकवतात, तेव्हा ते त्यांना जीवनात यशस्वी व्हायला मदत करत असतात.—नीतिवचनं २:१, ११.
नीतिवचनं २२:६ याचा मागचा-पुढचा संदर्भ
नीतिवचनं २२ व्या अध्यायात बऱ्याच म्हणी वाचायला मिळतात. जीवनातल्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये देवाची बुद्धी आपल्याला कशी मदत करू शकते याबद्दल त्यात सांगितलंय. या म्हणींवरून कळतं, की यहोवाच्याa नजरेत चांगलं नाव कमावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एक व्यक्ती नम्र, उदार आणि मेहनती असेल तरच ती चांगलं नाव कमावू शकते. (नीतिवचनं २२:१, ४, ९, २९) याउलट इतर वचनांतून कळतं की एक व्यक्ती जेव्हा देवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष करते आणि गरिबांवर अत्याचार करते, तेव्हा तिला वाईट परिणाम भोगावे लागतात.—नीतिवचनं २२:८, १६, २२-२७.
नीतिवचनं २२ व्या अध्यायातली बरीचशी वचनं मुलांना प्रशिक्षण देण्याबद्दल नसली, तरी त्यात जीवनाच्या मार्गाबद्दल सांगितलंय. त्यामुळे आपल्याला देवाची पसंती आणि खरा आनंद मिळू शकतो. (नीतिवचनं २२:१७-१९) आईवडील आपल्या मुलांना जेव्हा या मार्गावर चालायला मदत करतात, तेव्हा ते त्यांच्या मुलांना सगळ्यात चांगलं जीवन जगायला मदत करत असतात.—इफिसकर ६:१-३.
नीतिवचनं पुस्तकात काय सांगितलंय हे जाणून घ्यायला खाली दिलेला व्हिडिओ पाहा.
a यहोवा हे देवाचं नाव आहे. (स्तोत्र ८३:१८) “यहोवा कोण आहे?” हा लेख पाहा.