येशूचं लग्न झालं होतं का? त्याला भावंडं होती का?
बायबलचं उत्तर
येशूचं लग्न झालं होतं की नव्हतं याबद्दल बायबलमध्ये काहीही सांगितलेलं नाही. असं असलं तरी, त्याचं लग्न झालं नव्हतं हे बायबलमधल्या काही गोष्टींवरून स्पष्टपणे कळतं.a खाली दिलेल्या गोष्टींचा विचार करा:
१. बायबलमध्ये बऱ्याचदा येशूच्या घरच्यांबद्दल वाचायला मिळतं. तसंच, त्याच्या सेवाकार्यात आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी ज्या स्त्रिया त्याच्यासोबत होत्या, त्यांच्याबद्दलही आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. पण त्याच्या बायकोबद्दल मात्र बायबलमध्ये कुठेही वाचायला मिळत नाही. (मत्तय १२:४६, ४७; मार्क ३:३१, ३२; १५:४०; लूक ८:२, ३, १९, २०; योहान १९:२५) बायबल याबद्दल काहीच का सांगत नाही याचं तर्काला पटणारं कारण म्हणजे त्याचं मुळात लग्नच झालं नव्हतं.
२. देवाच्या सेवेत जास्त वेळ घालवण्यासाठी जे लग्न करत नाहीत त्यांच्याबद्दल येशूने आपल्या शिष्यांना असं म्हटलं: “ज्याला [अविवाहित राहणं] शक्य आहे त्याने हा निर्णय घ्यावा.” (मत्तय १९:१०-१२) अशांसाठी येशूने चांगलं उदाहरण मांडलंय.—योहान १३:१५; १ करिंथकर ७:३२-३८.
३. येशूच्या मृत्यूआधी त्याने त्याच्या आईची जबाबदारी त्याच्या एका शिष्याला दिली. (योहान १९:२५-२७) जर त्याचं लग्न झालं असतं किंवा त्याला मुलं असती, तर त्याने त्यांचीही जबाबदारी कोणावर तरी नक्कीच सोपवली असती.
४. बायबलमध्ये पतींसाठी येशूचं उदाहरण वापरण्यात आलंय. पण जर त्याची बायको असती, तर त्याने त्याच्या बायकोला कसं वागवलं याबद्दल बायबलमध्ये सांगितलं नसतं का? उलट बायबलमध्ये म्हटलंय: “पतींनो, ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मंडळीवर प्रेम केलं आणि तिच्यासाठी स्वतःला अर्पण केलं, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या पत्नीवर प्रेम करा.” (इफिसकर ५:२५) शिवाय, येशूचं खरंच लग्न झालं असतं, तर एक खरोखरचा पती म्हणून त्याचं चांगलं उदाहरण इफिसकर ५:२५ मध्ये वापरण्यात आलं नसतं का?
त्याला भावंडं होती का?
हो, येशूला सहा किंवा त्यापेक्षा जास्त भावंडं होती. त्याच्या भावांचं नाव याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा होतं. तसंच, त्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त बहिणीही होत्या. (मत्तय १३:५४-५६; मार्क ६:३) येशूची ही भावंडं मरीया आणि योसेफची मुलं होती. (मत्तय १:२५) बायबलमध्ये येशूला मरीयाचा ‘पहिला मुलगा’ म्हटलंय. यावरून कळतं की तिला आणखी मुलं होती.—लूक २:७.
येशूच्या भावांबद्दल असलेले गैरसमज
मरीया आयुष्यभर कुमारी राहिली या कल्पनेला खरं ठरवण्यासाठी काही जणांनी “भाऊ” या शब्दाला वेगवेगळा अर्थ दिलाय. उदाहरणार्थ, काही जणांना वाटतं, की येशूचे भाऊ योसेफच्या आधीच्या बायकोपासून झालेली मुलं होती. पण बायबल सांगतं, की दावीदला वचन दिलेल्या राजपदाचा कायदेशीर हक्क येशूला वारसा म्हणून मिळाला. (२ शमुवेल ७:१२, १३; लूक १:३२) जर योसेफला येशूपेक्षा मोठी मुलं असती, तर त्याच्या सगळ्यात मोठ्या मुलाला हा वारसा मिळाला असता.
“भाऊ” हा शब्द येशूच्या शिष्यांना सूचित करू शकतो का? या गोष्टीला बायबलमध्ये आधार नाही. कारण बायबल सांगतं की एके काळी “[येशूचे] भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.” (योहान ७:५) येशूचे भाऊ आणि त्याचे शिष्य वेगवेगळे होते असं बायबलमधून कळतं.—योहान २:१२.
आणखी एक गैरसमज म्हणजे येशूचे भाऊ त्याचे चुलत किंवा मावस भाऊ होते. पण ग्रीक शास्त्रवचनं लिहिणाऱ्या लेखकांनी “भाऊ” आणि “नातेवाईक” या शब्दांसाठी वेगवेगळे शब्द वापरलेत. (लूक २१:१६; कलस्सैकर ४:१०) बायबलचे बरेच विद्वान मान्य करतात, की येशूचे भाऊ आणि त्याच्या बहिणी ही त्याची सख्खी भावंडं होती. जसं की, द एक्सपोझिटर्स बायबल कमेंट्री या संदर्भ पुस्तकात असं म्हटलंय: “‘भाऊ’ या शब्दाचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे . . . येशूचे भाऊ मरीया आणि योसेफची मुलं होती. तसंच, येशूचा आणि त्यांचा जन्म एकाच आईच्या पोटी झाल्यामुळे म्हणजे मरीयाच्या पोटी झाल्यामुळे ते येशूचे सख्खे भाऊ होते.”
a बायबलमध्ये ख्रिस्ताला “नवरा मुलगा” म्हटलंय. पण मागच्या-पुढच्या वचनांवरून कळतं, की अशा प्रकारचे उल्लेख लाक्षणिक अर्थाने करण्यात आलेले आहेत.—योहान ३:२८, २९; २ करिंथकर ११:२.